सहजच ...... गंमत म्हणून

#सहजच
#गंमत_म्हणून
                  राजकीय भूकंप झाला तेव्हा गण्याच्या घरचे सारखं टीव्ही पुढचं. जवा बघावं तवा टीव्ही वर  लोकं ," रात्रीच्या अंधारात फक्त पापं केली जातात " असं पोटतिडकीने सांगताना गण्यानं ऐकलं  अन् रात्रीच्या अंधारात टेबल लॅम्प लावून अभ्यास करणारा गण्या  आता ," झाली तेवढी पापं पुरे झालीत" म्हणत परीक्षा तोंडावर आली तरी जाड दुलई पांघरूण ढाराढुर झोपा काढू लागलं
       राजकीय भूकंप आला तसा गेलाही पण गण्याच्या घरात पोराच्या भविष्यावरून आई बापामधे कौटुंबिक वाद सुरू झाला तो थांबण्याचं नाव घेत नाही .
©️ अंजली मीनानाथ धस्के

भुरळ..... प्रतिबिंबाची

#भुरळ_प्रतिबिंबाची
#१००शब्दांचीगोष्ट

                आरशासमोर उभं राहून तिने अनेकदा स्वतःलाच समजावलं, "तू सुंदर नाही असच हा म्हणतो. खरं सौंदर्य माझ्या अंतरमनात आहे हे याला कुठे कळतं. यात मी माझं बाह्यरूप कधी बघतच नाही. याला  मनाशी संवाद घडवून आणण्याचं साधन मानते फक्त"
याच आत्मविश्वासाच्या जोरावर तिने 'विश्वसुंदरीचा'  किताबही पटकावला.
 मुकुट धारण केलेली ती आरशासमोर उभी राहिली तेव्हाही तो तिचे सौंदर्य मान्य करेना. आता तीही जिद्दीला पेटली. नाक,त्वचा, ओठ, दात,हनुवटी सुंदर करून घेण्यासाठी  शस्त्रक्रिया केल्या. अखेर  तिने आदर्श मापदंड असलेलं सौंदर्य मिळवलचं.
आता आरसाही,"तूच विश्वसुंदरी" म्हणतो.
तीही तिचं नवं रूप दिमाखात मिरवते.
 आरश्यातल्या  खोट्या प्रतिबिंबिनेच तिला अखेर भुरळ घातली. पूर्वीसारखा तिचा मनाशी संवाद आता होत नाही.
©️ अंजली मीनानाथ धस्के

खरी लाईफ लाईन

#खरी_लाईफ_लाईन
#१००_शब्दांची_गोष्ट
९वीच्या विद्यार्थ्यांना,"तूच माझी लाईफ लाईन" या विषयावर  निबंध लिहून वाचायला सांगितला.
         आयुष्यात  प्रमुख भूमिका निभावणाऱ्या व्यक्तींवर, नात्यांवर  सगळ्यांनी भरभरून बोलायला  सुरुवात केली.
           शहरीकरणाला अगदीच नवीन त्यामुळे मंदबुध्दी म्हणून हिणवले जात असलेला  संतोष जेव्हा त्याचा निबंध वाचायला उठला तेव्हा वर्गात एकच हशा पिकला.
          "दिल्लीची सद्यपरिस्थिती  बघता निसर्गाचा समतोल राखला नाही तर पुढची पिढी सुदृढ, निरोगी जन्माला येणं कठीण.
निसर्ग जीवन स्रोत आहे.   शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि कसदार जमीन हिच भावी पिढीची लाईफलाईन आहे.
निसर्ग नेहमीच खूप देतो आता आपली वेळ आहे.
जल, वायू आणि जमीन राखूया प्रदूषण मुक्त,
 निसर्गच  खरी लाईफलाईन लक्षात असू द्या फक्त"
         थोड्यावेळ पूर्वी हसण्यात बुडालेला वर्ग  टाळ्यांच्या कडकडाटात गरजून निघाला.
©️ अंजली मीनानाथ धस्के

