व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी ( भाग ८)

कथा मालिका :  व.नि.ता ( भाग ८)

विषय: कौटुंबिक कथा

भाग ८:

©️Anjali Minanath Dhaske 

       वनिताला लवकरात लवकर निर्णय घेणे भाग होते. विना नोकरी करता मिळणार्‍या पैशांची चटक लागल्याने प्रसाद सुधारणार नव्हता. उलट तिच्या मुलांचे भविष्य धोक्यात येणार होते.  तिने मनाशी काहीतरी पक्के केले.  दागिने, थोडे पैसे, दोन ड्रेस आणि प्रतीकचे थोडे कपडे घेवून ती घराबाहेर पडली.

               वर्षभरापूर्वीच तिला कलकत्त्याच्या एका सेवाभावी संस्थेची माहिती मिळाली होती. अगदी शेवटचा पर्याय म्हणून तिने त्या संस्थेचा पत्ता असलेला कागद स्वतःजवळ जपून ठेवला होता. अजूनही प्रसाद सुधारेल या आशेवर ती दिवस ढकलत राहिली असती तर एक दिवस प्रतीकही या दलदलीत ढकलला गेला असता. आता तर काळजीत गर्भातील दुसर्‍या निष्पाप जिवाची भर पडली होती. म्हणूनच प्रसाद सुधारेल या आशेचा दोर कापत तसेच मनात परतीचा मार्ग बंद करूनच तिने कलकत्त्याचा मार्ग स्विकारला. 

        बस बदलत बदलत ती कलकत्त्याच्या सेवाभावी संस्थेत दाखल झाली. तिथे देबाश्री ताई सगळ्या संस्थेचा कार्यभार सांभाळत होत्या.  त्यांनी तिची प्रेमाने चौकशी केली.  तिला आश्रमातील एक खोली रहायला दिली.  ती स्वतःच्या मर्जीने आश्रमात दाखल झाली आहे या आशयाचा कागद तिला सही करण्यासाठी दिला.  पुन्हा फसवणूक तर होणार नाही? या भीतीने तिच्या हातातले त्राणच गेले. आता भविष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे या काळजीने तिचे अश्रू अनावर झाले. आश्रमात येणार्‍या प्रत्येकाकडून असा कागद लिहून घेतला जातो. यात काळजी करण्यासारखे काही नाही अशी हमी तिला देबाश्री ताईंनी दिली. प्रसादकडेही ती फार काळ सुरक्षित नव्हतीच. तिनेही मन घट्ट करून देवावर सगळे सोडून कागदावर सही केली.

         सुरुवातीला तिला आश्रमातील सगळ्यांमधे मिळून मिसळून रहायला अवघड जात होते. आश्रमात अनाथ लहान मुले होती. घरच्यांनी किंवा नवर्‍याने पैशासाठी बाजारात विकलेल्या काही स्त्रियांची सुटका करून त्यांनाही इथे राहण्याची सोय केली होती. वेगवेगळ्या  वयाच्या अनेक निराधार स्त्रिया होत्या. आश्रमातील  मुलांना शिकवण्याची सोय होती. स्त्रियांनाही शिकण्याची आवड असेल तर शिक्षण दिले जात होते. ज्यांना शिक्षणात आवड नाही त्यांना इतर कला शिकवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली जात होती. स्त्रियांना आश्रमातील विविध विभागात काम करून पैसे मिळविता येत होते. ज्यांना आश्रमा बाहेर नोकरी करण्याची इच्छा होती त्यांना तशी परवानगी दिली जात होती. आश्रमाबाहेर जाणार्‍या स्त्रियांना संध्याकाळी सात वाजण्याआधी आश्रमात परतण्याची सक्ती होती. आश्रमात स्त्रिया आणि लहान मुले यांनाच प्रवेश असल्याने आश्रमातील वातावरण अतिशय सुरक्षित होते. आश्रमातील प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागविले जावे अशी देबाश्री ताईंची शिस्त होती. आश्रमातील नियमांची रचनाच अशी होती की कोणीही कोणालाही त्रास देत नसे. तसेच प्रत्येकीला आश्रमातील काहीना काही काम करावेच लागत असे. 

         आश्रमातील अनाथ मुलांच्या राहण्याचा व शिक्षणाचा खर्च आश्रम करत असे. ज्या स्त्रियांसोबत त्यांची लहान मुले आहेत त्यांना मात्र मुलांच्या, स्वतःच्या शिक्षणाचा व खाण्यापिण्याचा खर्च स्वतः करावा लागत असे.  त्यांची सुरक्षित वातावरणात राहण्याची सोय मात्र आश्रमा तर्फे केली जात असे. त्या मोबदल्यात आश्रमातील कामे निःशुल्क करावी लागत.

      तिथल्याच शिवणकाम विभागात काम करणार्‍या व मराठी बोलणार्‍या सुमनशी वनिताची मैत्री झाली. आश्रमात आपल्याला रहायला जागा मिळाली, खायला अन्नही मिळते. या भावनेने वनिताने आश्रम झाडणे, स्वयंपाकात मदत करणे, देबाश्री ताईंच्या कार्यालयाची स्वच्छता करणे अशा कामांना स्वतःहून सुरुवात केली. 

            सुरवातीचा महिनाभर देबाश्री ताईंने  तिला आश्रमात रुळायला मदत व्हावी म्हणून तिला आवडेल ते काम करण्याची मुभा दिली. त्या  तिच्या टापटीप काम करण्याने प्रभावित झाल्या. पदरी एक मूल असतांना पोटात वाढणार्‍या गर्भाची काळजीही तिला घ्यायची होती. आश्रमातील कामे करत असतांनाच तिने आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनणे गरजेचे होते.

            इकडे वनिताचा शोध तिच्या सासरचे आणि माहेरचे लोक घेत होते. प्रसादला वनिताच्या जाण्याचे फारसे दुःख नव्हते परंतू जातांना ती सोबत दागिने आणि मुलाला घेवून गेली याचे त्याला जास्त वाईट वाटले होते. वनिताने कलकत्त्याचा उल्लेख देखील कधी कुणाजवळ न केल्याने ती महाराष्ट्रा बाहेर गेली असेल याची कोणाला शंका देखील आली नाही. त्याच कारणाने ती सुरक्षित ही राहिली. 

          वनिताला माहीत होते घराची आठवण काढून रडण्यात काही अर्थ नाही. मुलांना चांगले आयुष्य द्यायचे असेल तर तिला खंबीरपणे आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे आवश्यक आहे. वाणिज्य विभागातून पदवी शिक्षण पूर्ण असल्याने देबाश्री ताईंने तिला आश्रमातील प्रत्येक विभागाच्या जमा खर्चाचा लेखाजोखा मांडून ठेवण्याची जबाबदारी दिली. तिच्या कामात नीटनेटकेपणा होता. संस्थेच्या प्रत्येक जमा खर्चाची माहिती संगणकात ही साठवावी लागत असे. थोड्याच दिवसात तेही काम वनिताने शिकून घेतले. अशा प्रकारे तिचे बाळंतपण सुखरूप होईपर्यंत संस्थेतील नोकरी देवून त्यांनी तिला आर्थिक मदत केली.


क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

वनिताचा आश्रमात येण्याचा निर्णय योग्य ठरेल का? तिच्या मुलांचे भविष्य ती घडवू शकेल का? कधीच घरा बाहेर न पडणारी ती इतक्या दूर आल्यावर इथे टिकाव धरू शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

भाग १  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html

भाग ७ link:

भाग ९ link:




No comments:

Post a Comment