वटपौर्णिमा (२७ \०६ \२०१८) :

वटपौर्णिमा (२७ \०६ \२०१८) :

काळाची गरज लक्षात घेता, प्रत्येक स्त्रीने आज  केवळ वटवृक्षाचे पूजन करण्यावरच न थांबता  एक वटवृक्ष लावण्याची आवश्यकता आहे. हे व्रत आपण आपल्या पतिला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतो. म्हणूनच आज  एक वृक्ष लावल्यास  आपल्या पतिला च नव्हे तर आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांनाही उत्तम आणि निरोगी आरोग्याची देणगी आपण देवू शकतो. चला तर मग " एक पाऊल पुढे जाऊया  , एक झाड लाऊया .  सर्व वाचक मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप  शुभेच्छा.




वाढदिवस (२४/६/१८)

वाढदिवस (२४/६/१८):
               आज माझ्या मुलाचा १० वा वाढदिवस आहे. त्याला "शिंच्यान "हे  कार्टून कँरेक्टर आवडते. म्हणुन मी रंगोऴीत शिंच्यान रेखाटन्याचा केलेला छोटासा प्रयत्न.....

देऊ धैर्याने लढा


( या कवितेचा विडियो ही दिला आहे. कवितेला पूरक अशी रांगोऴी ही आहे. विडियो बघून कॉमेंट लिहायला विसरू नका.)
*देऊ धैर्याने लढा*

उघडे फिरते पोर भिकारी
पुतळ्यांना मात्र कपडे भारी
तरी तांड्यावरच्या खोपटातली
माय सांगे आपल्या लेकराला
देऊ धैर्याने लढा.......

नेते कितीही येती-जाती
समस्यांना नसते गिनती
श्रीमंत अधिक श्रीमंत होती
तरी सामान्य म्हणे कुटुंबाला
देऊ धैर्याने लढा.......

रोज एक स्त्री बळी पडते
स्व अस्तित्वासाठी धडपडते
सगळेच पुरुष सारखे नसतात
आई धीर देई लेकीला
देऊ धैर्याने लढा.......

पोर करपते स्पर्धेमधे
भीती सदा गुणवत्तेची
तरी जीव तुझा अनमोल
बाप समजावे पोराला
देऊ धैर्याने लढा.......

उंच भरारी घेण्याआधी
कळी कोमेजते पोटातच
लचके तोडण्या तयार कोल्हे
तरी भाऊ समजावे बहिणीला
देऊ धैर्याने लढा.......

मोडणाऱ्या संसाराला
सोबत एकमेकांची सदा सावरते
पांघरता तुज ऊन पाऊस ही थिटा पडे
पत्नी बोले पतीला
देऊ धैर्याने लढा.......

सुळसुळाट सारा भोंदूंचा
अन्  बाजार झाला श्रद्धेचा
तरी संकट येता मदत मिळे
माणूस सांगे माणुसकीला
देऊ धैर्याने लढा.......

निर्माल्ये सारी नदीत जाती
प्रदूषणाने ग्रासले पाण्याला
तरी गाळ उपसणारे हात बघून
सरिता बोले सागराला
देऊ धैर्याने लढा.......

चोच वासते चिमण्या जिवांची
फुका पाण्याचे लोट वाहती
बघून परसातले दाणा पाणी
चिमणी बोले चिमण्याला
देऊ धैर्याने लढा.......

जंगले सारी नष्ट झाली
प्राणवायू पुरे न श्वासाला
तरी रोप उगवते फोडून खडकाला
धरणी बोले गगनाला
देऊ धैर्याने लढा.......

दुष्काळ जरी वाढला
निसर्ग जरी कोपला
फुलवू  हिरवा गालीचा
बळीराजा बोले काळ्या मातीला
देऊ धैर्याने लढा........

भ्रष्टाचार बळावला
बेरोजगारी वाढली
तरी मेहनत करणारे हात बघून
सत्य सांगे गरिबीला
देऊ धैर्याने लढा.......
©️ अंजली मीनानाथ धस्के


रंगीत रांगोऴी

रंगीत रांगोऴीचे अजून काही प्रकार इथे देत आहे.
                          प्रकार क्र. १



प्रकार क्र. २


प्रकार क्र. ३


मॉर्निंग वॉक

#मॉर्निंगवॉक
             सकाऴी फिरायला जाणारे लोक ..... यांचं निरीक्षण करणे म्हणजे, " व्यक्ती तितक्या प्रवृती " याची प्रचीती घेणे. मी रोज फिरायला जातेच असं नाही. वेऴ आणि मुड़ याची जोड़ी जमली तरच फिरणं होतं. मला डोक्याला खाद्य हवं असेल तर मात्र मी आवर्जुन जाते.
                सकाळी फिरायला जाणं हे आरोग्यासाठी  उत्तमच..... पण मला वाटते की, ' आत्मपरीक्षण.... स्वतःशी संवाद.... निरीक्षण.... त्यातुन मिऴणारे ज्ञान.... हे फार अमूल्य आहे '.  माझ्यासाठी " मॉर्निंग वॉक ".... हा अनुभव सोहऴाच आहे.
 मी फिरायला जाणाऱ्यांचे काही वर्ग करण्याचा  प्रयत्न केला आहे. ते वर्ग काहीसे असे....
             " मॉर्निंग वॉक " याला अनेकांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवलं आहे असे.... ' जागरूक वर्ग '. तर अनेकांना याला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवायचं आहे हाच विचार सतत त्यांच्या मनात घोऴत  असतो असे.... ' विचारी वर्ग '.  या दोन मुख्य वर्गांपेक्षा वेगळे  असे  इतर अनेक वर्ग अस्तित्वात आहेत.
          काही जण हे विशिष्ट मुड असेल तरच सकाऴी फिरायला निघतात असे.... ' हौशी वर्ग '. काही जण उद्या पासुन सकाऴी फिरायला जायच असं नक्की करुन ऐन वेळी कारण काढून जायच टाऴतात असे..... 'आऴशी वर्ग ' .  काही जण जायच नक्की करतात. मग त्यासाठी  लागणारे सगळे साहित्य ( स्पोर्ट शुज,विशिष्ट कपड़े, योगामँट.. वगैरे )  खरेदी करतात. प्रत्यक्षात मात्र फिरायला जायची वेऴ त्यांच्यावर क्वचितच येते असे..... ' अती हौशी तरी परिस्थितीने पिचलेला वर्ग '. या उलट आहे त्या परिस्थितीत ( अवतारात)  फिरणारे असे..... ' संसारी किंवा काटकसरी वर्ग '. काही जण एक महीना नियमित फिरल्यावरच सगळी खरेदी करायची असा निश्चय करणारे आणि त्यावर अंमल करणारे असे....' व्यवहार ज्ञानी वर्ग ' . स्वतःच्याच धुंदीत..... कानात हेडफोन  घालून  किंवा मोबाइलवर मोठ्याने गाणे  ( सुगम संगीत, रेडिओ, भजन, प्रवचन  वगैरे ) लावुन फिरणारे  असे.....' स्व केंद्री वर्ग '. या उलट सामाजिक संबंध प्रस्थापित करुन ते अधिक दृढ़ व्हावे यासाठी धड़पडणारे  असे.....  ' समाजाभिमुख वर्ग '.  ठरलेल्या वेळेत एकच फेरी पूर्ण करायची आहे असं ठरवुनच अगदी हळु हळु फिरणारे असे..... ' कासव वर्ग '. या उलट झपाझप पाऊले टाकत, बागेत चालणाऱ्या प्रत्येकाशी  आपली शर्यत आहे आणि ती आपणच जिंकणार अशा आविर्भावात चालणारे..... असे  ' ससा वर्ग '. काही जण घरी फोनवर किंवा विशिष्ट व्यक्ति बद्दल मनमोकऴ बोलता येत नाही म्हणून तर काही जण सकाळच्या कामात घरी आपली लूडबूड नको म्हणून फिरायला निघतात......  असे..... ' गरजु वर्ग '. धवपऴीच्या जीवनात  अनेक गरजा आहेत म्हणूनच की काय.... या वर्गाची संख्या लक्षणीय आहे.  प्रसंगानुरूप वरील सर्व वर्गात  मोड़णारे असे.....' संधीसाधू वर्ग '.  अमुक वज़न होईपर्यंतच किंवा पोटाचा घेर अमुक इंच कमी होईपर्यंतच फिरायच  आहे असे ठरवुन फिरणारे.... ' ध्येयवेडा वर्ग '. काही जण....जे  मनाने किंवा शरीराने तरुण आहेत ते  बागेतील एक कोपरा पकडून फुलांचे ताटवे न्याहऴत असतात. असे..... ' डोळस वर्ग '. आयुष्याच्या विशिष्ट टप्यावर असलेले आणि चैतन्याचा झरा असलेले असे ...' उत्साही वर्ग '. फिरतांना गप्पा मारल्याच पाहिजेत असा समज असणारे.....' बोलका वर्ग '.  इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत असे दाखविणारे..... ' दिखावू वर्ग '. स्वतःचा अमूल्य वेऴ...... इतरांना व्यायामाचे किंवा आहाराचे धड़े देत सत्कारणी लावणारे असे... ' ज्ञानी  वर्ग '. सगळे व्यायाम प्रकार आपल्यालाच कसे आदर्श जमतात किंवा पूर्वी कसे जमत होते हे वारंवार सांगणारे असे... ' बोलबच्चन वर्ग '. आंघोळ, पूजा-अर्चा आटपुन मगच फिरायला निघणारे असे.... ' नीटनेटका  वर्ग '. आपल्याला कोणी बघत नाही याची खात्री करुन हऴूच झाडांची फूले तोडणारे व  त्यांचे हे कृत्य उघडकीस  आल्यावर  " देवासाठीच घेतो आम्ही " अशी बतावनी करणारे असे.... ' देवभोऴा वर्ग '.  बागेतील रखवालदारासाठी  हा वर्ग उपद्रवी ठरतो.  वरील प्रत्येक वर्गाचे दोन उप प्रकार आहेत.... स्त्री वर्ग आणि पुरुष वर्ग. आता नव्याने एक वर्ग उदयास येत आहे. तो म्हणजे..... आपल्या पाल्याने कुठल्याही प्रकारचा उपद्रव करु नये म्हणून बागेतल्या बाकावर त्यास बसवुन व हाती मोबाईल सुपुर्त करुन..... आपण स्वतः वरीलपैकी कोणत्याही एका वर्गात मोडण्यास उत्सुक असलेला वर्ग. या वर्गाला मी अजुन तरी कुठले नाव दिले नाही. कारण अल्प संख्येत मोडणारा हा वर्ग आहे आणि लवकरच तो नामशेष व्हावा ही च इच्छा आहे.
            असे अनेक वर्ग अस्तित्वात आहेत. अर्थात हे सगळे वर्ग  माझ्या निरीक्षण क्षमतेतुन जन्माला आले आहेत. त्यामुळे या व्यतिरीक्त इतर वर्गही असूच शकतील. या प्रत्येक वर्गाचे निरीक्षण करतांना मला अनेक गोष्टींचे नव्याने आकलन झाले. आयुष्याकड़े बघण्याचा नवा  दृष्टिकोण मिळाला. नकऴत कानावर पडलेले संभाषण.... समस्या..... मत.... या....  आणि अशा....  अनेक गोष्टींनी आत्मपरिक्षण करण्यास प्रवृत्त केले. माझ्या अनेक कठिण प्रश्नांची उत्तरे मला मॉर्निंग वॉक करतांना  सहज सापडली . कानात हेडफोन नसल्याने  निसर्गातील अनेक सुमधुर स्वर कानी पडले. छोट्या गोष्टीत ही  आनंद असतो हे....फुलांना आणि फुलपाखरांना बघुन कळले. सकाळच्या हवेत फक्त गारवा नसतो तर डोक्यातील अनेक विचार पुसून दिवसाची पाटी पुन्हा कोरी करण्याची ताकद असते, हे ही जाणवलं. आजुबाजूच्या कोलाहलातही मनात मात्र नीरव शांतता अनुभवता आली . सकाळच्या हवेत असलेला सुगंध उरात भरून घेतांना सुखद  उर्जेची अनुभूती झाली . सूर्याची कोवळी किरणे...... हिरव्यागार गवतावर दव बिंदुंची नक्षी.... चिमण्या पाखरांची किलबील.... फुलांचा सुगंध.... उत्साहाचे तारुण्य ल्यालेली... चीरतरुण पहाट.... मन मोहुन घेते. आपण कोणत्या वर्गात मोडतो? हा विचार बाजुला ठेवुन....... प्रसन्न सकाळ आणि भरपूर मनोरंजन करणारे निरीक्षण याचा आस्वाद घ्यावयाचा असेल तर  ' मॉर्निंग वॉक ' ला पर्याय नाही.
(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के
       पुणे, चिंचवड ३३


चहा.... एक जादुई पेय

#चहा_एक_जादुई_पेय
                   आज आमच्या मावशींच काम संपत आलं  तसं मी चहा करायला घेतला..... त्या नको नको म्हणत असतांना.... " घ्या हो थोडा.... त्या निमित्ताने मीही घेईल थोडा, एकटीला नको वाटतं... सोबत असेल की बरं  वाटतं  " असं  मी म्हणता त्याही तयार झाल्या चहा घ्यायला. चहा घेताना अनेक विषयावर आमचे बोलणे झाले. त्या घरी जायला निघाल्या... तशा त्या थोड्या थांबल्या आणि म्हणाल्या, " ताई चहा एकदम मस्त झाला होता. माझा सगळा शीण गेला. आता अजून दहा घरची कामं शिल्लक असती तरी केली असती बघा  चटाचटा. "  मी काहीच विशेष केल नव्हतं  म्हणून थोडं  बुजल्या सारखे झाले तरी त्यांनी केलेल्या मनमोकळ्या  कौतुकाबद्दल  त्यांना धन्यवाद दिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी कृतकृत्य झाले . नुसता चहाच तर केला होता..... पण केवढं समाधान दिले त्याने असा विचार डोक्यात आला आणि  लगेच  मन भूतकाळात गेलं......
              चहा...... का कुणास ठावूक लहानपणा पासूनच दूध आणि चहा यावर माझा सारखाच लोभ  होता. आमच्या आईला मात्र आम्ही दुध पिऊन सुदृढ बालक व्हावे असे वाटायचे. दुध आवडत असल्याने ते पिण्याचा कंटाळा कधीच नव्हता. पण आम्हाला दुध देवुन हे लोक ( आई बाबा )मस्त चहा घेतात, आल्या गेलेल्याला चहाचा आग्रह करतात .... याचा हेवा वाटायचा. मी शेंडेफळ म्हणून रोज लाडी गोडी लावून त्याच्या चहातला एक घोट तरी चहा मिळवायचेच. आई मात्र.... " चहा पिल्याने तू काळी पडशील " असा धाक दाखवायची. ( जन्मजात काळा रंग घेवुन आलेली मी अजून काय काळी होणार?....... असा प्रश्न मला पडायचा.😝निदान मी तरी बिनधास्त चहा घेवु शकते असा समजही त्यामुळे पक्का झाला.) आई घरी चहा देत नाही म्हंटल्यावर मी ही नामी युक्ती शोधून काढली. आई कुठेही जातांना नेहमी मला सोबत घेवुन जायची. तिच्या मैत्रिणी तिला चहा घेण्याचा आग्रह करायच्या आणि मला उगाच विचारायच म्हणून विचारायच्या " तू घेणार का ग चहा?" बस...... याचीच मी वाट पहायचे आणि उत्तर द्यायचे 😝 " घरी घेत नाही पण तुमच्याकडे घेईल थोडा ". स्पष्ट बोलण स्वभावात लहानपणा पासुनच आहे. ताकाला जावुन भांडे लपवायचे.... असं  जमलंच नाही कधी. (" ती चहा घेत नाही " असं  माझ्या आधी आई त्यांना सांगण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती 😜) माझ्या उत्तरावर आई डोळे मोठे करून बघायची, 'घरी चल बघतेच तुला ' अशी धमकी त्यात असायची. ( यापेक्षा जास्त  ती सध्या तरी काही करू शकत नाही याची खात्री असल्यामुळे )  मी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून समोर आलेला चहा पिवुन टाकायचे.
      दिवसेंदिवस चहावर असलेले  प्रेम वाढतच गेले.  ( दुधावर ही लोभ होताच ) तसतसे आईचे चहापासून  दूर ठेवण्याचे प्रयत्न ही वाढत गेले. एके दिवशी आमच्यात भांडण  सुरू झाले. " तुम्ही मस्त चहा घेता, मला का नाही देत? मीही आता मोठी झाले आहे. तू काळी पडत नाही चहा घेवुन मग मीच का काळी होणार?   झाले तर होवू दे काळी पण मला थोडा चहा हवाच." असे मी रागाने बडबडत होते. मला तिचे म्हणणे पटत नसले तरी तीही माघार घ्यायला तयार नव्हती. शेवटी माझे वडील आले भांडण सोडवायला. " दे तिला थोडा चहा, काही होत नाही तेवढ्याने, दुध घ्यायला तर ती नाही म्हणत नाही न? मग काय अडचण आहे?  "  असं त्यांनी सांगितल. आईला त्यांचे बोलणे रूचले की नाही.....माहीत नाही. पण मी आनंदून गेले. पप्पांना  आणि मला आईने चहा दिला. चहा पितांना युद्ध जिंकल्याचा भास होत होता तर एक  प्रश्न डोक्यात होताच. शेवटी न राहवुन  पप्पांना मी विचारलेच, " आई नाही म्हणत असतांना..... तुम्ही कसे काय तयार झालात?"   त्यावर ते...... " चहाही  घेता आला पाहिजे?"  मी निरागस पणे, "म्हणजे काय हो पप्पा ?". त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्यामुळे चहावर असलेले प्रेम तर वाढलेच पण ' चहा ' या पेया विषयीचा आदर ही वाढला. त्यांनी स्पष्टीकरण दिले...... " चहा हे संवाद साधण्याचे उत्तम साधन आहे. दोन परिचित व्यक्ती चहा पितांना मन मोकळं बोलतात तर दोन  अपरिचित व्यक्ती आपला परिचय वाढावा म्हणून चहा पितात. तुम्हाला देण्याइतकं दुध सगळ्यांकडे असेलच असं सांगता येत नाही, तेव्हा तुम्ही " मी फक्त दुधचं घेते " असं संगितल तर  त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते आणि मग  मनमोकळा संवाद घडत नाही. तळागाळातल्या लोकांशी संवाद साधायचा असेल, त्यांना आपलसं करून घ्यायचं असेल, त्यांच्यात मिसळून जायच असेल तर चहा घेता आलाच पाहिजे. चहाला नकार दिला तर कदाचित तुमच कौतुक होईलही पण गप्पांची मैफील रंगायला हवी असेल तर चहा घेता यायला हवा. "
                  वडीलांनी सांगितलं ते मनात खोलवर रूजलं. निरीक्षण करण्याची वाईट सवयही लहानपणा पासुनच आहे. त्यामुळे पप्पांच्या बोलण्यातला खरेपणा पडताळून बघण्याची एकही संधी मी सोडली नाही. आई घरी काम करणाऱ्यांना कामात जरा वेळ आराम मिळावा, काम करण्यात उत्साह वाटावा म्हणून सक्तीने चहाची छोटी सुट्टी द्यायची. चहा सोबत घरात असेल ते खायला द्यायची. मग या छोट्या सुट्टीतही सुख दु:खाच्या गोष्टी बोलल्या जायच्या. त्यांच्या अनेक समस्या..... या सुट्टीतच आईकडून सोडवल्या जायच्या. घरी येणारा प्रत्येक जण चहा घेवुनच जायचा. अनेकांची मन तिने चहा देवुन जिंकली होती.
                  एकदा मी आईवर रागावून घरा बाहेर पडले.  खरं  तर तिने मला घरा बाहेर राहण्याची शिक्षा केली होती. ( शिक्षा का केली? असे निरागस प्रश्न विचारायचे नाहीत  . वाईट अनुभव विसरलेले बरे असतात.)  बराच वेळ बाहेर थांबून आई घरात घेईल याची वाट मी बघितली. ती काही आली नाही. मग मलाही  कंटाळा आला होता आणि शेजारीच बांधकाम सुरू होते म्हणून मग मी माझा मोर्चा तिकडे वळवला. तिथे काम करत असलेले रखवालदार आजोबा मला ओळखत होते. त्यांच्या सावलीत टाकलेल्या बाजेवर मी निवांत बसले. तेव्हा त्यांनी विचारलं, " आज एकटीने ईकड कस येन केलं?"  त्यावर मी.... " आईन घरा बाहेर काढलय. आता मी कधीच जाणार नाही घरी. इथंच राहणार तुमच्या सोबत. तुम्ही सांगाल ते काम करत जाईन. तुम्ही नाही न हाकलुन देणार?" त्यावर ते.... " म्या कशापायी  हाकलू ? ... काम कशाला वो सांगू तूम्हास्नी....कधी नव्हे ते पाहुण आले घरला.... आधी त्यांचा पाहुणचार कराया पाहिजे. गरीबा घरचा चहा घेणार का जरासा?"  चहा..... ऐकुन माझी कळी खुलली.त्यांनी चुलीवर चहा ठेवला  आणि मला समजावत म्हणाले , " एवढा राग बरा न्हाय, आई हाय.... रागवली तर काय होत .... मायाबी करते की तेवढीच. आता चहा प्या आन शांत व्हा. झाल गेल गंगेला मिळाल , अस म्हणायच आन सार विसरायच बगा  " मी चहा पीत होते तेवढ्यात आई आली शोधत. "घरी चल.... तुला चहा आवडतो न म्हणून केलाय, सोबतच घेवुया."  माझ्यापुढे चहाच होता ते बघून आजोबांना आई म्हणाली, " तुम्ही कशाला केला, घरी यायच... मी सगळ्यासाठीच केला असता." त्यावर ते.... " तुम्ही रोजच देताय की चहा. आमच्या घरी कोण येत चहा घ्यायला, आज पाहुणे आल्याचा आनंद झाला, या पोरीपायी. मी घरी नेतो म्हटल  तर ही काय थांबत नव्हती. उगा कुठे गेली असती... मंग चहात रमवल मन तिचं, चहा घेवुन झाल्यावर आनतच होतो बगा  तुमच्याकडे "  आम्ही सगळे घरी गेलो आणि परत चहा घेतला. चहाने एक भांडण बेमालुम मिटवले होते .
                                     तिने  चहानी जोडलेली   नाती..... वर्षानुवर्ष टिकणारी, रक्ताच्या नात्यापेक्षाही मजबूत अशा नात्यांमधे बदलतांना मी पहिली. चहा न देणारी आई.... आता पावसात भिजून आल्यावर ' आल्याचा ' खास चहा देवु लागली. आजही ती आम्हा तिघा भावंडांपैकी कोणाकडेही  असली तरी, तिथेही ती या चहाची जादू करतेच . ती नसतांना " बरेच दिवस झाले, तुमच्या आई आल्या नाहीत " अशी तिची प्रेमळ चौकशी होते. ती आल्यावर " आल्या तशा रहा महिनाभर..... लेकीस्नी आन आमास्नी बी बरं वाटतय .... जायाची घाई नगा करू " अशी हक्काची दटावणीही होते .
            माझे वडील घरी आलेल्यांना  चहाचा आग्रह करतांना असंच म्हणायचे, " घ्या थोडा... तुमच्या निमित्ताने मलाही घेता येईल. "  त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून मी ही तसाच आग्रह करायला शिकले. आईची चहाची जादू आता मलाही जमते आहे, ही जाणीव मनाला फार सुखावून गेली. त्यांच्या आठवणींमुळे  माझ्याही नकळत.....चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित आले. चहाने मलाही खूप छान मैत्रिणी दिल्या आहेत. खूप छान आठवणी दिल्या आहेत. आयुष्यातील अनेक नाती, क्षण या चहाने सुरेख गुंफली आहेत.चहाच्या निमित्तानेच  आठवणींच्या गाठोड्यातून आज पुन्हा एक सुखद क्षण वेचला गेला......कागदावर लिहिला गेला....... स्वतःशीच छान संवाद साधला गेला...
चहा.... खरंच संवाद साधण्याचे एक उत्तम साधन आहे.

©️ अंजली मीनानाथ धस्के
पुणे, चिंचवड ३३

पर्यावरण दिन (५ जून २०१८ )

#पर्यावरण दिन
         आज 'पर्यावरण दिन ' आहे.... पण खऱ्या  अर्थाने पर्यावरण 'दीन ' झालेले दिसते आहे. पर्यावरणासाठी झटणारे हात कमी पडतांना दिसतात आहे. वर्टिकल गार्डन ची मागणी होतांना दिसते आहे पण आपल्या घरात असलेल्या कुंडीत लावलेली रोपे जगवतांना मात्र दमछाक होते आहे.  काही कायदे सक्त झाले पाहिजेत तर काही निसर्गाचे  नियम आपण सक्तीने पाळले पाहिजेत. निसर्ग जसे भरभरून देतो तसे..... कोपला की एका क्षणात सगळे परत ही घेवु शकतो. कडक उन्हात जेव्हा उभे राहतो तेव्हाच झाडाच्या थंड सावलीची उणीव भासते. काश्मीर मधे निसर्गाचा सन्मान केला जातो म्हणूनच "  भूतलावर स्वर्ग कुठे आहे तर तो इथेच आहे " असं ते अभिमानाने सांगतात......... पर्यावरण ' दीन ' होणार नाही यासाठी आपणही  खारीचा वाटा घेवु शकतो.   तुळस......... पूर्वी आणि आजही प्रत्येकाच्या घरी असतेच. तुळस औषधी आहेच पण ती तिच्या  परिसरातील डासांचा मुक्त  वावरही कमी  करते . मुख्य म्हणजे ती एक अशी वनस्पती आहे जी फक्त ऑक्सीजन (O2)वायु देत नाही तर ती ओझोन (O3) वायु देते. वातावरणातील ओझोन वायुचे प्रतल विरळ होत आहे आणि सूर्याची प्रखर किरणे  थेट पृथ्वीवर पडतात आहे.  ही  प्रखर किरणेच पृथ्वीचे तापमान वाढवण्यास कारणीभूत असतात. तेव्हा प्रत्येकाने आपल्या घरी, परसदारी जास्तीत जास्त तुळस लावली तरी पर्यावरणाला मदतच होणार आहे  .  आपल्या घरी तुळशीचे संवर्धन.... संगोपन केले तरी " पर्यावरण दिन " साजरा  होणार हे नक्की.

(C)सौ. अंजली मीनानाथ धस्के
पुणे,चिंचवड ३३

मुक्त


                आयुष्यात अनेक बंधन असतात..... कधी आपण स्वतः हून ती लादून घेतो, तर कधी आपल्यावर लादली जातात...... बंधनं झुगारून देत.... काही करण्याची मजा काही औरच..... प्रेम........ जेव्हा प्रेमात अपेक्षा येतात तेव्हा त्याचेही कधी कधी बंधन होते......
अशाच बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरूणीचे बोल..... या कवितेतून व्यक्त झाले आहे ....


*मुक्त*
तुजपासून दूर जाता
माझ्यात मी परतत आहे
पुरे कवटाळणे दु:ख आता
तुझे नसणे मना भावत आहे

विरहगाथा गात नाही
स्वातंत्र्यगीत गात आहे
तुजसाठी झुरणे नकोच आता
प्रेमात माझ्याच मी पडत आहे

नको जीवघेणा खेळ आठवणींचा
वास्तवात मी मजेत आहे
भूतकाळात रमणे नकोच आता
भविष्याशी नाते जोडत आहे

गुंता सुटत नाही भावनांचा
दोर सारे कापत आहे
जुने सारे मागेच सोडून आता
पुढे पुढेच मी जात आहे

तुझ्यावर विसंबुन न राहता
नवा मार्ग मी चालत आहे
माझ्या क्षमतांची ओळख आता
नव्यानेच मला होत आहे

ओझे नकोच बंधनाचे
मुक्त मी आज होत आहे
माझ्याच आकाशी मी आता
गगन भरारी घेत आहे

©️ अंजली मीनानाथ धस्के
पुणे, चिंचवड ३३



बदल

#बदल

मला आवड आहे निरीक्षण करण्याची..... मुद्दाम न करताही आपोआप ते होतं.... माझा नाइलाज आहे.

आज मी माझ्या मुलाला शाळेत नेत असतांना.... रस्त्यात लागणाऱ्या बस थांब्याने माझ लक्ष वेधल. खरं तर विशेष असं काहीच नाही.... एक आजी आपल्या नातवाला घेवुन शाळेच्या बसची वाट बघत होत्या. पण..... खूप पुढे गेल्यावरही माझ्या डोळ्यासमोर सारख हेच चित्र येत होतं.... काही... त.... वेगळ आहे. मनात परत त्याची उजळणी झाली...... (हे  सगळे विचार  मी परत घरी आल्यावर आले डोक्यात .... ड्राइविंग करतांना नाही 😅) आजी उभ्या.... त्यांच्या खांद्यावर नातवाचे दप्तर... नातू (बस थांब्या जवळच असलेल्या स्नॅक्स सेन्टर ची खुर्ची घेवुन )खुर्चीवर बसून आळस देतोय.....(सगळ्याच लहान मुलांप्रमाणे  सकाळी लवकर उठाव लागल्यामुळे झोप पूर्ण झाली नाही  याचं  ते लक्षण )
यात विशेष ते काय....... आणि एकदम मी भूतकाळात हरवून गेले. मी शाळेला  सिटी बस ने 50 पैसे देवुन तिकीट काढून जायचे. ( 😝माझ्या वयाचा अंदाज करत बसू नये.... कारण माझ वयं  वाढण्याचा वेग.. हा... महागाई वाढण्याच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे.)
सकाळची गर्दी त्यामुळे बसायला जागा मिळायची नाही. आणि अनेकदा मिळालेली जागा बस मधे चढलेल्या आजी किंवा आजोबांना द्यावी लागायची. कित्येकदा तर त्यांच्या साठीच बसमधे घाईने चढून,धक्काबुक्की करून जागा मिळवायचो.
आणि अचानक लक्षात आल.... काय वेगळ आहे.... आत्ता बघीतलेल्या आजी - नातवंड यांच्या जोडीमधे. खरं तर वय वाढल की शरीर थकत..... त्यामुळे खुर्चीत आजीने बसायला हवं आणि लहान मुल चंचल असतात.... नातवाने आजी भोवती बागडायला हवं. पण प्रत्यक्षात याच्या अगदी उलट दृश्य होतं. घरात मुलांवर दरारा ठेवणारे आजी आजोबा नातवंडांच्या बाबतीत मवाळ धोरण ठेवतात. कोणे एके काळी आपल्या मुलांना घरात पाहुणे आल्यावर टी. व्हि. बंद करून पाहुण्यांना बसायला जागा द्यावी असे दरडावणारे आई-बाबा... आज मात्र घरात मित्र मैत्रिणी आल्यावर  नातवंडाने बोललेले बोबडे बोल " आजी जरा हळू बोल... मला नोबीता काय म्हणतोय ते काहीच कळत नाही " हे निमूट पणे ऐकुन घेतात.... नातवंडाने टी. व्हि. चा आवाज वाढवला तर दुसराऱ्या खोलीत जाण्याची तयारीही दाखवतात.
स्वतःच्या मुलांच्या दप्तराचे ओझे कधीच न उचलणारे, वेळोवेळी मुलांना स्वावलंबनाचे धडे देणारे , मुलांचे कुठलेच फाजिल लाड न पुरवणारे आणि मुलांना (प्रेमळ )धाकात ठेवणारे आई वडील आज मात्र नातवंडांची अनेक छोटी मोठी कामे करतांना दिसतात.... त्यांचे लाड पुरवतांना दिसतात...
दूर कशाला जायच.... आम्हाला शिस्त लागावी म्हणून हातात कायम शस्त्र बाळगणारी माझी आई..... "मुलाला मारणे बरे नाही, प्रेमाने समजावून सांगत जा" असा समजुतीचा सल्ला देते. 😂 मी तिच्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली तर
" चांगले बदल हे स्वीकरलेच पाहिजे ".... असा प्रेमळ दम ही देते.
कुठल्याही बदलाचे चांगले वाईट  परिणाम हे दूरगामी असतात. आपल्या पुढच्या पिढ्यांवर ते दिसून येतात. त्यावरूनच ते बदल चांगले की वाईट ठरवता येते.
याही बदलाचे परिणाम मी आजी होईल तो पर्यंत मला कळतील  कदाचित....😅 आज्ञाधारक असलेली आपली शेवटची पिढी आहे असं आपण गमतीने म्हणतोच..... आजी आजोबांचा आदर युक्त धाक असणारीही आपली शेवटचीच पिढी असेल कदाचित.

©️ अंजली मीनानाथ धस्के
पुणे, चिंचवड ३३

बदाम

#बदाम

शिरा करून झाल्यावर बदामाचे काप घालावे म्हणून १०.... १२ बदाम हातात घेतले..... का... कुणास ठावूक मन भूतकाळात गेलं.( हातात काम असलं तरी डोक्यात विचार रूंजी घालत राहतातच  )

