मस्त चाललंय आमचं

#मस्त_चाललंय_आमचं

         काल जुन्या मैत्रिणींचे अचानक भेटायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सगळ्या ' नैवेद्यम हॉटेलच्या टेरेस गार्डनमधे भेटल्या. भेटल्यानंतर जुन्या, नविन अशा अनेक विषयांवर गप्पा रंगात आल्या होत्या. या सगळ्यात 
'नवरा' आणि ' स्वतःचे वाढते वय' हे दोन मुख्य मुद्दे होते.
      लग्नाला अनेक वर्षे होवूनही अजून नवरा घरकामात मदत करत नाही. काळा बरोबर नवऱ्यांनी त्यांचे विचार बदलायला हवे. अशा तक्रारी त्या एकीकडे करत होत्या तर दुसरीकडे स्वतःच्या वाढत्या वयाबरोबर होणारे बदल नियंत्रणात ठेवून आपण अजूनही किती मेन्टेन आहोत, त्यासाठी आपण काय काय करतो याचे कौतुकही सुरू होते. 
             गप्पा सुरू असतांना अचानक त्या सगळ्यांची नजर अलकावर खिळली. अलका त्यांच्यात अगदीच " ऑड मॅन ( वुमन) आउट" होती. तिच्या चेहऱ्यावर दोन वर्षात येवू घातलेली चाळीशी स्पष्ट दिसत होती. त्यात भर म्हणजे पूर्वी लांबसडक, काळेभोर असलेल्या तिच्या केसात आता चंदेरी केसांची उपस्थितीही प्रकर्षाने जाणवत होती.
सगळ्या जणी तिला केस काळे करण्याचे विविध उपाय सांगू लागल्या. चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी महिन्यातून एकदा पार्लरला जाणे कसे फायदेशीर असते हे पटवून देवू लागल्या. 
               अलकाच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू झाले. 
प्रत्येकाला लहानपणी मोठे होण्याची हौस असते. मोठे झाल्यावर मात्र एका विशिष्ट टप्प्यावर वय वाढूच नये किंवा वाढलेले वय चेहर्‍यावर दिसू नये असा प्रयत्न का असतो? तिचा मात्र असा आग्रह कधीच नव्हता. लहानपणी तिच्या घरी त्यांच्या बाबतचे निर्णय घेतांना घरातले मोठे नेहमीच म्हणायचे, " उगाच उन्हात पांढरे नाही केलेत हे केसं.... अनुभवाचं देणं आहे हे " तिला भारी गंमत वाटे या वाक्याची तेव्हाच तिच्या बाल मनाने ' आपणही हे 'अनुभवाचं देणं ' असेच मिरवायचे' असे ठरवून टाकले होते. सगळेच केस पांढरे झाले की कोणती केश रचना करायची हे देखील तिचे ठरले होते. तिला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होणारे शारीरिक, मानसिक बदल मनसोक्त उपभोगायचे होते. वृध्द झाल्यावर सगळे केस पांढरे नसतील, त्वचा सुरकुतलेली नसेल, नातवंडांचे लाड करतांना, आशिर्वाद देतांना थरथरणारे हात नसतील तर काय मजा आहे मग वृध्द होण्यात? असे तिला वाटे. सुरुवाती पासूनच वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या शारिरीक बदलांसाठी ती मानसिक दृष्ट्या तयार होती. दिसण्यापेक्षा मन व शरीर कायम सुदृढ रहायला हवे यासाठी ती आग्रही होती. 
             एका लग्नसमारंभात तिच्या पंचावन्न वर्षीय मामाने तिला सगळ्यांसमोर मुद्दाम टोमणा मारला होता, "काय ग.... आताच किती केस पांंढरे झालेत. तारुण्यात म्हातारी झालीस. माझ्याकडे बघ अजून केस काळे आहेत" त्यावर तिही बिनधास्त बोलली होती, " त्याचे काय आहे न मामा..... तुझे फक्त वय वाढते आहे. माझे तसे नाही.... माझा वयाबरोबर अनुभव देखील वाढतो आहे. त्याच अनुभवाने सांगते, 'दर आठ दिवसाला केस रंगविले तर ते अगदी तुझ्या केसांसारखे काळेच राहतात"
तिचे बोलणे ऐकून मामी सहित उपस्थित सगळ्यांमधे हशा पिकला होता. 
      मघाशी हॉटेलच्या टेरेस गार्डनमधे येतांना लिफ्ट बंद असल्याने सगळ्यांना पायर्‍या चढाव्या लागल्या होत्या. त्यावेळी काहींचे गुडघे दुखले तर काहींना श्वास घेणे जड गेल्याचे तिने पाहिले होते.
        यावेळी ही तिला काहीतरी बोलता आलेच असते. परंतू आजकाल कोणत्याही समारंभात घुमवूून फिरवून तिच्या दहा बारा  पांढर्‍या केसांवरच चर्चा केली जात होती. सगळ्यांना आपले विचार पटवून द्यायला गेलो तर आपला अमूल्य वेळ मात्र वाया जातो. हे अनुभवाने ती शिकली होती.
   म्हणुनच मनातले सगळे विचार मनातच ठेवून अलकाने मैत्रिणींचे प्रेमळ सल्ले ऐकून घेतले. 
           घरी आल्यावर रात्री झोपतांना मात्र 'आपल्याला आपले मत ठामपणे का सांगता येवू नये?' केस काळे न करणे.... किती शुल्लक बाब आहे. यावरही लोक त्यांची मते आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करत राहतात. या आपल्या शुल्लक निर्णयावर जर आपल्याला ठाम रहायचे असेल तर अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावेच लागणार आहे. या जाणिवेने तिला प्रचंड वैताग आला. तिच्या मनाची चिडचिड, धुसफूस झाली. 
    दुसर्‍या दिवशी सकाळी जरा उशीराच उठली. उठली म्हणजे काय नवऱ्याने व मुलाने प्रेमाने उठवले. नवऱ्याने हळूच ओठ टेकले कपाळावर तर मुलाने मिठीच मारली. लाडीक हट्ट केरत , " उठ ना ग मम्मी" असे म्हणाला.
    तशी ती लगबगीने उठली . नाश्त्याची वेळही झालीच होती म्हणून पटापट आवरून केसांना चिमटा लावत ती स्वयंपाक घरात दाखल झाली. तिथे पोह्यांचा मस्त सुवास दरवळत होता तर आल्याच्या चहाचे पाणी उकळत होते. ती काही विचारणार तेवढ्यात मागून नवऱ्याने व मुलाने ." सरssssप्राइज..." असा जल्लोष केला. तिच्या डोळ्यातला आनंद दोघांनाही सुखावून गेला. तिने प्रेमानेच मुलाला जवळ घेतले . "मला ही घ्या रे तुमच्यात" असे म्हणून त्या दोघांना नवराही बिलगला. तिच्या या छोट्याशा जगात तरी 'तिच्या दिसण्यापेक्षा, तिच्या असण्याला महत्व होते. हीच भावना तिला भविष्यात तिच्या दिसण्या संबंधी येणार्‍या अनेक सामाजिक प्रसंगांना तोंड देण्यासाठी अधिक बळ देणारी होती.
 सुख, समाधान, आनंद, प्रेमात न्हावून निघालेली त्यांची ही छबी सिंक शेजारच्या आरश्यात स्पष्ट दिसत होती व आरश्याला ठामपणे सांगत ही होती, " येवू दे चाळीशी,वाढू दे वय ....मला पर्वा नाही त्याची कारण .... कारण ...... मस्त चाललंय आमचं "
        आपल्यावर भरभरून प्रेम करणाऱ्यांसाठी आपण कसे दिसतो हे कधीच महत्त्वाचे नसते. त्यांनी आपल्यासाठी बदलावे असे वाटत असतांना आपण मात्र आपल्यात होणारे नैसर्गिक बदलही टाळू पहात असतो. लोक काय म्हणतील याचेच जास्त भय वाटून अनेकदा आपण आपल्या मनाविरूद्ध वागत असतो. तरुण दिसण्यासाठी अनेक रासायनिक साधनांचा वापरत असतो. केसांना काळे करण्यासाठी लावलेल्या डायचे दुष्परिणामही भोगत असतो. 
           जे करायचे आहे ते स्वतःसाठी करावे. लोकभया पोटी नाही. स्वतः मधले बदल सकारात्मकतेने स्विकारले तरच आपण या लोक भयापासून मुक्त होऊ शकतो. बाहेरून मुलामा देण्याआधी आपण आतून प्रसंन्न रहाणे शिकायला हवे. कारण बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक चिरकाल टिकणारे असते. आपणही आपल्या दिसण्यापेक्षा असण्याला महत्व देवून, आपल्या प्रियजनांच्या साथीने बिनधास्त म्हणू शकतो......" मस्त चाललंय आमचं ".