कोणतंही काम हलक नसतं

#कोणतंही_काम_हलक_नसतं

            आदित्य आणि सोहम दोघे जिवाभावाचे मित्र . शिक्षण सोबत घेतल तसचं स्वतःचे  व्यवसायही सुरू केले. आदित्यने मोटार गाड्यांसाठी लागणारे छोटे छोटे भाग बनवण्याचा कारखाना सुरु केला तर सोहमने कारचे सूशोभिकरण करून देण्यासाठीचा  स्टुडिओ उभारला.
         दोघांच्याही व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले. आदित्यने जसे पैसे येत गेले तसे स्वतःचे राहणीमान ही उंचावले. सोहम मात्र जसा आधी होता तसाच आताही राही. घरात, बाहेर  कुठेही दिसेल ते काम करी . अनेकदा आदित्य त्याला समजावण्याचा प्रयत्न करी ," आता आपला वर्ग वरचा आहे तेव्हा आपल्याला असली छोटी कामे करणं शोभत नाही. समाजात आपला मान वाढवायचा असेल तर आपण स्वतः काम न करता फक्त हुकुम सोडायला हवे."
 सोहमला यातलं काहीच पटत नसे. " कोणतंही काम छोट  नसतं" याच विचारांचा तो होता. कामगारांना हुकुम सोडण्यापेक्षा त्यांच्या बरोबरीने कामे करायला त्याला जास्त आवडायचं. त्यांच्या बरोबरीने राबायचं म्हणजे छान छान कपडे घालून कसं मिरवता येईल ? म्हणून पैसा खूप कमावूनही त्याचं राहणीमान अगदी साधं होतं.
          दिवसामागून दिवस जात होते. दोघांचेही व्यवसाय जोरात सुरू होते.   ' पेट्रोल गाड्या पर्यावरणाचं नुकसान करतात म्हणून इथून पुढे फक्त विजेवर चालणाऱ्या गाड्या बनवल्या जाव्यात ' अशी घोषणा नव्या सरकारने केली आणि अचानक बाजारात मंदी आली. सगळ्याच व्यवसायांवर या मंदीचा परिणाम झाला होता पण सगळ्यात जास्त फटका मोटार निर्मितीच्या व्यवसायांवर झाला होता. अनेक छोटे कारखाने बंद पडले. कामच मिळत नाही तर कामगारांना पगार तरी कसे देणार ? त्याचाच परिणाम म्हणून आदित्यचा कारखानाही बंद पडला . असं काही होईल याची जराही शंका नसतांना हे झाल्यामुळे आदित्य पुरता कर्ज बाजारी झाला . उत्पन्न भरपूर होते तेव्हा मोठं मोठी कर्ज काढून त्याने बंगला, गाड्या घेतल्या . सगळा पैसा राहणीमान जपण्यात घालवला . आता जेवढी शिल्लक होती त्यात त्याने उभा केलेला हा डोलारा सांभाळणे कठीण होते.  अचानक राहणीमानात बदल केला तर लोक काय म्हणतील? या भीतीने त्याचा खर्च सुरूच होता. कर्ज वाढतच जात होतं. गाड्या विकल्या . बंगला विकला तरी खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नव्हता.
       व्यावसायातून येणारे उत्पन्न कमी झाले तसे सोहमने इतर कामंही करायला सुरुवात केली. त्याच्या कामगारांनाही इतर काम मिळेपर्यंत मदत केली . त्याच्या कामगारांपैकी कोणी चहाची टपरी सुरू केली , कोणी वडापावची गाडी चालवायला घेतली , कोणी किराणा मालाच्या दुकानात काम करू लागले तर कोणी कपड्यांच्या दुकानात काम करायला लागले. सगळ्यांच्या पोटापाण्याची सोय होते आहे म्हंटल्यावर सोहमने त्याच्या स्टुडिओतील काही मशिन्स विकल्या आणि डोक्यावर असलेले कर्ज कमी केले. जमा पैशातून महाविद्यालया समोरच एक गाळा भाड्याने घेवून त्यात छोटंसं स्नॅक्स सेंटर सुरू  केलं. इथेही त्याच्या स्टुडिओ मधल्याच काही कामगारांना काम दिलं. तो स्वतः टेबल पुसण्यापासून ते  पदार्थ बनवण्यापर्यंतची  सगळी कामे करू लागला. त्याला तसं काम करतांना बघून त्याच्या हाताखालची माणसंही मन लावून कामं करू लागले . त्याचा हा व्यवसायही जम धरू लागला.  स्टुडिओ पूर्ण बंद पडला होता तरी त्याचं आणि त्याच्या कामगारांच मस्त सुरू होतं. आता तर तो रहाणीमानावर पूर्वीपेक्षाही कमी खर्च करू लगला. "कर्ज काढून रेशमी वस्त्र मिरवण्यापेक्षा कष्टाच्या कमाईचे फाटके कापड घालावे " याच मताचा तो होता आणि यात त्याच्या घरच्यांचीही त्याला साथ मिळाली.
          आदित्यला आणि त्याच्या घरच्यांना सगळ्या महागड्या वस्तू वापरण्याची सवय लागल्यामुळे आता त्याला पैशाची चणचण भासू लागली. पूर्वी ज्या कामांना कमी लेखलं ती काम करावी लागू नये म्हणून तो मित्रांना पैसे उधार मागूनच घर खर्च सांभाळू लागला. आधी हुकुम सोडण्याची सवय लावून घेतल्याने आता पैसा कमावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची त्याची मानसिकता नव्हती. दिवसेंदिवस तो अधिकच कर्ज बाजारी होवु लागला . सगळे मित्र त्याला टाळू लागले.
एक दिवस बाजारात फिरत असतांना  काहीतरी खावून घ्यावं म्हणून तो तिथल्याच स्नॅक्स सेंटर मधे गेला . तिथे सोहम टेबलं पुसत होता. त्याला पाहून आदित्यला आश्चर्य वाटलं. याची परिस्थिती फारच वाईट झाली असं वाटून त्याने  सोहमला आवाज दिला.  सोहमने आधी त्याची ऑर्डर घेतली आणि मग त्याच्या जवळ येवून बसला.  दोघांच्या खूप गप्पा रंगल्या . सोहमने स्टुडिओ विकून टाकल्याच सांगितलं . आदित्य मात्र अजूनही  दिखावा करण्यातच  मग्न होता. व्यवसाय बंद झाला तरी आपल्याला फार काही फरक पडला नाही . असंच तो भासवत राहिला. ' केलं तर आपल्याला शोभेल असंच काम करायचं' याच मतावर  तो अजूनही ठाम होता.  टेबल पुसण्याच  इतकं हलकं काम सोहमने  का करावं? यावर तो सोहमवरही चिडला. सोहमनेही त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की ," कोणतंच काम हलक नसतं. कोणत्याही मोठ्या कामात यश मिळवायचं असेल तर त्यासाठी लागणारी सगळी छोटी छोटी कामं यायलाच हवी. तसेही उधारीवर जगण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाची कमाई कधीही चांगली .  पैसा काय .... येत आणि जात असतो.  माणूस पैशाने नाही तर कर्तुत्वाने मोठा होतो " .  सोहमने इतकं समजावलं पण आदित्य काही समजून घ्यायला तयार झाला नाही.
         जातांना  जेव्हा आदित्य त्याच्या खाण्याचे बिल द्यायला गेला तेव्हा  गल्ल्यावरच्या माणसाने सांगितलं की ," आमच्या मालकाचे तुम्ही मित्र ..... तुमच्या कडून पैसे कसे घेणार? ". त्याचे हे वाक्य ऐकून आदित्यला धक्काच बसला. त्याने सोहमकडे वळून बघितलं तर तो त्यांच्याच  टेबलावरच्या खरकट्या ताटल्या उचलून घेत टेबल स्वच्छ करत होता.
" कोणतंही काम हलक नसतं " या शिकवणीनेच सोहमला या मंदीच्या काळातही यश दिलं होतं तर  खोटा अहंकार मिरवणाऱ्या आदित्यच्या डोळ्यात अंजन घातलं होतं.


तात्पर्य :
१: कोणतंही काम हलक नसतं.
२: माणूस पैशाने नाही तर कर्तुत्वाने मोठा होतो.

©️ अंजली मीनानाथ धस्के



घटस्फोट

#घटस्फोट
                घटस्फोट हा शब्दच किती स्पोटक आहे. सद्य परिस्थितीत घटस्फोटाचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या आहे. आजुबाजूलाच या शब्दाचे चटके अनुभवलेली अनेक आप्त मंडळी असूनही या विषयावर काही लिहावं असं कधी मनातही नव्हतं.
काल परवाच एका मित्राने या विषयावरची एक बातमी पाठवली आणि त्यावर मी  मत मांडाव असं सुचवलं. तेव्हाही  मी म्हणाले ," हा विषय असा वर वर बोलण्याचा, लिहिण्याचा मुळीच नाही.  निदान सोशल मीडियावर त्या संबंधी एखादी पोस्ट आली की आपण आपली प्रतिक्रिया नोंदवावी असा हा विषय नक्कीच नाही.
ज्याला हा वाईट अनुभव आला त्याचे मत आणि नुसते मत द्यायचे म्हणून दिलेले मत यात तफावत आढळते. अनेकदा या मतांतराने संघर्षही होतो. त्यात माझी भर नको" म्हणत मी तो विषय टाळला.
        तेवढ्यात मेंदू मधे या विषयसंदर्भात जेवढी काही माहिती होती ती जमा व्हायला सुरुवात झाली होती. नेहमीप्रमाणे ही जमवाजमव थांबवणं माझ्या हाती नव्हतं. त्याला नकार देवूनही डोक्यात विचार घोळायला सुरुवात झालीच.
ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे...... असंच झालं. बोलायचं नाही म्हणता म्हणता लिहायचा मोह आवरणे कठीण झाले.
                 काडिमोड.... हा शब्द लहानपणी मोठ्यांच्या बोलण्यात क्वचित ऐकू येई. तेव्हा अखेरचा पर्याय म्हणूनच या शब्दाकडे बघितले जायचे. अनेक वेळा या शब्दाचा वापर जरी झाला तरी प्रत्यक्षात त्याचा अवलंब करण्याची वेळ कधीही येत नव्हती. त्यामुळे  त्याची फारशी दहशत नव्हती.
          जेव्हा घटस्फोट या शब्दाचे आमच्या जवळच्याच व्यक्तींना  चटके बसले तेव्हा मात्र हा शब्द किती स्पोटक  आहे याची जाणीव प्रकर्षाने झाली.
        मागे सोशल मीडिया वर एक पोस्ट आली की ," मुलींचे संसार मोडण्यात मुलीच्या आईचा नको तितका हस्तक्षेप कारणीभूत असतो"  यावर दोन्ही बाजूच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला . एकमेकांची अक्कल काढल्या गेली. अनेकांनी " घटस्फोट होण्यात मुलाच्या आईचा हस्तक्षेपच जास्त कारणीभूत असतो " अशी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.
  खोलवर विचार करण्यासारखी बाब पण वाद विवाद करून सोडून देण्यात आली.
लग्न संस्कृतीवर बोलतांना,"
 लग्न होते तेव्हा ते फक्त दोघांचे होत नाही तर दोन घरं एकमेकांशी जोडली जातात" असं आपण मोठ्या अभिमानाने सांगतो मग घटस्फोट घेण्याची वेळ ही कोणत्याही एका व्यक्तीमुळे  येते हे म्हणणं कितपत योग्य आहे.  प्रत्यक्षात घटस्फोट होतो तेव्हा अनेक घटक कारणीभूत असतात. परिस्थिती नियंत्रणाच्या अथवा सहनशक्तीच्या बाहेर असते.
         सासूरवास ही समस्या तर पूर्वापार चालत आलेली मग आज कालच घटस्फोटाचे प्रमाण का वाढले??? असा प्रश्न निर्माण होतो.
          चार दिवस सासूचे .... या म्हणी प्रमाणे तेव्हा घरातली मोठी मंडळी योग्य वेळी घरातल्या जबाबदाऱ्या नव्या पिढीच्या खांद्यावर देवून मोकळी होत असे. त्यानंतर फक्त मार्गदर्शकाची भूमिका बजावत असे. आता वडीलधारी मंडळी संसाराच्या कामातून निवृत्ती घेतात, जबाबदाऱ्या पुढच्या पिढीला सोपवल्या जातात पण हक्क आणि अधिकार स्वतः कडेच राखीव ठेवण्याचा प्रयत्न कायम असतो यातून न टाळता येणारा संघर्ष निर्माण होतो. ज्या घरातल्या वडीलधाऱ्यांना समस्येचं मूळ कळालेल असतं त्या घरात घटस्फोट होत नाही किंवा घटस्पोटाची  कारणे सासू किंवा आई चा हस्तक्षेप ही नक्कीच नसतात.
 पूर्वीची स्त्री अबला होती , आर्थिक दृष्ट्या परावलंबी होती, तिला तिचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते अशी काही कारणं ही सापडतात.
आताची स्त्री पुरुषाच्या तुलनेत कोणत्याच क्षेत्रात मागे नाही. ती कणखर आणि स्वतंत्र विचारांची आहे.
तरी   घटस्फोटाच प्रमाण वाढत जातं आहे . ते का ?? याच उत्तर मिळत नाही.
       अनेक वेळा बघण्यात येतं की सासू किंवा आई या घटकांपेक्षा जोडीदाराशी असलेले मतभेदच वेगळं होण्यासाठी कारणीभूत असतात.
         इथे अनेकदा ठरवून केलेलं लग्न आणि प्रेम विवाह यात वाद होताना आढळतो. लग्न कोणत्याही पद्धतीचं असल तरी लग्नानंतर नवरा बायको हे नवरा बायको प्रमाणेच वागतात. प्रेमविवाह आहे म्हणून घटस्फोट होणारच नाही असं ठामपणे सांगता येत नाही. कारण आजकाल दोन्ही लग्नाच्या प्रकारामधे घटस्फोट होतांना आढळतात.
       
