रस पान

#रसपान
#भक्तीरस
#भौतिकरस
©️अंजली मीनानाथ धस्के
           आज का कोणास ठाऊक ..... सकाळी सकाळी जरा वेळ घाटावर जावून  नदीकडे निवांत बघत बसावस वाटलं . मस्त थंडी .... नदीच्या पाण्यावर धुकं पसरलेलं .... पानकावळे पाण्यात सुर मारून आपली भोजन व्यवस्था करण्यात मग्न ... त्यामुळे  पाण्याचा होणारा एक विशिष्ट  आवाज..... चिमण्यांची सुरेल चिवचिव....   मन कसं शांत ..... शांत ....... शांत झालं. शेजारीच एक आजोबा योगा करायला बसले. त्यांनी मोबाईलवर  "अथर्वशीर्ष " लावलं....  " ओमssss भद्रं कर्णेभि:ssss ...." कानावर पडताच मन ताल पकडू लागलं ... डोळे मिटले गेले.... " त्वमेव केवलं कर्तासिsss... त्वमेव केवलं धर्तासिsss.... " पर्यंत मन पोहचले . रोमारोमात भक्ती रस पाझरू लागला ... आत्मा आणि परमात्मा एक होणार असं वाटू लागलंच होतं  तेवढ्यात...... दुसऱ्या बाजूला दोन कॉलेज कुमारी येवुन बसल्या ..... आणि त्यांच्या मोबाईलवर ...." मतलबी ..... बन जा जरा मतलबी .... दूनियाकी सूनता क्यो..... खुद की भी सून ले कभी "  हे गाणं वाजलं.
विश्वामित्र जिथे टिकाव धरू शकले नाही तिथे माझ्या सारखी सामान्य व्यक्ती काय टिकाव धरणार.
क्षणात मतलबी मन " परमात्म्याची भेट" पुन्हा केव्हातरी घेवू म्हणत भक्ती रसातून बाहेर आलं आणि लगेच भौतिकरस प्राशन करू लागलं. कुठलेही दुःख नसलेल्या माझ्या मनाने  सकाळच्या उगवत्या  सूर्याला नमस्कार करून   ," सूरज डुबा हैं यारों sss.... दो घुट नशेके मारो sssss
गम तुम भूला दो सारे संसार के " म्हणत जल्लोषात थिरकायला सुरुवात केली.
काय करणार 😉.... आमच्या पिढीचे वय ज्या टप्प्यावर आहे तिथे मनाला भक्ती रसाची कितीही ओढ असली तरी अजून ते भौतिकरसातच चटकन रमते.
माझ्या मनाचे जे झाले ते झाले ..... गुलाबी थंडीत ... सकाळी सकाळी तुमचे मन शांत .. प्रसन्न व्हावे म्हणून ही  " गुलाबी पहाट" असलेली  रांगोळी खास तुमच्यासाठी.....
इतर लिखाण " आशयघन रांगोळी"  या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com
( ही रांगोळी आधी चित्र काढून न घेता .. डायरेक्ट रंग वापरून रंगवली आहे.  )
©️अंजली मीनानाथ धस्के




एक न मिळालेला अल्बम ( विनोदी)