©️अंजली मीनानाथ धस्के




( हि रांगोळी तळहाता एवढी लहान आहे)

निळाफ्रॉक (अलक )

#बक्षिस
#निळाफ्रॉक
#१००शब्दांचीकथा
#AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के
            कचरा गोळा करण्याचे काम करणारी  ' चिंधी ' पुतळ्याला घातलेल्या निळ्या रंगाच्या फ्रॉककडे अगदी हावरेपणाने बघायची. तिचे असे दिवसातून दोनदा येणे मालकाला खटकायचे. दुकानात छोट्या  चोऱ्या व्हायच्या त्यात चिंधीचाच हात आहे अशी शंका मालकाला कायम येत असे.   पण परिसर स्वच्छ राहतो म्हणून तो काही बोलत नसे.  एक दिवस  तिने मालकाला त्यांच्याच दुकानातल्या कचऱ्यातले  साड्यांचे बॉक्स आणून दिले आणि उघडून बघायला सांगितले . आश्चर्य .... कचऱ्यातल्या बॉक्स मध्ये साड्या होत्या. इतके दिवस दुकानात होणाऱ्या चोरीचे रहस्य ' चिंधी'  मुळे अचानक उलगडल्या गेले. चिंधी जायला निघाली तेव्हा मालकाने , पुतळ्याचा निळा फ्रॉक काढून चिंधीला तिच्या इमानदारीने बक्षिस म्हणून तर दिलाच पण दुकानाच्या साफसफाईचे कायमस्वरूपी काम ही दिले.
©️ अंजली मीनानाथ धस्के

(Momspresso Marathi या वेळेस थीम... ' बक्षिस' शब्द)

बाप्पा आणि 🎅 सांता

#बाप्पाचसांता
#AnjaliMDhaske
       आज अंगारिका चतुर्थी आणि नाताळ एकत्र आलेत. तेव्हा रांगोळीत गणपती बाप्पा काढावे की सांता काही सुचत नव्हते. विचार केल्यावर लक्षात आले की......
बाराही महिने आपल्या हाकेला धावून येणारे ..... आपल्या सगळ्या मनोकामना न मागता पूर्ण करणारे ..... 🎅सांताला जसे असते तसेच लंबोदर असलेले.... लंबी दाढी एवेजी लांब सोंड असलेले .. हर‌णांच्या एेवेजी   उंदीर मामाची गाडी असलेले .... " जिंगल बेल ...जिंगल बेल"..... म्हणत सांताचे आगमन होते तर त्याच घंटेच्या नादात आणि टाळ्यांच्या गजरात ' सुखकर्ता.. दुःखहर्ता ....' अशी आरती केली की बाप्पा प्रसन्न होतो..... विघ्नहर्ता.... सुखकर्ता ... असे आपले लाडके बाप्पाच खरे आपले 🎅सांता आहेत.
सगळ्यांना चतुर्थीच्या आणि नाताळाच्या  खूप खूप शुभेच्छा.....
©️ अंजली मीनानाथ धस्के



कुलूप बंद

#कुलूप_बंद
#१००शब्दांचीकथा
#AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के

                  उच्च शिक्षित रमा जेव्हा रानडेंच्या घरची लक्ष्मी बनून आली तेव्हा तिला गृहप्रवेशासाठी चार दिवस थांबावे लागले. येवू घातलेल्या मानसिक संघर्षाची जाणीव तिला झाली . सुगरण रमाचे कौतुक करणाऱ्या सासूबाई जेव्हा  चार दिवस तिच्या हातचे काहीच खात नसत तेव्हा ....... पूजेला .... सणाला अडचण आली की तिचा घरातला वावर मर्यादित केला जाई तेव्हा ..... बंड पुकरावेसे वाटे. नंतर सगळंच इतकं अंगवळणी पडलं की  ' याला ' आपला विरोध होता हेही ती विसरून गेली.
       आज सूनबाई ' मुक्ता' चा गृहप्रवेश पण त्याही  सोबत त्यांची ' सखी' घेवून आलेल्या .
      चलबिचल झाली मनाची ...... अखेर मुक्तासाठी घराचा मुख्य दरवाजा तर उघडला गेलाच पण कित्येक वर्ष सुरू असलेला मानसिक संघर्ष मागच्या खोलीत कायमचा कुलूप बंद झाला.
©️ अंजली मीनानाथ धस्के

(ही रांगोळी तळहाता एवढी छोटी आहे)
ही कथा Momspresso Matathi ब्लॉगच्या मुख्य पानावर विजेती कथा म्हणून प्रकाशित झाली आहे.
(Momspresso Marathi या वेळेस थीम... ' आयुष्यातील पाहिले मोठे यश' शब्द)

#बनियान_शोध_मोहीम

 #बनियान_शोध_मोहीम
#लघुकथा
#AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के

             दामले आणि जोशी वाड्यात राहणारे सख्खे शेजारी. दोरीवर वाळत घातलेले कपडे कायम अदलाबदल होतील  इतके सख्खे शेजारी . आजही घरात मिस्टर दामलेंचे  बनियान काही केल्या सापडेना. त्यांच्या आंघोळीचा खोळंबा झाला होता.  तेव्हा मिसेस दामले  लगेच मिसेस  जोशी यांच्याकडे गेल्या व आपली अडचण सांगितली .  शोधून ही जेव्हा जोशींना ते बनियान सापडेना तेव्हा त्यांनी त्यांचे सगळे बनियान घेतले व दामलेंचे घर  गाठले. नेहमीप्रमाणे  दामलेंची चीडचीड सुरू होती. जोशींनी आणलेले प्रत्येक बनियान नीट निरखून बघितल्यावर ," हे आपले नाही" असे भाव दामलेंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते तर  मिसेस दामले आणि जोशी कुटुंब "आता हे तरी यांचे निघावे म्हणजे सुटलो एकदाचे " अशी प्रार्थना करत होते.
 'यातले एकही बनियान आपले नाही' असे जेव्हा दामलेंनी सांगितले तेव्हा मात्र सगळ्यांचा संयम सुटला आणि जरा वैतागूनच जोशी म्हणाले , " कशावरून एकही तुमचे नाही म्हणता ....  " . त्यावर दामले ठामपणे म्हणाले , " कारण यापैकी एकालाही....   पोटावर.... छिद्र ... नाही ".
        दामलेंच्या खरेपणाने केलेल्या निरागस विनोदावर .....दामले आणि जोशी कुटुंब हसत सुटले.
मिसेस  दामलेंच्या हातचा फक्कड चहा घेऊन .....बनियान शोध मोहीम निकालात निघाली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( हि रांगोळी तळहाता एवढी लहान आहे)

अदृष्य ओझं

#अदृष्य_ओझं   
#१००शब्दांचीगोष्ट
©️ अंजली मीनानाथ धस्के
                 घरी मोठी पूजा ...... होम हवन .... येणारे  पाहुणे आणि त्यात हाताशी सुमन नाही म्हणून तिच्या आईची धावपळ सुरू होती. तर मंदिरात स्त्रियांना प्रवेश देण्यात यावा असा निर्णय जाहीर झाल्यावर त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी कॉलेजच्या मुलींनी काढलेल्या रॅलीमधे सुमन अगदी उत्साहात नारे देत होती.
   जुन्या रुढींच्या विरोधात आज एक पाऊल पुढे टाकल्याचा आनंद घेवुनच सुमन  घरी परतली . तिला खूप काही सांगायचं होत आईला.  ती आईला प्रेमाने मिठी मारणार इतक्यात मागून काठी टेकत आजी आली आणि तिच्या आईला म्हणाली, " बाहेरची आहे ना आज ही ...... मग हिला मागच्या खोलीत जायला सांगा .  घरात मोठी  पूजा झाली.... उगाच शिवाशिव नको. जेवणाचे ताट ही मागेच नेवून द्या आणि हो.... काय लाड करायचे ते चार दिवसांनी करा".
दोघींनी एकमेकींकडे बघितले ...दोघींचे ही डोळे पाणावले ...... जवळ येण्यासाठी उचललेली पावले मात्र एका अदृष्य ओझ्याने जड झाली....... आणि.... आपसूक मागे फिरली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
#AnjaliMDhaske


              ( हि रांगोळी तळहाता एवढी लहान आहे)

#हेल्दी_फूड

   #हेल्दी_फूड
#समजगैरसमज
    #लघुकथा
        
            आदित्यच्या वाढदिवसानिमित्त स्वराची एक आठवड्यापुुर्वीपासून तयारी सुरू होती.  आदित्यच्या वाढदिवशी
तिची जय्यद तयारी बघून तिला मदत करायला आलेल्या मैत्रिणी कुठेलेही काम शिल्लक नाही म्हणत तिचं भरभरून कौतुक करत होत्या. मग काय सगळ्यांच्या गप्पा रंगात आल्या.
नेहा : अग आमच्या सोसायटीत वाढदिवसाला  वेफर्स.... समोसे असच काहीतरी विकत आणून दिलं जातं.
सरिता : हो न ग ... स्वरा सारखे घरी करणे सगळ्यांना थोडीच जमणार आहे.
स्वरा : अग घरी नाही केले तरी चालेल पण काहीतरी हेल्दी देण्याचा प्रयत्न करायला हवा.
मीताली : अग ... हेल्दी??.... गेल्या गेल्या वेलकम ड्रिंक म्हणून कोक देतात हातात, निदान तेही देणं बंद केले तरी पुरे आहे.
स्वरा :  हो ना ..... मी तर मुलांना कोक कसं टॉयलेट क्लीन करत याचा व्हिडिओ दाखवून ठेवला आहे. म्हणजे कोणी दिलं तरी ते घेणार नाहीत.
नेहा, सरिता आणि मीताली तीघी मैत्रिणी एकदमात बोलल्या: हो का ?  आम्हालाही पाठव तो व्हिडिओ.
                    तेव्हढ्यात दारावरची बेल वाजली. सगळी मुलं खेळून आल्यावर 'पार्टी पार्टी' चा गलका करतच घरात शिरली. स्वराने सगळ्यांना बसायला सांगितले. ' वेलकम ड्रिंक' आणायला स्वयंपाक घरातील फ्रीजकडे वळली तशी सगळ्या मैत्रिणींची उत्सुकता वाढली. त्याही तिच्या मागोमाग गेल्या. फ्रीजचा दरवाजा उघडला गेला.  तिथे सगळे पदार्थ व्यवस्थित हवा बंद डब्यांमध्ये भरून ठेवलेले होते. काही डीप फ्रिझ केलेले होते. आठवड्याच्या भाज्या चिरून ठेवलेल्या होत्या. सात दिवसांसाठी सात डब्यात मळलेली कणीक भरून ठेवली होती. रेडी टु कुक साठी कांदा, लसूण, टोमॅटो पेस्टचे आईस क्युब बनवून ठेवलेले होते. अगदी लिंबू, कोथिंबीर चिरून तर ओले खोबरे किसून ठेवलेले होते. महिन्या भराचे दुधाचे टेट्रा पॅक मस्त रचून ठेवलेले होते. पुढच्या आठवड्यात येणार्‍या पाहुण्यांसाठी घरचेच श्रीखंड हवे म्हणत, तीन किलो दहीही आणून ठेवलेले होते.
 एकंदरीत फ्रिज आतून बघण्यासारखा होता. आजचे सगळे पदार्थ बाहेर काढून फक्त गरम करायचेच काम तेवढे शिल्लक होते. " घरचे  साठवून ठेवलेले पदार्थ गरम करून खाणे म्हणजे हेल्दी फूड " हा  स्वराचा असलेला गैरसमज लक्षात येवून सगळ्याच तोंडाचा 'आ ' करून फ्रिज  बघण्यात गुंग होत्या.  तेवढ्यात स्वराने कोक ऐवजी आंबा आणि संत्री यांच्या चवीच्या दोन मोठ मोठ्या सील बंद तयार शीतपेयाच्या बॉटल बाहेर काढून पटापट पेले भरले. ती "वेलकम ड्रिंक तया sss र" म्हणत त्या सगळ्या जणींच्या हातात एक एक पेला देवून मुलांच्या घोळक्यात दिसेनाशीही झाली.

©️ अंजली मीनानाथ धस्के


( हि रांगोळी तळहाता एवढी लहान आहे)

पिप्पी_डंपरची

#पिप्पी_डंपरची  (अ ल क)
#AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के
         शार्दुलला त्याचे आवडते खेळणे कायम सोबत लागायचे . आजही तो ' डंपर' (ट्रक चा एक प्रकार)सोबत घेऊनच झोपला . कडाक्याच्या थंडीत...  दुलई पांघरून झोपलेल्या आईला शार्दुलने पिप्पी आलीचा घोषा लावू  उठवले.  जाम कंटाळा  त्यात  कार्ट आता  पिप्पीच्या बहाण्याने पाण्यात खेळणार म्हणून तिने नामी युक्ती लढवली . पलंगाजवळची खिडकी थोडीच उघली . त्याला तिथेच उभे केले आणि सांगितले , " इथूनच कर पिप्पी".    इकडे हीचा डोळा लागला.   एवढी थंडी का वाजते म्हणून उठून  बघते तर काय ..... खिडकी सताड उघडी ...... तिच्या गजांना खेटून शार्दुलचा डंपर उभा आणि शार्दुल पलंगावर मांडी घालून दोन्ही हातांच्या तळव्यावर आपला चेहरा ठेवून  त्या डंपरकडे एक टक बघत बसलाय. तिला काही कळेना . तो खिडकी बंद करू देईना. डंपरला ही हात लावू देईना. काहीच ऐकेना.  प्रेमाने "का नको? " असे विचारल्यावर तो बोबड्या भाषेत म्हणाला , " अsssरेsss माझी  पिप्पी झाली🙄 ... आता तो  पिप्पी करतोय😊. डंपर केवढा मोठा असतो माहित आहे ना 😲.........मग !..... त्याची  पिप्पी पण मोठी असणार न 😏.... करू दे त्याला  पिप्पी 😩..... डिशटब (  डिस्टर्ब ) नको करू ".
      यावर ती पोट धरून मोठमोठ्याने हसत सुटली.
©️ अंजली मीनानाथ धस्के

( Momspreso मराठी ... मुख्य पानावर  १०० शब्दांची विजेती कथा म्हणून प्रकाशित झाली आहे ती कथा👇 खाली देत आहे. त्यांनी दिलेल्या व्हिडिओ ला अनुसरूनच कथा लिहायला सांगितली होती. )



#पिप्पी_डंपर_ची   

          कडाक्याच्या थंडीत...  दुलई पांघरून झोपलेल्या आईला शार्दुलने पिप्पी आलीचा घोषा लावू  उठवले.  जाम कंटाळा  त्यात  कार्ट आता  पिप्पीच्या बहाण्याने पाण्यात खेळणार म्हणून तिने नामी युक्ती लढवली . पलंगाजवळची खिडकी थोडी उघली .त्याला तिथेच उभे केले आणि सांगितले , " इथूनच कर पिप्पी".   थोड्या वेळाने  उठून  बघते तर .... खिडकी सताड उघडी ...... गजांना खेटून त्याचा आवडता  डंपर उभा आणि शार्दुल  त्याच्याकडे एकटक बघत बसलाय. शार्दुल  खिडकीला व डंपरला हात लावू देईना.   "का नको? "  विचारल्यावर  बोबड्या भाषेत म्हणाला , " अरे माझी झाली ... आता तो  करतोय. डंपर केवढा मोठा असतो माहित आहे ना ?? मग....!  त्याची पिप्पी पण मोठी असणार .... करू दे त्याला  .....  डिस्टर्ब  नको करू ".
     
  ती पोट धरून हसत सुटली.

©️ अंजली मीनानाथ धस्के

मारून_मुटकून_पुणेकर


#मारून_मुटकून_पुणेकर
  #AnjaliMDhaske

  • ©️ अंजली मीनानाथ धस्के      

            आज बऱ्याच वर्षांनी ओळखीचे .... नात्यातले काही पाहुणे घरी आले . त्याचं स्वागत ... चहा पाणी केल्यावर ते म्हणाले .... "पक्की पुणेकर झालीस " ....... मी दचकले आणि विचारले .." का ....काय झालं .....( चहा पोहे तर केले .... खाऊन आलाच असाल असं न विचारता ....  तरी मी पुणेकर 😅)
त्यावर ते म्हणाले " पुण्यात रहायला लागल्या मुळे नाकातून बोलतेय तू"
मी म्हणाले.." असं ..... होय...... मग मी फार कमी दिवसांची पुणेकर आहे" त्यावर ते😱.... "दुसऱ्या गावी बदली झाली की काय तुमची ? " . मी गालातल्या गालात हसत ......" नाही हो काका ....... मला झालेला सायनस लवकरच बरा होणार आहे " .
           विनोदाचा भाग सोडला तर हा गंभीर विषय आहे. विचार करायला गेलं तर पुण्याबद्दल असे अनेक गैरसमज आपण करून घेतो आणि नकळत करून ही देतो .
पुण्याला खूप वैभवशाली इतिहास आहे. खूप परिपूर्ण ....संपन्न असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे . हजरजबाबीपणा, बुध्दीचातुर्य, स्पष्टवक्तेपणा , प्रसंगावधान, शाब्दिक कोट्या करण्यासाठी लागणारे भाषाज्ञान, मराठी भाषेबद्दल असलेले असीम प्रेम , विनोद बुध्दी...... आणि सगळ्यात महत्वाचं " निवांतपणा" हे इथल्या माणसाचे महत्वाचे गुणधर्म.
          या गुणधर्मामुळेच अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत असं मला वाटतं. उदाहणादाखल....... कर्वे रोड वर वेगाने पुढे जाणाऱ्याला "अहो कर्वे .... जरा हळू " असं फक्त पुणेकरच म्हणू शकतो कारण.... निवांतपणा ...... घाई खपवून घेवू शकत नाही. ( वेळेत पोहचायचे आहे तर त्यासाठी घरून वेळेत निघायला हवे..... रस्त्यावर वेग घेवून .. घाई करून फायदा काय . ) दुसरे असे की  ....... त्याच्या वेगाने केवळ त्याचेच नाही तर इतरांचेही मोठे नुकसान होवू शकते ह्याची जाणीव  त्याला कमी वेळात आणि कमी शब्दात करून द्यायची  असल्याने स्पष्टवक्तेपणा, भाषा कौशल्य, आणि प्रसंगावधान हे अंगी असलेले गुण मदतीला धावून येतात. समज देताना कोणत्याही अपशब्दाचा वापर केला जात नाही. उलट 'अहो 'अश्या आदरार्थी संबोधन वापरले जाते.
                  घरी आलेल्या पाहुण्याला "चहा करू का ? " असं विचारले तर त्यात उद्धटपणा नसून स्पष्टवक्तेपणा आहे ..... केवळ एका प्रश्नाने आलेल्या माणसावर असलेला हक्क दिसतो . त्याला "हो.... ठेवा थोडा " म्हणण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते तो ते नाकारून बुजरेपणाने " नाही ... नको " या पर्यायांची निवड करतो.
"हो " उत्तर आले तर पाहुणे बराच वेळ बसणार आहेत , नक्कीच काहीतरी काम आहे पण लगेच कसे सांगावे म्हणून थोडा वेळ हवा आहे ..... आपल्या सारखाच स्पष्ट बोलणे आवडणारा आहे . असे अनेक अंदाज बांधता येतात आणि त्यावर पुढचा संवाद ही साधता येतो. त्याने "नको " असे उत्तर दिले तर ..... त्याचा वेळ  आणि आपली साधन सामग्री ( चहा पत्ती... साखर... दूध) वाया जात नाही. बोलणे आटोपते घेता येते.
यातही येणाऱ्यांची गैरसोय नको ...... त्यांना विचारूनच करावे हा स्वच्छ हेतू.
            आता दुपारची वामकुक्षी.....
          सकाळी  गरमा गरम पोहे खाल्लयावर ... दुपारच्या जेवणाला उशीर होतो ...... जेवण झाल्यावर पचन व्यवस्थित व्हावे म्हणून डाव्या अंगावर झोपावे ( म्हणजे घोरत पडावे असा याचा अर्थ  मुळीच नाही) असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. आयुर्वेद ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे हे कोणीहीअमान्य करणार नाही.
             पण अनेक बारकावे लक्षात न घेता केवळ अनुकरण करण्यामुळे....... पुण्यात रहायला असणारे आणि नव्याने रहायला येणारे असे अनेक लोक हे गैरसमज करुन घेत आहेत. शब्दांचे भान न बाळगता केलेल्या बडबडीला...... अंगी असलेल्या उद्धटपणाला.......... सावरण्यासाठी........." अस्सल पुणेकर बाणा" संबोधने कितपत योग्य आहे.   स्पष्टवक्तेपणाला पुर्णविराम देवुन केवळ आणि केवळ समोरच्याचा अपमान करणे हेच ध्येय ठेवणे म्हणजे ' पुणेकर ' नव्हे. आपली बोली भाषा सोडून केवळ पुण्यात रहायला आलो म्हणून ' ण' चा अतिरेक करणे......."  तुझी आई तुला ओरडेल असं न म्हणता ,. तुला तुझ्या आईचा ओरडा खावा लागेल " असे शब्द प्रयोग करणे म्हणजे पुणेकर नव्हे.
          विनोद बुध्दी आणि स्पष्टवक्तेपणा ....... यांची योग्य जाण असणे म्हणजे पुणेकर . जाती भेदाच्या राजकारणात गुंतून न पडता सगळ्यांसाठीच शिक्षणाचे दरवाजे खुले ठेवून कलागुणांना प्रोत्साहन देतो.... तो म्हणजे पुणेकर. चुकीची गोष्ट खपवून न घेणे म्हणजे पुणेकर ........ त्यासाठी वेळप्रसंगी परखड मत मांडणं म्हणजे पुणेकर ....... मराठी भाषेबद्दल निस्सीम आदर व्यक्त करतो तो पुणेकर ........ मराठी माणूस ही उत्तम व्यवसाय करू शकतो हे सांगणारा पुणेकर ....... इतर भागातली अनेक पदार्थ मोठ्या मनाने स्वीकारून त्यांना पुण्याच्या खाद्य संस्कृतीत ओळख मिळवून देतो तो पुणेकर .... आणि हे सगळं रक्तात भिनलेला ..........'अस्सल पुणेकर' .
   असा अस्सल पुणेकर फक्त पुण्यातच असतो असं नाही तर तो जगाच्या पाठीवर कुठेही असू शकतो. कारण अस्सल पुणेकर ही पुण्यापूर्तीच संकुचित असलेली वृत्ती नसून  उत्तम संस्कार आणि जीवनमूल्ये यातून जन्माला आलेली विचारधारा आहे.
              उद्दामपणा.... उद्धटपणा..... आळशीपणा ( दुपारी ढाराढुर झोप काढणे)...... विनाकारण "अरे" ला "कारे "करणे...... हे सगळं  "अस्सल पुणेकर" या शब्दाला धरून आहे असे मी तरी मनात नाही आणि खपवून ही घेत नाही.
अंगी असलेल्या चांगल्या गुणांचा उत्कर्ष म्हणजे ' पुणेकर ' असं निदान मी तरी मानत आले आहे .
इथे येवुन अनेक वाईट गुण केवळ 'पुणेकर' म्हणवून घेण्यासाठी अंगीकारावे लागणार असतील तर मी इथली फक्त रहिवासी होणे पसंद करेन ...... तथाकथित ' पुणेकर' होणे नाही. 
©️ अंजली मीनानाथ धस्के
    चिंचवड, पुणे



