ते ११ रुपये

#ते_११_रुपये
           
             २०१५ साली सोसायटीच्या गणेश मंडळासाठी मी रांगोळी काढायचं ठरवलं होतं. आमच्या सोसायटीचा गणपती सात दिवस असतो म्हणून मग मला अष्टविनायकांपैकी एक गणपती रोज काढायची कल्पना सुचली . शेवटच्या दिवशी दोन गणपती काढले तर रांगोळीतून अष्टविनायक दर्शन सहज  पूर्ण करता येणार होत.
          मोरेश्वर गणपती काढण्यापासून सुरवात केली. पहिल्याच दिवशी मोरेश्वर गणेशाचे रांगोळीतील रूप बघून सगळ्यांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला. माझा रांगोळी काढण्याचा हुरूप वाढला . दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रांगोळी काढण्यासाठी म्हणून मांडवात गेले तेव्हा माझ्या कालच्या रांगोळीवर ११ रुपये ठेवलेले दिसले . चुकून पडले असतील असं वाटून मी ते पैसे तिथल्याच दान पेटीत टाकले आणि कामाला लागले . रांगोळी काढून झाल्यावर घरच्या कामांची घाई असल्याने  मी त्या पैशांबद्दल कसलीही चौकशी न करता घरी आले .
तिसऱ्या दिवशीही  रांगोळीवर ११ रुपये ठेवलेले दिसले . काहीच कळेना . चुकून पडतील तर बरोबर अकराच रुपये कसे पडतील? ते चुकून पडल्या सारखे दिसत नव्हते . कोणी तरी मुद्दाम ठेवत असल्यासारखे वाटत होते. मी गोंधळात पडले . हा काय प्रकार आहे?  मांडवात चार पाच आजोबा भजन म्हणण्यासाठी जमलेले होते त्यांनी माझा गोंधळलेला चेहरा बघून विचारलेच , काय झालं आहे ?
मीही त्यांना ११ रुपयांबद्दल सांगितले," काल तर हे पैसे मी उचलून दान पेटीत टाकले मग हे पैसे इथे पुन्हा कोण? आणि का ठेवतं?"
 त्यावर त्यांनी खुलासा केला . A wing मधले एक आजोबा गणपतीच्या दर्शनाला येतात तेव्हा तुझ्या रांगोळीवर मुद्दामहून ११ रुपये ठेवतात . पहिल्या दिवशी आम्ही त्यांना टोकलं की," ते पैसे तिथे नका ठेवू . दान पेटीत टाका".
त्यावर त्यांनी सांगितलं की ,"   हे पैसे खास या रांगोळी काढणाऱ्या मुलीसाठीच आहेत  .  आता नाजूक तब्येतीमुळे अष्टविनायक दर्शन घ्यायला जाणं झेपत नाही . हिच्या रांगोळीमुळे इथेच देवाचं दर्शन घडतय .  रोज पुढच्या गणपतीचं दर्शन घेण्याची ओढ म्हणून चालवत नसतांना मी इथं येतो . रांगोळी सुरेखच काढते. जितकी ओढ पुढच्या गणपतीच्या   दर्शनाची असते मनात तितकीच ओढ हिची रांगोळी बघण्याचीही निर्माण होते. साक्षात गणपतीचीच कृपा आहे  तिच्यावर  तेव्हाच तर इतक्या सुंदर रांगोळ्या काढते.   मला तर तिच्या रांगोळीतच माझा देव भेटला. तिच्या कलेचं कौतुक म्हणून आहेत हे पैसे. दान पेटीत काय पैसे टाकायचे ते टाकतोच नंतर आधी तिचे आभार मानू द्या. या पैशाला कोणीच हात लावायचा नाही . हे तिलाच मिळायला हवेत". म्हणून आम्ही कोणी हात लावत नाही त्या पैशांना.
"पोरी तुझेच आहेत ते पैसे . मान ठेव त्याचा . दान पेटीत टाकू नकोस ". असं म्हणून त्या आजोबांनी मी काल दान पेटीत टाकलेले ११ रुपयेही काढून माझ्या हातात ठेवले.
मला तर काहीच कळायला तयार नाही . कौतुकाचा हा प्रकार मला नवीनच होता. पण मनात कुठेतरी खूप भारी वाटलं होत हे खरं. घरी येवुन मोठ्या आनंदाने नवऱ्याला झालेला प्रकार सांगितला तेव्हा त्याचं म्हणणं होतं," असतो एखाद्याचा भरभरून कौतुक करण्याचा स्वभाव,   म्हणून त्यांनी तुझ्या कलेचं कौतुक केलं असावं  ... लगेच काही हरबऱ्याच्या झाडावर चढू नको".  कारण काय असेल ते असो पण त्यांचं केलेलं हे कौतुक मला एक वेगळीच प्रेरणा देवून गेलं होत हे मात्र खरं .
आम्हा दोघांची भेट  रोज रांगोळीच्या माध्यमातून होत होती म्हणूनच कदाचित सात दिवसात त्यांनी मला भेटायचा प्रयत्न केला नाही की मीही त्यांचा शोध घेतला नाही .
ओळखीचे लोक मला भेटल्यावर माझ्या रांगोळीच खूप कौतुक करतात पण एका अनोळखी व्यक्तीने केलेलं हे कौतुक माझ्या कायम स्मरणात राहीलं. त्याला कारणही तसंच आहे . माझ्या रांगोळ्यांमधे विशेष काही नव्हतं..... विशेष होतं ते त्यांच्यात. असं मोकळ्या मनाने कौतुक करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी खूप मोठं मन लागतं . जे त्यांच्याकडे होतं.
आजही गणेश उत्सवात रांगोळी काढतांना मला त्यांची आठवण येते . त्यांना मनोमन मी निरोप ही देते , "आजोबा.... नंतर रांगोळी स्पर्धेत अनेक पारितोषिक मिळाली पण तुमच्या कौतुकाची सर कशालाच आली नाही हो ...
तुम्ही केलेल्या कौतुकाने मिळालेली प्रेरणा मला कधीच शब्दात मांडता येणार नाही .
आजकाल अनेक  लोक इतरांचे  कौतुक करण्यासाठी टाळाटाळ करतांना दिसतात. वेळच नाही , सुचलं नाही , आवडलं तरी पट्कन कौतुक करण्याचा आमचा स्वभावच नाही अशी सबब सांगतांना दिसतात तेव्हा मात्र तुमची प्रकर्षाने आठवण होते.
मी स्वतःच्या आनंदासाठी काढलेल्या रांगोळ्यांच तुम्ही कौतुक केलं. त्यामुळे आजही मी चांगल्या वाईट प्रतिक्रियांचा विचार न करता  स्वत:च्या आनंदासाठीच रांगोळी काढते . बघणाऱ्यांना त्या रांगोळ्या आवडतात. ही खरंच तुम्ही म्हणालात तसं बाप्पाचीच कृपा असावी.....
तुमचे  आभार मानावे तितके थोडेच आहेत कारण  ते ११ रुपये मला  कौतुकांच्या आठवणीबाबत कायमचे खूप श्रीमंत करून गेले आहेत .

