कथा मालिका : व. नि. ता. (भाग २)
विषय: कौटुंबिक कथा
भाग २ :
©️Anjali Minanath Dhaske
प्रसादने बाळंतपणासाठी वनिताला गावी पाठविण्याचा निर्णय घेतला. सासरी, माहेरी डोहाळे पुरवल्या जात असल्याने तीही आनंदी होती. खरं तर होणार्या बाळाला बाबांचा जास्तीत जास्त वेळ सहवास मिळावा अशी तिची ईच्छा होती. परंतु बाळाच्या आगमनाची तयारी अधिक चांगल्या प्रकारे करता यावी म्हणून प्रसादने ओव्हर टाइम करायला सुरवात केली होती त्यामुळे तिने मनातली ईच्छा बाजूला ठेवून गावी जाण्याचा निर्णय घेतला. प्रसाद दर महिन्याला तिच्या खर्चासाठी म्हणुन काही रक्कम पाठवत होताच. तोही महिन्यातून दोन वेळा न चुकता गावी तिला भेटायला येत होता. अशातच तिच्या लहान बहिणीचे लग्न ठरले. तेव्हा वडिलांची आर्थिक परिस्थिती फारच बिकट असल्याने लगेच लग्न करून द्यायला वडील तयार नव्हते. मुलाकडची मंडळी जास्त दिवस थांबायला तयार नव्हती. ठरलेले लग्न मोडण्याची भाषा मुलाकडची मंडळी करू लागली होती. तेव्हा चांगले स्थळ हातातून जावू नये म्हणून प्रसादने स्वतःहून मध्यस्ती केली. तिच्या वडिलांना बिनव्याजी पाच लाख रुपये देवून बहिणीचे लग्न धुमधडाक्यात करण्याचे सुचविले. आपल्या शिक्षणासाठी पैसे नाहीत असे म्हणणार्या प्रसादने तिच्या वडिलांना एक हाती पाच लाख रुपये कसे दिलेत असा साधा प्रश्न वनिताच्या निरागस मनाला पडला नाही. बहिणीचे लग्न झाले याच आनंदात ती दंग होती. त्याच्या या कृतीने तिला आणि तिच्या घरच्यांना फार समाधान झाले. तिच्या लहान बहिणीचे लग्न पार पडून तीही संसाराला लागली. यानंतर वनिताच्या माहेरी प्रसादचे विशेष कौतुक होवू लागले. वनिताचा सुखी संसार बघून आई वडील निश्चिंत होते.
बघता बघता घरात लहान पाहुण्याचे आगमनही झाले. गोंडस नातू मिळाल्याने सासरीही सगळे आनंदात होते. बाळाचे ' प्रतीक ' असे नामकरण केले.
प्रतीक तीन महिन्याचा झाला तरी प्रसाद तिला नेण्याचे नाव काढेना. नातवंडाची बाललीला अनुभवण्यासाठी सासरचे ही तिला स्वतःहून प्रसादकडे शहरात पाठवेना. प्रसादला आपली ओढ राहिली नाही या भीतीने अखेर तिनेच हिंमत करून सासू जवळ विषय काढला. प्रसादचे खाण्यापिण्याचे फार हाल होतात ही सबब पुन्हा एकदा सांगून तिने सासूचे मन वळविले. प्रसाद आल्यावर सासूने वनिताला घेवून जाण्याचा विषय काढला. परंतु तो टाळाटाळ करतोय हे लक्षात आल्यावर, ' पोरगं हातचं जातंय की काय ' या शंकेने सासूने हट्टाने वनिताची रवानगी प्रसादसोबत केली.
आता प्रतीकशी खेळण्यात प्रसादचा जास्तीत जास्त वेळ घरात जावू लागला. फक्त कामासाठी बोलावणे आले तरच तो घराबाहेर पडू लागला. सुरुवातीला प्रतीकचा सांभाळ व घर काम करतांना वनिता गोंधळून जात होती. प्रसाद घरी असल्याने तिला बरीच मदत करत होता. सुरुवातीला त्याच्या घरी असण्याने ती सुखावली होती. नेहमी फोन आला की तो लगेच कामासाठी बाहेर पडत असे. कुठे जातोय? कधी येणार? असे प्रश्न तीने विचारले की तो तुटक उत्तरे देत असे. पूर्वी रोज सकाळीच कामावर जाणारा प्रसाद आता मात्र दिवस दिवस घरात कसा काय बसून असतो ? फोन आल्यावर तास दोन तास तो बाहेर जातो. ईतका कमी वेळ काम करूनही चांगला पगार देणारी कोणती नोकरी तो करतो? असे अनेक प्रश्न तिला चिंतित करत होते.
तिने त्याला अनेकदा विचारले की, तो नेमके काय काम करतो? हल्ली तो घरीच जास्त वेळ कसा घालवतो? ऑफिसचे फोन असे वेळी अवेळी, रात्री बेरात्री का येतात? त्याने कधीही प्रश्नांची उत्तरे समाधानकारक दिली नाहीत. बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली की माणसे दुसर्या बाईकडे आकर्षित होतात, अशी शंका उगाच तिच्या मनात जोर धरू लागली. तीने त्याचा फोन तपासण्याचा प्रयत्न केला पण प्रसाद आंघोळीलाही जातांना फोन सोबत घेवून जात होता. प्रसाद वनिताकडे दुर्लक्ष करत होता. घरात असतांना पुर्वीसारखा तिच्याशी प्रेमाने बोलत नव्हता. वनिताची चिडचिड वाढली . त्यांच्यात सारख्या कुरबुरी सुरू झाल्या.
वर वर बघता प्रसादचे वागणे सामान्य होते. प्रतीकचे तर तो खूप लाड पुरवत होता. प्रतीकला दवाखान्यात नेतांना फोन आला तरी तो जाण्याची कधीच घाई करीत नव्हता. प्रतीकला घरी आणून सोडल्यावरच तो कामावर जात होता. प्रतीकच्या वेळा सांभाळतांना ती दमून जाते म्हणुन तो कधीही स्वयंपाक, घरकाम केलेच पाहिजे या बाबत आग्रही नव्हता. तरीही त्या दोघांच्या नात्यात खोलवर कुठेतरी काहीतरी उसवत जात होते. केवळ शंका घेवून भांडण काढणे तिच्या स्वभावात नव्हते परंतु गप्प बसून सहन करणेही तिला शक्य नव्हते. माहेरी किंवा सासरी कोणालाही याबाबत सांगणे तिला जमणार नव्हते. जवळची अशी कोणी मैत्रीणही नव्हती जिच्याशी बोलून मन हलके करता येईल.
अशातच प्रसादने पूर्वीसारखे रोज कामावर जायला सुरवात केली. तिनेही मन घट्ट करून शंका बाजूला सारल्या आणि प्रतीकसोबतच स्वतःवर लक्ष द्यायला सुरवात केली. व्यायाम करून तिने शरीर पुन्हा सुडौल बनवायला सुरवात केली.
क्रमशः
©️Anjali Minanath Dhaske
पुणे
प्रसाद नक्की कोणती नोकरी करत होता? दोघांच्या नात्यात नक्की काय उसवत चालले होते? प्रसाद दुसर्या स्त्रीच्या नादी लागला होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.
भाग १ link
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html
भाग ३ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html
भाग ४ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html
भाग १० link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_13.html
भाग ११ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_87.html
भाग १२ link:
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_46.html
भाग १३ link: समाप्त (The end)
https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_15.html
No comments:
Post a Comment