           मनुष्य स्वभाव बघता चांगल झालं तर माझ्यामुळे आणि वाईट झालं तर ते इतरांमुळे म्हणण्याचा प्रघात आहे.
       तसचं काहीसं या समेस्ये बाबतीत होताना दिसतं. समस्या आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे पण ती इतरांमुळे हेच पटवून देण्याचा प्रयत्न होतो.
       मला स्वतःला प्रामाणिकपणे वाटतं की घटस्फोटाची कारणे ही अशी दिसतात तितकी वरवरची नक्कीच नाही.
माझ्या बघण्यातली  उदाहरणं इथे देत आहे.
 या उदाहरणामधे दोन वेगवेगळी कुटुंब. त्यातील  आईला दोन मुली. समाजाने त्यांना सतत 'तुम्हाला दोन्ही मुलीच का ???' म्हणत डिवचलेल.
एका आईने ते फारस मनावर घेतलं नाही तर दुसऱ्या आईने ' माझ्या मुली मुलाच्या तुलनेत कुठेच कमी नाहीत ' असा पवित्रा घेतला. दोघींनी सतत मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं पण एकीने मुलींच्या मनात कळत नकळत हे बिंबवल की ," घरची कामं करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. मुलांनाही लाजवेल असं कर्तृत्व सिद्ध करायचं "
दोघींच्या मुली आपापल्या क्षेत्रात आघाडीवर . दोघींच्या मुलींची लग्न झाली.
आज पर्यंत अभ्यास , कार्यक्षेत्र यावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे मुलींना अचानक आलेल्या इतर जबाबदाऱ्या पेलनं जड जावू लागलं.
एकीच्या मुलींनी आलेली परिस्थिती आव्हान म्हणून स्वीकारत संसाराला सुरुवात केली. समाजातील अनेकांनी ,"कशाला  येवढा त्रास सहन करता. घटस्फोट घ्या " असा सल्ला दिला तरी त्याकडे दुर्लक्ष केलं. संसारात कधी नमत घेत तर कधी हक्कासाठी भांडत आपलं स्थान बळकट केलं. कारण त्यांच्या आईलाही त्यांनी तसचं करतांना बघितलं होत. समाज काय बोलतो यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे महत्त्वाचं असतं.
मुलींच्या मनात नोकरी करणे म्हणजे मुलांचं क्षेत्र आणि घर सांभाळणे  म्हणजे मुलीचं क्षेत्र असा भेद भाव नव्हता. त्या दोन्ही क्षेत्रांना आपलं मानत होत्या.
दुसरीच्या मुलींना मात्र नमत घेणं जड जावू लागलं. घरची कामं दुय्यम असा समज असल्याने छोट्या छोट्या गोष्टी ही त्रास दायक झाल्या. नोकरी केली तरच कर्तृत्व सिद्ध करता येत ही शिकवण नकळत मिळाल्याने  स्व खुशीने जी जबाबदारी एखादी स्त्री घेते ती घेणं ही त्यांना त्यांची हार वाटू लागली. वाद वाढत गेले . आईलाही वाटू लागलं मुलींना त्रास होतो आहे. समाजानेही आता मूली मुलांच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नसतांना उगाच का ऐकून घ्यायचं असे विचार बिंबवले .
परिणाम ..... घटस्फोट झाला.

          या उदाहरणात घटस्फोट झाल्यानंतर समाजाने मात्र मुलगी आणि मुलीच्या आईला दोष दिला .
(थांबा ..... लगेच माझी अक्कल काढू नका)

आता मुलांच्या बाबतीतली उदाहरणं आहेत .
दोन्ही कुटुंबातील आईंना दोन मुलं. समाजात मिरवतांना  आपण इतरांपेक्षा किंचित सरस असल्याची जाणीव झालेली.
(तुम्ही कितीही म्हणालात मुलगा मुलगी समान तरी हा विचार फक्त बोलण्या पुरताच मर्यादित आहे प्रत्यक्षात सामाजिक विचारांची परिस्थिती फारशी बदलली नाही. )
मुलीची उणीव सलत असल्याने दोन्ही आईंने मुलांना घरातली सगळी कामं शिकवली. तिच्या दुखण्या खुपण्यात मुलांचं काही अडू नये आणि भावी आयुष्यात त्यांनी कोणावर अवलंबून राहू नये हा शुद्ध हेतू .
त्यातील एका आईने मात्र घर कामात मुलांची मदत घेत असताना  कळत नकळत हे बिंबवल की ही कामं दुय्यम दर्जाची ,  मुलींची करण्याची .
कालांतराने दोघींच्या मुलांची लग्न झाली.  एकीच्या सूनांमधे एक नोकरी करणारी तर एक गृहिणी तरी एकमेकांना सावरत संसार चाललेला .
दुसरीच्या सूनांमधे ही एक नोकरी करणारी तर एक गृहिणी  होती. तिला नवरा काहीच मदत करत नाही म्हणून त्यांच्यात वाद होते. तिच्या नवऱ्याला वाटायचं घरातली कामं ही बायकांचीच असतात कधी तरी मदत म्हणून केली तर करायची. ते आपलं कार्य क्षेत्र नाही.  तर गृहिणी होती तिला तिने केलेल्या कामाचे कौतुक केलं जातं नाही अशी कायम तक्रार. ती तिच्याच क्षेत्रात काम करते त्याचं काय कौतुक करायचं अशी तिच्या नवऱ्याची भूमिका . संसार रडत रखडत सुरू. शेवटी सहन न होवून एक सून माहेरी निघून गेली ती कायमचीच.
इथे समाजाने आई स्वतः मुलांना काम सांगते पण बायकोला मदत करायची नाही असं शिकवते म्हणून  "सासुरवास " यावर घटस्फोटाचा दोष ढकलून दिला.

