एक पिंजरा स्वतःसाठी


#एक_पिंजरा_स्वतःसाठी    
                    गेले पंधरा दिवस माझा छळ सुरू आहे. तसा तो रोजचाच आहे म्हणा ... पण आता उन्हाळ्याची चाहूल लागली म्हणून की काय जरा जास्तच वाढलाय. मोकळ्या  हवेत जरा बसावं म्हटलं तर ते भसकन अंगावर येतात अगदी जादुगराच्या टोपीतून निघावे तसे. दिवसभर मेले  धुडगूस घालतात . ज्या ताटात खातात ( पाणी पितात)त्यातच विष्टा करतात. यांना स्वच्छता नावाला आवडत नाही. चिवुसाठी म्हणून काही ठेवावं तर हेच फडशा पाडतात.   यांना काडी काडी गोळा करून घरटे बांधायला नको . कुंडीतली हिरवळ नष्ट करून तिथेच अंडी द्यायची .  बरं अंडी दिलीत तर ती उबवायला नको? जातात निघून .... म्हणजे झाडं जातं ते जातं पिल्ल ही तयार होत नाही . " तेल गेले ...तूपही गेले हाती राहिले .... धुपाटणे (अंडे) " अशी गत होते.  मेहनतीने वाढवलेली नाजूक रोपं जणू नष्ट करण्याचा  त्यांनी विडाच उचलला आहे. काल तर झेनियाची ५० नाजूक रोपं त्यांनी अशी काही तुडवली... तोडली की जीव चिडला😠 ... रडकुंडीला 😭आला. खुडून टाकलेली रोपं.... त्यात सगळीकडे चिखल माती पसरवलेली बघून मनात सगळे दुष्ट विचार फेर धरुन नाचू लागले.🤔 बंदूक असती ना हाती तर एकेकाला नेम धरून मारलं असतं. 🙄इथं फटाक्याची बंदूक सपडत नाही घरात  लवकर तिथे खरी बंदूक कधी यावी आपल्या हाती.  आता तर चिडचिड 😤 झाली नुसती . वाटलं हाती लागले ना तर मुंडीच पीरगाळून टाकावी एकेकाची .
कल्पनेनंच असुरी आनंद झाला.
बागकाम आवडणारी पण कबुतरांच्या त्रासाला कंटाळून गेलेली मी आणि माझं पापभिरू मन ते ... बिचारं ..  कृती काय करणार ... लागलं  लगेच दुसरे साधे उपाय शोधायला. इतके दिवस आपण पक्ष्यांसाठी पिंजरे तयार केले आता आपण स्वतःच्या घराला जाळ्या लावून  घ्यायच्या ..... पिंजरा तयार  करायचा स्वतः साठीच 😓😓.. हे मात्र मुक्त संचार करणार .... सगळीकडे.
©️ अंजली मीनानाथ धस्के