#एकनमिळालेलाअल्बम
#PULA#यत्रतत्रसर्वत्र
(PULA हा पुणे लेडीज चा खूप मोठा ग्रुप आहे.)
©️अंजली मीनानाथ धस्के
 तर झालं असं ....
मला एक फोन आला. ( त्यात काय एवढं विशेष . सध्या ह हळदीकुंकवाचा सिझन आहे ... आलं असेल एखादं बोलावण असं अजिबात समजू नका. ) पुल ग्रुपच्या व्हेरिफाइड सेलर असलेल्या एका ज्वेलरी कंपनीकडून हा फोन आला होता . त्यांना त्यांच्या मराठमोळ्या  दागिन्यांच्या जाहिरातीसाठी सामान्य स्त्रीचाच चेहरा हवा होता आणि त्यासाठी माझ्याहून परफेक्ट कोणी असूच शकत नाही अशी त्यांची बहुदा खात्री पटली होती. म्हणून त्यांनी  मला फोन केला होता. मी जरा आढेवेढे घेतले पण माझ्या वेशभूषे पासून ते मेकअप आर्टिस्ट पर्यंत सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. माझ्या जाण्या- येण्याची सोय ही केली. तेव्हा माझा नाइलाज झाला. मी दिलेल्या वेळी दिलेल्या  ठिकाणी पोहचले. माझे शरीर त्यांच्या स्वाधिन केले .( सगळ्या बायकाच .... कंपनीची मालकीण ... वेशभूषा करणारी .... मेकअप आर्टिस्ट ...आणि फोटोग्राफर... तेव्हा गैर अर्थ घेवू नये😜) त्यांनी बघता बघता माझा कायापालट केला . आरश्यात जेव्हा स्वत:ला बघितले तेव्हा , " ही😱 मी नव्हेच ... ही तर अप्सरा😜 नभीची" असेच वाटले मला . मनसोक्त पोझ दिल्या .... इतक्या की कॅमेऱ्याची  मेमोरी फुल्ल झाली . मन कसे तृप्त झाले होते. मला फोटोची फायनल कॉपी   दोन दिवसात व्हॉट्स ऍप वर पाठवायच त्यांनी कबुल केलं. मी त्यांचे आभार मानले आणि पुन्हा भेटण्याचं आश्वासन देवुन  प्रेमाने त्यांचा  निरोप घेतला.  घरी आल्यावर दोन दिवसात फोटो मिळणार या विचारात मी शेखचिल्ली सारखी स्वप्न रंगवू लागले. कशात लक्ष लागेना . फोटो कसे  आले असतील ? मी चांगली दिसत असेल का? फोटो चांगले आले तर पुलं वर लगेच रिव्ह्यू देवुन टाकूया का? . फोटो बघून सगळ्या भरभरून कौतुक करतील का ? कौतुक केले तर आपण काय रिप्लाय करायचा?. आनंदाच्या  नुसत्या उकळ्या फुटू लागल्या. इतका आनंद झाला की...  आनंदाने उड्या मारत " आज मै उपर ... आसमा नीचे " हे गाणं मी मोठ्याने गुणगुणायला लागले .
तेवढ्यात नवरोबने गदा गदा हलवून झोपेतून जागे केले. तो मला फिट आली आहे  असंसमजून घाबरून विचारत होता , " काय हे? काय  होतय ? हात पाय वाकडे का करतेय? काय सांगायचं आहे? स्पष्ट सांग काहीच कळलं नाही काय बडबडत होती ".
त्यावर मी चिडून बोलले , " पाच मिनिट अजून थांबला असता तर फोटोचा अल्बम मिळणार होता . लगेच रिव्ह्यू देवुन छान कमेंट ही  मिळाल्या असत्या. "
त्याला काहीच कळले नाही . तो माझ्याकडे 🙄🙄🤔🤔😱😱😱😱 भूत बघितल्या सारखा बघत होता.
हे सगळ सांगायचं कारण की , पुलं ग्रुप वर एवढ्या  उत्कंठावर्धक काही गोष्टी घडत असतात की त्याचा परिणाम संवेदनशील मनावर झाल्यावाचून राहत नाही. तेव्हा झोपण्यापूर्वी  पुल ग्रुप पासून किमान अर्धा तास तरी दूर रहावे.  अन्यथा  जवळचे लोकच  तुमच्या बद्दल.. तुमच्या उत्तम आरोग्य बद्दल 😜 गैरसमज  करून घेतील.
 तसेच मेहनतीने केलेल्या फोटो शूटचा अल्बम कधीच मिळणार नाही या गोष्टीचं  झालेलं प्रचंड दुःखही तुम्हाला😓🤪 पचवावे लागेल.
©️अंजली मीनानाथ धस्के
फोटो अल्बम मिळाला असता तर तुम्हालाही खात्री पटली असती की मी फोटोमधे या रांगोळीतल्या नटीपेक्षा ही सुंदर दिसत होते😉😆. असो.... तूर्तास रांगोळी वरच समाधान मानावे.
इतर लिखाण माझ्या " आशयघन रांगोळी" या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com

