पराभव


   #पराभव
  ©️ अंजली मीनानाथ धस्के

              ती या रेड लाइट एरियात गेली अनेक वर्ष रहात होती. रिटा हे नाव तिला कोणी दिलं हेही तिला नक्की आठवत नाही. तिचं कोणी जगाच्या पाठीवर कुठे असेल याबद्दलही तिला खात्री नाही. तिला समजायला लागायच्या आधीच ती इथे आली होती. बाहेरचं जग कसं आहे याची तिला काहीच कल्पना नव्हती. तिच्या लक्ष्मी अक्काला ती कचऱ्याच्या टोपलीत सापडली होती. लक्ष्मी अक्का स्वतः देह विक्री करून गुजरान करत होती. कितीही धंदा करा तिच्या हातावर गरजेपुरते पैसे ठेवले जायचे. तरी तिच्यातल्या ममतेला पाझर फुटला होता. तिने आपल्या घासातला घास देवून रिटाला वाढवल होतं.  
लक्ष्मी अक्का जिथे रहात होती तिथे रिटा  सुरक्षित नव्हतीच पण बाहेरच्या जगात ही ती सुरक्षित राहील याची काहीच खात्री लक्ष्मी अक्काला नव्हती.
    खरं तर रिटाला चांगल आयुष्य जगता यावं यासाठी तिने सुरवातीला खूप प्रयत्न केले.
रिटानेही सुरवातीला यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता पण बाहेरचे लांडगे तिचे लचके तोडायला तयारच होते.
          लहानपणापासूनच रिटा नको ते सगळं बघत आली होती म्हणूनच की काय तिलाही या सगळ्याच काहीच वाटतं नव्हतं.
बाहेरच्या जगापेक्षा  रेड लाइट भागातल जग तिला जास्त सुरक्षित वाटू लागलं होत. बाहेरच्या जगाने तिला नाकारलं होत म्हणूनच तर ती इथे होती.
लक्ष्मी अक्काने तिला स्वीकारलं तस इथल्या लोकांनीही तिला आपलं मानलं होत. तिच्यासाठी जीव तोडणारी चार आपली म्हणावी अशी माणसं इथे होती . म्हणूनच तिनेही हळू हळू बाहेर पडण्याचा विचार सोडून दिला.
तसही सगळं सहन करता येत पण पोटातली आग सहन करणं कठीण या पोटाच्या आगीपुढे दोघींचही काहीच चाललं नाही.
       सुरवातीला हे अंगवळणी पडायला जड गेलं पण हळूहळू ती या धंद्यातल कसब शिकू लागली.
      काही गोष्टी तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की गिऱ्हाईक खुश झाला की हवा तो दाम द्यायला तयार असतो.
दुसरं म्हणजे एकदा का वय निघून गेलं तर इथे कुत्र तुमचं हाल खात नाही. कधीही आणि
कसेही गिऱ्हाईक आले तरी तयारच रहावं लागतं.
ती लक्ष्मी अक्कासारखी  मिळतील ते पैसे घेवून गप्प बसणारी नव्हती. तिच्या मर्जीने आणि हवा तेवढा दाम मिळाल्यावरच ती तयार व्हायची.
     स्वत:च्या दिसण्यावर, टापटीप रहाण्यावर ती विशेष लक्ष द्यायची . इथला सगळा खेळ दिसण्यावर आहे हे ही ती जाणून होती.
  एकीकडे   तिच्यामुळेच लक्ष्मी अक्कालाही आता चार सुखाचे घास मिळत होते. पैसा मिळत होता तरी येणारा प्रत्येकच जण फक्त तिच्या शरीराचे लचकेच तोडत होता. म्हणून  दुसरीकडे लक्ष्मी आक्काला  आपल्याच मुळे पोरीचे असे हाल होतात अशी  बोचनीही सतावायची.
        कितीही त्रास झाला तरी रिटा सगळ्या वेदना लपवत गिऱ्हाईक आलं की हसत तयार व्हायची. तीला असं बघून लक्ष्मी अक्काच काळीज तीळ तीळ तुटायच पण रिटा मोठी धीराची . ती अक्काला समजवायची,
"अग इथे दोन घास तरी मिळतात , आपल्या म्हणाव्या अशा जीवा भावाच्या मैत्रिणी आहेत. जोपर्यंत जवानी आहे तोपर्यंत कमावून घेते . एकदाका गिऱ्हाईक कमी झालं की मग जमवलेले पैसे घेवून बाहेर पडू" .
       धंद्यात जम बसवून दोन वर्ष लोटली नव्हती तर कोरोना नावाच्या विषाणूचे जगात आगमन झाले. बघता बघता या विषाणूचा प्रवेश रिटा रहात होती त्या रेड लाइट एरियात ही झाला.
गिऱ्हाईक कमी होता होता बंदच झालं. आहे त्या पैशावर तग धरून दिवस काढावे तर तिच्या मैत्रिणींची होणारी उपासमार तिला सहन होईना. सगळ्यांसाठी पुढचे अनेक महिने पुरेल इतका पैसाही तिच्याजवळ नव्हता. तरी ती जमेल ती मदत करत होती.
त्यातच लक्ष्मी अक्काला कोरोनाची लागण झाली. दोघींची ताटातूट झाली. रिटाची चाचणीही    पोझीटीव्ह आली.  रिटाने  कोरोनाला हरवत एक लढाई जिंकली .
तिला तिच्या घरी सोडण्यात आले. घरी येवुन बघते तर सगळाच संसार चोरीला गेलेला. चोरट्यांनी सगळी जमापुंजीही चोरून नेली होती.
         सगळ्यांनी दुरून धीर दिला . जीव महत्वाचा सांगत आठ दिवस एकवेळच जेवणही दिलं. शून्यातून पुन्हा सुरवात करावी तर लॉकडाऊन वाढवल्याची बातमी आली. कोरोनाची दहशत वाढली . मदत करणारेही तिच्या जवळ जायला तयार नव्हते.
गिऱ्हाईक नाही तर पैसे नाही आणि पैसे नाही तर अन्न नाही अशी सगळ्यांचीच अवस्था झाली होती. त्यात तिला मिळणाऱ्या एक वेळच्या जेवणाची ही मारामार झाली . त्यातच लक्ष्मी अक्का या आजारातच देवाघरी गेल्याची बातमी आली. दुरून का होईना तीच अंतिम दर्शन घेता यावे असा रिटाने हट्ट धरला . तिच्या सोबतीला कोणीच यायला तयार झालं नाही. आक्काला शेवटचा निरोप देवून आल्यावर तर
  ज्यांना आपलं म्हणून तिने मदत केली त्यांनीही पाठ फिरवली. अक्का गेल्याच दुःख करायलाही तिला निवांत वेळ मिळाला नाही.
सरकारी मदत मिळत होती पण हिला घराबाहेर पडता येत नव्हतं आणि तिला कोणी घरी काही आणून द्यायला धाजावत नव्हतं.
           एरवी तर  कोणीही सहज तिच्या शरीराशी खेळ खेळला असता. स्वत:ची शारीरिक भूक भागवली असती . त्या निमित्ताने रीटाचीही पोटाची खळगी भरली असती पण आता फुकटात ही कोणी तिला हात लावायला तयार नव्हतं .
बाहेरच्या जगाने तिला नाकारलं तेव्हा रेड लाइट जगातल्या आक्काने तिला स्वीकारलं होतं पण आता तर या रेड लाइटच्या जगानेही तिला नाकारलं होत. ती पुरती खचली. आक्काच्या कुशीत शिरून रडावं तर तीही सोडून गेली. हे दुःख तिला सहन होईना तिची जगण्याची इच्छाच संपली.
     इतरांची शारीरिक भूक भागवणाऱ्या तिचे प्राण तिचीच पोटातली भुक घेवू पहात होती. एक विषाणू काय आला सगळ्यांनी तिची  साथ सोडली .
कोणी साथ दिली नाही तरी
तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या पोटातली भुकच तिची साथ देणार होती. ही आयुष्याची  शेवटची आणि महत्त्वाची शिकवण कोरोना नावाचा विषाणू तिला  देत होता.
कोरोना विरूद्धची लढाई तर ती जिंकली होती पण आज पराभूत झालेला तोच विषाणू तिच्यावर हसत होता कारण *भुके विरुद्धच्या लढाईत तिचा पराभव होत होता.*
  ©️ अंजली मीनानाथ धस्के
या
(टिपः लिखाण आवडल्यास नावासहिताच शेयर करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.)

