कामिनी (भाग ८)

#कामिनी
#भाग८
©️अंजली मीनानाथ धस्के



    आईबाबांना बघून श्रेया सगळ्याच चिंता, भीती विसरली.
      आज सुट्टी घेऊन आईबाबांसोबत घरीच वेळ घालवावा असं तिच्या मनात असतांना ऑफिस मधून फोन आला. तिला ताबडतोब बोलावून घेतलं होतं.
          काय झालं असावं याचा विचार करतच ती ऑफिस मधे पोहचली. ऑफिसमधे सगळे अगदी रोजच्या सारखी कामं करत होते. स्वतःच्या केबिनकडे जाता जाता तिने सरिता मॅडम ला विचारलच ," कशाला बोलावून घेतलं आहे मला इतक्या तातडीने ?" त्यांना तिच्या बोलण्याचा रोख न कळल्याने त्या काहीच न बोलता तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिल्या. तिनेही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि केबिनचा दरवाजा ढकलला
      तिच्या केबिनमधे  एक वृद्ध बसलेले तिला दिसले. तिने त्यांच्या येण्याचे कारण विचारले असता त्यांनी तिला सांगितले ते असे की,"माझं नाव सदाशिव खरात असून तुमच्या पोस्ट ऑफिसचा शिक्का असलेला एक पत्र मला मिळालं आहे. यात माझ्या मुलीच्या जीवनात खूप आनंदाचा क्षण लवकरच येणार आहे. त्यासाठी मी काही दिवस इथे तिच्याकडे येवुन रहावं अशी तिने मला गळ घातली आहे. परंतु तीन चार महिन्यांपासून  मुलीचा आणि माझा काहीच संपर्क झाला नाही. ती या गावातून अचानक गेल्यानंतर मी पोलिसांच्या मदतीने तिचा खूप शोध घेतला. ती रहात होती तो बंगलाही मालकाने रिकामा करून मागितल्याने मी तिचं सगळं सामान तिथून स्वतःच्या गावी नेलं. इतके दिवस कसलीच खबर मिळाली नाही आणि काल अचानक मला तिचं हे पत्र मिळालं.  ती इथे भेटेल. कोणता आनंदाचा क्षण तिच्या आयुष्यात येणार आहे हे सांगेल या  आशेने तिचा शोध घेतं पुन्हा येथे आलो आहे."
श्रेया म्हणाली," मी काय मदत करावी असं तुम्हाला वाटतं आहे."
ते म्हणाले," तुमच्या इथे कोणी ही चिठ्ठी  टाकतांना तिला बघितलं असेल तर मदत होईल"
श्रेया सहज बोलली, " रोज इतके लोक येतात कोणा कोणाचे चेहरे लक्षात राहतील .... पण तुम्ही स्टाफ ला भेटून खात्री करून घेवू शकता".
     तिच्या बोलण्याने सदाशिव खरात हवालदिल झाले. त्यांची ती अवस्था बघून श्रेयाला तिच्या वडिलांची आठवण झाली. सांत्वन करण्यासाठी तिने त्यांना एका खुर्चीत बसवलं. पाणी प्यायला दिलं. ते पाणी पीत होते इतक्यात त्यांनी टेबलावर ठेवलेल पत्रं श्रेयाला दिसलं .
त्यावरचा  सदाशिव खरात, ४७, कणकवाडी , वलगाव , अमरावती . हा पत्ता तिला दिसला . तिला लगेच आठवलं काही दिवसापूर्वी आपणच या पत्रावर तिकीट लावायला सांगून पोस्ट केलं होतं.  पत्रा खाली ठेवलेला फोटो बघून तर ती त्या फोटोच्या डोळ्यात बघतच राहिली. खूप ओळखीचे डोळे वाटले तिला.
   ती फोटो निरखून बघते आहे म्हंटल्यावर सदाशिव खरात यांनी तिला विचारले " तुम्ही कुठे पाहिलं आहे का माझ्या मुलीला? "
श्रेयाने सांगितलं ," नाही .... पण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय , नाव काय आहे यांचं ?"
त्यांनी सांगितलं ," कामिनी खरात "
श्रेयाला कामिनी नाव ऐकताच स्प्रिंगच्या बाहुलीची आठवण झाली. त्या बाहुलीचे छोटे छोटे डोळे अगदी फोटोतल्या कामिनीच्या डोळ्यासारखे दिसत होते याची जाणीव होवून तिच्या मणक्यातून  भीतीची लहर गेली.  तिने पट्कन तो फोटो स्वत:च्या हातातून टेबलावर ठेवला.
      हिंमत करून तिने विचारलंच ," या कामिनी खरात इथे रहायला कुठे होत्या ?" सदाशिव खरात यांनी श्रेया सध्या रहात असलेल्या बंगल्याचाच  पत्ता तिला सांगितला.
