चौकट (मातृ दिना निमीत्त केलेली कविता)

#Mothersday2024 #mothersdayspecial 

#कविता 

#चौकट

आई आणि.......... बरेच काही 

चौकटीत राहणाऱ्या आणि चौकट मोडू पाहणाऱ्या सगळ्याच मातांना ' मातृ दिनाच्या' हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

@anjalimdhaske

बाप होता येतं सहजच 

आईने नऊ महिने गर्भ रखावा लागतं 


बाप असू शकतो स्वार्थी 

आईने निःस्वार्थ असावं लागतं 


बाप असतोच कठोर 

आईने हळवं रहावं लागतं 


बाप असला जरी स्वच्छंदी 

आईने घराशी, लेकरांशी बांधून घ्यावं लागतं


बापाला असते मुभा बेफिकरीची 

आईने मात्र जबाबदार असावं लागतं 


बापाला उपमा ' नारळाची '

आईने 'दुधावरीची साय ' व्हावं लागतं



बापाला व्यसनांचा आधार 

आईने निर्व्यसनी तरी खंबीर असावं लागतं 


बाप घरातला ' कमावता ' असतो 

आईने कमवूनही घरासाठी ' राबवं' लागतं 


बाप जरा.. बरा असला तरी ' भारी' वाटतो 

आईने नेहमीच ' भारी' असावं लागतं 


बाप करु शकतो ' उपेक्षा '

आईने मात्र सगळ्यांच्या अपेक्षांवर ' खरं ' उतरावं लागतं 


बापाला प्रिय असतं त्याचं स्वातंत्र्य

आईने मात्र कायम पारतंत्र्यात रहावं लागतं 


बापाला घेता येते विश्रांती 

आईने २४*७ ' ऑनड्युटी' रहावं लागतं 


बापाला असते स्वतःची ' चॉईस' 

आईने दुसऱ्यांच्या आवडीला ' आपलं' मानावं लागतं 


बापात कायम असतं ' पुरुषपण' 

आईने ' बाईपणाच ' मोल द्यावं लागतं


बाप कसाही असू शकतो 

आईने कायम ' आदर्श' असावं लागतं 


बाप  असतो घराचं छप्पर

आईने मात्र भिंत होवून 

त्याचही ओझ खांद्यावर घ्याव लागतं


बापाला 'माणूस ' म्हणून जगता येतं

आईने मात्र कायमच ' आई ' रहावं लागतं


बापा विषयी फार कोणी लिहीत नाही 

म्हणून त्याच्या वागण्याला नसते 'समाजाची चौकट ' 

आईने मात्र स्व अस्तित्व हरपून मातृ साहित्याच्या ओझ्याखाली ' सामाजिक  चौकटीतच ' जगावं लागतं

©️ अंजली मीनानाथ धस्के 






आयस्क्रिम मशीन

 #आयस्क्रिम_मशीन 

©️ अंजली मीनानाथ धस्के 

टाईम मशीन बद्दल आपण सगळ्यांनीच वाचले किँवा ऐकले असेल. टाईम मशीन या संकल्पने आधी 'आयस्क्रिम मशीन' या संकल्पनेशी माझे बालपण जोडल्या गेले आहे.  टाईम मशीनचा अनुभव घेणे तर शक्य नाही. टाईम मशीन असती तर पुन्हा एकदा पारंपरिक आयस्क्रिम मशीनचा अनुभव घेता आला असता का? माहित नाही परंतू आठवणीच्या गाठोड्यात असे अनेक क्षण टाईम मशीनच्या प्रतीक्षेत आहेत. 

       मी साधारण दुसरीत असेल.......

           एक दिवस संध्याकाळी खूप उत्साहात वडील घरी आले होते. त्यांना आम्हाला काही तरी सांगायचे होते परंतु उन्हाळ्याचे दिवस व शाळेला सुट्टी सुरू असल्याने संपूर्ण दिवस घरात बसून कंटाळलेली आम्ही भावंडे खेळायला बाहेर पडलो. रात्रीच्या जेवणाला बसलो तेव्हा  मात्र वडील आई यांचे 'आयस्क्रिम मशीन' या विषयावर बोलत सुरू झाले. मधेच आम्हाला उद्देशून वडील बोलले," मुलांनो या रविवारी आपण घरी आयस्क्रिम बनविणार आहोत."

