गुढी पाडवा २०२०



 
 
#गुढी_पाडवा_२०२०
देशासाठी ... आपल्या प्रियजनांसाठी....  स्वतःसाठी....
घरीच थांबुया... आनंदी राहू या .....
मला नेहमी वाटतं ..... पाणी गढूळ झालं की आपल्याला काहीच करता येत नाही. हे काहीच न करणं .... गढूळ पाण्यातील गाळ खाली बसायला मदत करत. थोडा वेळ गेला की पाणी आपोआप स्वच्छ दिसायला लागतं.
          सध्या आपण काहीच करू शकत नाही. पण आपलं हे घरी राहणं . घरातल्या घरात जे करता येईल ते करून आनंदी रहाणंच गरजेचं आहे.
        काही दिवस आपण घरातच थांबलो की ..... वातावरण पुन्हा पूर्ववत होईल.
        जेव्हा आपण एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करू शकत नाही तेव्हा आपण काय करतो....... किमान त्याच्या अडचणी वाढणार नाही याची काळजी घेतो.
       अगदी तसंच आहे .... सध्या आपल्या सारख्या  सामान्यांना मदत करता येणार नाही आहे तेव्हा बाहेर पडून प्रशासनाच्या अडचणी वाढवायच्या नाहीत. हा नियम पाळला पाहिजे.
            जिंदा रहने के लिए चीते की रफ्तार  उसकी जरूरत है। नुमाइश की जाय इसलिए पाला हुवा कोई शौक नहीं । हर रफ्तार के बाद वो कमजोर होता है इसलिए कुछ देर बाद उसे रुकनाही पड़ता है।
                 खुप धवलो आपण ... आता थोड थांबुया .... पुन्हा नव्या जोमाने धावण्यासाठी स्वतःला तयार करू या.

नवं वर्ष.... नवी सुरवात
धरून नवं विचारांची कास
चला उभारू मना मनात
आज संकल्पाची गुढी खास

           नूतन वर्षाच्या आभाळ भर शुभेच्छा .....
गुढपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा...
©️ अंजली मीनानाथ  धस्के
नेहमी प्रमाणे सोबतीला मी काढलेली रांगोळी ही आहेच .
आवडल्यास नक्की कळवा.
( पोस्ट शेयर करतांना नावासहित करावी.)

निसर्गाय_नमः

#निसर्गाय_नमः
   बऱ्याच दिवसांनी निवांत खिडकीत बसून वाफळलेला चहा घेतांना ...... दूरवरच्या डोंगर रांगावर नजर आपोआप खिळली.
नदीची खळखळ कधी नव्हे ती कानी पडत होती. आसमंतात फक्त पक्षांच्या किलबिलाटाचा आवाज भरून राहिला होता.
            एरवी सतत धावणारं जग आज अचानक थांबल्यासारखं वाटतं होतं.
           
