श्री गणेशा

#श्रीगणेशा
#सुखकर्ता
#विघ्नहर्ता
#अधिपती
©️ अंजली मीनानाथ धस्के
   आज इंद्राने तत्काळ बैठक बोलावली होती.  सगळे देव, यक्ष, गंधर्व, किन्नर गोंधळून गेलेले होते. तेवढ्यात जमलेल्या सगळ्यांवर वरूण देवाने सॅनिटायझरचा पाऊस पडला . वायू देवाने सगळ्यांना कोरड केलं. विश्वकर्मा याने सगळ्यांना मास्क आणि हँड ग्लोजचे वाटप केले.
     दरबारात  इंद्र देवाचे आगमन झाले. आजच्या चर्चेचा विषय गंभीर होता. 
     कोरोना नावाच्या दानवाने पृथ्वीवर थैमान घातले होते.
     विष्णुदेवाने वरूण देवाला पृथ्वीवर अवकाळी पाऊस पाडण्यासाठी  कारणे द्या अशी नोटीस पाठवली होती. तर ब्रम्ह देवाकडून यमाच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले होते.

 कोरोनामुळे मृत्यू मुखी पडलेले अनेक मनुष्य प्राणी स्वर्गात आणि नरकात दाखल होत होते. त्यांना इतर लोक सामावून घ्यायला तयार नव्हते . त्यांची वेगळी सोय करण्यात यावी अशी मागणीही केली जात होती.
धन्वंतरी  देवावर कामाचा ताण वाढत होता. यमाला उसंत घ्यायला वेळ मिळतं नव्हता.
सगळे देव आपापली कामे व्यवस्थित करत असूनही पृथ्वीवर मात्र काहीच सुरळीत सुरू नव्हतं
          चित्रगुप्त ही पुरता गोंधळलेला होता. सगळ्या मनुष्य प्राण्यांच्या आयुष्याच्या हिशेबात मृत्यू चिन्ह गंडांतर योग लिहिला होता. पण यात एकच मेख होती . जो कोणी स्वतःची, समाजाची  स्वच्छता पाळत नसेल आणि मुक्त भ्रमण करेल त्यालाच शोधून मृत्यु पाश आवळायचे असाच यमाचा हुकुम होता.
         सगळ्यांचे पालनपोषण करणाऱ्या विष्णु भगवंताला मोठीच काळजी लागून राहिली होती. जितके ते जगरहाटी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत तितकेच इतर देवांच कामकाज नियंत्रणाबाहेर जावू लागले होते.
     धन्वंतरी देवाने तर संशोधनाच्या मदतीने मनुष्याला अमर करण्याचा चंगच बांधला होता. त्या संशोधनातूनच हा नवीन दानव जन्माला आला होता आणि  बघता बघता या कोरोना दानवाने संपूर्ण पृथ्वीला विळखा घातला होता. मानवाने त्याच्याशी दोन हात करायची तयारी सुरू केली न केली तोच आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी यमही कोणत्या ना कोणत्या मार्गाने पृथ्वीवर प्रवेश करू लागला . कुठे आग लागली, कुठे भूकंप, कुठे अती वृष्टी,  कुठे विषारी वायू गळती  तर कुठे मोठं मोठे अपघात घडू लागले.
        मृत्यूचा दर येवढा वाढू लागला की ब्रम्ह देवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला.

       महादेव मात्र हिमालयाच्या शिखरावर शांत... ध्यानस्थ बसून होते.
    गेली अनेक वर्षे मानवा प्रमाणेच देवांचाही मुजोर, भ्रष्ट आणि मनमानी कारभार सुरू होता. सत्यापेक्षा, कर्तव्यापेक्षा अहंकार मोठा झाला होता. पुन्हा एकदा देवांमधे स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू झाली होती.
          म्हणूनच की काय कोरोना दानवा विरूद्ध एकजुटीने लढण्या ऐवेजी वरुण देवताही वाटेल तेव्हा पाऊस पाडत होता. नदी नाल्यांना पूर आणत होता. सागर देवता ही त्याचीच री ओढत भरती अहोटीचा खेळ खेळत होता. वायू देवताही स्वतः चे महत्व सिद्ध करण्यासाठी वेगवान वादळे निर्माण करत होता. सूर्य देवही  तप्त तापून सुरू असलेल्या चढाओढीत त्याची दखल घ्यायला भाग पाडत होता.
       
महादेवाने समजावू पाहिलं होतं पण स्पर्धेच्या नादात  सत्तेचा उन्मत्तपणा, अहंकार  सगळे बाळगून होते. स्वतःची कर्तव्ये विसरून सत्ता मिळवण्याची हाव करत होते.
त्यामुळे  ' जे जे होईल ते ते पहावे ' अशीच भूमिका महादेवाने घेतली होती.
     
