व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी( भाग १३ )

 कथा मालिका :  व.नि.ता ( भाग १३ )

विषय: कौटुंबिक कथा

भाग १३:

©️Anjali Minanath Dhaske 

         एवढ्या रात्री प्रतीकला बस थांब्यावर बघून साक्षीला आश्चर्य वाटले. वडील आणि भाऊ दोघे थोडा वेळ काहीतरी बोलले. भावाने वडिलांना पैशाचे बंडल दिले. वडिलांनी खिश्यातून काहीतरी काढून भावाच्या हातात दिले. भावाने ते खावून अलगद वडिलांच्या मांडीवर डोके ठेवले.  

      आपल्याच भावाला भेटायला येतांना वडिल आपल्याशी खोटे का बोलले? इतक्या रात्री हे एकमेकांना का भेटतात? वडिलांनी खिशात काय लपविले होते? भावाने इतके पैसे कुठून आणले व आपल्या वडिलांना का दिले? असे अनेक प्रश्न साक्षीला पडले होते. इतक्यात प्रसादचा फोन वाजला. त्या आवाजाने मुलगी दचकली परंतु आपला भाऊ मांडीवर गाढ झोपून आहे याचे तिला आश्चर्य वाटले. 

           प्रसाद मोबाईलवर बोलू लागला, " अहो शेठ, देतो तुमचे पैसे, इथे सगळे फासे उलटे पडले म्हणून वेळ लागतोय. .... नाही.... आता  पैसे देण्याऐवजी येतांना तुमच्यासाठी कोवळा माल घेवून येतो. महिनाभरात तो तयार होईल. लतच अशी लागेल की त्याला तयार व्हावेच लागेल. सध्या माझ्या मांडीवरच डोक ठेवून शांत झोपला आहे. नाही.... नाही..शेठ... मुलगी तर अजूनच कोवळी आहे. दिसायला सुंदर आहे. तिचे तर वेगळे वीस लाख घेणार त्याहून एक रुपया कमी घेणार नाही. फोटो पाठवतो तुम्हाला. तुम्हीच बघा. पैसे माझ्या खात्यात जमा झाले की लगेच तुम्हाला माल पोच करतो. शब्द आहे आपला.... शेठ. काळजी करू नका. यावेळी फसवणार नाही. गुड नाईट "

         प्रसादने मोबाईल मधून साक्षीचे अनेक फोटो घेतले होते. त्यातील एक फोटो त्याने त्याच्या शेठला पाठविला.  

           त्याचे हे बोलणे आणि कृती बघून, ऐकून साक्षी भीतीने गांगरून गेली. प्रतीकने झोपेचे नाटक सुरूच ठेवले अन्यथा प्रसादला संशय आला असता आणि बर्‍याच गोष्टी अधिक हाताबाहेर गेल्या असत्या.  प्रसादने प्रतीकचे डोके बाकावर ठेवले. खिशातून पैसे काढून नीट मोजून घेतले. लगेच तो आपल्या खोलीवर जायला निघाला. 

             साक्षी तिथेच एका दुकानाच्या आडोशाला लपून राहिली. प्रतीकला नक्की काय झाले आहे याची तिला तपासणी करायची होती. प्रसाद गेल्यानंतर साक्षी भावाजवळ गेली. तसा प्रतीक उठून बसला. त्याने खिशात लपवून ठेवलेले पान उघडून बघितले. त्यात दोन गोळ्या ठेवलेल्या होत्या. प्रसाद काय समजायचे ते समजून गेला.  त्याने साक्षीच्या हाताला धरून तडक घर गाठले. मुलांना दारात बघून वनिताने सगळ्यात आधी देबश्री ताईंना फोन केला. देबश्री ताईंनी दुसर्‍याच क्षणी दबा धरून बसलेल्या पोलिसांना कळविले. खोलीवर परतणा-या प्रसादला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. 

        दोन्ही मुलांनी वनिताला कडकडून मिठी मारली. मुलांना झालेला पश्चाताप आणि वनिताला झालेला आनंद दोन्ही अश्रू रूपाने ओघळू लागले. आयुष्याची कठीण लढाई वनिताने पुन्हा एकदा देबश्री ताईंच्या मदतीने जिंकली होती. 

