जमा_खर्च (मनोगत २०१९)



    #जमा_खर्च
एका मागून एक वर्षे गेली पण जमा खर्च काही कधी मांडला नाही किंबहुना असा हिशोब करुन सरत्या वर्षाला निरोप द्यायचं धाडस कधी केलं नाही. आजही तस धारिष्ट्य करणार नाही. वर्ष आणि त्यातले क्षण अनेक चांगल्या वाईट अनुभवांनी व्यापलेले असतात. आहारात जशा सगळ्या चवी आवश्यक तसेच आयुष्यातले विविध अनुभव देणारे हे क्षण गरजेचे असतात. कसेही असले तरी ते क्षण फक्त आपले असतात. याच भावनेने मला आयुष्य जगायला आवडतं.
माझ्याकडे  करण्यासारखं सतत काही तरी चांगल असेल तर गेलेलं आणि येणार प्रत्येक वर्ष माझंच आहे असंच मी मानते.
अनेकदा आपण " काय मिळवलं" याचा आनंद  करण्यात आपण " काय दिलं " याची जाणीव कमी होत जाते. परंतु आपण सतत काही तरी चांगल दिलं तरच काहीतरी मिळवल्याचा आनंद उपभोगता येतो.
मिळवण्याच्या स्पर्धेत बरच काही देण्याचं राहून जातं.
         या वर्षी ही fb वर फेरफटका मारत असताना momsoresso मराठी ची " १००  शब्दांची गोष्ट " ही स्पर्धा दृष्टीस पडली. प्रियांका चोप्रा जोरजोरात हसते आहे असा व्हिडिओ दिला होता त्याला अनुसरून कथा लिहायची होती.
लिहावं असं काही मनात नसतांना त्या व्हिडिओ ने एक गमतीदार प्रसंग आठवला आणि त्याच प्रसंगाला शब्दात मांडल्या गेलं.
Momsoresso चा लगेच रिप्लाय आला ," कथा खूप छान आहे पण शब्द मर्यादा १०० शब्दांची आहे तेव्हा हिच कथा १०० शब्दात लिहून पुन्हा पोस्ट करा ".
        खरं तर ही १०० शब्दांची गोष्ट लिहिण्याची स्पर्धा आहे हे लिहिण्याच्या नादात मी विसरून गेले होते. लिहिलेला प्रसंग १०० शब्दात बसवणे मला अशक्य वाटतं होत. लिहणं असो की बोलणं ..... असं तोलून मापून करणं माझा पिंडच नव्हता. स्पर्धेचा विचार बाजूला ठेवून केवळ momspresso ने पुन्हा पोस्ट करा असं म्हंटल्याने , मला जमत नसतांनाही मी तो प्रसंग १०० शब्दात लिहून काढला आणि ' पिप्पी डंपरची' या नावाने  पोस्ट ही केला.
अचानक पुन्हा fb वर फेरफटका मारतांना माझी पिप्पी डंपरची ही कथा विजेती कथा म्हणून Mom'spresso मराठी च्या पेज वर माझ्या नावासहित झळकली .
आनंद गगनात मावेनासा झाला. Momspresso बद्दल काहीच माहिती नसतांना तिथून पुढे मला त्यांच्या १०० शब्दांची गोष्ट या स्पर्धेच्या पोस्ट दिसू लागल्या . गंमत म्हणून मीही लिहू लागले . १०० शब्दांच्या दोन कथा विजयी झाल्यावर मेसेंजर वर momspresso मराठी ने ," तुम्ही आमच्या ब्लॉगर ही बनू शकता" म्हणून ब्लॉगर बनण्यासाठीची सगळी माहिती पुरवली.
      आपल्या लिखाणासाठी कोणीतरी आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देते आहे म्हंटल्यावर मीही मग Mom'spresso मराठी पेज ला भेट दिली.  तिथे जानेवारी महिन्याची टॉप ब्लॉगर काँटेस्ट सुरू होती .
आशयघन रांगोळी हा माझा स्वतःचा ब्लॉग होताच . यावर मी रांगोळ्या आणि त्याला अनुसरून कथा, कविता , लेख किंवा प्रसंग लिहीत होतेच. इथे लिहिलेला बदाम हा लेख मी Mom'spresso मराठी वर " 'बदाम आई आणि मी' त्यांची ब्लॉगर म्हणून पोस्ट केला. त्यानंतर ही बरेच लेख , कथा पोस्ट केल्या .
सोबतच १०० शब्दांच्या कथा लिहिण्याचा नादच लागला.
डोक्याला लिखाण करण्यासाठी वेगवेगळे विषय मिळत होते आणि त्यानिमित्ताने लिखाण होत होतं. वाचकांना लिखाण आवडतं होतं.  बाकी कशाची अपेक्षाही नव्हती.
जानेवारी च्या टॉप ब्लॉगर काँटेस्ट मधे माझ्या ,' बदाम आई आणि मी " या ब्लॉग ची निवड झाली. आनंदाने मी ' सातवे आसमान ' वर पोहचले.  गंमत म्हणजे momspresso मराठीने यावेळी विजेत्या ब्लॉगर चे लाईव्ह इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं होतं. मला fb वर पोस्ट करणे, like,comment आणि शेअर याव्यतिरिक्त fbचे कोणतेही फीचर माहीत नव्हते.
विशाखा चाफेकर हिने सगळं समजावून सांगितलं. खूप आत्मविश्वास वाढवला . या लाईव्ह शो च्या निमित्ताने Momspresso मराठीच्या  टॉप ब्लॉगर ऋचा मयी यांच्यासोबत मैत्री झाली . काहीच माहिती नसल्याने लाईव्ह शो ला कनेक्ट व्हायला मला बराच वेळ लागला पण विशाखा ने ही वेळ खूप शिताफीने हाताळली. मी फारच नर्व्हस झाले होते पण तिने ," हिच तर लाईव्ह शो ची गंमत असते " म्हणत माझा आत्मविश्वास टिकवून ठेवला. ऋचा मयी यांच्या सोबत जेव्हा मी लाईव्ह शो मधे झळकले तेव्हा अनेकांनी मला मी कशी बोलले यापेक्षा ,'   ऋचा मयी यांच्या चांगल्या चांगल्या कथा आम्हाला WhatsApp वर वाचायला मिळतात. तुझ्यामुळे त्यांना प्रत्यक्षात बघता आलं' अशी प्रतिक्रिया दिली.
            या प्रतिक्रियेच वाईट वाटण्यापेक्षा पहिल्याच लिखाणात आपल्याला त्यांच्याशी मैत्री करता आली आणि आपण त्यांच्या सोबत लाईव्ह शो वर झळकलो याचा आनंद जास्त झाला. Momspresso मराठी ने लिखाणासाठी व्यासपीठ तर दिलंच पण अनेक चांगल्या, वल्ली मैत्रिणीही दिल्या. ब्लॉगर लेखिका म्हणून ओळख मिळवून दिली. चांगला वाचक मिळवून दिला. लिखाणासाठीचा आत्मविश्वास दिला . यासाठी Momspresso मराठी आणि विशाखा चाफेकरचे कितीही आभार मानले ते कमीच आहे .
 यावेळी ख्रिसमसच अतिशय सुरेख असं गिफ्ट momspresso मराठी कडून मिळालं ते म्हणजे
सरत्या वर्षाला निरोप देता देता ही momspresso मराठीने टॉप ब्लॉगर म्हणून माझ्या नावाचा उल्लेख केला. माझा फोटोही त्यांच्या पेज वर झळकला .
खरंच मन भरून आलं .....

मी इतर ऑनलाईन स्पर्धेतही भाग घेतला. विशेष म्हणजे या स्पर्धांमध्ये लिखाण करायचे नव्हते तर अभिनय करायचा होता. अभिनयाचा किडा वळवळला आणि इथेही यश मिळालं.
अनेक प्रयोग केले आणि ते आप्त स्वकियांच्या पचनिही पडले.
या वर्षात मला भरभरून प्रतिसाद तर मिळालाच पण परिस्थिती कशीही असली तरी आपल्याकडे असलेले चांगले तेच देता यायला हवे हेही मी शिकले. सोशियल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने करता येतो. आपले विचार प्रभावीपणे जनमानसात पोहचवता येतात याची जाणीव झाली.
शिकण्याचा हा प्रवास आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत असाच सुरू रहावा हिच इच्छा....

 आयुष्याचा या प्रवासात वेगवेगळ्या टप्यांवर ज्यांनी लाख मोलाची साथ दिली त्या सगळ्या आप्त स्वकियांचे, मैत्रिणींचे, वाचकांचे आणि शुभ चींतकांचे मनापासून खूप खूप आभार .....
तुमच्या स्नेहामुळेच हा प्रवास सुंदर आठवणींनी सजतोय तेव्हा असाच स्नेह कायम असू द्या....
नवीन वर्षासाठी मी कधीच कुठलाच संकल्प करत नाही किंबहुना संकल्प करण्यासाठी कधीच नवीन वर्षाची वाटही बघत नाही.
 त्यामुळेच वर्षा अखेरीस जमा खर्चाचा हिशोब ही मांडत नाही. दर वर्षाला निरोप देतांना मात्र ," पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त"  असं म्हणूनच निरोप देते. नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्ष सरत जात तसं ते भरभरून ' देतही ' जातं पण या भरभरून 'घेण्याच्या ' नादात माझ्याकडे असलेलं खूप काही ' द्यायचं ' राहून जातं ......
जे द्यायचं राहून गेलेलं असतं ते येत्या वर्षात देण्याचा प्रयत्न असतो ....
ही अपूर्णतेची  जाणीवच पूर्णेतेचा प्रवास सप्तरंगी बनवते ......

शेवटी एवढंच म्हणेन....

अपनों  के प्यार में
हम गमो की फिकर करते नहीं
मंज़िलो की तलाश में
हम कभी सफर करते नहीं
जिंदगी बसती है हर सीख में
हम हार जीत में उलझते नहीं
उड़ने का जस्बा ख्वाबों में
हम इनामो से तरक्की तोलते नहीं
जीना सीखा है पल पल में
हम सालों का हिसाब रखते नहीं

© अंजली मीनानाथ धस्के
https://www.momspresso.com/parenting/article/2019-mdhiil-nviin-ttonp-blongrs

शायरी

शायरी

शायरी

शायरी

कुछ हंसी चेहरोसे नकाब इस कदर उतरे यारों की....
अब  खुबसुरती से नफरत सी हो रही हैं

©️ अंजली मीनानाथ धस्के

शायरी

शायरी

गिरगीट तो  यूही बदनाम हैं
उससे जल्द तो हमने इंसानोके रंग बदलते  देखे हैं

©️ अंजली धस्के




शायरी

शायरी

खुदा ये तेरी रहमत समझु की तेरा करम.....
भेजे जो तूने फरीश्ते वो मुझे मेरे यारों मे मिल जाते हैं

©️अंजली मीनानाथ धस्के




शायरी

शायरी

यूं  हमारी मोहब्बत
अल्फाजों की मोहताज न रहती ....
 गर  तुम इकरारे मोहब्बत बया कर देते।

©️ अंजली मीनानाथ धस्के


शायरी

शायरी

होठोसे  तो करते हो इनकार
आंखों से प्यार सा छलक जाता हैं।
तुमसे मिलने के बाद न जाने क्यों
लफ़्ज़ों से ऐतबार उठसा जाता  हैं।

©️ अंजली मीनानाथ धस्के

मोहब्बत (हिंदी)




*मोहब्बत*
दिलों दिमाग पे तो हैं
बस तुम्हारी मोहब्बत का असर
न तुम्हे पाने की ख्वाइश
न तुम्हे खोने का डर

खुदसेही बाते करते हैं
तुम्हे आईना समझकर 
न तुम्हारे इकरार की चाहत
न तुम्हारे इनकार की फिकर

मुलाकाते होती रहती हैं
 तुमसे ख्वाबों में अकसर
न तुम्हारे ऐतबार का जुनून
 न तुम्हारे धोके का केहर

रह जाना चाहते हैं
इन्हीं हसी लम्हों में उलझकर
न करनी जीने की जद्दोजहद
न पीना मौत का जहर
©️ अंजली मीनानाथ धस्के

मेन विल बी मेन

    #मेन_विल_बी_मेन
   
        आमच्या सहजच गप्पा सुरू होत्या. नवरोबा हजारदा विचारूनही ऑफिसच्या कामांबद्दल फारस काही सांगत नव्हता . मी मात्र त्याला या आधी सांगायच्या राहून गेलेल्या  अनेक  गोष्टींचे बारीक सारीक तपशीलही कथन करत होते.
शेजारीच आमचे बाळराजे पुस्तक वाचण्याचे निमित्त करत आमच्या गप्पा ऐकण्यात रंगले होते.
मी सांगत होते.... ," आई पण ना .... आईचं आहे. मी तिथल्या ( माहेरच्या) मावशींना डोळ्यासमोर ठेवून ' रंजना' ही काल्पनिक कथा लिहिली होती ती त्यांनाच वाचून दाखवली. नुसती वाचून दाखवली नाही तर दोघींनीही मनसोक्त रडून घेण्याचा कार्यक्रम ही पार पडला. मला तर हे ऐकल्यानंतर त्या मावशींच्या समोर जातांना फारच अवघडल्या सारखं वाटत होतं."
नावरोबाने त्यावर विचारले," त्यांच्यावर  कथा लिहिली ... ती ऐकल्यावर त्या मावशींची काय प्रतिक्रिया होती?"
मी तपशील देत," डोळ्यात पाणी आलं होतं रे त्यांच्या.... मला म्हंटल्या ," ताई  तुम्ही कथा लिहिली.... त्यातला एक अन् एक शब्द माझ्या मनातला वाटला. माझा भूतकाळ तर तुम्हाला मी कधी सांगितला नाही तरी एकदम खरं लिहिलं तुम्ही..... शेवट मनानी लिहिलाय तुम्ही पण देवाचा आशीर्वाद राहिला तर तसाच शेवट होईल बघा माझ्या आयुष्याच्या कहाणीचा".
खरं तर डोळ्यातलं पाणी रोखण्याच्या नादात तोंडातून शब्द निघत नव्हते माझ्या पण आवंढा गिळून मी बोललेच ," मावशी मी लिहाला आहे त्यापेक्षाही चांगला शेवट होईल तुमच्या कथेचा .... देव नेहमी मानवापेक्षा  श्रेष्ठच निर्मिती करतो "... त्यावर मावशी भारावून बोलल्या,"
ताई तुमच्या तोंडत साखर पडो.... तुमची कथा ऐकली त्यादिवसा पासून  संकटांशी सामना करण्याची हिंमत वाढली बघा माझी. तुमची कथा खरी होणार ताई ... मी कष्टाला कमी पडणार नाही. माझ्या तिन्ही पोरांनाही  तुमची कथा वाचून दाखवली ताई मी ,  माझ्या दोन्ही मुली तर मला बोलल्याही ," आई काळजी करू नको आपण आपली कथा खरी करू".... तुमच्याघरच्यांसारखी ... तुमच्यासारखी माणसं पाठीशी आहेत म्हंटल्यावर माझ्या आयुष्याचा शेवट चांगलाच होणार याची खात्री आहे मला " .
         आपल्या शब्दांनी एखाद्याला लढण्याची हिंमत मिळावी या भावनेने मी नवरोबला हा प्रसंग सांगताना भावूक झाले होते.
        तेवढ्यात आमच्या बाळराजेंनी  बोलण्यात सहभाग घेतला," मम्मी ..... तू लिहिलं त्याप्रमाणे जर त्यांच्या आयुष्यात घडलं तर तू ' वाल्मिकी' च होशील".
मी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितलं तसं त्याने स्पष्टीकरण दिले," वाल्मिकींनी आधी रामायण लिहिलं मग ते तसं घडलं आहे ... असं आजीने मागे एकदा सांगितले होते... त्याअर्थी तू वाल्मिकी होशील असं मी म्हणतो आहे ."
त्याच्या या स्पष्टीकरणावर मी संभ्रमित झाले होते ... काय बोलावं हा विचारच करत होते.
तेवढ्यात नवरोबाने त्याचे अमूल्य शब्द खर्ची घातले ," तुझं म्हणणं बरोबर आहे बेटा .... मम्मीची कथा खरी झाली तर ती तेव्हा नक्कीच वाल्मिकी ठरेल पण......  सध्या ती 'वाल्या ' बनून आपल्याला छळत असते त्याचं काय ?"
वडिलांचं म्हणणं शंभर टक्के खरं असल्याची खात्री पटली म्हणून की काय बाळराजे हसू दाबत तिरप्या नजरेने माझ्याकडे बघत होते.
या दोघांपुढे रडून काही उपयोग नाही याची जाणीव होवून मीही त्यांच्या हसण्यात सामील झाले.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( टिपः ' रंजना' या कथेला वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. माझं लिखाण आवडल्यास शेयर करावसं वाटलं तर नावासहितच करा ही नम्र विनंती )
http://anjali-rangoli.blogspot.com/2019/10/blog-post.html?m=1






          

कधीतरी .... माझीच मी

#कधीतरी_माझीच_मी

अपेक्षांचे ओझे नको
नको जबाबदाऱ्या
अंतरात मी....
शांत मी ....

कोणताच प्रश्नं नको
नको उत्तरं....
पूर्ण  मी.....
अपूर्ण मी ....

तुझ्याशी संवाद नको
नको स्वतःशी...
अचल मी...
अबोल मी ...

स्पर्धा वेळेशी नको
नको कोणाशी
मुक्त मी ....
फक्त मी ...

विषय कुठलाच नको
नको कल्पना...
मनात मी....
स्वप्नात मी....

मनीचा कोलाहल नको
नको विवंचना ....
निष्क्रिय मी....
निशब्द मी ....

कधीतरी वाचन नको
नको लिखाणही...
निद्रेत मी...
निवांत मी ...

इतरांचे आदर्श नको
नको तुलना ....
कधीतरी सहजंच ,
माझीच मी ....
 फेवरेट मी ....
 असते ना.....
©️ अंजली मीनानाथ धस्के

आत्मसन्मानाने जगण्याची संधी


#आत्मसन्मानाने_जगण्याची_संधी
#१००शब्दांचीगोष्ट
          मी जन्मतः आंधळी,  शरीराने अधू असल्याने सगळ्यांनाच नकोशी होते.  रेडिओवर एखादं गाणं ऐकलं की ते हुबेहूब म्हणण्याच्या माझ्यातल्या कौशल्याने गरीब आईवडिलांना कमाईच  साधन मिळालं आणि माझी रवानगी रेल्वस्थानकावर झाली.  येणाऱ्या-जाणाऱ्यांना गाणं म्हणून दाखवल्यामुळे माझी इतर भावंड शाळेत जात होती. घरी जरा चांगलं अन्न शिजत होतं.
       आंधळी, झिपरी, लुळी, पांगली, भिकारी अशा अनेक नावांनी मी ओळखली जावू लागले. मी मात्र गाणं ऐकण्यात आणि ते गाण्यातच स्वतःचा आनंद शोधला.
       गाणं गातांनाचा माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि इतके वर्ष दुर्लक्षित असलेली मी अचानक प्रकाश झोतात आले.
          कलेची कदर करणाऱ्यांनी 'पार्श्वगायिका' ही नवी ओळख मिळवून दिली. ही ओळख नव्हेच माझ्यासाठी आत्मसन्मानाने जगण्याची संधीच आहे.
©️ अंजली मीनानाथ धस्के

नवी ओळख

  #नवी_ओळख   
#१००शब्दांचीगोष्ट
         माझ्यामूळे घराला वंशाचा दिवा मिळाला परंतु माझे स्त्रीमन  पुरुषी शरीराची साथ देईना.  लोक मला ' हिजडा' म्हणून हिनवू लागले. घरच्यांनी माझ्या  'लक्ष्मण' या नावाला लावलेलं आडनावही काढून घेतलं. जळत्या निखाऱ्याप्रमाणे बोचनाऱ्या नजरा, विषारी शब्दांचे बाण पचवतच छोटीमोठी नोकरी करत L.L.M.चे शिक्षण पूर्ण केले.  काही लोकं अंगचटीला यायचे. हिजड्यांनाही 'नाही' म्हणण्याचा अधिकार आहे याची जाणीव त्यांना करून दिली . माझ्यासारख्यांनाही सामान्यआयुष्य जगता यावे यासाठी संघर्ष केला.
       वेश्याव्यवसाय करणाऱ्यांच्या ५० मुलांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. तृतीय पंथीयांना सन्मानाने करता येतील अशा नोकऱ्या मिळवून दिल्या.
 त्यांनी मला त्यांच्या जीवनातील अंध:कार दूर करणारी  एक 'पणती'  मानलं. त्यांनीच मला 'अॅडोव्हकेट लक्ष्मीताई' ही नवी ओळख दिली.
©️अंजली मीनानाथ धस्के


      

सहजच ...... गंमत म्हणून

#सहजच
#गंमत_म्हणून
                  राजकीय भूकंप झाला तेव्हा गण्याच्या घरचे सारखं टीव्ही पुढचं. जवा बघावं तवा टीव्ही वर  लोकं ," रात्रीच्या अंधारात फक्त पापं केली जातात " असं पोटतिडकीने सांगताना गण्यानं ऐकलं  अन् रात्रीच्या अंधारात टेबल लॅम्प लावून अभ्यास करणारा गण्या  आता ," झाली तेवढी पापं पुरे झालीत" म्हणत परीक्षा तोंडावर आली तरी जाड दुलई पांघरूण ढाराढुर झोपा काढू लागलं
       राजकीय भूकंप आला तसा गेलाही पण गण्याच्या घरात पोराच्या भविष्यावरून आई बापामधे कौटुंबिक वाद सुरू झाला तो थांबण्याचं नाव घेत नाही .
©️ अंजली मीनानाथ धस्के

भुरळ..... प्रतिबिंबाची

#भुरळ_प्रतिबिंबाची
#१००शब्दांचीगोष्ट

                आरशासमोर उभं राहून तिने अनेकदा स्वतःलाच समजावलं, "तू सुंदर नाही असच हा म्हणतो. खरं सौंदर्य माझ्या अंतरमनात आहे हे याला कुठे कळतं. यात मी माझं बाह्यरूप कधी बघतच नाही. याला  मनाशी संवाद घडवून आणण्याचं साधन मानते फक्त"
याच आत्मविश्वासाच्या जोरावर तिने 'विश्वसुंदरीचा'  किताबही पटकावला.
 मुकुट धारण केलेली ती आरशासमोर उभी राहिली तेव्हाही तो तिचे सौंदर्य मान्य करेना. आता तीही जिद्दीला पेटली. नाक,त्वचा, ओठ, दात,हनुवटी सुंदर करून घेण्यासाठी  शस्त्रक्रिया केल्या. अखेर  तिने आदर्श मापदंड असलेलं सौंदर्य मिळवलचं.
आता आरसाही,"तूच विश्वसुंदरी" म्हणतो.
तीही तिचं नवं रूप दिमाखात मिरवते.
 आरश्यातल्या  खोट्या प्रतिबिंबिनेच तिला अखेर भुरळ घातली. पूर्वीसारखा तिचा मनाशी संवाद आता होत नाही.
©️ अंजली मीनानाथ धस्के

खरी लाईफ लाईन

#खरी_लाईफ_लाईन
#१००_शब्दांची_गोष्ट
९वीच्या विद्यार्थ्यांना,"तूच माझी लाईफ लाईन" या विषयावर  निबंध लिहून वाचायला सांगितला.
         आयुष्यात  प्रमुख भूमिका निभावणाऱ्या व्यक्तींवर, नात्यांवर  सगळ्यांनी भरभरून बोलायला  सुरुवात केली.
           शहरीकरणाला अगदीच नवीन त्यामुळे मंदबुध्दी म्हणून हिणवले जात असलेला  संतोष जेव्हा त्याचा निबंध वाचायला उठला तेव्हा वर्गात एकच हशा पिकला.
          "दिल्लीची सद्यपरिस्थिती  बघता निसर्गाचा समतोल राखला नाही तर पुढची पिढी सुदृढ, निरोगी जन्माला येणं कठीण.
निसर्ग जीवन स्रोत आहे.   शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि कसदार जमीन हिच भावी पिढीची लाईफलाईन आहे.
निसर्ग नेहमीच खूप देतो आता आपली वेळ आहे.
जल, वायू आणि जमीन राखूया प्रदूषण मुक्त,
 निसर्गच  खरी लाईफलाईन लक्षात असू द्या फक्त"
         थोड्यावेळ पूर्वी हसण्यात बुडालेला वर्ग  टाळ्यांच्या कडकडाटात गरजून निघाला.
©️ अंजली मीनानाथ धस्के

कोणतंही काम हलक नसतं

#कोणतंही_काम_हलक_नसतं

            आदित्य आणि सोहम दोघे जिवाभावाचे मित्र . शिक्षण सोबत घेतल तसचं स्वतःचे  व्यवसायही सुरू केले. आदित्यने मोटार गाड्यांसाठी लागणारे छोटे छोटे भाग बनवण्याचा कारखाना सुरु केला तर सोहमने कारचे सूशोभिकरण करून देण्यासाठीचा  स्टुडिओ उभारला.
         दोघांच्याही व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले. आदित्यने जसे पैसे येत गेले तसे स्वतःचे राहणीमान ही उंचावले. सोहम मात्र जसा आधी होता तसाच आताही राही. घरात, बाहेर  कुठेही दिसेल ते काम करी . अनेकदा आदित्य त्याला समजावण्याचा प्रयत्न करी ," आता आपला वर्ग वरचा आहे तेव्हा आपल्याला असली छोटी कामे करणं शोभत नाही. समाजात आपला मान वाढवायचा असेल तर आपण स्वतः काम न करता फक्त हुकुम सोडायला हवे."
 सोहमला यातलं काहीच पटत नसे. " कोणतंही काम छोट  नसतं" याच विचारांचा तो होता. कामगारांना हुकुम सोडण्यापेक्षा त्यांच्या बरोबरीने कामे करायला त्याला जास्त आवडायचं. त्यांच्या बरोबरीने राबायचं म्हणजे छान छान कपडे घालून कसं मिरवता येईल ? म्हणून पैसा खूप कमावूनही त्याचं राहणीमान अगदी साधं होतं.
          दिवसामागून दिवस जात होते. दोघांचेही व्यवसाय जोरात सुरू होते.   ' पेट्रोल गाड्या पर्यावरणाचं नुकसान करतात म्हणून इथून पुढे फक्त विजेवर चालणाऱ्या गाड्या बनवल्या जाव्यात ' अशी घोषणा नव्या सरकारने केली आणि अचानक बाजारात मंदी आली. सगळ्याच व्यवसायांवर या मंदीचा परिणाम झाला होता पण सगळ्यात जास्त फटका मोटार निर्मितीच्या व्यवसायांवर झाला होता. अनेक छोटे कारखाने बंद पडले. कामच मिळत नाही तर कामगारांना पगार तरी कसे देणार ? त्याचाच परिणाम म्हणून आदित्यचा कारखानाही बंद पडला . असं काही होईल याची जराही शंका नसतांना हे झाल्यामुळे आदित्य पुरता कर्ज बाजारी झाला . उत्पन्न भरपूर होते तेव्हा मोठं मोठी कर्ज काढून त्याने बंगला, गाड्या घेतल्या . सगळा पैसा राहणीमान जपण्यात घालवला . आता जेवढी शिल्लक होती त्यात त्याने उभा केलेला हा डोलारा सांभाळणे कठीण होते.  अचानक राहणीमानात बदल केला तर लोक काय म्हणतील? या भीतीने त्याचा खर्च सुरूच होता. कर्ज वाढतच जात होतं. गाड्या विकल्या . बंगला विकला तरी खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नव्हता.
       व्यावसायातून येणारे उत्पन्न कमी झाले तसे सोहमने इतर कामंही करायला सुरुवात केली. त्याच्या कामगारांनाही इतर काम मिळेपर्यंत मदत केली . त्याच्या कामगारांपैकी कोणी चहाची टपरी सुरू केली , कोणी वडापावची गाडी चालवायला घेतली , कोणी किराणा मालाच्या दुकानात काम करू लागले तर कोणी कपड्यांच्या दुकानात काम करायला लागले. सगळ्यांच्या पोटापाण्याची सोय होते आहे म्हंटल्यावर सोहमने त्याच्या स्टुडिओतील काही मशिन्स विकल्या आणि डोक्यावर असलेले कर्ज कमी केले. जमा पैशातून महाविद्यालया समोरच एक गाळा भाड्याने घेवून त्यात छोटंसं स्नॅक्स सेंटर सुरू  केलं. इथेही त्याच्या स्टुडिओ मधल्याच काही कामगारांना काम दिलं. तो स्वतः टेबल पुसण्यापासून ते  पदार्थ बनवण्यापर्यंतची  सगळी कामे करू लागला. त्याला तसं काम करतांना बघून त्याच्या हाताखालची माणसंही मन लावून कामं करू लागले . त्याचा हा व्यवसायही जम धरू लागला.  स्टुडिओ पूर्ण बंद पडला होता तरी त्याचं आणि त्याच्या कामगारांच मस्त सुरू होतं. आता तर तो रहाणीमानावर पूर्वीपेक्षाही कमी खर्च करू लगला. "कर्ज काढून रेशमी वस्त्र मिरवण्यापेक्षा कष्टाच्या कमाईचे फाटके कापड घालावे " याच मताचा तो होता आणि यात त्याच्या घरच्यांचीही त्याला साथ मिळाली.
          आदित्यला आणि त्याच्या घरच्यांना सगळ्या महागड्या वस्तू वापरण्याची सवय लागल्यामुळे आता त्याला पैशाची चणचण भासू लागली. पूर्वी ज्या कामांना कमी लेखलं ती काम करावी लागू नये म्हणून तो मित्रांना पैसे उधार मागूनच घर खर्च सांभाळू लागला. आधी हुकुम सोडण्याची सवय लावून घेतल्याने आता पैसा कमावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची त्याची मानसिकता नव्हती. दिवसेंदिवस तो अधिकच कर्ज बाजारी होवु लागला . सगळे मित्र त्याला टाळू लागले.
एक दिवस बाजारात फिरत असतांना  काहीतरी खावून घ्यावं म्हणून तो तिथल्याच स्नॅक्स सेंटर मधे गेला . तिथे सोहम टेबलं पुसत होता. त्याला पाहून आदित्यला आश्चर्य वाटलं. याची परिस्थिती फारच वाईट झाली असं वाटून त्याने  सोहमला आवाज दिला.  सोहमने आधी त्याची ऑर्डर घेतली आणि मग त्याच्या जवळ येवून बसला.  दोघांच्या खूप गप्पा रंगल्या . सोहमने स्टुडिओ विकून टाकल्याच सांगितलं . आदित्य मात्र अजूनही  दिखावा करण्यातच  मग्न होता. व्यवसाय बंद झाला तरी आपल्याला फार काही फरक पडला नाही . असंच तो भासवत राहिला. ' केलं तर आपल्याला शोभेल असंच काम करायचं' याच मतावर  तो अजूनही ठाम होता.  टेबल पुसण्याच  इतकं हलकं काम सोहमने  का करावं? यावर तो सोहमवरही चिडला. सोहमनेही त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की ," कोणतंच काम हलक नसतं. कोणत्याही मोठ्या कामात यश मिळवायचं असेल तर त्यासाठी लागणारी सगळी छोटी छोटी कामं यायलाच हवी. तसेही उधारीवर जगण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाची कमाई कधीही चांगली .  पैसा काय .... येत आणि जात असतो.  माणूस पैशाने नाही तर कर्तुत्वाने मोठा होतो " .  सोहमने इतकं समजावलं पण आदित्य काही समजून घ्यायला तयार झाला नाही.
         जातांना  जेव्हा आदित्य त्याच्या खाण्याचे बिल द्यायला गेला तेव्हा  गल्ल्यावरच्या माणसाने सांगितलं की ," आमच्या मालकाचे तुम्ही मित्र ..... तुमच्या कडून पैसे कसे घेणार? ". त्याचे हे वाक्य ऐकून आदित्यला धक्काच बसला. त्याने सोहमकडे वळून बघितलं तर तो त्यांच्याच  टेबलावरच्या खरकट्या ताटल्या उचलून घेत टेबल स्वच्छ करत होता.
" कोणतंही काम हलक नसतं " या शिकवणीनेच सोहमला या मंदीच्या काळातही यश दिलं होतं तर  खोटा अहंकार मिरवणाऱ्या आदित्यच्या डोळ्यात अंजन घातलं होतं.


तात्पर्य :
१: कोणतंही काम हलक नसतं.
२: माणूस पैशाने नाही तर कर्तुत्वाने मोठा होतो.

©️ अंजली मीनानाथ धस्के



घटस्फोट

#घटस्फोट
                घटस्फोट हा शब्दच किती स्पोटक आहे. सद्य परिस्थितीत घटस्फोटाचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या आहे. आजुबाजूलाच या शब्दाचे चटके अनुभवलेली अनेक आप्त मंडळी असूनही या विषयावर काही लिहावं असं कधी मनातही नव्हतं.
काल परवाच एका मित्राने या विषयावरची एक बातमी पाठवली आणि त्यावर मी  मत मांडाव असं सुचवलं. तेव्हाही  मी म्हणाले ," हा विषय असा वर वर बोलण्याचा, लिहिण्याचा मुळीच नाही.  निदान सोशल मीडियावर त्या संबंधी एखादी पोस्ट आली की आपण आपली प्रतिक्रिया नोंदवावी असा हा विषय नक्कीच नाही.
ज्याला हा वाईट अनुभव आला त्याचे मत आणि नुसते मत द्यायचे म्हणून दिलेले मत यात तफावत आढळते. अनेकदा या मतांतराने संघर्षही होतो. त्यात माझी भर नको" म्हणत मी तो विषय टाळला.
        तेवढ्यात मेंदू मधे या विषयसंदर्भात जेवढी काही माहिती होती ती जमा व्हायला सुरुवात झाली होती. नेहमीप्रमाणे ही जमवाजमव थांबवणं माझ्या हाती नव्हतं. त्याला नकार देवूनही डोक्यात विचार घोळायला सुरुवात झालीच.
ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे...... असंच झालं. बोलायचं नाही म्हणता म्हणता लिहायचा मोह आवरणे कठीण झाले.
                 काडिमोड.... हा शब्द लहानपणी मोठ्यांच्या बोलण्यात क्वचित ऐकू येई. तेव्हा अखेरचा पर्याय म्हणूनच या शब्दाकडे बघितले जायचे. अनेक वेळा या शब्दाचा वापर जरी झाला तरी प्रत्यक्षात त्याचा अवलंब करण्याची वेळ कधीही येत नव्हती. त्यामुळे  त्याची फारशी दहशत नव्हती.
          जेव्हा घटस्फोट या शब्दाचे आमच्या जवळच्याच व्यक्तींना  चटके बसले तेव्हा मात्र हा शब्द किती स्पोटक  आहे याची जाणीव प्रकर्षाने झाली.
        मागे सोशल मीडिया वर एक पोस्ट आली की ," मुलींचे संसार मोडण्यात मुलीच्या आईचा नको तितका हस्तक्षेप कारणीभूत असतो"  यावर दोन्ही बाजूच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला . एकमेकांची अक्कल काढल्या गेली. अनेकांनी " घटस्फोट होण्यात मुलाच्या आईचा हस्तक्षेपच जास्त कारणीभूत असतो " अशी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.
  खोलवर विचार करण्यासारखी बाब पण वाद विवाद करून सोडून देण्यात आली.
लग्न संस्कृतीवर बोलतांना,"
 लग्न होते तेव्हा ते फक्त दोघांचे होत नाही तर दोन घरं एकमेकांशी जोडली जातात" असं आपण मोठ्या अभिमानाने सांगतो मग घटस्फोट घेण्याची वेळ ही कोणत्याही एका व्यक्तीमुळे  येते हे म्हणणं कितपत योग्य आहे.  प्रत्यक्षात घटस्फोट होतो तेव्हा अनेक घटक कारणीभूत असतात. परिस्थिती नियंत्रणाच्या अथवा सहनशक्तीच्या बाहेर असते.
         सासूरवास ही समस्या तर पूर्वापार चालत आलेली मग आज कालच घटस्फोटाचे प्रमाण का वाढले??? असा प्रश्न निर्माण होतो.
          चार दिवस सासूचे .... या म्हणी प्रमाणे तेव्हा घरातली मोठी मंडळी योग्य वेळी घरातल्या जबाबदाऱ्या नव्या पिढीच्या खांद्यावर देवून मोकळी होत असे. त्यानंतर फक्त मार्गदर्शकाची भूमिका बजावत असे. आता वडीलधारी मंडळी संसाराच्या कामातून निवृत्ती घेतात, जबाबदाऱ्या पुढच्या पिढीला सोपवल्या जातात पण हक्क आणि अधिकार स्वतः कडेच राखीव ठेवण्याचा प्रयत्न कायम असतो यातून न टाळता येणारा संघर्ष निर्माण होतो. ज्या घरातल्या वडीलधाऱ्यांना समस्येचं मूळ कळालेल असतं त्या घरात घटस्फोट होत नाही किंवा घटस्पोटाची  कारणे सासू किंवा आई चा हस्तक्षेप ही नक्कीच नसतात.
 पूर्वीची स्त्री अबला होती , आर्थिक दृष्ट्या परावलंबी होती, तिला तिचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते अशी काही कारणं ही सापडतात.
आताची स्त्री पुरुषाच्या तुलनेत कोणत्याच क्षेत्रात मागे नाही. ती कणखर आणि स्वतंत्र विचारांची आहे.
तरी   घटस्फोटाच प्रमाण वाढत जातं आहे . ते का ?? याच उत्तर मिळत नाही.
       अनेक वेळा बघण्यात येतं की सासू किंवा आई या घटकांपेक्षा जोडीदाराशी असलेले मतभेदच वेगळं होण्यासाठी कारणीभूत असतात.
         इथे अनेकदा ठरवून केलेलं लग्न आणि प्रेम विवाह यात वाद होताना आढळतो. लग्न कोणत्याही पद्धतीचं असल तरी लग्नानंतर नवरा बायको हे नवरा बायको प्रमाणेच वागतात. प्रेमविवाह आहे म्हणून घटस्फोट होणारच नाही असं ठामपणे सांगता येत नाही. कारण आजकाल दोन्ही लग्नाच्या प्रकारामधे घटस्फोट होतांना आढळतात.
       
