कथा मालिका : व.नि.ता ( भाग ४)
विषय: कौटुंबिक कथा
भाग ४:
©️Anjali Minanath Dhaske
वनिता आई वडिलांकडे प्रसाद बद्दलं तक्रार सांगायला गेली की ते काहीही ऐकून न घेता प्रसादचे गुणगान गायला सुरुवात करायचे. सासरी पैसे वेळच्या वेळी पोहोचत असल्याने त्यांना काहीही सांगून फारसा ऊपयोग नव्हता. या वेळीही तिने प्रसादशी कोणतीही चर्चा, भांडण न करता स्वतःच्या सगळ्या शंकांचे शांतपणे ठोस पुरावे मिळवून निरसन करण्याचे ठरविले. तिने घरातले वातावरण बिघडू न देता दिनक्रम सुरू ठेवला. प्रतीकचा पहिला वाढदिवस गावी धुमधडाक्यात साजरा केला.
वनिता आता फार प्रश्न विचारत नाही, शंका घेत नाही, भांडण करत नाही म्हंटल्यावर प्रसाद निर्धास्त झाला. असेच दिवसामागून दिवस जात राहिले. एक दिवस शेजारच्या काकूंनी वनिताला सांगितले की , ' आदल्या दिवशी त्या रात्री सहकुटुंब जेवायला हॉटेलात गेल्या होत्या तेव्हा तिथे प्रसाद त्यांना काही माणसांसोबत बराच उशिरापर्यंत बसलेला दिसला होता.' हे ऐकल्यावर प्रसादची बाजू सावरायला तीने हसून, " मित्रांना भेटायला गेले होते " म्हणत विषय टाळला.
अजूनही प्रसाद नक्की काय काम करतो याची वनिताला काहीच कल्पना नव्हती त्यामुळे तो त्याच्या कार्यालयातील मित्रांसोबत होता की ईतर कोणा सोबत याची तिला मनातून खात्री देता येत नव्हती.
परंतू आता फक्त संयम बाळगून काही होणार नाही. याची तिला जाणीव झाली तीने अधिक सावध रहायला सुरुवात केली. नवर्याला फोन आला व तो गॅलरीत जावून हळू आवाजात बोलायला लागला की तीही दाराच्या पडद्यामागे लपून त्याचे बोलणे ऐकू लागली. कोणाला तरी माणसे हवी आहेत, रेट परवडत नाही, किती वाजता भेटायचे? कोणीतरी मुलं पाठवत आहे, काम नक्की होईल, अशा आशयाची वाक्ये कानावर पडत होती. त्यातून तिला फार अर्थ बोध होत नव्हता. परंतू तिने डोळे आणि कान कायम उघडे ठेवून वावरायला सुरवात केली.
या सगळ्या प्रयत्नात तिला प्रसादच्या मोबाईलचा पासवर्ड मिळाला . प्रसाद एक मिनिटही फोन स्वतःच्या नजरेआड करत नसे. रात्री घरी आल्यावर झोपतांनाही तो मोबाईल बंद करून मोबाईलला उशी खाली ठेवून झोपत असे. कधी कधी तो वनिताची परीक्षा बघण्यासाठी म्हणून स्वतःचा मोबाईल तिच्या हाताशी येईल असा ठेवत असे तेव्हा वनिताही आवर्जून त्याच्या मोबाईलकडे दुर्लक्ष करत होती. कोणताही संशय न येता त्याचा मोबाईल हातात मिळविण्यासाठी विनिता योग्य संधीची वाट बाघत होती. ती संधी तिला लवकरच मिळाली.
प्रसाद तापाने फनफनला असतांना वनिता त्याचा दवाखाना, खाणे पिणे यांची काळजी घेत होती. प्रसाद औषधांच्या गुंगीत असल्याने अचानक बराच वेळासाठी त्याचा फोन वनिताच्या हाती लागला. तिने फोन उघडून फोटो गॅलरी, मेसेज,मेल बॉक्स चेक करत असतांना तिला काही माहिती मिळाली .
मेल बॉक्स मधल्या मेल वरुन प्रतीकच्या जन्माआधीच प्रसादची नोकरी गेलेली होती. त्याला नोकरी साठी ब्लॅक लिस्ट केल्याने त्याला ईतर कुठेही नोकरी मिळणार नव्हती. याची माहिती तिला मिळाली. प्रतीक सोबत खेळण्यात तो दिवस दिवस घरीच असे याची तिला आठवण झाली. तीने कामाबद्दल चौकशी सुरू केली होती तेव्हा त्याने पुन्हा कामावर जायला सुरवात केली होती. तेव्हा तो कामावर जायचे फक्त नाटक करत होता. याची जाणीव झाल्यावर तिला मोठा धक्का बसला.
फोटो गॅलरीमध्ये अनेक पुरुषांचे फोटो होते. मेसेज मध्ये ही वेगवेगळ्या पुरुषांनी वेगवेगळ्या वेळी प्रसादला भेटायला बोलाविले होते. यावरून फार काही कळत नव्हते.
नोकरी जाऊनही घर खर्च भागविण्यासाठी सध्या प्रसाद नेमके काय काम करतो? नोकरी गेली आहे हे स्पष्टपणे न सांगता रोज कामावर जाण्याचे नाटक का करतो? याचा उलगडा काही केल्या होत नव्हता. कंटाळून तीने घर कामात लक्ष गुंतवण्याचा प्रयत्न सुरू केला.
तेवढ्यात प्रासदचा मोबाईल वाजला. मोबाईलच्या स्क्रीनवर ' ऑफिस ' हे नाव झळकले . वनिताची उत्सुकता चाळवली. प्रसाद औषधाच्या गुंगीत शांत झोपला होता म्हणून तिने भीतभीतच फोन सुरू केला. फोनवरचे बोलणे ऐकून तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तिने एका झटक्यात मोबाईलला आपल्या पासून दूर फेकले.
क्रमशः
©️Anjali Minanath Dhaske
पुणे
प्रसादला ब्लॅक लिस्ट का केले? नोकरी नसतांना त्याने रोज कामावर जाण्याचे नाटक का केले? नोकरी नसतांना आता ' ऑफिस ' मधून फोन कसा आला ? फोन घेतल्यावर वनिताची अवस्था इतकी बिकट का झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.
भाग १ link
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html
भाग २ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html
भाग ३ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html
भाग १० link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_13.html
भाग ११ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_87.html
भाग १२ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_46.html
भाग १३ link: समाप्त (The end)
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_15.html
No comments:
Post a Comment