व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी (भाग १)

  

कथा मालिका :  व.नि.ता ( भाग १)

विषय: कौटुंबिक कथा

भाग १:

©️Anjali Minanath Dhaske 

                 वनिताने गावाकडच्या महाविद्यालयात पदवी शिक्षण पूर्ण केले होते.  शहरात चांगल्या नोकरीवर असलेल्या रूबाबदार प्रसादचे स्थळ सांगून आल्यावर तिच्या घरात आनंदी आनंद झाला . वनिता आणि प्रसाद यांचे लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडले होते. लग्नात वनिता वीसची तर प्रसाद पंचवीस वर्षे वयाचा होता. वनिताला दोन बहिणी आणि एक भाऊ होता. वडिलांची परिस्थिती बेताची असल्याने मुलींच्या शिक्षणापेक्षा लग्न करून देण्याकडे त्यांचा कल जास्त होता. 

        लग्नानंतर काही महिने वनिता प्रसादच्या कुटुंबासोबत गावच्या घरीच राहिली. खर म्हणजे तिला नवर्‍यासोबत शहरात राहण्याची व पुढचे शिक्षण पूर्ण करण्याची ईच्छा होती. प्रसाद दर आठवड्याला गावी येणे जाणे करत होताच. राजा राणीचा संसार असावा हे स्वप्नं तिला खुणावत होते. वनिता शहरात जाण्यासाठी प्रसादच्या मागे लागली होती.  वनिताच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रसादने आई वडिलांचे कारण देत तिला शहरात नेण्याचे टाळले होते.  वनिताच्या माहेरच्यांनी ही एक दोन वेळा सासरकडच्यांना सुचविले की, नवीन जोडप्याने शहरात संसार मांडून एकत्र राहावे. नवीन नवरीला शहराची हवा लागली तर ती सासू सासर्‍यांचे कधीच काही करत नाही अशी भीती सासरच्या मंडळींना वाटत असल्याने त्यांनीही तिला शहरात पाठविण्याचे फार मनावर घेतले नाही. 

     लग्न होऊनही मुलाचे शहरात खाण्याचे आबाळ होतात ही गोष्ट लक्षात आल्यावर  सासरच्यांनी वनिताला शहरात जायला परवानगी दिली. प्रसाद मात्र आता महागाईचे कारण पुढे करत तिला नेणे टाळत राहिला.  यातच वर्ष निघून गेले.  घरात आता पाळणा हलायला हवा असे वाटून प्रसादच्या आई वडिलांनी वनिताला शहरात नेण्याचा आग्रहच सुरू केला तेव्हा मात्र प्रसादचा नाईलाज झाला. 

            अखेर शहरातील  दोन खोल्यांमधे वनिता प्रसादने संसार थाटला. वनिता आवडीने रोज प्रसादला डबा बनवून देई. प्रसादही संध्याकाळी तिच्या ओढीने घरी परतत होता. दिवस आनंदात जात होते.  सुटीच्या दिवशीही प्रसादला काम असे.  वनिता घरात एकटी कंटाळून जाई.  तिने प्रसादला पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची तिची ईच्छा अनेकदा सांगून पहिली. सध्याच्या पगारात फक्त घर खर्च भागविणे शक्य असल्याने शिक्षणासाठी अधिक खर्च करणे शक्य नाही म्हणत त्याने तो विषयही मोडीत काढला. माहेरच्यांकडून कसलीही मदत होणार नाही याची तिला खात्री असल्याने तिनेही शिक्षणाचा विषय डोक्यातून तात्पुरता काढून टाकला. बाहेर फिरायला जावू म्हणुन एकदा तिने पिच्छा पुरविला तेव्हा त्याने सिनेमाची दोन तिकिटे काढून आणली.  तिला सिनेमाला घेवून गेला.  

           सिनेमा सुरू झाला आणि प्रसादचा फोन वाजला. ऑफिसचे काम आहे म्हणून तो बाहेर पडला.  वनिताने त्याला खूप फोन केले होते पण त्याचा फोन लागत नव्हता. ती शहरात अजून रुळली नव्हती. त्याची वाट पहावी की घरी जावे या गोंधळात सिनेमा संपण्याची वेळ झाली.  तेवढ्यात धापा टाकत  प्रसाद तिच्याजवळ येवून बसला.  तिची चिडचिड झाली होती परंतू स्थळाचे भान ठेवता तिने गप्प राहणे पसंत केले.  घरी गेल्यावर मात्र त्यांचे कडाक्याचे भांडण झालेच. नोकरी टिकवायची असेल तर सुट्टीच्या दिवशी पण काम करावे लागते याच मतावर प्रसाद ठाम होता.  दोन दिवसांच्या अबोल्यानंतर तिनेच अखेर माघार घेतली. प्रसादने मात्र  त्या दिवसानंतर  सुट्टीच्या दिवशी तिच्यासोबत बाहेर जाणे सोडून दिले . 

        प्रसादने लवकरच दोन खोल्यातून तीन खोल्यांमधे संसार हलविला.  नवर्‍याची नोकरीत प्रगती होत आहे म्हणुन वनिता ही समाधानी होती. प्रसादला आवडत नसल्याने घराबाहेर ती फारशी पडत नव्हती.  त्यामुळे शेजारी राहणार्‍या कुटुंबाशी तिच्या ओळखीही खूप नव्हत्या. सामान आणण्याकरता बाहेर पडतांना एक दोघींशी दृष्टी भेट फक्त होत राही .

   प्रसाद त्याच्या कामामधे अधिकाधिक व्यग्र होत गेला तसे तिला घर खायला उठले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करावे, सासू सासर्‍यांना आपल्याकडे  रहायला बोलावून घ्यावे असे तिला फार वाटत असे. परंतू शहरी भागातील जीवन  त्यांना मानवणार नाही ही सबब देवून प्रसाद त्यांना बोलाविणे टाळत  वनितालाच दर महिन्या दोन महिन्यांनी आठ दहा दिवस गावी पाठवत असे.  वनिताच्या माहेरी शेती असल्याने तिचे आईवडील ही शहरातल्या तिच्या घरी कधी येत नसत. अशातच तिला दिवस गेले. 

क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

वनिताने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले का? नवीन लग्न झालेले असूनही प्रसाद कामाला इतके महत्व का देत आहे? वनिताच्या कोणत्याही मागणीला तो का टाळत आहे?  या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html

भाग ५ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_68.html


भाग ६ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_9.html


भाग ७ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_71.html

भाग ८ link:



भाग १३ link: समाप्त (The end)

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_15.html




No comments:

Post a Comment