होणाऱ्या घटस्फोटात बरेच घटक कारणीभूत असतात ते सगळे नमूद करणे शक्य नाही. प्रत्येक वेळी समाजाचा सुर मात्र एकच ," कोणीतरी एकाने ( सासू, सून, नवरा ,बायको यापैकी कोणीतरी एकाने) समजुतीने घ्यायला हवं " असाच होता. पण समाजाने आपल्या नसा नसात लिंग भेद , त्यावरून केला जाणारा कार्य क्षेत्र भेद , कुटुंबातील दर्जा देण्यातला भेद भाव इतका भिनवला आहे की समानता फक्त बोलण्या पुरतीच मर्यादित राहते व्यवहारात येत नाही. अहंकार कुरवाळला जातो कोणीच माघार घेत नाही.
जिथे नात्यांपेक्षा  अहंकार मोठा होतो तिथे सुखी संसाराची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
घटस्फोटानंतर
*हल्लीच्या मुली कोणाचं ऐकुन घेत नाही जरा मना विरुद्ध झालं की घटस्फोट घेवून मोकळ्या होतात.
*नोकरी करणारी मुलगी हवी तर ती तिने घर काम  करावं ही अपेक्षाच किती चुकीची आहे.
* सगळं सांभाळून आम्ही काय नोकऱ्या केल्या नाहीत?? आजकालच्या मुलींना घर काम करायचं च नसतं म्हणून जातात कामावर.
*मुलाची आई हस्तक्षेप करते.
* मुलीची आई हस्तक्षेप करते.
* आम्हाला न सांगता आर्थिक व्यवहार करते/ करतो.
*मुलगी माहेरच्या लोकांवर सगळा पैसा खर्च करते.
*मुलगा त्याच्या घरचे सांगतील ते ऐकतो. त्यांच्यावर वाट्टेल तसा खर्च करतो.
अशा काही लक्षणीय प्रतिक्रिया कायम दिल्या जातात.
मुलगी, मुलगा , मुलीची आई किंवा मुलाची आई यांच्या पैकी एकावर दोष ढकलून दिला जातो.

मला वाटतं कोणत्याही आईला आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं वाटतं नसेल . कोणत्याही मुलाला किंवा मुलीला घटस्फोट आनंदाने घ्यायचा नसतो तरी घटस्फोट होतात.
मग नक्की कारण काय?????
बाल वयात आपल्या संवेदनशील मनावर झालेल्या नोंदी पुढे आपल्या आयुष्यात चांगले वाईट बदल घडवून आणतात.
वर वर बघता आज काल तरी घर काम आणि एकमेकांना न सांगता केले जाणारे आर्थिक व्यवहार  हाच मुद्दा ऐरणीवर आहे.
मुलाला नोकरी करणारी बायको हवी आहे पण घरच्या जबाबदाऱ्या तिने त्याच्या आईसारख्या पार पाडाव्या ही अपेक्षा तर मुलीला वेल सेटल मुलगा हवा असतो पण त्याच बरोबर संसाराच्या येणाऱ्या जबाबदाऱ्या नको असतात.
मुळात नवरा बायको दोघांच्या विचारात अंतर त्यात भरीस भर मुलाच्या आईला सुनेने आपण करत होतो ती सगळी कामं करत नोकरी , आल्या गेल्याच स्वागत हसत मुखाने करून संसार करावा ही अपेक्षा तर मुलीच्या आईला आपण जपलं तसचं जावयाने जपावं ही अपेक्षा.  आपली मुलगीही नोकरी करते. बोरोबरीची वागणूक हवी . नोकरी सोडा म्हणतात पण मुलीचं आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात येईल असे विचार डोक्यात पिंगा घालतात.
खरं तर दोन्ही पक्ष आपापल्या परीने योग्य आहेत . सुवर्ण मध्य साधत संसार करणारे यशस्वी होतात तर एकाच मुद्यावर अडून बसणारे घटस्फोट घेतात.
वाढत्या घटस्फोट प्रमाणाला जबाबदार आपली समाज व्यवस्था आहे. पूर्वी पुरुष प्रधान संस्कृती होती स्त्रियांना बोलण्याच स्वातंत्र्य नव्हतं. कितीही मत भेद असले तरी मुलीनेच नमत घ्यायचं हे ठरलेलं होतं. खरं तर तेव्हा घटस्फोट घेण्याची मुभा असती तर घटस्फोटाचे प्रमाण आज इतकेच असते. मुलीनेच नमत घ्यायचं असतं असं रक्तात भिनलेले त्यामुळे  मुली मना विरुद्ध का होईना तडजोड करत. घटस्फोट घेणे ही बाब फार लाजीरवाणी मानली जायची म्हणून अनेक वेळा मुलगाही तडजोड करायला तयार असायचा. तडजोड केली तरी ती जमेल आणि झेपेल एवढीच असायची . तरीही पटलं नाही तर वेगळं होण्याचा मार्ग तेव्हाही खुला होताच.
आता मुलगा/ मुलगी कोणालाच तडजोड नको आहे. लग्न झाल्या क्षणी सगळं मनासारखं हवं आहे.

जेव्हा मी मुलगा आणि मुलगी दोघांशी घटस्फोट का घ्यायचा आहे ? याची कारणं जाणून घेण्यासाठी संवाद साधायचा प्रयत्न केला तेव्हा मुलांचं म्हणणं
* माझी आई घरातलं सगळं करते . आल्या गेल्याच हसून स्वागत करते. माणसं जोडून ठेवते यापैकी काहीही करायचं म्हटलं तर बायको नकार देते जमणार नाही म्हणून मोकळी होते. स्वतः चे आर्थिक व्यवहार मला सांगत नाही. कधी विचारलं तर माझ्या कमाईतून केलं तुला काय सांगायचं अशी उत्तर देते.
तिला फक्त नवरा हवाय बाकी जबाबदाऱ्या नकोत.