रांगोळी काढतांना जो आनंद मला होतो त्याचं आनंदाचा अनुभव बघणाऱ्यालाही येवुन त्याची पोच पावती म्हणून मला कौतुकाचे ११ रुपये दिल्या गेले. त्या ११ रुपयाच्या रूपात मी दिलेलाआनंद माझ्याजवळ परत आला तेही द्विगुणित होवून.
आनंद मिळवायचा असेल तर तो स्वतः अनुभवत इतरांनाही देता यायला हवा ही शिकवण मला मिळाली ती त्या आजोबांमुळेच. 
आता आनंदाची सुरुवात मी माझ्यापासुनच करते. इतरांनी माझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणावे अशी अपेक्षा न करता मी स्वतः ते निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करते.  मला आनंद वाटेल ते सगळ मी  कुठंलीही अपेक्षा न ठेवता  स्वतःसाठी आणि इतरांसाठीही करते . त्यामुळे आता भेटला तर  आनंदच  भेटतो नव्या नव्या रूपाने .... 
तेव्हा तुम्ही ही स्वतःचा आनंद स्वतः मधेच शोधा. माझ्यासारखाच  तुम्हालाही तो नक्की सापडेल . कारण बाप्पाच तो ....  बाप्पाची कृपा सगळ्यांवरच असते 



©️ अंजली मीनानाथ धस्के
तेव्हा काढलेल्या रांगोळ्या व्हिडिओ च्या स्वरूपात पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहे. आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेयर करायला विसरु नका.





विघ्नहर्ता बाप्पा

#विघ्नहर्ता_बाप्पा
                      आज कावेरी जरा लवकरच उठली होती. खूप दिवसापासून भंगलेली बाल गणेशाची मूर्ती घरामधे तशीच पडून होती. खरं तर घरात जागा नसतांना केवळ मुलांना आवडली म्हणून केवढ्या हौसेने त्यांनी 'छोटा भीमचे' रुप असलेली गणेश मूर्ती घरी आणली होती. पण आता मात्र 'रस्त्यावर गर्दी वाढायच्या आत मूर्तीला कुठेतरी ठेवून यावे', असे तिच्या मनात होते. कामांची घाईही खूप होती. तिने कामांची यादी केली आणि मूर्ती घेवून घराबाहेर पडली. बरेच अंतर गेल्यावरही तिला मूर्ती ठेवायला मनासारखी जागा मिळेना. तेव्हा तिने गावातल्या नदीच्या घाटावर जाण्याचा निर्णय घेतला. तिथे निर्माल्य, तुटके फोटो यांचा ढीग पसरलेला होता. येवढ्या घाणीत बाप्पाला ठेवून जावे तर तिच्या मनाला पटेना. नदीत विसर्जित करावे तर तिथेही बंदोबस्त कडक होता. निर्माल्य नदीत टाकल्यास पाचशे  रुपये दंड आकारल्या जाणार होता. दुसरी एकही चांगली जागा दिसत नव्हती  म्हणून ती फार वैतागली होती तेवढ्यात तिचा मोबाईल खणखणला.  चडफडतच तिने फोन घेतला. पाहते तर आईचा फोन होता. तिने आईला काही बोलायच्या आत तिकडून आईचे रडणे ऐकु आले आणि "तू ताबडतोब घरी ये " असा निरोप तिला मिळाला. "बरं येते लगेच" म्हणून तिने फोन ठेवला. क्षणात यादीतली सगळी कामे तिने रद्द केली. आईकडे जायला गाडी वळवली तेवढ्यात तिला मूर्तीची आठवण झाली. कोणताही विचार न करता घाईतच ती मूर्ती तिने तिथेच एका झाडा जवळच्या कट्ट्यावर ठेवून दिली.
            अर्ध्या तासात ती आईकडे पोहोचली. आई अजूनही रडतच होती. रडाण्याचे कारण विचारल्यावर कळले की,तिच्या भावाने आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 
         दिवसातील अधिक काळ तर आई तब्येतीच्या तक्रारीमुळे झोपूनच असे. तिच्या रोजच्या सगळ्या विधी अंथरूणात पार पाडत होत्या. दिवाणखाना तर आईच्या पलंगाने आणि औषधाच्या बाटल्यांनी. कायमचा व्यापलेला होता. घरात दादा, वहीनी दोघेही नोकरी करणारे होते.  आईला हल्ली कमी दिसत होते.  अनेक गोष्टींचे विस्मरणही होत होते. घरात तिच्याजवळ पूर्णवेळ थांबणारे दुसरे कोणी नव्हते. पूर्वीसारखे तिला घरात एकटे ठेवून कामावर जाणेही अशक्य झाले होते. तिच्यासाठी घरात पूर्णवेळ थांबणारी प्रशिक्षित परिचारिका ठेवणे गरजेचे होते. अशी सेवा खूप महाग होती. वाहिनीचा सगळा पगार या सेवेत खर्ची लागणार होता. भावाच्या एकट्याच्या पगारात घरखर्च, बाहेरगावी शिकणाऱ्या त्याच्या दोन मुलांचे खर्च आणि आईचा दवाखान्याचा खर्च असे सगळे खर्च भागण्यासारखे नव्हते. याउलट वृध्दाश्रमात पूर्ण वेळ प्रशिक्षित  परीचारीका जुजबी रकमेत उपलब्ध होणार होती. वृद्धाश्रम घराजवळ असल्याने आईला  रोज भेटणे, घरचे जेवण देणे शक्य होणार होते. मुख्य म्हणजे ऑफिसमधे   असतांना आई सुरक्षित असल्याने निश्चिंत मनाने काम करणे शक्य होणार होते. भाऊ आणि वहीनीने नाखुशिनेच हा निर्णय घेतला होता.
              कावेरीकडे आईला न्यावे तर तिचे घर फारच छोटे होते. परिस्थिती तर अगदी बेताची होती. तरी ती रोज सकाळी मुलांना शाळेत सोडल्यावर आईकडे येवून बसायची.  मागच्या महिन्यात ती दुपारी मुलांना शाळेतून आणण्यासाठी बाहेर पडली होती. तेव्हढ्या तासाभरात  आईला पाणी पितांना ठसका लागला.  पाणी फुप्फुसात गेले आणि ती बेशुद्ध पडली होती. त्यानंतर पंधरा दिवस दवाखाना केला तेव्हा ती पूर्ववत बोलू लागली होती. आईजवळ प्रशिक्षित परिचारिका असणे आवश्यक असल्याने तिला दादा वहीनीला काही समजावता येणार नव्हते. 
        तिच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यांची उत्तर शोधण्याआधी तिला आईला समजावणे, धीर देणे गरजेचे होते. काय बोलावे तिला काहीच सुचत नव्हते. ती पुर्णपणे बधीर झाली होती. तरी तीने धीर केला व आईला म्हणाली , " डोळे पूस बघू आधी, निर्णय घेतला म्हणून लगेच नाही काही नेणार तुला, निघेल काही तरी मार्ग, तू काळजी करू नकोस. मी बोलते दादा वहीनीशी,  देव आहेच की आपल्या पाठीशी. डोळे पूस बघू आणि काही तरी खावून घे बरं आता."
         तीने मनातल्या मनात " देवा तुलाच रे काळजी. काही तरी मार्ग काढ यातून. सोडव बाबा या संकटातून" असा धावा केला . तशी तीला मूर्तीची आठवण झाली आणि सल काळजात खोलवर  रुतली. डोळ्यात अश्रू दाटले. तिच्या मनावर प्रचंड ताण आला. तिचं आता कशातच चित्त नव्हतं. ती घाईतच उठली आणि घराबाहेर पडली. आता तिला तिचे बालगणेश परत हवे होते. तीने जिथे मुर्ती ठेवली होती तिथे ती परत आली.
         पण आता तिथे मूर्ती कुठेच नव्हती. होती ती फक्त अपराधी पणाची भावना आणि डोळ्यात दाटलेले पाणी.  
         ती डोळे मिटून, डोकं धरून तिथेच बसून होती. एकीकडे मनात बाप्पाची विनवणी सुरूच होती.
तेवढ्यात तिच्या कानी " गणपती बाप्पा मोरया" चा गजर पडला.
तिने आवाजाच्या दिशेने बघितले तर काही स्वयं सेवक नदीच्या आसपासचा  परिसर स्वच्छ करत होते.  तुटलेले फोटो, भंगलेल्या मुर्त्या गोळा करून टेंपोत भरत होते.  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या,निर्माल्य नदीत टाकल्यामुळे, नदी किनाऱ्यावर ठेवल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. परिसर अस्वच्छ राहतो.  हे टाळण्यासाठी स्वयंसेवक   त्या मुर्त्या, फोटो व निर्माल्य घेवून जात होते. 
त्यांच्या गाडीवर मोठा बॅनर होता.  त्यावर छोटीशी कविता ठळक अक्षरात लिहिलेले होती.