मी ५... ६ वर्षांची असेल ( तुम्ही म्हणाल की स्मरणशक्ती फारच दिसतेय.... तर काही प्रसंगच  असे असतात की ते विसरले जात नाहीत ) उन्हाळ्याचे दिवस होते. आम्ही सगळे अंगणात  झोपत असू. विदर्भातला उन्हाळाच तसा असतो. आम्ही.. आमचे घर मालक.... शेजारी सगळेच अंगणात झोपत असू.... फार मज्जा असायची.... झोपतांना गप्पांची मैफील रंगायची. असो....
तर अशाच एका दिवशी पप्पा पेपर तपासण्याचे काम करत बसलेले ( तेव्हा पेपर घरी द्यायचे शिक्षकांना तपासायला )... आई भरतकाम करत बसलेली.... आम्ही भावंड मजेत बाहेर  झोपलेलो. आई माझ्याजवळ आली आणि मला उठवून घरात घेवुन गेली. तिने हळूच एक कागदाची पुडी उघडली. त्यात १०... १२ बदाम होते. ( तेव्हा परीस्थिती अशी होती की गरजे शिवाय बदाम घरात आणून ठेवणं परवडत नसे. आज ही तसंच काहीस महत्त्वाच काम असणार असा मी अंदाज बांधला )जवळच दुधाची छोटी वाटी होती. आईने सहाण घेवुन त्यावर बदाम उगळायच काम सुरू केलं . सगळ झाल्यावर तो लेप तिने माझ्या हाता - पायाला... चेहऱ्याला लावला आणि जावून झोपायला संगितले. झोप इतकी आली होती की मीही निमूट जावून झोपले.
सकाळी उठल्यावरही मी काही तिला रात्रीबद्दल विचारलं नाही. ( मला एकटीलाच उठवल.... लेप लावला...म्हणजे नक्कीच आमच्या दोघींच गुपित आहे. हे मला जाणवलं आणि एकदाम भारी वाटलं )
दुसऱ्या दिवशीही असंच घडलं. तिसऱ्या दिवशी मात्र मी झोपायला गेलेच नाही. आईच्या मागे मागेच होते. माझी दोन्ही भावंड झोपल्यावर.... आई नेहमीप्रमाणे कामाला लागली. आज मात्र बदाम कमी होते कागदात. ते पाहून मी आईला विचारायला सुरुवात केली. " तू हे काय करतेस? का करतेस?" 
आई म्हणाली "बदाम चांगले असतात म्हणून उगाळते आणि तुला त्याचा   लेप  लावते." 
 मी... " चांगले म्हणजे कसे ग?" 
त्यावर ती.... " बदाम उगाळून लावली की त्वचा चांगली होते, रंग उजळतो." 
 पुन्हा मी... " अजून काय होतं?"
 त्यावर ती..." बदाम खाल्ले की बुद्धी तल्लख होते." 
 पुन्हा मी.... " मग तू मला बदाम खायला का देत नाहीस?.... माझी बुद्धी तल्लख होईल न खावुन...अंगाला का लावतेस? "
माझ्या भोळ्या प्रश्नावर ती एकदम बदाम उगाळायची  थांबली..... स्वतःशीच काहीतरी खोल विचार  केल्यासारखी वाटली.  मला तेव्हा  वाटलं... ती एवढं करते आहे..... आणि मी... नसते प्रश्न विचारत बसले . तिला वाईट वाटल असेल. पण झाल उलटंच. तिने राहिलेले ३... ४...बदाम आणि  उगाळत असलेला अर्धा बदामही धुवून  मला खायला दिले.सगळे बदाम संपवले म्हंटल्यावर नंतर कधी रात्री तिने मला उठवल नाही. हा प्रसंग खूपच छोटा पण माझ्या लक्षात राहिला कारण मला वाटायच की मी स्पेशल आहे. आई सर्वात अधिक प्रेम माझ्याच वर करते. ती मला झोपवतांनाही
" एका तळ्यात होती बदके पिले अनेक....." हे माझ्या आवडीचे गाणे म्हणायची. गाण्यातला  राजहंस तूच आहे असं सांगून मला एकदम खुश करायची.
पण मी जस जशी मोठी होत गेले मला कळत गेल की... ती त्या रात्री मलाच का लेप लावायची?  तिच्यावर  असलेल माझं प्रेम... आदर अधिक वाढत  गेला. तो तिने स्वतः शीच संघर्ष करून घेतलेला निर्णय आणि आजही ती त्यावर ठाम आहे यामुळेच....
      मी दोन्ही भावंडांपेक्षा थोडी सावळी.... ते दोघे गोरे. त्या काळी  ( खरंतर आजही ) मुलीच्या रंगालाच खूप महत्व. मुलगी सावळी म्हणजे हुंडा द्यावाच लागेल आणि तोही इतर मुलीं पेक्षा जास्तच... असा समज मुलीच्या आई वडीलांचा करून दिला जात होता . इच्छा नसतांनासुद्धा समाजाच्या ह्या भ्रामक कल्पनांना अनेक मुलींचे आई-वडील बळी जात होते. अवघ्या २५ व्या वर्षी तीन मूलांचे मातृत्व स्वीकारलेल्या माझ्या आईच्या मनातही काळजीने घर करणं  सहाजिकच होतं.त्याही वयात  परिस्थितीने विचारलेल्या प्रश्नांना ती सद्सद् विवेक बुद्धीने सामोरी जायची आणि त्यातूनच एक प्रगल्भ व्यक्तीमत्वाची स्त्री... आई    घडत गेली.  समाजात मुलीचा  रंगच बघितल्या जाणार..... म्हणून तिने परिस्थिती नसतांना... बदाम आणण्याचा... तो उगाळून लेप लावण्याचा घाट घातला खरा.... पण लेकीच्या प्रश्नाने लगेच अंतरमुख होवून.... बदाम लेप लावण्यापेक्षा... ते बदाम खावून बुद्धी तल्लख करणंच गरजेच आहे. या निर्णयापर्यंत पोहचण्याचा तिचा प्रवास... त्यात तिची झालेली घालमेल, समाजाच्या गैरसमजांना बळी न जाता आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीर उभे रहावे लागणार.. याची जाणीव.... हे सगळ मी त्या क्षणी तिच्या डोळ्यांत पाहीलं होत.  ( त्याचा अर्थ कळायला बरीच वर्षे जावी लागली हा भाग वेगळा )
           आजही अनेक छोट्या मुलींच्या वाढदिवसाला मी जाते.  तेव्हा आपली मुलगी छान दिसावी  म्हणून आई मुलीला  छान फ्रॉक तर घालतेच पण तिच्या मुळातच नाजुक असलेल्या ओठांना....गरज नसतांनाही लिपस्टिक लावते. तेव्हा आत खूप खोल  काळीज कुठेतरी   तुटतं. टेलिव्हिजन वर अनेक जाहिराती आजही गोरा रंग कसा श्रेठ.... हेच आपल्या मनावर ठसवतात. त्यात भर म्हणून आता मुलांच्या ही मनात गोऱ्या रंगाचे महत्त्व जागृत करून त्यांच्यासाठीही अनेक सौंदर्य प्रसाधने  बाजारात उपलब्ध करुन दिली आहेत . ( या गैरसमजातही स्त्री-पुरुष समानता आली हाच काय तो आनंद )
लहानपणी मला भांडणात " डोंबडी " म्हंटलं की मी हमखास रडत असे. ( विदर्भात काळ्या-सावळ्या मुलीला डोंबडीच म्हणतात.) माझे वडील मला समजावून सांगायचे..." सुंदर व्यक्तीकडे आपण एकदा... दोनदा.... तीनदा वळून बघू पण ज्या व्यक्तीचे रूप तिच्या कर्तुत्वाने उजळून निघालेले असते तिच्या वरून आपली नजर हटत नाही. रूप आपल्या हाती नाही पण कर्तुत्व आहे. तेव्हा तुझं तू ठरव... रडत बसायच की कर्तुत्व घडवायच." मला ते पटायचं आणि मी रडायचं थांबायचे.  रंगाचा विषय निघाला की आमचे घर मालक 'लोखंडे काका' आणि माझी मोठी मावशी यांच एकच मत असे.... ते माझ्या आई - वाडीलांना सांगत " आत्ता तुम्ही तिच्या भविष्याच टेन्शन घेताय खरं पण भविष्यात तीच टेन्शन तुम्हाला कधीच नसणार." या आणि अशा अनेक  गोष्टी  मला आत्मनिर्भर बनवत गेल्या. आरस्या समोर उगाच दुख: करत बसण्यापेक्षा अनेक छंद मी जोपासले... त्यात रमले. सौंदर्य सगळ्यांनाच आवडतं..... प्रत्येक व्यक्ती सुंदर असते... फक्त बघणाऱ्यांना तशी दृष्टी हवी. स्वतःला कळले की आपण कशात सुंदर आहोत तर आपल्यालाही आपल सौंदर्य खुलवता येत. पण काही गैरसमज आपल्या इतके अंगवळणी पडले आहेत की ते चूक... की....बरोबर हे पडताळूनही बघीतले जात नाही. सौंदर्याचे ढोबळ निष्कर्षच आपण पळतो.... त्यांना पात्र ठरण्यासाठीच धडपडतो..... ते बदलण्यासाठीचे  प्रयत्न मात्र कमी पडतांना दिसतात. असो..... शिरा खावुन झाल्यावर आईने दिलेल्या बदामाने आपली स्मरणशक्ती काही बाबतीत ( म्हणजे अभ्यास सोडून इतर  ) अधिक तीव्र झाली आहे आणि त्यातूनच असं अचानक भूतकाळात हरवून जाण्याचा आजार जडला असावा अशी कल्पना मनात येवुन मी गालातल्या गालात हसूनही घेतलं आणि धन्यवादही  दिले... आई - बाबांना आणि माझ्या आयुष्यातील  त्या प्रत्येक व्यक्तीला जिने माझ्या दिसण्यापेक्षा .... माझ्या असण्याला महत्व दिले.
( नेहमीप्रमाणे सोबतीला मी काढलेली रांगोळी ही आहे)


©️ अंजली मीनानाथ धस्के
पुणे 

टिप: लिखाण आवडल्यास नावा सहित शेयर करावे. आपला अभिप्राय अनमोल आहे तेव्हा प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. 

