कथा मालिका : व.नि.ता ( भाग ३)
विषय: कौटुंबिक कथा
भाग ३:
©️Anjali Minanath Dhaske
प्रसादला कामानिमित्त दहा दिवस बाहेर गावी जायचे होते परंतू वनिताला प्रतीकसोबत एकटीला रहाणे जमेल का? याची चिंता त्याला सतावत होती. वनिताने त्याला कंपनी कोणत्या कामासाठी व कुठे पाठवत आहे ? नक्की किती दिवसांसाठी पाठवत आहे? असे प्रश्न विचारले तेव्हा त्याने उत्तर द्यायचे सोडून वनिता सारखी संशय घेते म्हणत भांडण उकरून काढले. तो घरात नीट बोलेना झाला. नेमका तेव्हाच वनिताचा लहान भाऊ संदीप नोकरीच्या मुलाखतीसाठी वनिताकडे रहायला आला. तो रहायला आल्यावर प्रसादने त्याचे हसून स्वागत केले व त्यालाच दहा बारा दिवस राहण्याचा आग्रह केला. संदीप रहायला तयार झाल्यावर वनिताशी एक शब्दही न बोलता प्रसाद बॅग घेवून घराबाहेर पडला. वनिताचे फोनही तो घेत नव्हता. संदीपला मात्र रोज फोन करून ख्यालीखुशाली विचारत होता. वनितापेक्षा संदीप वयाने लहान म्हणुन त्याच्याजवळ मन मोकळे करता येत नव्हते. प्रसाद भांडण करून घराबाहेर पडला होता हे तिला उघडपणे भावाला सांगता येत नव्हते. प्रसादचे विचित्र वागणे सहन करणेही अवघड जात होते. तिची नुसती घुसमट होवू लागली. या उलट भाऊजींना आपल्या बहिणीची किती काळजी आहे याचे कौतुक तिच्या भावाला वाटत होते. तसे तो घरी आईवडिलांना फोन करून कळवत देखील होता.
अखेर प्रसाद दहा बारा दिवसांनी परत आला. तो आल्यावर वनिताला बरे वाटले. त्याने येतांना प्रतीकसाठी बरीच खेळणी आणली होती. भावासोबत पाठविण्यासाठी म्हणून भरपूर मिठाई आणली होती. त्याचे असे वागणे पाहून आपलेच काहीतरी चुकते आहे का? असे वाटून प्रसादचा राग घालवण्यासाठी तीने स्वतःहून त्याची माफी मागितली. त्यानेही तिला मोठ्या मनाने माफ केले. दुसर्या दिवशी संदीप गावी निघून गेला. प्रसादही प्रतीकला घेवून बागेत फिरायला गेला. वनिताने घर आवरायला घेतले तसे तिला प्रसादने खेळणी व मिठाई आणलेल्या कपाडी पिशव्या दिसल्या. प्रत्येक पिशवीवर मोठ्या अक्षरात दुकानाचे नाव होते व त्याखाली बारीक अक्षरात पत्ता होता. पत्ता वाचल्यावर वनिताला लक्षात आले की मिठाई व खेळणी दोन्ही गोष्टी याच शहरातील दुकानातून विकत आणल्या आहेत. मग काल प्रसादने ती मिठाई खास बाहेर गावाहून आणलेली आहे असे संदीपला का सांगितले होते? संशयाने तिला पुन्हा एकदा घेरले.
खरं तर तिला तिच्या अनेक प्रश्नांची उत्तरे हवी होती. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रसाद देणार नाही याची तिला खात्री होती. या प्रश्नांची उत्तरे तिची तिलाच शोधायची होती. कटकट ,भांडण करण्यापेक्षा सध्या तरी प्रतीकच्या वाट्याला येणारे बाबांचे प्रेमाचे क्षण तिला अधिक महत्त्वाचे वाटले. यावेळी तीने परिस्थितीला संयमाने सामोरे जाण्याचे ठरविले.