             रस्त्यावरही इतरांशी कळत नकळत स्पर्धा करणारे. निसर्ग निर्मित आवाजाकडे दुर्लक्ष करून धावणारे.  मानव निर्मित आवजांचे प्रदूषण करणारे .....
आज सगळे निःशब्द होते. बोलत होता तो फक्त निसर्ग.
आज घरात राहून कोंडल्याची भावना सगळ्यांच्या मनात निर्माण होते आहे. बाहेर निसर्ग मात्र मोकळा श्वास घेत होता.
  निसर्ग भरभरून देतो . आपलं समाधान होत नाही. आज रस्त्यावर प्राणी बिनधास्त फिरू शकत आहे .  तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या माणसाचा मात्र पराभव होत आहे. डोंगरांना , नद्यांना ..... वृक्षांना..... कोणत्याच व्हायरसची भीती नाही.
           महात्मा गांधी म्हंटले होते , खेड्याकडे चला......  त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या गेलं.  शहरीकरणाने आपल्याला वेड लावलं. पैसा , घर .. गाडी घेण्याच्या नादात गावं मागे पडली. आज मात्र गावी जाण्यासाठी लोकं धडपडतांना दिसत आहे.
       घरात कोंडून घेणाऱ्याला वाटतं ," गावाकडे माझंही एखादं घर असतं, एखादं शेत असतं तर मीही गावी गेलो असतो. शेतातल्या घरात राबून मजेत दिवस काढला असता.
          दारात भाजी, कोठारात धान्य, गोठ्यात गायी असल्यावर  ..... कशाला केली असती चिंता. "
           एक लक्षात घ्यायला हवं आज  कुठेही गेलो तरी आपण सुरक्षित नाही. उलट जिथे आहे तिथेच थांबून विचार करायला हवा. तंत्रज्ञान विकसित करतांना 'निसर्गाची हानी होणार नाही' हा विचार अग्रस्थानी हवा. निसर्ग सर्व श्रेष्ठ आहे ..... त्याच्याशी खेळ महागात पडू शकतो. याची प्रचिती आली आहे.
   सध्या स्वतः शी संवाद साधण्यासाठी निवांत वेळ मिळतोय . माणूस म्हणून कुठे तरी आपल्या हातून नकळत काही चुका झाल्या आहेत. बुद्धीमत्तेच्या जोरावर निसर्गाला हरवायला निघालेला मनुष्य .... आता निसर्गापुढे स्वतः हतबल झालाय.
            आपण निसर्गाला जपण्यात.... त्याचा आदर करण्यात कमी पडलो आहे हे मान्य करायला हवं. आताही दुर्लक्ष केले तर निसर्ग रस्त्यावर येईल. मानव प्राणी मात्र कायमचा मातीत मिसळून जाईल.....
©️ अंजली मीनानाथ धस्के
( पोस्ट  शेअर करताना नावा सहित करावी. )

घर उन्हातलं (अलक)


#घर_उन्हातलं
   लहानपणी इतर भावंडांची खोड्या काढणाऱ्या बबड्या विरूद्ध तक्रार ऐकुन आई त्यांना समजावत नेहमी म्हणायची ," या बबड्याचे घर ना आपण उन्हातच बांधू "
      शिक्षा म्हणून त्याला उन्हात उभं करायची. त्याला तसं उन्हात उभं बघून सावलीतल्या भावंडांना आनंद व्हायचा.
     सुरक्षिततेचा उपाय म्हणून  बाहेर गावाहून परतलेल्या बबड्याला  आईने आनंदाने घरात न घेता त्याच्या सामानासहित दोन तास कडकडीत उन्हात उभं केलं.
आज मात्र त्याला तसं बघून भावंडांचं  काळीज  तुटलं. 
©️ अंजली मीनानाथ धस्के

