स्त्री आणि परावलंबित्व (लेख)

 लेख: स्त्री आणि परावलंबित्व 

विषय: स्त्री आणि परावलंबित्व 

#इराराज्यस्तरीयलघुकथास्पर्धा 

©️ Anjali Minanath Dhaske 


               फार पूर्वी पासून आपल्या विचारांची जडण घडण अशी झाली आहे की, स्त्री आणि परावलंबित्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे आपल्याला भासते. 

        संसार रुपी रथाची स्त्री आणि पुरूष ही दोन चाके आहेत असे आपण वारंवार म्हणत असलो तरी प्रत्यक्षात मात्र आर्थिक बाजू सांभाळणार्‍या पुरुष रुपी चाकाला महत्व दिले गेले. घरात राबणाऱ्या  स्त्री रुपी चाकाचे अस्तित्वच दुर्लक्षित राहिले. 

         आपल्या आयुष्यात होत असणार्‍या प्रत्येक तुलनेत ' आर्थिक  स्वावलंबन' या संकल्पनेला जेव्हा प्राधान्य दिले गेले तेव्हा  त्या तुलनेत स्त्रिया सर्वाधिक परावलंबी ठरल्या. घरात ज्याच्या हाती आर्थिक व्यवहार असेल त्याच्याच हातात घरातील निर्णय घेण्याची सत्ता दिली आणि घरासाठी राबणारी स्त्री तिच्याही नकळत परावलंबी होत गेली.  

              लग्न म्हणजे संसारात एकाने आर्थिक बाजू सांभाळली तर दुसर्‍याने कौटुंबिक बाजू सांभाळायची असा साधा सरळ व्यवहार होता. आजही ज्या घरातील प्रत्येक निर्णय सामंजस्याने एकमेकांच्या संमतीने घेतला जातो त्या घरातील स्त्री कधीच परावलंबी होत नाही. संसारात ' वर्चस्व ' स्थापित करण्याची भावना निर्माण झाली तेव्हाच सामंजस्य लोप पाऊन ' पैसा म्हणजेच सत्ता " हे समीकरण प्रचलित झाले असावे. खरे पाहता स्त्री घरी असे म्हणुनच पुरुष निश्चिंत मनाने घराबाहेर पडून अर्थार्जन करू शकत होता. 

             शारीरिक बलाचा वापर होणार्‍या कामात स्त्री पुरुषावर अवलंबून असे तर कोमल स्वरूपाच्या कामात पुरुष स्त्रियांवर अवलंबून होते. मुळात दोन्ही कामांचे स्वरुप भिन्न असल्याने त्या कामांच्या तुलनेतील निकषांवर एकाने दुसर्‍याला परावलंबी ठरविणे तात्विक दृष्ट्या योग्य नाही.  पुरुष आणि स्त्री एकमेकांना पूरक मानले जात होते तोपर्यंत स्त्रीच्या बाबतीत 'परावलंबी' हा शब्द चलनात नव्हता. आयुष्यात जेव्हा  'पैसा' मोठा झाला तेव्हा कमावत्या पुरूषाची बायको परावलंबी झाली आणि कमावत्या स्त्रीचा नवरा परावलंबी मानला गेला.  ज्या घरात स्त्री पुरुष दोघेही कमावते झाले तिथेही आर्थिक स्वातंत्र्याचा झेंडा मिरवणारी स्त्री मात्र छोटे मोठे निर्णय घेतांना बर्‍याच अंशी परावलंबीच राहिली होती. निर्णय घेण्याच्या दृष्टीने स्वावलंबी असणारी स्त्री जर कमावती नसेल तर सामाजिक दृष्ट्या तिला परावलंबी मानण्यात आले. 

            आदिवासी जमातीत स्त्रीया शिकारीला जात नाहीत तरी त्यांच्या समाजात त्यांना परावलंबी मानले जात नाही. कारण ते निसर्ग नियम मानतात.  स्त्री आणि पुरुष शारीरिक दृष्ट्या भिन्न असल्याने त्यांच्या योग्यतेनुसार कामांची विभागणी केलेली असते.  स्त्री शारीरिक दृष्ट्या कोमल असल्याने बळकट पुरुषाने शिकार करून/ जंगलात फिरून आणलेल्या साहित्याची  स्वच्छता, साठवणूक करणे. कातडी वाळविणे, त्यांची वस्त्रे बनवणे,  पदार्थांना  शिजवणे, सगळ्यांना खावू घालणे,  मुलांचा सांभाळ करणे अशी कामे स्त्रिया करतात. तिच्या कामाचे स्वरुप जरी कोमल असले तरी त्यांचे महत्व नाकारले जात नाही. 

            निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांना परस्पर पूरक बनविले आहे.  तेव्हा त्यांच्यात तुलना होऊच शकत नाही. आपण उच्च शिक्षित समाज असूनही स्त्री पुरुषांची सर्रास तुलना करतो.  स्त्री पुरुषांच्या शारिरीक तुलनेत स्त्री परावलंबी ठरते. यावरच न थांबता आपण दोन स्त्रियांची वर वर तुलना करत एकीला परावलंबी घोषित करतो.

        कमावत्या स्त्रीच्या तुलनेत घर सांभाळणारी स्त्री परावलंबी  ठरते.  स्वतःचे निर्णय स्वतः घेणार्‍या स्त्रीच्या तुलनेत कुटुंबाच्या मताला प्राधान्य देणारी स्त्री परावलंबी ठरते. स्वतःची कामे स्वतः करणार्‍या स्त्रीच्या तुलनेत कामात दुसर्‍यांची मदत  घेणारी स्त्री परावलंबी ठरते.  स्वतःच्या आवडीचे कपडे परिधान करणार्‍या स्त्रीच्या तुलनेत इतरांच्या आवडीचे कपडे परिधान करणारी स्त्री परावलंबी ठरते. गाडी चालविता येणार्‍या स्त्रीच्या तुलनेत गाडी चालविता न येणारी स्त्री परावलंबी ठरते. स्वयंपाक  येणार्‍या स्त्रीच्या दृष्टीने स्वयंपाक न येणारी स्त्री परावलंबी ठरते. स्वतःच्या आवडीचे पदार्थ बनविणाऱ्या स्त्रीच्या तुलनेत इतरांच्या अवडीनिवडी सांभाळणारी स्त्री परावलंबी ठरते.  स्वतःसाठीचा खास वेळ राखून ठेवणार्‍या स्त्रीच्या तुलनेत संसारात गुरफटलेली स्त्री परावलंबी ठरते. खंबीर, कणखर स्त्रीच्या तुलनेत अडचणीत सापडलेली दुबळी स्त्री परावलंबी ठरते. 

        अशा अनेक निरर्थक तुलना आपल्या आजुबाजूला सतत होत असतात म्हणुनच जगाच्या प्रत्येक कोपर्‍यात, प्रत्येक स्त्री कोणत्यातरी एका क्षणी परावलंबी ठरत असते.

              स्त्री निसर्गाची सुंदर निर्मिती आहे. प्रत्येक स्त्री खास आहे.  प्रत्येक स्त्रीची वैचारिक, शारीरिक आणि आर्थिक जडण घडण वेगवेगळ्या परिस्थितीत होत असते.  त्या सगळ्यांचा परिपाक तिच्या व्यक्तिमत्त्वातून प्रकट होत असतो. म्हणूनच प्रत्येक स्त्रीचे व्यक्तिमत्त्व भिन्न असते.  प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचा आदर व्हावा असे लोकशाहीची मूल्ये  आपल्याला सुचवितात. परंतू,  तुलना केल्याने स्त्री आणि परावलंबीत्व यांचा परस्पर संबंध ईतका घट्ट झाला आहे की अनेक स्त्रियांना वैचारीक आंधळेपणा येवून त्यांनी स्वतःचे परावलंबित्व मान्य  केले  आहे. 

           आदी शक्तीचा अंश असणार्‍या आपण स्त्रियांनी आपल्याच समस्या सोडविण्यासाठी संघर्षाची कास सोडून परावलंबीत्व स्विकारले. आपल्या आत असणार्‍या प्रचंड ऊर्जेला डावलून इतरांच्या मदतीवर विसंबून राहणे पसंत केले. प्रत्यक्षात आहे त्या परिस्थितीत स्वतःचा स्विकार करून आदर करण्यापेक्षा इतरांच्या सहानुभूती वर जगणे स्विकारले. इतरांशी तुलना करत आपणच ' परावलंबित्वाशी ' आपले नाते  घट्ट  केले. 

           स्त्री परावलंबी नव्हती.  परावलंबी नाही.  जगाचा  उद्धार करण्याची क्षमता असलेल्या स्त्रीने ' परावलंबित्व ' या संकल्पनेचा स्विकार केल्यास किंवा  ईतर स्त्रियांच्यावर ही संकल्पना लादल्यास समाजाचा वैचारिक पाया मात्र अधिक ढासळत जाईल. म्हणूनच भविष्यातही स्त्री परावलंबी राहणार नाही यासाठी प्रत्येकीने स्वतः  प्रयत्न करायला हवेत.  परावलंबित्वाचा स्त्रीच्या विचारांवर लादलेला संबंध मोडीत काढून स्वावलंबनाची विस्तृत व्याख्या निर्माण करायला हवी.  स्वतःच्या क्षमतांची जाण ठेवत स्वावलंबनाचे धडे गिरवत पुढच्या पिढ्यांनाही  ' नवे विचार, नवे आदर्श ' द्यायला हवे. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या प्रतिभेचा शोध घ्यायला हवा.  शारीरिक, वैचारिक आणि आर्थिक स्वावलंबनाचा योग्य अर्थ स्वीकारून समाजातील प्रत्येक स्तरावर  तो रुजवायलाही हवा. 


©️ Anjali Minanath Dhaske 

पुणे 

टिप: लेखातील विचार हे सर्वस्वी माझे  आहेत. आपण सहमत नसल्यास इतर विचारांचाही मला आदर आहे. लेखन आवडल्यास नावासहितच शेअर करायला हवे.  लाईक, कमेंट  करण्याची सक्ती नसली तरी त्यांचा धो धो पाऊस पाडण्यास माझी अजिबात हरकत नाही. धन्यवाद



2 comments: