असंगाशी संग .... प्राणाशी गाठ

   #असंगाशी_संग_प्राणाशी_गाठ

            आज काल का कोणास ठाऊक मी बी. एड. करत असतांना चे दिवस आठवतात. तेव्हा अभ्यासक्रमात खूप कार्यक्रम समाविष्ट करण्यात आले होते. त्या पैकी एक म्हणजे ' छात्र सेवा कल' . या उपक्रमा अंतर्गत आम्हा शिक्षक विद्यार्थ्यांनी आठ दिवस संपूर्ण शाळा आणि शाळेचा कारभार जसा चालतो अगदी तसाच तो  चालवायचा असतो. मुख्याध्यापक ....वर्ग शिक्षक ..... विषय शिक्षक व.... चपराशी सगळ्या भूमिका आम्हीच करायच्या असतात. शाळा सुरू होते त्या प्रार्थापासून ते शाळा सुटे पर्यंत सगळी जबाबदारी आमची असायची.  शाळा सुटतांना शाळेतील विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण या विषयाच्या अंतर्गत एक कथा सांगायची....  प्रार्थना घ्यायची आणि मगच सगळे विद्यार्थी घरी जायचे . असा शाळेचा नियम होता.
शक्य तोवर हे काम आमच्या सोबत असणारे आमचे सहकारी ज्यांनी बी एड. ला मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेची निवड केली आहे ते करत.
 एक दिवस   ज्या वर्गाची मी आठ दिवसांसाठीची  वर्ग शिक्षिका होते  . तसेच मी ज्या वर्गावर पाठ घ्यायचे ते विद्यार्थी गोंधळ घालून माझे नाव मोठं मोठ्याने घेवू लागले . मुख्याध्यपकांनी त्यांना विचारल्यावर मुलांनी सांगितलं की आम्हाला ज्या गणित आणि विज्ञान विषय शिकवायला येतात त्या ताईनेच आज कथा सांगावी.
  आमच्या वेळा पत्रकात पुर्ण आठ दिवसांचे नियोजन आधीच झाले होते . त्यानुसार सगळे तयारी करत होते.    मूल्यशिक्षण .... बोध कथा ...... ..... या कसल्याच बाबींची   मी तयारी केली नव्हती की  विचारही  केला नव्हता.   असं अचानक सगळ्या शाळेसमोर बोधकथा सांगायची म्हंटल्यावर माझे हात पाय थरथरायला लागले.  वर्गात ५० मुलांना शिकवण वेगळं आणि सगळ्या  शाळेसमोर.... शिक्षक.... विद्यार्थ्यांसमोर ... असं कुठलीच तयारी न करता बोलण वेगळं.
माझे सहकारी जे ठरल्या प्रमाणे तयारी करून आले होते त्यांचा खोळंबा झाला होता याचाही माझ्या मनावर ताण आला. मी " उद्या नक्की सांगते " असं म्हणून टाळू पहात होते तितके ते काम मीच करावे असा आग्रह होत होता.
मला एकही कथा आठवेना ..... माझ्या हातात माईक .... हात थरथरत आहेत . माझ्या मनावर ताण आला की माझा आवाज कापरा होतो.    कापऱ्या आवाजात माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले ," आज जी कथा मी सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे , ' असंगाशी संग .... प्राणाशी गाठ'. मी सुरुवात केली आहे म्हंटल्यावर वातावरण अधिकच शांत झाले . अगदी इतके शांत की माझ्या धडधडत्या हृदयाचे ठोके माईक मधून सगळ्यांनाच ऐकू जातील की काय अशी भीती मला वाटली.
माझा आवाज भीतीने अधिकच कपरा झाला.
                 तरी मी कथा सांगायला सुरूवात  केली, " एक आटपाट नगर होतं. त्या नगराचा एक राजा होता . त्या राजाची एक सुंदर राणी होती . राजा त्या राणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा. एके दिवशी राणीला नदीवर आंघोळ करण्याची इच्छा झाली. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठीची सगळी तयारी सुरू झाली. नदीवर सैनिक पाठवण्यात आले . सगळी व्यवस्था अगदी चोख करण्यात आली. राणी तिच्या सखींसोबत  पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत असतांना ,सैनिक मात्र   थोडे अंतर ठेवून  राणी आणि राणीच्या सामानाचे संरक्षण करण्यासाठी पहारा देत उभे राहिले.

                सगळे कान देवून ,ऐकत आहे म्हंटल्यावर आवाजातला कंप जरा कमी झाला. मीही कथा सांगण्यात रमले.
              या नदी शेजारीच सुंदर वनराई होती . या वनराईत एक खूप मोठे वडाचे झाड होते. या झाडावर एक कावळा .... एक बगळा आणि इतर अनेक पक्ष्यांची घरटी होती. झाडाच्या सावलीतच मोठे बिळ होते . त्यात एक  विषारी नाग ही रहात होता. कावळ्याने सांगावे आणि इतरांनी करावे असे सगळे आनंदात नांदत होते.  कावळ्याला कायम बागळ्याचा राग येई . त्याचा रंग पांढरा शुभ्र ..... वागणूक सगळ्यांशी प्रेमाची .... कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही . मुख्य म्हणजे बगळा  कावळ्याचे सांगणे फार मनावर घेत नसे . जे त्याला योग्य वाटे तेच तो करत असे . कावळ्याचे ही सगळ्यांशी संबंध होतेच पण त्या सगळ्यांनी आपलंच ऐकावं .... या झाडावर फक्त आपली हुकूमत चालवी अशी लालसा त्याच्या मनात निर्माण झाली. सगळे पक्षी कामासाठी बाहेर पडले की कावळा राहिलेल्या पक्षांसोबत इतर पक्षांची निंदा करत असे . बगळ्याने ही हे सगळ करावं असं त्याचं मत होतं. पण बगळा काही त्याला दाद देईना. कावळ्यात एक दुर्गुण होता . तो म्हणजे कावळा हलक्या कानाचा होता. ''खरं काय खोटं काय ' याचा विचार न करता इतर सांगतील त्यावर विश्वास ठेवणारा होता. कोणी त्याची खोटी स्तुती केली की तो स्तुती करणाऱ्याचे वाटेल ते काम करून देत असे. सगळ्यांनी आपल्या बद्दल चांगलेच बोलावे असा त्याचा आग्रह होता.     साप ..... कावळा आणि बगळा दोघांशी बोलत असे.  आता कावळ्याने या  विषारी  सापाची मदत घेण्याचे ठरवले . सापाला खुश करण्याची एकही संधी तो सोडत नसे.  कावळा आपली सगळी कामे बिनबोभाट करतो आहे म्हंटल्यावर सापही कावळ्याच्या फायदा घेवू लागला.   आता कावळ्याने आपली जास्तीत जास्त कामे करावी म्हणून सापही त्याला मुद्दाम बागळ्याच्या विरोधात अनेक गोष्टी सांगू लागला.  शब्दांचे विष कावळ्याच्या कानात ओतू लागला. या सगळ्याचा परिणाम म्हणून ,  साप आपल्या बाजूने आहे म्हंटल्यावर कावळ्याला अधीकच चेव चढला. इतर पक्ष्यांनाही कावळ्याचा  त्रास होताच . कावळ्याच्या विरोधात बोलायला कोणी तयार होत नसे . कोणालाही कावळ्याचा  काही त्रास झाला तर,' ज्याचं तो बघून घेईल ' असे म्हणून सगळे गप्प बसून रहात. पण त्यांना हे कळत नव्हते की जो त्रास आज दुसऱ्याला आहे तोच त्रास कधी ना कधी आपल्याला होणार आहे. आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून  त्यातले काही पक्षी कावळ्याला जावून मिळाले.  कावळ्यानेही आपल्या सारख्याच वाईट विचारांचे पक्षी जमवायला सुरुवात केली. हे सगळे मिळून    कावळ्याच्या मदतीने इतरांना त्रास देवू लागले. बगळ्याने  खूप समजावलं की सगळे प्रेमाने राहू. झाडावरचे वातावरण पूर्वी सारखेच करू .पण त्यांना आता या वाईट कामांचीच चटक लागली .  बगळ्याच्या विरोधात काहीही सांगितल की कावळा आपली कामं आनंदाने करतो म्हंटल्यावर काही पक्षीही  सापा सारखेच कावळ्याचे कान भरू लागले . बगळा काही केल्या कावळ्याच्या ऐकण्यात येईना आणि कावळ्याच्या विरोधातही काहीच करेना तेव्हा कावळ्याला बगळ्याशी प्रेमानेच बोलावे लागे . त्या दोघांना प्रेमाने बोलतांना बघून सापाला विनाकारणच असे वाटू लागले की हे दोघे मित्र झाले तर आपली कामं कोण करणार. त्याला राहून राहून वाटू लागलं की या दोघात भांडण व्हायलाच हवे. त्याने कावळ्याचे कान भरायचे काम अधिक जोमाने सुरू केले. तो सांगू लागला की," तुमच्या समोर गोड बोलतो पण माघारी तुमच्या विषयी नेहमी खूप वाईट बोलत असतो . इतका वाईट बोलतो की तुम्हाला त्याच्याशी बोलायचं तर बोला मी इथून पुढे तुम्हा दोघांशीही बोलणार नाही".  कावळा डोक्याने आधीच अर्धवट त्यात सापाची साथ सुटली तर इतर पक्ष्यांनाही आपला धाक राहणार नाही असं वाटून कावळ्याने बगळ्याचा काटा काढायचाच असे  ठरवले .
           एके दिवशी राजाचे सैनिक नदीच्या काठावर राणीच्या आंघोळीची तयारी करतानां सापाने पाहिले . त्यांच्या जवळच्या दगडावर  बगळा निवांत बसलेलाही  त्याने पाहिला. त्यालाही नदितल्या पाण्यात आंघोळ करायची होती.