श्रेयाला आश्चर्याचा धक्का बसला होता इतक्यात त्या पत्रा मागच्या बाजूला आकर्षक अक्षरात लिहिलेलं ' कामिनी ' बघून अगदी असच कामिनी लिहिलेलं  तिने या आधी कुठे तरी पाहिलं होतं. कुठे ते काही केल्या तिला आठवेना.
     इतक्यात तिच्या केबिनमधे तिच्या स्टाफचा चपराशी चहाचा एक कप घेवून आला. त्याने तो कप तिच्या पुढे ठेवला आणि जायला निघाला तशी ती त्याला जरा रागातच बोलली ," माझ्या केबिनमध्ये गेस्ट असतांना तू एकच चहाचा कप का आणला ? जा अजून एक कप चहा घेवून ये".
    तो कवरा बावरा झाला," लगेच आणतो " म्हणत केबिनच्या बाहेर पडला. सदाशिव खरात यांच्यासाठी चहा आणल्या गेला नाही म्हणून तिने आपला कप त्यांच्यापुढे ठेवत बोलली ," काय योगा योग आहे... मी या गावात नवीन आहे.
सध्या मीही याच बंगल्यात रहाते आहे." ती हे बोलत होती पण तीच सगळं लक्ष ' कामिनी 'अक्षरावर खिळलं होतं. तितक्यात तिला  आठवलं हे अक्षर तिने तिच्या घराच्या वरच्या खोलीतील पेटीतल्या एका पत्रावर बघितलं होतं. पेटीतल ते पत्र यांच्या कडे कसं आलं?  भीती , उत्कंठा अशा संमिश्र भावना तिच्या मनात निर्माण झाल्या . तिला आता घाई लागली होती घरी जावून ती पेटी उघडून बघण्याची आणि ते पत्र त्या पेटीत आहे की नाही याची  खात्री करून घेण्याची.
     ती  सदाशिव खरात यांना उद्देशून म्हणाली , " मी त्या घरात रहायला आले तेव्हा कामिनी ताईंची एक पेटी तुम्ही तिथेच विसरून गेला होता ती आम्हाला मिळाली. तुम्ही आलाच आहात तर माझ्या घरी चला आणि ती पेटी तुमच्या ताब्यात घ्या. "
       खरं तर मुलगी मिळत नाही आहे याची निराशा इतकी होती की तिची पेटी घेवून काय करायचं असं मत सदाशिव खरात याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं . पण श्रेयाने समजावलं की, त्यातील सामनातून कामिनी सध्या कुठे आहे याचा काही अंदाज लागला तर  तिचा शोध घ्यायला मदतच होईल. ते लगेच श्रेयासोबत तिच्या घरी जायला निघाले.
श्रेया मॅडम आल्या तशा जायला निघाल्या म्हणून तिथल्या स्टाफ ला आश्चर्य वाटलं. पण आज एकंदरीत तिचे वागणे बघून तिची तब्येत बरी नाही म्हणून तिला कोणी ही अडवल नाही.
       घराकडे जातांना अचानक सदाशिव खरात यांनी तिथल्याच जुन्या बस थांब्यावर  श्रेयाला थांबवलं. त्यांनी परतीच तिकीट काढून ठेवलं असल्याने त्यांना तिच्या घरी येता येणार नव्हतं. बस यायला वेळ आहे तोपर्यंत जर श्रेया ती पेटी घेवून आली तरच त्यांना ती त्यांच्या सोबत नेणं शक्य होतं. श्रेयाला काही करून ती पेटी त्यांना द्यायची होती. तिने लवकरच पेटी घेवून येण्याचं आश्वासन दिले. ती पेटी आणायला निघाली तेव्हा ते तिला म्हणाले ," तुला त्रास देतोय पोरी पण तू वेळेत पेटी आणलीस तर मला माझ्या पोरीची भेट झाल्याचा आनंद होईल " त्यांच्या डोळ्यातली पोरीच्या भेटीची ओढ बघून ती तडक घराकडे निघाली.

    इकडे श्रेयाच्या घरी तिचे बाबा घराभोवतीची बाग बघायला गेले असतांना मागच्या बाजूला  असलेल्या गुलाबांच्या वाफ्यात  भिंतीजवळ स्प्रिंगची बाहुली दिसली. ही बाहुली अशा अवस्थेत होती जणू ती खूप थकून गुडघ्यात डोकं घालून बसलेली आहे. ते त्या बाहुलीलाकडे आकर्षित झाले.
 त्या बाहुलीला घेण्यासाठी ते तिच्या जवळ गेले. तिच्या जवळ जाताना त्यांना गुलाबाचे काही काटे टोचले. काट्यांनी ओरबाडल्या गेलं, थोड रक्त ही आलं पण  बाहुलीला उचलून घेण्याच्या नादात त्यांच्या ते  लक्षातही नाही आलं.


क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे.
साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1






No comments:

Post a Comment