झोपेतल्या गोष्टी


#झोपेतल्यागोष्टी
#गमतीजमती

      बाळराजेंना झोपतांना गोष्ट सांगावीच लागते तेव्हा पप्पा फार फार कल्पक होतो . रोज काय नविन सांगायचे? या प्रश्नाचं उत्तर म्हणून गोष्टीत तो मनाला वाटेल तसे फ्युजन करतो . कानावर पडलेली गोष्ट ऐकत मी बापडी झोपेच्या विश्वात अर्धवट रममाण झालेली असते . कानी संवाद पडतो तो असा.....
बाळराजे : पप्पा पुढे काय होत?
पप्पा: ( आलेला पेंग बाजूला ठेवून गड लढवण सुरू आहे...  )  ....   स्वतःला वाचवण्यासाठी तो घोडा जीवाच्या आकांताने धावत सुटतो आणि .....     अचानक.................. अ...  चा...   न...  क...( झोप लागली बहुतेक  ..... असा विचार मी झोपेत करतेय )
बाळराजे : अचानक काय??
पप्पा :  अचानक काय ?? हम्म्म
कुठे होतो रे मी ?
बाळराजे : घोडा धावत सुटतो....
पप्पा : हा ..... तर तो धावत असतो धावत असतो आणि अचानक बिळात शिरतो .
(मी झोपेत  आणि बाळराजे जागेपणी एकादमात )
आम्ही:  काय???? बिळात🤔 शिरतो .... पप्पा आज घोड्याची गोष्ट आहे ना .?
पप्पा: हो का? घोडा होता का तो ?
शेवटी मी जागी  झालेच  ... बाळराजे वैतागले ...  पप्पाला झोपेतून  पूर्ण जागे करून सांगितलं.......
आम्ही: हो ....घोडा आहे आज गोष्टीत ..... बिळात कसा  जाईल तो??🙄🙄🙄🤔🤔🤔
पप्पा : अरे ..........तो घोडा नावाचा उंदीर आहे रे ... गेला बिळात आता  .... झोपा बरं तुम्हीही  ...
मी आणि बाळराजे : घोडा नावाचा उंदीर🙄😱😜😬😝🤪😆😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣
 (आमच्या हसण्याने निदान शेजारची चार घर तरी जागी झाली असतील )
दुसऱ्या दिवशी  बाळराजेंनी पप्पाला त्याचाच विनोद ऐकवला  .... पप्पा आज ," उंदीर नावाच्या घोड्याची गोष्ट सांगा ना ".
त्यानंतर  .... मुंगी नावाच्या हत्तीनीची ..... ससा नावाच्या वाघाची ..... जिराफ नावाच्या बकरीची.... अश्या अनेक कथांचा जन्म  झाला .
आज चला हवा येवू द्या मधे जेव्हा , " अरे मी  मास्याचे नाव ससा ठेवले आहे ". हा विनोद बाळराजेंनी ऐकला तेव्हा अगदी खुशीत म्हणाला  .... " पप्पा पप्पा.... हे... सेम ...टू... सेम...  तुमच्यासारखे विनोद करतात " 🤣🤣🤣
मी .... पप्पाला  मधेच झोप लागली  तर आज काय विनोद  होणार काय माहित या चिंतेत
पप्पा मात्र बाळराजे खुश आहेत आपल्या विनोद बुध्दीवर  म्हणून स्वत:च्या कल्पकतेला पणाला लावण्याचा तयारीत.
©️अंंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे

मन की बात

#मनकीबात
एखाद्या ' घटनेवर ' चिडाव.....
एखाद्या ' मुद्यावर ' भांडाव....
एखाद्या ' अवगुणावर ' टीका करावी.....
एखाद्या ' प्रसंगी ' आवाज ही वाढवावा....
एखाद्या ' विचारावर ' मतभेद ही असावा....
तरी माणसाने माणसाचा तिरस्कार करू नये कारण प्रत्येक माणूस हा कधी ना कधी ... एखाद्या घटनेमुळे... एखाद्या प्रसंगी... एखाद्या अवगुणामुळे... एखाद्या  मुद्यावर चुकलेला असतोच. दुसऱ्यांच्या ' मतांचा ' आदर केल्यास ' भेद' आपोआप नष्ट होतील.
©️अंजली मीनानाथ धस्के

वाण

#वाण
#१००शब्दांचीगोष्ट
           पगार झालेला नाही .  हातात फक्त १०० रुपये . त्यात वर्षाचा पहिला सण .... कसा मेळ बसवायचा याच विचारात राधा बसची वाट बघत उभी होती. तेवढ्यात  कानावर शब्द पडले , " मी जरा वेळ मंदिरा समोर बसतो , बघू औषधाचे पैसे जमले तर आज जावू दवाखान्यात". तिने मागे वळून पाहिले तर पायाच्या  जखमेला झाकण्यासाठी  भलेमोठे कापड गुंडाळलेली भिकारीण वेदनेने विव्हळत बसली होती .   तिला दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची नीतांत गरज होती . तिचा नवरा भिक मागून पैसे जमा करण्याची तयारी करत होता. तेवढ्यात बस आली. राधेचा हात आपसूक पर्समधे गेला.  १०० ची नोट त्या भिकरणीला दिली . तिने मनापासून आशिर्वाद दिला. बसमधे चढल्यावर राधा स्वतःशीच प्रसन्न  हसली . संक्रांतीचा सण वाण देवुन दणक्यात साजरा झाला होता.