सो गया ये जहाँ

#सो_गया_ये_जहाँ

            रिया आणि आकाश एक प्रेमळ ... मनमिळावू जोडपं. कोणाच्याही अध्यात नाही की मध्यात नाही.  त्यांचं छोटंसं  कुटुंब हेच त्यांचं सारं विश्व होतं.  आज मात्र पहिल्यांदाच ते आपल्या दोन वर्षाच्या मुलाला मनात नसतांनाही ' रात्रीचा परतायला उशिर झाला तर  ? असा विचार करून घरी मावशीकडे  ठेवून ऑफिसच्या कार्यक्रमाला गेले.  जसं जसा उशीर होवू लागला तसं तसे दोघांचे लक्ष घड्याळ्याच्या काट्याकडे लागले तर चित्त घरी असलेल्या आपल्या बाळाकडे गेले.  गप्पा गोष्टी.. खाणं पिणं आवरतं घेवून त्यांनी लवकरच सगळ्यांचा निरोप घेतला.
         कार्यक्रमाविषयी ... भेटलेल्या लोकांविषयी .... बोलत दोघांनी घरची वाट धरली. घरी पोहचायला एक तास तरी लागणार होता . बाळाचा विचार मनात येवुन दोघंही अस्वस्थ झाले . वेळ जावा .. ताण कमी व्हावा  म्हणून रियाने रेडिओ वर मस्त ९० च्या दशकातली गाणी लावली. दोघं एकदम आनंदात .... हसत गाणी म्हणत घराकडे निघाली.   शनिवार म्हणून रस्त्यावर वर्दळ होतीच.  पुढच्या चौकातच त्यांची गाडी ट्रॅफिक सिग्नलला थांबली . तेवढ्यात त्यांच्या कानावर धाड धाड धाड धाड असे आवाज आले. त्या पाठोपाठ   आरडाओरडा.. जीवाच्या आकांताने मारलेल्या किंकाळ्या ऐकू आल्या.  सीट खाली  लपाव का ? असा विचार दोघांच्याही मनात आला पण काही समजायच्या  आतच एक गोळी रियाच्या छातीत  तर दुसरी आकाशच्या डोक्यात  घुसली.  गर्दीची वेळ आणि योग्य संधी साधून दोन आतंकवादी बेछूट गोळीबार करत होते. त्यांना कशाचीच पर्वा नव्हती . त्यांच्यात सैतान संचारला होता.  बराच वेळ ... धाड धाड... किंकाळ्या.. काच फुटण्याचे आवाज... हॉर्न... गाड्या एकमेकांवर आदळल्याचे आवाज .... भयाण ...भीषण ... मनाचा थरकाप उडवणारे आवाज येतंच होते.
सैतानी थैमान घालून झाल्यावर त्यांचा मोर्चा पुढच्या चौकात असलेल्या एका हॉटेल कडे वळला.
          थोड्यावेळाने  सगळं कसं शांत ... स्तब्ध... निश्चल झालं होतं. वेळ ही जणू थांबली होती.
       कारच्या सीटखाली लपलेल्या आकाशने हळूच गाडीचा ताबा घेतला . रियालाही जाग आली ..... बाळासाठी घरी जाण्याची घाई दोघांनाही होती. दोघांनी एकमकांकडे अर्थ पूर्ण नजरेने बघितले. रियाचे  लक्ष समोरच्या आरशात रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेल्या स्वत:च्या  आणि आकाशच्या देहाकडे गेले . ती विषण्ण हसली . तेवढ्यात रेडिओ वर गाणं लागलं .... " सो गया ये जहाँ ... सो गया आसमा ... सो गयी है सारी मंज़िलें... ओ सारी मंज़िलें...   सो गया है रस्ता "
                   मला खाडकन् जाग आली .... दरदरून घाम आला होता.  भीतीने  माझं काळीज धडधडायला लागलं होतं . आधी हातातंला पुलवामाच्या दुःखद बातम्यांनी खाचाखच भरलेला पेपर मी बाजूला सारला. मनात झालेली उलथापालथ थांबवण्यासाठी  दिर्घ श्वास घेवून , " हे फक्त एक  वाईट स्वप्न आहे " असं   मनाला समजावंल  खरं पण माझ्यसारखेच शहीद जवानांच्या  आईलाही  समजावता आले असते तर किती बरे झाले असते , हा  विचार मनाला चटका लावून गेला. नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि "शहीद जवानांच्या आत्म्याला शांती मिळो " असे अस्पष्ट शब्द बाहेर पडले.

©️ अंजली मीनानाथ धस्के


भावपूर्ण श्रद्धांजली....

#भावपूर्ण _श्रद्धांजली
कसली ही हाव?? माणुसकीला हरवून गेली....
भ्याड हल्ले करण्याची कशी क्रूर बुद्धी झाली...
या विकृतीची मनामनात चीड निर्माण झाली....
बलिदाने दिली ज्यांनी  ती व्यर्थ न कधी गेली ...
जवानांच्या पाठीशी समस्त जनता उभी झाली ...
बोलायचं आहे खूप पण शब्द अबोल झाली.....
लिहिणे जमेना नाही काही भावना दाटून आली.....
नयनी साठल्या अश्रूंची वाट मोकळी झाली...

शहिदांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली....

शहिदांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली....
©️ अंजली मीनानाथ धस्के






दिवसाची सुरुवात


#हसत_खेळत
#दिवसाची_सुरुवात
(वेळ सकाळची .... अगदीच घाईची ... काम करत माझी बडबड सुरू)
मी:   लवकर आटप रे उशीर होतो शाळेला . रोज रोज काय रे उशीर करायचा .काल तर अगदी थोडक्यात वाचलो . गेट वर चे काका " शेवटची दोन मिनिट राहिली आहेत गेट बंद करायला लवकर करा " असं म्हणाले होते.
मुलगा :   😱😱दोन मिनिटं होती काल गेट बंद व्हायला.
मी : हो रे दोनच मिनिट होते .... आपल्याला अजून थोडा वेळ झाला असता तर शाळेला सुट्टी मिळाली असती.😓😓😓
मुलगा : अग दोन मिनिटं होते न... मग उशीर कसा होईल.. दो मिनट भी बहुत बडी चीझ होती हैं बाबू.
मी : आता मात्र तुला बघतेच रे 😡 ... थांब जरा आलेच  😠
मुलगा : आता घाईत नको .... घरी आल्यावर बघ ... निवांत😝
मी : त्यांना डायलॉग चे पैसे मिळतात .. तुझी मात्र विनाकारण सुट्टी होईल शाळेला . आवर लवकर .... तू वेळेवर तयार असला तर ठीक नाहीतर मी एकटी निघून जाईन तुझं दप्तर घेऊन😝😝😝 तू बस  तयार होवून घरीच .
मुलगा: आलो ... आलो . हे बघ तयार आहे मी.
( आज पाच मिनिट वेळेआधीच पोहचलो  )
ज्ञान:
* आजकालच्या मुलांना उपदेश करणं सोप नाही.
* आपल्या बचावासाठीचे आवश्यक ते सगळे ज्ञान त्यांना असते.
* आपले चांगल्या सवयी लावण्याचे प्रयत्न कमी पडता कामा नये.
* हसत खेळत शिकवण दिली तर ते आपलंही सहज ऐकतात.
* दिवसाची सुरुवात ही हसत आणि हसवत केली तर पूर्ण  दिवस आनंदी होतो .
©️ अंजली मीनानाथ धस्के