         सध्या प्रतीकने परदेशात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून भारतात चांगल्या पगाराची नोकरी मिळवली.  लग्न होवून त्याचे छोटे चौकोनी कुटूंब आहे. साक्षीने सी.ए. चा अभ्यासक्रम पूर्ण केला. चांगल्या कंपन्यांसाठी उत्तम आर्थिक सल्लागाराची कामे ती तिच्या छोट्या कार्यालयात सक्षमपणे पार पाडते. एका गोंडस मुलीची ती आई असून सुखी संसार सांभाळते आहे. 

               प्रत्येक स्त्रीमधे संकटांवर मात करण्याची शक्ती असतेच. संकटात असलेल्या स्त्रीला गरज असते ती तिच्यातील शक्तीला ओळखून योग्य मार्गदर्शन देण्याची आणि थोड्या आधाराची. याची प्रचीती वनिताला आश्रमातील आयुष्यात अनेकदा आली होती. संसारात स्त्रीचे चरित्र पुरुषाचे भाग्य ठरविते तर पुरुषांचे कर्म स्त्रीचे आयुष्य घडविते. प्रसादचे वाईट वर्तन वनिताच्या दुःखाला कारणीभूत ठरले होते तरी तिने स्वतःच्या क्षमतांचा शोध घेत आयुष्याला नवी झळाळी प्राप्त करून दिली.

                 वनिताने सेवा निवृत्ती स्विकारली असून देबाश्री ताईंच्या  आश्रमाचा कारभार तीने विस्तारण्याचे  काम सुरू केले. प्रत्येक भागातील गरजू स्त्रीला आणि अनाथ मुलांना योग्य वेळेत मदत मिळावी म्हणून तिने आश्रम संस्थेच्या अनेक छोट्या शाखा काढल्या. मुंबईत स्थापन केलेल्या आश्रम शाखेचा कार्यभाग ती स्वतः सांभाळत आहे. वनिताच्या आईवडिलांनी तिला भेटून घरी येण्याविषयी तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या नात्यातील स्वार्थाने आधीच ती पोळल्या गेली होती. त्या मायेचे दोर तीने केव्हाच कापून टाकले होते. आता मात्र तिच्या सारख्या अनेक स्त्रियांना त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदतीचा हात देत आहे. " स्त्री क्षणाची  पत्नी आणि अनंत काळाची माता असते " या उक्ती प्रमाणेच तिने आयुष्य व्यतीत केले. आयुष्याच्या कठीण समयी देबाश्री ताईंनीच तिच्या पालकांची भूमिका अगदी चोख निभावली होती. म्हणूनच आईवडिलांकडे न जाता तिने देबाश्री ताईंच्या सत्कार्याचा वारसा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

       अल्प कालावधीतील तिचे अफाट समाजकार्य बघून तिला अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे .

स्वतःच्या आयुष्यातील काळा भूतकाळ मागे टाकत अनेक स्त्रियांच्या, अनाथ मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून त्यांना उज्ज्वल भविष्य बहाल करते आहे. आता वनिता हे फक्त नाव राहिले नसून तीचा सहवास अनेकांसाठी वरदायक ठरत आहे. निर्मोही होवून समाजकार्य करणारी ती आता अनेकींची तारिणी देखील आहे. 



©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

टिप:  तुम्हाला कथा मालिका कशी  वाटली? तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. कथेतील  संपूर्ण कथानक काल्पनिक असून कुठल्याही पात्राशी वास्तवात साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. लेखन आवडल्यास नावासहितच शेयर करावे ही नम्र विनंती. संपूर्ण कथा वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद. 

भाग १  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html

भाग ५ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_68.html

भाग ६ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_9.html

भाग ७ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_71.html

भाग ८ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_11.html


भाग ९ link:

भाग १० link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_13.html

भाग ११  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_87.html

भाग १२ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_46.html



No comments:

Post a Comment