मुक्त सृजनशीलता महत्त्वाची

#१००शब्दांचीकथा
 momspresso Marathi वर विजयी कथेत स्थान प्राप्त झालेली कथा.
विषय : जादूची कांडी फिरवणारी परी भेटली तर...
#मुक्त_सृजनशीलता_महत्त्वाची

  जादूची कांडी फिरवणारी परी भेटली तर.... वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली.
रावी: तर... मी या जगातून स्पर्धाच नष्ट करून टाकेल. स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढतो,कमतरता कळतात,प्रेरणाही मिळते. खूप शिकायला मिळतं. हे सगळं खरं असलं तरी खूप मेहनत घेवुनही स्पर्धेत जेव्हा अपयश वाट्याला येतं तेव्हा मोठ्यांनाही ते  सहज स्वीकारता येत नाही. तिथे लहानांकडून काय अपेक्षा करणार?
*स्पर्धा आपल्या मुक्त सृजनशीलतेवर वेळेचे,विषयाचे बंधन लादते* स्पर्धा कळतनकळत तुलना करायला शिकवते. ही तुलनाच जीवघेणी ठरते. हरणाऱ्याचे सांत्वन केले जाते. लक्षात मात्र विजयी होणाराच राहतो. हरण्या-जिंकण्या पलीकडचं आयुष्य प्रत्यक्षात जगायचं असेल तर स्पर्धा नष्ट करायलाच हवी. 
 रावीचे उत्तर ऐकून आयोजकांनी टाळ्यांच्या गजरात *स्पर्धा*असा उल्लेख काढून*व्यक्त व्हा*असे आवाहन केले.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः कथा आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावी.






आजीच झाली परी

#१००शब्दांचीकथा
विषय : जादूची कांडी फिरवणारी परी भेटली तर...
#आजीच_झाली_परी

    चिमुकल्या नातीने परी कथा सांगणाऱ्या आजीलाच प्रश्न केला...
आजी तुला जादूची कांडी फिरवणारी परी मिळाली तर.... तू काय करशील ग?

 पैश्यामागे धावणाऱ्यांना नात्याच महत्त्व कळू दे. नात्यांमध्ये मोकळा संवाद वाढू दे. घरातल्या लक्ष्मीहाती अन्नपूर्णा वसू दे
घराचं गोकुळ होवू दे. हेच मागितलं असतं ग पण तो कोरोना राक्षस आलंय ना त्यानेच माझ्या या इच्छा पूर्ण केल्या.
 आता जर परी भेटली तर मात्र"कोरोना राक्षसाने लवकर जावं आणि माझ्या या छोट्या परीला अंगणात खेळता यावं हेच मागेन"
तूला परी भेटली तर तू काय करशील ?