अबोली

   #अबोली
#AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के

                         पूजेला फुले हवीत म्हणून अश्विनी रोज शेजारच्या वाड्यात जात असे. शेजारी राहणारे आजी आजोबा तिला आपली नातच मानत होते. त्यामुळे  ते तिला हक्काने बोलावून घेत व टोपलीभर फुले देत. आजी दहा दिवसांसाठी माहेरी म्हणजे त्यांच्या भावाकडे गेल्या होत्या. आजोबा एकटेच होते घरी म्हणून मग दोन्ही घरच्या पूजेसाठी फुले वेचायचे आणि फोटोसाठी हार करायचे काम  तिलाच मिळाले होते. ती रोजच्यासारखीच फुले वेचत होती.  अबोलीची थोडी फुले घ्यावीत म्हणून तिने हात पुढे केला तेवढ्यात आजोबा मागून आले व म्हणाले , " अबोलीची फुल तेवढी तोडू नकोस, तुझी रागवेल आपल्यावर ". त्यावर ती आश्चर्याने म्हणाली, " का नको? मी रोजच तर ही फुले घेत असते. आजींना फार आवडतात". त्यावर ते म्हणाले, " तेच तर, तिला फार आवडतात अबोलीची फुले. ती रोज त्याचा छोटा गजरा बनवून माळते केसात. तिची फुले आपण पूजेला घेतली तर तिला गजरा बनवता येत नाही मग ती दिवसभर कुरकुर करत असते." असे बोलून त्यांनी आजीची नक्कल करत " एवढी फुल असतांना ...... काय गरज असते अबोलीची फुले तोडायची कुणास ठाऊक. मला मेलीला एक तर आवड आहे अबोलीचा गजरा माळायची पण हे........ मुद्दाम विसरतात आणि पूजेला घेतात सगळी फुले". त्यांनी हुबेहूब आजीची नक्कल केली होती. 
त्यावर ती दोघही खळाळून हसली. 
         आजोबांना चिडवत अश्विनीही  बोलून गेली ,"आजोबा तुम्ही फारच धाकात आहात हं... आजींच्या. त्या घरी नाहीत तरी तुम्ही फुल तोडत नाही आहात. " असे ती म्हणाली तसे आजोबा मिश्किल पणे म्हणाले " तिच्या डाय केलेल्या केसात सुंदर दिसतो गजरा  पण मी मुद्दाम घेतो चार दोन फुले पूजेला. ती लाडीक चिडते, बडबड करते, घर कसं भरल्यासारखं वाटतं. आता ती घरी नाही तर फुले तोडून आणि ती पूजेला घेवून तरी काय फायदा".
           आजी परत आल्यावर त्यांना झाडावर सुकलेली फुले दिसली तेव्हा अश्विनीने त्यांना," आजोबांनी एकही फुल तोडू दिले नाही" अशी कौतुकास्पद तक्रार केली. त्यावर आजी लटक्या रागाने म्हणाल्या, "बघ कसे मुद्दाम त्रास देतात मला. मी नव्हते घरी तर फोन करुन म्हणतात कसे, "अबोलीचे एकही फुल तोडले नाही हं.... तू चिडतेस म्हणून सगळी फुले जपून ठेवली आहेत. आलीस की खात्री करून घेशील". आजींनीही आजोबांची हुबेहूब नक्कल केली असल्याने अश्विनीला कौतुक वाटले.  आजींचे बोलणे सुरूच होते ,"खरं तर त्यांनाच मी अबोलीची फुले केसात माळलेली आवडतात. ही फुले खूपच नाजूक म्हणून मग मी त्यांचा गजरा विणते.गजरा कसला ... सुटी फुले माळता येत नाही म्हणून दोऱ्यात गुंफून छोटा गुच्छ करते इतकंच.
अबोलीच झाड ते केवढं..... त्याला फुलं येतात ती किती ......
बरं मी केसात फुल मळावी हा आग्रह ही त्यांचाच ..... तरी मुद्दाम पूजेला हीच फुले घेतात "
       त्यावर अश्विनी म्हणाली,"  आजी ... तुम्ही चिडावे म्हणून ते मुद्दाम तसे करतात ".  आजी गालातल्या गालात गोड हसल्या व बोलल्या , " मलाही माहित आहे गं, ते गंमत करतात. पूर्वी सासू , सासरे, नणंद, माझ्या माहेरची माणसे, आमची मुले..... यावरून छोटे मोठे वाद व्हायचे. मग काय  धुसफूस, रागवणं, रूसून बसणं, समजूत काढणं, यात दिवस मजेत जायचे. आता एकही कारण नाही संवाद साधायला. जुन्या आठवणी काढत बसायला आम्हाला आवडत नाही तेव्हा अशी फुटकळ कारण काढून लुटूपुटूचे भांडण करतो. दिवस कसा मजेत जातो. उगाच का आजोबा रोज सकाळी अबोलीला आवर्जून पाणी घालतात. मला लागतील तेवढी फुले बाजूला काढून जास्तीची फुले तेवढी पूजेला घेतात. तरी मी दुर्लक्ष करून त्यांच्यावर चिडते, रागावते. मग त्यांनाही बहाणा मिळतो हसण्याचा आणि हळूच केसात फुले माळून माझा  राग घालवण्याचा.  नाव  ' अबोली ' आहे या फुल झाडाचे पण आमच्या संवादाचे .... सुखाचे कारण आहे बघ ".
          
            आज  दोघींच्या या संवादाला दोन वर्षे झालीत.
            आजही अश्विनी सकाळी  फुले वेचायला शेजारच्या वाड्यात जाते. आजही आजी न चुकता आबोलीचा गजरा विणतात. लाडीक तक्रारही करतात, " मुद्दाम मला मागे ठेवून गेलात न ... माझी फजिती बघायला. पण मीही खमकी आहे. सगळं एकटीने करते. अगदी तुम्ही अबोलीच्या झाडाला जसे झारीने हळुवार पाणी घायलायचे तसेच घालते हो... मीही.  बघा फुले कशी टवटवीत आहेेत. हारही किती सुंदर झालाय.  तुमच्या तसबिरीला कसा एकदम खुलून दिसतो".
         अश्विनीचे डोळे पाणावतात. " आजी ... तुम्ही चिडावं म्हणून ते मुद्दाम तसे करतात " असं आज मात्र तिला म्हणवत नाही. धूसर नजरेने ती सुईत दोरा ओवण्याचा निरर्थक प्रयत्न करत राहते.

©️ अंजली मीनानाथ धस्के

          ( हि रांगोळी तळहाता एवढी लहान आहे)