जागतिक चिमणी दिवस २०२०


   
#जागतिक_चिमणी_दिवस
#२०मार्च२०२०
#चिवचिव
  चिमण्या ... त्यांची चिव चिव.... मला भारी आवडते. सकाळी त्यांची किलबिल कानी पडली की प्रसन्न वाटतं. त्यांच्या हालचाली बघत बसणे हा तर माझा आवडता छंद. सध्या घरी कोणी येत नाही की आपण कोणाकडे जात नाही. नियम म्हणजे नियम ... कडक पाळायचा.
   हे छोटे मित्र मंडळी मात्र नियमित  येतात. चिमणे जीव येवुन चिव चिव करतात . जणू सांगून जातात," संकट कोणत्याही स्वरूपाचं असू दे तुझा दृढ संकल्प महत्त्वाचा. तशी तू  स्वखुशीने घरी असतेच पण आता काही दिवस सक्तीने घरात राहून बघ. घरातल्या कणा कणाशी तुझं नातं जसं जोडल्या गेलंय तसेच इतर सदस्यांचे नातेही घराशी नव्याने जोडायला मदत कर. मुलासोबत मुल होवून खेळ. मुलाला सोबत घेऊन कामं कर . काम हळू होईल पण दिवस मजेत जाईल . मुलाला अनेक घर कामं शिकव. त्याला सध्या मैदानी खेळ खेळता येत नाही  म्हणून काय झालं बैठे खेळ खेळण्याची मजा काही औरच असते हे पटवून दे. सगळे दिवस सारखे नसतात. अहोंना वर्क फ्रॉम होम आहे तेव्हा फॅमिली टाईम एन्जॉय कर. काही नवीन पदार्थ बनवायला त्या दोघांची मदत घे.
वेळ उरणार नाहीच पण उरला तर मस्त पाय पसरून टीव्हीवरचे कार्यक्रम बघ. वाटलं तर वाम कुक्षी घे.
   तू खंबीर तर घर हसरं हे पक्क लक्षात ठेव तेव्हा चूटर पूटर  खाऊ खात ....  गप्पा गोष्टी.... थोडीशी मस्ती .... यात ' ही' वेळही  मस्त निघून जाईल. आम्ही तर आहोतच कायम सोबतीला ..... "
मातीच्या भांड्यातलं थंड पाणी पिवून  तहान भागवत खिडकीच्या दांड्यावर विसवलेले ते जीव दिलासा देवून जातात. जगण्याची .... लढण्याची नवी उमेद देवून जातात.
        आज त्यांचा खास .... जागतिक चिमणी दिवस.
त्यांची संख्या कमी होत आहे. त्यांना जपलं पाहिजे. निसर्गाचा समतोल राखलाच पाहिजे . वेळ आली आहे डोळे उघडून परिस्थितीच  निरीक्षण करण्याची. निसर्ग अनमोल.... त्यातील प्रत्येक जीव बहुमोल. वेळीच निसर्गाची हानी थांबायला हवी. आता पर्यंत त्याने भरपूर दिलंय... देत आहे. आता आपली वेळ आहे परतफेड करण्याची.
           जमेल तेवढी झाडं लावण्याची. नद्यांना स्वच्छ करण्याची. या चिमण्या जीवाला जपण्याची .
            उन्हाळा सुरू झाला की परसदारी चिमण्यांसाठी पाणी ठेवून बघा मिळणारा आनंद .. येणारा अनुभव ... मनाला प्रसन्न करून जाईल.
रोज त्यांना पाहून पाहून त्यांची रांगोळी काढण्याचा मोह मला झाला होता तेव्हा काढलेली ही रांगोळी . जुनी असली तरी मला अत्यंत प्रिय आहे. गुबगुबीत चिमणराव आणि स्लिम ट्रिम चिमणाबाई....
      आजच्या दिवशी या चिमण्या जीवांचे आभार तर मानलेच पाहिजे .....
ते आहेत म्हणून माझी सकाळ किलबिलते
त्यांच्या चिवचिवाटाने घर प्रसन्न हसते.
©️ अंजली मीनानाथ धस्के
(पोस्ट शेयर करताना नावासहित करावी. )


अफवा

#अफवा 
   केदार इंटरनॅशनल कंपनीमधे मोठ्या पदावर कामाला. परदेशात कोरोनाची भीती असतांनाही त्याला महत्त्वाच्या कामानिमित्त सिंगापूरला जावाच लागलं.
      आठवडाभर काम करून तो भारतात परतला. इथे आल्यावरही कामानिमित्त प्रवास सुरूच होता. काहीच दिवसांनी भारतात कोरोनाचे रुग्ण आढळले. इथेही वातावरण तंग झाले. नेमकी त्याच वेळी केदारला ताप आला. खोकला ही यायला लागला. दवाखान्यात जाऊन आल्यावर व्हायरल आहे असं डॉक्टरांनी सांगितले. आई वडील रोज कोरोनाबद्दल बातम्या ऐकत होते. केदार काही दिवसांपूर्वीच परदेशातून प्रवास करून आलाय . १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले असले तरी मनात शंका ठेवण्यापेक्षा एकदा करोनाची चाचणी करून घेतलेली बरी असं त्याचं मत होत. डॉक्टरांनीही परदेश प्रवासाचा इतिहास असल्याने चाचणी करून घेण्याचे सुचवले होतेच.
केदारचे आई वडील, भाऊ समीर त्याला भेटायला आले. सततचा प्रवास , कामाचा ताण त्यात झालेल्या व्हायरलने त्याला खूप अशक्तपणा आला होता. उपचारात कसलीच हयगय न करता समीरने त्याला कोविड १९ च्या चाचणी करता  हॉस्पिटलला नेले.
           कोविड १९ ची चाचणी नकारात्मक आली. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. तरी इतर संसर्ग होवू नये, दुखणे वाढू नये म्हणून केदरला पूर्ण बरं वाटलं तरी बाहेर पडणे टाळावे असे डॉक्टरांनी सांगितले.
             कंपनीनेही घरून काम करण्याची मुभा दिलीच होती.
      कोविड१९ ची चाचणी करून सिटी हॉस्पिटल मधून बाहेर पडतांना त्यांच्या नकळत नेमके केदरच्या एका शेजाऱ्याने त्यांना बघितले.
त्यांच्या हातात दवाखान्याच्या कागद पात्रांची फाईलही शेजाऱ्याने पाहिली. पुढचा मागचा कोणताच विचार न करता त्या शेजाऱ्याने सोसायटीतील काही सदस्यांना लगेच फोन करून ," केदारला कोरोनाची लागण झालेली आहे" असे सांगून टाकले तर काही सदस्यांना  हॉस्पिटल समोर समीर केदारच्या हाताला धरून उभा असलेले फोटो व्हॉटसअप वर पाठवला.
 कोरोनामुळे केदारच्या मुलांच्या शाळेला सुट्टी मिळाली होती. सगळीकडेच वर्क फ्रॉम होम ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती म्हणून समीरनेही प्रवास टाळला. सगळ्यांनाच मस्त एकत्र वेळ घालवता येईल. केदरलाही बरे वाटेल म्हणून आई वडील केदारकडेच थांबले. केदरच्या घरचे खबरदारी म्हणून घराबाहेर ही पडत नव्हते.
सगळीकडे ही अफवा वाऱ्या सारखी पसरली. त्यांच्या घरा बाहेर न पडण्याने सोसायटीतील लोकांना अफवेबद्दल अधिकच खात्री पटू लागली. शेजारच्या कॉलनीत रहाणाऱ्या नातेवाईकांना ही अफवा कळली. त्यांनी कसलाच विचार न करता ही अफवा बाहेर गावच्या नातेवाईकांपर्यंत पोहचवली. शेजारचे त्यांना पाहून रस्ता बदलू लागले. हसून बोलणं टाळू लागले. प्रत्यक्ष भेटणं टाळत असले तरी फोनवरून विचारणा करू लागले.
 केदारलाही अनेकांनी फोन करून विचारणा केली. बिल्डिंग खालच्या दुकानात सामान आणायला गेलेल्या समीरला दुकानदाराने दुकानात यायलाच मनाई केली. या सगळ्याचा केदरच्या मुलांनाही मानसिक त्रास सुरू झाला.