Momspresso Marathi वर "वाण" या शब्दाला अनुसरून १०० शब्दांची गोष्ट लिहायची होती . 
या स्पर्धेत विजेती कथा म्हणून प्रकाशित झालेली माझी ही कथा " वाण" 


मकरसंक्रांत (२०१९)


" तिळ गुळ घ्या गोड गोड बोला" 
       मकसंक्रांत म्हंटल की...  तिळगुळ, हळदीकुंकू, वाण यांची आठवण होते. तसेच पतंग उडवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे सगळेच जण रांगोळीत पतंग रेखाटण्याचा प्रयत्न करतात. मला ही पतंग काढायला खूप आवडतं. परंतु या वेळेस मनात थोडा वेगळा  विचार  आला ...उन्हाळ्याची चाहूल घेवुन येणारा हा सण त्यामुळे पक्ष्यांसाठी बाल्कनीत पाण्याचे छोटे भांडे भरून ठेवायला हवे  याची आठवण झाली... पतंग उडवून झाल्यावर झाडावर राहिलेल्या मांज्यात अनेक छोटे पक्षी अडकतात त्यांना इजा होते हे टाळायला हवे.... चिमण्यांची संख्या कमी झाली आहे ती टिकवण्यासाठी थोडे प्रयत्न करायला हवेत....
आजही ज्यांच्या चिवचिवाटाने दिवसाची प्रसन्न सुरुवात होते त्या चिमण्यांसाठी हि रांगोळी ....
देता दाना , मिळता पाणी
भूक भागते चिमण्या जीवांची
गाती  चिव चिव गाणी
सजुदे मैफिल याच सुरांची
किलबिल पडू दे कानो कानी....
©️ अंजली मीनानाथ धस्के





वेक अप

#वेकअप
#१००शब्दांचीगोष्ट
महिन्याभरापूर्वी छोट्याशा आजाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या टेस्ट केल्या गेल्या. दुर्दैवाने  डॉक्टरांची शंका खरी ठरली.  कुटुंबावर आभाळच कोसळलं होतं. थर्ड स्टेजवर ' कॅन्सर '  ऐकून नवरा हादरून गेला... ती पार कोलमडली. भेटायला येणारे सांत्वन करत .... दिलासा देत ....  पण तिचं कश्यातच लक्ष नव्हतं.  'आपल्या माघारी लेकरांच काय होणार ' या काळजीने तिला झोप आली नाही.  आयुष्यात अनेक संकटे आली पण तिने धीर सोडला नव्हता. शुन्यातून विश्व निर्माण केलं होतं . चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला..  आरशात पाहिलं ...... समोर ती.. मागे मुलं बिनघोर झोपलेली . तेवढ्यात गजर झाला ... क्षणात निर्धार करत स्वतःशीच पुटपुटली, " रडणं पुरे .... घर सावरायला हवं ... योग्य ट्रीटमेंट घेवून बरं व्हायला हवं... खूप कामं पडली आहेत " वेक अप सोनाली वेक अप " .
©️ अंजली मीनानाथ धस्के
(Momspresso Marathi ने थिम अलार्म क्लॉक चे चित्र आणि वेक अप शब्द दिला होता कथा लिहिण्यासाठी.)