आम्ही सगळ्यांनी अगदी आश्चर्याने," खरंच...... घरी आयसक्रिम बनविता येते?"

त्यावर वडील उत्साहाने ," का नाही.... आयस्क्रिम मशीनमधे सहज बनविता येते?"

आम्हीं खुशीत," आपण आयस्क्रिम मशीन घेणार आहोत?"

त्यावर आई ," दोन महिने उन्हाळा जाणवतो... त्यासाठी एवढे महाग मशिन घ्यायचे. बाकी वर्षभर त्याला सांभाळत बसावे लागेल ते वेगळेच"

वडिलांनाही कल्पना होती की,  असली हौस त्यांच्या खिषालाही परवडणारी नव्हती. तरीही आमच्या समोर ते बोलले ," एक दिवस वापरून बघू, आपल्याला आवडली तर आपली स्वतःची मशीन विकत घेवू.... त्यात काय एवढे"

आम्ही भावंडे," मग आपल्याला रोज आयस्क्रीम खायला मिळणार?"

वडील बोलले," आधी मशिन घरी येवू तर द्या "

            आमच्या घरी , आमच्या ओळखीत तसेच संपूर्ण कॉलनीत कुणाकडे तेव्हा फ्रीजही नव्हता. ' बर्फ' हा फक्त कुल्फी वाल्यांच्या लाल मडक्यात बघायला मिळायचा. आयसक्रिम हा शब्द या आधी आम्ही फक्त ऐकून होतो. त्याची चव कशी असेल याची कल्पनाच फक्त करु शकत होतो. तेच आयस्क्रिम आपल्या घरी बनणार आहे आणि त्याची चवही आपल्याला चाखायला मिळणार आहे याच उत्साहात आम्ही भावंडे झोपी गेलो.

    वडील ज्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. तिथल्याच एका सह प्राध्यापकाने हे आयस्क्रिम चे मशीन विकत घेतले होते. बोलता बोलता त्यांनी वडीलांजवळ त्या मशीनच्या आयस्क्रिम बद्दल फारच कौतुक केले. घरच्या घरी अगदी स्वस्तात खूप चविष्ट आयस्क्रिम बनविता येते. हे फार रंगवून रंगवून सांगितले होते. वडिलांनीही असे एक मशिन घ्यावे यासाठी त्यांनी खूप प्रेरित केले होते. त्या मशीनच्या वर्णनाने वडील फारच प्रभावित झाले होते. मशिनची किंमत चार ते पाच हजार रुपयांपर्यंत होती. तसेच इतर खर्च बघता आयस्क्रिम बनविणे वाटते तितके सोपे आणि स्वस्त नक्कीच नव्हते याचा अंदाज वडीलांना आला होता तरीही आपल्या मुलांना प्रत्यक्षात आयस्क्रिम कसे बनते? हे घरच्या घरी दाखविण्याची संधी त्यांना सोडायची नव्हती. त्या मशिनमधे आयस्क्रिम बनविण्याच्या प्रक्रियेने त्यांच्यावर अशी काही मोहिनी घातली होती की, वडिलांनी स्वत:च्या तत्त्वाला डावलून प्रथमच त्यांच्या  सहकाऱ्याला एक दिवसासाठी ते मशिन मागितले. 

        खरे तर वडीलांना उधार घेणे, दुसऱ्याची वस्तू  / कपडे आणून वापरणे असले काहीही अजिबात आवडत नसे.  तरीही त्यांनी ती मशिन एका दिवसासाठी मागितली होती. यावरून त्या मशिनमधे नक्कीच काहीतरी खास आहे याची कल्पना घरातील प्रत्येकाला आली होती.