पण त्याला  बघताच   सैनिक  धावत आले आणि त्याला हाकलून लावले . त्याच्या  मनात बगळ्या विषयीचा  राग अधिकच  उफाळून आला. सापाने कावळ्याला  सांगितलं की बगळ्याचा काटा काढण्याची एक नामी युक्ती त्याला सुचली आहे. जेव्हा साप सैनिकांचे लक्ष वेधून घेईल ती संधी साधून कावळ्याने आंघोळीला आलेल्या राणीचा हिऱ्यांचा हार पळवायचा . हार घेण्याआधी सैनिकांचे लक्ष स्वतः कडे वेधून घ्यायचे  आणि उडायला सुरुवात करायची . म्हणजे ते कावळ्याचा  माग काढायला सुरुवात करतील . ही संधी साधून साप पटकन् त्याच्या बिळात लपून जाईल . कावळ्याने तो हार  बगळ्याच्या घरट्यात नेवून ठेवायचा. सैनिक आले की त्यांचे लक्ष घरट्याकडे वेधून घ्यायचे आणि पळून जायचं.  सैनिक  रागाच्या भरात बगळ्याचे घरटे उध्वस्त करतील. घरटे उध्वस्त झाले की आपोआपच बगळाही परत इथे येणार नाही".
कसलाही विचार न करता कावळा लगेच तयार झाला.
ठरल्या प्रमाणे सगळ झालं . हार बगळ्याच्या घरात ठेवला . नेमकं बगळ्याने ते पाहिलं . वेळ फार कमी होता . बगळ्याकडे दोनच पर्याय उपलब्ध होते . एक.....   घरट्याचा विचार सोडून जीव वाचवून पळून जाणं . दुसरा..... आलेल्या परिस्थितीला तोंड देवून  या दोघांना  कायमचा धडा शिकवणे.
पहिला पर्याय खूप सोपा होता. पण बगळ्याला माहित होत की जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी कावळा आणि सापसारखे लोक भेटतीलच किती दिवस त्यांना टाळत ... भीत आपण जगणार . आता आपल्या अस्तित्वासाठी का असेना आपल्याला लढावे लागणार. त्याने चटकन् तो हार आपल्या चोचीत घेतला आणि सापाच्याच  बिळात टाकला . तेवढ्यात सैनिक तिथे आले. बगळा लगेच उडून गेला. सैनिकांनी कावळ्याला हार उचलतांना पाहिलं होत त्यामुळे त्यांनीही बागळ्याला काही केलं नाही.  हार घरट्यात नाही हे पाहून तर आता कावळ्याचे धाबे दणाणले . तो मोठं मोठ्याने काव काव करू लागला . त्याची काव काव ऐकून त्याच्या मदतीला इतर पक्षी ही आले . अचानक ऐवढे पक्षी बघून सैनिकांनी धनुष्य बाण चालवायला सुरुवात केली.  या गोंधळात पक्षी दुसरीकडे उडून गेले पण काही घरटी तुटली . कावळा जखमी झाला त्याला उडता येईना.
इकडे कावळ्याच्या आवाजाने गोंधळून  जावून साप ही बिळाच्या बाहेर पडला . एका सैनिकाचे  लगेच त्याच्या बिळावर लक्ष गेले. तिथेच राणीचा हार पडलेला दिसला . त्याने ओरडून सगळ्यांना सावध केलं आणि काठी घालून सापाला मारून टाकले  .  हार घेवून  सैनिक निघून गेले.
 वातावरण शांत झाल्यावर सगळे पक्षी परतले.
बगळाही  आपल्या घरट्यात परत आला . कावळा जखमी होवून विव्हळत होता . विष ओकणारा साप मरण पावला होता. ज्यांनी ज्यांनी कावळ्याला साथ दिली होती सूदैवाने त्यांची घरटीच  फक्त तुटलेली होती पण  प्राण मात्र थोडक्यात बचावले होते. आता सगळ्याच पक्षांना कळून चुकले की वाईट माणसांची संगत केली की आपलेही  वाईटच होते. तेव्हा सगळ्यांनी एकी केली व कावळ्याला त्या झाडावरून हाकलून लावले.

गोष्ट सांगून झाल्यावर नेहमी प्रमाणे त्यातून काय शिकलो यावर चर्चा करायची असते म्हणून मग मी नेहमीचाच प्रश्न विचारला, "आता या गोष्टीतून तुम्ही काय बोध घेतला?"
आठवीतल्या एका हुशार मुलीने फार सुंदर उत्तर दिले.
 ," ही कथा नावा प्रमाणेच बोध देते ..... " असंगाशी संग ...... प्राणाशी गाठ "....वाईट माणसांची संगत ही तात्पुरती सुखकारक असली  तरी या संगतीचे  वाईट परिणाम हे दूरगामी असतात. अनेकदा त्यांच्या संगतीने येणारी संकट ही जीवावर बेतणारी असतात ".

मुख्याध्याकांना कथा फार आवडली होती त्यांनी लगेच माझ्या हातून माईक घेत मुलांशी संवाद साधला, " तुम्ही ज्या पद्धतीने शांत बसून ऐकत होता त्यावरून स्पष्ट आहे की तुम्हाला ही कथा आवडली..... तेव्हा तुम्हाला या कथेतील कोणा प्रमाणे वागायला आवडेल ? "
सगळ्यांनी एका सुरात सांगितले ," बगळ्याप्रमाणे".
लगेच पुढचा प्रश्न ," बगळ्याप्रमाणे का? "
मुलांनी हात वर केले .... एकेकाला उत्तर देण्याची संधी दिली . थोड्या फार फरकाने सगळ्यांची उत्तर अशीच होती.....
कारण बगळा हुशार .... चतुर आहे म्हणून
कारण बगळा सद् मार्गी आहे म्हणून

त्यावर ते म्हणाले , ....." ही कथा मलाही खूप आवडली... कारण यात  सद् मार्गी बगळा तर आहेच पण ही कथा आपल्या समाज व्यवस्थेचं प्रतीक ही आहे   .  बगळा होण वाटतं तेवढं सोपं नाही. ..... जेव्हा तुम्ही समाजात राहता तेव्हा  अनेक  प्रसंग असे येतात की लोकं छोट्या स्वार्थासाठीही तुमचा गैर फायदा घेऊ शकतात.  आपण हलक्या कानाचं असता कामा नये. दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः च्या अनुभवावर निर्णय घेतला जाणे गरजेचे असते. तुमच्या आजूबाजूला अनेक  माणसं सापासारखी  असतात. जे स्वार्थापोटी शब्दाचं विष आपल्या कानात ओकत असतात. अशा सापांना वेळीच ठेचलं पाहिजे अन्यथा आपल्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग ओढवू शकतात. ही कथा आपल्या समाज व्यवस्थेचं उदाहरण आहे .... झाडावर चांगले वाईट दोन्ही प्रकारचे पक्षी आहेत पण वाईट कामं करणाऱ्यांची एकी लवकर झाली ..... चांगल्या विचारांच्या पक्ष्यांना संघटित व्हायला वेळ लागला. जर चांगल्या विचारांचे पक्षी वेळीच संघटित झाले असते तर कावळ्याला समज देणे .... गरज पडल्यास हाकलून देणे त्यांना अवघड नव्हते . त्यांच्यावर कठीण प्रसंग ओढवला नसता पण जोवर स्वतः ला त्रास होत नाही तोपर्यंत , " आपल्याला काय करायचं दुसऱ्याचं  ....  त्यांचं ते बघून घेतील . अशीच भूमिका सगळ्यांची असते. आज जे दुसऱ्या सोबत घडले ते उद्या आपल्या सोबत हि घडू शकते याचा विसर आपल्याला पडलेला असतो.
संकट कितीही मोठे असले तरी आपण आपल्या सद् सद् विवेक बुध्दीच्या जोरावर तिचा सामना नक्कीच करू शकतो.
 जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी थोड्या फार फरकाने अशीच चांगली वाईट माणसे आपल्या आजूबाजूला असतात. तेव्हा पाठ दाखवून पळून जाणे सोपे असते . खरी हिंमत खंबीरपणे लढण्यात असते.
बघ्याची भूमिका घेणं सोपं असतं पण गरज असते ती योग्य वेळी  आपली मते स्पष्टपणे  मांडण्याची  आणि त्यावर ठाम राहण्याची . तेव्हाच समाजातील वाईट वृतींना आळा बसून सौख्याचे वातावरण प्रस्थापित होईल."
आम्ही सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला.
आज इतकी वर्ष झाली या प्रसंगाला पण ही बोध कथा आणि त्यावर मुख्याध्यापकांनी केलेले स्पष्टीकरण .... दोन्ही अगदी लक्षात राहिले .आजही जेव्हा एखाद्या वाईट व्यक्तीच्या सानिध्यात आल्याने एखाद्या वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागते .  तेव्हा मी ही कथा आणि मुख्याध्यापकांचे त्यावरचे स्पष्टीकरण आठवते . तेव्हा जे तितकसं समजलं नव्हतं ते आता मात्र नीट कळलं आहे.
आजही  ........ तेव्हा शिकलेले  मूल्यशिक्षण कामी पडते.
 आयुष्यात मी जे काही चांगले  काम केले  किंवा  करते आहे त्याचे सगळे श्रेय हे , " मला लाभलेल्या उत्तम व्यक्तींच्या सहवासालाच जाते ..... त्यांच्यातल्या चांगलेपणाने  मला नेहमीच वाईटा विरूद्ध खंबीरपणे उभे राहण्याची हिंमत दिली .
हा प्रसंग आठवण्याच दुसरं मजेशीर कारण म्हणजे , माझ्या या कथा कथनाने शाळेचे मुख्याध्यापक इतके प्रभावित झाले होते की त्यांनी आमच्या घरी येवुन माझ्या वडिलांकडे त्यांच्या मित्राच्या मुलासाठी मला मागणी घातली होती .  मुलाने आणि त्याच्या वडिलांनी माझ्याच नकळत मला याच छात्र सेवा काल मधे शाळेत वावरतांना बघितले होते .
मला पुढचे शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची होती त्यानंतरच मी लग्नाचा विचार करणार होते त्यामुळे माझ्या वडिलांना  त्यांना नाईलाजाने नकार कळवावा लागला होता.
मनात कुठलाही आकास न ठेवता . नकार मिळूनही माझ्या वडिलांना त्यांनी माझ्याच वेगळेपणा बद्दल सांगितले. माझ्या निमित्ताने का होईना त्यांची एकमेकांशी ओळख झाली .. याचं समाधान व्यक्त केलं.  तसचं  लग्नाच्या गाठी स्वर्गात  बांधल्या जातात ..... असं स्वतः ला आणि माझ्या वडिलांना समजावलं होत.
  खरं तर आई बाबांचे सगळ्यात खोडकर अपत्य म्हणजे मी .... तरी झाल्या प्रकरणाने त्यांना माझा अभिमान वाटला हे मात्र नक्की .
असो......
 इथून पुढच्या वाटचालीतही  अशीच चांगली माणसं भेटत जातील आणि अनेक सकारात्मक विचारांनी ... अनुभवांनी मला समृध्द करतील  याची मला खात्री आहे.
समाजाचे प्रतीक असलेले या कथेतील वडाचे झाड रांगोळीत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( टिपः यात कुठलीही आत्मप्रौढी नसून .. ज्या प्रसंगांनी आत्मविश्वास वाढवला ... आपल्यातल्या चांगल्या गुणांची  ओळख करून दिली .... ... त्याबद्दल केवळ कृतज्ञ तेचे भाव आहेत .)