           कोरोना दानव महा ताकदवर झाला होता. कोणाचेच त्याच्यावर नियंत्रण नव्हते. त्याच्या दहशतीने भूतलावरील सगळे व्यवहार ठप्प झाले होतेच पण आता स्वर्ग लोकातही त्याची भीती पसरली होती.
       पृथ्वीवरील अनेक मनुष्य प्राण्यांनी देवतांना साकडे घातले, नवस बोलले, अभिषेक केले . काहींनी देवांना पाण्यात ही ठेवले होते. पण या महाकाय दानवापुढे कोणाचेच काहीच चालत नव्हते. सध्यातरी त्याला हरवण्याचा उपाय म्हणून घरातच राहण्याचा  सल्ला दिला जात होता. सगळे व्यवहार थांबले होते.  परंतु भुकेला थांबवणं कठीण . हातावर पोट असणारे देवांनाच दुसणे देत होते.  संयम सुटत चालला होता.  देवावरची श्रद्धा ढळू लागली होती. काळ मात्र कोणासाठी थांबायला तयार नव्हता.
     एकाबाजूला  देवांकडे रोज नव नव्या तक्रारींचे ढीग येवुन पडत होते. नव नवीन संकटे उभी रहात होती तर दुसऱ्या बाजूला कोरोना दावन पृथ्वी भोवतीचे त्याचे फास आवळतच होता.  देवांना वर्क फ्रॉम होम करणे अशक्य असल्याने त्यांनी वेश बदलून  कोरोना योध्यांच्यारुपात काम सुरू केले होते. येवढं करून  मानव त्यांचीही विटंबनाच करत होता. एकीकडे मूळ  देव रूपाला मंदिरात कैद केल्या गेले होते तर दुसरीकडे कोरोना योध्याच्या रुपात ही देवांच्या  प्राणांवर  बेतत होते. इकडे आड तिकडे विहीर अशीच सगळ्यांची अवस्था झाली होती.
    इंद्राच्या बैठकीत सगळेच देव हवालदिल झालेले होते. 
     
सगळे फक्त आपल्या तक्रारी सांगत होते. प्रत्यक्षात मात्र  कोणीच कोणाला सहकार्य करत नव्हते. आलेल्या अडचणींवर मात करण्याचा उपाय कोणाकडेच नव्हता.
   तेवढ्यात नारद मुनींनी सुचवले ,"  सगळ्यांनी या संकटाचा मुकाबला करण्यासाठी महादेवाचा धावा करावा. ते देवांचेही देव आहेत. ते या संकटावर नक्कीच उपाय सुचवतील "
       
        सगळ्यांनी लगेच  नारद मुनींचे म्हणणे
 मान्य केले. सगळे ताबडतोब हिमालय शिखरावर पोहचले. शिवाला ध्यानस्थ बघून आवाज देण्याची  कोणाचीच हिंमत होईना.
 अखेर इंद्राच्या आग्रहाखातर ब्रम्हदेव आणि विष्णुदेव यांनीच सगळ्यांची अडचण महादेवापुढे  मांडली.
     
    महादेवांनी कोरोना दानवापासून  पृथ्वीचे रक्षण  करावे अशी सगळ्यांनी मागणी केली.
       महादेवाने मंद स्मित केले.
         सगळे महादेवाला विनंती जरी करत होते तरी प्रत्येक जण आपापल्या परीने आल्या संकटाचे "देवकारण" करू पहात होता. या संकट काळी एकत्र येऊन लढण्यापेक्षा दुसऱ्याला कमी लेखून स्वतःच वर्चस्व सिद्ध करण्याची संधी शोधत होता.
     खरं तर हे युद्ध कोरोना नावाच्या दानवाविरूद्ध जितकं होतं तितकंच ते स्वतःच्या अहंकराविरुद्धही होतं. कोरोना नावाचा दानव मुळात शक्तिशाली नव्हताच. त्याला प्रत्येकाने स्वतःच्या अहंकाराचे खतपाणी देवून मोठे केले होते. त्यामुळे  कोणा एकाच्या प्रयत्नाने तो नष्ट होणं केवळ अशक्य  झालं होतं. आता  तो दानवच सगळ्यांच्या नाड्या आवळत होता.
   
    महादेवांना जाणीव झाली की,  या सगळ्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्याची वेळ आली आहे.  प्रत्येकाने कितीही मनमानी कारभार केला तरी. आजही देवांचा अधिपती गणेशच आहे.  जग हितासाठी गणेश जे करेल तेच सर्वोत्तम असेल असा विश्वास प्रत्येकाने बाळगायला हवा.
 प्रत्येकाच्या अहंकाराने मोठ्या झालेल्या  कोरोना दानवाविरूद्ध एकट्याने लढण्यात काहीच अर्थ नाही.   सगळ्यांनी एकजुटीने त्याचा सामना करणे आवश्यक आहे सगळ्यांनी आपल्या पदापेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्यायला हवे
आणि कर्तव्याच्या या लढाईला एक उत्तम नेतृत्वाची गरज आहे .
        शेजारीच लाडू खात बसलेल्या गणेशाकडे  महादेवाने एक प्रेमळ कटाक्ष टाकला. गणेशाच्या हातातील लाडू संपताच महादेवाने पृथ्वीला त्याच्या सुरक्षित हाती सुपूर्त केले. तिचे रक्षण करण्याची आज्ञा दिली.
        गणेशालाही तत्काळ त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली. देवांनाही त्यांची चूक कळली. " देवकारण" विसरून सगळे एकजुटीने ,एकमताने कोरोना दानवाविरुद्ध लढायला तयार झाले.
     सगळ्या विघ्नांचा नाश करण्यासाठी सुखकर्ता ही सज्ज झाला. गणेशाने वडिलांची आज्ञा प्रमाण मानत कोरोना  दानवाच्या अंतासाठीच्या युद्धाचा " श्री गणेशा " केला.
©️ अंजली मीनानाथ धस्के
#AnjaliMinanathDhaske
टिपः सोबतीला गणेश चतुर्थी निमित्त काढलेली ही रांगोळी खास तुमच्या भेटीला आली आहे.
इतर
 लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. इतर नावाने किंवा विना नावाने शेयर करू नये.
इतर लिखाण anjali-rangoli.blogspot.com या linkवर  उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment