त्या दोघी ( लघुकथा)

 लघुकथा: त्या दोघी 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

पुणे 

          

           गेली अनेक वर्ष मंदिरातील गाभाऱ्यात ती मखमलीच्या आसनावर विराजमान होती.  रोज नवनवीन फुलांचे हार गळ्यात घातले जात होते. आरती, धूप यांच्यासोबत रोज चांदीच्या ताटात गोडाचा नैवेद्यही दाखवला जात होता.  समईच्या मंद प्रकाशात तिची सुवर्ण कांती उजळून निघत होती. तीही सगळ्यांना प्रसन्न चित्ताने भरभरून आशिर्वाद देत होती. सगळे कसे मनासारखे घडत होते. एक दिवस अचानक तिच्या आशिर्वाद देणार्‍या हाताला भेग गेली आणि तिचे दिवसच फिरले.

       झाल्या प्रकाराबद्दल घरातल्या मोठ्यांना सगळ्यात आधी कळविण्यात आले. त्यांनी जाणकार लोकांचे मत घेण्याचा निर्णय घेतला. जाणकारांच्या सल्ल्याने घरातील थोरामोठ्यांनी एक मताने तिची हुबेहुब प्रतिकृती आणण्याचा ठराव पास केला. नवीन मूर्तीच्या आगमनाची आणि तिच्या विसर्जनाची जय्यद तयारी करण्यात आली. 

                 आज तिच्यासोबत जे काही झाले त्यात नवल नव्हते.  रुढी, नियम याच्या नावाखाली तिची रवानगी नदीच्या वाहत्या पाण्यात करण्यात आली होती. जड अंतःकरणाने तिला निरोप देण्यात आला.  हे सगळे स्विकारणे तिच्यासाठीही सोपे नव्हते. परंतु जो पर्यंत मूर्ती पूजा केली जाईल तो पर्यंत तिच्या सारख्या भंगलेल्या अनेकींना विसर्जित केले जाईल. हे सत्यही ती जाणून होती. 

           तीही मागे वळून न पाहता मूकपणे गढूळ प्रवाहाबरोबर तिच्या नवीन प्रवासाला निघाली. 

               नदीच्या पाण्यात विसर्जन करण्याची पद्धत जरी जुनी होती तरी हल्ली नद्या पूर्वीसारख्या स्वच्छ राहिल्या नाहीत की आता त्या खळाळून वाहत देखील नाहीत. वर्षानुवर्षे साठलेला नदीतील गाळ कधी उपसला जात नाही म्हणून तिच्या या लांबच्या प्रवासात तिला अनेक ठिकाणी अडकून पडावे लागले.  प्रवाहासोबत जातांना जिथे जिथे ती अडकून पडली तिथे तिथे मानव निर्मित कचर्‍याने, घाणीने तिचा जीव गुदमरून गेला. कधी काळी तिच्यातल्या देवत्वाची पूजा केल्या जात होती. हे विसरून अडकून पडल्यानंतर प्रत्येक वेळी तिने हा वेदनादायी प्रवास लवकर संपावा म्हणून तेहतीस कोटी देवांचा, तिच्या सहकार्‍यांचा धावाही  केला .  

     या वेळी रात्रीच्या अंधारात  ती नेमकी कुठे अडकून पडली होती, याचा तिलाच अंदाज येत नव्हता. झुंजूमुजू झाले तसे तिला जाणवले. अंधारात ती घाटाच्या पायर्‍यांपाशी येवून पोहोचली होती. जवळच्या झाडावरील पाक्षी दाण्याच्या शोधत दूर उडून गेले. सकाळी सकाळी अनेक लोक घाटावर सूर्य दर्शनासाठी आले. अनेकांशी तिची नजरा नजरही झाली. परंतु 'दगडाचे काळीज' असणार्‍या त्यांच्या नजरेत भंगलेल्या दगडी मूर्तीची किंमत शून्य होती. याचा अनुभव तिने आज नव्यानेच घेतला.

           काही बायका धुणे धुण्यासाठी आल्या होत्या.  त्यांनी तर तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून स्वतःचे काम लवकर उरकण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या येण्याने गढूळ नदीचे पाणी अधिक प्रदूषित झाले होते खरे परंतु त्यांच्या सुगंधित साबणाच्या रासायनिक पाण्याने तिला मात्र दुर्गंधीपासून क्षणिक सुटका मिळाली होती.

          दिवस वर चढला तशी घाटावर माणसांची गर्दीही कमी झाली.  दुपारच्या एकांतात दूर कुठेतरी झाडाच्या सावलीत काही लोकांचा घोळका गुपचूप मद्याचा आस्वाद घेत बसला होता. त्यांच्या येण्याची तिने थोडा वेळ वाट बघितली. परंतु कोणीही घाटाकडे फिरकले नाही. स्वतःच्या वेदना मद्यात बुडवू पाहणार्‍या त्यांना पाण्यात बुडलेल्या तिची वेदना कशी समजणार?