       शनिवारी संध्याकाळी आमच्याकडे मशिन येणार, रविवारी आम्ही आयस्क्रिम बनविणार आणि सोमवारी सकाळी ती मशिन परत करायची असे काहिसे ठरले होते. प्रत्यक्षात आमच्या घरी मशिन येणारा शनिवार उगवायला जरा वेळ लागला. ज्यांची मशिन होती तेच प्रत्येक रविवारी आयस्क्रिम बनवत असल्याने आमच्या स्मरणातून ती मशिन गेली होती. त्यांनी मशिन स्वतःहून दिली तरच मशिन आणायची, त्यांना आपण मशिन मागायची नाही असेच आई बाबांनी नी जाहीर केले होते. मशिनची किंमत, उन्हाळा दिवस .... बघता आपण मशिन मागणे योग्य नाही असेच त्यांना वाटत होते.

 ज्यांची मशिन होती त्यांचे कुटुंब चार पाच दिवस गावी जाणार असल्याने त्यांनी स्वतःहून वडीलांना मशिन घेवून जाण्याविषयी सुचविले. तसेच काय काय तयारी करावी लागेल याची सविस्तर माहिती दिली. त्या एका शुक्रवारी वडील पुन्हा अतिशय उत्साहात घरी आले. घरी आल्या आल्या त्यांनी आईला रविवारी जास्तीचे दिड लिटर दूध मागवयला सांगितले. रसवंती गृहातून छोटी बर्फाची लादी आणावी असे मनात येवून वडिलांनी चौकशी केली असता ते प्रकरण बरेच खर्चिक जात होते. स्वस्तात बर्फाची लादी कूठे मिळते? कोण आणून देवू शकेल ? यावर आमच्या घरमालकासहित अनेकांशी चर्चा सुरू असतांनाच मला रोज शाळेत सोडणारे रिक्षावाले काका ' हरिभाऊ' गरजेला काही पैसे मिळतील का? असे विचारायला आले होते. आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना मात्र आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागायचे.  त्यांनी सगळी चर्चा ऐकली तेव्हा त्यांनीच सांगितले की ते चौकातल्या रसवंती साठी कधी कधी बर्फ आणून देतात. यात एक अडचण होती की बर्फाची एक लादीच घ्यावी लागणार होती. उरलेल्या लादीचे काय करायचे हा प्रश्न होता. परंतु या सगळ्यासाठी होणारा खर्च बघता संपूर्ण लादी घेणेच स्वस्त पडणारे होते. अखेर ' हरिभाऊ' काकांनी आनंदाने बर्फाची लादी आणून द्यायचे कबूल केले. ते ज्या कामासाठी आले होते तेही झाले होते. 

        सगळे कसे जुळून येत आहे म्हटल्यावर वडील तडक दुकानांत गेले. बदाम, काजू, वेलची, चारोळी असे सगळे जिन्नस थोडे थोडे घेवून आले. वडिलांचा उत्साह इतका वाढला होता की कधी एकदा मशिन घरी येते असे त्यांना झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आईला जास्तीचे दूध मागविण्या विषयी आठवण करून दिली. आई दूध आणून देणाऱ्या काकांशी बोलत असतांनाच वडिलांनी न राहवून," चांगले घट्ट दूध आणून द्या बरं कां.... पाणी मिसळू नका. घट्ट बासुंदी व्हायला हवी"अशी सूचना केली तसे ते काका," कोणी खास पाहुणे येणार आहेत का घरी.? " बोलून गेले. वडील अगदी खुशीत," या वेळी पाहुणे नाहीत.... आम्ही घरी आयस्क्रिम बनविणार आहोत. त्यासाठी दूध घट्ट हवे. जास्त आटवावे लागू नये "

काकाही कौतुकाने बोलले," आयस्क्रिम घरी बनविणार आहात का ? , छान... छान... काही काळजी नको मी आणून देतो उद्या जास्तीचे दूध " 

          आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त उत्साह वडिलांमधे संचारला होता. त्याच उत्साहात ते तयार होवून महाविद्यालयात गेले. संध्याकाळी ते ठरल्याप्रमाणे आयस्क्रिम मशिन घेवूनच घरी पोहचले. 