 मी... तिचा पापा घेईल... असा 😘
 ती तुझ्यासारखीच न मागता माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल ना म्हणून....
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः कथा आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावी


पोपट

#पोपट


      सात आठ वर्षांपूर्वीची घटना . बाळ राजे नर्सरी मधे असतील.
आमच्या बाळराजेंची पहिली तोंडी परीक्षा होती. तेव्हा नवीनच पद्धत आली होती. मुलांच्या आवडी निवडी, राग रंग बघून त्यांना प्रश्न विचारला जात होते. एकदा उत्तर बरोबर नाही आलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचा कल बघत प्रश्न विचारला जात होता.
उद्देश हाच की , मुलांना सगळं येत असतं पण त्या वेळी जर त्यांची इच्छा नसेल किंवा त्यांना आठवत नसेल तर  त्याचा ताण त्यांच्या मनावर येवू नये. अगदी हसत खेळत प्रश्न उत्तर विचारली जावी.
असो...
         विचारून विचारून असं काय विचारणार लहान मुलांना? जे त्यांना शाळेत दहादा शिकवतात तेच पुन्हा लाडीगोडी लावून विचारणार होते. म्हणजेच पालक यानात्याने आम्हाला मुलांकडून काहीच करून घ्यायचं नव्हतं.
       मी बाळराजेंना शाळेतून आणायला गेले तेव्हा त्याच्या शिक्षिकेने मला बोलावून घेतलं.
     तिने मला सांगितलं की ," आपका बेटा बहोत अच्छा है पढायी मे, बस एकही सवाल का जवाब बार बार पूछने पर भी वो गलत ही दे रहा है "
मी काळजीने लगेच विचारलं ," सवाल क्या है?"
त्यांनी  तत्परतेने सांगितलं ," who eats row chilly?"
मी विचारलं ," तो उत्तर काय देतो आहे ?"
त्यांनी सांगितलं ," पहिली बार जवाब दिया .... मेरे पापा ( my father) दुसरी बार जवाब दिया तोता और मेरे पापा ( parrot and my father)"
माझं तोंड बघण्यासारखं झालं होतं.
त्यावर त्याच बोलल्या ," उसे सही जवाब पता है पर कितनी बार भी पूछा तो ' मेरे पापा ' ये जवाब मे रहताही हैं"
मी सारवासारव करत स्पष्टीकरण दिले की ,"  .... आम्ही महाराष्ट्रीयन असल्याने आमच्या बऱ्याच पदर्थासोबत त्याचे पप्पा ताजी मिरची  खातात ".
त्यावर त्या दिखुलास हसल्या आणि आमच्या बालराजेंना जवळ बोलावलं , " देखो बेटा तुम्हारा जवाब सही हैं पर तुम्हारे पापा को हमने तो देखा नही हैं ना रॉ चीली खाते हुवे ... तो जवाब मे सिर्फ parrot (पोपट) ही बोलना हैं । आया ध्यान में "
आमच्या बालराजेंनी लगेच बोबड्या शब्दात उत्तर दिलं ," मैने भी तो  parrot (पोपट) को रॉ चिली खाते हूवे नही देखा हैं फिर जवाब मे parrot(पोपट) क्यो बोलू "
आता मात्र शिक्षिकेच तोंड बघण्यासारखं झालं होतं. कुठून बुध्दी झाली आणि याच्या पप्पा ने याच्यासमोर मिरची खाल्ली असा विचार मनात येवुन   मला तर मेल्याहून मेल्यासारख झालं होतं .
आमचा संवाद दुरून ऐकणाऱ्या मुख्याध्यापिका आमच्याजवळ आल्या आणि आमच्या बाळराजेंना उचलून घेत म्हणाल्या , "  मीही मिरची खाणारा पोपट फक्त आपल्या पुस्तकातच  बघितला आहे. प्रत्यक्षात पोपटाला इतक्या जवळून बघण्याचा योग  अजून तरी  आला नाही. तुला हवं ते उत्तर दे बाळा. दोन्ही उत्तर बरोबर आहेत." त्याचा पापा घेत त्यांनी मला सांगितले , " हमारे बचपन मे किताबो की बाते  हम कितने आसानीसे मान लेते थे। आज कल के बच्चे होशियार हैं। घरपर जाके उसे बिलकुल दाटना नही । बहुत समझदार बच्चा है।"
          खरं तर  प्रकरण फार वाढलं नाही  म्हणून इकडे माझा  जीव भांड्यात पडला होता.
          घरी आल्यावर जेव्हा घरच्यांना आमच्या बाळराजेंचा हा पराक्रम कळला तेव्हा मात्र सगळ्याची हसून हसून पुरेवाट लागली.
या प्रसंगानंतर बाळराजेंची निरीक्षण क्षमता बघता सगळेच त्याच्यासमोर अदबीने वागू लागले.  पहिल्याच परीक्षेत  बाळराजेंनी पोपटावरच्या प्रश्नाने अनेकांचा पोपट केला होता त्यामुळे बाळराजे काय बघतील आणि शाळेत जावून सांगतील याची अप्रत्यक्ष धास्तीच सगळ्यांनी घेतली होती.
©️ अंजली मीनानाथ धस्के
लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे


तो_ती_आणि_मोकळा_संवाद

#तो_ती_आणि_मोकळा_संवाद

     ख्याली खुशाली विचारायला मित्राने तिला फोन केला .
  तो:   कशी आहेस?
ती: मजेत.
तो: तुझं बरं आहे कधी विचारा ... तुझं उत्तर ठरलेलं असतं... मजेत.
ती: ह.... तू बोल काय विशेष ?
तो: आज विशेष हेच.. की शेजारची सोसायटी सील केली.
   त्यामुळे आता आम्हालाही रोज मिळणारी भाजी, दूध सगळंच बंद होणार.
कधी बदलणार ही स्थिती ? आधी सोसायटीत फिरता येत होत. सायकल चालवता येत होती . घरी असलो तरी तेवढंच जरा बरं वाटतं होतं पण आता घरातच कोंडून घ्यावं लागणार .
लोकं काही ऐकत नाही . दिवसेनदिवस रुग्ण संख्या वाढतेच आहे. किती दिवस घरी रहायचं. कंपन्या अडचणीत येणार , पगार मिळतो की नाही अशीही चिंता लागली आहे .  विचार करून रात्रीची झोप येत नाही...
हेच काय ते विशेष .....
नुसता कंटाळा आला आहे ... तुला नाही आला कंटाळा .
ती: कसा येईल ?
तो : म्हणजे ...
ती : म्हणजे .... वाघाचे पंजे
तो : बस का ....  असं कसं होईल की तुला कंटाळा आला नाही. घरातली सगळी कामं नवरा करतो का?
ऐैती: अरे बाबा सगळी काम खरंच जर नवऱ्याने केली तर मग मात्र नक्कीच मला कंटाळा यायला वेळ लागणार नाही.
परिस्थितीने सगळ्यांना घरात बंद केले आहे . सगळेच त्याबद्दल तक्रार करतात . पण एरवी या घरासाठीच तर आपण मर मर करत असतो. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी कधी एकदा घरी जातो असं आपल्याला होत . आठवडा भर सतत बाहेर खावं लागलं की घरच्या साध्या जेवणाची आठवण यायला लागते.
मग आपल्या याच घरात राहण्याचा कंटाळा का यावा ?
तो: का म्हणजे ? काम नको का करायला .
ती : तुझं माहीत नाही ... मला भरपूर कामं आहेत. उलट रोजच्या कामामध्ये  वाढ झाली आहे. तरी..... आता
घरातल्यांना कधी नव्हे ते घर कामाचं महत्त्व लक्षात आलं आहे त्यामुळे सगळेच आपापल्या परीने मदत करत आहेत.
घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्याचाच वापर करून घरच्यांना कंटाळा येणार नाही असे नवं नवीन पदार्थ बनवण्यात माझे कसब पणाला लागते आहे खरे पण  मी केलेल्या नव नवीन खाद्य पदार्थांना घरच्यांकडून दादही पूर्वीपेक्षा भरपूर मिळते आहे.
       पूर्वी ' अग तुझे केस किती पांढरे झालेत.  कलर का करत नाही ' असं म्हणून माझ्या काकूबाई पणावर हसणाऱ्या मैत्रिणी आता स्वत:च्या नवीन सेल्फी टाकून मला खिजवण्याचा प्रयत्न करत नाही.
      " तू नोकरी करत नाही म्हणून तुला घर टापटीप ठेवायला जमतं , स्वतःचे छंद जोपासायला मिळतात " अस म्हणणाऱ्यांना घर टापटीप ठेवायला आणि छंद जोपासायला किती पापड बेलावे लागतात याची पूर्ण कल्पना आली आहे.
" किती प्लॅनिंग असत ग तुझं .... आयुष्य बिना प्लॅनिंग जगायचं असतं.
 किती पसारा जमवते ग... किती किराणा सामान घेतेस ... गाव जेवण घालायचं आहे का?  असं म्हणून चिडवणाऱ्या नवऱ्याला आता काहीही आणायला घरा बाहेर पडावं लागतं नाही म्हणून त्यालाही माझ्या त्या त्रासदायक वाटणाऱ्या सवयींच महत्व पटलं आहे.
घरी येणारे पाहुणे कमी झाले याच दुःख आहेच पण एरवी वेळ नाही म्हणत टाळणारे जवळचे आप्तगण आता आवर्जून चौकशी करतात त्याचच   समाधान सध्या मोठं आहे.
 घरातच राहून आनंदी कसं रहाता येईल याचा विचार डोक्यात सुरू असल्याने टीव्हीवरच्या बातम्या ऐकुन लोकांच्या मूर्खपणावर तावातावाने चर्चा करण्यासाठी वेळच मिळत नाही.
*जेव्हा आपली परिस्थिती बदलत नाही तेव्हा त्या परिस्थितीला आपली मानसिकता बदलायची असते* असं कुठेतरी वाचलं होतं.
म्हणूनच संघर्ष न करता मी येईल त्या परिस्थितीशी  जुळवून घेत स्वतः मधे बदल करायला शिकले.
त्याचाच फायदा आता होतो आहे.