व्हॅलेंटाईन डे

 #व्हॅलेंटाईन_डे
   ©️ अंजली मीनानाथ धस्के
           ती खूप अवखळ, अल्लड, बालिश...  त्याच्या संगतीने रोझ डे , चॉकलेट डे , व्हॅलेंटाईन डे असे सगळे डे खास पद्धतीने साजरे व्हावे यासाठी आग्रही असणारी.....  'टोटल फिल्मी' तर तो तेवढाच शांत , संयमी, समजूतदार..... ' वास्तवात जगणारा'. ... असे विशिष्ट एका दिवसापुरते प्रेमाचे प्रदर्शन करणे ... भेट वस्तू देणे  त्याला मुळीच आवडत नसे.  तुझं .. माझं असा जिथे भेदच नाही तिथे  प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा दिवसांची वाट का बघायची ?  असं त्याचं ठाम मत   . अशी ही दोघं विवाह बंधनात बांधली गेली .
             ती  मुद्दाम  सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या नजरा चुकवून त्याला डोळा मारी .... त्याला ठसका लागला की लगेच पाण्याचा पेला देत म्हणे , " लक्ष कुठे असतं जेवतांना? "  थोड्या दिवसातच तिच्या या खोड्या त्याच्या अंगवळणी पडल्या  .... तिला असं अव्यक्त प्रेमच जास्त सुखावतं .... आनंदी करतं हे तो ओळखू लागला . "किती  बालिश आहेस तू " असं तो म्हणत असला तरी हाच बालिशपणा त्याला तिच्या अधिक.... अधिक प्रेमात पाडू लागला.  तोही आता एक पाऊल पुढे जावून तिच्या खोड्या काढू लागला . ती स्वयंपाक घरात काम करत असली की तो हमखास तिला मिठी मारत असे आणि मोठ्याने म्हणे , " चहा घ्यावा वाटतो आहे , एक कप चहा देशील का? " त्याने केलेला ओढांचा चंबु बघून ती भीतीने ,  प्रेमाने लाजून जात असे . त्यात भर म्हणजे दिवाणखान्यात बसलेल्या सासूबाई म्हणत , " करतेच आहेस तर मलाही दे अर्धा कप " त्यावर ती घाबरी घुबरी होवून जाई . त्याला स्वतः पासून दूर लोटू पाही.... मग तो तिला अधिकच चिडवत डोळा मारून म्हणे , " तुमच्या सासूबाईंनाही हवा आहे अर्धा कप चहा ... देणार न?? " ती डोळे मोठे करुन त्याला  दटावी... पुरे आता असं विनवी पण मनातून तृप्त होवून जाई.
              कालांतराने त्यांच्या संसार वेलीवर एक सुंदर फुल उगवले . मुलाच्या संगोपनात तिचा बालिशपणा  मागे पडला. तरी तो तिला तिच्या आवडीचे चॉकलेट आणि गुलाबाचे फुल व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने  द्यायला विसरला नव्हता. तिच्यासाठी त्याच्याही नकळत तो  थोडासा फिल्मी झाला होता . तिच्यातली अल्लड पत्नी आता जबाबदार आई झाली होती . ती खऱ्या अर्थाने संसाराला लागली होती . त्याच्यासाठी आता तीही थोडी वास्तवात जगायला शिकली  होती. तिच्यातला हा बदल त्याला कितीही सुखावत असला तरी तिचा पूर्वीचा बालिशपणा ही त्याला हवा होता.
       त्याची बदली दुसऱ्या गावी झाली.  नवीन गावी स्वतःच्या हक्काच्या घरात त्यांचा संसार स्थिरावला. आता त्यांना अडवणारं ... बघणारं घरात तिसरं मोठं माणूस नव्हतं त्यामुळे  अव्यक्त प्रेमची गंमतही ती विसरून गेली .....
        बघता बघता मुलगा ३ वर्षांचा झाला . एक दिवस ती कामात गुंतलेली असतांना अचानक तिला कसली तरी आठवण झाली .
तिने मुलगा खेळण्यात दंग आहे याची खात्री करून घेतली आणि मगच  याच्या जवळ जावून बसली. याने कामातून डोकं वर काढत तिच्याकडे बघितलं तसं तिने अलगद त्याचे डोळे झाकले.... त्याच्या ओठांवर हळूच ओठ टेकले .
त्याला काही कळायच्या आत त्याच्या कानात , " हॅपी व्हॅलेंटाईन डे" असं कुजबुजली. खूप दिवसांनी पूर्वीची ती ... आज त्याला अशी अचानक भेटली . तो आनंदून गेला. त्याला काहीच कळेना. आज तर व्हॅलेंटाईन डे नाही मग हे काय नवीन .... तेवढ्यात मुलाने आवाज दिला , " मम्मी .....इकडे  ये ना.... बघ मी काय काढलंय " . तिने "आले ह बाळा " असं मुलाला  सांगितलं आणि खट्याळपणे त्याला म्हणाली ," तुलाच वाटतं न .... असं  एका विशेष दिवसाची वाट बघणार प्रेम नसावं म्हणून खास तुझ्यासाठी " . ती मुलाकडे जायला निघाली . त्यानेही ही संधी सोडली नाही . पटकन् तिचा हात पकडला... कानात हळूच बोलला ,  " मलाही तर शुभेच्छा देऊ दे"  आणि ...  मुलाला मोठ्याने सांगितलं , " मम्मी मला शुभेच्छा देते आहे .... झालं की येईलच ह बाळा" . ती पूर्वी सारखीच लाजली .  पूर्वी सारख्याच खट्याळ नजरेने  त्याच्याकडे  पाहिले आणि प्रेमाने त्याला दूर लोटून मुलाकडे गेली .तोही मागोमाग गेला.  मुलगा तिला म्हणाला  , " मम्मी..... पप्पाला दिल्या तशा  शु...भे..च्छा मलाही  हव्यात ".
त्यावर दोघेही खळाळून हसली आणि मुलाला प्रेमाने बिलगली. "हॅपी व्हॅलेंटाईन डे... बेटा" म्हणत दोघांनीही त्याच्या गालाचे मुके घेतले.  आज कुठल्याही कारणाशिवाय.... साधनाशिवाय.... खऱ्या अर्थाने त्यांनी  थोडा फिल्मी तर थोडा वास्तविक असा .... व्हॅलेंटाईन डे.. साजरा केला .
हृदयाची हृदयाला साद जाता
होती प्रेमळ मिलने......
श्वास श्वासात गुंतू लागता
एक होती स्पंदने.....
नात्यांची नात्यात वीण गुंफता
जीवन हे सुंदर बने......
प्रेमाने प्रेमाला साथ देता
एक होती सारी मने......
कवितेच्या या ओळी जणू ते प्रत्यक्षात जगत होते.
©️ अंजली मीनानाथ धस्के