 हे कमी म्हणून की काय काही नातेवाईकांनी केदारच्या आई वडिलांनाच फोन केला," तुमचा मुलगा कोरोनामुळे गेल्याच कळलं " अशी सुरवात केली. आई वडील बिपी चे रुग्ण . हे असं कानावर आल्यावर त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडले. प्रत्येकाला सांगून पटवून त्यांना प्रचंड मानसिक थकवा आला.
कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही असे डॉक्टरांनी लिहून दिलेले पत्र दाखवूनही फायदा होत नव्हता. अफवा वाऱ्यासारखी पसरली होतीच.
घरात सगळ्यांनी आनंदाने रहावे म्हणून एकत्र आलेल्या केदारच्या घरच्यांना केदारबद्दलच्या अफवांनी पुरते हैराण करून सोडले. केदार आधीच थकलेला होता त्यात या वाईट अनुभवाने तो अधिकच खचला.
         शेवटी घरच्यांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. शोध घेतल्यावर या अफवांना करणीभूत असलेले ते शेजारी ज्यांनी केदारला हॉस्पिटलच्या बाहेर पडतांना बघून सगळ्यांना फोन केला होता त्यांचं नाव समोर आल.
        पोलिसात तक्रार नोंदवल्या गेली तर त्या माणसाची नोकरी गेली असती . सगळ्यांनीच मग हे आपापसात मिटवून घेण्याचा सल्ला दिला. आपल्याला झाला तेवढा मानसिक त्रास पुरे झाला. त्या माणसाची नोकरी घालवून त्याला आयुष्यातून उठवायची केदार आणि त्याच्या घरच्यांची मुळीच इच्छा नव्हती.
अखेर त्या शेजाऱ्याने केदरची आणि त्याच्या घरच्यांची तोंडी व लेखी माफी मागितली.
सोसायटीच्या व्हॉटसअप ग्रुपवर लेखी माफीचा फोटो पाठवला
पोलिसांकडूनही त्यांना," पुन्हा असे घडणार नाही याची काळजी घ्या" अशी सक्त ताकीद मिळाली.
  सुजाण नागरिक या नात्याने खबरदारी घ्यावी म्हणून कोविड१९ ची चाचणी केदारने करून घेतली पण सुशिक्षिततेचा बुरखा पांघरून वावरणाऱ्या समाज कंटकाच्या अफवेला बळी पडला होता.
         इतर सदस्यांनीही आपली चूक कबूल केली. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. काही दिवसांच्या मनस्तापानंतर आता कुठे तो आणि त्याच्या घरचे स्थिरावले आहेत. अखेर एका वाईट अनुभवाची दिलासा देणारी सांगता झाली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( ही कथा काल्पनिक असून प्रत्यक्षात साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा शेयर करताना नावा सहित करावी )
टिपः
कधीही कानावर किंवा व्हॉट्सअपवर येणाऱ्या कोणत्याही माहितीची खात्री करून घेतल्या शिवाय ती माहिती इतरांना फॉरवर्ड करू नये. तुम्ही केलेला एक फॉरवर्ड मेसेज एखाद्याच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेऊ शकतो. जगावर कोरोना रुपी महा संकट असतांना सगळ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका चोख बजावायला हवी. उगाच फोन आहे , वेळ आहे म्हणून कसलाही विचार न करता कोणतीही माहिती कोणालाही फॉरवर्ड करू नये. या कठीण परिस्थितीत सोशल मीडियाचा वापर करायचा असेल तर तो इतरांना धीर देण्यासाठी करावा. संकटाचा सामना एकजुटीने करण्याची प्रेरणा देण्यासाठी करावा . अनेक बिघडलेली कामे या सोशल मीडियामुळे सुरळीत होवु शकतात. या माध्यमाचा योग्य आणि सकारात्मक वापर करावा.