एक व्यथा

 
   #एक_व्यथा         
#AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के
                       आज कावेरी जरा लवकरच उठली होती. खूप दिवसापासून भंगलेली बाल गणेशाची मूर्ती घरामधे तशीच पडून होती. खरं तर घरात जागा नसतांना केवळ मुलांना आवडली म्हणून केवढ्या हौसेने छोटा भीमचे रुप असलेली  गणेश मूर्ती घरी आणली होती. पण आता मात्र रस्त्यावर गर्दी वाढायच्या आत मूर्तीला कुठेतरी ठेवून यावे,  असे तिच्या मनात होते. कामांची घाईही खूप होती. तिने कामांची यादी केली आणि मूर्ती घेवून घराबाहेर पडली. बरेच अंतर गेल्यावरही तिला मूर्ती ठेवायला मनासारखी जागा मिळेना तेव्हा ती फार वैतागली आणि तेवढ्यात तिचा मोबाईल खणखणला. चडफडतच तिने फोन घेतला. पाहते तर आईचा फोन होता. आईला काही बोलायच्या आत तिकडून आईचे रडणे ऐकू आले. "तू ताबडतोब घरी ये " असा निरोप मिळाला. "बरं येते लगेच" म्हणून तिने फोन ठेवला. यादीतली सगळी कामे तिने रद्द केली. आईकडे जायला गाडी वळवली तेवढ्यात तिला मूर्तीची आठवण झाली . घाईतच ती मूर्ती तिने तिथेच एका कट्ट्यावर ठेवून दिली.
          आई अजूनही रडतच होती . रडायचं कारण विचारल्यावर कळलं की, भावाने आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज काल आई तब्येतीच्या तक्रारीमुळे झोपूनच असे. भावाचे घरही तसे छोटेच. दिवाणखाना तर आईच्या पलंगाने आणि औषधाच्या बाटल्यांनी व्यापलेला. घरात सगळे नोकरी करणारे आईकडे बघणारे कोणी नाही. तिच्यासाठी घरात पूर्णवेळ थांबणारी बाई ठेवणे परावडण्यासारखे  नव्हते. हल्ली आईला एकट्याने ठेवणे ही तिच्या तब्येतीच्या दृष्टीने धोक्याचे झाले होते. 
 भावानेही नाखुशिनेच हा निर्णय घेतला होता. तिच्या मानत  विचारचक्र सुरू झाले. 'आपल्याकडे आईला न्यावे तर आपलेही घर छोटेच आहे. घरात वृद्ध सासू ,सासरे, एक नणंद, दोन मुले, नवरा आणि आपण मिळून सात जण राहतो.  त्यात आपलीही परिस्थितीही बेताची आहे.'
 तिच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण झाले होते . त्यांची उत्तर शोधण्याआधी तिला आईला समजावणे, धीर देणे गरजेचे होते. काय बोलावे तिला काहीच सुचत नव्हते. ती पुर्णपणे बधीर झाली होती. तरी तीने धीर केला व आईला म्हणाली , " डोळे पूस बघू आधी , निर्णय घेतला म्हणून लगेच नाही काही नेणार तुला, निघेल काही तरी मार्ग. तू काळजी करू नकोस. मी बोलते दादाशी. देव आहेच की आपल्या पाठीशी. डोळे पूस बघू आणि काही तरी खावून घे बरं आता ."
         तीने मनातल्या मनात  " देवा तुलाच रे काळजी ....... काही तरी मार्ग काढ यातून. सोडव बाबा या संकटातून" असा धावा केला. तशी तीला मूर्तीची आठवण झाली. एक सल काळजात खोलवर  रुतली. डोळ्यात अश्रू दाटले.  तिच्या मनावर प्रचंड ताण आला. तिचं आता कशातच चित्त नव्हतं. ती घाईतच उठली आणि घराबाहेर पडली. आता तिला तिचे बालगणेश परत हवे होते. तीने जिथे मुर्ती ठेवली होती तिथे ती परत आली. 
                पण ...... आता तिथे मूर्ती कुठेच नव्हती..............
होती ती फक्त अपराधी पणाची भावना आणि डोळ्यात दाटलेले पाणी.............


#भंगलेली_मूर्ती_सांगू_पाहे_काही

भंगलेली मूर्ती सांगू पाहे काही.......
नवी कोरी असता देव्हाऱ्यात मांडली...
हात जोडूनी दोन्ही, पुढती माझ्या मानही झुकली.........
केवळ माझ्या दर्शनाने अनेक संकटेही सुटली........
पण........
रंग जरा उडता किंवा
कोपरा एखादा तुटता
नकोशी का होते? अडगळ का वाटली?......
सोडले जरी कडेला अथवा झाडा खाली...
कोणे एकेकाळी देवत्व होते माझ्यातही........
कोणे एकेकाळी देवत्व होते माझ्यातही........

रस्त्याच्या कडेला असलेल्या याच मूर्तीला बघून मनात अनेक विचार आले आणि त्यातून ही कथा  व कविता तयार झाली.

मनात अनेक प्रश्न उभे राहिले .
जिथे रूप संपलं की देवही बेघर होतो तिथे वृध्द आईवडिलांना वृद्धाश्रमात जाण्यापासून रोखणे ... वृद्धाश्रम ही संकल्पना समुळ नष्ट करणे आपल्याला ..... शक्य होईल ?????????
रूढी परंपरा म्हणून किती दिवस आपण असे कुठलाही विचार न करता नदी प्रदूषण करत राहणार आहोत???? निर्माल्य , लाल चूनडी , देवांचे फोटो .... भंगलेल्या मुर्त्या नदीत सोडणार आहोत???
अनमोल अशा नैसर्गिक स्रोतांची हानी करणे कितपत योग्य आहे????
कारण कुठलेही असो .... जिथे वेळ पडली तर देवाला घरा बाहेरचा रस्ता दाखवला जातो.... तिथे माणसांनी माणुसकी जपली पाहिजे अशी ओरड करणे  योग्य ठरेल का????
निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे ... आता आपली वेळ आहे या नैसर्गिक स्रोतांची जपणूक करण्याची तरी "आपण केवळ अनेक वर्षे असेच करत आलो आहोत' ही सबब सांगून चांगले बदल स्विकारणे का टाळतो आहे???
अनेक जणांनी असे बदल स्विकारले तरी अजूनही सर्वानुमते असे प्रयत्न कमी का पडत आहेत????
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची ... शोधलेली उत्तरे सगळ्यांनी अवलंबायची गरज आहे .
तुम्हाला काय वाटते ????

©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
सोबत अगदी साधी सोपी सुंदर रांगोळी ही आहे .

मी काढलेली बाल गणेशाची रांगोळी

रस्त्याच्या कडेला असलेल्या याच मूर्तीला बघून मनात अनेक विचार आले आणि त्यातून ही कथा व कविता तयार झाली.


पाऊस

पाऊस
दिवाळीत ही पावसाला रिमझिम बरसू दे
रांगोळीतले रंग माझे एकमेकात मिसळू दे
तहानलेल्या जमिनीला तृप्त होवू दे
आसमंतात साऱ्या तिचा गंध भरू दे
रिकाम्या या गर्भात तिच्या पाझर फुटू दे
दुष्काळाचे संकट नको आनंद पसरू दे
एक दिवा कष्टकऱ्या च्या घरात ही पेटू दे
घरा घरात फक्त आनंद नांदु दे
फक्त आनंद नांदु दे......
दिवाळीत ही पावसाला रिमझिम बरसु दे......
रांगोळीतले रंग माझे एकमेकात मिसळू दे......

(C) ‌‌सौ. अंजली धस्के






दिवाळी २०१८ ( लक्ष्मी पूजन)

    #AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के

 दिवाळी सण ..... दिव्यांचा
           खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिवे बाजारात विकत मिळतात पण मंदिरात प्रज्वलित असलेला लांबन दिवा मनाला प्रसन्न करतो.
लक्ष्मी देवीला सर्व फुलांमध्ये कमळ अत्यंत प्रिय .... म्हणून तेजोमय कमळ . प्रत्येक घरातली लेक... सून .... ह्या त्या घरची लक्ष्मीच ........ असतात ..... म्हणून कुठलेही दागदागिने न घालता .... ऐश्वर्याची कुठलिही खूण न बाळगता केवळ अापल्या दिव्यत्वाचे तेज ल्यालेली ही देवी ...... समस्त स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करते. साधीच तरीही मोहक .... अशी लक्ष्मी ...तिला  आवडणारे कमळ ..... आणि तिच्या देवत्वाची जाणीव अधोरेखित करणारे लांबन दिवे.
सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा....
©️अंजली  मीनानाथ धस्के





नरक चतुर्दशी (२०१८)

नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा......


धनतेरस/ धन्वंतरी पूजन ( २०१८)

आज धनतेरस ...... आज धन ...सापत्ती  पूजन केले जाते त्या सोबतच चांगल्या आरोग्यासाठी धन्वंतरी देवतेचे पूजन ही केले जाते.
सगळ्यांना उत्तम आरोग्य आणि धन धान्य समृद्धीची दिवाळी जावो हीच सदिच्छा........

मोराचे डिझाइन (दिवाळी २०१८)


मोराचे डिझाइन आणि दिवाळीचा पहिला दिवा
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.........