भाषा .... संदिग्धता आणि मी

 #भाषासंदिग्धता_आणि_मी
©️ अंजली मीनानाथ धस्के
       माझे मन अगदी पाण्यासारखे निर्मळ आहे परंतु कधी कधी कल्पनाशक्ती नको तिथे 🙄आणि नको तेव्हा वेगाने काम 😥करते त्यातून असे विनोद घडतात.😁
प्रसंग १
मी आणि माझ्यासारखेच ७ जण दुकानात समान घेण्यासाठी उभे आहोत.
मी :- जल्दी बील बनायो ..... भैया
भैया :- करता हुं ना मॅडम
(तेवढ्यात माझ्या मागून एका बाईचा आवाज आला )
ती:- भैया जल्दीसे मेरा दूध निकालो.
मी:- 😰😱😲( स्वतःशीच) हे मी काय ऐकल!!!
..... धडधडत्या हृदयाने भैयाकडे बघितल. तर तो एकदम निर्वीकार
भैया:-  हा हा.... बस पाच मिनिट
ती:-  बस पाच मिनिट.... बोलके कितानी देर से खडा किया है/ निकालो जल्दीसे....
मी:- 😫( स्वतःशीच ) 🙉🙉🙉घोर कलयुग ... दुसरं काय
इतक्यात भैया  मागे वळला ... फ्रीज उघडल आणि त्यातून दोन दूध बॅग काढून तिला दिल्या.
मी:- 🙄😬🤪🙈🙊🙊🙊
आता मी मागे वळून तिच्या कडे पाहिले ती गोड हसली व म्हणाली
ती :- सुबह जल्दी जाती हुं ना काम पे ईसलिये अभी लेके जाना पडता है/
मी :-( हसून ) हम्मम (धन्य आहेस माऊली.... अज्ञानात सुख असतं ते काही खोटं नाही.."बॅग फ्रीजमेसे" शब्द तू गाळलास पण माझी धडधड वाढली .. बी. पी शूट होता होता वाचले मी ... आता घरी गेल्यावर हसून पुरेवाट लागणार आहे ती वेगळीच .)

प्रसंग २
मैत्रिणीला फोन केला
मी:- हॅलो...
ती :- मॅडमला....आज वेळ मिळाला वाटतं बोलायला.
मी:- तुझी खूपच आठवण आली मग  बोलावं म्हणून केला फोन... काय कशी आहेस?
ती :- मजेत
मी:- काय करते आहेस?
ती:- कपडे काढते आहे.
मी:-😱😱 😲😲😲😲 ही वेळ आहे का असं काही करायची ?
ती:- मग कोणती वेळ असते? घरात कोणी नसलं की शांततेत आवरत सगळं.
मी:- 😨😲😲☹️ काय हे..... कधी लागली ही सवय.
ती :- कधी म्हणजे काय ..... अगदी पहिलेपासून
मी:-  मला कधी जाणवलं नाही  🤔🤔.
ती :-😱😱 जाणवलं नाही म्हणजे ??.... आता काय तुझ्या समोर कपड्यांच्या घड्या करत बसायचं होत का मी?
मी :- 😥🤪😬 कपडे...... ओह.... म्हणजे तू दोरीवरचे कपडे काढत होतीस का ?
ती:- दोरिवरचे नाही तर काय 🤭🤭🤭😉😛😝
नालायक आहेस पक्की
मी:- मी काय नालायक .... तू बिनडोक..... "दोरीवरचे कपडे "असं स्पष्ट सांगायला हवं होतं.... माझ्या जागी दुसरा कोणी असता तर फोनवर बोलण्यात वेळ वाया घालवला नसता ... घरीच आला  असता डायरेक्ट😉😜😜
 ती:-🙏 धन्य आहेस (जोरजोरात हसत सुटली.)

आजचे ज्ञान
* बोलतांना वाक्यातली संदिग्धता  टाळायला हवी.
* वाक्यातले काही शब्द गाळले तर अर्थाचा अनर्थ होवू शकतो.
* आपल्याला जो अर्थ अपेक्षित आहे तोच समोरच्याने घेतलाय का? याची खात्री करूनच संवाद सुरू ठेवावा.
* भाषा कोणतीही असो संवाद थांबता कामा नये.
* भाषेमुळे किंवा त्यातील संदिग्ध रचनेमुळे होणारे विनोद खुल्या मनाने स्विकारले पाहिजे.
*सगळ्यांची मने निर्मळच असतात ... मुद्दामहून कोणी संदिग्ध बोलत नाही 😉
* भाषेवर प्रेम करा.... हसवा आणि हसत रहा.

©️ अंजली मीनानाथ धस्के
anjali-rangoli.blogspot.com " आशयघन रांगोळी" या ब्लॉगवर  माझे इतर लिखाण आणि रांगोळ्या उपलब्ध आहेत.


मी काही पट्टीची लेखिका नाही . ज्या प्रसंगांनी मला काही तरी शिकवलं ... किंवा आठवीत राहिले ... ते लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून प्रसंग चांगले अथवा वाईट जसे घडले तसे स्वीकारून .... माझ्या लिखाणातून तसेच ते व्यक्त करण्याचा व त्यातून काही तरी शिकण्याचाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com