बोधकथा

#बोधकथाबी एड करत असतांना सगळ्यात आवडीचा कालावधी म्हणजे जेव्हा आमचे पाठ एखाद्या शाळेवर लागायचे .  खूप धम्माल असायची . आम्ही मुलांना शांत करून आमचा पाठ कसा पूर्ण करतो याला खूप महत्त्व असायचे . मला पाठा दरम्यान खूप शैक्षणिक साधने वापरायला आवडायची . आम्ही पाठ घेत असतांना आमचे सहकारी आणि प्राध्यापक आमचे निरिक्षण करण्यासाठी सगळ्यात शेवटच्या बाकावर बसायचे . प्राध्यापक आपण कसे शिकवतो हे बघण्यासाठी उपस्थित राहणार आहेत याचचं आम्हाला दडपण यायचं. पण सरावाने ते मागे बसले आहेत याचा विसर पडून मी माझा पाठ पूर्ण करू लागले . एके दिवशी मी माझा पाठ पूर्ण करून वर्गा बाहेर पडत असतांनाच त्या वर्गाचे वर्ग शिक्षक तिथे आले. आमचे प्राध्यापक मला माझ्या पाठविषयी काही सांगतील  म्हणून मी ही वर्गाबाहेर थांबले . आमचे प्राध्यापक आणि सहकारी मित्र बाहेर आले . माझ्या एका सहकारी मित्राने  केलेल्या निरीक्षणावर प्राध्यापकांची स्वाक्षरी घ्यावी म्हणून निरिक्षण वही त्यांच्या समोर धरली . त्यांनी सही करण्यासाठी पेन घेतला आणि  स्वाक्षरी करणार तेवढ्यात ते थांबले . त्यात नोंद होती की, " शैक्षणिक साहित्याचा वापर वाढवावा ". आमच्या प्राध्यापकांनी वरती नाव वाचलं तिथे माझे नाव लिहिले होते. त्यांनी लगेच त्या पानावर फुली मारली. सहकारी मित्र एकदम घाबरून गेले. काय चुकलं असं विचारू लागले. तेव्हा त्यांनी सांगितलं, " त्यांच्या वाजनापेक्षा जास्त त्या शैक्षणिक साहित्य वापरतात. आत्ताही बघ केवढे सामान त्यांच्या हातात आहे. उगाच लिहायचं म्हणून काहीही नोंदी लिहिण्यात काही अर्थ नाही".
आम्ही ज्या वर्गा बाहेर थांबलो होतो त्या वर्गात गोंधळ सुरू झाला. ज्यांचा तास होता ते शिक्षक गैर हजर होते आणि आता शाळेच्या कामानिमित्त बाहेर जावे लागणार असल्या कारणाने वर्ग शिक्षकांना ही वर्गात थांबणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी आमच्या प्राध्यापकांना विनंती केली की ते परत येई पर्यंत आम्हा शिक्षक  विद्यार्थ्यांनी त्यांचा  वर्ग शांत  करावा.
आमचे प्राध्यापक आम्हाला म्हणाले , "आता आपले लगेच तास नाहीतच मग शिक्षकांच्या खोलीत बसण्यापेक्षा या वर्गात जावून बसू तेवढीच त्यांना मदत होईल आणि पाठ टाचण नसतांनाही वर्ग कसा हाताळायचा याचा अनुभव तुम्हाला मिळेल ".
खरं तर मी आणि माझे दोन सहकारी आम्ही तिघही गणित आणि विज्ञान पद्धती स्वीकारलेले बी एड चे विद्यार्थी . तास ज्या शिक्षकांचा होता ते इतिहास आणि मूल्यशिक्षण हे दोन विषय शिकवायचे.
माझे पुढचे टाचण तयार होते पण मुल ऐकेना. त्यांना मी शिकवावे असे वाटत तर होते पण पुन्हा गणित सोडवण्याची त्यांची अजिबात तयारी नव्हती. माझ्या सहकाऱ्यांनी तयारी नाही सांगून हात झटकले. तेव्हा आमचे प्राध्यापक मला म्हणाले, " बोध कथा सांगून मूल्यशिक्षणाचा तास घेता येईल . तुम्ही प्रयत्न करा. नोकरी लागल्यावर असे  अनेक  प्रसंग येतात ".
मला कथा वाचायला आवडतात पण सांगायची वेळ येते तेव्हा एकही कथा आठवत नाही. वर्गात गोंधळ वाढत चालला तसे मी माझ्या प्राध्यापकांकडे  फार आशेने बघितले . मला वाटलं ते मला वर्गातली मुलं शांत करण्यासाठी मदत करतील . पण त्यांनी," मी इथे नाही असच समजा" असं घोषीत केले . माझ्या सहकाऱ्यांनी लगेच पुढाकार घेऊन मुलांना शांत करण्याचे काम सुरू केले . सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. बाजूच्या वर्गातले शिक्षकही आता आमच्या वर्गात आले . शेवटी मी धीर करून डस्टर माझ्या समोरच्या टेबलावर आपटले . सगळे एकदम शांत झाले. मी लगेच वर्गाचा ताबा घेत म्हणाले , " आता मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे . तुम्ही सगळे शांत राहिलात तरच मला हे शक्य आहे".
सगळ्यांनी एकच प्रश्न विचारला की कथेचं नाव काय ?
मला काही केल्या कथेचं नाव आठवत नव्हते. मग मी एक युक्ती केली . मी सांगून टाकलं की, "या कथेची एक गंमत आहे . आधी मी तुम्हाला कथा सांगणार . त्यातून तुम्हाला काय बोध झाला हे विचारणार . तुम्हाला जो बोध होईल त्याप्रमाणे तुम्हीच मला कथेसाठी एक छानस नाव सुचवायचे. ज्याचं नाव सगळ्यात छान तेच नाव या कथेला देण्यात येईल.
आता तर काय वर्ग अधिकच शांत झाला. मीही कथेला सुरुवात केली," फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे . एका  गावात खूप तेजस्वी असा एक साधू असतो.  त्याचे प्रवचन ऐकायला दुरून दुरून लोक येत असतात. त्याच गावात एक श्रीमंत व्यापारी रहात असतो . त्याच्या मनात येतं की या साधूला एकदा तरी आपल्या घरी जेवायला बोलवावे. त्यांच्या सारख्या महान साधूने आपल्या घरी जेवायला आल्यावर  गावात आपला मान अधिक वाढेल असे वाटून तो साधूला रोज घरी येण्यासाठी विनवत असतो. अनेक दिवस टाळून झाले तरी व्यापारी पिच्छा सोडत नाही म्हंटल्यावर साधूने त्याच्या घरी जेवायला जायचे ठरवले. व्यापाऱ्याला खूप आनंद झाला त्याने जय्यद तयारी केली. साधूचे स्वागत दणक्यात करण्यात आले. त्याची ही तयारी बघून साधूला व्यापाऱ्याविषयी प्रेम वाटू लागले. व्यापारी जेवतांना साधूला आग्रह करून करून वाढू लागला. साधूनेही सगळ्याच पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला. तांदळाची खीर तर साधूला इतकी आवडली की त्याने ती वारंवार खाल्ली.
          जेवण झाल्यावर साधू व्यापाऱ्याशी गप्पा मारत बसला.  व्यापारी लगेच साधूच्या पायाशी बसून त्याचे पाय चेपू लागला. साधूला आश्रमात परतायचे होते. पण भरपेट जेवण आणि सुरू असलेली सेवा याने त्याला झोप यायला लागली.  व्यापाऱ्याने आज माझ्याकडेच मुक्काम करा असा आग्रह धरला. साधूला त्याची ही विनंतीही टाळता आली नाही. साधूला एका खास खोलीत नेण्यात आलं.  झोपेमुळे साधूने त्या खोलीचे फारसे निरिक्षण केले नाही. साधू लगेच झोपी गेला. पहाटे जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने सभोवती नजर टाकली तर ती एक फारच सुंदर खोली होती. पलंग तर मऊ मऊ गादीचा होता. शेजारीच पाण्यासाठी चांदीचा तांब्या पेला ठेवलेला. खिडक्या .... पडदे.... सामान..... सगळंच खूप सुंदर . पण का कुणास ठाऊक साधूला चांदीचा पेला फारच आवडला . हा पेला आपण झोळीत टाकून घेवून गेलं तर कोणाला काय कळणार असा विचार त्याच्या मनात सुरू झाला. शेवटी न राहवून त्याने पेला झोळीत टाकला. व्यापाऱ्याचा निरोप घेऊन तो आश्रमात परतला.
        इकडे व्यापाऱ्याच्या घरात साधूच्या खोलीतला चांदीचा पेला गायब झाला म्हणून एकच गहजब उडाला. व्यापाऱ्याने सगळ्या नोकरांना बोलावून चौकशी सुरू केली. सगळ्यांना विचारूनही कोणी कबुल होईना तेव्हा व्यापाऱ्याने सगळ्यांनाच चाबकाचे फटके मारण्याचा निर्णय घेतला.
इकडे साधू रोजच्या सारखं साधनेला बसला . त्याचे चित्त मात्र एक सारखे झोलीतल्या चांदीच्या पेल्याकडेच लागले.
आता तर तो फार बेचैन झाला. त्याला कळेना की आपण हा पेला का उचलून आणला? आपल्या तर तो काहीच कामाचा नाही. आपल्या गरजाही फार कमी आहेत . मग ह्या पेल्याचा आपल्याला येवढा मोह का झाला?  चोरी करणे वाईट असे आपण आपल्या प्रवचनात सांगतो पण मग आज आपणच का चोरी केली? खूप खूप विचार केल्यावर त्याच्या मनात एक शंका आली आणि त्या शंकेच निरसन फक्त व्यापारीच करू शकतो असा विचार त्याच्या मनात आला . केलेली चूक वेळीच सूधारायला हवी असे वाटून त्याने ताबडतोब पेला घेतला आणि व्यापाऱ्याचे घर गाठले.
        तिथे व्यापाऱ्याने सगळ्या नोकरांना एका रांगेत उभे केले होते . त्यातल्या एका नोकराला चाबकाचे फटके मारायला सुरुवात केली होती. तो नोकर कळवळून सांगत होता की," मी चोरी नाही केली ".
हे दृश्य पाहून साधू दुःखी झाला. त्याने पुढे होवून चाबूक अडवला आणि चांदीचा पेला झोळीतून काढून व्यापाऱ्याच्या हातात दिला. "यांना मारू नकोस चोरी मी केली होती" अशी कबुलीही दिली.
     व्यापाऱ्याला वाटले साधू महान आहे . नोकरांना वाचवण्यासाठी स्वतःवर चोरीचा आळ घेतोय. त्याने साधूला विचारले , "  मागितला असता तर यापेक्षा मोठा आणि छान पेला मी तुम्हाला दिला असता . हे तुम्हाला माहिती आहे .तुम्ही चोरी का कराल? तुम्ही या नोकरांना वाचवण्यासाठी असे खोटे का बोलताय? "
     साधू ने सांगितले ," मी खोटे बोलत नाही. मलाही हाच प्रश्न पडला आहे की मी चोरी का केली ? याचे उत्तर शोधण्यासाठीच मी इथे आलो आहे. मला सांगा काल मी जी खीर आवडीने खात होतो तिचे सामान तु कसे मिळवले आहेस?
      यावर व्यापारी एकदम गडबडून गेला . साधूने पुन्हा विचारले ," खिरीसाठीचे तांदूळ आणि साखर तु कसे मिळवले आहेस?"
त्यावर व्यापाऱ्याने घाबरातच सांगितले की , " राजाकडून जे धान्य ... सामान लोकांना वाटण्यासाठी माझ्या दुकानात पाठवण्यात येतं त्यातले  तांदूळ आणि साखरचे पोते मी सैनिकांच्या चोरून माझ्या घरी घेवुन येतो . त्यातल्याच तांदळाची आणि साखरेची खीर मी तुम्हाला खावू घातली .  मला माफ करा पण माझ्या या चोरीचा तुम्ही नेलेल्या पेल्याशी काय संबंध?"
    त्यावर साधू उत्तरला ," कंद मुळे खाणारा मी ... सत्याच्या मार्गाने जाणारा मी ..... स्वतः चे पोट भरण्यासाठी कष्ट करणारा मी ......  खीर छान लागली म्हणून भरपेट खाल्ली. चोरीच्या सामनापासून बनवलेल्या खीरीने मलाही चोरी करायला उदुक्त केले. मी चोरी केली पण मी रोज असे चोरीचे  अन्न  खात नाही म्हणून चोरी कबुल करण्याची बुध्दी झाली . तुम्ही रोज रोज चोरीचेच   अन्न   खाता त्यामुळे तुम्हाला रोज रोज चोरीची बुध्दी होते आणि त्यामुळेच चोरी करणे वाईट आहे हे ही तुम्ही विसरून गेलात. आता एकच कर की , इथून पुढे कधीही मला तुझ्या  घरी जेवायला बोलावू नकोस ".
त्यांचे हे बोलणे जवळ उभा असलेला एक नोकर ऐकत होता. त्याने लगेच साधूचे पाय पकडले आणि मोठमोठ्याने रडू लागला. कारण विचारल्यावर त्याने सांगितले की , ' व्यापाऱ्याच्या या चोरीच्या सामानातले थोडे सामान तोही त्याच्या मुलासाठी  चोरून नेत होता .  अजून त्याचा मुलगा लहान आहे पण जाईल तिथे चोरी करतो . त्याचे भविष्यही या चोरीच्या अन्नामुळे धोक्यात आले . त्याला सुधारण्यासाठी आता काही उपाय असेल तर तो सांगावा'.
त्याचे रडणे बघून साधूने सांगितले ," रडू नकोस ... अजून वेळ गेली नाही . चोरीचं सामान गरजूंना देवून टाक . घरातल्या सगळ्या गरजा फक्त स्वतःच्या कष्टाच्या कमाईने पूर्ण करायला सुरुवात कर. गरजा भागात नसतील तर कष्ट वाढव पण पुन्हा चोरी करू नकोस . हळू हळू तुला कष्ट करतांना   बघून तुझा मुलगाही चोरी करणे सोडून देईल".
त्या दिवशी नोकराला आणि व्यापाराला आपली चूक कळली. त्यांनी त्या दिवसानंतर कधीच कोणत्याही प्रकारची चोरी केली नाही.
गोष्ट संपली तरी वर्गात शांतता होती . काय बोध घेतला हे विचारलं तर ," चोरी करणे वाईट " या मतावर सगळेच आले होते.
मग मी कथेचे स्पष्टीकरण दिले ते असे ....
" यापुढे जावून ही कथा अनेक बोध देते ते म्हणजे ,
  वाईट मार्गाने वाटचाल करणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात तुम्ही आलात तर तुमच्याही नकळत तुम्ही वाईट गोष्टीच्या आहारी जाता.
 तुमची सद् सद् विवेक बुध्दी जागृत असेल तरच तुम्ही चांगले काय.... वाईट काय यातला भेद ओळखू शकता.
चूक सुधारण्यासाठीची संधी ही एक मात्र अशी संधी आहे जी कधीच निघून जात नाही.
चूक लक्षात आल्यावर ती झाकून न ठेवता मोठ्या मनाने स्विकारायला तर हवीच पण भविष्यात ती टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.