आयस्क्रिम मशीन  या शब्दामुळे ' मशिन मधे दुध टाकले तर  आयस्क्रिम तयार होवून बाहेर येणार ' आशी काहीशी माझी समजूत झाली होती. जेव्हा प्रत्यक्षात लाकडी बादली रुपी ते मशिन बघितले तेव्हा उद्या खरंच आयस्क्रिम मिळणार आहे का? याची मला शंका वाटली होती.

      दिसायला लाकडी बादली जरी दिसत असली तरी तिची किंमत बघता आईने आम्हाला त्या बादलीकडे फिरकूही दिले नाही. "उद्याच आयस्क्रिम बनवितांना तिचे निवांत दर्शन मिळणार आहे "असे जाहीर करून टाकले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या पासून वडिलांना चिंता लागून राहिली होती. दूधवाले काका जास्तीचे दूध घालायला विसरणार तर नाही? विसरले तर आयत्या वेळी कोणाकडे असे जास्तीचे दूध मिळू शकते, या सगळ्याचा विचार करत असतानाच दुधवाले काका आले आणि ठरल्याप्रमाणे जास्तीचे दूध देवून गेले. दूध घेतल्या वर लगेच ते दुध आटविण्यासाठी वडीलांनी आईच्या मागे लकडा लावला. प्रत्यक्षात आईने मात्र दुध फक्त तापवून ठेवले. वडिलांना स्पष्टीकरण देत सांगितले," आताच दुध तयार करायला घेतले तर तुम्ही सगळे आयस्क्रिम बनविण्या आधीच बासुंदी म्हणून सगळे संपवून टाकाल "

आईचे म्हणणे शंभर टक्के खरे होते. म्हणून वडिलांनाही काहिच बोलता आले नाही. आता लगेच करण्यासारखे काही नसल्याने वडिलांना दूसरी चिंता सतावू लागली. हरिभाऊ बर्फाची लादी आणून द्यायला विसरले तर ? बर्फाची लादी वेळेत आली नाही तर? कारण लादी आणून द्यायचे ठरले होते परंतू लादी कधी आणून द्यायची त्याची वेळ ठरवली नव्हती. आयस्क्रिम तयार व्हायला आठ ते दहा तास लागणार होते. आजचा एक दिवस फक्त हातात होता. आयस्क्रिम बनविण्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच वस्तू घरात हजर होत्या.  वडिलांच्या  अती आग्रहामुळे अखेर आईने जास्तीचे घेतलेले दूध आटवून ठेवले . आता फक्त बर्फाची लादी घरात आली की आयस्क्रिम तयार करण्याला वेग येणार होता. वडीलांची घालमेल वाढू लागली. त्यांची घर ते गेट.... गेट ते घर अशा फेऱ्या सूरु झाल्या. या दरम्यान त्यांच्या बरोबरीने आम्हीही आटवलेल्या दुधाची चव चाखून पाहिलीच.

आयस्क्रीम बनेल तेव्हा बनो... मला तर माझ्या वाट्याचे दूधच पिवून घ्यावे वाटू लागले. दुधाची अप्रतिम चव जिभेने चाखल्याने आता आमच्या भावंडांच्या ही जीवाला चैन नव्हते . वडिलांचा धीर ही सुटला होता. त्यांनी घराबाहेर पडून बर्फ कूठे मिळतोय का तेही पुन्हा पडताळून बघितले. बर्फ भरपूर लागणार होता आणि रसवंतीवाले कोणीही द्यायला तयार नव्हते.