गंमत जंमत

#कॉलेज
#गंमतजंमत

११ वीत प्रवेश म्हणजे अनेक चांगल्या वाईट (वाईट.... अभ्यासाच्या बाबतीत फक्त 😝)अनुभवातून शहाणपण घेण्याचा काळ... शाळेच्या शिस्तीतुन मुक्त होण्याचा काळ.... आपल्याच आकाशात उंच भरारी घेण्याचा काळ.... मैत्रीच्या व्याख्या थोड्या बदलण्याचा काळ..... थोडक्यात सांगायचे तर   आयुष्यातील सुवर्णकाळ.( अभ्यासू विद्यार्थ्यांच माहीत नाही.... मी...माझ्या सारख्या सामान्य विद्यार्थिनींबद्दल सांगते आहे.)
विदर्भ महाविद्यालय परिसर अतिशय रमणीय.... वर्ग खोल्या भव्य....  आसन व्यवस्था नाट्यगृहासारखी... परिसरातील बाग तर बघण्यासारखीच. ( त्यामुळे वर्गापेक्षा... वर्गा बाहेरच मुल जास्त उपस्थित असायची ). मला परिसर.. बाग.. वर्ग.. काहीच नवीन नव्हतं.... बालपणापासून ह्या परिसरातच वावरले, वाढले . त्यामुळे नवीन परिसरात  बावरल्या सारख  ,लाजल्या सारख  होत तस कधीच माझ्या बाबतीत घडल नाही. उलटं मी खूप बिनधास्त, रोखठोक वागायचे. ... मला  नवीन होतं  ते शाळेतून बाहेर पडल्यानंतर  मिळालेलं  स्वातंत्र्य आणि अभ्यासक्रम... असो.....
प्रात्यक्षिक असतांना...आमच्या वर्ग खोल्यांकडून प्राणी शास्त्र विभागाच्या प्रयोग शाळेकडे जायचे असेल तर खूप मोठं  मैदान ओलांडावे लागत असे. ह्या मैदानाला लागून डांबरी रस्ता होता, पण त्याच्या  दुसऱ्या
 बाजूला मुलांचे  वसतिगृह होते. म्हणजे  मैदान आणि वसतिगृहाची लांबी जवळ जवळ सारखीच होती. वसतिगृह दोन मजली होते.
असंच एके दिवशी सकाळी प्राणी शास्त्र विभागाच्या प्रयोग शाळेकडे जायचे असल्याने आम्हा मुलींच ठरत नव्हतं... की... कसे जायचे.... हिवाळ्याचे दिवस असल्याने ऊन खात मैदानातून जाण्याचं ठरल. आम्ही गप्पा मारत निघालो... तेवढ्यात आमच्या पायाशी... काहीतरी चमकत होतं आणि ते आमच्या सोबत पुढे पुढेच येत  होतं.... थोड थांबून शोध घेतल्यावर लक्षात आलं की... हा प्रकाश वसतिगृहातील दुसऱ्या मजल्यावर दाढी करणारऱ्या एका मुलाच्या आरस्यातून मुद्दाम निर्माण केल्या जात आहे. त्याचा हा उद्योग बघून आधी खूप राग आला पण सर्वानुमते दुर्लक्ष करण्याचे ठरले. आम्ही चालण्याचा वेग वाढवला. आता तर त्या मुलाला जास्तच उत्साह आला. तो  मोठ्याने गाणं  ही म्हणायला लागला. " बदन पे सीतारे लपेटे हुवे... ओ जाने तमन्ना कहा जा रहे हो "  बेसूर अस गाणं  आणि आमच्या पायात नाचणारा   प्रकाश.... त्याचं  सुरूच.... आम्ही वेग अजून थोडा वाढवला. एकतर तो पूर्ण गाणं  गात नव्हताच... एकच ओळ पुन्हा पुन्हा म्हणत होता ( जणू काही आम्हालाच प्रश्न विचारत होता " कहा जा रहे हो?)... त्यात भर म्हणून त्याने आवाज थोडा अजून वाढवला. त्याच्या आवाजाने  इतर खोल्यांमधली मुलंही बाहेर आली आणि त्याचा हा उद्योग बघू लागली. प्रेक्षक मिळतात आहे म्हंटल्यावर त्याचा उत्साह द्विगुणीत झाला. आता प्रयोगशाळाही जवळ आली होती. प्रयोगशाळेचा दरवाजा उघडलेला  होता त्यावरून मी अंदाज केला की आमचे प्राध्यापक प्रयोगशाळेत आलेले आहेत. माझी हिम्मत वाढली मी माझा चालण्याचा वेग कमी केला. माझ्या मैत्रिणी माझ्या  चार पाऊले पुढे गेल्या.... तशी मी थांबले.... त्याने लगेच " बदनपे सितारे लपेटे हुवे.. ओ जाने तमन्ना कहा जा रहे हो  " अस पुन्हा मोठ्याने गायल.... मग मीही त्याच्याकडे रागाने बघीतल आणि ओरडले..." मसणात जाते आहे... यायच आहे? " त्यावर तो गडबडला... इतर मुल त्यावर हसायला लागली. तोही मग दिलखुलास हसला आणि म्हणाला " इतक्या लवकर नाही जायच आहे मला... तुम्ही जरा घाईत दिसताय तुम्ही जा पुढे.... "  त्यावर मी.... " मगा पासून जीव तोडून  विचारताय.... बघा आवरल असेल तर चला." त्यावर तो.... " नाही नाही " अस म्हणतच त्याच्या खोलीत गेला. मी ही प्रयोगशाळेत आले . बघते तर काय  माझ्या मैत्रिणी पोट धरून हसत होत्या. खूप हसलो सगळ्याजणी.... प्रयोगशाळेच्या बाहेर पडतांना थोडी भीती वाटत होती. परंतु   पुन्हा असं  घडल नाही. तो क्षण मात्र आमच्या लक्षात राहीला.
तेव्हा मुल टूकार जरी असली तरी त्यांची दहशत,भीती नव्हती. असे अनेक प्रसंग घडले तरी त्याबद्दल कोणाच्याही मनात अढी नसे. मुल आणि मुली..सहज प्रतिक्रिया म्हणून अशा प्रसंगांचा स्वीकार करत होती. त्यातून निर्माण होणाऱ्या  निखळ विनोदाचा आनंद घेण्याची प्रवृत्ती सगळ्यांमधे होती. असे प्रसंग लक्षात ठेवून... नंतर त्यावर अधिक तीव्र  प्रतिक्रिया द्यावी असं मुलांच्या डोक्यातही येत नसे. वेळ प्रसंगी गरज लागलीच तर  ही मुलंच निस्वार्थ भावनेन मदत करायला तयार असायची.  "तुला नंतर बघून घेईन" असे शब्द त्यांच्या तोंडी कधीच यायचे नाहीत.  आता मात्र भीती वाटते कोणाला काही बोलायची. आज काल सूड बुद्धीतून अनेक वाईट प्रसंग घडतात. शुल्लक कारणावरून टोकाची भूमिका घेण्याची वृत्ती दिसून येते. आजही  मुलामुलींमधे बिनधास्तपणा जाणवतो पण असे प्रसंग सहजतेने स्विकारण्याची वृत्ती .... त्यातील निरागसता ...   मात्र हरवली तर नाही न? असा प्रश्न मनात येवुन जातो.
 ©️ अंजली मीनानाथ धस्के

टिप: मी काही पट्टीची लेखिका नाही . ज्या प्रसंगांनी मला काही तरी शिकवलं ... किंवा आठवीत राहिले ... ते लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून प्रसंग चांगले अथवा वाईट  जसे घडले तसे स्वीकारून .... माझ्या लिखाणातून तसेच ते व्यक्त करण्याचा व त्यातून काही तरी शिकण्याचाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो.  तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com