वाढदिवसानिमत्त ( २०१८)


#RangolionCake
सरप्राईझ.......
सरप्राइज देणं हे वाटतं तितकं सोपं अजिबात नाही .
आपल्याला जे आवडतं ते  सरप्राइजगिफ्ट म्हणून घेवून देणं म्हणजे सरप्राइज  नक्कीच नाही .
समोरच्याला काय हवं ते जाणून घेणे ..... त्याला काय आवडतं ते समजून ... त्यानुसार सरप्राइजगिफ्ट निवडणे .... या साठी ..... आपण त्या व्यक्तीला किती परफेक्ट ओळखतो हे फार महत्त्वाचे ठरते आणि नेमके हेच गणित नारोबाला लागू होत नाही . ऑफिस मधून घरी आल्यावर .... " तुला कसं कळलं आज मला .... हाच मेनू खायची इच्छा झाली होती ...... तू अगदी मनकवडी आहेस " असं दिलखुलास पणे सांगतो पण आपला वाढदिवस असला की तो मात्र कधीच " मनकवडा " होण्याचा प्रयत्न करत नाही . ( माझ्या मनात एकाच वेळी इतके विचार सुरू असतात की त्याला माझे मन ओळखणे अवघड जात असावे .,😅)
        दोन महिने आधीपासून जरी मी त्याला आडून आडून सांगितले की मला घड्याळ हवे आहे . ऑनलाईन शॉपिंग.... करण्याचे हजार ऑप्शन्स दाखवले ...... T.V. वर येणाऱ्या जाहिराती आवर्जून दाखवल्या ....... मॅकझिन मधले फोटो दाखवले ..... अगदी दुसऱ्या बाईच्या हातातली घड्याळ 'किती छान आहे न ' असं म्हणून दुसऱ्या बाईकडे ( हातातील घडयाळ😩) बघण्याची परवानगी दिली........ तरी त्या कडे दुर्लक्ष करून तो वाढदिवसाच्या दिवशी माझ्यासाठी माझ्याकडे ज्या कलर ... पॅटर्न .. असलेल्या पर्स आहेत ... त्याच्याशी मिळती जुळती पर्सच सरप्राइजगिफ्ट म्हणून देतो. आपलेच प्रयत्न कमी पडलेत असं म्हणून😂 ...... " पदरी पडले .... पवित्र झाले" मानून गप्प बसते.
          पण या वेळेस ठरवलं ... तो समजून घेईल हा योग येईल तेव्हा येवो ...... आपण स्पष्ट सांगून मोकळे व्हायचं.  आपण स्वतः च स्वतः ला काय हवं .... काय आवडतं हे परफेक्ट सांगू शकतो ..... त्यासाठी इतरांची बुध्दी आणि पर्यायाने आपला वेळ का वाया घालवायचा.
          या वेळेस ठरवलं स्वतःच स्वतःला हवं ते सरप्राइजगिफ्ट द्यायचं.
          प्रसंग छोटा असो वा मोठा असो मी रांगोळी काढतेच  कारण रांगोळी काढतांना  मला निखळ आनंद होतो. तरी  आपणच आपल्यासाठी रांगोळी काढायची जरा अतीच वाटल आणि अचानक मनात आल की असं काही तरी करायला हवं जे करण्यात मला आणि त्याचा उपभोग घेताना इतरांना आनंद येईल. ........ केक .... मुलाला खूप आवडतो .... ठरल केक करायचं .....पण मी केक बनवण्यात जेमतेम आहे. त्यातही आइसिंग करणे म्हणजे एक दिव्यच.
           मला रांगोळी काढायला आवडते . मला या रांगोळी ने एक नवीन ओळख दिली. माझी आठवण येणाऱ्यांना आधी माझी रांगोळीच आठवते . तेव्हा माझ्या वाढदिवसाच्या केक वर रांगोळी असायलाच हवी आणि तेही मी काढलेली . हे मनाने पक्क केलं .
           काम सुरू झाले .... ६ ते ६ थेंबाची रांगोळी आणि रांगोळी भरलेली छोटी भांडी  केक वर काढायचा प्रयत्न सुरू झाला..... वेळ कसा गेला काहीच कळले नाही . मदतीला मुलगा होताच . मी चुकले तर तो लगेच म्हणायचं " अरे राहुदे काही होत नाही ..... रांगोळी काढतांनाही तर थोडी रांगोळी सांडतेच ..... एकदम परफेक्ट केली की साच्यातून काढल्या सारखी वाटेल न ..... जे चुकतंय ते तसच ठेव .... त्याने अजून छान दिसतोय केक ..... अगदी तू केल्या सारखा वाटतो ."
          मग काय जे जसं जमल तसचं ठेवलं ......
          माझ्या रांगोळीला केक वर विराजमान झालेलं बघून मुलगा आणि नवरा एकदम खुश....... आता ही रांगोळी खाताही येणार आहे याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता.
             ' एका दगडात दोन पक्षी मारले' या आनंदात मीही हरखून गेले.
(C) Anjali M. Dhaske






कोजागिरी पौर्णिमा(२०१८)

      कोजागिरी पौर्णिमे निमित्त काढलेल्या रांगोळ्या

             पूर्ण चंद्र बघून मन मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही . बालपणी चांदोबा... चंदामामा... अशी त्याची ओळख करून दिली जाते. तारुण्यात याच चंद्रा मधे आपण आपल्या भावी जोडीदाराचे रुप शोधू पाहतो. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राला पाहून .... त्याच्या शीतल प्रकशात मन चिंब भिजते... चंद्राला पाहून जशी समुद्राला भरती येते तशीच माझ्या मनातील भावनांना ही भरती येते....सृष्टी  निर्माण कर्त्याला माझे शतश: नमन ......चंद्रावर असलेल्या प्रेमासाठी........ चंद्रालाच समर्पित.........
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या..........


चंद्र पौर्णिमेचा (२०१८)

       पूर्ण चंद्र बघून मन मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही . बालपणी चांदोबा... चंदामामा... अशी त्याची ओळख करून दिली जाते. तारुण्यात याच चंद्रा मधे आपण आपल्या भावी जोडीदाराचे रुप शोधू पाहतो. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राला पाहून .... त्याच्या शीतल प्रकशात मन चिंब भिजते... चंद्राला पाहून जशी समुद्राला भरती येते तशीच माझ्या मनातील भावनांना ही भरती येते.... शब्दरुपी लाटांनी मन व्यापून जाते. नशेत व्यक्ती आपली मातृभाषा सोडून इतरही भाषा आत्मविश्वासाने बोलते अगदी तसेच मंद शीतल चंद्रप्रकाशाची नशाच अशी आहे की ...... माझे मन ही शायराना झाले.  हिंदी भाषा .... माझा प्रांत नाही तरी प्रेमात सगळे  माफ असते. चंद्रावरच्या प्रेमासाठी ...... चंद्राला समर्पित.........

दसरा(२०१८)

 #पाटी पूजन       

           दसरा  म्हंटल की आठवण येते ती शाळेतल्या पाटी पूजन सोहळ्याची . काळीशार दगडी पाटी ..... ती वापरून पांढरट पडली असेल तर त्यावरती कोळसा घासून तिला पूजनासाठी मस्त काळ कुळकुळीत करायचं.... मग त्यावर सुबक असे सरस्वतीचे चिन्ह काढायचे ..... मनोभावे पूजन करायचे . वय वाढत गेले आणि हातातली पाटी सुटली. पण आजही पाटी दिसली की त्यावर लेखणीने लिहिण्याचा मोह टाळता येत नाही. बालपणाशी नाळ जोडणारी हि पाटीच आज रांगोळीत रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर सरस्वती आणि महासरस्वती ची सुबक चिन्हे ही रेखाटली आहे. अगदीच साधी सोपी रांगोळी तरीही मनाच्या एका कोपऱ्यात विशेष स्थान असणारी......
            दसऱ्याच्या सर्व वाचकांना खूप खूप शुभेच्छा.......... सरस्वती देवीची तुम्हां आम्हां वर अशीच कृपा राहो हीच इच्छा...

नवरात्र उत्सव (२०१८ )

                   नवरात्र..... नऊ रंग....
हा उत्सव स्त्री शक्तीचा ..... हा उत्सव रंगांचा....
प्रत्येक रंग हा  देवीच्या  एका रूपाशी निगडीत आहे. प्रचंड उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा असलेला हा सण आहे. कपालिनी देवीच्या ह्या काळ्या सावळ्या रूपातील चेहऱ्यावर असलेल्या दिव्य तेजाने आणि मंद स्मित हास्याने माझे मन भक्ती रसात न्हावुन निघाले...... नतमस्तक झाले.
प्रत्येक दिवसाप्रमाणे रंगांचा क्रम ठेवून बोर्डर केलेली आहे.
       सर्व वाचकांना नवरात्र उत्सव निमित्त खूप खूप शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी (२०१८)

         श्री  गणेश चतुर्थी निमित्त काढलेली रांगोळी. गणेशाची सगळीच रुप मनमोहक असतात. बाल गणेशाचे रूप हे विशेष लोभसवाणे दिसते. म्हणूनच बाल गणेशाची रांगोळी काढण्याचा माझा हा प्रयत्न........
सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा......