        अकरा... साडे अकराच्या दरम्यान हरिभाऊ बर्फाची लादी घेवून आले. बर्फाचा कारखाना उघडायलाच  दहा..साडे दहा झाले असल्याने त्यांनाही उशीर झाला. त्यांनी न विसरता लक्षात ठेवून काम केले होते याचा आनंद आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागला. वडिलांनी त्यांना रिक्षा भाडे देवू केले ते त्यांनी घेण्याचे नाकारले," तुम्ही माझ्या अडीअडचणीला धावून येता. अन् मी फक्त बर्फ आणून द्यायचे पैसे घ्यायचे.... असं कसं चालेल." म्हणत त्यांनी आमचा निरोप घेतला. गरिबितही हा माणूस मनाची श्रीमंती दाखवून गेला 

आता वडीलांची लगीन घाई सूरु झाली. मोठी लाकडी बादली आमच्या मधल्या खोलीच्या मधोमध ठेवण्यात आली. तिच्यावरचं लाकडी झाकण काढल्या गेले. त्या बदलीच्या मधोमध एक आल्युमिनियमचा  डबा आडव्या रॉड वर लटकवलेला होता. त्या डब्याला झाकण होते. या डब्याभोवती लाकडी बादलीत असलेल्या रिकाम्या जागेत बर्फाचे तुकडे आणि मीठ असे मिश्रण भरून टाकल्यावर त्या डब्यात आटवलेले दूध ठेवायचे. वरच्या लाकडी झाकणाला मधोमध एक छिद्र होते. त्यात आतल्या बाजूने एक रवी सदृश्य रॉड  घालावा लागायचा, लाकडी झाकण लावून घ्यायचे. ती रवी त्या तळा पर्यंत डब्यात बुडेल अशी ठेवायची. आता झाकणावर अशी एक रचना ठेवायची की त्या मधे हा बाहेर आलेला रॉड फिट बसेल. हात शिलाई मशीनला जसे हाताने फिरवता येते तशीच काहीशी ही रचना होती. बर्फामुळे डब्याच्या कडेने आतील बाजूचे दूध घट्ट होवू लागले की साधारण दर एका तासाने लाकडी झाकण न उघडता  बाहेरूनच एक हॅण्डल फिरवले की आतले दूध ढवळून निघावे. बर्फाचा थंडावा संपूर्ण दुधात समान पसरत रहावा यासाठी अशी रचना केलेली होती.

वडिलांनी पटपट सगळे सोपस्कार पूर्ण केले. सगळे सोपस्कार पूर्ण करत असतांना त्यांनी उत्साहाने आम्हाला अनेक गोष्टी संबधी सविस्तर माहिती दिली. बर्फात मीठ मिसळले असता बर्फ लवकर वितळत नाही. लाकडी बादलीमुळे आतली थंडी बाहेर येत नाही आणि बाहेरची गरमी आत जात नाही. 'लाकूड उष्णतेचे वाहक नाही' याचे प्रात्यक्षिक दाखविले. आतले दूध हे डब्याच्या कडेने घड्ड होते आणि मध्यभागी पातळ असते हे दाखवत," आतील भांडे हे मुद्दाम धातूचे आहे कारण धातू हे उष्णतेचे उत्तम वाहक असतात" याचेही स्पष्टीकरण दिले. लाकडी झाकण न उघडता दुधात ठराविक वेळेने रवी फिरवल्याने दुधाचे तापमान एक सारखे होत अधिक थंड होण्यास फायदा होतो. त्यामूळेच साधारण सहा ते आठ तासाने दुधाचे द्रव रूप जावून त्याला घन रूप प्राप्त होण्यास मदत होते. यातील विज्ञान ही सविस्तर सांगितले. वडिलांनी आईसक्रीम बनविण्याच्या निमित्ताने त्याच्या संदर्भातील सगळेच वैज्ञानिक मुद्दे इतक्या उत्साहात समजावून सांगितले की  त्यांना हेच सगळे मुद्दे प्रात्यक्षिक दाखवून समजावयाचे होते याची आईला खात्री पटली. आता लगेच काही आयस्क्रिम मिळणार नाही याची कल्पना येवून आम्ही भावंडांनी बर्फाकडे मोर्चा वळवला. "अरे.. असे बर्फ चघळत बसाल तर उन्ह लागेल" असे आईने खुप समजाविले परंतु बर्फ पहील्यांदाच हातात घेणाऱ्या आम्हाला तिचे बोलणे ऐकू येत नव्हते.