मुलीला विचारलं तर तिचे म्हणणे असते
नवऱ्याला सतत आईवडिलांना भावाला बहिणीला मदत करायची असते त्या नादात बँक खात्यात पैसे जमवत नाही.
मला माझं भविष्य सुरक्षित करायचं आहे. माझे आर्थिक व्यवहार कोणाला सांगून करणं मला पटत नाही. मला शॉपिंग, हॉटेलिंग आवडतं ते मी माझ्या पैशाने करते त्यावर रोकतोक मला आवडत नाही. त्याला माझे पैसे हवेत फक्त . नोकरी करून पैसे आणून द्यायचे यांना आणि हे घरातल्या कामवाल्या बाई सारखी वागणूक देणार. हे खपवून घेतलं जाणार नाही.

यात मुलाकडची मंडळी मुलीला दोष देतात तर मुलीकडची मंडळी मुलाला दोष देतात .
वरील पैकी कोणतही उदाहरण घेतलं तर लक्षात येईल की खरं कारण आहे आपली समाज व्यवस्था.
पुरुष प्रधान संस्कृती झुगारून आपण स्त्री सशक्ती करणाचा, समानतेचा पुरस्कार केला पण अजूनही समानता आपल्या नसा नसात भिनली नाही. स्त्री पुरुष समानता, स्त्री सशक्ती करण म्हणत असताना ...... एक स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीला समानतेच्या , बरोबरीच्या दर्जाने वागवतांना दिसत नाही.
 टाळी एका हाताने वाजत नाही. कोणत्याही नात्यात आनंद आणण्यासाठी  सामंजस्य दोन्ही बाजूंनी दाखवायला हवे पण " पाहिले आप पाहिले आप " म्हणण्याच्या नादात घरगुती वाद वाढतच जातात. 


मुलाची आई आज अभिमानाने सांगते की ," मी बाई माझ्या मुलाला सगळं शिकवलं , त्याला सुंदर स्वयंपाक येतो. उद्या नोकरी करणारी बायको मिळाली तरी मला झाला तसा त्रास तिला होणार नाही" हे बोलून ती मुलाचं कौतुक नक्कीच करते पण कळत नकळत घर काम हे मुलीचं कार्य क्षेत्र होत/ आहे हे  नकळत त्याच्या मनात रुजवून जाते.

मुलीची आई मुलीला प्रोत्साहन देताना ," मेरी बेटी मेरा अभिमान . समाजाने दुसरी मुलगीच आहे का तुम्हाला ??? असं म्हणून हिणवलं तरी  मी माझ्या मुलींना सगळं शिकवलं . अभ्यासात तर हुशार आहेतच पण घरकाम ही करतात. मुलगा असता तरी येवढं नाव नसतं मिळवलं तेवढं या पोरींनी मिळवून दिलं" असं म्हणताना दिसून येते. पण हे सांगत असताना ती नकळत आपल्या मुलींची तुलना मुलाशी करते .
स्त्री सशक्ती करणं झालच पाहिजे . यावर कोणाच च दुमत नाही पण हे करताना कळत नकळत आपण आपली स्पर्धा पुरुषांशी आहे हे बाल मनावर बिंबवतो.
मुलांना ही ऐकवलं जातं , " बघ ती मुलगी असून रडत नाही , बघ ती मुलगी असून बाईक चालवते , बघ ती मुलगी असून मोठ्या पदावर नोकरी करते "
यामुळे लहानपणापासून  एकमेकांकडे स्पर्धक म्हणून पाहिले जाते. मुलांचा दर्जा वरचा आणि मुलींचा दर्जा खालचा एवढंच कशाला लग्न करतानाही मुलाच्या आईचा दर्जा वरचा त्यामानाने मुलीच्या आईचा दर्जा खालचा
 असं सुचवलं जातं.
लग्न झाल्यावर मग छोट्या छोट्या गोष्टी ही अहंकाराला डिवचणाऱ्या ठरतात . एकमेकांना कमी तरी लेखलं जात किंवा आपणच कसे श्रेष्ठ हे सिद्ध करण्यासाठी चढाओढ लागते.
मुळात संसार हा जिंकण्या हरण्यासाठी नसून तो एकमताने, प्रेमाने करण्याचा आहे हे शिकवायला हवं.
     समाजाने पूर्वापार पासून  अमुक क्षेत्र पुरुषाचं , अमुक कामे पुरुषांनाच शोभा देतात , चूल मुलं बाईचच क्षेत्र , नोकरी केली तरी घरची कामं करण्याची जबाबदारी तिचीच असं आपल्याला शिकवलं.

त्यामुळे आपण स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते फारसे यशस्वी होत नाहीत. फार पूर्वी ही ज्यांनी समाजाची ही चाकोरी पाळली नाही . परिस्थितीनुसार स्वतः मधे योग्य बदल केले ते सगळे संसार सुखाने सुरू होते आणि आताचे संसारही सुरू आहेत. आजकाल बऱ्याच घरात स्त्री कमावती असते  आणि पुरुष घर सांभाळतांना दिसतो. त्यांचा संसार सुखाने सुरू असतो मात्र समाजातील काहीच लोक कौतुक करतात बाकी सगळे त्या पुरुषाला टोचून बोलतात . बायकी काम करत बसतो म्हणून हिणवतात .