भंगलेली मूर्ती सांगू पाहे काही
नवी कोरी असता देव्हाऱ्यात मांडली.
हात जोडूनी दोन्ही, पुढती माझ्या मानही झुकली.
केवळ माझ्या दर्शनाने अनेक संकटेही सुटली.
पण........
रंग जरा उडता किंवा
कोपरा एखादा तुटता
नकोशी का होते? अडगळ का वाटली?
सोडले जरी कडेला अथवा झाडा खाली
कोणे एकेकाळी देवत्व होते माझ्यातही

त्याच गाडीजवळ एक आजोबा माईक हातात घेवून सांगत होते, " निर्माल्य नदीतच विसर्जित व्हावे असा आग्रह धरणारे आपण विसरून जातो की, असे नियम,रुढी बनविल्या गेल्या तेव्हा लोकसंख्या फार नव्हती. त्या काळी स्वतःचे पाणी शुद्ध करण्याची नैसर्गिक क्षमता नद्यांमधे अस्तित्वात होती. आपल्या संस्कृतीत नद्यांना अत्यंत पवित्र मानले जाते. तिच्यात मारलेल्या एका डुबकीने आपली सगळी पापे धुवून जातात असे मानल्या जाते. पूर्वी नदीचे पाणी पिण्यायोग्य होते. आता या पाण्यावर जलशुद्धीकरण केल्याशिवाय आपण हे पाणी पिणे अशक्य आहे. आपली देवावर खरी श्रद्धा असेल तर तीच श्रद्धा देवाने निर्माण केलेल्या या निसर्गावरही असायला हवी. जसे भंगलेल्या मूर्तीचे देवत्व नष्ट होते तसेच दूषित नदीचे पावित्र्य नष्ट होत नसेल का? मानला तर  दगडातही देव असतो. असे ठामपणे सांगणारे आपण भंगलेल्या मूर्तीचे मात्र देवपण नकारतो. देव जर निर्लेप, निर्गुण निराकार आहे तर शोभेच्या मूर्तिपूजेचा अट्टाहास योग्य आहे का?
तेव्हा नद्यांना दूषित करणारे स्त्रोत नगण्य होते. आता आपण आपल्या नद्यांचे नाल्यात रूपांतर केले आहे. जुन्या पद्धतीचे पालन करतांना पूजेसाठी जुन्याच पध्दतीच्या पर्यावरण पूरक मूर्ती, फोटो  वापरण्याचा आग्रह असायला हवा. 
'एक गाव एक देऊळ', 'एक गाव एक गणपती ' या संकल्पना मानणाऱ्या समाजाचे 'एक वसाहत एक देऊळ', 'एक घर एक गणपती ' या संकल्पना मानणाऱ्या समाजात रूपांतर झाले आहे. तेव्हा निसर्गाप्रतीही आपल्या जबाबदार्‍या वाढवायला हव्यात.
 'प्रदूषण रहित नदी ' या आमच्या आवाहनात प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर जरी प्रतिसाद दिला तरी नदीचे पावित्र्य पुन्हा मिळविण्यात आपल्याला यश येईल. तुम्ही नदीत टाकण्यासाठी जे काही निर्माल्य, भंगलेल्या मूर्ती आणता, ते आम्हाला द्या. आम्ही त्याचा योग्य तो मान राखून त्यावर प्रक्रिया करु"
         त्यांचे बोलणे ऐकत असतांनाच  कावेरीची नजर तिच्या बाप्पालाच शोधत होती. गाडीच्या आत डोकावून पाहते तर तिथे तिची छोटा भीमचे रूप असलेली मूर्ती ठेवलेली होती.  तिने ती मूर्ती वापस मागितली पण ती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची असल्यामुळे आज जरी घरी नेली तरी उद्या अधिक भंगल्यावर तिला पुन्हा विसर्जनासाठी इथेच आणल्या जाणार असे वाटून  स्वयंसेवक ती मूर्ती तिला द्यायला तयार नव्हते. प्लास्टर ऑफ पॅरिसची मोठी मूर्ती घेण्याची चूक तर तिने केली होती. तिला तिची चुक उमगलीही होती. तरी तिची साध्याची होणारी भावनिक गुंतागुंत ऐकून एकाने त्यांच्याजवळ असलेली शाडू मातीपासुन व फुलांच्या बिया आत टाकून बनवलेली अत्यंत छोटी व सुबक गणेश मूर्ती तिला दिली. आता भविष्यात कधी पुन्हा तिच्या बाप्पाची मूर्ती भंगलीच तर घरातल्या कुंडीत तिचे विसर्जन करता येणार होते . विसर्जन केलेल्या बाप्पाची छान फुल झाडे ही बनणार होती. 
  त्यामुळे बाप्पाचं रूप जरी बदललं तरी आपला बाप्पा आपल्याला मिळाला याचा तिला आनंद झाला होता . इथून पुढे मात्र ती 'भंगलेल्या मुर्त्या गोळा करण्यासाठी  त्यांच्यातली एक स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे' , असे तीने त्या आनंदाच्या भरात ठरवून टाकले .
              तीने या नव्या बाप्पाला घरी आणलं देवघरात ठेवून पूजा केली.
*विघ्नहर्ता बाप्पाच तो.  खरे तर त्याला भक्तांकडुन काही नको असते. त्याच्यासाठी फस्त भक्तीची भावना महत्वाची असते .*  बाप्पासमोर बसून तिने केलेल्या कृतीची माफी मागितली. मूर्ती पूजेचा अट्टाहास सोडून नदीचे पावित्र्य राखण्याचा ध्यास घेण्याचे वचन दिले. तेव्हढ्यात योगायोगानेच  दादाचा फोन आला. 'आईच्या नावाने कोर्टात सुरू असलेल्या केसचा निकाल आईच्या बाजूने लागल्याने वडिलोपार्जित संपत्तीत असलेला आईचा वाटा तिला मिळणार आहे. आता वर्षभरासाठी आईजवळ पूर्णवेळ परिचारिका ठेवणे शक्य होणार आहे. बाप्पाचीच कृपा. त्यानेच सोडवलं मला संकटातून '. हे सांगताना त्यालाही आनंदाश्रु अनावर झाले हे तिला स्पष्ट जाणवले. आज निसर्गाप्रती जागरूकता आणि बाप्पाबद्दल  श्रद्धेच्या भावनेने तीला नवा दृष्टिकोन मिळाला होता. तिचे मन त्या कृतज्ञतेत समाधानाने व्यापून गेले.
©️ अंजली मीनानाथ धस्के

जुन्या कथेलाच नव्याने एक सकारात्मक शेवट दिला आहे


कृष्ण जन्माष्टमी २०१९

कृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा


बोलणे सोपे....