कळी .... कविता..... रांगोळी

#इवलीशीकळी
#रांगोळी
©️ अंजली मीनानाथ धस्के
 आमच्या बागेत आज एक छोटी कळी उगवली .... ( हे फुल वर्षभर असच राहतं  ..... सुकल्यावर ही असच दिसतं.  ह्या फुलांचे हार प्रत्येक तीर्थक्षेत्री विकायला असतात.) तिचे निरीक्षण करता करता अचानक तिच्या मध्यात असणाऱ्या रचनेने माझे लक्ष वेधले. कळीच्या मध्यातली रचना आणि मी काढते त्या रांगोळीत फार साधर्म्य आहे असे जाणवले . येवढ्या छोट्या कळीमधेही इतकी सुंदर रांगोळी दडलेली पाहून भारी गंमत वाटली. सृष्टीच्या निर्मात्याला तोड नाही  हेच खरे.... त्या निर्मात्याच्या चरणी माझ्या कलेचे हे पुष्प अर्पण...
#इवलीशीकळी
इवलीशी कळी.... नखरेल भारी 
वाऱ्यावर डूले.....खुदकन हसे
पिवळ्या रंगात सुंदर दिसे
हिरवी पाने तिच्या दिमतीस सारी
इवलीशी कळी.... नखरेल भारी

इवलीशी कळी.... नखरेल भारी
कोवळ्या किरणांनी सजे
सूर्याला पाहून हळूच लाजे
मिरवी तोरा... परसदारी
इवलीशी कळी.... नखरेल भारी

 इवलीशी कळी.... नखरेल भारी
मध्यात परागकणांची दाटी असे
जवळून बघता गंमत दिसे
तिच्या रांगोळीची तऱ्हाच न्यारी
इवलीशी कळी.... नखरेल भारी
©️ अंजली मीनानाथ धस्के