खूप कष्टाने आम्ही पाहिले दोन तास दम धरला. उघडून बघूया का? हाच मोह अनावर होऊ लागला .

अखेर वडिलांनी ते लाकडी झाकण उघले तसे आम्ही आमच्या हातात आसलेल्या वाट्या पुढे केल्या. आमचा डाव आईच्या लक्षात आल्याने, तिने खुप विरोध केला. अशाने आयसक्रिम बनण्या आधीच दूध संपलेले असेल याची तिला भिती वाटू लागली. वडिलांनाही आमच्या सोबत थोडे थंड दुध चाखून बघण्याचा मोह झाला. त्या थंड दुधाच्या चवीने माझ्या मनावर असे काही गारूड घातले की माझ्या बाल मनाला उन्हाळ्यात केवळ असे थंड दुध पिल्याने/खाल्यानेच स्वर्गीय गरव्याची अनुभूती मिळू शकते असे वाटून गेले. त्या मोहाच्या क्षणी आयस्क्रिम वगैरे सगळे झूठ.....  वाटू लागले.

 आम्ही भावंडांनी पुन्हा एकदा बर्फाकडे मोर्चा वळवला. बर्फाचा गारे गार तुकडा चोखण्यातही गंमत वाटली.

  आयस्क्रिम मशिनमधे  रिकाम्या झालेल्या छोटया जागेतही पुन्हा एकदा  बर्फ भरण्यात आला. उरलेला सगळा बर्फ आईने शेजारी  वाटून टाकला. 

चार वाजता अधीर होवून आम्ही पुन्हा आपापली वाटी सांभाळत मशिन भोवती गराडा घातला. वडिलांनी मशीनचे झाकण उघडले. आता दुधाला आधीपेक्षा बरेच घन स्वरूप प्राप्त झाले होते. ते बघून तोंडाला सुटलेल्या पाण्यामुळे अजून थांबणे अशक्य वाटू लागले. आमच्या समाधानासाठी पुन्हा एकदा आमच्या वाट्यांमधे आयस्क्रिम रुपी प्रसाद दिला गेला.त्याची चव शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी अप्रतिम होती. सोबतीला गारे गार स्पर्श जिभेला सुखवून टाकत होता. वाटीतला प्रसाद संपला पण मनातली हाव काही संपत नव्हती. उलट ती अधिकच जोर धरू लागली. अखेर "मला नंतर काही नको, माझ्या वाट्याचे अयस्क्रिम मला आताच हवे" म्हणत मी माझ्या मनातली लोभाला वाट मोकळी केली. 

बाल मनाने कितीही समजूतदारपणे शब्द दिला तरी आईच्या लेखी त्याला काहीच अर्थ नव्हता. आईनेही मग जाहीर करून टाकले," तुम्हा तिघांची तयारी असेल तर सगळ्याची आताच समान वाटणी करून टाका... मला नंतर वाद नको." खर तर वडिलांनाही हेच हवे होते पण आईपुढे त्यांना आमच्या सारखा बाल हट्ट करणे कठीण गेले असते. त्यांनी लगेच पडत्या फळाची आज्ञा घेवून सगळ्या घन रुपी दुधाची सामान वाटणी करण्याचे काम हाती घेतले. कारण सतत वाटीभर चव घेण्याच्या नादात तसेही फार काही भांड्यात शिल्लक नव्हतेच.