तो: अग पण बाहेरची परिस्थिती बदलण कोणा एकाच्या हातात नाहीच तर ... तू मजेत असली तरी परिस्थिती थोडी बदलणार आहे.
 ती : वर्तुळ कशाने बनते ?
तो: काय???
ती : सांग ना ... वर्तुळ कशाने बनते?
तो : परिघावरच्या असंख्य बिंदूने वर्तुळ बनते.
ती : परिघा आधी केंद्र बिंदू येतो ... तो असतो आधी .... तोच त्याच्या भोवतीच्या समान अंतरावर  असलेल्या सगळ्या बिंदूना जोडत जातो त्यातून वर्तुळ तयार होते.
तो : मग .. त्याने काय फरक पडतो आपल्या परिस्थितीत?
ती : तसही ...माझ्या एकटीच्या काही होणार नाही हे जरी मान्य केले तरीही भोवतालची परिस्थिती बदलत नाहीच ना मग निदान आपली मानसिकता बदलून आपल्या पुरते तरी सकारात्मक वातावरण निर्माण करायला काय हरकत आहे.
   आपल्या भोवती असलेली परिस्थिती बदलायची असेल तर केंद्रबिंदू स्वतःला मनायचं .... परिस्थितीत हवे असलेले बदल स्वतःमधे करायचे मग आपोआप आपल्या भोवती  तयार होणारे वर्तुळ आपल्याला हवे तसे बनते. वेळ लागतो पण आपल्या मनासारखे घडून येईल ही आशा कायम रहाते.
म्हणून आपल्यावर आणि आपल्या मानसिकतेवर बरच अवलंबून असतं असं मनायच आणि आशावादी रहायचं
उम्मिद पे दुनिया कायम है .... कुछ समझे
तो: तुझं बरं आहे ग तू स्त्री आहेस . तुला घरी रहायची सवय आहे म्हणून तू हे सगळं बोलू शकते.
पण माझ्या सारख्या धडधाकट पुरुषाला अजून काही दिवस सरकारने घरी बसवलं तर वेड लागेल .
ती:  .... अभिनंदन
तो : कशाबद्दल ?
ती : तू लवकरच वेडा होणार आहे म्हणून
तो : बस का .... अरे वेड लागू नये म्हणून तर मी work from home पण सतत करत नाही . मधे मधे ब्रेक घेतो . घरच्यांना वेळ देतो . बायकोला मदत करतो . घरातल्या घरात व्यायामही करतो.
आहारापासून घरच्या कामापर्यंत
एक टाईम टेबल बनवलाय ... आम्ही सगळे त्याचे काटेकोर पालन करतो आहे. मुलं अजून लहान आहेत . आईवडिलांची ही जबाबदारी आहे माझ्यावर
 ... वेड लागून कसं चालेल ग ...
ती : तू work from home करतोय म्हणजे तुला काम आहे. टाइम टेबल बनवलाय म्हणजे संघर्षाची मानसिक तयारी सुरूच आहे. एरवी वेळ नाही म्हणत असतो... आता कुटुंबा सोबत वेळ घालवतोय म्हणजे सुखी आहेस
मग उगाच तक्रारीचा पाढा का वाचतो आहेस.
आपण निदान आपल्या घरात तरी आहोत . अनेक जण आपल्या घरापासून दूर कुठेतरी अडकून पडले आहेत.
आपण निदान आपल्या आवडीचे पदार्थ बनवून खावू तरी शकतो आहे पण अनेक जण दोन वेळच्या जेवणासाठी सरकारी यंत्रणेवर किंवा मदत करणाऱ्यांवर अवलंबून आहेत.
आपण निदान आपल्या मनोरंजनाचे काही उपाय तरी करू शकतो पण डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार , अनेक अत्यावश्यक सेवा देणारे यांना रात्रदिवस काम करावं लागतं आहे. आपण आपल्या बँक बॅलेन्सच्या आधारे निदान काही महिने तरी आपलं घर चालवू शकतो पण रोजंदारीवर काम करणाऱ्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे.
आपण फार काही करू शकत नाही या सगळ्यांसाठी पण घरात राहून आनंदी राहू शकतो. सरकारी यंत्रणा आपलं काम चोख करते आहे . घरात राहून आपण आपल्या यंत्रणेवर येणारा ताण कमी करू शकतो.
आनंदी राहून सकारात्मक विचार करू शकतो. जेणे करुन बाहेर पडायला मिळत नाही याबद्दल ची नकारात्मक चर्चा निदान आपल्या पुरती तरी बंद होईल.

तो: खरंय तुझं.... जे संकट समोर उभ राहील आहे त्याचा सामना सकारात्मकतेनेच करायला हवा . काही लोक बेजबाबदार वर्तन करतात म्हणून जबाबदार लोकांनी त्यांच्यावर चर्चा करून नकारात्मक मत बनवू नये. जे आहे त्यात उत्तम उपाय योजायला  घराबाहेर पडून इतरांना त्रास होईल असे वर्तन करण्यापेक्षा तुझ्यासारख्या मित्र मैत्रिणींना
बोलून मन मोकळं करायला हवं.
ती : खरंय .... मन मोकळा संवाद सकारात्मक ऊर्जा देतो.
तो: म्हणून तर तुला फोन करून तुझं डोकं खायला मला आवडत .
ती: खा किती खायचं ते माझं डोकं.... पण हे कधीच विसरू नको की आधी कोवीड१९ विरूद्धचां लढा आपल्या सगळ्यांच्या सकारात्मकतेने आपल्याला जिंकायचा आहे. नंतर देशावर आलेल्या आर्थिक संकटालाही पळवून लावायच आहे त्यासाठी आधीपासूनच तयारी करायला हवी . या सगळ्याची सुरवात आपल्या सकारात्मक विचारांनी करायची आहे. आपण आपल्या घरातील वातावरण आनंदी ठेवायचं ... . काळ थांबत नसतो .... हे दिवस ही जातील रे.
लांब शर्यतीचा घोडा शर्यत जिंकण्यासाठी आधी दोन पावलं मागे येतो आणि मग सुसाट वेगाने पळतो . अगदी तसंच या कोरोना निमित्त  आपण दोन पावलं मागे आलो असलो तरी हे मागे येणं कायमच नाही .  हे लक्षात घ्यायला हवं.
आपल्याला आपली शर्यत जिंकायचीच आहे .