           मनुष्य स्वभाव बघता चांगल झालं तर माझ्यामुळे आणि वाईट झालं तर ते इतरांमुळे म्हणण्याचा प्रघात आहे.
       तसचं काहीसं या समेस्ये बाबतीत होताना दिसतं. समस्या आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे पण ती इतरांमुळे हेच पटवून देण्याचा प्रयत्न होतो.
       मला स्वतःला प्रामाणिकपणे वाटतं की घटस्फोटाची कारणे ही अशी दिसतात तितकी वरवरची नक्कीच नाही.
माझ्या बघण्यातली  उदाहरणं इथे देत आहे.
 या उदाहरणामधे दोन वेगवेगळी कुटुंब. त्यातील  आईला दोन मुली. समाजाने त्यांना सतत 'तुम्हाला दोन्ही मुलीच का ???' म्हणत डिवचलेल.
एका आईने ते फारस मनावर घेतलं नाही तर दुसऱ्या आईने ' माझ्या मुली मुलाच्या तुलनेत कुठेच कमी नाहीत ' असा पवित्रा घेतला. दोघींनी सतत मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं पण एकीने मुलींच्या मनात कळत नकळत हे बिंबवल की ," घरची कामं करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. मुलांनाही लाजवेल असं कर्तृत्व सिद्ध करायचं "
दोघींच्या मुली आपापल्या क्षेत्रात आघाडीवर . दोघींच्या मुलींची लग्न झाली.
आज पर्यंत अभ्यास , कार्यक्षेत्र यावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे मुलींना अचानक आलेल्या इतर जबाबदाऱ्या पेलनं जड जावू लागलं.
एकीच्या मुलींनी आलेली परिस्थिती आव्हान म्हणून स्वीकारत संसाराला सुरुवात केली. समाजातील अनेकांनी ,"कशाला  येवढा त्रास सहन करता. घटस्फोट घ्या " असा सल्ला दिला तरी त्याकडे दुर्लक्ष केलं. संसारात कधी नमत घेत तर कधी हक्कासाठी भांडत आपलं स्थान बळकट केलं. कारण त्यांच्या आईलाही त्यांनी तसचं करतांना बघितलं होत. समाज काय बोलतो यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे महत्त्वाचं असतं.
मुलींच्या मनात नोकरी करणे म्हणजे मुलांचं क्षेत्र आणि घर सांभाळणे  म्हणजे मुलीचं क्षेत्र असा भेद भाव नव्हता. त्या दोन्ही क्षेत्रांना आपलं मानत होत्या.
दुसरीच्या मुलींना मात्र नमत घेणं जड जावू लागलं. घरची कामं दुय्यम असा समज असल्याने छोट्या छोट्या गोष्टी ही त्रास दायक झाल्या. नोकरी केली तरच कर्तृत्व सिद्ध करता येत ही शिकवण नकळत मिळाल्याने  स्व खुशीने जी जबाबदारी एखादी स्त्री घेते ती घेणं ही त्यांना त्यांची हार वाटू लागली. वाद वाढत गेले . आईलाही वाटू लागलं मुलींना त्रास होतो आहे. समाजानेही आता मूली मुलांच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नसतांना उगाच का ऐकून घ्यायचं असे विचार बिंबवले .
परिणाम ..... घटस्फोट झाला.

          या उदाहरणात घटस्फोट झाल्यानंतर समाजाने मात्र मुलगी आणि मुलीच्या आईला दोष दिला .
(थांबा ..... लगेच माझी अक्कल काढू नका)

आता मुलांच्या बाबतीतली उदाहरणं आहेत .
दोन्ही कुटुंबातील आईंना दोन मुलं. समाजात मिरवतांना  आपण इतरांपेक्षा किंचित सरस असल्याची जाणीव झालेली.
(तुम्ही कितीही म्हणालात मुलगा मुलगी समान तरी हा विचार फक्त बोलण्या पुरताच मर्यादित आहे प्रत्यक्षात सामाजिक विचारांची परिस्थिती फारशी बदलली नाही. )
मुलीची उणीव सलत असल्याने दोन्ही आईंने मुलांना घरातली सगळी कामं शिकवली. तिच्या दुखण्या खुपण्यात मुलांचं काही अडू नये आणि भावी आयुष्यात त्यांनी कोणावर अवलंबून राहू नये हा शुद्ध हेतू .
त्यातील एका आईने मात्र घर कामात मुलांची मदत घेत असताना  कळत नकळत हे बिंबवल की ही कामं दुय्यम दर्जाची ,  मुलींची करण्याची .
कालांतराने दोघींच्या मुलांची लग्न झाली.  एकीच्या सूनांमधे एक नोकरी करणारी तर एक गृहिणी तरी एकमेकांना सावरत संसार चाललेला .
दुसरीच्या सूनांमधे ही एक नोकरी करणारी तर एक गृहिणी  होती. तिला नवरा काहीच मदत करत नाही म्हणून त्यांच्यात वाद होते. तिच्या नवऱ्याला वाटायचं घरातली कामं ही बायकांचीच असतात कधी तरी मदत म्हणून केली तर करायची. ते आपलं कार्य क्षेत्र नाही.  तर गृहिणी होती तिला तिने केलेल्या कामाचे कौतुक केलं जातं नाही अशी कायम तक्रार. ती तिच्याच क्षेत्रात काम करते त्याचं काय कौतुक करायचं अशी तिच्या नवऱ्याची भूमिका . संसार रडत रखडत सुरू. शेवटी सहन न होवून एक सून माहेरी निघून गेली ती कायमचीच.
इथे समाजाने आई स्वतः मुलांना काम सांगते पण बायकोला मदत करायची नाही असं शिकवते म्हणून  "सासुरवास " यावर घटस्फोटाचा दोष ढकलून दिला.

होणाऱ्या घटस्फोटात बरेच घटक कारणीभूत असतात ते सगळे नमूद करणे शक्य नाही. प्रत्येक वेळी समाजाचा सुर मात्र एकच ," कोणीतरी एकाने ( सासू, सून, नवरा ,बायको यापैकी कोणीतरी एकाने) समजुतीने घ्यायला हवं " असाच होता. पण समाजाने आपल्या नसा नसात लिंग भेद , त्यावरून केला जाणारा कार्य क्षेत्र भेद , कुटुंबातील दर्जा देण्यातला भेद भाव इतका भिनवला आहे की समानता फक्त बोलण्या पुरतीच मर्यादित राहते व्यवहारात येत नाही. अहंकार कुरवाळला जातो कोणीच माघार घेत नाही.
जिथे नात्यांपेक्षा  अहंकार मोठा होतो तिथे सुखी संसाराची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
घटस्फोटानंतर
*हल्लीच्या मुली कोणाचं ऐकुन घेत नाही जरा मना विरुद्ध झालं की घटस्फोट घेवून मोकळ्या होतात.
*नोकरी करणारी मुलगी हवी तर ती तिने घर काम  करावं ही अपेक्षाच किती चुकीची आहे.
* सगळं सांभाळून आम्ही काय नोकऱ्या केल्या नाहीत?? आजकालच्या मुलींना घर काम करायचं च नसतं म्हणून जातात कामावर.
*मुलाची आई हस्तक्षेप करते.
* मुलीची आई हस्तक्षेप करते.
* आम्हाला न सांगता आर्थिक व्यवहार करते/ करतो.
*मुलगी माहेरच्या लोकांवर सगळा पैसा खर्च करते.
*मुलगा त्याच्या घरचे सांगतील ते ऐकतो. त्यांच्यावर वाट्टेल तसा खर्च करतो.
अशा काही लक्षणीय प्रतिक्रिया कायम दिल्या जातात.
मुलगी, मुलगा , मुलीची आई किंवा मुलाची आई यांच्या पैकी एकावर दोष ढकलून दिला जातो.

मला वाटतं कोणत्याही आईला आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं वाटतं नसेल . कोणत्याही मुलाला किंवा मुलीला घटस्फोट आनंदाने घ्यायचा नसतो तरी घटस्फोट होतात.
मग नक्की कारण काय?????
बाल वयात आपल्या संवेदनशील मनावर झालेल्या नोंदी पुढे आपल्या आयुष्यात चांगले वाईट बदल घडवून आणतात.
वर वर बघता आज काल तरी घर काम आणि एकमेकांना न सांगता केले जाणारे आर्थिक व्यवहार  हाच मुद्दा ऐरणीवर आहे.
मुलाला नोकरी करणारी बायको हवी आहे पण घरच्या जबाबदाऱ्या तिने त्याच्या आईसारख्या पार पाडाव्या ही अपेक्षा तर मुलीला वेल सेटल मुलगा हवा असतो पण त्याच बरोबर संसाराच्या येणाऱ्या जबाबदाऱ्या नको असतात.
मुळात नवरा बायको दोघांच्या विचारात अंतर त्यात भरीस भर मुलाच्या आईला सुनेने आपण करत होतो ती सगळी कामं करत नोकरी , आल्या गेल्याच स्वागत हसत मुखाने करून संसार करावा ही अपेक्षा तर मुलीच्या आईला आपण जपलं तसचं जावयाने जपावं ही अपेक्षा.  आपली मुलगीही नोकरी करते. बोरोबरीची वागणूक हवी . नोकरी सोडा म्हणतात पण मुलीचं आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात येईल असे विचार डोक्यात पिंगा घालतात.
खरं तर दोन्ही पक्ष आपापल्या परीने योग्य आहेत . सुवर्ण मध्य साधत संसार करणारे यशस्वी होतात तर एकाच मुद्यावर अडून बसणारे घटस्फोट घेतात.
वाढत्या घटस्फोट प्रमाणाला जबाबदार आपली समाज व्यवस्था आहे. पूर्वी पुरुष प्रधान संस्कृती होती स्त्रियांना बोलण्याच स्वातंत्र्य नव्हतं. कितीही मत भेद असले तरी मुलीनेच नमत घ्यायचं हे ठरलेलं होतं. खरं तर तेव्हा घटस्फोट घेण्याची मुभा असती तर घटस्फोटाचे प्रमाण आज इतकेच असते. मुलीनेच नमत घ्यायचं असतं असं रक्तात भिनलेले त्यामुळे  मुली मना विरुद्ध का होईना तडजोड करत. घटस्फोट घेणे ही बाब फार लाजीरवाणी मानली जायची म्हणून अनेक वेळा मुलगाही तडजोड करायला तयार असायचा. तडजोड केली तरी ती जमेल आणि झेपेल एवढीच असायची . तरीही पटलं नाही तर वेगळं होण्याचा मार्ग तेव्हाही खुला होताच.
आता मुलगा/ मुलगी कोणालाच तडजोड नको आहे. लग्न झाल्या क्षणी सगळं मनासारखं हवं आहे.

जेव्हा मी मुलगा आणि मुलगी दोघांशी घटस्फोट का घ्यायचा आहे ? याची कारणं जाणून घेण्यासाठी संवाद साधायचा प्रयत्न केला तेव्हा मुलांचं म्हणणं
* माझी आई घरातलं सगळं करते . आल्या गेल्याच हसून स्वागत करते. माणसं जोडून ठेवते यापैकी काहीही करायचं म्हटलं तर बायको नकार देते जमणार नाही म्हणून मोकळी होते. स्वतः चे आर्थिक व्यवहार मला सांगत नाही. कधी विचारलं तर माझ्या कमाईतून केलं तुला काय सांगायचं अशी उत्तर देते.
तिला फक्त नवरा हवाय बाकी जबाबदाऱ्या नकोत.

मुलीला विचारलं तर तिचे म्हणणे असते
नवऱ्याला सतत आईवडिलांना भावाला बहिणीला मदत करायची असते त्या नादात बँक खात्यात पैसे जमवत नाही.
मला माझं भविष्य सुरक्षित करायचं आहे. माझे आर्थिक व्यवहार कोणाला सांगून करणं मला पटत नाही. मला शॉपिंग, हॉटेलिंग आवडतं ते मी माझ्या पैशाने करते त्यावर रोकतोक मला आवडत नाही. त्याला माझे पैसे हवेत फक्त . नोकरी करून पैसे आणून द्यायचे यांना आणि हे घरातल्या कामवाल्या बाई सारखी वागणूक देणार. हे खपवून घेतलं जाणार नाही.

यात मुलाकडची मंडळी मुलीला दोष देतात तर मुलीकडची मंडळी मुलाला दोष देतात .
वरील पैकी कोणतही उदाहरण घेतलं तर लक्षात येईल की खरं कारण आहे आपली समाज व्यवस्था.
पुरुष प्रधान संस्कृती झुगारून आपण स्त्री सशक्ती करणाचा, समानतेचा पुरस्कार केला पण अजूनही समानता आपल्या नसा नसात भिनली नाही. स्त्री पुरुष समानता, स्त्री सशक्ती करण म्हणत असताना ...... एक स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीला समानतेच्या , बरोबरीच्या दर्जाने वागवतांना दिसत नाही.
 टाळी एका हाताने वाजत नाही. कोणत्याही नात्यात आनंद आणण्यासाठी  सामंजस्य दोन्ही बाजूंनी दाखवायला हवे पण " पाहिले आप पाहिले आप " म्हणण्याच्या नादात घरगुती वाद वाढतच जातात. 


मुलाची आई आज अभिमानाने सांगते की ," मी बाई माझ्या मुलाला सगळं शिकवलं , त्याला सुंदर स्वयंपाक येतो. उद्या नोकरी करणारी बायको मिळाली तरी मला झाला तसा त्रास तिला होणार नाही" हे बोलून ती मुलाचं कौतुक नक्कीच करते पण कळत नकळत घर काम हे मुलीचं कार्य क्षेत्र होत/ आहे हे  नकळत त्याच्या मनात रुजवून जाते.

मुलीची आई मुलीला प्रोत्साहन देताना ," मेरी बेटी मेरा अभिमान . समाजाने दुसरी मुलगीच आहे का तुम्हाला ??? असं म्हणून हिणवलं तरी  मी माझ्या मुलींना सगळं शिकवलं . अभ्यासात तर हुशार आहेतच पण घरकाम ही करतात. मुलगा असता तरी येवढं नाव नसतं मिळवलं तेवढं या पोरींनी मिळवून दिलं" असं म्हणताना दिसून येते. पण हे सांगत असताना ती नकळत आपल्या मुलींची तुलना मुलाशी करते .
स्त्री सशक्ती करणं झालच पाहिजे . यावर कोणाच च दुमत नाही पण हे करताना कळत नकळत आपण आपली स्पर्धा पुरुषांशी आहे हे बाल मनावर बिंबवतो.
मुलांना ही ऐकवलं जातं , " बघ ती मुलगी असून रडत नाही , बघ ती मुलगी असून बाईक चालवते , बघ ती मुलगी असून मोठ्या पदावर नोकरी करते "
यामुळे लहानपणापासून  एकमेकांकडे स्पर्धक म्हणून पाहिले जाते. मुलांचा दर्जा वरचा आणि मुलींचा दर्जा खालचा एवढंच कशाला लग्न करतानाही मुलाच्या आईचा दर्जा वरचा त्यामानाने मुलीच्या आईचा दर्जा खालचा
 असं सुचवलं जातं.
लग्न झाल्यावर मग छोट्या छोट्या गोष्टी ही अहंकाराला डिवचणाऱ्या ठरतात . एकमेकांना कमी तरी लेखलं जात किंवा आपणच कसे श्रेष्ठ हे सिद्ध करण्यासाठी चढाओढ लागते.
मुळात संसार हा जिंकण्या हरण्यासाठी नसून तो एकमताने, प्रेमाने करण्याचा आहे हे शिकवायला हवं.
     समाजाने पूर्वापार पासून  अमुक क्षेत्र पुरुषाचं , अमुक कामे पुरुषांनाच शोभा देतात , चूल मुलं बाईचच क्षेत्र , नोकरी केली तरी घरची कामं करण्याची जबाबदारी तिचीच असं आपल्याला शिकवलं.

त्यामुळे आपण स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते फारसे यशस्वी होत नाहीत. फार पूर्वी ही ज्यांनी समाजाची ही चाकोरी पाळली नाही . परिस्थितीनुसार स्वतः मधे योग्य बदल केले ते सगळे संसार सुखाने सुरू होते आणि आताचे संसारही सुरू आहेत. आजकाल बऱ्याच घरात स्त्री कमावती असते  आणि पुरुष घर सांभाळतांना दिसतो. त्यांचा संसार सुखाने सुरू असतो मात्र समाजातील काहीच लोक कौतुक करतात बाकी सगळे त्या पुरुषाला टोचून बोलतात . बायकी काम करत बसतो म्हणून हिणवतात .

मला   वाटतं आपण स्त्री पुरुष समानता फक्त म्हणतो पण ती खऱ्या अर्थाने कोणीच स्वीकारत नाही
मुलगा असो की मुलगी दोघंही स्वतःच्या फायद्याचं तेवढं घेतात. आजकाल सगळे व्यवहार 'सोयीची समानता ' यावरच चाललेले असतात.
काळ बदलला तसे अनेक बदल आपण स्विकारले पण त्या सोबत मानसिकतेतही बदल घडवून यायला हवा होता तो आपण केलाच नाही. म्हणूनच समाज सुधारत जातोय तरी काही दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं आहे.
लहान पणापासून मुलगा मुलगी समान याच भावनेने मुलांना वाढवल जावं . घरातल कोणतंही काम हे " आपलं " काम आहे ही भावना रुजवायला हवी.
संसार / लग्न हा एक व्यवहार किंवा कोणताही करार नाही की जिथे लपवून ठेवलेले नियम आणि अटी लागू असतात.
संसार म्हणजे नात्यांची विश्वास, प्रेम , आपुलकी आणि सामंज्यस्याने निर्माण होणारी सुरेख गुंफण असते. हे समजून घ्यायला हवं.
लग्नानंतर दोन्ही घरांची जबाबदारी स्विकारायची असते हे जसं मुलीला शिकवलं जातं अगदी तितक्याच सहज मुलालाही शिकवलं तर संसारात निर्माण होणारे अनेक वाद संपुष्टात येतील.
स्वातंत्र्य , आर्थिक आत्मनिर्भरता म्हणजे स्वैराचार नव्हे हे शिकवायला हवं.
आजकाल मुलींना पूर्वी ठरवून दिलेली कार्यक्षेत्र झुगारून द्यावीत हे शिकवलं जातं. मुलांच्या कार्य क्षेत्रात मुलींचा  सहज वावर  मुलांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण करतो.
एकमेकांच्या कार्य क्षेत्रात घुसखोरी होतेय जाणवून देण्यापेक्षा त्या ऐवजी सगळीच कार्य क्षेत्र आपली आहेत हे दोघांनाही सांगत आवडेल ते क्षेत्र निवडण्याच स्वातंत्र्य त्यांना दिलं  तर वैचारिक संघर्ष टाळता येईल.

नात्यानं मधे संवाद निर्माण करायला हवा .
नवरा बायको ने एकमेकांशी मोकळे पणाने बोलून एकमेंकांच्या अपेक्षा समजून घ्यायला हव्यात. एकमेकांना बदलण्यापेक्षा स्वतः मधे शक्य ते बदल घडवून आणायला हवेत. हे करत असताना एकमेकांमधे बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे .
आजकालची पिढी रुढी परंपरा याबाबतची माहिती घरातल्या मोठ्यांकडून  शिकण्याएवेजी सोशल मीडियावरून घेतात. आज जेवायला काय करू ? हे सासूला विचारताना कमीपणा वाटतो पण हा आणि असे अनेक घरगुती प्रश्न सोशल मीडियावर बिंधास्त विचारले जातात.
सासू सून वाद ही समस्या बघता वाटतं पूर्वी वानप्रस्थाश्रम होत ते काय वाईट होत. नवं स्विकारण्याच्या नादात जून चांगल असूनही माग पडलं.
कधी कधी जी आई मुलगा आणि मुलीला समानते ने वाढवते तीच आई सासू झाल्यावर मात्र मुलगी आणि सून यांच्यात भेदभाव करतांना आढळते .

समानता जर व्यवहारात आणली तर मुलगा- मुलगी, मुलगा -सून , मुलगी-सून , नणंद -भावजय, बहिण- नणंद, सासू- आई, मुलगा- जावई हे आणि असे अनेक भेद समाजातून नष्ट होतील.
"जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी " हे उगाच बोलल्या गेलं नाही आपल्यात ती शक्ती आहे तेव्हा आपणच आपल्या पुढच्या पिढीत समानता रुजवायला हवी. त्याआधी आपल्या स्वतः मधे ती भिनवायला हवी. नवीन संस्कृती उदयाला घालतांना जुन्या संस्कृतीच्या चांगल्या गोष्टीही सोबत घ्यायला हव्या. संसार करणाऱ्या नवरा बायको मधे स्पर्धा निर्माण न करता , त्यांची जुन्या पिढीशी तुलना न करता संसार त्या दोघांचाही आहे, तडजोड दोघांनाही करावी लागेल  ही जाणीव करून द्यायला हवी. आता केलेल्या छोट्या छोट्या तडजोडी सुखी संसाराची नांदी असतात हेही लक्षात घ्यायला हवं.
लग्न करणाऱ्या मुला मुलींना आजकाल सगळं मनासारखं, परफेक्ट लागतं पण ते तस भेटलं नाही तर आपल्या मनासारखं करून घेत असतांनाच जोडीदाराच्या मनालाही जपावं लागतं याची शिकवण द्यायला हवी.
असं केलं तर घटस्पोटाच प्रमाण कमी होईल .


"आजकाल" निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्येची कारण ही भूतकाळात दडलेली असतात. त्यावर वर्तमानकाळातच उपाय योजना केल्या गेली तर भविष्य काळ नक्कीच सुखकारक होईल. अशी माझी धारणा आहे.

जिथे घटस्फोट घेणे अनिवार्य आहे तिथे तो घेतलाच जावा. उगाच नात टिकवायचे एकतर्फी प्रयत्न करत आयुष्य वाया घालवू नये याच मताची मी ही आहे.
पाश्च्यात्य संस्कृतीचे अनुकरण करतांना आपल्या संस्कृतीत असलेल्या चांगल्या मूल्यांची  जपणूक आवर्जून करायला हवी. बदलत्या काळानुसार पुरातन ज्ञान आणि आधुनिक विचार यांची योग्य सांगड घालायला हवी तरच आपली कुटुंब संस्कृती खऱ्या अर्थाने बहरेल .
वाचकांना माझे मत पटेल न पटेल पण आजही घटस्पोटाकडे अखेरचा पर्याय म्हणूनच पाहिले जावे एवढीच माफक इच्छा आहे म्हणून हा लेखन प्रपंच.
©️ अंजली मीनानाथ धस्के
(लिखाण आवडल्यास  प्रतिक्रिया नोंदवायला विसरु नका. या लेखाच्या प्रकाशनाचे सगळे हक्क लेखिकेच्या मालकीचे आहेत. नावा शिवाय कुठेही प्रकाशित केलेले आढळल्यास कारवाई करण्यात येईल.)

फिटनेस फंडा

फिटनेस_फंडा   
            बागेतल्या झाडांमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या ओपन जिम मधील उत्साही माणसांना बघून, 'आजकाल फिटनेससाठी काय काय केलं जातं ' यावर चर्चा सुरू होती. सगळी तरुण झाडे सळसळ करत आपले मुद्दे मांडत होते. ज्येष्ठ वृक्ष मात्र शांत उभा होता. तेवढ्यात  सकाळी बागेत फिरायला येणाऱ्यांना आकर्षित करून स्वतःच्या क्लबचे  मेंबर बनवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांनी 'डान्सिंग फॉर फिटनेस' ची फ्री कार्यशाळा आज आयोजित केली आहे असे जाहीर केले. त्यांनी स्पीकर वर आधुनिक गाणी लावली. सगळ्या झाडांची सळसळ थांबली. कान मात्र टवकारल्या गेले. समोर काही मुले उभी राहून हात पाय कसे हलवायचे याबद्दल सूचना देवू लागली. फार काही प्रतिसाद मिळत नाही हे बघून लोकांचे लक्ष वेधून घेत त्यांच्यातील एका गुटगुटीत पोराने माईकचा ताबा घेतला. त्यावर  ," आपल्या आयुष्यात खूप टेन्शन असतात. त्या सगळ्यांना घटकाभर तरी विसरता आलं पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी थोडा तरी वेळ काढता आला पाहिजे. कसलीही लाज बाळगू नका. नाचता येत नसेल तर आम्ही शिकवू. हसत खेळत , झिंगाट ऐकत फिटनेस मिळवा आणि आयुष्याची गाडी बुंगाट पळवा". असे बोलला. तसे पुन्हा एकदा नव्या जोमाने गाणी लागली.
           " झिंग झिंग झिंगाट" ,
"तुझ्या साडीला सर्फ लावून धुवून टाक" अशी गाणी जोरात वाजू लागली.  सकाळी असली गाणी कानावर पडल्याने,  व्हायचं तेच झालं. पार्टी आणि व्यायाम यायला फरक न कळल्याने गाणी ऐकताच रात्रीचा हँग ओव्हर न उतरलेले काही जण त्यांच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत बेधुंद होऊन नाचत सुटले. मघाचा माईक हातात घेतलेला गुटगुटीत पोरगाही सूचना देत देत नाचायला लागला.
दुर बाकावर बसलेल म्हातारं मित्राला म्हणलं ," माझा नातूबी रोज रात्री  पार्टी का काय म्हणत असच गाणं लावून नाचतंय. डोकं उठवतंय . आता सकाळच्या पारी फिटनेसच्या नावावर डोकं उठवण्याचे यांना पैसे  द्यायचे? घोर कलयुग आलाय .... हरी ओम .. .. हरी ओम "
तेव्हढ्यात 'आवाज वाढव डिजे तुला आईची शपथ हाय' हे गाणं लागले. त्या गाण्याच्या तालावर उत्साहित तरुण झाडांनीही ताल धरला. ती सगळी अधिकच सळसळू लागली.
मघाशी माईक हातात घेऊन आयुष्याला बुंगाट पळवा म्हणणारा गुटगुटीत पोरगा आता नाचून थकल्याने कोपऱ्यात जावून धापा टाकायला लागला.
     तरी काही चाणाक्ष झाडांनी त्याला हेरलच. त्यांच्यात ," हा स्वतः अजून इतका गुटगुटीत आहे. जरा नाचला नाही तर धापा टाकतो आहे. हा काय लोकांची आयुष्य बुंगाट पळवणार?" अशी जोरदार चर्चाही रंगू लागली. 
          हा सगळा प्रकार गुपचूप बघणारं जून झाड मात्र, "संगीत संस्कृतीत प्रत्येक प्रहरासाठी एक विशिष्ट राग आहे. त्याचाच नेमका आजच्या पिढीला विसर पडला आहे" म्हणत खिन्न हसलं.' काळासोबत बदलायलाच हवं. बदलता येत नसेल तर निदान गप्प राहणे शिकायला हवे.' असे स्वत:लाच समजावत " तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे " या स्वतःच्याच जुन्या फिटनेस फंड्यावर डोळे मिटून घेत गार वाऱ्यासोबत ताल धरून डूलायला लागलं.