      आम्ही आमच्या वाट्या सरसावून बसलो. तेवढ्यात आईने अजून दोन वाट्या वडीलांपुढे आणून ठेवल्या. आमच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले. आईने स्पष्टीकरण दिले," शेजारी द्यायला हवे आहे" खरं तर त्या वेळी आईच्या समाज सेवेचा राग आला होता. आमच्या चेहऱ्यावर नाराजी लपविता आली नाही. आईला बहुदा त्याची जाणीव झाली," आठवडाभर आयस्क्रिम करणार आहोत म्हणून जो काही प्रचार केला आहे त्यासाठी निदान सख्या शेजाऱ्यांना तरी वाटी भर द्यावेच लागणार आहे. ते सगळे सकाळ पासुन तुमचे हे प्रयोग बाहेरूनच बघून जातात आहे. हवे तर मला माझा वाटा देवू नका. पण या दोन वाट्या तेवढ्या भरून द्या " 

            आमच्या घरात कुकरची तिसरी शिट्टी झाली की," काकू भात झाला का हो, आमच्या पिंट्याला भात खायचा आहे आणि अजून माझे कुकरच गॅसवर चढले नाही " किंवा भाजीच्या फोडणीचा वास आला की थोड्याच वेळात ," अमूक भाजी केली का आज तुम्ही? आमच्या यांना ऑफिसला जायला उशीर होतोय आणि अजून माझी भाजी निवडून व्हायची आहे " तर कधी " तुमच्या हातची अमूक भाजी नानांना आवडते" म्हणत  सोबत आणलेली वाटी बेधडकपणे आईच्या हाती देणारे ...... असे आमचे सख्खे शेजारी. वेळ प्रसंगी स्वतः चटणी, लोणचे चपाती असे खावून , त्यांना कधी रिकाम्या हाताने / वाटीने न पाठविता आईने जपलेले असे हे , सगळे जीवाभावाचे सख्खे शेजारी. अर्थात त्यांचीही आमच्यावर फार माया.....  एरवी रिकाम्या वेळात त्यांच्यात घरात आमचा दंगा चालायचा, न सांगताही मदतीला धावून येणारे, अर्ध्या रात्री गावावरून  येणार म्हणून आमची वाट बघत जागणारे, आल्यावर हक्काने गरम जेवण तयार करून जेवू घालणारे ..... जीवा भावाचे घरमालक... सख्खे शेजारी.  त्यांचा आमच्यावर जीव होताच... नाहीतर आमच्या घरात आयस्क्रीम बनते आहे याचा आम्ही एवढा गाजावाजा करूनही ते आज काही बेधडकपणे वाटी घेवून आले नव्हते. 

         तिच्या  बोलण्याने आमचा नाईलाज झाला. वडिलांनी वाटणी करायला घेतली तेव्हा लक्षात आले की वाट्यांची संख्या जास्त आणि उरेलेले घन रुपी दूध कमी . त्यातही शेजारी द्यायच्या दोन वाट्या भरून घेतल्यावर आमच्या वाट्याला एक पळी भर देखील घन रुपी दूध आले नाही. 

पूर्ण आयस्क्रिम तयार होण्या आधीच आम्ही वाट्या घेवून आल्याने. नुकतेच घन रुप धारण केलेले दूध बाहेरच्या गर्मीने पुन्हा पूर्व पदावर येवू लागले होते. आईने लगेच दोन वाट्या घेवून शेजारच्यांकडे मोर्चा वळविला. आम्ही मात्र काहीसे खट्टू झालो. तरी घन रूपी दुधाचेचे द्रव रूप होण्याआधी पटापट  आयस्क्रिम खाण्यास सुरूवात केली. पाणी सदृश्य पदार्थाच्या तीन अवस्था या निमीत्ताने नुसत्या बघितल्या नाही तर काही चाखताही आल्या.

आईला अगदीच चवीला म्हणून ठेवलेले आयस्क्रिमही वितळून गेले. ती आल्यावर तिला ते दिले. आमच्या नजरेतला हावरटपणा किंवा तिचा मूळचा प्रेमळ स्वभाव कारणीभूत झाल्याने तीने त्या विरघळलेल्या आयस्क्रिमचा ही आम्हाला एक एक चमचा भरवला.

