#निसर्ग
#प्रदूषण
राम तेरी गंगा मैली हो गयी .........
हे गाणे फार जुने असले तरी आजच्या परिस्थितीत त्याची दखल गांभिर्याने घेण्याची गरज आहे.
रुढी ,परंपरा ,संस्कृती जपायला हवी. पिढी दर पिढी स्वतःच्या सोयी नुसार काही बदल त्यात केले जातात. परंतू समाजाचा, निसर्गाच्या सद्य परिस्थितीचा विचार करून काही बदल आवर्जून करायला हवे. संस्कृतीत कालानुरूप होणारे बदल हे मात्र कायम समाजाच्या दृष्टीने हितकारक असावेत.
'एक गाव एक गणपती' ही संकल्पना मागे पडून घरोघरी गणपती ही प्रथा सुरू झाली आहे. तेव्हा 'माझा बाप्पा माझी जबाबदारी ' ही संकल्पना आत्मसात करायला हवी. मनाला पटतील असे बदल स्विकारत निसर्गाची मदतीची हाक ऐकायला हवी. व्यावसायिक सांडपाण्याचा विनियोग योग्य पद्धतीने होण्यासाठी काही कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. नद्यांचा गाळ वेळोवेळी उपसून पूर परिस्थितीचे संकट टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
कोणत्याही नदीच्या किंवा समुद्र किनारी नजर फिरवली तर मानवनिर्मित कचर्याचे ढीग दृष्टीस पडतात. एखादे सरकार, संस्था किंवा संघटना यासाठी काम करेल हे पुरेसे नाही. निसर्गाच्या सान्निध्यात मजा लुटतांना निसर्गाचा आदर राखला जावा, त्याच्या प्रती कृतज्ञ भाव मनात कायम असावा. असे संस्कार भावी पिढ्यांना अधिक जाणीवपूर्वक द्यावे लागतील.
या साठी आजच्या पालकांनी प्रयत्न करायला हवेत. मुलांमधे जागरूकता निर्माण करायला हवी. अन्यथा पाणी शुद्ध करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले तरी नैसर्गिक स्त्रोत नष्ट झालेत किंवा प्रदूषित राहिलेत तर त्याचे दूरगामी परिणाम हे अत्यंत वाईट स्वरूपाचे असतील.
तेव्हा वेळीच सावध होण्याची गरज आहे.
अडचणी अनेक आहेत, कारणे अनेक आहेत परंतु त्या सगळ्यांवर मात करून निसर्गाचा मान राखत संस्कृती जपणारा समाज निर्माण करण्याची गरज ही आहेच.
जागरूक होणे.... संघटित होणे... आणि सांस्कृतिक वारसा पुढे नेणे.
हीच काळाची गरज आहे.
©️Anjali Minanath Dhaske
No comments:
Post a Comment