देव ( कविता)


#देव
 देवळाची दार बंद होता
माणूस सैरभैर झाला
संकट समय येता
कोणी कामी नाही आला
कोरोनाची भीती वाटता
 म्हणे देवही घाबरला
काय सांगावं यांना....
देव देवळात नव्हताच कधी
तो तुमच्या आमच्या मनात
नारळ फुलं वाहून आधी
दर्शन घेण्याच्या नादात
धक्का बुक्की करतो आम्ही
अशांतता मनात
तेव्हाही देव दिसला नाही
असून तो आपल्यात
वेळ मात्र वाया जातो
त्याला मूर्तीमधे शोधण्यात
कर्म कांड नकोत
त्याला नको मूर्ती पूजा
लांब लांब रांगा नकोत
त्याला नको भाव दुजा
अवचित जाते दर्शन होवून
कोणत्याही रुपात
काळ येता संकट घेवून
तोच येतो धावत
माणसांमधेच राहून
माणसांसाठीच असतो राबत
मदतीचा हात पुढे करून
माणुसकी असतो जपत
©️ अंजली मीनानाथ धस्के
( कविता आवडल्यास नावा सहित शेयर करावी)












सामर्थ्य

 
 
                       #सामर्थ्य
खूप काही मला नको
फक्त आत्मविश्वाचे बळ दे
इतरांच्या कामी  यावे
अशी सद्सदविवेक बुद्धी दे
गोरगरीबांचे आशिर्वाद लाभावे
हातून असे कार्य घडू दे
जीवाला जीव द्यावे
असे आप्तगणांचे प्रेम दे
संघर्षालाही मी हरवावे
असे मला सामर्थ्य दे
जीवन हे फुका न जावे
जगण्याला माझ्या अर्थ दे
©️ अंजली मीनानाथ धस्के

सबलीकरण

                         #सबलीकरण
   
                        ज्ञान ज्योत प्रज्वलित होता
झाली ती आत्मनिर्भर
समानतेचा ध्यास घेते
तरी विसरत नाही स्त्रीपण
आकाशाला गवसणी घालते
तरी पाय जमिनीवर
स्वयंसिद्धा आहेच ती
ठेवा विश्वास तिच्या क्षमातांवर
असेल जर आजही उपेक्षित  कोठे
 तरी करावे आपण तिचे  सबलीकरण 
©️ अंजली मीनानाथ धस्के

माझ्यात मी सुंदर आहे

#माझ्यात_मी_सुंदर_आहे

       मी आई, बहीण
आजी , काकू, मामी
मावशी, आत्या
बायको अथवा मैत्रीण
असेल कोणीही तुमच्यासाठी
 तरी माझ्यात मी खास आहे.
तुम्ही बघा उपभोग्य वस्तू म्हणून खुशाल
तरी माझ्या क्षमतांची मला जाण आहे
तुम्ही नावे ठेवा माझ्या आधुनिक पहेरावाला बिनधास्त
तरी माझ्या कर्तव्यांचे मला भान आहे
तुम्ही करा भेद  काळी-गोरी, जाड -बारीक, तरुण-म्हातारी असे कितीही
तरी माझ्यात मी सुंदर आहे
माझ्यात मी सुंदर आहे
©️ अंजली मीनानाथ धस्के
कविता शेयर करताना कवयित्रीच्या नावासहित करावी.