©️ अंजली मीनानाथ धस्के
लिखाण आवडल्यास प्रतिक्रिया नोंदवायला विसरु नका.
(या लेखाच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या मालकीचे आहेत.)

असाही बालदिन

#असाही_बालदिन
#१००शब्दांचीगोष्ट
सोहम आणि स्पृहाने  रागातच साक्षीच्या केबीनमधे प्रवेश केला. ती तिथे नव्हती.   स्पृहाच लक्ष टेबलवर ठेवलेल्या भेटवस्तूंकडे गेलं. त्यावरचा मजकूर अर्धवट होता. आपल्यासाठी  मजकूर लिहितांना तिला तात्काळ शस्त्रक्रिया विभागाकडे  जावं लागलं होतं याची जाणीव होवून दोघांचाही राग शांत झाला.  शेजारच्या खोलीत असलेले आजोबा औषध घ्यायला नकार देत आरडाओरडा करत होते. दोघांनी तिथे जाऊन साक्षी सांगते तसचं त्या आजोबांना समजावून सांगितलं. त्यांनी बालकांपुढे बालहट्ट मागे घेत  इंजेक्शनही  घेतलं.
तेवढ्यात आजोबांची समजूत काढण्यासाठी साक्षी तिथे पोहचली. समोरचे दृश्य पाहून,"बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा" म्हणत तिघांनाही चॉकलेट्स दिली. आजोबा त्यावर दिलखुलास हसले. मुले तिला प्रेमाने बिलगली आणि सगळ्यांनाच प्रगल्भतेची जाणीव करून देणारा बालदिन साजरा झाला.
©️ अंजली मीनानाथ धस्के
anjali-rangoli.blogspot.com
या लिंक वर इतर लिखाण आणि रांगोळ्या उपलब्ध आहेत.
Momspresso Marathi वर विजेती कथा म्हणून निवड झालेली ही १०० शब्दांची गोष्ट.

आठवणीतली दिवाळी

#आठवणीतली_दिवाळी
#ठिपक्यांची_रांगोळी
       आमच्या लहानपणी रंगीत  रांगोळ्या अंगणात सजल्या की दिवाळी आली असं जाणवायला लागायचं. दिवाळीच्या दिवशी तर  ठिपक्यांच्या मोठं मोठ्या रांगोळ्या काढण्याची चढाओढ रंगायची.   संध्याकाळी त्या रांगोळीला दिव्यांनी सजवतांना तर अधिकच मजा वाटायची. अंगणातील रांगोळी दिव्यांनी उजळुन निघाली की आमचे चेहरेही खुलून यायचे.
     ठिपक्यांच्या रांगोळ्यांमधे तुळशवृंदावन, हंसांची जोडी, कमळ फूलं, पोपट, बदक , चांदण्या , फुलपाखरू , हत्ती असे अनेक आकार सहज काढले जायचे. ठिपक्यांची रांग जितकी सरळ , दोन ठिपक्यां मधले अंतर जितके एक समान तितकी रांगोळी सुबक आणि सुंदर यायची . विशेष म्हणजे मोठी रांगोळी काढली तरी घरची सगळीच लहान थोर मंडळी त्यात रंग भरण्याचे काम करू लागतं असे.  शेजारच्यांशी कितीही चढाओढ असली तरी एकमेकींना रंग भरायला मदत करण्यासाठी मात्र सगळ्याच जणींचा कायमच मदतीचा हात पुढे असायचा.
 आमच्यातल्या अनुभवी मुली रंग संगती ठरवत . आम्हीच्यावर मात्र त्यांनी ठरवून दिलेले रंग ठरवून दिलेल्या आकारात व्यवस्थित भरण्याची जबाबदारी असायची.
        या कामात घरी आलेली पाहुणे मंडळीही हातभार लावत असे.  लहान काका आणि आम्ही अनेक दिवाळी सोबत साजऱ्या केल्या . तेव्हा फोन नसले तरी पत्र व्यवहाराने एकमेकांना आमंत्रण दिले जायचे. महिला मंडळी फराळाचे करण्यात मग्न असायच्या तेव्हा काका आणि आम्ही पोरं  आकाशदिवे, झेंडू फुलांच्या माळा , आणि रांगोळी यांची जबाबदारी अगदी आनंदाने स्वीकारत असू.  या व्यापातून वेळ काढून आम्हा मुलामुलींचे किल्ला बनवण्याचे कामही जोरात सुरु असायचे. किल्ल्याच्या सभोवताली  शेणाने सारवून मस्त आंगण केले जायचे . त्या अंगणात विहीर , शेत असं इतर बरंच काही करत असू पण माझ्यासाठी किल्याच्या अगदी समोरचं छोटसं गुळगुळीत आंगण  फार महत्त्वाचं असायचं कारण किल्याच्या समोर पाच ते पाच ठिपक्यांची छोटीशी रांगोळी काढण्याची जबाबदारी माझ्या एकटीची असे . मला ही जबाबदारी अत्यंत प्रिय होती . तिथे काढायची रांगोळी कोणती असेल? त्यासाठीची रंग संगती कोणती असेल? हे सगळं मी एकटीने ठरवलेलं असायचं. तिन्ही सांजेला पूजेची आणि घराभोवती दिवे ठेवण्याची लगबग सुरु असली तरी  त्या रांगोळीवर  एक पणती नेवून ठेवल्याशिवाय मला चैन पडत नसे. किल्ल्यावर इतर दिवे ठेवण्याचं काम आई करायची. ते करत असताना ती आवर्जून माझ्या रांगोळीच कौतुक करायची. तिने  कौतुक करावं म्हणून तर माझी सगळी धडपड असायची. ताई मात्र चिडून आईला म्हणायची , " माझी रांगोळी तिच्या रांगोळी पेक्षा कितीतरी चांगली आहे. तु उगाच तिची खोटी स्तुती करते". त्यावर आई तिला समजावयाची," अग तुझी रांगोळी अप्रतिम असते. तिच्या आणि तुझ्या रांगोळीची मी कधी तुलना करत नाही. तू तिच्या पेक्षा वयाने मोठी  , तुझ्या तुलनेत तिला रांगोळीचा सराव नाही , विशेष म्हणजे तू काढलेल्या रांगोळीत रंग भरून जे रंग उरतात त्यांचाच वापर तिने करायचा असतो . त्यामानाने तिची रांगोळी छानच असते . तिलाही सगळे रंग आणि मोठं आंगण दिलं तर तीही नक्कीच चांगली रांगोळी काढेल . तसंही ती तुझं बघूनच रांगोळी काढायला शिकते आहे. त्यामुळे तिची रांगोळी चांगली आली तर त्यात तुझाही वाटा आहेच. तुमच्या दोघींमधे स्पर्धा निर्माण होवू नये उलट तिने तुझ्या कडून अजून चांगली रांगोळी काढायला शिकावं म्हणून मी तिचं कौतुक करते ".
        यावर ताईनेही कधी आमच्या रांगोळ्यात तुलना केली नाही. उलट त्या नंतर मला रंग देताना ती ते कसलेही आढेवेढे न घेता देवू लागली.
         बालपणी सारखी समाधानी  दिवाळी पुन्हा अनुभवता येणं कठीण म्हणून काळाच्या ओघात मागे पडलेली ठिपक्यांची रांगोळीच यंदा खास दिवाळीच्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला. २० ते २० ठिपक्यांची ही रांगोळी आहे.
ही रांगोळी काढतांना पूर्वी इतकीच मजा आली . या रांगोळीतही रंग भरतांना घरच्यांनी थोडी मदत केली. लक्ष्मीला कमळ फूलं अत्यंत प्रिय असतात म्हणून मग रांगोळीतही कमळ फुलंच रेखाटली आहेत.
तुम्हालाही रांगोळी आवडल्यास नक्की कळवा. आपली प्रतिक्रिया हिच प्रेरणा असते.
सगळ्या वाचकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ....
आपल्याला ही दीपावली सुख, समृध्दी , समाधान , आरोग्यदायी आणि भरभराटीची जावो हीच इच्छा.....
©️ अंजली मीनानाथ धस्के
(इतर लिखाण आणि रांगोळ्या anjali-rangoli.blogspot.com आशयघन रांगोळी या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे.)

सोप्या सुंदर रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. 