हळदीकुंकू समारंभ (२०१९)

#हळदीकुंकूसमारंभ
#एक_वेगळा_प्रयत्न
             गेली सहा वर्षे मी घरी हळदीकुंकू कार्यक्रम करत नाही . त्या ऐवजी गरजूंना काही देता आलं तर ते देण्याचा प्रयत्न करते. या वेळेस माझी मैत्रीण अंजली मुंगडे माझ्या या उपक्रमात सहभागी झाली .
यावेळ विद्यार्थ्यांसाठी काही मदत करावी या हेतूने मी शाळेत गेले . तिकोने मॅडम यांना मी आमचे बजेट सांगितले आणि त्यात काय देता येईल ते  त्यांनी आम्हाला सुचवावे हा विचार मांडला. त्यावर त्यांनी निवडक विद्यार्थ्यांना देण्यापेक्षा सगळ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची बाटली द्यावी असं सांगितलं. मुलं डब्बा तर घेवून येतात पण पाणी आणत नाही. तुम्ही बाटली दिली तर आमचा प्रश्न सुटेल . मुल रोज पाणी देखील आणतील. असं त्यांनी सांगितलं.
     आम्ही दोघी  शॉपमधे गेलो . सगळ ठरवून ... शाळेचा पत्ता देवुन आम्ही परतलो. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या दिवशी  आमचे समान शाळेत पोहचले.
       शाळेने पालकांसाठी हळदीकुंकूचा कार्यक्रम ठेवला होता . त्यात ते बालवाडीच्या मुलांचे बोरन्हाण ही करणार होते.  पुढच्या पिढीला आपल्या सणांचे महत्व कळावे यासाठी त्यांनी छोटा मनोरंजनात्मक कार्यक्रम ही ठेवला होता. आमच्याही नकळत गणेश जयंतीच्या मुहूर्तावर क्रांतिवीर चाफेकर प्राथमिक शाळेत जाण्याचा योग आला.
          आम्ही नको नको म्हणत असतांनाही तिथे गेल्यावर त्यांनी आम्हा दोघींना " प्रमुख पाहुणे" घोषित केले. खरं तर कुठल्याही प्रकारचा बडेजाव आम्हाला नको होता. पण आमच्या या कृतीतून पालकांना व विद्यार्थ्यांना ही " देण्याचं  " महत्त्व कळेल. आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना त्यांच्यात निर्माण होईल असं तिकोने मॅडमच मत होतं. त्यांच्या मताचा आदर करून आम्ही प्रमुख पाहुणे पद स्विकारले  .  आमचं स्वागत श्रीफळ देऊन केले. गणेश पूजन व सरस्वती पूजन  आमच्या हस्ते केल्या गेले . आमचा परिचय विद्यार्थी व पालकांना करून दिला.  पाटील मॅडम नी हळदीकुंकूसमारंभाचे महत्त्व तर सांगितलेच पण सुंदर गीत ही सादर केले. बालवाडीच्या मॅडम नी खूप सुंदर अभिनय करून विनोदी गीत सादर केले. मलाही दोन शब्द बोलण्याची संधी दिली. आमच्या हस्ते लहान मुलांचे बोरन्हाण ही केले.
         या निमित्ताने पुन्हा माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. थोडेच वर्ष मी शिक्षिका म्हणू काम केले पण शाळेशी असलेलं नातं कधीच संपुष्टात येवू नये असंच मला वाटतं.
        खरं तर मुलांना आनंद देता यावा म्हणून आम्ही गेलो होतो पण तिथून परत येताना  मी व माझी मैत्रीण दोघीही लाख मोलाचा आनंद, समाधान व सकारात्मक उर्जा सोबत घेवून परतलो .
आमची ही छोटीशी सेवा गणेश चरणी अर्पण.......
©️ अंजली मीनानाथ धस्के