गणवेष

 #गणवेष

©️ अंजली मीनानाथ धस्के 

'गणवेष ' हा शब्द ऐकण्यात बोलण्यात आला की आपल्याला बालपणीची आठवण होते. शालेय जीवनात प्रवेश करतांना हाच आपला सोबती असतो. या गणवेषामुळेच आता आयुष्यात ' शिस्त ' या प्रकाराशी ओळख होते. बेफिकीर असलेल्या बाल मनाला शिस्तीचा पाठ देवून 'वेसण ' घालण्याचे काम चोखपणाणे केले जाते. पुढे पुढे गणेवेषाबद्दल आदर भाव निर्माण होवून अंगावर गणवेष असे पर्यंत आपणही शिस्तीचे काटेकोर पालन करायला लागतो. शाळा सुटते, गणवेष मागे पडतो तरी त्या योगे लागलेली शिस्त काही अंशी आपली सोबत करतच असते. आयुष्यात अनेक गणवेष आपल्या परिचयाचे होतात.  कपड्यांचा खाकी रंग असला तरी सायकल, पत्रांचे गठ्ठे आणि शबनम बॅग असेल तर 'पोस्टमन ' काका. शाळेय वर्गात सूचनांचे राजिस्टर घेवून येणारे चपराशी/शिपाई काका. मोटार सायकलवर ऐटीत जाणारे पोलीस काका. बस मधे "पुढे सरका", "तिकीट तिकीट" असे ओरडणारे कंडक्टर काका आणि बेल वाजली की बस गाडी पुढे नेणारे ड्रायव्हर काका. कपड्यांचा रंग एक असला तरी त्या त्या गणवेषाशी निगडीत जबाबदाऱ्याही समजू लागतात.

        गुलाबी/निळ्या रंगाची साडी घालून सफाई करणाऱ्या महीला बघून त्यांच्या आयुष्यातील गणवेश आणि शिस्त या दोघांची नव्याने जाणीव होते.  त्यांच्या आयुष्यात गणवेश हा ' शिस्ती ' पेक्षा ही जास्त असे खूप काही घेवून येतो. त्यांना गणवेष मिळाला म्हणजे पगाराची खात्री, दोन वेळच्या जेवणाची खात्री, घरातील मुलाचे रडत रखडत का होईना शिक्षण होण्याची खात्री.... आणि बरेचं काही. रोजगाराची हमी देणारे गणवेष समाजात आनंदाने स्वीकारले जातात.असो.....

   रूप कुठेलीही असो  डोळ्यांना सहज दिसणारा हा गणवेष प्रत्येकालाच परिचयाचा असतो.  शाळेत जाणारा असो वा नसो प्रत्येकाचा आपला असा एक गणवेष असतोच. आपल्याच या गणवेषाला मात्र आपण अनभिज्ञ असतो. प्रश्न पडला असेल की कोणता गणवेष?

तर..  ........

बल्यावस्थेतून पौगंडावस्था..... तारुण्यअवस्था, ..... वृद्धावस्था..... असा आपला प्रवास सुरू असतांना आपले 'व्यक्तिमत्त्व ' घडत जाते. हे जे काही व्यक्तिमत्त्व घडत जाते तेव्हा मनावर कळत नकळत होणाऱ्या संस्कारातून ' विचारांचा गणवेष ' मनावर चढत जातो. गंमत अशी की, मानवाला हा गणवेष दिसत नाही.... दिसत नाही म्हणुन टाकून देता येत नाही. अंगावर ' गणवेष ' असो वा नसो मनावर ' विचारांच्या गणवेषाची जशी विण' तसेच वर्तन मनुष्य करत जातो. सगळयात महत्त्वाचे म्हणजे अंगावरच्या गणवेषाने मिळणारे पद, अधिकार ,जबाबदाऱ्या यांचे पालन  काटेकोर व्हावे यासाठी मनावर  'विचारांचा गणवेष' ही त्याला साजेशा हवा अन्यथा आपली निराशा होवू शकते. 

अंगावर परिधान केलेल्या गणवेषाशी विसंगत वर्तन मनुष्य सहतेने करू शकतो  परंतू मनावर असलेल्या 'विचारांच्या गणवेषा ' विरूद्ध बंड पुकारणे खुद्द मनुष्याला अवघड होवून बसते. "माझ्या तत्वात हे बसत नाही" ,  असे उद्गार याच गणवेषाची देन आहे.

      दुराग्रही, कंजूस, लोभी, सालस, निर्मळ, निरागस अशी विशेषणे आपल्या व्यक्तिमत्त्वाला लागतात ती याच 'विचारांच्या गणवेषामुळे '.