मला   वाटतं आपण स्त्री पुरुष समानता फक्त म्हणतो पण ती खऱ्या अर्थाने कोणीच स्वीकारत नाही
मुलगा असो की मुलगी दोघंही स्वतःच्या फायद्याचं तेवढं घेतात. आजकाल सगळे व्यवहार 'सोयीची समानता ' यावरच चाललेले असतात.
काळ बदलला तसे अनेक बदल आपण स्विकारले पण त्या सोबत मानसिकतेतही बदल घडवून यायला हवा होता तो आपण केलाच नाही. म्हणूनच समाज सुधारत जातोय तरी काही दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं आहे.
लहान पणापासून मुलगा मुलगी समान याच भावनेने मुलांना वाढवल जावं . घरातल कोणतंही काम हे " आपलं " काम आहे ही भावना रुजवायला हवी.
संसार / लग्न हा एक व्यवहार किंवा कोणताही करार नाही की जिथे लपवून ठेवलेले नियम आणि अटी लागू असतात.
संसार म्हणजे नात्यांची विश्वास, प्रेम , आपुलकी आणि सामंज्यस्याने निर्माण होणारी सुरेख गुंफण असते. हे समजून घ्यायला हवं.
लग्नानंतर दोन्ही घरांची जबाबदारी स्विकारायची असते हे जसं मुलीला शिकवलं जातं अगदी तितक्याच सहज मुलालाही शिकवलं तर संसारात निर्माण होणारे अनेक वाद संपुष्टात येतील.
स्वातंत्र्य , आर्थिक आत्मनिर्भरता म्हणजे स्वैराचार नव्हे हे शिकवायला हवं.
आजकाल मुलींना पूर्वी ठरवून दिलेली कार्यक्षेत्र झुगारून द्यावीत हे शिकवलं जातं. मुलांच्या कार्य क्षेत्रात मुलींचा  सहज वावर  मुलांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण करतो.
एकमेकांच्या कार्य क्षेत्रात घुसखोरी होतेय जाणवून देण्यापेक्षा त्या ऐवजी सगळीच कार्य क्षेत्र आपली आहेत हे दोघांनाही सांगत आवडेल ते क्षेत्र निवडण्याच स्वातंत्र्य त्यांना दिलं  तर वैचारिक संघर्ष टाळता येईल.

नात्यानं मधे संवाद निर्माण करायला हवा .
नवरा बायको ने एकमेकांशी मोकळे पणाने बोलून एकमेंकांच्या अपेक्षा समजून घ्यायला हव्यात. एकमेकांना बदलण्यापेक्षा स्वतः मधे शक्य ते बदल घडवून आणायला हवेत. हे करत असताना एकमेकांमधे बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे .
आजकालची पिढी रुढी परंपरा याबाबतची माहिती घरातल्या मोठ्यांकडून  शिकण्याएवेजी सोशल मीडियावरून घेतात. आज जेवायला काय करू ? हे सासूला विचारताना कमीपणा वाटतो पण हा आणि असे अनेक घरगुती प्रश्न सोशल मीडियावर बिंधास्त विचारले जातात.
सासू सून वाद ही समस्या बघता वाटतं पूर्वी वानप्रस्थाश्रम होत ते काय वाईट होत. नवं स्विकारण्याच्या नादात जून चांगल असूनही माग पडलं.
कधी कधी जी आई मुलगा आणि मुलीला समानते ने वाढवते तीच आई सासू झाल्यावर मात्र मुलगी आणि सून यांच्यात भेदभाव करतांना आढळते .

समानता जर व्यवहारात आणली तर मुलगा- मुलगी, मुलगा -सून , मुलगी-सून , नणंद -भावजय, बहिण- नणंद, सासू- आई, मुलगा- जावई हे आणि असे अनेक भेद समाजातून नष्ट होतील.
"जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी " हे उगाच बोलल्या गेलं नाही आपल्यात ती शक्ती आहे तेव्हा आपणच आपल्या पुढच्या पिढीत समानता रुजवायला हवी. त्याआधी आपल्या स्वतः मधे ती भिनवायला हवी. नवीन संस्कृती उदयाला घालतांना जुन्या संस्कृतीच्या चांगल्या गोष्टीही सोबत घ्यायला हव्या. संसार करणाऱ्या नवरा बायको मधे स्पर्धा निर्माण न करता , त्यांची जुन्या पिढीशी तुलना न करता संसार त्या दोघांचाही आहे, तडजोड दोघांनाही करावी लागेल  ही जाणीव करून द्यायला हवी. आता केलेल्या छोट्या छोट्या तडजोडी सुखी संसाराची नांदी असतात हेही लक्षात घ्यायला हवं.
लग्न करणाऱ्या मुला मुलींना आजकाल सगळं मनासारखं, परफेक्ट लागतं पण ते तस भेटलं नाही तर आपल्या मनासारखं करून घेत असतांनाच जोडीदाराच्या मनालाही जपावं लागतं याची शिकवण द्यायला हवी.
असं केलं तर घटस्पोटाच प्रमाण कमी होईल .


"आजकाल" निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्येची कारण ही भूतकाळात दडलेली असतात. त्यावर वर्तमानकाळातच उपाय योजना केल्या गेली तर भविष्य काळ नक्कीच सुखकारक होईल. अशी माझी धारणा आहे.

जिथे घटस्फोट घेणे अनिवार्य आहे तिथे तो घेतलाच जावा. उगाच नात टिकवायचे एकतर्फी प्रयत्न करत आयुष्य वाया घालवू नये याच मताची मी ही आहे.
पाश्च्यात्य संस्कृतीचे अनुकरण करतांना आपल्या संस्कृतीत असलेल्या चांगल्या मूल्यांची  जपणूक आवर्जून करायला हवी. बदलत्या काळानुसार पुरातन ज्ञान आणि आधुनिक विचार यांची योग्य सांगड घालायला हवी तरच आपली कुटुंब संस्कृती खऱ्या अर्थाने बहरेल .
वाचकांना माझे मत पटेल न पटेल पण आजही घटस्पोटाकडे अखेरचा पर्याय म्हणूनच पाहिले जावे एवढीच माफक इच्छा आहे म्हणून हा लेखन प्रपंच.
©️ अंजली मीनानाथ धस्के
(लिखाण आवडल्यास  प्रतिक्रिया नोंदवायला विसरु नका. या लेखाच्या प्रकाशनाचे सगळे हक्क लेखिकेच्या मालकीचे आहेत. नावा शिवाय कुठेही प्रकाशित केलेले आढळल्यास कारवाई करण्यात येईल.)