तो: सगळ्यांना   सगळंच माहिती असतं ग पण वळत नाही ना. तुझ्या कडून ऐकलं की डोक्यात घुसत...
 तू छान समजावतेस....
ती : अस्स ..... मी छान समजावते काय ..... मग वचन दे. lockdown period वाढला तरी आता तू तक्रार करणार नाहीस.
स्टे होम स्टे सेफ.... याच बरोबर
स्टे पोझीटीव्ह... स्टे हॅपी याचाही अवलंब करशील.
तो : मी वचन देतो की पुन्हा तक्रार करणार नाही . सकारात्मक विचार करून घरातलं आणि माझ्या मनातलं वातावरण आनंदी ठेवेल.
ती:  .... आज साठी एवढंच पुरे... बोला
  गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
तो : गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला (😄😄😄😄)
       जा जावून कामही कर थोड घरातलं. एकट्या नवऱ्याला किती लावशील कामाला

ती:  हम्म्म ... तुझी कामं झाली वाटतं करून
तो: नाही ना .... भांडी वाट बघत आहेत.
दोघंही दिलखुलास हसले.
©️ अंजली मीनानाथ धस्के
एका मित्राने आपल्या मैत्रिणीला सकारात्मक विचार करण्याचे वचन दिले म्हणून पिंकी प्रॉमिस दाखवणारी ही रांगोळी .
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करतांना नावासहितच करावे.



मानसिक संसर्ग


  #मानसिक_संसर्ग
©️ अंजली मीनानाथ धस्के
एकांतवासाला कंटाळलेले जीव विरंगुळा म्हणून आप्तस्वकीयांना फोनवर बोलतात . ज्या विषयाला टाळायचे म्हणून फोन करतात नेमकी त्याच विषयावर सविस्तर चर्चा रंगते.
एकाने अमुक गोष्टीचा कंटाळा आला म्हणावं आणि दुसऱ्याने त्याचीच री ओढवी असच संभाषण सुरू रहात .      कोरोना संसर्गजन्य रोग आहे. त्याच्या निमित्ताने इतर अनेक छोटे छोटे मानसिक संसर्गजन्य रोग या कालावधीत प्रकर्षाने जाणवायला लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे फोन वरचा संवाद .....  फोन वर बोलणारे   दोघेही स्वतःच चित्त प्रसन्न ठेवण्याचा खटाटोप करत असतांना एकाने दुसऱ्याला फोन करावा. दुसऱ्यानेही नकळत चिंताजनक विषयाला हात घालावा आणि मग दोघानींही ज्या गोष्टीवर आपला जोर चालत नाही त्या विषयावर तासभर चर्चा करून अखेर तो विषय अनुत्तरित ठेवावा.... जणू पुढच्या वेळी पुन्हा नव्याने जुनाच विषय चघळायला घ्यायचा आहे असा करारच त्यांच्यात झालेला असावा.
सगळी गंमतच आहे..... आमचं आजच उदाहरण घ्या ना... नेहमीप्रमाणे मैत्रिणीशी फोन वर बोलणे सुरू झाले. तिने तक्रारीचा सूर लावला . भाज्या मिळत नाही. घरातले सारखे भूक भूक करतात काय करावं . घरातली कामं तर संपतच नाही. मुल टीव्ही वर सतत कार्टून बघत बसतात. कधी हे सगळं थांबणार आहे . कधी बाहेर फिरायला मिळणार आहे. इति ...        खरं तर भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात तेव्हाही..." काय बाई त्याच त्याच भाज्या करायच्या" .. म्हणणाऱ्या आम्ही आमच्याही नकळत "भाजी भेटणं कठीण झालंय " ही गंभीर समस्या मानून हिरीरीने त्याबद्दलच्या तक्रारी मांडायला सुरुवात केली. ऋतु कोणताही असो घरात असले म्हणजे सगळेच कायम भूक भूक करतात . त्यात नवीन ते काय पण ही समस्याही अती गंभीर वाटून घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करतांना होणारी तारांबळ एकमेकींना दुःखी स्वरात पण... रंगवून सांगितली. घरातली कामं वाढली हे जरी खरं असलं तरी ती करतांना जगातील इतर समस्यांचा भुंगा डोक्यात शिरत नाही. हाताला काम असल्याने रिकाम्या वेळेचं काय करावं असे प्रश्न पडत नाही. हे फायदे अनावधानाने कबूल केले असले तरी त्यामुळे शरीरावर पडणारा ताण विसरून कसं चालेल ? म्हणून मग त्यावरही तीने मला आणि मी तिला सांत्वनपर बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या.