तसेच रंग माझा वेगळा या face book  पेज लाही follow करा 








पणती

#पणती
©️अंजली मीनानाथ धस्के

         यंदा अनेक कंपन्यांनी बोनस द्यायचं टाळलं होतं. अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असल्या तरी दिवाळी सण म्हटलं की थोडा तरी हात सैल सोडावाच लागतो. दिवाळी या सणावर यंदा मंदीचे सावट पसरलेले असले तरी बाजार मात्र नेहमीप्रमाणे गर्दीने फुलून गेला होता. कितीही तंगी असली तरी स्वतःसाठी खरेदी करतांना कोणी हातच राखून खरेदी करत नाही. हेच खरं....
                               निशालाही यंदा खर्च कमी करावा असंच वाटतं होतं. तिच्या लहान मुलाला दिवाळी असली की भारी उत्साह असायचा.त्याच्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणत त्याच्यासाठी आवश्यक ती खरेदी करणेही गरजेचे होते. इच्छा नसतांनाही ती नवऱ्याच्या आग्रहाखातर त्या गर्दीचा एक भाग झाली होती. ठरलेल्या दुकानातून ठरलेल्या वस्तू घेवून बाहेर पडल्यावर बाजारात असलेल्या मंदिरातही जावून यावं म्हणून ते तिघेही मंदिरात गेले . पुरुषांची रांग लांब असल्याने नवरा आणि मुलगा मंदिरातून बाहेर यायला वेळ होता. शांततेत दर्शन घेवून निशा मंदिराच्या बाहेर पडली. ती बाहेरच्या पायरीवर बसली. तिला गर्दिचा भाग होण्यापेक्षा गर्दीचे निरीक्षण करायला खूप आवडायचे. बाहेर पडल्यावर मंदिराच्या आवारातच एक गजरेवाला गजरे विकत बसलेला होता. ती त्या गजरेवाल्याच निरीक्षण करण्यात रमली. त्याच्या फुलांचा सुगंध मनाला वेड लावत होता. कितीही काटकसरी बाई असली तरी तिला गजऱ्याचा मोह होतोच. अनेक बायका त्याच्याशी भाव करून करून थकल्या पण तो काही ऐकत नव्हता . बायकाही 'महागाईच वाढली आहे, त्याला आपण तरी काय करणार ' असं म्हणत नेहमी १० रुपयाला मिळणारा गजरा शेवटी निमूटपणे २० रुपयाला घेवून आनंदाने केसात माळत होत्या. निशालाही गजरे खूप आवडायचे . लहान असतांना तर गजरा माळल्याशिवाय तिचा दिवस जात नव्हता . हळूहळू तिचे गजरा माळण्याचे वेड कमी झाले. गजरा घेवून त्याचा सुगंध श्वासात भरून घ्यायला मात्र ती कायम उतावीळ असायची.
       तिची पावलेही गजरे वाल्याकडे वळली. ती गजरेवाल्याकडे जाणारh⁷ तोच तिला एका फुगेवाल्याने अडवले. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघता त्याला खात्री होती की एकदाका निशाने गजरा घेतला तर ती काही त्याच्याकडून फुगे घेणार नाही. बायकांची सगळी गर्दी गजरे वाल्याकडे होती . त्यांच्या लेखी फुगेवाल्याला अस्तित्व नव्हते. फुगेवाला मात्र गजरेवाल्याकडे जमलेली गर्दी पाहून विचार करत होता ,' आपलंही आयुष्य या फुलांसारखं एकाच दिवसाचं पण सगळ्यांना हवं हवसं असतं तर किती बरं झालं असतं'.
         निशाची नजर जरी गजऱ्यावर खिळली होती तरी तिने फुगेवाल्याला विचारल," कैसा दिया? " त्यानेही लगेच सांगितलं ," सादावाला बीस रुपये और फॅन्सीवाला पचास रुपये". " पचास रुपये " असं ती जरा आश्चर्याने जोरातच बोलली. नकळत तिचा हात वीस रुपयाच्या फुग्यावर स्थिरावला. तिच्याकडे बघून फुगेवाल्याला वाटलं की, तिने तिचा हात वीस रुपयाच्या फुग्यावर ठेवलाय म्हणजे यातही ती भाव करणार .
       कोणता फुगा घ्यावा? तिचा निर्णय झालाच नाही . ती तशीच विचार करत थांबली. खरं तर ज्याच्यासाठी फुगा घ्यायचा होता तो तिचा लाडोबा मंदिराच्या पायरीवर बूट घालण्यात व्यस्त होता. त्याच्याच पसंतीने फुगा घ्यावा म्हणून ती उगाच फुग्यांवरुन हात फिरवीत वेळ काढत होती.
      ती वेळ काढत होती पण इकडे फुगेवाल्याच्या डोळ्यात भीती दाटून आली होती की, ' हेही गिऱ्हाईक काही न घेताच जाणार '. त्याला ती शांतता सहन होत नव्हती म्हणून ती हात ठेवेल त्या फुग्याचा रंग, आकार खूप छान आहे, असं तो सांगू लागला.
         निशाने तेवढ्यातही निरीक्षण केले. त्याचा कळकट अवतार , समोरचं बास्केटमधे पेंगुळेलं छोट लेकरू, तेही तितकच कळकट, सोबतीला मागे कॅरीअरवर त्याच्या अंथरूूणाच गाठोडं.... यावरून त्याच्या परिस्थितीचा अंदाज बांधला. फुगे विकून जे पैसे मिळतील त्यात पोट भरायचं आणि रात्र झाली की जागा मिळेल तिथे झोपायचं. असंच त्याच आयुष्य असावं. याची जाणीव तिला बेचैन करून गेली. 
           आता रात्रीचे आठ वाजले होते. निशा कडे बघत, 'या बाईनेही फुगा घेतला नाही तर?' याची चिंता, वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात छोट्या अक्षयची आणि त्याच्या बाबांची स्वारी आईला शोधत फुगेवाल्यापाशी पोहचली. निशाने अक्षयला लगेच विचारलं, " कुठला फुगा हवाय तुला ?" एरवी काही खरेदी करायचं म्हंटल की नाही म्हणणाऱ्या आईने आज स्वतःहून कोणता फुगा हवाय? असं विचारलं होतं. तिच्या या प्रश्नाने अक्षय खूपच बुचकळ्यात पडला असला तरी चालून आलेली संधी न गमावता त्यानेही लगेच फॅन्सी फुग्यातल्या स्पायडर मॅनकडे बोट दाखवून ," तो हवाय " म्हणून सांगून टाकले . तिनेही लगेच फुगा घेतला. फुगेवाल्याला शंभर रुपयाची नोट दिली आणि पन्नास रुपये परत घेण्यासाठी तिथेच थांबली . त्याने शंभरची नोट हातात तर घेतली मात्र तिला परत देण्यासाठीचे पन्नास रुपयेही त्याच्याकडे नव्हते. त्याचा खिसा रिकामा होता. त्यावरून दिवसभरात एकही फुगा विकला गेला नव्हता याची निशाला कल्पना आली.
        रात्र वाढत चालली तशी सगळ्यांना घरी जायची घाई होती. कोणी चिल्लर देत नव्हते . आता 'ही' शंभरची नोट परत केली तर 'ही' बाई फुगा न घेताच निघून जाणार . चिल्लर नाही म्हणून हाता तोंडाशी आलेली कमाईही जाणार या विचाराने नोट परत देत तो खिन्न हसला. त्याची ही अवस्था बघून निशानेच पुढाकार घेऊन आजूबाजूच्या बायकांना चिल्लर आहे का ? म्हणून चौकशी सुरु केली. खरं तर शेजारीच उभा असलेला नवरा चिल्लर आणायला जवळच्या दुकानाकडे निघाला होता तरी ती मुद्दाम ज्यांच्याकडे लहान मुले आहेत त्याच बायकांना विचारात राहिली. त्या बायकांनी नाही म्हंटल्यावरही ,' बघा असतील तर ..... मिळाले तर बरं होईल. फुगेवाल्याला द्यायचे आहेत.' असं सांगत त्यांना हातातला फुगा दाखवू लागली. तिच्या हातातला फुगा बघून त्या बाईजवळ चिल्लर नसली तरी तिचे मुलं फुग्यासाठी हट्ट सुरू करू लागे. उभ्या उभ्या तिने दोन तीन बायकांच्या मुलांना फुग्यासाठी हट्ट करायला उदुक्त केले. नवरा चिल्लर आणेपर्यंत तिघी चौघींनी आपल्या हट्ट करणाऱ्या मुलांना वीस रुपयाचा फुगा देवून गप्पही केले. तिनेही तिच्या फुग्याचे पन्नास रुपये दिले . ते पैसे खिशात टाकतांना, 'आज रात्रीच्या खाण्याची सोय झाली' याचा आनंद त्याच्या डोळ्यात होता. तो तोंडभरून हसला आणि तिला धन्यवाद देवू लागला. त्याचा आनंद तिला एक वेगळीच ऊर्जा देवून गेला. तिने गजरा न घेताच परतीची वाट धरली. आज फुलांचा सुगंध श्वासात भरून घेता आला नाही तरी एका जीवाचा त्याच्या कष्टाच्या कमाईवरचा विश्वास मात्र तिने टिकून ठेवला होता. ' कितीही महागाई वाढली तरी माणुसकी महाग होता कामा नये ' या विचाराच्या पणतीने तिच्या मनात प्रज्वलित होताच तिचा चेहराही समाधानाच्या तेजाने लख्ख उजळून निघाला.

©️अंजली मीनानाथ धस्के

( सदर कथेच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधिन आहेत. लेखिकीच्या नावासहितच कथा शेयर केली जावी)

दिवाळी हा सण  दिव्यांचा आहे. एक छोटी पणती जसा तिच्या भोवतीचा अंधःकार दूर करते . तसेच एक चांगला विचार आपल्या  मनातील रितेपणाचा  अंधार दूर करून आपल्या विचारांना सकारात्मक दिशा देण्याचं काम करतो. अशाच एक, एक करत जेव्हा असंख्य चांगल्या विचारांच्या पणत्या
आपल्या मनात प्रज्वलित होतील तेव्हा आपले व्यक्तिमत्त्व तर दिवाळीसारख्या मांगल्याच्या झगमगाटाने उजळून निघेलच पण इतरांच्या आयुष्यातही आपल्याला आशेचा प्रकाश पसरवता येईल. सद्य परिस्थितीत संस्कारांच्या अध:पतनाचा अंधकार हा सकारात्मक विचारांच्या पणत्यांनीच नष्ट करणे शक्य आहे.
सोप्या सुंदर रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. 

तसेच रंग माझा वेगळा या face book  पेज लाही follow करा 
ईतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे 

( सदर कथेच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधिन आहेत. लेखिकीच्या नावासहितच कथा शेयर केली जावी)


कोजागिरी पौर्णिमा २०१९

#कोजागिरी_पौर्णिमा
#चंद्र

 पौर्णिमा म्हणताच सगळ्यात आधी आठवतो तो शीतल , असा पूर्ण चंद्र. त्यातही कोजागिरीचा चंद्र तर अप्रतिम सुंदर दिसतो . या चंद्र प्रकाशाचे महत्त्व जितके तितकेच कवी मनावर याचे राज्य अधिक आहे.  सागरला भरती येते त्याप्रमाणेच पोर्णिमेच्या चंद्राला पाहून माझ्या शब्दांनाही उधाण येतं. कोजागिरीच्या सर्व वाचकांना खूप खूप शुभेच्छा....... 
शरद पौर्णिमेनिमित्त सहजच सुचलेले शब्द..... तुम्हाला आवडल्यास नक्की कळवावे.
#चंद्र
#मिलन
तू पौर्णिमेचा चंद्र होता 
मी रातराणीचा गंध व्हावे
शरदाच्या चांदण्यात न्हावून निघता
कणाकणाने मी बहरत जावे
प्रेमाच्या धुंदीत हरवत जाता
हळूच कवेत मला तू घ्यावे
श्वासात सुगंध भरून घेता
तूही तुला विसरत जावे
तुझ्यात मी मला शोधता
माझ्यात तू झिरपत जावे
काळोखाच्या पार्श्वभूमीवर 
तुझे अन् माझे मिलन व्हावे

