व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी ( भाग ५ )

 कथा मालिका :  व.नि.ता ( भाग ५ )

विषय: कौटुंबिक कथा

भाग ५ :

©️Anjali Minanath Dhaske 

         प्रसादचा मोबाईल फेकल्या नंतर मटकन जमिनीवर बसून घेत आपल्या थरथरणार्‍या हातांनी तिने दोन्ही गुडघ्यांना धडधडत्या छातीजवळ ओढून घेतले. भिंतीला डोके टेकवून तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. संगीत, काचेच्या पेल्यांची किणकीण,बर्‍याच पुरुषांचा हास्य कल्लोळ या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर दारू पिऊन जड झालेल्या जिभेचा वापर करत अत्यंत अश्लील भाषेच्या माध्यामातून प्रसादचा विरह सहन न होणार्‍या भावना व्यक्त करणारा अत्यंत लाळघोट्या पुरुषी आवाज वनिताच्या कनात  बराच वेळ घुमत राहिला.  

              वनिताला तिचे लग्नानंतरचे दिवस आठवायला लागले.  प्रसाद स्वतःहून शारिरीक जवळीक कधीच साधत नसे. सुरुवातीला बुजल्यासारखे होत असावे अशी तिची समजूत होती.  परंतू प्रतिकच्या जन्मानंतरही त्याने केलेला प्रत्येक प्रणय हा यांत्रिक असल्यासारखा भासत होता.  प्रसादच्या स्पर्शात कधीच ओढ, प्रेम, आतुरता तिला जाणवली नव्हती. ती गावाकडच्या बंदिस्त वातावरणात वाढल्याने तिचे प्रणयाबाबत असलेले ज्ञान अतिशय तुटपुंजे असल्याने नवरा आणि बायको यांच्यातील संबंध असेच यांत्रिक असावेत असा तिने गैरसमज करून घेतला होता.  आज  वनिताला जे काही उमजले होते ते ती कोणाजवळ बोलू शकत नव्हती. प्रसाद कायम खोटे बोलून वनिताची फसवणूक करत आला होता. तो ईतर पुरुषांसाठी स्वतःच्या देहाची विक्री करत होता. त्यातूनच तो घर खर्च भागवत घरी पैसे पाठवत होता. तो प्रत्येक वेळी फोन आला की, फोन करणार्‍या पुरूषाची शारीरिक भूक भागवायला घराबाहेर पडत होता.  अशा पुरुषाच्या मुलाला आपण जन्म दिला आहे या जाणिवेने तीला स्वतःचीच घृणा वाटली. तिचे संपूर्ण आयुष्य अंधारून गेले. सुखी संसाराची आशा धुळीस मिळाली. 

            झोक्यात झोपलेल्या प्रतीकच्या उठण्याने तिचे नकारात्मक विचारचक्र थांबले. प्रतीकच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला हातपाय गाळून, आशा सोडून चालणार नव्हते. 

       तिच्या माहेरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती. वनिता सगळ्यात मोठी, त्यानंतर भाऊ आणि लहान चार बहिणी.  तिघींचे शिक्षण, लग्न अजून बाकी होते. तिच्या घटस्फोटाच्या निर्णयाला कोणीही पाठिंबा देणार नव्हते.  आईला तिने वर वर कल्पना देण्याचा प्रयत्न केला तेव्हा आईनेही फार काही जाणून घेण्याच्या फंदात न पडता, " दुसर्‍या बाईचा नाद नाही ना? मग काय त्रास आहे. तुला आणि प्रतीकला चांगलं सांभाळतो आहे. तेव्हा तुच पुढाकार घेवून नवर्‍याचे मन  संसाराकडे वाळवायचे बाई,  आम्हाला आमचे व्याप कमी आहेत का? उगा संसार मोडून आमच्यावर ओझे नको करू. प्रतीककडे बघून आनंदात रहायला शिक " अशा तुटक भाषेत समजावले होते. संसार वाचविण्यासाठी तिला अखेरपर्यंत प्रयत्न करावेच लागणार होते. 

    वनिताला जिच्या सोबत बोलून मन हलके होईल अशी जवळची मैत्रीण ही नव्हती.  सासरी प्रसादच्या शब्दाबाहेर कोणी नव्हते.  तो सगळ्या घराचा कारभार पाहत असल्याने कोणीही त्याला समजावण्याच्या किंवा विरोध करण्याच्या भानगडीत पडत नसे. 

            प्रसाद जे काही करत होता त्याने वनिताच्या मनात त्याच्या विषयी चीड, किळस, घृणा निर्माण झाली होती. परंतू जो पर्यंत तिच्या मनाचा पक्का निर्णय होत नाही तोपर्यंत  तिच्या वागण्यातून तिने प्रसादला कधी शंका येवू दिली नाही. 

     प्रसाद प्रतीकची काळजी घेत असे.  त्याच्यासोबत खेळतांना प्रतीकही नेहेमी खुश होई.  आपल्या वागण्याने प्रतीक वडिलांच्या प्रेमाला वंचित होईल असे काही करण्याची तिची ईच्छा नव्हती. सद्यपरिस्थितीत आर्थिक दृष्ट्या ती सर्वस्वी प्रसादवर अवलंबुन होती. 

           अखेर तिने प्रसादशीच बोलण्याचा निर्णय घेतला. जेव्हा प्रसादला कळले की वनिताला तो ईतर पुरुषांशी संबंध ठेवतोय हे समजले आहे. तेव्हा त्याने तिच्यावर चीडचीड न करता तिला सगळे समजले आहे याचे समाधान व्यक्त केले . यापुढे तिने कसलीही तक्रार न करता जे जसे आहे तसे स्वीकारून गप्प बसावे, असे सुचविले. तो ' पुरुष समलिंगी ' गटात सामील झाला असून त्यात देहविक्रीचे त्याला भरपूर पैसे मिळतात. म्हणून जर तिने समजून घेतले तर तो तिला आणि प्रतीकला सांभाळण्यात काहीही कमी पडू देणार नाही असे आश्वासनही दिले. तो असे सगळे बोलत असतांनाच त्याला फोन आला व तो तसाच घरा बाहेर पडला.  

        प्रसादला जर हे काम करायचे होते तर त्याने आपल्याशी लग्नच का केले? मुलाला जन्म का दिला? आपली ईच्छा नसताना त्याच्या या घाणेरड्या कामाशी आपण का जुळवून घ्यायचे? अशा अनेक प्रश्नांचे वादळ तिच्या डोक्यात उठू लागले. 

क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

वनिताला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का? प्रसादचे मन वळविण्यात तिला यश येईल का? तिचे सुखी संसाराचे स्वप्नं पूर्ण होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.

भाग १  link 

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html




भाग १३ link: समाप्त (The end)

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_15.html




No comments:

Post a Comment