मन की बात

#मनकीबात
©️ अंजली मीनानाथ धस्के
टेक केअर गूड नाईट या सिनेमाच्या निमित्ताने.........
          हा सिनेमा बघितला तेव्हापासून या बद्दल लिहावं म्हणत होते पण या ना त्या निमित्ताने लांबणीवर पडत गेलं...... काल परवाच मैत्रिणीशी बोलतांना काही विषय निघाले आणि आता लिहावच असं मनाने घेतल.....
कलाकार उत्तम असतील तर सादरीकरण उत्तम होतंच पण त्या आधी सिनेमाचा प्राण म्हणजे त्याचे कथानक उत्तम हवे . या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच उत्कृष्ट सिनेमा बनतो.
 मला जे अनुभवाने पटले... नेमक तेच या सिनेमाने अधोरेखित केले आहे , " जेव्हा करायला काहीच नसत तेव्हा अनेक चुकीच्या गोष्टी आपल्याच नकळत आपल्या आयुष्यात प्रवेश करतात". म्हणून हा सिनेमा मला खूप भावला..... असो
*सगळ्यात आधी पालकत्व कसे असावे ? कसे असू नये यासाठी  हा सिनेमा मार्गदर्शक आहे. आदर्श पालक होण्याचे नेमके असे कुठलेच ठोकताळे नाहीत . फक्त येणाऱ्या चांगल्या वाईट परिस्थितीत मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते आणि तेच आपल्याला उत्तम पालक बनवते.
*आपल्या मुलांना चांगली संगत असणे गरजेचे आहे.
*बदलत्या काळाची गरज म्हणून येणारे नव नवीन ज्ञान आपण आत्मसात करायलाच हवे त्यासाठी इतरांवर अवलंबून राहता कामा नये.
*स्वतः बद्दलच्या खासगी बाबी फोन वर बोलतांना मोठ्याने बोलू नये.
*मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्यातला संवाद कमी होता कामा नये.
*आपल्याला काय वाटत ... या पेक्षा मुलांना काय वाटतं... हे वेळोवेळी तपासल पाहिजे.
*अनोळखी व्यक्तीशी मैत्री करतांना नेहमी सजग राहावे.
*मुलांना (मोठ्यांना ही) ..... करण्यासारखं खूप काही असलं पाहिजे.( इथे ढीग भर क्लासेस लावून त्यांचे बालपण गमावणे मुळीच अपेक्षित नाही. त्यांच्यातल्या रचनात्मकतेला चालना मिळत रहावी.... एवढेच)
*चूक कुठल्याही प्रकारची असो ती कबुल करण्याची आणि ती चूक सुधारण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांची तयारी असली पाहिजे.
*समस्येला घाबरून जीव देण्यापेक्षा..... शेवटच्या श्वासापर्यंत लढणेच अधिक योग्य आहे.
**आता सगळ्यात महत्वाचं....
"खरं सांगू... मला करण्यासारखं काहीच नव्हतं म्हणून मी चॅटिंग करत होती " ..... या आशयाचा  फार छोटा डायलॉग आहे त्यात पण खूप .... खूप गंभीर समज देवुन जातो.
अनेकदा आपण पाहतो वाचतो , " माझ्याही काही गरजा आहेत " असं म्हणून अनेक लोक फावल्या वेळेत गैर गोष्टींच्या आहारी जातात ... स्वतःची  चूक झाकण्याचा प्रयत्न करतात ....
खरं पाहिलं तर स्वतःच्या अशा गरजा कोणाला नसतात ..... एक सारख्याच परिस्थितीत चांगलं आणि वाईट वागणारे असतातच की.... चिखलात कमळ आणि शेवाळे दोन्ही उगवते ... आपल्याला नेमके काय व्हायचे आहे ते सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे.
आता प्रश्न पडेलच.... की, "कमळ होण्यासाठी काय करावं?"  तर त्याच अगदी साध उत्तर आहे , " आयुष्याच ध्येय निश्चित करावं" . ज्याला करण्यासारखं खूप काही असतं तो वाईट गोष्टींच्या आहारी साहजासहजी जात नाही. तुम्हाला छंद असले पाहिजेत ... तुम्ही ते जोपासले पाहिजेत.... मग तुम्ही नोकरी करत आहात ....कींवा .... करत नाही याला काहीच महत्त्व नाही . " खाली दिमाग ... शैतान का घर " ही म्हण उगाच नाही पडली.
स्वतःला चांगल्या कामात व्यस्त ठेवले तर वाईट सवयींच्या आहारी जायला वेळ रहात नाही.  लहान मूल जेव्हा पाळण्यात असते तेव्हा त्याच्याकडे काहीच नसते करायला मग ते काय करते , पाळण्यात झोपल्या झोपल्या आपल्याच हातांचे  .... मागून... पुढून निरिक्षण करत बसते ....... बोटांच्या मुठी आवळून..... पुन्हा त्या उघडून पाहते.... त्यांना पाहून हुंकार भरते . जेव्हा ते पालथे पडते ... रांगायला लागते तेव्हा त्याला नविन विश्वाची ओळख होते ... करण्यासारखे खूप काही मिळते आणि मग पळण्यातला  हातांचा खेळ विस्मरणात जातो. आपलंही अगदी असंच असतं ..... करायला काहीच नसेल तर आपल्या शारिरीक गरजा .... मानसिक गरजा डोकं वर काढतात आणि त्या सहजा सहजी पूर्ण होत नसतील तर मग  आपण चुकीच्या मार्गाने वाटचाल सुरु करतो. काही जण रिकामा वेळ असेल तेव्हा तासन् तास गॉसिपिंग करून  आपल्याच डोक्यात कचरा भरून घेतात तर काही जण तासन् तास व्हिडिओ गेम खेळत बसतात.  काही जण मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी गरज नसतांना सतत शॉपिंग करत असतात तर "शारिरीक गरज " या  नावाखाली अनेक स्त्री पुरुष आपल्या चुका झाकण्याचा प्रयत्न करतात. मूळ समस्या काय आहे ? याच्या खोलात न शिरता वरवरचा विचार करून झडपट समाधान देणारे उपाय अवलंबले जातात.
मदत तेरेसा ...... डॉ. अब्दुल कलाम ... यांचे मानवी देह नव्हते???? की.... यांना मानसिक, शारिरीक गरजा नव्हत्या???? शरीर धर्म कोणाला चुकला आहे  .... तसाच तो त्यांनाही चुकला नसेल. पण त्यांनी त्यांच्या गरजांचे भांडवल केले नाही कारण....... कारण ..... या गरजा आयुष्यभर कुरवाळत बसण्यापेक्षा त्यांनी आयुष्याचे उदात्त ध्येय ठरवले आणि ते गाठण्याचा मार्ग अवलंबला.
मान्य आहे सगळ्यांनाच काही मदर तेरेसा आणि डॉ. अब्दुल कलाम होण शक्य नाही  .....  म्हणूनच आपले थोर संत सांगुनच गेले आहेत, " सामान्यांनी धोपट मार्ग सोडू नये.... संसारात राहून परमार्थ साधवा ".
तेव्हा आपण जे करतो आहोत तेच करत राहायचे ..... तरी वेळ उरत असेल तर त्यावेळेचा सदुपयोग करायचा ... छंद जोपासायचे.... नवनविन गोष्टी शिकत राहायचं ..... रचनात्मक दृष्टीने स्वतःचा विकास करत राहायचं.... असं केल्याने आयुष्यातील अनेक छोट्या छोट्या समस्या नक्कीच  नाहीश्या होतील.
खरं तर खूप सोपं आहे सगळं फक्त आपण आपल्या मनाला योग्य वळण लवायची गरज आहे.
( सिनेमा बघितल्यावर ..... मनात विचार सुरू झाले .... म्हणून डोळ्याची रांगोळी पोस्ट केली  )
©️ अंजली मीनानाथ धस्के