कष्टाची कमाई ..... कष्टाची सवयच तुम्हाला वाईट गोष्टींपासून दूर ठेवते.
मुख्य म्हणजे लोभाचे अनेक क्षण आयुष्यात येतील पण त्यावेळी  मोहाच्या आहारी न जाता सद् मार्गाची निवड करता यायला हवी.
खरं तर ही कथा खूप विचार करायला लावणारी आहे. तसेच
मूल्यशिक्षण हा विषयच  असा आहे की तो फक्त शिकायचा नसतो तर प्रत्यक्ष आपल्या वागण्यात तो अवलंबायचा देखील असतो. प्रत्यक्ष आयुष्यात इतर विषय कच्चे राहिले तर त्याने तुमच्या आयुष्यावर फारसा गंभीर परिणाम होत नाही  पण मूल्यशिक्षण जर घेतलेच नाही तर माणूस म्हणून तुम्ही १०० टक्के अपयशी ठरता. ही गोष्ट मात्र फक्त तुमच्याच आयुष्यावर नाही तर समाजावर ही वाईट परिणाम करू शकते.
कथा एक पण त्यातून बोध घेतले तर अनेक आहेत. कथेला काय नाव द्यायचं या पेक्षा कथेतून काय बोध घेतला हे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही या कथेला देवू शकता .  तसंही शेक्सपियर सांगून गेलेत ," नावात काय आहे".

असं बोलून मी माझी कथा संपवली.
वर्गातली मुल तर आनंदी झालीच पण आमच्या प्राध्यापकांनी .... सहकारी मित्रांनी आणि शेजारच्या वर्गातले शिक्षक जे आता वर्ग येवढं शांत कसा झाला हे बघायला आले होते त्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून माझे कौतुक केले.

मूल्यशिक्षण हे आजही खूप गरजेचे आहे. कळत नकळत घेतलेले मूल्यशिक्षण आयुष्यात  माणूस म्हणून जगतांना खूप उपयोगी पडते. आजकाल  बोधकथा वाचायच्या म्हणून वाचल्या जातात . त्यातून घेतलेला बोध प्रत्यक्ष आयुष्यात अवलंबला जात नाही. किंबहुना तशी शिकवणच  दिली जात नाही. मग नंतर आपणच चर्चा करतो की आजकाल सगळ्यांच्या भावना बोथट होत चालल्या आहेत. नैतिक मूल्यांचा ह्रास होत चालला आहे. पण आपणच पुढाकार घेऊन ही मूल्ये जपायला हवी आणि वारसा म्हणून पुढच्या पिढीला द्यायला हवी. याचा विचार करणारी माणसं आज फारच थोडी आहेत . आता गरज आहे ती आपण   सर्वांनीच मूल्यशिक्षणाची पुन्हा नव्याने उजळणी करण्याची.
आपण सर्वांनी प्रयत्न केले तरच ..... आपल्याला हवा असलेला सामाजिक बदल हा हळू हळू का होईना घडणार हे नक्की .
माझ्या आयुष्यात मी शिकलेले मूल्यशिक्षण वर्गात शिकवण्याचा केलेला पहिला प्रयत्न.... ," ज्या प्रसंगाने अनेक चांगल्या गोष्टींची  सुरुवात केली. ज्या प्रसंगाने माझ्यातला आत्मविश्वास वाढवला.    " तो प्रसंग येथे सांगत आहे .
कथा आवडल्यास ..... नक्की कळवा ..... अजूनही खूप छान छान बोध कथा आहेत ..... तोपर्यंत ," खूप वाचा ..... जे आवडेल ते स्वीकारा ....नाहीतर सोडून द्या".गुढी पाडवा (२०१९)

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
तुम्हा सर्वांना नूतन वर्षाभिनंदन !!
आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!...

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

चकुल्या

#चकुल्या

नुकतंच लग्न झालेली निशा सासरी आली. शिकलेली.... नोकरी करणारी सून मिळाली खरी पण आपल्या सारखा ' एक नंबर' स्वयंपाक येतो का? याची खात्री करून घ्यायला म्हणून सासूबाईही तिच्या पाककौशल्याची परीक्षा घ्यायला सज्ज झाल्या. माहेरी तिच्या फसलेल्या प्रयोगाला ही दाद मिळायची . ती नव्या जोमाने नवीन प्रयोग करायची. तिला स्वयंपाकाची आवड नसली तरी वेगवेगळे पदार्थ ती आवडीने करायची. त्यामुळे आपण हे आव्हान सहज पेलू शकतो असा विश्वास तिच्यात होता.
पहिल्याच दिवशी जेव्हा जेवणाच्या पदार्थांची यादी हातात मिळाली तेव्हा तिला कळालं की हे वाटतं तितकं सोपं प्रकरण नाही. तिनेही मग गांगरून न जाता एक एक पदार्थ करायला घेतला . वरण भात भाजी पोळी कोशिंबिर  ..... असं ताट सजलं ...  याआधी आईला फक्त मदत व्हावी म्हणून काम करणाऱ्या तिने  आयुष्यात पहिल्यांदाच  पूर्ण स्वयंपाक केला होता . खूप उत्साहात तिने सगळ्यांना ताट वाढली आणि त्यांच्या प्रतिक्रिया टिपून घेवू लागली. अर्थातच तिचा अंदाज चुकला होता .... मनासारख्या प्रतिक्रिया तर आल्याचं नाहीत पण सासूबाईंनी ही आपणच किती चविष्ट जेवण बनवायचो याची सगळ्यांना आठवण करून दिली. दुसऱ्या दिवशी ही असेच घडले. काही दिवसांनी फरक पडेल या आशेवर ती काम करतच होती . आजही तिला सासूबाईंनी पदार्थांची यादी दिली . तिने त्यांना लगेच विनंती केली की ती सगळा स्वयंपाक करेल . भाजीची सगळी तयारी ही करेल पण भाजीला फोडणी मात्र त्यांनी घालावी म्हणजे तिला सगळ्यांना आवडणारी भाजी कशी असते ते शिकता येईल . तिची ही विनंती , " त्यात काय एवढं ....   कर जसं येतं तसं.... मला गॅस जवळ उभ राहिलं की त्रास होतो.  इतकी शिकली आणि साधी फोडणी घालता येत नाही तुला?  कर रोजच्या सारखं .... " असं सांगून धुडकावण्यात  आली. ती हिरमुसली तरी ताटात वरण भात, भाजी , दुधी भोपळ्याचा हलवा, कढी , चपाती , भजे ,तळलेले पापड आणि कोशिंबीर असा बेत वाढला. सासऱ्यांनी दुधी भोपळ्याचा हलवा या आधी कधी खाल्लाच नव्हता त्यामुळे त्यांनी लगेच ," हा काय कचरा केला " अशी भयंकर प्रतिक्रिया दिली. तिने आशेने सासुबाईंकडे बघितले तर त्याही अगदी मख्ख चेहऱ्याने मुलाला म्हणाल्या , " आज काल जेवण जातच नाही ... तसंही वय झाल आता .. खायचं तरी किती असतं . खायचे दोन घास आणि गप पडून राहायचं ".  आई वडिलांची प्रतिक्रिया बघून तोही निशाला चटकन बोलून गेला ," आईला विचारून करायला काय होतं तुला ".
आता मात्र तिचा धीर सुटला ..... चेहऱ्यावर कसं बसं टिकवलेल  हसू गायब झालं....  डोळे पाण्याने डबडबले. ती उठून धावतच बेडरूम कडे गेली. ओक्साबोक्शी रडायला लागली .
इकडे ह्याला तिच्या मागे जावून तिची समजूत काढायची होती तर सासूबाईंनी," आधी जेवून घे. मी समजावते तिला " असं म्हणून त्याला येवू दिलं नाही . त्या स्वतः तिच्या कडे आल्या. त्यांचा खोटा मायेचा स्पर्श ... खोटी सहनभुती तिला नको होती. त्यात त्या तिला म्हणाल्या , " यात एवढं काय आहे रडण्या सारखं.... उगा भरल्या घरात रडते कशाला ? ". तीही खंबीर पणे उत्तरली, " तुम्हाला शिकवा म्हणूनही तुम्ही तुमची पद्धत शिकवत नाही आणि मी केलेल्या जेवणाने तुमची पोट भरत नाही म्हणून रडते आहे".
तिच्या या उत्तराने त्या चपापल्या ... सारवासारव करत म्हणाल्या, " आमच्या माणसांना काहीही केलं तरी आवडत नाहीच . मलाही असेच बोलतात. त्यात एवढं रडण्यासारखं काही नाही " आणि निघून गेल्या.
रात्री झोपतांना  तो हळूच तिच्या जवळ आला . तिचा हात हातात घेऊन म्हणाला ," सॉरी  ग .... मला वाटलच नाही की तू माझ्या बोलण्याच येवढं वाईट वाटून घेशील .... खरंच मनापासून सॉरी . इथून पुढे मी नक्की काळजी घेईल ".
तिचे डोळे पुन्हा पाणावले पण या वेळेस मात्र त्याने लगेच तिचे ओघळणारे अश्रू पुसून घेतले. ती ही मग हळूच त्याच्या मिठीत शिरली.  त्याला जाणवलं की आपण मघाशी  जी जखम दिली आहे ती अजून ओली आहे . तेव्हा आता आपण काही बोलण्यापेक्षा तिच्या बोलण्याची वाट पाहणं योग्य.   दोघंही कितीतरी वेळ अशीच निःशब्द  बसून होती. तिलाही त्याच्या स्पर्शातून अपराधीपणाची भावना जाणवत होती. शेवटी तिनेच पुढाकार घेऊन त्याला सांगितलं की, " लहानपणापासून  अन्न हे पूर्णब्रह्म हेच ऐकत आले रे मी .... खारट झालेलं जेवणही माझे बाबा बीन तक्रार जेवायचे . आईने खावू नका म्हणून सांगितल तर ते म्हणायचे ... होत एखाद्या वेळी कमी जास्त चालायचंच.... रोज चवीच खातो मग कधी तरी हेही खायला काय हरकत आहे. अशा वातावणात वाढले मी ... इथे मात्र  आमची चव नाही ही ... आमच्या सारखं नाही हे ... हेच ऐकाव लागतंय. शिकावं म्हंटल तर आई शिकवत नाही . आमच्या माणसांना हे आवडतं नाही ... आमच्या माणसांना ते आवडत नाही .... हे ऐकावं लागतं तेव्हा जाणवत की मी अजून तुमची झालेच नाही. इतरांच ठीक आहे त्यांना कदाचित माझा स्वीकार करायला वेळ लागेल . पण तू ही बोलतोस तेव्हा वाटतं की आपण इथे आलो कशासाठी? स्तुती नका करू पण असही नका बोलू की नवीन काही पदार्थ करण्याची .... स्वयंपाक करण्याची माझी इच्छाच मरून जाईल. आवडलं नाही तर नका खावू पण अन्नाला नावं नका न ठेवू. मला तुमच्या आवडी निवडी समजायला वेळ लागणार ... तोपर्यंत तूम्ही समजून .. सांभाळून घ्यायला हवं."
तिच्या या बोलण्याने त्याला ही तिच्या दुःखाची तीव्रता जाणवली . तिला समजावण्याच्या सुरात तो म्हणाला, " माझ्यात इथून पुढे नक्कीच सुधारणा होईल . मलाही तुला समजून घ्यायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत तूही सांभाळून घे ... आज रडलीस तशी पुन्हा रडू नकोस आणि हो आत्ता जसं मन मोकळं बोलली तसंच बोलत जा ". या घटनेने दोघांना मनाने ही खूप जवळ आणलं.
त्या दिवसानंतर त्याने तर तिला तिच्या स्वयंपकावरून कधी बोल लावला नाहीच पण वडिलांनाही काय सांगितलं कुणास ठाऊक त्यानंतर सासरेबुवांनी ही कधी काही तक्रार केली नाही . उलट तिची शिकण्याची इच्छा बघून दोघेही तिला  त्यांना माहीत असलेल्या पद्धती सांगू लागले.
तिला थोड बळ मिळालं . तेवढ्यात एके दिवशी सासूबाईंनी आज रात्रीच्या जेवणाला  ' चकुल्या ' कर अशी फर्माईश केली . तिला हे नाव एकदमच नवीन होत. तिने त्यांना सांगितलं की ," मला येत नाही पण तुम्ही पद्धत सांगितली तर मी बनवून ठेवेन". त्यावर त्या अगदीच मोघम पद्धत सांगून बाहेर निघून गेल्या. तिने कणीक मळली ... डाळ तांदूळ चा कूकर लावला . तेवढ्यात सासरे बाहेरून आले आणि तिला विचारलं आज काय बेत संध्याकाळचा ? तिने ''चकुल्या '' सांगितल्यावर त्यांची कळी खुलली . ते म्हणाले ओल खोबर घातलं तर एक नंबर लागतात चकुल्या. ओल खोबर या बद्दल तर सासूबाईंनी काहीच सांगितल नाही हा विचार मनात येऊन  तिने त्यांच्याकडे असं काही बघितलं की त्यांना जाणवलं की हिला चकुल्या येत नाहीत . त्यांनी लगेच , "  ओला नारळ नसेल न घरात ..... थांब मी घेवून येतो ... हिला ही बोलावून आणतो ती तुला चकुल्या शिकवेल . तू काळजी करू नकोस काही" असं सांगून काढता पाय घेतला.
इकडे हिला आनंद झाला  की आज  काही झालं तरी आपल्याला सासूबाईंच्या हाताच्या एक नंबर चकुल्या शिकायला आणि खायला मिळणार .
थोड्याच वेळात सासरे एकटेच ओला नारळ घेवून परत आले आणि म्हणाले," तिने तुला कसं करायचं हे सांगितलं आहे ना तसच कर .. फार काही अवघड नसतं".
आता मात्र तिला सासूबाईंनी सांगितलेली पद्धत करून बघावी असं वाटेना . हा प्रयोग नक्की फसणार असं वाटून तिने सासऱ्यांना त्यांना माहीत असलेली पद्धत विचारली तेव्हा ते स्वतः स्वयंपाक खोलीत उभे राहून तिला मदत करू लागले . त्यांनी सांगावं आणि हिने करावं यातून चकुल्या तयार होवू लागल्या . तेवढ्यात तो ही घरी आला. खमंग वास येवुन त्याची भूक ही खवळली . तोही मग ताट वाढण्याच्या तयारीत तिला मदत करू लागला.
सगळे जेवायला बसले . आज तीही त्यांच्या सोबतच जेवायला बसली. सगळे निमूट जेवत होते . तिचे लक्ष त्याच्याकडे गेले त्याने ईशाऱ्यानेच ' चांगल्या झाल्यात ' असं सांगितलं. कोणीच काही बोलत नाही म्हंटल्यावर सासूबाईं सासऱ्यांना उद्देशून म्हणाल्या , " आपल्या सारख्या झाल्या नाहीतच .... नुसतं खोबरं लागतंय  ... होय ना ". त्यावर आपण काय बोलावं आणि सासूला राग आला तर असा विचार करून  मग तेही म्हणाले , " हो तर तुझ्या हातच्या चकुल्या एक नंबरच पण मलाही नीट माहीत नाही तू कशा करते ..... मी जे सांगितलं ते केलं तिने .... पुढच्या वेळेस तूच करून दाखव तिला म्हणजे काही प्रश्नच येणार नाही ". आता बोलण्यात काही अर्थ नाही हे उमगुन मग सासूबाईंनी ही विषय वाढवला नाही.

तिने ही लगेच सासऱ्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि म्हणाली , " आई तुमच्यासारख्या तर जमणारच नाहीत मला कधी ... मी फार कच्ची आहे स्वयंपाकात . पुढच्या वेळेस तुम्हीच करा ह .... म्हणजे एक नंबर चव मलाही शिकता आणि चाखता येईल ".
आता हे स्वयंपाकाचं काम परत  आपल्याच गळ्यात  पडतंय की काय या भीतीने त्या पटकन् बोलून गेल्या ," आमच्या माणसांचं काय घेते मनावर .... ते कशाला पण एक नंबर म्हणतात . बऱ्या आहेत या चकुल्या ही .... तुला ही येईल करून करून".
निशाला मुळात नंबर साठीची जीवघेणी स्पर्धा कधीच ...कोणत्याही  क्षेत्रात आवडतं नव्हती ..... पण सासूबाईंना त्यांचा ' एक नंबर ' टिकून ठेवायचा होता. त्यांच्या या स्वभावाची ती बळी ठरत होती . चकुल्याच्या निमित्ताने तिनेच स्वत:ला समजावलं की ,' एक नंबर ' चे  दावेदार  आपण कधीच  नव्हतो. मग ही मर मर कशाला?? मुळात आपल्याला स्पर्धाच आवडत नसतांना ही एक नंबर मिळवण्यासाठीची नकळत चाललेली आपली ही धडपड कशासाठी?? आपल्याला हवं असलेलं कौतुक मिळवण्याची ही ओढ कसली? हवं असलेलं कौतुक मिळत नाही म्हंटल्यावर ..... ते मिळायलाच हवं हा अट्टहास का ? आपला आनंद हिरावून घेवून जर ते मिळणार असेल तर ते हवंय कशाला?  जे जसं आहे तसं स्वीकारण्याची गरज आहे . समोरच्याला ही आपल्या मर्यादांची जाणीव करून द्यायला हवी आहे. ' मला एवढंच  जमतं ' हे खुल्या मनाने कबुल करून ..... या पेक्षा जास्त अपेक्षा असतील तर स्वतः करून घेण्याची तयारी ठेवावी  याची समज ही देता यायला हवी. तिच्या पुरता तरी हा ' एक नंबर ' तिने आयुष्यातून कायमचा  हद्द पार केला .
निशाने पहिला घास तोंडात टाकला आणि का कोणास ठाऊक तिला या चकुल्याची चव खूप आवडली . आज  पहिल्यांदाच ती  स्वतःच्या हक्काच्या घरात पोट भर जेवत होती. त्या दिवशी तिला एवढं मात्र कळलं होत की , एक नंबर अशी कोणतीच पद्धत नाही .....की .... चव नाही आणि असलीच तरी ती आपल्याला चाखायला कधीच मिळणार नाही . तेव्हा आपण प्रेमाने करू आणि आनंदाने खावू तोच पदार्थ आणि त्याचीच चव एक नंबर .
एक नंबर ..... च्या मागे लागून जीवनातला  लाख मोलाचा आनंद गमावून चालणार नाही. कारण कोणतंही काम करतांना जर आपल्याला स्वतःला ते काम करण्यात आनंद मिळत नसेल तर मिळणारा नंबर हा फक्त नंबरच राहतो.
 आज  ती जे बनवते ते तिच्या आवडीने .... आनंदाने . तिच्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा तिच्या पाककलेचं कौतुकच  करतो . सासरचे बरेच पदार्थ ती नंतर शिकली पण चकुल्या विषयी तिच्या मनात असलेलं प्रेम आजही अगदी तसचं आहे .   आज ही नवरा कधी कधी चकुल्या खातांना कौतुकाने ' एक नंबर  झाल्या चकुल्या' असं म्हणतो . तेव्हा सासऱ्यांनी शिकवलेल्या या चकुल्या आपल्याला  बरंच काही शिकवून गेल्या . सुरवंटाचे  फुलपाखरू बनण्याचा हा सुंदर प्रवास सुरू झाला होता.  याची आठवण होवून ती ही मग  गालातल्या गालात हसते.
©️ अंजली मीनानाथ  धस्के
होळी / रंगपंचमी (२०१९)

होळी / रंगपंचमी (२०१९)
आपल्यातल्या प्रत्येकीने असाच , ' स्वतः चा वेगळा रंग जपायला हवा ' . इतरांच्या रंगात रंगून जातांना स्वतः चा रंग मात्र टिकून ठेवायला हवा.
आजची रांगोळी 
रंगात रंगूनी साऱ्या ..... रंग माझा वेगळा 
रंगपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.......


रंग माझा वेगळा

#रंग_माझा_वेगळा              
          पाच बहिणींमधे शामल सगळ्यात मोठी . कष्टाची सवय अगदी लहानपणा पासूनच लागलेली . मुलाच्या हव्यासापोटी पाच मुलींना जन्म देवून नाजूक तब्येत झालेली  आई आणि इतकं करून  ही मुलगा झाला नाहीच म्हणून त्यांना सोडून गेलेला बाप . नवरा सोडून गेल्याचं दुःख इतकं होत की शामलची आई अधिकच आजारी राहू लागली. त्यामुळे  लहान बहिणींचे सगळे करायची जबाबदारी शामलवरच आली. तिनेही ती आनंदाने घेतली .  अभ्यासात हुशार असूनही शिक्षण अपूर्ण सोडून भारती बजारमधे वाजनाप्रमाणे सामान भरण्याची  नोकरी स्विकारली. घरचे सगळे करून कामावर जायची . आल्यावर राहिलेली काम करत लहान बहिणींचा अभ्यास घ्यायची . शामलपेक्षा कोमल दोनच वर्षांनी लहान म्हणून तिलाही कामाला लावावं असं आईचं मत होत पण शामलने हट्ट करून जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तिला शिकू द्यावं असं आईकडून  कबुल करून घेतली. त्यामुळेच की काय पण आईपेक्षा शामलवरच बहिणींची माया अधिक.
         खर्च वाढले तसे शामलने इतरही कामे घेतली . आई सारखी आजारी असली तरी पोरींचे उसवलेले कपडे छान शिवायची . कुठे बारीक छिद्र असेल तर ते सुंदर फुलाचा टाका घालून बंद करायची . मुलींनी फाटके कपडे घालू नये असंच तिला  वाटायचं पण बँकेत जमा रक्कम फार थोडी त्याच व्याज कमी येत होतं.  त्यात शामलचा पगार ही फार नव्हता.   कोमल, काजल, पायल आणि सैजल सगळ्याच शाळेत जाणाऱ्या . पैसे पुरायचे नाही. तेव्हा शामलला काही तरी मदत करावी असं प्रत्येकीला वाटायचं . तेव्हा आईच सुई दोऱ्यावरच प्रेम बघून शामलने गल्लीतल्याच ' लेडी मुड ' या बुटिकचे मालक असलेल्या सय्यदचाचा कडून आईला काम मिळवून दिलं. घराबाहेर न जाताही आवडीच काम मिळालं त्यामुळे आई खुश होती. पैसे कमी मिळत होते पण वेळ छान  जावू लागला .
     शामालची धडपड बघून घरच्या कामात बहिणी तिला मदत करायच्या पण आता
 आईला असं कामात बघून चौघिंनी शामलकडे आम्हालाही काही तरी काम मिळवून दे, असा हट्ट धरला.
   शामल मात्र त्यांनी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे याच मताची होती.
वर्षा मागून वर्षे जात होती.
दिवसामागून दिवस जात होते. खर्च वाढतच होता. शिल्लक काहीच उरत नव्हते. प्लास्टिक बंदी आली तेव्हा सय्यद चाचाने पेपरच्या पिशव्या  बनवून देण्याची विनंती केली.  तेव्हा चौघींनी घरीच पेपरच्या पिशव्या बनवण्याचे काम सुरू केले. त्या नुसत्या पिशव्याच बनवायच्या नाही तर त्यावर ' लेडी मुड ' हे नाव ही सुंदर अक्षरात काढून द्यायच्या . त्यांची मेहनत आणि कामाचा दर्जा बघून  सय्यद चाचाने अजून इतर दुकानदारांचे कामही मिळवून दिले. त्या आळीपाळीने अभ्यास आणि काम करत त्यामुळे शामलची काही तक्रार नव्हती.
       आता काही पैसे शिल्लक राहत होते. पोरींची जिद्द .... हुशारी बघून  शामलच्या आईला वाटू लागलं की पोरींनी शिकून नोकरी करावी . आपल्यासारखी वेळ त्यांच्यावर येवू नये . तिला जणू  जगण्याचा उद्देश मिळाला . हातात काम होतंच . तिच्या कामातली तिची सफाई बघून आजूबाजूच्या बायका तीच कौतुक करायच्या . तिलाही मग हुरूप यायचा.
आपणही काही तरी करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्याची जाणीव होवून तिचं आजारपण ही कमी झालं.
शामालचा  प्रामाणिकपणा.... परिस्थिती समोर न झुकता संघर्ष करण्याची वृत्ती .... जबाबदारी स्विकारण्याची सवय....अपार कष्ट करण्याची तयारी.... शिक्षणाबद्दलची आस्था  आणि कुटुंबावर असलेलं प्रेम हे गुण बघून भारती बजार मधे सुपर वायिझरची बढती मिळाली .
आता त्यांच्या आयुष्याला थैर्य प्राप्त झाले होते.
       कोमलने एम. कॉम पूर्ण करून  एका थोड्या फर्मवर नोकरीही मिळवली. काजलने एम ए करत करत कोचिंग क्लास वर शिकवण्याचे काम सुरू केले.