देवी शॉर्ट फिल्म समीक्षा

#देवी
#शॉर्टफिल्म



      देवी या शॉर्ट फिल्मचा फर्स्ट लूक जेव्हा पहिला तेव्हा त्या फिल्मच्या पोस्टरमधे अनेक नामवंत नायिका पहिल्या आणि या शॉर्ट फिल्म बद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.
          सुरवातीला पाच मिनिटे नक्की काय सुरू आहे याचा अंदाज घेण्यात जातात.
         नंतर हळू हळू या शॉर्ट फिल्मचा विषय लक्षात येतो आणि फिल्म पूर्ण बघून झाल्यावर  आपलं डोक सुन्न होत. मनात राग , चीड,  हतबलता, अगतिकता या सगळ्या भावना प्रचंड गोंधळ घालू लागतात. अनेक प्रश्न जे आजही अनुत्तरित आहेत त्याची मनाला नव्याने बोचणी लागते हेच या शॉर्ट फिल्म च यश असावं.
           एक छोटीशी खोली. त्यात  विविध वयोगट, विविध भाषा,  विविध क्षेत्रातील आणि शारीरिक व्यंग असलेल्या स्त्रिया एकत्र बसलेल्या आसतात.
 टी. व्ही. वर सुरू असलेली  बातमी ऐकुन त्यावर कोणतीच प्रतिक्रिया न देता त्या आपल्याच विश्वात रमलेल्या असतात.
 टीव्ही वर येणारी बातमी थांबते सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची एक लकेर येते आणि तेवढ्यात दारावरची बेल पहिल्यांदा वाजते.  बाहेर असलेल्या स्त्रीला खोलीत घ्यावे की नाही यावर चर्चा सुरू होते.
खोलीतली जागा कमी असल्याने काहींनी बाहेर जावे आणि नव्या स्त्रियांना आत घ्यावे असाही एक पर्याय पुढे येतो.
      आतल्या स्त्रियांना बाहेर जायचे नसते त्यामुळे कोणी बाहेर जावे यासाठी ज्या स्त्रियांवर घरातल्याच व्यक्तीने बळजबरी केली त्यांनी बाहेर जावं असं ठरत .
दुसऱ्यांदा बेल वाजते .
   कोणीच बाहेर जाणार नाही. हे समजल्यावर जिच्या बाबतीत बळजबरी करणारा २५ वर्ष वयाच्या आतला होता तिने थांबावे . बाकीच्यांनी बाहेर जावे असा दुसरा पर्याय समोर येतो .
      कोणा वर एकाने तर कोणावर अनेकांनी बळजबरी केलेली असते त्यांच्या वयाची बेरीज केली तर जिने सगळ्यांना ही सुरक्षित खोली दिली तिच्यावरच बाहेर जाण्याची वेळ येते .
        तिसऱ्यांदा बेल वाजते.
आता बळजबरी केल्यानंतर  प्रत्येकीला कसं संपावण्यात आल त्यावरून बाहेर कोणी जावं हे ठरवावं असं सुचवलं जातं .
      इथेच आपल्या विचारांना धक्का बसतो. आता पर्यंत ज्यांना आपण सामान्य पीडित महिला समजतोय त्या वास्तविक जिवंतच नाहीत. ती खोली म्हणजे  स्वर्ग किंवा नरक नसून त्या पिडीत स्त्रियांना सुरक्षित वाटावी अशी एक छोटेखानी जागा आहे.  मुख्य म्हणजे जिने या सगळ्या पिडीत स्त्रियांना एकत्र आणलं तिला आपण त्यांचं रक्षण करणारी  *देवी* म्हणावं तर *तीही पिडीतच* आहे. हे मनाला चटका  देवून जातं.

       प्रत्येक जण स्वत:च्या मृत्यूची कहाणी एका शब्दात सांगत. प्रत्येकीची कारण आपल्या परिचयाचं .... नवीन असं काहीच नाही तरी आत खोल कुठेतरी  विचार करायला लावणारं .
          दाराबाहेर असणाऱ्या स्त्रीला आत घेण्याचं सर्वानुमते ठरत . दार उघडून रक्षण करणारी देवी जिला आत घेते तिला बघितल्यावर आतल्या प्रत्येक स्त्रिच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख ,  वेदना आणि समाज व्यवस्थेतील विकृतीबद्दल पडलेले अनेक प्रश्न, आक्रोश सगळं काही डोळ्यात स्पष्ट दिसतं.
 काही तरी चुकलय याची शंका आपल्या मनालाही स्पर्श करून जाते.
आत आलेली सज्ञान स्त्री नसून  आपल्या फ्रॉकशी खेळणारी पाच सहा वर्षाची चिमुकली हे आपल्याला दिसल्यावर वेदनेची एक कळ मेंदूत पोहचते.
 जेव्हा ती चिमुरडी खोलीतल्या सगळ्यात प्रौढ स्त्रीच्या आजी या नात्याने गळ्यात पडते तेव्हा पुन्हा एकदा नवीन बातमी घेवून  टी. व्हि. सुरू होतो.
     यावेळी मात्र त्या सगळ्या पिडीत स्त्रियांच्या चेहऱ्यावरची वेदना आपल्या काळजाचाही ठाव घेते.
     स्त्रीच वय , जात किंवा शारीरिक क्षमता काहीही असो वासनांध  पुरुषाला तिच्यात फक्त एक मादी दिसते . हा गंभीर प्रश्न नेहमीचाच पण तितक्याच दमदार आणि वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. एक जळजळीत सत्य .... जे बघायला , ऐकायला कठीण पण त्यावर काम होण्याची नितांत गरज आहे.
     प्रत्येकीच्या वाट्याला कमी संवाद आले असले तरी काजोल , मुक्ता बर्वे भाव खावून जातात. इतरांनीही त्यांच्या वाट्याला आलेल्या संवादांना योग्य न्याय दिला आहे. लेखन उत्तम आहेच पण सादरीकरणही तेवढेच दमदार आहे.
कलाकारांच्या नावापेक्षा कथेचा आशयच  कथेचा प्राण आहे याची जाणीव प्रकर्षाने होते.
      मनोरंजनासाठी आपण अनेक सिनेमे बघतो पण कमी शब्दात आणि वेळेत प्रभावीपणे  वेगळी, ओघवती मांडणी असलेली  ही शॉर्ट फिल्म एकदातरी आवर्जून बघावी अशीच आहे.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( लिखाण आवडल्यास नावा सहित शेयर करावे)