       सुरवातीला याची विण कच्ची असते परंतू नंतर नंतर ही विण घट्ट होत जाते. मनुष्याने त्याच्या 'विचारांच्या गणवेशषात' कच्चे धागे वेळच्या वेळी काढून टाकणे,  योग्य धागे नव्याने विणणे, हे कायम सूरू ठेवावे . म्हणजे मग हा गणवेष कायम नव्या सारखा राहतो.चांगल्या विचारांची कास धरत जो मनुष्य डोळस पणे आपल्या वर्तनात काळ, स्थळ, घटना यांच्यानुसार योग्य बदल करत जातो त्याला ' परिपक्व व्यक्तिमत्व ' अशी ओळख मिळते. कारण त्याची ' विचाराच्या गणवेषात ' योग्य वेळी योग्य ते बदल स्वीकारण्याची तयारी असते. 

        केवळ अंगावरचा गणवेष एक सारखा आहे म्हणून कोणाशी मैत्री होत नाही. विचारांचा गणवेष जिथे एक सारखा असतो तिथे मात्र नाते कोणतेही असो आनंदाचे नंदनवन फुलते. 

  अनेक जण समोरच्यानुसार 'विचारांचा गणवेष' बदलत निभावून नेतात. एखाद्या मोठया संघाचा भाग होतात. तर अनेक जण स्वत:च्या 'विचाराच्या गणवेषा '  वर इतके ठाम असतात की ते एकटे पडतात. तर काही जण या एकटेपणाला घाबरून सतत विचारांचा गणवेष बदलत राहतात. शरीरावर आसलेल्या  गणवेषाला काल मर्यादा असते परंतू विचारांचा गणवेष स्मशानातील चीतेपर्यंत सोबत तर करतोच, त्यांची कीर्ती चिरकाल टिकणारी असते.

     आपल्या ' विचाराच्या गणवेषावर ' आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा प्रभाव असतो. वाईट अनुभवातून कच्चे धागे काढून टाकायला मदत होते तर चांगल्या अनुभवातून नवीन धाग्यांचा समावेश करतात येतो. यात अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काही धागे आपण जन्मजात घेवुन आलेले असतो तर बाकी सगळे धागे हे चांगल्या वाईट अनुभवातूनच तयार करत असतो. गणवेषाचे विणकाम मात्र आयुष्याच्या शेवटपर्यंत करत रहायला हवे. अन्यथा ज्याने विणकाम थांबवले तो शरीराने नाही परंतु मनाने काळाच्या पडद्याआड जातो. अंगावरच्या गणवेषाला स्वच्छ धुवून, कडक इस्त्री करून जसे जपतो तसेच या अदृश्य गणवेषाला सकस विचारांच्या धाग्याने वेळोवेळी रफू ही करायला हवा.

तेव्हा तुम्हीही थांबला असाल तर नव्या जोमाने गणवेषाचे विणकाम/ शिवणकाम /रफु करायला घ्या. करण........

शाळेत शिकवत असताना एका  ग्रामीण गीत ऐकण्यात आले होते. 

"आम्ही 'बी ' घडलो... तुम्ही ' बी '  घडाना "

गातांना  गाण्याची पद्धत बदलून अर्थाचा अनर्थ करून मजा घेणाऱ्या काही निरागस मुलांनी घडता घडता बिघडते, तर बिघडत आहे असे वाटतांनाच खूप काही घडूनही जाते याचा अनुभव दिला.

©️ अंजली मीनानाथ धस्के 

सोबत रांगोळी आहेच.... ..... आजची रांगोळी  ' खापर्डे बगीचा प्राथमिक शाळा' अमरावती. या माझ्या शाळेला समर्पित आहे.



गुढी पाडवा २०२४

 #गुढी पाडवा २०२४

आपल्या मनात एक तरी अशी खिडकी असावी जिथे प्रत्येक भावना व्यक्त करता यावी. सुख- दुःख, राग - लोभ, इर्षा , मत्सर, प्रेरणा, दया, सगळया पासून विरक्तही होता यावे. अन्  या विरक्तीचाही उत्सव वाटावा.  मोकळे पणाने जगण्यासाठी अशी एक खिडकी हवीच. 

आजच्या रांगोळीतही  खिडकीत गुढी उभारलेली आहे. या खिडकीत फुलझाडांच्या कुंड्याही आहेत. बाहेरचा रंग जरा उडाल्या सारखा वाटत असला तरी आतल्या बाजूने मात्र प्रसन्न वातावरण असल्याची खात्री देणारा रंग आहे. खिडकी म्हंटली की पडदा ही आलाच पण आज त्याला बाजूला सारले आहे. 

आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख, समृद्धी व आनंदाचे जावो हिच सदिच्छा.

रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

https://youtu.be/tzaOA9aIoAs?si=c_khJF-0OJdUAueX

चैत्रांगण... ही एक रांगोळी नसून आपली संस्कृती आहे.

 कसे काढावे? बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

https://youtu.be/Fug5nWsVy9g?si=AESFct1eXLH4-12e