पायल बी फार्मसी  आणि सैजल १२ वी करत होती .
       आता शामलने लग्न करायला काहीच हरकत नाही. असं आईला वाटायचं पण ती काही मनावर घेत नव्हती. अशातच कोमलला तिच्या ऑफिस मधे काम करणाऱ्या एका सहकारी मित्रा बरोबर फिरतांना शामालने पहिले. त्याला घरी बोलावून त्यांचा विचार घेतला. दोघांनाही लग्न करायचे होते पण मोठी बहीण घरात असतांना लहान बहिणीचे लग्न कसे होणार म्हणून दोघंही गप्पच होती. आईने खूप चिडचिड केली पण शामलने त्यांचे लग्न लावून दिले. कोमल तिच्या संसारात रमली. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत काजलनेही लग्न करण्याचा निर्णय घेतला. शामललाही बरीच स्थळ सांगून येत होती पण तिची अट ऐकुन नकार कळवत होती.
      आई चिडून म्हणायची , " ' आईला शेवटपर्यंत सांभाळण्याची तयारी असणाऱ्याशीच लग्न करायचं ' ही काय अट झाली??? अग ज्याच्याशी लग्न केलं होतं तो तर पाच पोरी देवून पळून गेला . तू का स्वतःच नुकसान करून घेते? कोमल ... काजल सारखं लग्न करून मोकळी हो . आमचं आम्ही बघून घेवू " .
शामल मात्र ठाम होती. आईचा लग्न कर ..  लग्न कर चा तगादा ऐकून त्रासून गेली होती. तिचा उदासवाना चेहरा बघून भारती बजार मधल्या विशाल ने तिला " आता वेळ आहे तुझ्याकडे तर पुढचे शिक्षण पूर्ण का करत नाहीस ? तुझं मन गुंतून राहिलं." असं सुचवलं . तिलाही ते पटलं .
आता पायलनेही तिच्याच कॉलेज मधल्या एका मुलाशी लग्न करून सुखी होण्याचा निर्णय घेतला.
सैजलला डॉक्टर व्हायचे असल्याने तिने एक वर्ष पूर्णपणे स्वत:ला  अभ्यासात  गाडून घेतले . अभ्यासात ती हुशार होतीच....तिला एम. बी. बी. एस ला प्रवेश तर मिळालाच पण तिने शिष्यवृत्ती ही मिळवली.  ती हॉस्टेल वर रहायला गेली.   घरात आता शामल आणि आई अशा दोघीच राहिल्या. शामालच ही शिक्षण सुरू होते.
   आता आईला वाटायचं , ' देवाने मुलगा दिला नाही बरच झालं कारण  मुला पेक्षाही जास्त कर्तबगार ... सतत आपला विचार करणारी मुलगी मात्र दिली '.
सैजल डॉक्टर झाली . तिने पुढे एम. डी. ही पूर्ण केल. तिच्याच शिक्षकांनी आपल्या डॉक्टर मुलासाठी तिला मागणी घातली. शामलने तिचेही लग्न लावून दिले.
शामलने  आता भारती बजारची नोकरी सोडून दिली होती. मॉडर्न शिक्षण संस्थेच्या कॉलेजवर समुपदेशकाच काम तिने स्विकारलं होत. आपल्या सारखे परिस्थितीमुळे शिक्षण सोडू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ती शिक्षण सुरू ठेवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करून देत होती.
एक दिवस कामावरून घरी आली असतांना तिला दारात खूप चपला दिसल्या , घरातून हसण्याचे आवाज ऐकू आले. ती धावतच बहिणींना भेटण्यासाठी आत आली . बघते तर काय ... बहिणी आलेल्या   होत्याच पण सोबत विशाल आणि त्याचे आईबाबाही  आले होते. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर सगळे एकमेकांना खाणाखुणा करून मूळ मुद्याच कस बोलायचं असे विचारू लागले.  मग विशालची आईच म्हणाली, " तुझ्यासाठीच विशाल इतके दिवस बीनलग्नाचा थांबला आहे .आम्हाला तुझी अट मान्य आहे. तुला मुलगा पसंत असेल तर  आजच सगळी बोलणी ठरवून टाकू आणि पसंत नसेल तरीही आमची काहीच हरकत नाही ."
त्यांच्या अशा बोलण्याने शामल पुरती गांगरली ... लाजून तिचा चेहरा लाल झाला . ती पटकन उठून आतल्या खोलीत आली.
 झरझर जुने दिवस तिच्याडोळ्यापुढे आले. तिलाही विशाल आवडायचा . कुठलाही लाळघोटेपणा नाही की वागण्यात कधी खोटेपणा  नाही . सतत कामात बुडालेला .... नवीन नवीन मार्केटिंग टेक्निक शिकून घेणारा... तरी संयमित स्वभाव ... इतरांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती तिला खूप भावली होती . तरीही तिने कधी त्याला तसं जाणवू दिलं नव्हतं. पुढे त्याने स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला . मध्यंतरी ही भेटी झाल्या तेव्हा त्यानेही काही जाणवू दिले नाही . आज अचानक असा समोर आला तेही मागणी घालायला ... या विचारात ती गढून गेली होती तेवढ्यात विशालच्या बाबांचे शब्द कानी पडले , " आमचा विशाल खूप कमावतो .... शामलला आता नोकरी करायची ही गरज नाही ".
ते ऐकून तिच्या काळजात कळ उठली. ती लगेच बाहेर आली आणि म्हणाली , "बाबा आता तर कुठे  मी  पैश्यासाठी नोकरी करत नाही. आता तर कुठे मला माझी ओळख मिळाली आहे . आता तर कुठे मी माझं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. .... आता तर कुठे मी खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात केली आहे.   तेव्हा आता ही नोकरी सोडणे मला जमणार नाही". सगळे तिच्या या स्पष्ट बोलण्याने चकित झाले . 
सगळे तिच्या स्पष्ट बोलण्याने चकित झाले.
विशालच्या आईने तर तिला मिठीच मारली. कोणीही तिला तिच्या मना विरूद्ध काही करायला सांगणार नाही ,  अस सांगितल आणि चटकन् तिच्या हातात स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या सरकवल्या. उशीरा का होईना पण आता तिच्या आयुष्यात ही प्रेम च प्रेम आल होत.
लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली . तिच्या चांगल्या गुणांनी  घरतल्या सगळ्यांची  ती लाडकी झालीच आहे पण एका गोंडस मुलीची आई देखील तीआहे.
तिने विशालच्या मदतीने गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळावी म्हणून "  कमवा आणि शिका "  योजना सुरू केली. अनेक दिशा हीन विद्यार्थ्यांना तिने शिक्षणाचा मार्ग दाखवला . अनेक   लघु उद्योगांचे प्रशिक्षण  देणारी संस्था ही स्थापन केली ज्यामुळे गरजू स्त्रियांनाही प्रशिक्षण घेवून  स्वतःच्या पायावर उभे राहता आले.
सासूला तर सुनेचे फार कौतुक.... त्या अभिमानाने नेहमी म्हणायच्या ," आमच्या विशालची निवड एकदम योग्य आहे". सगळं घर तिने बांधून ठेवलं होतं . आईची काळजी घ्यायलाही ती कधीच विसरत नव्हती.
मुलगी , बहीण, सून , बायको आई अशा कौटुंबिक तर  सहकारी , समुपदेशिका, मार्गदर्शिका  अशा सामाजिक भूमिकेत ती जीव ओतून काम करत होती. अनेक महींलासाठी ती प्रेरणा ठरत होती. त्याचाच परिणाम म्हणून तिला सखी मंच ने, " रंग माझा वेगळा " हा पुरस्कार देवून सन्मानित केलं.
तिने या पुरस्काराच श्रेय विशालला दिलं कारण त्याच  तिच्या सोबत असणं .... त्याने सतत तिला' स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी ' यासाठी प्रोत्साहन देण यामुळेच ती इथपर्यंत पोहचू शकली. तिच्या या यशात  कुटुंबांतील प्रत्येक जण सहभागी होता. त्यांच्या सहकार्याने.... प्रेमाने ती मनासारखं काम करू शकली.
संकटही खूप आली पण तिचा निर्धार ठाम होता.जीवनाचे उतार चढाव.... सुख दुःख... चांगले वाईट अनुभव... कधी रडणे तर कधी हसणे ... मैत्री प्रेम ... एकाकीपणा.... भावनांचा ओलावा ....   असे सगळे रंग तिने अनुभवले तरी तिचा रंग मात्र वेगळाच होता . या सगळ्यात उठून दिसणारा.   तिच प्रभावी व्यक्तिमत्व जणू , ' रंगात रंगूनी साऱ्या .... रंग माझा वेगळा ' असं सांगणारच आहे.
( प्रत्येकीला या रांगोळीत  स्वतःलाच पाहण्याचा आणि " रंगात रंगून साऱ्या .... रंग माझा वेगळा"  असा म्हणण्याचा मोह आवरनार नाही हे नक्की . )
©️ अंजली मीनानाथ धस्के