 घन रुपी आयस्क्रिममुळे जिभेला बधीरपणा आला होता . त्यावर द्रव रुपी आयस्क्रिमच्या चवीने मात केली. वाटी रिकामी झाल्यावर मात्र वाटू लागले की, पूर्ण आयस्क्रिम बणेपर्यंत थांबायला हवे होते.  त्या आयस्क्रिमला हळू हळू वितळू द्यायचे आणि मग थोडे घट्ट थोडे पातळ असे ते आयस्क्रिम हळुवारपणे  जिभेवर ठेवून अलगद मिटलेल्या डोळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यायला हवा होता. त्या कल्पनेतही किती सुख होते.

 आता ..... नजर आयस्क्रिम मशीन मधल्या रिकाम्या डब्यावर गेली. कुबेराचा खजिना कोणी लुटून नेला असावा असे अपार दुःख मनात दाटून आले. 

आई वडिलांचे संवाद सुरू झाला. 

वडील," माझ्या मित्र बोलला , ते आईस्क्रीम तयार करून फ्रीज मध्ये ठेवतात आणि मग हळू हळू लागेल तसे खातात. आपल्याकडे तर काहिच उरले नाही."

आई ," हे मशिन आपल्या कुटुंबाला पुरेसे नाही.  या पेक्षा मोठे मशीन घ्यावे लागेल. तेव्हा कूठे पोरांच मन भरेल. बरं झाले उरले नाही.  जास्तीचे आयस्क्रिम ठेवायला आपल्याकडे फ्रीज कूठे आहे?"

वडील," तेही आहेच म्हणा.मोठया मशिनची किंमत याच्या दुप्पट आहे." 

आई," मशीन आणि फ्रीज यांचा खर्च..... आज गेलेला वेळ, श्रम आणि पैसा यांचे गणित बघता विकतचे आयस्क्रिम आणले असते ते ही परवडले असते. किंवा मुलांना रोज चार आण्याची कुल्फी घेवून दिली तर ते अधिक खूष होतील. त्यात पुन्हा जास्तीची कुल्फी हवी असेल तर तीही घेता येईल आणि हवी तेव्हा घेता येईल. आधी पासून तयारीची गरज नाही. आजचे आयस्क्रिम म्हणजे" नाल सापडली म्हणून घोडा घेण्यासारखे झाले"

आईच्या या वाक्याने रिकामे भांडे बघून मानत दाटून आलेल्या दुःखाचे ढग विरून गेले.  आजच्या प्रयोगाने कुल्फी घेवून देणे परवण्यासारखे आहे याची आईला खात्री पटली आहे असे वाटून उद्या पासून कुल्फी वाले काका आले की आपण आपल्याला हव्या तेवढ्या कुल्फी घेवू शकतो. या आशेचे इंद्रधनू मानत अलगद अवतरले. 

वडील," खर आहे तुझे, पण मला मुलांना आयस्क्रिम तयार होण्यातली वैज्ञानिक क्रिया समजावून सांगायची होती. त्यांना अनुभव द्यायचा होता. ते काम उत्तम झाले. आजच्या खर्चाची किंमत वसूल झाली म्हणायचे .  मुलांचा दिवस मजेत गेला. तूर्तास तरी हे मशीन विकत घेणे आपल्याला झेपणारे  प्रकरण नाही. उद्या मशिन परत करून येतो." 

          मनसोक्त आयस्क्रिम खाता आले नाही. आयस्क्रिम मशीन विकत घेण्या इतपत आपली आर्थिक परिस्थिती नाही. या निराशाजनक विचारांचा मनात प्रवेश देखील झाला नाही. आई वडील बोलले तसे, आम्हीं एका कुल्फीने खूष होणारी मुले होतो. आजचा आमचा दिवस फारच व्यग्र आणि मजेत गेला होता. तसेच भविष्यात रोज कुल्फी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. "उम्मीद पे दुनिया कायम हैं "..... , याची प्रचिती आली.


 आयस्क्रिम मशीन आमची नव्हती परंतू तिच्या योगे आमच्या आयुष्यात आलेले आनंदाचे क्षण, अनुभव व गोड आठवण..... मात्र आमची होती आणि कायम राहील.

©️ अंजली मीनानाथ धस्के 

सोबतीला रांगोळी आहेच..........