एक नाते असेही

#बाई
#एकनातेअसेही
©️अंजली मीनानाथ धस्के
         शाळेचा पहिला दिवस असल्याने मी आनंदात होते. नवीन दप्तर, डबा, गणवेश ... या सगळ्यामुळे अगदी भारी वाटत होतं . आपल्या भावंडांप्रमाणे आता आपल्यालाही शाळेत जायला मिळणार, नवीन गोष्टी शिकायला मिळणार याचा खूप आनंद होता.
(वयाच्या पाचव्या वर्षी) मला  प्राथमिक शाळा  खापर्डे बगीचा, अमरावती  इथे  बालवाडीत प्रवेश मिळाला होता. (नशीब चांगल होतं म्हणून  आता सारखं  वयाच्या दुसऱ्या  वर्षीच प्ले ग्रूपला प्रवेश घेणं  तेव्हा तरी शक्य नव्हतं .)  आज खास मला शाळेत सोडवायला  वडील येणार होते. ते आलेही.... मला शाळेच्या फटकापर्यंत सोडलं . शाळेतील (कर्मचारी ) मावशीने वडीलांना घरी जायला सांगितलं..... वडीलांनी मला आवश्यक त्या सूचना देवुन "टाटा" ही केलं. त्या क्षणी..... आता आपण आईच्या मायेच्या पंखाखालून बाहेर पडतोय....आणि  दुसऱ्या....  कडक शिस्त असलेल्या जगात प्रवेश करतोय, या भावनेन रडू कोसळलं. वडीलांचा पाय निघेना... माझं रडू अजून वाढलं . आता आमच्या वर्ग शिक्षिका (वारकरी बाई.... मँम, मिस, टीचर  हे आत्ताच वळण तेव्हा मात्र मराठी माध्यम असलेल्या शाळेत  वर्गशिक्षिकेला  आदराने बाईच म्हणायचे .)बाहेर आल्या,  मला हाताला धरून प्रेमाने वर्गाकडे नेलं . माझ्या वडीलांना  घरी जाण्याची खूण केली. मी मोठ्या मोठ्याने रडायला लागले. वर्गात सगळीच मुल शांत होती. आपापल्या  आसनावर बसलेली  होती. माझं रडण बघून अनेकांचे चेहरेही  रडवेले 😅झाले . मी  वर्गातून वडील दिसत होते त्या  जाळीकडे धाव घेतली.  त्यांना खूप खूप आवाज दिले. बाई त्यांना जायला सांगतच होत्या. शेवटी मनावर दगड ठेवून ते घरी गेले. आता रडून काही फायदा नाही... वेळ झाल्याशिवाय काही घरी जायला मिळणार नाही ह्या जाणीवेतून  मी गप्प झाले. इतर मुले रडू नये म्हणून आमच्या बाई छान बडबड गीते म्हणत होत्या... खेळ घेत होत्या... सगळ्यांशी प्रेमाने वागत होत्या... सगळ्यांना नावे विचारत होत्या... काय आवडतं ते जाणून घेत होत्या . धीट मुलांना वर्गापुढे बोलवून आवडीचे  गीत किंवा गोष्ट सांगायला देत होत्या.  मलाही बोलावण्याचा खूप प्रयत्न केला. मी काही जागचे हलले नाही. सगळ्यांनी अंगत  पंगत करून.... "वदनी कवल घेता..." म्हणून डबेही संपवले. मी मात्र  एकटीनेच कोपऱ्यात  बसून डबा कसातरी  संपवण्याचा प्रयत्न केला. आवडीचा मेनू असूनसुद्धा  माझं  खाण्यात अजिबात लक्ष नव्हतं .  शाळा सुटली तसे मी वर्गा बाहेर धाव घेतली. वडील होतेच बाहेर..... ( एक-दोन दिवसात रूळेल शाळेत असं बाई पप्पांना  सांगत होत्या ). उद्या शाळेत यायचच नाही असा निर्धार मी पक्का  केला होता. लगेच घरी गेलो. आई ने खूप लाड केले. "रडायचं नाही, खूप मजा करायची, नवीन मैत्रिणी बनवायच्या , बाईंच सगळं  ऐकायचं " असं  समजावलं.  माझी आई शिक्षिका होती परंतु आमचा संभाळ करण्यासाठी तिने नोकरी सोडली होती. तिची शिकवण्याची हौस ती आम्हाला शिकवून पूर्ण करायची.
त्यामुळेच की काय उरलेल्या दिवसभरात तिने हजार वेळा तरी.... " उद्या काय देवु डब्यात? ", "पप्पा उद्याही येणार आहे शाळेत ".... " रिक्षा लावल्यावर तर तूला अजून मजा एईल ".... "आता तुलाही लिहायला, वाचायला शिकवणार."  अशी निरर्थक बडबड केली. ( उद्या शाळेत जावेच लागणार हेच ती माझ्या मनावर ठसवू पहात होती.) माझा विरोध आणि निर्धार दोन्ही निकालात काढून... पुन्हा दुसऱ्या दिवशीही  मला शाळेत सोडण्यात आलं. माझ्यात सुधारणा अजिबात नव्हती. तिसरा दिवसही नको असतांना उगवलाचं. आता मात्र मी माझ्याच
निर्धाराला कंटाळले. सगळ्या मुलांमध्ये जावून बसले. गाणी गायीली... खेळ खेळले... वर्गापुढे कविता आणि गोष्टही म्हणून दाखवली. बाईंनी खूप कौतुक केलं . ( शाळा आणि  बाई  एवढ्याही  काही वाईट नसतात असं  जाणवलं आणि हायस वाटलं  ) दोन-तीन दिवसांनी...आता मुल वर्गात रमली असं  बघून बाईंनी बाराखडी शिकवायला सुरुवात केली. मला आईने आधीच शिकवल्यामुळे बाराखडी लिहिण्यात अजिबात  रस नव्हता . मला पुढचे शिकण्याची घाई होती.
अचानक डोक्यात शब्द बनवण्याची कल्पना  आली. मी फळ्यावर लिहिलेल्या अक्षरांच निरीक्षण केलं. तुटपुंजे ज्ञान आणि बालबुद्धी.... माझं सारं विश्वच ज्या शब्दात होतं.... तोच शब्द सुचला.... " आई ".
      मी पाटीवर बाराखडीतली दोनच अक्षर लिहिली..... "आ ई ".  स्वतःवरच खूष झाले. तेवढ्यात बाई आल्या.... थोड्या रागावल्या.... "दोनच काय गं  अक्षर काढली? बाराखडी लिहावी. बाकी मुल बघ कसं  शहाण्यासारखी लिहितात आहे."  माझ्या डोळ्यात पाणी आलं.... मी म्हणाले " हे तुमच्यासाठी मी मुद्दाम लिहिलं  आहे." त्यावर त्या म्हणाल्या.... "अग म..... 'ब 'ला काना ' बा' ... आणि ' ई '  .... "बाई" असं  लिहायच.   पुढे मी काना, मात्रा... अ.. ब... क... शिकवणार आहे. तेव्हा एईल लिहायला. घाई नको करू. बाराखडी लिही आधी." (  लहानपणापासून जिद्दी आहे मी😁.... माझा मुद्दा काही मी सोडला नाही.)  मी म्हणाले..... " बाई तुम्ही मला माझ्या आईच वाटता, एक आई घरी काळजी घेते... एक शाळेत... असंच वाटतंय मला.... म्हणून.... हा शब्द तुमच्यासाठीच आहे..... " "आ ई ". "   आता मात्र त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं..... त्यांनी माझा पापा घेतला पटकन.... "आपण वर्गात आहोत तेव्हा सगळ्यांसोबत बाराखडी लिहिली पाहिजे " अशी प्रेमळ समजही दिली. पापा मिळाला म्हंटल्यावर मीही पाटीवर बाराखडी गिरवली. इतर मुलं... मी असं  काय लिहिलं की मला बाईंचा पापा मिळाला याचा विचार करत होती.... पाटीवर 'आ' आणि 'ई ' ही दोनच तर  अक्षर होती. त्यांना आणि मलाही तेव्हा काही कळले नाही की विशेष काय घडलं होतं . कळल होतं ते फक्त आमच्या "बाईंना". चौथी पर्यंत त्याच वर्ग शिक्षिका होत्या. सुदैवाने तेव्हा तशीच पद्धत होती. एकच शिक्षिका सगळे विषय शिकवायच्या आणि एकदाका बालवाडीपासून सुरुवात केली तर चौथीपर्यंत त्याच वर्गशिक्षिका राहायच्या.
              मुळातच त्यांचा स्वभाव प्रेमळ.... मुलांना कधीच मारायच्या नाहीत.... समजत नाही तोपर्यंत समजावून सांगत.... कोणी गैरहजर असल्यास  त्याला इतरांच्या  बरोबर आणण्याचा प्रयत्न करत.... या आणि अशा अनेक गोष्टींमुळे त्यांच्या बाबतीत माझी असलेली  " आई "  ही संकल्पना सार्थ ठरली. बोर्डाची परीक्षा होती आणि माझ्या आजीने जगाचा निरोप घेतला. घरचे गावी जायला निघाले तेव्हा माझं वर्ष वाया जावू नये म्हणून बाईंनी मला त्यांच्या घरी ठेवून घेतलं . अभ्यास तर करून घेतलाच पण परीक्षा ही द्यायला लावली. त्यांच्या घरचेही तितकेच चांगले. शाळा बदलल्यावरही रविवारी आमचा काही  मुल-मुलींचा गट  त्याच्या घरी जात होतो. नवीन शाळेतील अनुभव त्यांना सांगत होतो. भरपेट  गप्पा आणि जेवण  दोन्हीचा आस्वाद घेत होतो . आजही त्यांच्याशी फोनवर बोलतांना मन त्यांच्याबद्दल असलेल्या आदराने...... स्नेहाने भरून येतं.
        आज मात्र प्रत्येक विषय शिकवायला वेगळ्या शिक्षिका....दर वर्षी  वर्गशिक्षिका ही वेगळ्या... एवढं  कमी म्हणून की काय.... वर्गातली मुलंही दर वर्षी बदलतात. यामुळे म्हणे 😭मुल सगळ्या परिस्थितीत जुळवून घ्यायला शिकतात. वर्षभरात जेमतेम शिक्षिका आणि मुल एकमेकांना समजून घ्यायला शिकतात तेवढ्यात पुन्हा सगळं  बदलतं.
      वर्षानुवर्षाच्या मैत्रीतील जादू ...... घट्ट होत जाणारी गुरु शिष्य  नात्याची वीण.....आपल्या पेक्षा जास्त आपल्याला, आपल्या क्षमतांना ओळखणारे शिक्षक..... शाळेच्या वेळे पुरतेच  जिव्हाळ्याचे संबंध मर्यादित नसून शाळेबाहेर ही उपयोगी पडतील असे मार्गदर्शन करणारे शिक्षक..... स्वतःच्या वागणुकीतून आदर्श शिकवणारे शिक्षक..... विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे जपणारे शिक्षक..... विद्यार्थ्यांच्या मनात प्रेम, आपुलकी... आदर निर्माण करणारे शिक्षक....   आजच्या पिढीला हे सगळे अनुभव दुर्मिळ तर होणार नाहीत न ? अशी शंका मनात घर करून जाते.
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे. इतर लिखाण आशयघन रांगोळी या ब्लॉगवर उपलब्ध आहे.
रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
https://youtu.be/Ev9Dwu1AAwQ