नवऱ्याला एक वेळ बायकोच्या हातातून टीव्ही चे रिमोट स्वतः कडे घेता येईल पण स्वतःच्या लहान मुलाकडून रिमोट मिळवण्यात त्याला कधीच यश येत नाही. किंबहुना घरातल्या कोणालाच यात यश येत नाही. आम्हा दोघींना तर जेव्हा कधी टीव्ही सुरू होतो तेव्हा कार्टून शो बघण्याची सवय झालेली आहे. आम्ही अनेक कार्टून शो आमच्या मुलांपेक्षाही आवडीने बघतो. अँनिमेटेड मूव्ही तर मला विशेष आवडतात म्हणून नवीन मूव्ही आला आणि तिने तो बघितला की ती मला आवर्जून सांगते. पण आज तिच्या कोण्या मैत्रिणीने तिला मुलांच्या टीव्ही बघण्याच्या तक्रारी ऐकवल्या आणि तिने त्या मला अगदी तिच्याच तक्रारी असल्या सारख्या  ऐकवल्या. मीही भूतकाळ, वर्तमान काळ यातील अनेक दिवसांचा शोध घेवून फुटकळ का होईना चार दोन तक्रारी शोधून काढल्याच आणि तिला ऐकावल्याच.
        हे सगळं कधी थांबणार याच उत्तर तर माझ्याकडे नव्हतं पण मैत्रिणीने येवढ्या आशेने विचारलं तर सांगायला हवंच म्हणून मग आहे नाही ते गणिती ज्ञान वापरून पाहिलं पण त्याने तीच समाधान होणार नाही याची खात्री असल्याने मग   तिला," कडक नियम पाळले तर लवकरच हे सगळं आटोक्यात येईल " असं साचेबद्ध उत्तर दिलं. तीनेही हे उत्तर पहिल्यांदाच ऐकतो आहे असे भाव शब्दात मांडून मी दिलेल्या उत्तराबद्दल समाधान व्यक्त केलं.       एरवीही कामाशिवाय घराबाहेर न पडणारी मी... मला घरात राहायचा कंटाळा येत नाही ..... पण मनसोक्त भटकायला आवडणाऱ्या तिची घरात होणारी घुसमट ऐकुन माझंही मन हेलावून गेलं. खिडकीतून येणारी मोकळी हवाही माझा भावना आवेग थांबवू शकली नाही. उगाचच जड झालेल्या स्वरात ," जातील ग .... हे दिवस ही जातील... लवकरच आपल्या नेहमीच्या ठिकाणी आपण भेटू आणि मज्जा करू. " असा दिलासा मी तिला दिला.
सरते अखेरी आमच्या चर्चेची गाडी एकमेकींना दिलासा देत सकारात्मक विचार कसे ठेवायचे या उपयांकडे वळली . बोलता बोलता एकमेकींच्या सहवासातील सुवर्ण दिवस आम्ही आठवायला सुरवात केली. भूतकाळातील गंमती आठवून , आम्ही मूर्खपणाने केलेले उद्योग आठवून एकमेकींची अक्कल काढत दिलखुलास हसून घेतलं. थोड्याच वेळाने ज्या तक्रारी वरून आमचं संभाषण सुरू झालं होतं त्याचं मोडीत काढायला सुरुवात झाली.
आपण आवडीने भाज्या कधी खातो ग? ... भाज्या मिळत नाही याची आपल्याला काय चिंता ... टीव्ही बघायला वेळच कुठे मिळतो? सासू सून हेवेदावे बघण्यापेक्षा कार्टून, डिस्कवरी बघणं बरं ... घरात उपलब्ध असलेल्या  कमीत कमी पदार्थात आज पोटभरीचा काय नवीन पदार्थ बनवला? यावर मनसोक्त संवाद साधला. अचानक कसली तरी आठवण होवून कामाचा डोंगर वाट बघत बसला आहे म्हणत लांबलेले संभाषण आटोपतं घेतलं.
नवीन काय बोललो ? किती खरं किती खोटं बोललो? या प्रश्नांची उत्तरे आम्ही शोधली नाही. त्याची गरजही भासली नाही. फोन ठेवल्यावर माझ्या आठवणीने तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या विचाराने माझ्या चेहऱ्यावर हसू मात्र फुललं . निखळ मैत्री अशीच असते भावनिक संसर्ग देणारी पण तेवढीच हवी हवीशी . अनेकदा एखाद्या समस्येवर आपण आपल्या पुरता उपाय शोधलेला असतो. अवतीभवतीच्या वातावरणाबद्दल तक्रार करायची नाही. जे आहे त्यात चांगल काय हे शोधून मार्गक्रमण करायचं असं ठरवलेलं ही असत. पण...... भेटणारा तक्रारीचा पाढा वाचत असेल तर आपल्याही नकळत आपणही तक्रारींचा पाढा वाचायला लागतो  आणि आपला हाच तक्रारींचा पाढा इतर अनेक जणांना ही उद्युक्त करतो. अनेक बाबतीत हा मानसिक संसर्ग पसरत जातो. तेव्हा " स्टे होम.. स्टे सेफ " सारखंच "नेव्हर कंप्लेंट ... फायिंड बेस्ट ... इमप्रुव्ह मेंटल हेल्थ .. स्टे हॅपी.... लिव लाँग" हेही आवर्जून करायला हवं.
©️ अंजली मीनानाथ धस्के
 टिपः सदर लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. यावेळी फुलांची रांगोळी काढली आहे . अपेक्षा आहे की ही रांगोळी ही तुम्हाला आवडेल. तुमच्यापैकी किती जणांना या मानसिक संसर्गाचा मजेशीर अनुभव आलाय. तुमचे अनुभवही वाचायला आवडतील.