(टिप: हे सर्वस्वी माझे मत आहे .... तुमचे मत या पेक्षा वेगळे असू शकते. पटल्यास स्विकारावे अन्यथा इथेच सोडून द्यावे )

सावित्रीबाई फुले (३/१/२०१९)

ज्यांच्यामुळे  स्त्री जातीला आजचे सोनेरी दिवस मिळाले.....
स्वातंत्र्य मिळाले..... स्वतः ची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली......
स्त्री शिक्षणाचे आराध्य दैवत असलेल्या..... सावित्रीबाई फुले ........यांच्या जयंती निमित्त काढलेली ही रांगोळी त्यांच्याच चरणी अर्पण..........

कमाल

#कमाल कमाल

#Gyanoftheday
©️ अंजली मीनानाथ धस्के
शालेय मैत्रिणीचा अचानक फोन आला..
ती ...  कशी आहेस?
मी. .. मजेत ... तू?
ती ... ऑफिस, घर मुलं यात वेळ  जातो सगळा .... तू काय करतेस? जॉब वगैरे काही??
मी... काहीच नाही
ती ..kay😱 एवढी शिकलीस यार तु आणि जॉब नाही करत😓 मन घट्ट करायचं आणि मुलांना पाळणाघरात ठेवायचं .... आधी त्रास होतो.. मग होत सगळ सुरळीत.... उलट मुलं घरी कंटाळतात .... त्यांना ही नंतर पाळणाघर आवडायला लागतं.... लहान असतानाच ठेवायचे त्यांना मग जास्त त्रास नाही देत . आपलं शिक्षण वाया नाही घालवायचं
मी....,,🙄🤔😓😷😷🤐🤐🤐🤐🤐🤐
दुसऱ्या दिवशी मित्राचा फोन आला
तो ... Hi ओळखल का?
मी... हो रे... बोल कसा आहेस?
तो .. मी मजेत.. तू काय करतेस सध्या?
मी...🤔🤔🤔🤔🤔 (आधीचा अनुभव होताच.. त्या मुळे यावेळस उत्तर काय द्यावं हा विचार सुरू)
तो... अग .. काय.... काय करतेस सध्या?
मी..... कमाल करते
तो...😱 काय??? म्हणजे काय??
मी... कमाल म्हणजे काहीच नाही
तो..😱😱😱???????????
मी ... अरे शाहरुख खानच्या वडिलांनी त्याला सांगितले की," जे काहीच करत नाही ते कमाल करतात"(हम तुम्हारी उम्र के थे तो पहाड चढ कर जाया करते थे ... तुम चढ सको तो चढ लो ... वरना जो कुछ नहीं करते ....... वो कमाल करते हैं. )   ...कालच ऐकलं मी त्यांच्या एका इंटरव्ह्युव मधे....
तो...🤪🤣🤣🤣 भारीच आहेस तू
मी... 🙄😝😜
आजचे ज्ञान.....
१ जो कुछ नंही करते.... वो कमाल करते हैं!
२ स्वतः चे कुटुंब आणि छंद यावर लक्ष केंद्रित करा.
३ आपले आयुष्य आपण कसे जगावे ... आपला प्राधान्य क्रम काय असावा हे आपण ठरवायचे . इतरांचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. कोणालाही त्यासाठी एक्स्प्लानेशन द्यायची गरज नाही. आपण काहीच करत नाही म्हणून आपल्याला कोणी कितीही बोल लावले तरी आपण " कमाल" करत असतो हे कायम ध्यानात ठेवायचं आणि आत्मविश्वासाने वावरायचं👍🏻
सोबत माझी एक... " कमाल" रांगोळी पोस्ट करत आहे.
anjali-rangoli.blogspot.com.... इतर लिखाण आणि रांगोळ्या या लिंक वर उपलब्ध आहेत.
जेव्हा " कमाल" करत असाल तेव्हा नक्की भेट द्या 😂😂😂😁
©️ अंजली मीनानाथ धस्के