©️ अंजली मीनानाथ धस्के



रंजना


#रंजना

                      पै पैं जमवून संसार करावा . काहीतरी संकट यावं आणि सगळंच संपून जाव . असंच काहीसं रंजनासोबत होत होतं . शिकलेला नवरा आहे म्हणजे आज ना उद्या चांगली नोकरी लागेल या आशेने तिने संसाराला सुरुवात केली . एका मागोमाग तीन मुलांचे मातृत्व तिने स्विकारले . घरातले सदस्य वाढत गेले तरी नवऱ्याला नोकरी लागायचा पत्ता नाही . त्याने शेवटी मजुरीचा मार्ग पत्करला. तिनेही चार घरची धुणीभांडी करायला सुरुवात केली. जरा सुरळीत सुरू झालं नाही तितक्यात लहान मुलाचा सारखा दवाखाना सुरू झाला. आधीच शिल्लक काही रहात नव्हतं त्यात दवाखान्याचा खर्च , मोठ्या दोन मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाची भर पडली. नवऱ्याने जास्तीचे काम घेतले तर हिनेही अजून काही घरची काम धरली. बघता बघता मोठी मुलगी दहावीत, लहानी आठवीत तर मुलगा पाचवीत पोहचले. खर्च वाढतच चालले . निराश न होता तिने मेहनत वाढवली . रोजचं खायला मिळतं आहे आणि मुलांचे शिक्षण सुरू आहे यातच समाधान होत . पण हे समाधान ही फारस टिकलं नाही . बांधकामावर असतांना नवरा वरच्या मजल्यावरून खाली पडला. कमरेच्या हाडाला जबर मार लागला . त्याने अंथरून धरलं. ऑपरेशनला पर्याय नव्हता.
ऑपरेशनला पैसे आणायचे कुठून? अंगावरचे चार मणी डोरल आधीच मोडून झाले होते . नवऱ्याने अंगावर दुखणं काढलं तरी कामावर जाता येतच नव्हतं. सगळा भार हिच्या एकटीवर येवून पडला. मोठीची दहावी झाली . अभ्यासात हुशार म्हणून तिला डॉक्टर करायचं स्वप्न बघितलं होत . उत्तम गुणांनी उत्तीर्ण होवूनही घरची परिस्थिती बघता तिने कॉमर्स कॉलेजमधे प्रवेश घेतला. नवऱ्याची तब्येत खूपच बिघडली . उठणं बसणं पूर्ण बंद झालं . होणाऱ्या वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या तेव्हा "यंदा दिवाळीला बोनस देवू नका पण  नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी लागणारी रक्कम तेवढी जमा करायला मदत करा " असं सांगून तिने कामावर आगावू रक्कम उचलली.  नवऱ्याचं ऑपरेशन करून घेतलं .
ऑपरेशन झाल्यावर सगळं आधी सारखं सुरळीत होईल असं वाटलं होतं पण.... आज डॉक्टर जे बोलले त्याने सगळ्या आशाच संपल्या होत्या . ऑपरेशन झालं तरी वर्षभर कोणतेही काम करायचे नाही फक्त आराम करायचा.  तसेच वर्ष झाल्यावर  पूर्वीसारखे जड काम तर करायचे नाहीच पण बैठे काम ही खूप वेळ बसून करणे टाळायचे . थोडक्यात जीव जगाला होता फक्त.... बाकी पूर्वी सारखे काहीच होणार नव्हते . तिच्या संसाराचे एक चाक कायमचे अधू झाले होते . इथून पुढे संसाराची गाडी तिला एकटीलाच ओढायची होती. तिच्या मनाप्रमाणेच शरीरावरही खूप ताण पडत होता. स्वतःच दुखणं कुरवाळायला तिला वेळच नव्हता . तिने संकटांनी वेढलेले हे जीवन संपवून टाकण्याचा निर्णय घेतला. अंगात ताप , डोळ्यात पाणी घेवून ती नवऱ्याच ऑपरेशन नीट व्हावं म्हणून केलेला नवस फेडण्यासाठी निघाली होती खरी पण डोक्यात विचार वेगळेच सुरू होते. एका क्षणात स्वतः च आयुष्य संपवून घ्यावं . मोकळं व्हावं या कष्टाच्या जगण्यातून . आपल्या माघारी काही का होईना ... आपण सुटाव यातून . हेच विचार घोळत होते. नवरात्रीचे दिवस होते. ती देवीच्या मंदिरात गेली. देवीच्या  पायावर डोकं टेकवलं. आता इथून बाहेर पडल्यावर घाटावर जावून जीवन संपवावं असंच तिच्या मनात होतं.
मंदिरात दर्शन घेवून बाहेर पडल्यावर तापाने थरथरणाऱ्या शरीराला जरा थंडावा मिळवा म्हणून   ती तिथल्याच डेरेदार झाडाखाली असलेल्या रांजणाच पाणी पीत विसावली. तिथे तिला एक भीक मागत असलेलं  जोडपं दिसलं. बायको पंगू झाली म्हणून हताश नवरा तिच्या पंगू पणाचे भांडवल करून भीक मागत होता.  आपसूकच तीच लक्ष त्यांचं निरीक्षण करण्यात गुंतलं. येणारे जाणारे त्यांच्या पुढे ठेवलेल्या भांड्यात नाणी टाकत होते. ज्यांनी नाणी टाकली नाही त्यांच्या मागे हा माणूस जात होता आणि बायकोच्या दुखण्याचे रडगाणे गात होता . समोरच्याने कितीही शिव्या हासडल्या, हाकलून लावलं तरी तो मागे हटत नव्हता. उलट त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःचे घाणीने भरलेले हात त्यांना लावत होता. पैसे मिळेपर्यंत पिच्छा पुरवत होता. त्याच्या त्या मळकट आवतारापासून सुटका करून घेण्यासाठी लोक नाईलाजाने का होईना पैसे देत होते.
रंजना होती तोपर्यंतच त्याने १०० एक रुपये कमावले.  ते  पाहून शरीराने पंगू असलेल्या त्याच्या बायकोपेक्षा मनाने पंगू असलेल्या त्या नवऱ्याची तिला कीव आली. त्याच वेळी
शरीराने धडधाकट असूनही पैसे मिळवण्यासाठी बायकोच्या अधू असण्याचा तो वापर करत होता याची तिला चीडही आली.
देवीचा उत्सव सुरू असतांना तिच्याच दारात एका स्त्रीच्या अधूपणाचे भांडवल करून भीक मागितली जात होती. स्त्री शक्तीचा उत्सव असून एक स्त्री शरीरानेच नाही तर विचारानेही पंगू होवून भीक मागत होती.
 पैसा तर हवाच असतो पण त्यासाठी स्वाभिमान सोडून देणं तिला मान्य नव्हतं. परिस्थितीशी लढण्याची ताकद हातात असतांना ... ते हात असे लोकांपुढे पसरणे तिला मान्य नव्हते.  सृष्टीतल्या शक्तीने अनेकदा वेगवेगळी रूपे घेवून दुष्टांचा संहार केला.  तसेच आपल्यालाही आपल्या स्त्री शक्तीचा विसर पडता कामा नये.   
              त्या भीक मागणाऱ्या जोडप्याला बघून तिने मनातले सगळे वाईट विचार झटकून टाकले. आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तरी   आपल्या कुटुंबाने कोणा पुढेही भीक मागता कामा नये . मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठीचे लागणारे सगळे शिक्षण , संस्कार द्यायचे.
 आपण आपल्या संकटांचा सामना करायचा. ताठ मानेने  यापरिस्थितीतून बाहेर पडायचे. जोपर्यंत हाताला काम मिळतं आहे तोपर्यंत काम करूनच घर चालवायचं. कष्टाचे जीवन जगावे लागले तरी चालेल पण लाचारीचे जीवन आपण  आपल्या कुटुंबालाही कधीच जगू द्यायचे नाही. असा निश्चय करूनच ती तिथून उठली.
          तिच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारली .  तिने सगळ्यात आधी दवाखान्यात जाऊन स्वतःसाठी औषधं घेतली. घरी गेली. काही दिवसात बरं वाटलं तेव्हा तिने जास्तीची कामे धरली. तिची काम करण्याची इच्छा आणि घर पुन्हा उभं करण्यासाठीची चाललेली धडपड कामावर अनेकांच्या लक्षात आली. त्यांनी मदत देवू केली तेव्हा ती ठाम पणे बोलली ," काम असेल तर सांगा पण दया म्हणून काही नको" .
तिच्या या बोलण्याने प्रभावित होऊन एका ताईंनी तिच्या मोठ्या मुलीसाठी  झेपेल आणि  जमेल असं कोचिंग क्लासमधे आलेल्या पालकांना माहिती देण्याचं काम दिलं. एका ताईंनी तिच्या नवऱ्याला पेपर बॅग बनवण्याचं प्रशिक्षण  दिलं. त्याला जमतील तेवढ्याच पेपर बॅग त्याने बनवायच्या. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आणि त्यातून मिळणारा मोबदलाही त्याला घरपोच मिळण्याची सोय केली.
तिचं मुलं लहान होती पण तिच्याकडे पाहून तीही परिस्थितीशी लढायला शिकली. सगळ्यांनी कामालाच देव मानून त्याची अखंड आराधना केली.
 हळू हळू दिवस बदलले. मोठी मुलगी  एका कंपनीत अकाउटांट म्हणून काम करू लागली तर लहानीने डी एड चा अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. मुलगा ही शिक्षण घेता घेता मिळेल ते काम करायला लागला होता.
आज परिस्थिती बदलली तरी रंजनाचा तिच्या कामावर असलेला विश्वास कायम आहे . आजही  तिला कोणी भीक मागितली तर ती न देता काम करायची तयारी असणाऱ्यांना ती काम मिळवून देते.

©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहीत करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे



दसरा २०१९


#दसरा२०१९
#दुर्गुणांचे_दहन
#पाटीपुजा
दसरा हा सण आपण चांगल्याचा वाईटावर विजय या अर्थाने साजरा करतो. इतरांचे दुर्गुण आपल्याला चटकन् दिसतात पण आपल्यातल्या दुर्गुणांकडे कळत नकळत आपलेच दुर्लक्ष होते. कोणीही परिपूर्ण नसतं. परिपूर्णतेचा ध्यासच आपल्यातील चांगल्या गुणांची वृध्दी करण्यास कायम प्रेरित करतो.
आधी आपल्यातल्या दुर्गुणांचा नाश केला पाहिजे तेव्हा आपण एक उत्तम माणूस म्हणून आपले अस्तित्व टिकवू ठेवू शकतो.
" जग बदलावे असे वाटत असेल तर त्या बदलाची सुरुवात आपल्या पासूनच करायला हवी ".  हा बदल तेव्हाच घडून येईल जेव्हा  शिक्षणातील  मूल्यांचा वापर आपण आपल्या आयुष्यात करू . शिक्षणाने  आपण केवळ शिक्षित होत नाही तर सुसंस्कृत होण्यास मदत मिळते.  म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी पाटी पूजनाला खूप महत्त्व आहे.
                 दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिक्षणाची कास धरत स्वतःतल्या रावणाचे दहन करण्याचा संदेश देणारी  ही रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल.
तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा...
©️ अंजली मीनानाथ धस्के


देवीच्या साडेतीन शक्तिपीठांचे मुख दर्शन ( नवरात्र २०१९)

#देवीच्या_साडेतीन_शक्तिपीठांचे_मुख_दर्शन

               नवरात्र म्हणजे शक्तीचा जागर.  नवरात्रात देवीच्या मुखावर प्रचंड तेज असते. या तेजस्वी रूपाच्या दर्शनाने आपल्यालाही सकारात्मक ऊर्जा मिळते. संपूर्ण वातावरण जणू आध्यात्मिकतेने भारावून गेलेले असते. मूर्तीतल्या दिव्य तेजाचे शक्ती रूप बघितल्यावर जी अनुभूती होते ती शब्दात सांगणे कठीण.

        सगळ्यांनाच हा अनुभव घ्यायचा असल्याने देवीच्या मंदिराकडे आपोआप आपली पाऊले वळतात. कधी नव्हे इतकी भक्तांची गर्दी मंदिराच्या गाभाऱ्यात जमते.  देवीचे मनोहरी  रूप आपल्याला आपल्या डोळ्यात साठवायचे असते म्हणून आपण नतमस्तक होवून ते रूप टिपण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाच धक्‍का बुक्की सुरू होते.
प्रत्येकाला निवांत दर्शन घ्यायचे असते पण गर्दीत ते काही केल्या शक्य होत नाही.
दर्शन घेवूनही अनेकदा अपुरे पणाची भावना बोचत राहते. अनेकदा मंदिर परिसरात भक्तांची एवढी प्रचंड गर्दी असते की नाईलाजाने अनेक भक्त मंदिराचे ' कलश दर्शन ' यावर समाधान मानून माघारी जातात.

या अपुरे पणाच्या भावनेतूनच " साडेतीन शक्ती पीठांचे मुख  दर्शन " ही संकल्पना डोक्यात आली. एक भीती मनात वाटत होतीच. रांगोळीत देवीच्या दिव्य तेजाला साकारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भलतेच धाडस करतो की काय असं वाटतं होतं.
पण देवीचीच ही इच्छा असावी म्हणून  हे शक्य झाले.
मी केलं मी केलं असं म्हणून सृजनशीलतेच आपण कितीही श्रेय घेवू पहात असलो तरी ...... खरी सृजनशीलता ही त्या *शक्तीत* असते. तिने तुमची निवड केली तरच तुमच्या हातून काही निर्माण होवु शकते अन्यथा तुम्ही कितीही प्रयत्न करा सारे व्यर्थ.
  रांगोळीत चेहरा काढतांना माझी भंभेरी उडते आणि इथे नुसता चेहरा काढायचा नव्हता तर केवळ चेहऱ्यावरून देवी ओळखू यायला हवी होती. पण या रांगोळ्या मी काढाव्या ही कल्पना ही त्या शक्तीमुळेच सुचली होती  आणि प्रत्यक्षात  आली तेही त्या शक्ती मुळेच. मी केवळ साधन मात्र ......
आमच्या कडे कामाला येणाऱ्या मावशींनी जेव्हा सप्तशृंगी देवीची रांगोळी बघितली त्याही घटकाभर थांबल्या .... डोळेभरून देवीच रूप बघितलं आणि मला म्हणाल्या ," आम्ही दर्शनाला गेलो होतो वणीला ......... पण नुसती धक्का बुक्की .... नीट डोळे भरून बघताही आल नाही देवीला ...... नुसती ढकला ढकली ...... नंतर आठवून म्हंटल तरी देवीच रूप फार काही आठवत नव्हतं..... पण तुमची रांगोळी बघितली तेव्हा आठवलं ..... देवी अगदी हुबेहूब अशीच दिसते. तुमच्या मुळे देवीच निवांत दर्शन होतंय आज  " अस म्हणून त्यांनी हात जोडून डोळे मिटून घेतले . त्यांचं समाधान झालं तेव्हा बोलल्या ," मॅडम तुम्ही तुमची नजर काढून घ्या बर आज ..... कसली भारी कला आहे तुमच्या हातात. एक एक रूप काय सुंदर काढलयं रांगोळीत .... घरबसल्या साडे तीन  पीठांचे दर्शन घडवले तुम्ही ...... कमाल आहे तुमची....
..... काही झालं तरी नजर काढाच आज ... विसरु नका "
त्यांनी मन भरून घेतलेलं दर्शन, समाधानाने तृप्त होवून केलेलं कौतुक आणि त्यांची ही निरागस माया बघून रांगोळी काढल्याच सार्थक झाल्यासारखं वाटलं.  म्हणून या रांगोळीच्या माध्यमातून  साडे तीन शक्ती पिठांचे दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न   ज्या भक्तांना मंदिरात जाऊनही मनासारखं दर्शन घेता येत नाही त्या सगळ्या भक्तांनाच समर्पित करते.....
या रांगोळ्यांमुळेच मला तुमच्यासारख्या अनेक वाचकांच्याही शुभेच्छा मिळत असतात. त्या अशाच मला मिळत रहाव्यात आणि माझ्या हातून सतत काही चांगले घडत जावे हीच इच्छा...
या नवरात्र निमित्त प्रत्येक स्त्रीने तिच्यात असलेल्या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती घ्यावी आणि हिच ऊर्जा कुटुंब, समाज, विश्व कल्याणासाठी वापरावी हिच सदिच्छा....
सगळ्या भक्तांवर तिची कृपा कायम असू दे....
सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा....
देवीच्या एकूण ५१ शक्ती पीठांपैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहेत म्हणून त्यांचा मान मोठा आहे. असं ऐकिवात आहे.
कोल्हापूरच्या महालक्ष्मीचेतुळजापूरच्या तुळजाभवानीचे
 आणि माहूरच्या रेणूकादेवीचे मंदिर अशी ही तीन पूर्ण पीठे तर वणीच्या सप्तःशृंगीचे हे अर्ध पीठ आहे.
या रांगोळ्यांमधे मुद्दामहून सगळ्यांना हिरवी साडी नेसवलेली असून सगळ्यांची नथ ही एकाच प्रकारची आहे.
रेणुका माता आणि सप्तश्रृंगी देवीच्या मुखा मधे तांबूल ही आहे.
 आई अंबा बाईचा उदो उदो
©️ अंजली मीनानाथ धस्के

                    कोल्हापूरची श्री महालक्ष्मी देवी




तुळजापूरची तुळजाभवानी माता


माहूरची रेणुकामाता



वणीची सप्तशृंगी देवी


देवीची साडतीन शक्ती पीठे



रांगोळीच्या माध्यमातून देवीच्या साडेतीन शक्तिपीठांचे मुख दर्शन घडवण्याचा छोटासा व्हिडिओ