पिरियड्स

# पिरियड्स

               खर तर चार चौघात हा शब्द वाचला, ऐकला... तरी थोडं संकोचल्या सारखं वाटतं. टी. व्हि. वरची जाहिरात बघून माझ्या मुलाच्या मनात अनेक प्रश्न घोळ घालत होते. त्याच वयच असं आहे की प्रश्न पडला.... की  उत्तर हवेच.  निरीक्षण करून  बऱ्याच गोष्टींची नोंद घेवुन मगच तो प्रश्न विचारतो...... त्यामुळे त्याने काय काय नोंदी घेतल्या हे आधी माहिती करून घ्यावे लागते. उत्तर द्यायचे म्हणून दिले की पुढे अनेक प्रश्न अंगावर येतात.
  " मम्मी पिरियड म्हणजे काय ग ?"...... इथून सुरुवात झाली. मी कामात होते.... " नियमित आणि ठराविक वेळेसाठी एखादी गोष्ट करणे म्हणजे पिरियड... याचं उदाहरण म्हणजे... गणिताचा, इंग्रजीचा पिरियड असतो न रोज तुझ्या शाळेत."    त्यावर वैतागुन लगेच तो, " अग ... हे माहिती आहे..... ऍड मधे ते जे सांगतात त्या बद्दल विचारतोय  मी." ( आता मात्र त्याला काय काय माहीत आहे हे जाणून घेणे आवश्यक होते. ).... नको त्या विषयावर इतक्या लवकर बोलावे लागणार ही अस्वस्थता लपवत, वरवर शांत असल्या सारखे भासवले. अगदी निरागस पणे विचारले, "कोणती जाहिरात रे?" त्यावर तो  "अग ती मोठ्यांच्या हगीस ची ऍड येते न ती " मी हसल्या सारखे केले " मोठ्यांच हगीस?" ... त्यावर लगेच तो.... " अग बेबी हगीस ची ऍड येते, आजोबांच्या हगीस ची ऍड येते.... आणि एका मुलीच सिलेक्शन का काय असतं... आणि तिची आई म्हणते आता कसं  करायच.... आणि " पिरियड्स की चिंता छोडो " अशी काही तरी ऍड येते न.... तू नाही बघत का?" "अच्छा ती.....होय "... मी (साळसूदपणा दाखवण्याचा अभिनय केला )  .   " मम्मी बेबीला टॉयलेट ट्रेनिंग देता येत नाही म्हणून त्यांना हगीस घालतात. आजी आजोबा आजारी असले की त्यांना हगीस घालतात. ( मी....लो....बी.पी. मुळे ऍड्मिट झाले तेव्हा माझ्या शेजारच्या  बेडवर आजी होत्या. आजीला ऍडल्ट डायपर  (हगीस )घालायच्या आहेत. सगळ्यांनी बाहेर थांबा असं  नर्स म्हणाली होती. अरे देवा त्याचीही नोंद घेतली का ह्याने.) पण मोठ्यांना टॉयलेट ट्रेनिंग देता येत मग त्यांना कशाला पाहिजे हगीस? आपल्या घरातही ते हगीस मी बघीतले आहे? ते कशाला? " ( देवा.... याच्या नजरेतून काहीच कसं  सुटत नाही.) आता मात्र खर सांगणं भाग होतं. ( मुलगी असती तर सोपं गेल असत सांगायला.....   असं  वाटून गेलं .... दोघींचे शरीर सारखेच....... याला अजून गर्ल आणि बॉय मधला नेमका फरक माहीत नाही.   कसं  सांगू आता?.... आवघड आहे सगळं  )
          तेवढ्या त्याचं अजून एक निरीक्षण  " त्या ऍड्मधे फक्त मुलीच का असतात ग?. "
 आता बोलण्याची......  समजावून सांगण्याची माझी वेळ.....  मन घट्ट केलं आणि शक्य तितकंच तरी खरं  सांगण्याचा निर्णय घेतला...... " त्या हगीस मुलीं ( बायकां )साठीच असतात म्हणून ऍड्मधे त्याच असतात  . बेबी कोणाला होतं?.... गर्ल्स ला.... म्हणून त्या खूप स्पेशल असतात. त्यांची शरीर रचनाही तशीच खास असते.  मोठ झाल्यावर स्वतःच्या शरीरात अजून एक जीव त्यांना सांभाळता यावा म्हणून त्याच्या शरीरात ( पोटात )एक स्पेशल जागाही असते. माझ्याही आहे.... म्हणून तर तू आला न माझ्या आयुष्यात. "     त्यावर तो "बेबी तर लग्न झाल्यावर होतं न?.. मम्मी आणि पप्पा दोघे "आम्ही बेबी सांभाळाय तयार आहोत"  असं देवाला सांगतात... मग देव ठरवतो न.... बेबी द्यायचं की नाही त्यांना.  "  (हे  फार पूर्वी सांगितलं होतं मी त्याला.... त्याच्या वयाला ह्या पेक्षा चांगल सांगणं मला तेव्हा तरी शक्य नव्हतं.)
            "हो रे..... पण बेबी हवय अस नुसता सांगून होतं नाही. त्यासाठी मम्मी आणि पप्पा फीजिकली स्ट्रौंग असायला हवे. त्याची तयारी आमचं शरीर खूप आधी पासून करतं. बेबीची खोली आईच्या पोटात असते. ती खोली कशी आहे? यावर पण खूप काही अवलंबून असते. आपण आपले घर कसे स्वच्छ ठेवतो.... तशी ही खोलीही स्वच्छ ठेवावी लागते आणि ही स्वच्छता आमचं  शरीर स्वतः करतं , स्वतः ठरवतं..... स्वच्छतेची  सुरूवात  कधीपासून करायची . आमच्या हाती काहीच नसतं. आम्ही फक्त सुदृढ राहण्याचा प्रयत्न करायचा. बाहेरून स्वच्छ होण्यासाठी आपण  आंघोळ करतो  पण आतली स्वच्छता....हे आमचं  शरीर ठरवतं. नक्की कधी हे काम सुरू होणार याचा पक्का अंदाज आम्हाला नसतो. बाहेर जायच आहे, नोकरीवर जायच आहे..... अनेक काम असतात. म्हणून मग या हगीसचा शोध लागला. त्यामुळे आमचे बरेच त्रास कमी झाले. "   त्यावर तो.... " त्रास होतो म्हणजे नक्की काय ग? तुलाही त्रास होतो? "     मी.... " त्रास म्हणजे चीडचीड होते, हात पाय  दुखतात, कंबर दुखते...असंच काही होत.... मलाही होतच की... मी काही वेगळी थोडीच आहे. "  त्यावर तो...   "आतून स्वच्छ कसं  करत ग तुमच शरीर तुम्हाला?"   (  चार दिवसापूर्वी माझा घोलाणा फुटला होता.... नाकातून रक्त आले..... तो हे बघून घाबरला होता.... तेव्हा घाण रक्त आहे... उष्णता वाढली की ते आपोआप येते असं  समजावून सांगितलं होतं. त्याचाच आधार घेतला )... " अरे.... शरीरातल्या भागांना  नको असलेले घाण रक्त शरीराबाहेर टाकले जाते. परवा तू बघीतलं अगदी  तसंच "..... त्यावर तो....  "  पण मग ते हगीस का लागते ? ते कसे वापरता? त्रास वाटतो का  त्याचा?  "
 त्यावर मी " पिण्याच्या भांड्याला  तोटी कुठे असते?"   तो.... " सगळ्यात खाली." मग मी..... "का?".... त्यावर तो....  " भांड्यातले सगळे पाणी आपल्याला मिळावे म्हणून ". त्यावर मी.... " अगदी बरोबर.... आमच्या शरीरालाही अशीच रचना दिलेली असते, चांगल्या प्रकारे शरीर आतून स्वच्छ होण्यासाठी . दर महिन्यातल्या चार-पाच दिवसच ही स्वच्छता चालते बाकी दिवस आराम असतो. स्वच्छता सुरू झाली की थांबवणं आमच्या हातात नसतं. म्हणून मग आम्ही हे हगीस त्या चार-पाच दिवसात वापरतो. त्यामुळे रोजची कामे करणं आम्हाला सोपं जातं . या चार-पाच दिवसांच्या कालावधिलाच पिरियड्स असे म्हणतात. त्यासाठीच आम्ही या हगीस वापरतो. त्याचा त्रास होतो पण शरीर आतून स्वच्छ राखण्यासाठी  सहन करतो.असे अनेक त्रास मुली, आम्ही बायकां आनंदाने सहन करत असतो. म्हणून मुलींचा ,
स्त्रियांचा  नेहमी आदर करायचा असतो . " बेबीसाठी जास्तीत जास्त त्रास तुम्हालाच का आहेत . बॉइजला काहीच नाही का? "  अशी निरागस हळहळ व्यक्त करून तो खेळायला गेला आणि माझा जीव भांड्यात पडला.
 ( ठरवून काहीच संगीतलं नाही.... तेव्हा जे सुचलं... योग्य वाटलं .. तेच सांगितले. त्याच्या शब्दकोशात जे शब्द आहेत तेच वापरले आहेत. )
आता सनी लीओनी ची ऍड तर त्याने बघितली नसेल ना? असा विचार मनात आला आणि धस्स झालं. पुढे काय प्रश्न येणार आहेत.... त्या परमेश्वरालाच माहीत.
देव मला ( समजावून सांगण्याची ) सद्बुद्धी देवो.

इवल्याश्या रोपा प्रमाणेच  बालमनही कोवळे असते . त्यांना योग्य संस्काराचे खत, विचारांची मशागत.... शिस्तीचे ऊन.... आणि मायेची फुंकर घातली तरच  रोपाचे वृक्ष होईल.

 ©️अंजली मीनानाथ धस्के
पुणे,चिंचवड ३३