बोलणे सोपे....

                 अहिल्याबाई होळकर महाविद्यालयात वृंदाला ' स्पर्धेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन' या विषयावर व्याख्यान द्यायचे होते. व्याख्यान ऐकायला येणारी तरुण पिढीची संख्या लक्षात घेऊन तिने अनेक मुद्दे विचारात घेतले. तिचे स्वतःचेही अनेक सकारात्मक अनुभव पाठीशी होतेच. शेवटी तो दिवस उजाडला. छान तयार होवून ती दिलेल्या वेळेत महाविद्यालयात पोहचली. तिथे तिचे स्वागत फुलांचा गुच्छ देवून करण्यात आले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. वृंदाचा परिचय श्रोत्यांना करून देण्यात आला. उत्तम समुपदेशक म्हणून वृंदाचे नाव सगळ्यांनाच परिचयाचे होते. तिचा शब्द न शब्द ऐकण्यासाठी श्रोते उत्सुक होते. सभागृहात  एकदम शांतता पसरली होती.
             तिने बोलायला सुरुवात केली,"माननीय व्यासपीठ, आदरणीय सहकारी आणि माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो ...... नमस्कार....... आजचा विषय ' स्पर्धेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ' हा आहे. आजच्या काळात स्पर्धा वाढली आहे असं आपण सतत ऐकत असतो. परंतू खरंच आजच्या काळात स्पर्धा वाढली आहे का? असा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारते तेव्हा मला नेमके उत्तर मिळतं नाही. आमच्या पिढीलाही स्पर्धेला तोंड द्यावेच लागले आहे. तेव्हाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावीच लागत असे. तेव्हाही स्पर्धेत यश मिळवण्यासाठी ' शॉर्ट कट ' उपलब्ध नव्हते. दोन गुणांनी मेरिट हुकलेली हताश मुले तेव्हाही होतीच. मेडिकल , इंजिनियरिंगच्या प्रवेशासाठी एक एक गुणांची रस्सीखेच तेव्हाही होतीच.
मग तेव्हापेक्षा आता स्पर्धा जास्त कशी ?
  आजही  स्पर्धा आणि तिचे मूळ रूप पूर्वीसारखेच आहे. आज मात्र  आपला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. हल्लीच्या पालकांचे विचार बदलले आहे. केवळ अभ्यासाला महत्त्व न देता मुलांनी इतर क्षेत्रातही आपले नाव  मोठे करावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. एकाच वेळी अनेक गोष्टी आल्या पाहिजे या पालकांच्या आग्रहाने मुलांच्या आयुष्यात  मात्र गोंधळ वाढतो आहे. 'इतरांना जे सहज जमत ते आपल्याला का जमत नाही' या भावनेने आजकाल मुले आणि त्यांचे पालक निराश होतात. त्यांचे बालपण खेळण्या बागडण्यात जाण्याऐवेजी अनेक गोष्टी शिकण्याच्या अट्टाहासात जाते आहे. मग सुरू होते चर्चा ..... स्पर्धेमुळे मुलांचे आयुष्य कसे करपते आहे , यावर...... पण सगळ्यात आधी
स्पर्धा म्हणजे काय ?
स्पर्धेची गरज का असते? हे  समजून घेतले पाहिजे.
स्पर्धा म्हणजे,"  आपल्याला त्या त्या विषयाचं असलेलं ज्ञान दिलेल्या वेळेत, दिलेल्या पद्धतीने व्यक्त होण्याची एक संधी" असते.
स्पर्धा जशी इतरांशी असते तशीच ती स्वतःशीही असली पाहिजे. इतरांशी स्पर्धा केली तर हाती नैराश्य येते. परंतु हीच स्पर्धा स्वतःशी स्पर्धा केली तर आपल्यात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. स्पर्धेमुळे आपल्याला आपल्यात असलेल्या कमतरतांची तसेच बलस्थानांची जाणीव होते. यश मिळवायचे असेल तर नियोजनपूर्वक तयारी हवी अशी शिकवण मिळते. निव्वळ स्पर्धेपुरती केलेली काही दिवसांची तयारी कायमस्वरूपी यश देत नाही.' स्पर्धा असो वा नसो आपण आपल्या प्रयत्नात सातत्य राखायला हवे' हे स्पर्धेत भाग घेतल्यावरच समजते.  स्पर्धेतील यश आपल्याला मेहनतीसाठी  प्रेरणा देणारे असते.
केवळ ज्ञान असून भागात नाही तर ते ज्ञान योग्य ठिकाणी दिलेल्या वेळेत सुसूत्रपणे मांडता यायला हवे. याची जाणीव स्पर्धेमुळे आपल्यात निर्माण होते. स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे इतर सहभागी सदस्यांकडून खूप काही शिकायला मिळते.  ज्ञानाची देवाघेवाण करण्यासाठीही स्पर्धा हे निमित्त असते. स्पर्धेनिमित्त एकाच विषयावर येणाऱ्या विविध प्रतिक्रिया आपल्या कल्पनाशक्तीचा विकास करण्यास सहाय्यक ठरतात.
स्पर्धा आपल्याला चालना देते. स्पर्धा असणे चांगलेच आहे. फक्त त्यात यशच मिळाले पाहिजे हा अट्टाहास  नको. स्पर्धा फक्त यश किंवा अपयशा  पुरती कधीच मर्यादित नसते . त्यापलीकडे जाऊन ती आपल्याला अनुभवाने समृध्दही करत असते. मात्र हे अनुभवाने समृध्द होणं अनुभवण्यासाठी स्पर्धा निकोप असावी लागते.
          आजकाल स्पर्धा गुणांपुरती मर्यादित राहिली नाही तर तिने कळत नकळत रोजच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत प्रवेश केला आहे. व्हॉट्सअँप , फेस बुक यांच्यावर येणाऱ्या प्रतिक्रीयांची संख्या हे कारणही स्पर्धेसाठी पुरेसे आहे. आज आपला आत्मविश्वास, आनंद हा व्हॉट्सअँप , फेसबुकवर येणाऱ्या प्रतिक्रियांवर अवलंबून आहे. पूर्वी अशी माध्यमे उपलब्ध नसल्याने उठसुठ तुलनेची, स्पर्धेची भावना निर्माण होत नव्हती. आता प्रसिद्धीच्या क्रमवारीत सगळ्यांनाच पहिला नंबर हवाय. त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी देखील आहे. पूर्वी रोजच्या जीवनात  स्पर्धा करायची झालीच तर आजुबाजुच्या लोकांपूर्तीच मर्यादित असायची पण सोशल मीडियामुळे , घरात बसल्या बसल्या आपण जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीशी स्पर्धा करू शकतो. स्पर्धेच्या कक्षा रुंदावल्या आहेत म्हणूनच आजचे  युग हे स्पर्धेचे युग आहे. थोड थांबून विचार केला तर सत्य जाणवेल की , ' योग्य वेळी , योग्य बाबतीत  निकोप स्पर्धा करणे हरवले आहे. स्पर्धेचा दर्जा खालावत जातो आहे'.
           स्पर्धा म्हटलं की कोणी तरी पुढे जाणार कोणी तरी मागे राहणारच. पण हे मागे राहणं स्वीकारता यायला हवे. त्यातून खूप काही शिकून पुढेचे मार्गक्रमन करता यायला हवे. सगळेच उर फुटेस्तोवर धावत आहेत म्हणून आपणही त्यांचे अनुकरण करणे योग्य नाही. आपल्याला नेमके काय हवे आहे यावर सगळे लक्ष केंद्रित करून इतर बाबतीतील स्पर्धा निग्रहाने दूर ठेवायला हवी. शिकण्याच्या प्रक्रियेत स्पर्धेची भूमिका खूप महत्त्वाची आहे परंतु ही स्पर्धा जर तुमचा शिकण्याचा आनंद हिरावून घेत असेल तर अशी स्पर्धा टाळायला हवी. स्पर्धेच्या नादात जगणे मागे पडत असेल तर वेळीच चूक सुधारायला हवी. आपल्या
 संपूर्ण आयुष्याचा 'स्पर्धा' हा केवळ एक भाग आहे. स्पर्धा आणि त्यातील यश म्हणजे आयुष्य नव्हे. स्पर्धेला  अनावश्यक महत्त्व देवू नये.तेव्हा योग्य तिथेच स्पर्धा करा. स्पर्धेकडे संधी म्हणून बघा. त्यातील यश अपयश यावर जीवाचा आनंद अवलंबून ठेवू नका. जीवन सुंदर आहे. आनंदी रहा. आनंद पसरवा" असे बोलून टाळ्यांच्या गजरात तिने समारोप केला.
      अनेक जण तिला भेटून मार्गदर्शन घेत होते. ती सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. अनेकांना गरज लागल्यास पुन्हा मार्गदर्शन करण्याचे आश्वसनही देत होती. श्रोत्यांच्या प्रतिसादावरून 
कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला होता हे सहज लक्षात येत होते.
             या सगळ्या धावपळीत ती थकून गेली होती. घराचे कुलूप उघडून सोफ्यावर बसतांना तिने पंख्याचे बटण दाबले. त्या गार हवेने तीला जरा बरे वाटले . डोळे मिटून ती घटकाभर तशीच बसून राहिली. तेवढ्यात तिला  मोबाईलची आठवण झाली. तिने घाईत पर्स मधून मोबाईल बाहेर काढला. फेसबुकचे पान उघडले  पटकन आजच्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ अपलोड केले. फोन पुन्हा बाजूला ठेवून दिला आणि डोळे मिटून शांत बसून राहिली.
              खरं तर तिला आता शांतातेची खूप गरज होती. परंतू 
 ही शांतताच तिला आतून अधिक अस्वस्थही करत होती. जाणारा प्रत्येक क्षण तिला युगा सारखा वाटू लागला होता. दरवेळी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर प्रतिक्रिया येण्यासाठी लागणारा वेळ तिला नकोसा वाटे. थोड्याच वेळात नोटिफिकेशनच्या आवाजाने खोलीतील शांतता दणाणून गेली. आजच्या कार्यक्रमाची जी पोस्ट तिने केली होती त्यावर अनेक प्रतिक्रिया  येवू लागल्या. तो आवाज ऐकून ती सुखावली. गालातल्या गालात हसली.
निदान आज तरी फेसबुकवरील लाईक ,कमेंटच्या स्पर्धेत ती जिंकणार होती. 
     त्याच आनंदात तिने स्वयंपाक घरात जावून मस्त कॉफी बनवली. वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात  घेवून ती बाल्कनीतल्या झोक्यावर मंद झोके घेत एकेक प्रतिक्रया वाचण्यात गुंग झाली. आजच्या तिच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत होता. अनेक दिवसांपासून व्हरचुअल प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्याचे तिचे स्वप्न  अखेर साकार झाले होते. 
©️ अंजली मीनानाथ धस्के
©️ अंजली मीनानाथ धस्के