दिवसा मागून दिवस जात होते. प्रसाद कधी कामावर जात होता तर कधी फोन आल्यावरच घराबाहेर पडत होता. कधी दिवस दिवस प्रतीकसोबत खेळण्यात घालवत होता. कधी अचानक कामाचे निमित्त सांगून दोन तीन दिवस बाहेर गावी निघून जात होता. वनिताशी जुजबी बोलत होता. स्वतःहून तिच्याशी शारीरिक जवळीक टाळत होता. सुरवातीला ती स्वतःहून जवळ गेली तरी तो केवळ तिला संशय येवू नये म्हणून संबंध ठेवत होता. नंतर नंतर तर त्याने तशी वेळच येवू नये म्हणून रात्री उशिरा घरी येण्यास किंवा संध्याकाळी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली होती. आईवडिलांना खर्च करायला पैसे मात्र तो वेळच्या वेळी पाठवत होता. यावेळी वनिताने संयम बाळगायचा ठरविले असल्याने तिने कोणत्याच शंका उपस्थित केल्या नाही. आला दिवस समाधानात घालवायचा असेच ठरविले.
वर वर सगळे कसे सुरळीत सुरू होते. प्रसाद बाहेर गेला की तीही प्रतीकला बाबा गाडीतून खालच्या बागेत फिरवत असे. हळू हळू तिच्या ईतर बायकांशी ओळखी होवू लागल्या. प्रसाद घरी नसतांना शेजारी राहणार्या बायका तिच्या मदतीला येवू लागल्या. असेच बोलता बोलता शेजारच्या काकू बोलून गेल्या की, ' ती बाळंतपणाला माहेरी गेली होती तेव्हा तिच्या घरात रोज नवीन नवीन तरुण मुले,माणसं रहायला येत होती. कचऱ्याच्या टोपलीत रोज दारूच्या बाटल्यांचा ढीग असे. तेव्हा काही सदस्यांनी तिच्या नवर्या विरोधात सोसायटी कार्यालयात तक्रार केली होती. इथे कुटुंबाला राहण्याची परवानगी आहे. केवळ तरुणांना घर भाड्याने देता येत नाही. बर झाले की वनिता लवकर आली नाहीतर तिच्या नवर्याला हे घर सोडावे लागले असते' ही सगळी माहिती तिच्यासाठी नवीन होती. आपल्या शिक्षणासाठी पैसे व परवानगी देत नाही . दारू प्यायला पैसे कुठून येतात? तिचा नुसता त्रागा झाला. प्रसादने तीला काहीही कल्पना न देता घरात परक्या लोकांना ठेवून घेतले याची तिला चीड आली. तिला आठवले की, ती जेव्हा बाळाला घेवून आली होती तेव्हा घराची अवस्था फार खराब होती. प्रसादला विचारल्यावर त्याने अधून मधून मित्र पार्टी करायला यायचे त्यात घर खराब झाले. कामाला येणार्या मावशीच्या मदतीने घर स्वच्छ करून घे म्हणत विषय बंद केला होता. तिने हजारदा सुचविले होते की ती येण्याआधीच कामाला येणार्या मावशी कडून घर आवरून ठेवावे परंतू त्याने तिच्या माघारी काम करणार्या मावशीला कधीच घरात येवू दिले नव्हते. तेव्हा तिला ते योग्यही वाटले होते. परंतू काकूंनी दिलेल्या माहितीने ती गांगरून गेली. तिने चेहर्यावर दाखविले नसले तरी वनिताच्या मनात पुन्हा शंका जोर धरू लागल्या.
क्रमशः
©️Anjali Minanath Dhaske
पुणे
वनिताच्या माघारी घरात नेमकी काय घडले होते? प्रसाद तिच्याशी वारंवार खोटे का बोलत होता? बायको असूनही तो वनिताशी शारीरिक जवळीक का साधत नव्हता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.
भाग १ link
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html
भाग २ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html
भाग ४ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html
भाग ५ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_68.html
भाग ६ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_9.html
भाग ७ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_71.html
भाग १० link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_13.html
भाग ११ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_87.html
भाग १२ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_46.html
भाग १३ link: समाप्त (The end)
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_15.html
No comments:
Post a Comment