गणेश चतुर्थी ११/३/२०

 
   गणेश चतुर्थी ११/३/२०
 गज मुख असलेल्या गणेशाचे रूप मन मोहून तर घेतेच. तसेच  त्याच्या दर्शनाने चित्त ही प्रसन्न होते.
गणेश चतुर्थी निमित्त काढलेली ही रांगोळी आपल्यालाही नक्कीच आवडेल.
©️ अंजली मीनानाथ धस्के


3D_रांगोळी फुलपाखरू


    #3D_रांगोळी
#फुलपाखरू
काढून बघण्याची खूप इच्छा होती. त्याचाच हा पहिला प्रयोग.....
मंजिल अभी दूर हैं
पर
राह का अपना मजा खूब हैं।
दोन वेगवेगळ्या रंगाचे फुलपाखरू काढले . कोणत्या रंगाचे फुलपाखरू चांगले दिसेल हे ठरवण्यासाठी खटाटोप केला पण निर्णय काही झाला नाही.
©️ अंजली मीनानाथ धस्के



अनेक कथांची एक कथा

#झोपेतल्या_गोष्टी (२)
#अनेक_कथांची_एक_कथा   
   
          बाळराजेंना  मैदानी खेळ खेळायला मिळत नाही  त्यामुळे  रात्री  लवकर झोप येत नाही. बाबा वर्क फ्रॉम होम करतोय . तो घरात असला तरी फारसा वाट्याला येत नाही.
      कामवाल्या मावशींनाही सुट्टी असल्याने मला मात्र दिवसभर पुरेल अस मस्त काम  मिळालंय. त्यामुळे रात्री पटकन झोपण्याकडे माझा कल असतो.
          दिवसभर वाट्याला न आलेला बाबा रात्री मात्र बाळ राजेंच्या चांगलाच तावडीत सापडतो.
"पप्पा गोष्ट सांगा ना ..... त्याशिवाय झोप नाही येणार " बाळ राजेंचं टूमणं सुरू होतं .
मी अर्धवट झोपेत असतांना  या दोघांचे मात्र " रात्रीस खेळ चाले " असं काहीसं सुरू असतं.
       दिवसभर कॉल वर बोलून थकलेला बाबा चिकाटीने नव नवीन कथा बनवून सांगत असतो खरा पण आज कामाच्या ताणामुळे त्यालाही गोष्ट सुचेनाशी झाली होती. नेहमीचं गोष्ट सांगा असं टूमणं सुरू झाल्यावर त्याने शक्कल लढवली " तूच आज  एक गोष्ट सांग.... बघू तुला सांगता येते का?".
            मला वाटलं आज शांततेतच झोपावं लागणार पण बाळ राजेंनीही ही संधी नाकारली नाही. त्याने कथेला सुरुवात केली.
        कोल्ह्याला द्राक्षे आंबट लागली तेव्हा तो कावळ्याकडे गेला. कावळ्याला गाणं म्हणायला लावून त्याच्या चोचीतला मासाचा तुकडा कोल्ह्याने  गट्टम् केला. दुखावलेला कावळा घरी जायला निघाला. तेवढ्यात  खूप पाऊस आला आणि त्याच घरही त्या पावसात वाहून गेलं. शेजारीच रहात असलेल्या चिमणीकडे तो गेला . तिच्याकडे रात्रभर मुक्काम केल्यावर त्याने तिच्या घरात केलेली घाण पाहून सकाळी चिमणीनेही त्याला हाकलून लावले. तहानलेला तो पाण्याच्या शोधात एका रांजणापाशी पोहचला. तळाला गेलेलं पाणी त्याने खडे टाकून वर आणलं. तो पाणी पिऊन तृप्त झाला.  तेवढ्यात त्याला त्याचा जुना मित्र करकोचा तिथे भेटला. आपल्याला कोल्ह्याने कसं फसवल हे त्याने करकोच्याला सांगितलं.
         करकोच्याने कोल्ह्याची फजिती करण्याची कल्पना मांडली. त्याने खोल खोल सुरईत खीर  भरून ती खाण्यासाठीच  आमंत्रण कोल्ह्याला दिलं. सुराईतली खीर काही कोल्ह्याला खाता आली नाही. त्याला चांगलाच धडा मिळाला. भुकेला तो त्याच्या गाढव व सिंह या  मित्रांकडे गेला.
सिंहाने केलेल्या शिकारीचे गाढवाने तीन समान भाग केले म्हणून गाढवाला सिंहाने मारून टाकले. कोल्हा सिंहांची चाकरी करण्याचे मान्य करून त्याचे जेवण झाल्यावर उरलेले मास खाण्याची तयारी दाखवतो. स्वतःच्या  हुशारीने कष्ट न करता कोल्हा स्वतः चे पोट भरून घेतो.
        कोल्हा आपल्या हुशारीने रोज एक प्राणी सिंहाकडे शिकारीसाठी पाठवत असतो. जेव्हा सिंहाकडे जाण्यासाठी  सस्याची वेळ येते तेव्हा ससा त्याला विहिरीजवळ घेवून जातो . विहितल्या दुसऱ्या सिंहावर हमला करतांना हा सिंह विहिरीत पडतो. या सिंहाला शिकारी जाळ टाकून वर काढतो. गुहेत असतांना त्याच्या अंगावर रोज खेळणारा उंदीर त्याला तिथे भेटतो. उंदीर जाळ कुरतडून शिकाऱ्यापासून त्याची सुटका करतो . वैतागलेला शिकारी कबुतराची शिकार करण्यासाठी बंदूक उचलतो. त्याला  कबुतराची शिकार करतांना   बघून मुंगी त्याच्या पायाला जोरात चावा घेते. कबुतराचा जीव वाचवते.
        झाडावर चढून अन्न गोळा करतांना ही मुंगी पाण्यात पडते.  पाण्यात झाडाचे पान टाकून कबुतर तिला बाहेर काढतो.
         पाण्याच्या बाहेर आलेली मुंगी लगेच तिच्या नेहमीच्या कामाला लागते . डोक्यावर धांन्याचा  दाणा वाहून नेत असतांना तिला मजा मारत बसलेला ग्रास हॉपर ( नाक तोडा) दिसतो .
भविष्यातील कठीण काळासाठी ती आधीच धान्याचा साठा करत असते. सतत कष्ट करत असते. त्यामुळेच जेव्हा कठीण काळ सुरू होतो तेव्हा ती तिच्या वारुळात मजेत असते तर ग्रास हॉपरला मात्र वण वण हिंडाव लागत असतं. त्याची दया येवुन मुंगी त्याला आपल्या वारुळात घेते. बाहेर प्रचंड बिकट परिस्थिती असली तरी आत मात्र सगळे सुरक्षित असतात. वर्षभर कष्ट करणाऱ्या मुंग्या आता मस्त आराम करत असतात. त्यांना माहीत असतं हा काळ ही लगेच निघून जाईल . पुन्हा कष्ट करण्याचे दिवस येतील. त्याही " स्टे होम स्टे सेफ " असं म्हणत त्यांच्या वारुळात त्या सगळ्या सोबत आणि सुरक्षित आहेत याचाच आनंद साजरा करत असतात.
           अशा प्रकारे अनेक कथांमधून प्रवास करत बाळराजेंची स्वारी शेवटाकडे पोहचली आणि लगेच
बाबांच्या कुशीत शिरून गाढ झोपेच्या अधीन ही झाली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( लिखाण आवडल्यास ते शेयर करतांना नावासहितच करावे .,)