मनी वसे ते स्वप्नी दिसे

मनी वसे ते स्वप्नी दिसे


सावीला  एक फोन आला.
 त्यात काय एवढं विशेष . आम्हाला हजारो येतात . आम्ही नाही बाई त्याचा गाजावाजा करत . असे विचार वाचकाच्या मनात येणं साहजिक आहे . खरी गोष्ट तर पुढे आहे . त्यासाठी सावीची ही गोष्ट वाचावी लागेल. त्याआधी या फोनची थोडी पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे.

सावीला फेस बुकवर सतत कार्यरत रहायला आवडायचं. अनेक ऑनलाईन ग्रुपची ती सदस्य होती . त्यातील ," सखी मंच" हा ग्रूप तिचा सर्वाधिक प्रिय होता . यावर येणारी प्रत्येक पोस्ट आणि प्रतिक्रिया यांनी ती भारावून जायची .  इथे जाहिरात करणाऱ्या महिला उद्योजिका आपल्या जाहिरातीसाठी याचं ग्रुपच्या काही  महिलांची निवड करायच्या. जाहिरातीसाठी निवडल्या गेलेली महिला आपले सुंदर सुंदर फोटो टाकून आपला अनुभव सगळ्यांना सांगायच्या . त्या फोटोवर , अनुभवावर खूपच छान प्रतिक्रिया यायच्या. ते वाचून  गृहिणी असणाऱ्या सावीला नेहमीच वाटे , की,
 आपलीही कधी तरी अशी निवड व्हावी . आपणही आपला अनुभव सगळ्यांना सांगावा . सुंदर सुंदर प्रतिक्रिया वाचून येणारा भारी  अनुभव घ्यावा .


तर झालं असं की ,
 सखी मंच या ग्रुपच्या  अधिकृत विक्रेता असलेल्या  एका नामांकित  ज्वेलरी कंपनीकडून हा फोन आला होता . त्यांना त्यांच्या मराठमोळ्या  दागिन्यांच्या जाहिरातीसाठी सामान्य स्त्रीचाच चेहरा हवा होता आणि त्यासाठी सावीहून चपखल व्यक्ती कोणी असूच शकत नाही अशी त्यांची बहुदा खात्री पटली होती. म्हणून त्यांनी तिला फोन केला होता. तीने जरा आढेवेढे घेतले पण तिच्या वेशभूषे पासून ते रंगभूषे पर्यंत सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. तिच्या जाण्या- येण्याची सोय ही केली. तेव्हा तिचा नाइलाज झाला. ती दिलेल्या वेळी दिलेल्या  ठिकाणी पोहचली. थोडी भीती मनात होती  पण तिथे गेल्यावर कंपनीची मालकीण ... वेशभूषा करणारी .... चेहऱ्याची रंग रंगोटी करणारी ...आणि छायाचित्रकार ... सगळ्या बायकाच .... अवतीभवती बघून तिने निर्धास्त होवून  शरीर त्यांच्या स्वाधिन केले .
 त्यांनी बघता बघता तिचा कायापालट केला . आरश्यात जेव्हा तिने स्वत:ला बघितले तेव्हा , " ही😱 मी नव्हेच ... ही तर अप्सरा😜 नभीची" असेच तिला वाटले  . त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तिने त्यांना जाहिरातीसाठी हव्या तशा  पोझ दिल्या .... कधी डोळ्यांना केलेला मेकअप दिसावा अशा बेताने पापण्या खाली ठेवून लाजण्याचा अभिनय करत फोटो काढले , कधी केलेली सुंदर केशरचना  दिसावी या बेताने  रूपगर्वितेचा अभिनय करत मागे वळून बघतांनाचे फोटो काढले, कधी केलेला मराठमोळा साज संपूर्ण दिसावा या बेताने दूरवर बघत असल्याचा ..... एखाद्या सुंदर आठवणींचा विचार करण्यात गुंग असल्याचा अभिनय करून , गळ्यातले मंगळसूत्र  हलकेच पकडून फोटो काढला , कधी अंगणात रांगोळी रेखाटण्यात मग्न असण्याचा अभिनय करून पदरावरचे मोर , पाय दुमडून बसल्यावरही ठसठशीत दिसणारे पायातील पैंजण , उठून दिसणारी नाकातील नथ, हातातल्या बांगड्या, दंडाचे सौंदर्य खुलवणारा बाजू बंद  .... या सगळ्याचे अनेक फोटो काढले . तर कधी सात्विकतेचा अभिनय करत तुळशीला पाणी देतांना, आरतीचे तबक हातात घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात उभे असलेला , हात जोडून नमस्कार करतांना ...असे ही खूप फोटो काढले . तर कधी पुजेसाठी फुल तोडण्याचा अभिनय करत बागेतल्या प्रत्येक फूलं झाडापाशी फोटो काढले.
  इतके फोटो काढले की तिथल्या आवरातली एकही  जागा छायाचित्रणासाठी  शिल्लक राहिली नाही आणि तिचे मनही कसे तृप्त.... समाधानी झाले .
छायाचित्रांची शेवटची प्रत  दोन दिवसात  पाठवायच त्यांनी कबुल केलं. तेव्हा तर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.
 तिने त्यांचे आभार मानले आणि पुन्हा भेटण्याचं आश्वासन देवुन  प्रेमाने त्यांचा  निरोप घेतला.  घरी आल्यावर दोन दिवसात फोटो मिळणार या विचारातच ती शेखचिल्लीसारखी स्वप्न रंगवू लागली. तिचे कशातच लक्ष लागेना . छायाचित्र कसे  आले असतील ? मी चांगली दिसत असेल का? छायाचित्र चांगले आले तर सखी मंच वर लगेच आपण आपला अनुभव सांगून  टाकूया का? . छायाचित्र बघून सगळ्यांना काय वाटेल?? त्या  भरभरून कौतुक करतील का ? कौतुक केले तर आपण काय प्रतिक्रिया द्यायची ?. सगळ्यात छान फोटो निवडून तो मोठा करून  एखाद्या राज घराण्यात असतो तसा आपल्या दिवाणखाण्यात लावूया का??? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात येवू लागले.

आनंदाच्या  नुसत्या उकळ्या फुटू लागल्या. इतका आनंद झाला की...  आनंदाने उड्या मारत " किती सांगू मी सांगू कुणाला , आज आनंदी आनंद झाला " हे गाणं ती मोठ्याने गुणगुणायला लागली .

तेवढ्यात ......

 नवरोबाने गदा गदा हलवून तिला झोपेतून जागे केले. तिला फिट आली आहे  असं समजून तो पुरता घाबरून गेला होता. हात पाय वाकडे करून ... ती काय पुटपुटत होती त्याला काही कळत नव्हतं.  तिला उठवत असतांनाच त्याने गोंधळून विचारलं  , " काय हे? काय  होतय ? हात पाय वाकडे का करतेय? काय त्रास होतोय? स्पष्ट सांग. तुझी ही  झोपेतली बडबड   काहीच कळत नाही   ".

त्यावर अजून झोपेतच असलेल्या सावीने चिडून उत्तर दिले , " पाच मिनिट अजून थांबला असतात तर काय बिघडल असतं . आता फोटोचा अल्बम मिळणारच होता .  "

त्याला काहीच कळले नाही . तो तिच्याकडे  भूत बघितल्या सारखा बघत होता.

त्याचा पांढरा पडलेला चेहरा बघून सावी भानावर आली. इतकी मेहनत करून काढलेल्या फोटोचा अल्बम प्रत्यक्षात कधीच मिळणार नाही हे दुःख पचवत तिने झालेला सगळा प्रकार त्याला नीट समजावून सांगितला तेव्हा मात्र तो ," मनी वसे ते स्वप्नी दिसे" म्हणत पोट धरून हसत सुटला.

©️ अंजली मीनानाथ धस्के








जसे दिसते तसे नसते

   
#जसे_दिसते_तसे_ नसते



       गेले दोन दिवस थंडीने गारठून गेलेल्या सुलभाच्या मनात एकच विचार येत होता..... आपल्याला घर .. उबदार पांघरूण असून एवढी थंडी वाजते तर उघड्यावर झोपणाऱ्या त्या आजी आजोबांचे काय होत असेल???? .
       