स्वातंत्र्य दिन (१५/८/२०१८ )

        रंग नसते तर किती कंटाळवाणे आयुष्य असते. रंग हे कोणा एका समूहाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. काय होईल जेव्हा रंगांना  ही जात... धर्म या गोष्टीची लागण होईल. जाती चे कारण सांगून जर रंग ही राजकारण करायला लागली तर???   शेतातुन हिरवा रंग निघून गेला तर .......  उगवत्या सूर्याचा जो रंग सृष्टीला  सचेत करतो .... तो भगवा रंग निघून गेला तर ........   पाणी, आकाश यांनी निळा रंग नाकारला  तर ...... तर काय होईल?????
          आपला तिरंगा..... यात तिन्ही रंगाचा समतोल आहे....... त्याचा अभिमान आहे. पण हाच समतोल मात्र प्रत्यक्ष जीवनात हरवतोय......
                  लहानपणी वाचलेली एक गोष्ट...... सगळ्या फुलांमधे आपापल्या रंगामुळे श्रेष्ठ कोण?.... असा वाद होतो. त्यावर निसर्ग  देवता निवाडा करते...... ' आज रात्री पाऊस पडेल...... उद्या ठरेल कोण श्रेष्ठ? '  पाऊस पडणार..... आपला रंग जाणार म्हणून सगळी फुले रात्र झाली की, स्वतःला मिटून घेतात. त्यांना त्यांचा रंग जपायचा असतो. काही फुले निसर्ग देवतेवर विश्वास ठेवतात... ती जे करेल ते सर्वोत्तम असेल.... असे मानून पावसाच्या स्वागतासाठी उमलुन तयार राहतात. पाऊस पडतो. प्रत्येक फुल पावसात न्हाऊन निघते. मिटलेल्या फुलांना काहीच होत नाही. तर उमललेल्या फुलांचा रंग निघून जातो. दुसऱ्या दिवशी सूर्याची चाहूल लागली तशी सगळी फुले जागी होतात.  जी फुलं पावसात भिजली त्या शुभ्र फुलांवर हसतात. आपण स्वतःला मिटून ठेवल्यामुळे  आपले श्रेष्ठत्व कसे टिकले याची बढाई मरतात. शुभ्र फुलं उदास होतात. तेवढ्यात  तिथे निसर्ग देवता येते. सगळे विचारतात,' सांग कोण आहे आमच्यात श्रेष्ठ? '  ती हसते आणि सांगते," आसमंतात एक अदभुत सुगंध पसरलेला जाणवतो आहे? .... ह्या  सुगंधाचे धनीच  श्रेष्ठ आहेत.  कालचा पाऊस हा तुमचे रंग जरी घेवुन जाणार  होता पण त्या मोबदल्यात तुम्हाला अदभुत सुगंध देणार होता. क्षणिक सौंदर्याचा मोह  त्याग केल्यामुळेच  सुगंधी फुले अत्तर रूपाने अमर होतील. म्हणून ही शुभ्र फुलेच श्रेष्ठ आहेत. "
         शुभ्र फुले आनंदी झाली तर इतर फुले खजील झाली. त्यांना आपली चूक कळली. रंगात गुरफटलो म्हणून अमरत्व.... श्रेष्ठत्व गमावले.
     आपले ही अगदी असेच होत आहे.......
              अंगावर शुभ्र कपडे घालून ही आपण शांतिदूत होवू शकत नाही......  त्या रंगाची सात्विकता आपल्या मनापर्यंत झिरपतच नाही. कारण आपण बघतो तो फक्त रंग....... त्याच्या अंतरंगी असलेले भाव आपण जाणून घेतच नाही. रंगांचा जसा समतोल आपल्या तिरंग्यात आहे. तसाच तो आपल्या समाज जीवनातही राखायला हवा.

              समतोल रंगांचा
              शान तिरंग्याची
              हिच गुरुकिल्ली
              सुदृढ समाजाची

(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के
  चिंचवड,  पुणे  ३३

दर्श अमावस्या (२०१८ ) / दीप अमावस्या

            आजपासून हिंदू सणांना सुरूवात होते. आज दिव्यांचे पूजन करायचे असते. कुठलाही सण हा दिवे आणि रांगोळी या शिवाय पूर्ण होवुच शकत नाही. दिवा  सोन्याचा, चांदीचा, पीतळेचा, तांब्याचा किंवा मातीचा कुठलाही असो तो अंधार नष्ट तर करतोच पण त्याची प्रज्वलित झालेली ज्योत मनाला सकारात्मक ऊर्जाही देते. " तिन्ही सांजेला देवाजवळ बसावं " हे सांगितले जाते ते या साठीच..... कीतीही विचार,चिंता डोक्यात असतील तरी प्रज्वलित ज्योत बघितली की मन शांत..... तृप्त होत.
     तेजस्वी  दिव्याला माझा नमस्कार.....  ' तिमीरातुनी तेजाकडे...प्रभू ने आमुच्या जीवना ' हे एकच मागणे.


रोजच्या वाराप्रमाणे काढायच्या रांगोळ्या

             फार पूर्वी जेव्हा  रोज काढायच्या रांगोळीचे तयार साचे मिळत नव्हते तेव्हा माझी आई हाताने त्या रांगोळ्या काढायची. आजही ती या रांगोळ्या हातानेच काढणे पसंत करते. हाताने काढलेल्या रांगोळीची सर तयार साचे वापरून काढलेल्या रांगोळीला येत नाही असेच तिचे मत आहे. तिला ते छोटे छोटे साचे वापरणे क्लेश दायक वाटते. सवईने हाताला वळण लागले आहे तेव्हा हाताने लवकर काढून होतात या रांगोळ्या असे तिचे म्हणणे असते. असो.....
तर वारा प्रमाणे काढायच्या रांगोळ्या  इथे देत आहे. फक्त मंगळवार ( Tuesday ) च्या दोन रांगोळ्या आहेत. एक मंगळवारची आणि एक ' राहू ' ची.
तसेच शनिवारी ( Saturday ) ही दोन रांगोळ्या काढायच्या आहेत. एक शनिवारची आणि एक ' केतू ' ची  यातील प्रत्येक रांगोळीला, तिच्या आकाराला व त्यातील शब्दाला विशेष असे महत्व आहे. रंग तुम्हाला हवे ते वापरा किंवा नका वापरू.... त्याचे बंधन नाही. तुम्हालाही हाताने रांगोळी काढायला आवडत असेल तर नक्की काढून बघा..... या सर्व रांगोळ्या. 
        श्री गणेशा ने सुरुवात होते म्हणून गणपती ची खास रोज काढण्याची रांगोळी ही इथे देत आहे.


सोमवार 

मंगळवार 

राहूची रांगोळी 

बुधवार 

गुरूवार 

शुक्रवार 

शनिवार

केतूची रांगोळी 

रविवार 


एकादशी(२३/७/२०१८ )

हि रांगोळी अगदी साधी रांगोळी तरी सुंदर दिसते.
विठ्ठलाचा टिळा रांगोळीच्या मधोमध काढून त्या भोवती अगदी सोपी फुल काढली आहेत.

कोलम : थेंबांच्या रांगोळीचा एक प्रकार

   या रांगोळया जर पायरी पायरी ने समजुन घेतल्या तर काढायला सोप्या वाटतात. नेमक्या कोणत्या थेंबांच्या भोवती गिरक्या  घ्यायच्या आहेत, कोणत्या थेंबांना टाऴुन पुढे जायचे आहे, हे एकदा समजले की.... रांगोऴी पूर्णत्वाला जातांनाचा प्रवास  एक वेगळीच अनुभूती देवुन जातो. या रांगोऴीमुळे  बुद्धिला भरपूर खाद्य तर मिऴतेच परंतु पूर्ण झालेली रांगोळी बघतांना मिऴणारा आनंद शब्दात सांगता येत नाही.

                           तयार रांगोळी 

पायरी क्र. १

                         पायरी क्र. २



पायरी क्र. ३



                        पायरी क्र. ४


पायरी क्र. ५
                     
                         
                         पायरी क्र. ६

                        पायरी क्र. ७

                       पायरी क्र. ८


                       पायरी क्र. ९