त्याच्या प्रेरणेने तिची झेप



#१००शब्दांचीकथा
#विषय
#आकाशी_झेप_घे_रे_पाखरा

#कथा१
#त्याच्या_प्रेरणेने_तिची_झेप

     मृणाल खूप चुलबुली मुलगी.
२३व्या वर्षी लग्न होवून संसाराची जबाबदारी अंगावर पडली.
पहिलं अपत्य 'विशेष मुल' म्हणून जन्माला आलं.
       आई होण्याचा आनंद अनुभवण्यापेक्षा मुलाची अवस्था बघून ती पुरती कोलमडली. अनेकांनी मुलाला संपवण्याचे सुचवले पण तिने त्याला जगवण्याचे आव्हान स्विकारले.
स्वतःच अस्तित्व विसरून ती फक्त त्याची आई बनली. त्याला व्यक्त होता येत नव्हतं पण आईची तळमळ जाणवत होती. १३ वर्षाचा असतांना त्याचा  संघर्ष संपला. प्राण पाखरू होऊन  समाधानाने आकाशात विलीन झाले.
'विशेष मुलांच्या' संगोपनासाठी पालकांना समुपदेशन करण्याचे ध्येय देवून  जणू त्याने आपल्या आईचा पिंजराच तोडला होता.
आज ती त्याच्या नावानेच एक संस्था चालवते. त्याच्यासारख्या   अनेक मुलांना जगण्याचा हक्क मिळवून दिला.
©️ अंजली मीनानाथ धस्के




पिलानेच आईच्या पिंजऱ्याचे उघडले दार



   #१००शब्दांचीकथा
#विषय
#आकाशी_झेप_घे_रे_पाखरा
#कथा२
#पिलानेच_आईच्या_पिंजाऱ्याचे_उघडले_दार

आई मी निबंध स्पर्धेत भाग घेवू?

घे की त्यात विचारायचं काय.

अग पण माझ्याकडे तेवढा वेळ  नाही. विषय ही थोडा किचकट वाटतो. मला बक्षिस मिळणार नाही.

अरे ..... बक्षिस मिळावं  म्हणून स्पर्धेत भाग घ्यायचा नसतो. त्या निमित्ताने आपली नवीन विषयाची तयारी होते. इतरांचे दृष्टिकोन जाणून घ्यायला मिळतात.  जिंकणाऱ्याला बक्षिस मिळत पण इतरांनाही स्पर्धा अनुभव संपन्न करून जाते. वेळ जेवढा आहे तेवढाही पुरेसा आहे तू योग्य नियोजन करण्याची गरज आहे फक्त.

मग हे नियोजन  रांगोळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी  तूही करायला हवे. तू मात्र स्वतःला घराच्या जबाबदारीत गुरफटून घेतले आहेस.

आकाशी भरारी घेण्यासाठी तिच्या पिंजऱ्याचे दार तिच्याच पिलाने आज हळूच उघडले.
©️अंजली मीनानाथ धस्के