      डोळे दिपवणार्‍या रखरखत्या उन्हात गढूळ पाण्याचा स्पर्श तिला गारवा देत असला तरी या वेळी आपली सुटका लवकर होणार नाही या जाणिवेने तिला ग्लानी आली. 'जे व्हायचे आहे ते होईल' म्हणत तिनेही स्वतःला नियतीच्या स्वाधीन करत डोळे मिटले. 

              बराच वेळ शांततेत गेला. सांज होत आली. कुठून तरी निरर्थक बडबड तिच्या कानी पडू लागली.  त्या बडबडीचा आवाज जस जसा जवळ येवू लागला. तसे काही लहान मोठे दगड पाण्यात येवून पडू लागले.  संथ पाण्यात अचानक माजलेल्या खळबळीने तिच्या आडोशाने अन्न शोधणाऱ्या छोट्या माश्यांनी अधिक खोल पाण्यात दडी मारली. तिनेही घाबरून डोळे उघडले. 

        तिच्यापासून फक्त एका पायरीच्या अंतरावर निरर्थक बडबड करत असलेली एक अतिशय घाण अवतारातली स्त्री बसलेली तिला दिसली. केसांच्या जटा झाल्या होत्या. त्यावर माश्या घोंगावत होत्या. चेहर्‍यावरचे तेज हरवले होते. दात किडलेले होते, नखात  माती फसलेली होती. अंगावरचे कपडे प्रचंड मळलेले होते. ठिकठिकाणी फाटलेलेही होते. दोन्ही पायात दोन वेगळ्या प्रकारच्या चपला होत्या. नजर भूतकाळात हरवलेली होती व हातवारे करत तोंडाने  असंबद्ध बडबड सुरू होती. 

                गढूळ पाण्यात जीव मुठीत घेऊन राहिलेल्या तिला 'हिची' अवस्था पाहून फार वाईट वाटले.  नियतीने दोघींसोबत सारखाच खेळ खेळला होता. 'हिच्या' मेंदूला वाईट घटनेचा धक्का लागल्याने ही माणसातून उठली होती. तर 'ती' काळाच्या ओघात भंगल्याने गाभार्‍यातून नाईलाजाने उठवली गेली होती. 'हिच्या' अखंड बडबडीच्या तालावर 'तिचे' विचार चक्र सुरु होते. 

         इतक्यात पायरीवर बसलेल्या 'हिची' पाण्यात असलेल्या 'तिच्या' वर नजर गेली.  दोघींची क्षणभरच नजरानजर झाली.   'तिच्या' छातीत धस्स झाले अन् 'हि' मात्र खुदकन हसली. लगेच पुढे होवून 'हिने' तिला उचलून घेतले. आपला कपाळ मोक्ष होणार या खात्रीने 'तिनेही' डोळे गच्च मिटून घेतले.  

          प्रत्यक्षात घडले मात्र आक्रित. तिच्या भोवतीचे वातावरण क्षणात बदलले.  'हिने' घाटाजवळ  झाडाच्या खाली असलेल्या दगडी  देवळीत 'तिला' नेवून ठेवले आणि आल्या पावली हसत, टाळ्या पिटत निघूनही गेली. 

          इथे धूप,दीप नसले तरी दुर्गंधी ,घाण नव्हती. आता सभोवती गढूळ पाणीही नव्हते. शुद्ध हवेची एक झुळूक तिला सुखावून गेली. घंटा नाद कानी पडला. तसे तिने आवाजाच्या दिशेने पाहिले. तिच्या अगदी समोरच एक छोटे मंदिर होते. गाभार्‍यात तेवणार्‍या मंद समईचा प्रकाश तिच्या कणाकणात झिरपत गेला. तसा शाश्वत अशाश्वत याचा भेद गळून तिला स्वतःचीच नव्याने ओळख झाली. ' ती' ही मग स्वतःशीच खुदकन हसली आणि या भौतिक जगाच्या बंधनात न अडकता निर्गुण, निराकार झाली. ती ... एका लांबच्या प्रवासातून कायमची मुक्त झाली. 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

पुणे 

टिप: कथेतील विचार हे सर्वस्वी काल्पनिक असून माझे आहेत. आपण सहमत नसल्यास इतर विचारांचाही मला आदर आहे.  लेखन आवडल्यास नावासहितच शेअर करायला हवे. 

इतर लिखाण आणि रांगोळ्या ' आशयघन रांगोळी ' या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे. 👉anjali-rangoli.blogspot.com 

 लाईक, कमेंट  करण्याची सक्ती नसली तरी त्यांचा धो धो पाऊस पाडण्यास माझी अजिबात हरकत नाही. धन्यवाद




No comments:

Post a Comment