टिपः
आपल्यातल्या प्रत्येकीने असाच , ' स्वतः चा वेगळा रंग जपायला हवा ' . इतरांच्या रंगात रंगून जातांना स्वतः चा रंग मात्र टिकून ठेवायला हवा.
मी काही पट्टीची लेखिका नाही . ज्या प्रसंगांनी मला काही तरी शिकवलं ... किंवा आठवीत राहिले ... ते लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून प्रसंग चांगले अथवा वाईट जसे घडले तसे स्वीकारून  ... इतरांचे त्या बद्दलचे अनुभव ऐकून .... माझ्या लिखाणातून तसेच ते व्यक्त करण्याचा व त्यातून काही तरी शिकण्याचाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. कधी कधी या प्रसंगाना कल्पकतेची जोड दिली जाते तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com

  

मुलांची उत्सुकता आणि गूगल

#मुलांची_उत्सुकता_आणि_गूगल

        निशा कुंड्याची मशागत करत होती . तेवढ्यात दारावरची घंटा वाजली . तिने दरवाजा उघडला तसा घाईघाईने साहील आत आला . पाणी पिवून परत खेळायला जायचा त्याचा बेत होता . त्याची घाई ... खेळून घामजलेला चेहरा बघून ... निशा  म्हणाली , " अरे हळू जरा एवढी घाई कसली करतोस .... कोणी जात नाही निघून ... सुट्टी आहे आज... तर सगळे थांबतीलच ". त्यावर सहिल म्हणाला , " सगळे थांबलेच आहेत ग .... मोबाईल वर सर्च बफर होतंय तेवढ्या वेळात मी घरी आलो " .
        निशाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली . नक्की कसला शोध घेतला जातोय मोबाईल वर ? वय जेमतेम १२ ..१३ नाही तर मोबाईल दिला कोणी यांना ? असे प्रश्न मनात आले . तिने लगेच विचारलं काय शोधता रे मोबाईल वर ? त्याने अगदी सहज सांगितलं, " अग कंडोम म्हणजे काय ? याचा शोध घेत आहेत सगळी मिळून " . तो पायात चप्पल सरकवून जायला निघाला तसा काळजीने  तिने त्याचा हात पकडला. "अरे चॉकलेट घेवून जा सगळ्यांना " असं बोलून त्याला थांबवलं . खरं तर तिला वेळ हवा होता . त्याला  काय आणि कसं समजावून सांगावं  याचा विचार करतच तिने चॉकलेट हातात घेतले.  वेळ गमावून चालणार नव्हतं .... जे काही करायचं ते अगदी सहज ... त्याला कुठलीही शंका न येता करणं गरजेचं होतं.
                  त्याच्या हातात चॉकलेट देत ती त्याला म्हणाली, " त्यात मोबाईल वर काय शोधायचं ... मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं की तुला " . त्यावर तो म्हणाला , " तुला माहित आहे त्याचा अर्थ ? .... काय असतं ग ते ? " त्यावर ती म्हणाली, " माहित आहे ना पण त्यासाठी तुला आधी  घरात यावं लागेल ... जरा शांत बसाव लागेल ... तरच सांगू शकते ... घाईत कसं सांगू ? " त्यावर तो लगेच सोफ्यावर येवुन बसला . याचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा तीव्र आहे . आधी काहीतरी नक्कीच कळलं आहे . आपल्याकडून त्याची खात्री फक्त करून घेतली जाणार . असा तिने अंदाज बांधला.
      " सांग आता ... बसलो मी शांत " असं तो बोलला तशी ती भानावर आली आणि म्हणाली , " आधी मला सांग हा शब्द कसा माहित झाला तुम्हाला ? " त्यावर तो लगेच उत्तरला ," अग आम्ही मागच्या पटांगणात खेळत होतो तर समीरला ' ते ' सापडलं त्याने ' ते ' काडीला अडकवलं आणि आमच्या कडे घेवून आला. तशी सगळी पोरं शी sss घाण असं करत पळू लागली.  आतिश म्हणाला की ते ," कंडोम आहे " फेक तिकडे . तर महेश म्हणाला हो हे कंडोमच आहे . आमच्या घरी याच पॅक बघितलं आहे मी . तसा आरव म्हणाला , " काही काय .... ते गर्ल्सच्या बॉडी पार्ट शी संबंधित काहीतरी खूप घाण असतं  . कोणी बघितलं तर ओरडतील आपल्याला ."
       नक्की काय असतं यात चर्चा सुरू झाली आणि मग गूगल वर सर्च करुन शोधायचं ठरल आमचं.    दर्शन म्हणतो की गूगल वर सर्च केलं की कळतं सगळं .
            नीशाच्या पायाखालची जमीन सरकली.  तिने सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला, "  तू हा शोध सोडून  कसा काय घरी आलास?  "  असं विचारलं तर तो म्हणाला , " अग किती वेळ झाला ते बफर च होतंय ? स्पेलिंग चुकलं की अजुन काय ? त्यांचे वाद सुरू आहे.  मला आला कंटाळा , तहान ही लागली होती म्हणून मग अलो घरी " .
     त्यावर ती लगेच म्हणाली , " बरं झालं घरी आलास ... गूगल वर असलेली सगळीच माहिती  १०० टक्के खरी नसते. " तसं तो आठवून म्हणाला , " हो ना ... पप्पाही हेच म्हणतात ... गूगल वर सगळंच १०० टक्के परफेक्ट नसतं काही.... परवाच काकाकडे जातांना  गूगल मॅप लावला होता , त्यावर टर्न लेफ्ट दाखवत होतं पण लेफ्ट ला तर रस्ताच नव्हता. शेवटी आम्ही लोकांना विचारत विचारत गेलो . जावू दे ...  आता तू सांग ना लवकर  ' ते ' नक्की काय असतं? " .
             तिने शब्दांची जुळवाजुळव केली आणि म्हणाली , " काही नाही रे ... मेडिकल  सायन्स ने लावलेला  तो एक चांगला शोध  आहे " . त्याने लगेच विचारलं, " मग सगळे शी sss घाण का करत होते? "  तिने समजावून सांगायला सुरुवात केली , " अरे अर्धवट माहिती असली की असेच वागतात लोक . त्याला  शी sss  घाण म्हणतात कारण त्यांना तसचं सांगितल्या गेलेलं असतं . मुळात त्यात घाण असं काही नाही आणि ते फक्त मुलींच्या  बॉडी पार्टशी संबंधित नाही तर  मुलांच्या  शरीराशी ही संबंधित आहे .  एक असा शोध जो दोघांनाही अनेक घातक आजारांपासून वाचवतो .  असे काही आजार आहेत ज्यांचा इलाज करणे अती कठीण कधी कधी तर त्या आजाराने जीव ही गमवावा लागतो. मग असे आजार होवूच नये म्हणून काळजी घेतलेली कधीही चांगली . तेव्हा आपल्याला हे साधन  त्या आजारापासून  दूर राहण्यासाठी उपयोगी पडते. हे साधन  वापरून झाल्यावर इतरांनी त्याला हाताळले तर त्यापासून इतरांना संसर्ग होवू शकतो . म्हणून त्याची विल्हेवाट काळजीपूर्वक करावी लागते. पण चुकून तुम्हाला ते असे कुठे सापडले तर त्यापासून आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून त्याला हात मात्र लावायचा नाही. बस एवढंच .... बाकी त्यात घाण शी sss असं काही नाही ".
             साहिलने लगेच शंका बोलून दाखवली  " आरव  का म्हणाला की घरचे ओरडतील  आणि सचिन ही म्हणाला की ,  'आपण गूगल वर काय  शोधतो हे घरी  सांगायचं नाही... नाही तर घरचे मरतील आपल्याला ' पण  तू तर माझ्यावर चिडली नाहीस . उलट त्याचा अर्थ सांगायला तयार झालीस  "  असं का ?? "
          आता तिने त्यालाच प्रश्न विचारला " मला सांग , कार कशी चालवायची? हे  तुला गूगल वर शोधून  माहिती झालं आणि आम्हाला न सांगता तू ती चालवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल?" तो म्हणाला , " मला कार नीट चालवता येणार नाही ". तिने पुन्हा विचारले , " का  चालवता येणार नाही? गूगलवर तर सगळी माहिती  आहे न ".
तो म्हणाला , " गूगलवर माहिती आहे ... तरी मी अजुन तितका मोठा झालो नाही ना... माझे पाय ब्रेक आणि  अॅक्सिलेटर पर्यंत नीट पोहचत नाही . ड्रायव्हिंग सीटवर बसल्यावर माझी उंची कमी पडते . मला समोरचा रस्ता ही नीट दिसत नाही. अशी कार चालवायला गेलो तर माझा अॅक्सिडेंट होईल ना. "
         ती लगेच समजावणीच्या सुरात म्हणाली, " अगदी बरोबर .... कोणतीही गोष्ट  करण्याआधी ते करण्यासाठीच   योग्य  वय लागतं . घरच्यांना न सांगता ...वेळेआधी काही करायला गेलात .... तर तुमचंच जास्त नुकसान होणार आहे. मग काही पालकांना वाटतं की योग्य वेळेआधी आपल्या मुलाला काही  माहिती होवू नये .... कारण ती माहिती मिळाली तर मुलं उत्सुकतेने काहीही प्रयोग करून स्वतःला इजा करुन घेवू शकतात. लहान वयात  चुकीची  माहिती  मिळाली ...... किंवा  योग्य वया आधीच नको ती माहिती मिळाली   तर त्याचे वाईट परिणाम मुलांना आयुष्यभर भोगावे लागतात.   मग यावर सोपा उपाय म्हणून काही पालक आपल्या मुलांनी त्यांच्या वयाला योग्य नसतील अशा गोष्टींबद्दल  विचारलं की लगेच चिडतात ... रागावतात. त्यात त्यांचा आपल्या मुलाचे संरक्षण करणे हाच हेतू असतो. माझा ही अगदी तोच हेतू आहे . तुला चुकीची आणि अर्धवट माहिती  तुझ्या मित्रांनी दिली  . त्या माहितीचा  तुझ्यावर वाईट  परिणाम होवू नये .  तुला तुझ्या वयाला योग्य अशा भाषेत सगळं समजावून सांगावं '  असं मी ठरवलं म्हणून तुझ्या या प्रश्नांवर  मी चिडले नाही . या पुढेही तुला काहीही विचारायचं असेल तर तू मलाच येवुन विचार .. उगाच गूगलवर शोधण्याचा प्रयत्न करू नको. आम्ही तुझी जी काळजी घेवू ती काळजी गूगल घेणार आहे का? " या तिच्या प्रश्नावर त्याने लगेच तिच्या गळ्यात दोन्ही हात टाकून लाडात येऊन समजूतदार पणाचा आव आणून....  निखळ हसत तिलाच समजावलं
, " अग गूगल काळजी घेत नाही ... फक्त माहिती देतं. काळजी घ्यायला तू आहेस न.... आय लव्ह यू मम्मा.  चल मी जावून त्यांना  चॉकलेट देवून येतो आणि सांगतोही की ते काही शी ss घाण नसतं म्हणून ".  तीही त्याला हसत म्हणाली , "लवकर ये रे ... जास्त उशीर करू नको  " पण  मनातल्या काळजीने अनेक प्रश्न निर्माण केले .
         आता अजुन काय माहिती घेवून येणार आहे हा ? या   विचारानेच तिला धस्स झालं.   इंटरनेटच्या विळख्यात  तरुण पिढी तर सापडलीच आहे पण आता या लहानग्यांना त्यापासून कसं दूर ठेवता येईल ? साधन वाईट नसतंच ... पण त्याचा योग्य वापर  कळण्याइतपत ही मुलं मोठी झालेली नसतांना त्यांच्या हाती स्मार्ट फोन देणं कितपत योग्य आहे?? फोन दिला नाही तरी टीव्ही वर जाहिरातींचा मारा होतोच आहे . या चिमुकल्यांपासून काय काय आणि कसं कसं लपवणार ??  गूगल फक्त माहिती देतं .... पण आपल्या मुलांच्या बाल मनाची काळजी कोण घेणार ??? असे अनेक प्रश्नांची ती उत्तरं शोधत होती आणि तिला जाणवलं की कुंडीतल्या झाडांना कीड लागू नये म्हणून फवारणी करावी लागते  ... तशीच मुलांच्या मनात वाईट विचार येवू नये म्हणून वेळोवेळी चांगल्या विचारांची पेरणी करावी लागते..... जशी  झाडांची वाढ योग्य प्रमाणात व्हावी म्हणून माती उकरावी लागते ... खत घालावं लागतं... अगदी तसचं मुलांशी मोकळा संवाद साधत ... सकारात्मक दृष्टिकोनातून ज्ञानाची भंडारे खुली केली पाहिजेत...  कधी कधी झाडांच्या नको तितक्या वाढलेल्या फांद्या छाटून त्याला योग्य आकार देतो ... तसेच मुलांच्या बुध्दीला वाईट वळण लागू नये म्हणून थोडा धाक .. थोडी शिस्त जोपासत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावा लागतो..  झाडांना  योग्य प्रमाणात उन आणि पाणी उपलब्ध करावं लागतं ... . अगदी तसचं आपल्या मुलांच्या बाबतीत ही सभोवतालच्या वातावरणातील बदल स्वीकारतांना ... त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊनच ते स्विकारले पाहिजे ... त्यांना योग्य ती साधन सुविधा उपलब्ध करून देतांना त्यावर आपले नियंत्रण  तर  हवेच पण त्याचा गैर वापर होवू नये याबाबत आपण सतर्क ही राहायला हवे आणि  हे सगळं पालक म्हणून  आपल्यालाच करावं लागणार आहे. तेव्हाच ते योग्य व्यक्ती म्हणून वाढीस लागतील.
               अशा विचारात ती गढून गेलेली असतांनाच साहिल परत आला आणि त्याने आनंदात तिला सांगितलं  , " अग त्याचं नेट पॅक संपल होतं . म्हणून त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. बरं झालं तू मला सगळं सांगितलं होतं. मी त्यांना सांगितलं तर मलाच सगळी चिडवायला लागली .  तू सांगितलं आहे म्हंटल्यावर सगळी गप्पच बसली   " .
          हे ऐकुन  तिचा जीव भांड्यात पडला आणि  पुन्हा नव्या जोमाने ती बाग कामाला लागली.
     
©️ अंजली मीनानाथ धस्के
लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. नावासहित शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.

  टिपः   मी काही पट्टीची लेखिका नाही . ज्या प्रसंगांनी मला काही तरी शिकवलं ... किंवा आठवीत राहिले ... ते लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून प्रसंग चांगले अथवा वाईट जसे घडले तसे स्वीकारून  ... इतरांचे त्या बद्दलचे अनुभव ऐकून .... माझ्या लिखाणातून तसेच ते व्यक्त करण्याचा व त्यातून काही तरी शिकण्याचाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. कधी कधी या प्रसंगाना कल्पकतेची जोड दिली जाते तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . 
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com