गेले दोन वर्ष ती त्यांचे निरीक्षण करत होती.
रोज मुलाला शाळेत सोडतांना जाण्यायेण्याच्या रस्त्यावरच एक गणपती मंदिर लागायचे . तिथेच गणपती मंदिराजवळ असलेल्या दुकानांच्या समोरच्या मोकळ्या जागेत हे आजी आजोबा  रात्रीचे झोपत. सकाळच्या वेळी रस्त्यावर रहदारी कमी त्यामुळे आपसूक जाता येता त्या आजी आजोबांना ती बघायची. रोजच्या बघण्याने तिला त्यांचा दिनक्रम ही हळूहळू कळू लागला होता.
 सकाळी सगळा पसारा आवरून सार्वजनिक प्रसाधनात स्वच्छ होवून ते दिवसभर कुठेतरी गायब होत. दिसायला अतिशय गरीब तरी गणपती मंदिरासमोर भीक मागतांना तिने त्यांना कधीच पाहिले नव्हते..... हे विशेष.
 त्यामुळे त्यांच्याकडे  बघून वाटायचे ते कुठेतरी कामाला जात असावे. त्यांच्यात असलेले प्रेम बघून कौतुक वाटायचे. त्यांच्याशी बोलून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा  होती पण कधी  हिंमत झाली नाही ....
             पंधरा दिवसांपूर्वी सकाळी ते तिला नेहमीच्या जागेवर दिसले नाही म्हणून  त्यांचा शोध घेतच ती पुढे जात होती.
 तेवढ्यात थोड पुढे गेल्यावर अगदीच उघड्या जागेवर ते दोघे अंथरुणावर बसलेली दिसली. आज दुपारी वेळ काढून त्यांच्याशी बोलायचं असं तिने ठरवलं . दुपारी ती वेळ काढून त्यांच्याजवळ बोलायला गेली तर आजीच्या पायाला प्लास्टर दिसले . चौकशी केली तेव्हा कळलं की , रोज संध्याकाळी मंदिरासमोर घोडागाडी , फुगेवाले, फेरीवाले असे सगळे असतात . छोटी यात्राच भरते जणू . त्यातील घोडा अचानक आजींच्या  अंगावर धावून आला . त्यांचा पाय शेजारच्या खड्यात गेला आणि त्या खाली पडल्या ... पायाचे हाड मोडले.  पायाला प्लास्टर लागलं . आता त्या पूर्वी सारखे हिंडू फिरू शकत नाही. कधी कोणी  खायला आणून देत . कधी कोणी पैसे देतं. त्यातून जवळच्याच दुकानातून खायचं विकत आणता येतं. अशी जुजबी माहिती मिळाली . खायची सोय होत आहे म्हंटल्यावर त्यांना  औषधासाठी थोडे पैसे देवून सुलभा घरी परतले.
         पंधरा दिवस होवूनही ते तिथेच आहेत . कुठे आसरा का शोधत नाही? केवढी थंडी... त्यात त्यांचे वय बघता त्यांचा निभाव कसा लागणार??? योग्य उपचार का घेत नाही??? असे अनेक प्रश्न तिच्या मनात  उपस्थित झाले.
त्यांना काही मदत करता आली किंवा कायम स्वरुपी निवारा देता आला तर तो देण्यासाठी प्रयत्न करावे असे तिच्या मनाने घेतले.
म्हणूनच  आज काही केल्या तिला झोप लागेना ..... काय करावं ?? या प्रश्नाचं उत्तर शोधत असतांना एकदम लक्षात आलं , निवारा वृध्दाश्रम चालवत असलेल्या श्रुती ताईंचा नंबर तिच्याकडे होता  . त्यांच्याशी बोलून बघाव का?.  रात्री वेळेचा विचार न करता तिने त्यांना  फोन केला .
आश्चर्य म्हणजे
 त्यांना या आजी आजोबांची माहिती होती पण ते वृद्धाश्रमात यायला तयार नाहीत असं ताईंनी तिला सांगितलं .
 " तुम्ही प्रयत्न करा कदाचित तुम्हाला यश मिळेल" असं सांगून त्यांनी या कामाची कायदेशीर तरी सोपी पद्धत  तिला समजावून सांगितली," पोलिस स्टेशनला रिपोर्ट करा . पोलिस त्यांना सरकारी दवाखान्यात नेतील . पोलिस NOC देतील तेव्हाच त्यांना दवाखान्यातून वृद्धाश्रमात आणणे शक्य होईल .  ते स्वतःहून यायला तयार नसतांना  केवळ तुमच्या सांगण्यावरून मी त्यांना आश्रमात आणू शकत नाही ".
ती सांगत असलेले आजी आजोबा आणि  त्यांनी आधीही प्रयत्न करून वृद्धाश्रमात न आलेले आजी आजोबा एकच आहेत का??? या प्रश्नाचं उत्तर समजण्यासाठी त्यांचे फोटो काढून पाठवायला श्रुतीताईंनी तिला सांगितले .
        सकाळी सगळ्यात आधी तिने त्यांचे फोटो काढून ताईंना पाठवले. फोटो बघून त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले की हे तेच हट्टी लोक आहेत . हे आजी आजोबा म्हणजे, 'आई आणि मुलगा' असं त्यांचं नातं आहे. यांच्यासाठी कायदेशीर पद्धतच वापरावी लागेल.
  तिला अजूनही एक प्रश्न छळत होताच की,' येवढे हाल होत असतांनाही हे आजी आजोबा वृद्धाश्रमात जायला नाही का म्हणतात ???'
तिला उत्तर हवेचं होते, तिने त्यांच्याशी पुन्हा सविस्तर बोलण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याजवळ ती गेली तेव्हा त्या आजोबांनी तिला ओळखलं . आजही ही मदत करायला आली असं वाटून त्यांनी हसून तिचं स्वागत केलं.
तिने आजोबांना विचारलंच, ' एवढी थंडी , आजीच्या पायाला प्लास्टर, त्यांचं सगळ एकाच जागी ... खायचे हाल असं असतांना तुम्ही वृद्धाश्रमात का जात नाही ? तिथे तुम्हाला डोक्यावर छत,  योग्य आहार , औषध मिळतील ".
     त्यावर ते लगेच म्हणाले ," आम्हाला असच उघड्यावर राहायचं आहे. छान सुरू आहे आमचं . आम्हाला बंधन नको कुणाचे.
          माझ्या आईला ( त्या आजीला) १२०००/- पेंशन आहे. . आम्ही रोज १५०/- रिक्षाला देतो . इथून दूर दुसरीकडे जावून भीक मागतो . खूप लोक दयेने आम्हाला कपडे , जेवण , पैसे देतात . मी आईच सगळं करतो . मला काही त्रास नाही तिचा. आईलाही असंच आवडतं उघड्यावर . थंडी बिंडी काय वाजत नाही .... हे बघा किती रजाया आहेत आमच्याकडे . अजून पोत्यातही भरपूर नवीन रजाया, चादरी  भरून ठेवल्या आहेत.
 मजेत आहोत आम्ही ... वृद्धाश्रमात अजिबात जाणार नाही .
ते लोक गोड गोड बोलून आमचे सगळं सामान घेऊन टाकतील. आईचे पैसे घेवून टाकतील. आई बरी झाली तरी आम्हाला बाहेर पडू देणार नाही . आता लोक पैसे देतात तिथे गेल्यावर हे सगळं बंद होईल .... मग काय करायचं आम्ही .
तुम्हाला द्यायचे तर द्या पैसे .... नाहीतर जा इथून .... आम्ही इथेच राहणार . कुठेच जाणार नाही".

त्यांनी दिलेल्या माहितीने ती पुरती गांगरली . अनेक प्रश्न मनात नव्याने निर्माण झाले . आर्थिक दृष्ट्या सक्षम असूनही त्यांनी असे उघड्यावरचे आयुष्य का निवडले ??? वृद्धाश्रमात जायचे नसेल तर एक खोली भाड्याने का घेत नाही?? गरज नसतांनाही ते भिक का मागतात ??? वृद्धाश्रमाबद्दल यांना एवढी चीड का ???? त्यांनी दिलेली ही सगळी माहिती १०० टक्के खरी कशावरून ?? सत्य काही वेगळं असेल का???

यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तिने त्यांना मागितलं नाही . त्यांना मदत करायला गेलेल्या तिला कळून चुकले की त्यांना तिच्या मदतीची मुळीच गरज नव्हती. ती घरी परतली.
तिचा पडलेला चेहरा बघून नवऱ्याने काळजीने विचारणा केली.
तिनेही सगळा प्रकार सांगितला.
झाल्या प्रकाराने ती नक्कीच विचलित झाली आहे हे ओळखून त्यानेही प्रेमाने तिचा हात हातात घेऊन तिचे सांत्वन  केले ," जास्त विचार करू नको   .. त्यांची सोय होते आहे सगळी. त्यांनी दिलेली माहिती खरी असो की खोटी.... ते मजेत आहेत... हेच सत्य आहे.
या सगळ्यातून तू काय शिकलीस  हे खूप महत्त्वाचे . कधी कधी आपल्याला जग  जसे दिसते.... तसे  मुळीच नसते आणि हो....हा अनुभव आला म्हणून सगळेच असे असतात असंही नाही ..... पुन्हा एखादा गरजू दिसला तर चौकशी केल्याशिवाय कुठलाही  निर्णय घेवू नकोस. हजारदा असा अनुभव आला तरी चालेल पण  यामुळे एकही गरजू सुटता कामा नये. हे कायम ध्यानात ठेवायचं. तू तुझं काम केलं ....  दुसऱ्याची इतकी काळजी असते तुला हे  पाहून  मला अभिमान वाटतो तुझा "
त्याचे हे धीराचे बोल ऐकुन तिनेही  शाश्रू नयनांनी त्याच्या  खांद्यावर डोकं ठेवलं . आजी आजोबा मजेत आहे .... हा विचार करून तीही निश्चिंत झाली .

©️ अंजली मीनानाथ धस्के


          

राखी पौर्णिमा आणि १५ ऑगस्ट २०१९

#राखी_पौर्णिमा_आणि_१५ऑगस्ट२०१९

               या वर्षी  १५ ऑगस्टलाच राखी पौर्णिमा  आल्याने
राखी पौर्णिमा आणि तिरंग्याचे तीन रंग यांचा समन्वय साधत या रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या रांगोळीत मानव निर्मित राखी आहे तर दुसऱ्या रांगोळीत निसर्गातील सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे  पौर्णिमेचा चंद्र आहे .  १५ ऑगस्ट असल्याने त्या चंद्रावरही तिरंग्याचे तीन रंग अवतरले आहेत . सोबत ढगांनी रेशीम धाग्यासारखा आकार घेतल्याने जणू चंद्राची राखीच बनली आहे असे भासावण्याचा प्रयत्न केला आहे.
©️ अंजली मीनानाथ धस्के


निसर्गचक्र ( १५ ऑगस्ट २०१९ )


#निसर्गचक्र
              निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देतो . आपण मात्र विकासाच्या नावाखाली अनेकदा त्याला नुकसान पोहचवत असतो . गेल्या काही दिवसात निसर्गाचे रौद्र रूप समोर आले आहे. निसर्गावर आपलं  नियंत्रण  नाही.  निसर्गाचा समतोल राखला तर होणारी हानी काही अंशी  नक्कीच कमी होईल .  निसर्गाचा आदर व नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठीचे योग्य नियोजन केल्यास  पुन्हा आपला देश , राष्ट्र .... . सुख समृद्धीने, धनधान्यांने परिपूर्ण बनेल .
तिरंग्यात जसे ' अशोकचक्र '    तसेच मानवी आयुष्यात  ' निसर्गचक्र '   महत्वाचे  आहे.
१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर .....
*करुया काळजी निसर्गाची .... तेव्हाच मिळेल हमी  सुखी राज्याची*
हा संदेश देणारी ही रांगोळी तुम्हाला आवडल्यास नक्की कळवा.
©️ अंजली मीनानाथ धस्के


अमावस्या आणि दीप ... तीन १०० शब्दांच्या गोष्टी

"अमावस्या आणि दीप " या विषयावर लिहिलेल्या १०० शब्दांच्या काही गोष्टी

#गोष्ट१
 #आई_आणि_'नेत्र'_दीप
एका लहान मुलाला आगीतून बाहेर काढतांना दोन्ही डोळे गमावलेल्या सुमितच्या आयुष्यात अमावास्येचा अंधार पसरला . सतत दुसऱ्यांच्या मदतीला धावणारा .... असं परावलंबी जीवन त्याला नकोसे झाले. आपण दुसऱ्यावर ओझे झालो या भावनेने खचला  .
त्यातच  त्याला एक क्षणही नजरे आड  न करणाऱ्या ....   माणूस म्हणून वागतांना आपण स्वतःच्या नजरेत कधीच पडता कामा नये. नेहमी संकटांना सामोरे जावे. ही शिकवण देणाऱ्या ....  त्याच्या आईने  जगाचा निरोप घेतला. जाताजाता त्याच्या आयुष्यातील अमावस्येला तिच्या ' नेत्र'दीपानेच नष्ट केले.
त्यानेही 'नेत्रदीप'  नावानेच गरजू लोकांना मदत करणारी नेत्रदानाचे महत्त्व सांगणारी संस्थेची स्थापली. "जिथे दुःखाची अमावस्या  तिथे 'मदतीचा' दीप " ही आईची शिकवण तो विसरला  नाही
©️ अंजली मीनानाथ धस्के


#गोष्ट२

#कर्मकाडांची_अमावस्या_आणि_सत्कर्याचा_दीप

श्रावी ' गुरुकुल' या मूकबधिरांच्या अनाथ आश्रमात आली . श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी, पुलाव असं जेवण बघून पोरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला .
तेवढ्यात सासूबाईंचा फोन आला : कुठे आहेस?
ती: बाहेर
त्या: वाटलच, देवा धर्माचं काही करायला नको ...
  आज दीप अमावस्या ... आधी घरातले सगळे दिवे स्वच्छ करून सायंकाळी  त्यांची पूजा कर .... नाहीतर विसरशील" .
मुलं... "ताई जेवण मस्त झालं" असं  खूणेनीच सांगत होती . त्यांच्या डोळ्यातली चमक ... दिव्यज्योत भासली. ती  सुखावली... सासूच्या  बोलण्याचं वाईट वाटून न घेता खंबीरपणे
म्हणाली ," निश्चिंत रहा. मी सगळं करेन. मात्र  यावेळी दिव्यांचा प्रकाश ... कर्मकांडाची अमावस्या दूर करणारा असेल ".
©️ अंजली मीनानाथ धस्के





#गोष्ट३
#संगीचं_भूत

शास्त्रीबुवांनी सांगितल्याप्रमाणे संगी...  लग्न व्हावं   म्हणून   दीपअमावस्येपर्यंत पारावरच्या पिंपळाखाली वाढत्या क्रमाने दिवे लावायची. आजही ती  एक एक दिवा लावत पिंपळाभोवती फेरी मारत होती.
बस गावात पोहचायला उशीर झाला होता. सगळे गप्पा मारत  पायीच घरी निघाले . गप्पांच्या ओघात "अमावस्येच्या रात्री भूतं दिवट्या घेवून वेताळाकडे हजेरी द्यायला निघतात . अडवणाऱ्यालाच झपाटतात"अशी  माहिती एकाने दिली.

दुरून एक दिवा दिसला तेव्हा भित्र्या गणामास्तरांना  आधार वाटला पण दिव्यांची संख्या वाढत जावू लागली तशी त्यांची बोबडीच वळली. "अमावस्या .. दीप... भूतं... वेताळ " म्हणत  रस्त्यातच  बसले.  मास्तरांची समजूत काढत सत्य जाणून घेण्यासाठी  सगळे पाराकडे गेले. तिथे संगीला दीप प्रज्वलीत करतांना बघून सगळ्यांची हसून पुरेवाट लागली.
©️ अंजली मीनानाथ धस्के