फिटनेस फंडा

फिटनेस_फंडा   
            बागेतल्या झाडांमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या ओपन जिम मधील उत्साही माणसांना बघून, 'आजकाल फिटनेससाठी काय काय केलं जातं ' यावर चर्चा सुरू होती. सगळी तरुण झाडे सळसळ करत आपले मुद्दे मांडत होते. ज्येष्ठ वृक्ष मात्र शांत उभा होता. तेवढ्यात  सकाळी बागेत फिरायला येणाऱ्यांना आकर्षित करून स्वतःच्या क्लबचे  मेंबर बनवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांनी 'डान्सिंग फॉर फिटनेस' ची फ्री कार्यशाळा आज आयोजित केली आहे असे जाहीर केले. त्यांनी स्पीकर वर आधुनिक गाणी लावली. सगळ्या झाडांची सळसळ थांबली. कान मात्र टवकारल्या गेले. समोर काही मुले उभी राहून हात पाय कसे हलवायचे याबद्दल सूचना देवू लागली. फार काही प्रतिसाद मिळत नाही हे बघून लोकांचे लक्ष वेधून घेत त्यांच्यातील एका गुटगुटीत पोराने माईकचा ताबा घेतला. त्यावर  ," आपल्या आयुष्यात खूप टेन्शन असतात. त्या सगळ्यांना घटकाभर तरी विसरता आलं पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी थोडा तरी वेळ काढता आला पाहिजे. कसलीही लाज बाळगू नका. नाचता येत नसेल तर आम्ही शिकवू. हसत खेळत , झिंगाट ऐकत फिटनेस मिळवा आणि आयुष्याची गाडी बुंगाट पळवा". असे बोलला. तसे पुन्हा एकदा नव्या जोमाने गाणी लागली.
           " झिंग झिंग झिंगाट" ,
"तुझ्या साडीला सर्फ लावून धुवून टाक" अशी गाणी जोरात वाजू लागली.  सकाळी असली गाणी कानावर पडल्याने,  व्हायचं तेच झालं. पार्टी आणि व्यायाम यायला फरक न कळल्याने गाणी ऐकताच रात्रीचा हँग ओव्हर न उतरलेले काही जण त्यांच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत बेधुंद होऊन नाचत सुटले. मघाचा माईक हातात घेतलेला गुटगुटीत पोरगाही सूचना देत देत नाचायला लागला.
दुर बाकावर बसलेल म्हातारं मित्राला म्हणलं ," माझा नातूबी रोज रात्री  पार्टी का काय म्हणत असच गाणं लावून नाचतंय. डोकं उठवतंय . आता सकाळच्या पारी फिटनेसच्या नावावर डोकं उठवण्याचे यांना पैसे  द्यायचे? घोर कलयुग आलाय .... हरी ओम .. .. हरी ओम "
तेव्हढ्यात 'आवाज वाढव डिजे तुला आईची शपथ हाय' हे गाणं लागले. त्या गाण्याच्या तालावर उत्साहित तरुण झाडांनीही ताल धरला. ती सगळी अधिकच सळसळू लागली.
मघाशी माईक हातात घेऊन आयुष्याला बुंगाट पळवा म्हणणारा गुटगुटीत पोरगा आता नाचून थकल्याने कोपऱ्यात जावून धापा टाकायला लागला.
     तरी काही चाणाक्ष झाडांनी त्याला हेरलच. त्यांच्यात ," हा स्वतः अजून इतका गुटगुटीत आहे. जरा नाचला नाही तर धापा टाकतो आहे. हा काय लोकांची आयुष्य बुंगाट पळवणार?" अशी जोरदार चर्चाही रंगू लागली. 
          हा सगळा प्रकार गुपचूप बघणारं जून झाड मात्र, "संगीत संस्कृतीत प्रत्येक प्रहरासाठी एक विशिष्ट राग आहे. त्याचाच नेमका आजच्या पिढीला विसर पडला आहे" म्हणत खिन्न हसलं.' काळासोबत बदलायलाच हवं. बदलता येत नसेल तर निदान गप्प राहणे शिकायला हवे.' असे स्वत:लाच समजावत " तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे " या स्वतःच्याच जुन्या फिटनेस फंड्यावर डोळे मिटून घेत गार वाऱ्यासोबत ताल धरून डूलायला लागलं.

©️ अंजली मीनानाथ धस्के
लिखाण आवडल्यास प्रतिक्रिया नोंदवायला विसरु नका.
(या लेखाच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या मालकीचे आहेत.)

असाही बालदिन

#असाही_बालदिन
#१००शब्दांचीगोष्ट
सोहम आणि स्पृहाने  रागातच साक्षीच्या केबीनमधे प्रवेश केला. ती तिथे नव्हती.   स्पृहाच लक्ष टेबलवर ठेवलेल्या भेटवस्तूंकडे गेलं. त्यावरचा मजकूर अर्धवट होता. आपल्यासाठी  मजकूर लिहितांना तिला तात्काळ शस्त्रक्रिया विभागाकडे  जावं लागलं होतं याची जाणीव होवून दोघांचाही राग शांत झाला.  शेजारच्या खोलीत असलेले आजोबा औषध घ्यायला नकार देत आरडाओरडा करत होते. दोघांनी तिथे जाऊन साक्षी सांगते तसचं त्या आजोबांना समजावून सांगितलं. त्यांनी बालकांपुढे बालहट्ट मागे घेत  इंजेक्शनही  घेतलं.
तेवढ्यात आजोबांची समजूत काढण्यासाठी साक्षी तिथे पोहचली. समोरचे दृश्य पाहून,"बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा" म्हणत तिघांनाही चॉकलेट्स दिली. आजोबा त्यावर दिलखुलास हसले. मुले तिला प्रेमाने बिलगली आणि सगळ्यांनाच प्रगल्भतेची जाणीव करून देणारा बालदिन साजरा झाला.
©️ अंजली मीनानाथ धस्के
anjali-rangoli.blogspot.com
या लिंक वर इतर लिखाण आणि रांगोळ्या उपलब्ध आहेत.
Momspresso Marathi वर विजेती कथा म्हणून निवड झालेली ही १०० शब्दांची गोष्ट.