रनर-अप ( भाग ५)

 
#रनरअप
©️ अंजली मीनानाथ धस्के
#भाग५
#अंतिमभाग

            त्याच्या डोक्यातले विचार त्याने घालवण्या आधीच ते टॉमीच्या कृतीत दिसून येत होत. त्यालाही हे सांभाळणं आता जड जावू लागल.
     यावर उपाय म्हणजे लवकरात लवकर गार्गीने तिचे संशोधन यशस्वी करणे. गार्गी आता दिवस रात्र संशोधनात बुडून गेली. काही झालं तरी तिला रोहनला गमवायच नव्हतं आणि त्याच आताच वागणं तिला सहनही करता येत नव्हतं.
          दिवसभर टॉमीच्या मदतीने करता येईल ते करून रोहन मन रमवत होता पण दिवसभर झोपूनच असल्याने  रात्रीची त्याला झोप येत नव्हती. तेव्हा मात्र त्याच्या मेंदूत नेमकी नको तेच विचार घोंगावू लागायचे. गार्गी मात्र दिवसभर केलेल्या संशोधनाच्या कामाने इतकी थकायची की संगणकावर काम करत असतानाच बसल्या जागी झोपी जायची.
 एका रात्री समोरच गाढ झोपेत असलेल्या गार्गीला बघून रोहनला रहावले नाही.  टॉमीने गार्गीशी लगट केलीच  आणि गार्गी पुरती गांगरून गेली. तरीही तिने हिंमतीने टॉमीला विरोध करत त्याला त्याच्या गळ्यातल्या पट्याच्या साहाय्याने  खिडकीच्या गजाला बांधून टाकले. सुटण्यासाठी टॉमीने म्हणजेच रोहनने खूप प्रयत्न केला पण त्याचा इलाज चालला नाही.
     या झटापटीत टॉमी गार्गिच्या पायाला जोरात चावला होता हे लक्षात यायला वेळ लागला. थोडी ताकद आल्यावर तिला याची जाणीव झाली. सकाळी दवाखान्यात जाऊन तिने जखमेवर इलाज करून घेतला . इंजेक्शन घेतले. ती घरी परतण्या आधीच  काम करणाऱ्या मावशीं कामाला आल्या होत्या.  टॉमीने भुंकून भुंकून घर डोक्यावर घेतलं होतं म्हणून त्यांनी त्याला मोकळं सोडलं होतं. त्याला तस मोकळं बघून गार्गीच्या काळजाचा ठोका चुकला. तिने त्याला पुन्हा बांधण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिला तस करू दिलं नाही. ती रोहनच्या खोलीत गेली. रात्री त्याच प्रेम तिने नाकारलं होत म्हणून तो नाराजच होता. त्या क्षणी त्याच्यासाठी मध्यम कोण आहे हे महत्त्वाचं नव्हतं . तिच्यासाठीच्या भावना महत्त्वाच्या होत्या. त्या भावनांचा ती असा अनादर करेल याची त्याने कल्पनाच केली नव्हती.
        तेवढ्यात रोहनला तीच्या पायाची जखम दिसली. तो ओशाळला.
    तिनेही रात्री काहीच झाल नाही असं दाखवत. रोजची रोहनची रोजची कामं करायला सुरवात केली. तिच्या पायाची जखम ठणकत होतीच. त्या वेदनांची कळ तिच्या चेहऱ्यावर उमटली होती . ती वेदना रोहनच्या काळजात खोल खोल रुतली.  ती मात्र रोहनशी प्रेमळ संवाद साधत त्याला ओल्या कपड्याने पुसून घेत होती.
 त्याला खूप समजावून सांगत होती. तिचही त्याच्यावर प्रचंड प्रेम होत म्हणून तर तिने इच्छा नसताना रोहनला त्याचे संशोधन वापरण्यासाठी मदत केली होती. रोहनच्या प्रेमळ भावनांना तिने कधीच नाकारलं नसतं पण टॉमीच्या माध्यमातून त्या भावनांचा स्वीकार करणं म्हणजे दोघांच्याही मानसिक अध: पतनास सुरवात केल्या सारखं होत.
     एरवी तिचा नकार  त्याला सहज पचवता आला  असता पण आता  बुध्दी, मन उत्तम काम करत असूनही तो शरीराने अपंग झाला होता. तो बरा होण्याची शक्यताही खुप नव्हती तो हे ही विसरून गेला की ती त्याला नाही तर टॉमीला नकार देत होती. म्हणूनच त्याला रात्री तिचा नकार पचवणं जड गेलं आणि तो आक्रमक झाला होता.
 त्याला ती टॉमीच्या माध्यमातून नकोच होती.  तो स्वतः तिला आनंदी ठेवू शकत नव्हता आणि तो जिवंत आहे तोपर्यंत तिच्या आयुष्यात इतर कोणीही येवू शकणार नव्हत कारण रात्रंदिवस रोहनला पूर्ववत करण्यासाठीचेच विचार गार्गीच्या डोक्यात असायचे.
         टॉमी तिच्या जवळ येवून बसला  त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. तिला रोहनची मानसिकता समजत होती तर त्याला तिचे प्रेम जाणवत होते.
      रोहनला खूप खूप वाईट वाटत होत. तिची अडचण समजत होती. त्यानेच तिला हा प्रयोग करायला भाग पाडलं होतं.  तिलाही रोहनची मानसिकता समजत होती पण कसाही असला तरी तिला तो हवाच होता.
टॉमीचा तर या सगळ्यात काहीच दोष नव्हता.  कळत नकळत त्याच्यावर अन्याय झाला होता.  टॉमी तर मुका प्राणी विनाकारण यात ओढल्या गेला होता. त्याचे तर या प्रयोगानंतर पूर्ण विश्वच बदलून गेले होते. त्याला स्वतःचे स्वतंत्र विचार असूनही रोहनच्या आदेशाचे पालन करावे लागत होते.
तिघही अश्रू गाळात होते. तिघांचेही एक वेगळेच भावनिक द्वंद सुरू होते.
     या घटनेनंतर रोहन टॉमीला मेंदूने कोणत्याही सूचना देण्याचं टाळू लागला. गार्गीने स्वतःवर , स्वत:च्या संशोधनावर, स्वतः च्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करावं यासाठी तो तिच्याशीही संवाद साधण्याच टाळू लागला. त्याला या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या वागण्यातला बदल लक्षात येवूनही गार्गी नेहमीप्रमाणेच प्रेमाने त्याच सगळं करत होती.
        गार्गीने मेंदूकडे संदेश नेणाऱ्या चेतापेशी आणि मेंदूकडून संदेश घेणाऱ्या चेतापेशी यांच्यावर संशोधन सुरू केले.
      यात तीन वर्षे निघून गेली पण  मानवी मज्जा संस्था इतकी किचकट आणि नाजूक रचना होती की त्यातील काही चेतापेशींचे प्रत्यारोपण केले तर त्याचा मज्जा संस्थेच्या कार्यप्रणालीवर वाईट परिणाम दिसून येत होता. एक पेशी बदलली की चांगल्या चार पेशींना धक्का पोहचून त्या मृत होत होत्या. यश मिळावं म्हणून गार्गी अधिकच संशोधनात आणि त्याच्या प्रयोगात बुडून गेली . याचा परिणाम म्हणून  तिचे स्वतःवरचे लक्षच उडाले. ती हसणं विसरून गेली. पूर्वी सारखी नीट नेटकी राहणी विसरून गेली. तिच्यातला
हा बदल रोहनला अधिकाधिक अपराधीपणाची भावना देवू लागला. तो स्वतः आयुष्याचा आनंद घेवू शकत नव्हता आणि त्याच्या जगण्याने गार्गी ही तिच्या आयुष्याला , त्यातील आनंदाला कायमची मुकली होती.
       गार्गीतला हा बदल तिच्या वरिष्ठांनाही जाणवला .
       गार्गीला तिचे हे संशोधन करण्यासाठी हवी ती मदत करायला ते तयार होते. तिला तिच्या संशोधनासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज अशी  प्रयोगशाळा खुली करून देण्यात आली. त्या आनंदात तिला वेळेचे भान राहिले नाही. घरी जायला उशीर झाला.
      मावशीही काम करून घरी गेल्या होत्या. रात्रीचे आठ वाजले होते.  घरातले दिवे  अजून लागले नव्हते. एरवी टॉमी हे सहज करतो पण आज घरात अंधार बघून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती दार उघडून दिवे लावत  धावतच रोहनच्या खोलीत गेली. तिथला दिवा लावताच तिला जे दिसलं ते पाहून तिचा भीतीने थरकाप उडाला. टॉमीला हाका मारल्या पण त्याचाही काहीच पत्ता नव्हता.  ती पुरती गोंधळून गेली . तेवढ्यात तिला त्यांच्या खोलीतील संगणक सुरू असलेला दिसला. त्यावर रोहनच्या मेल अकाउंट वर त्याचीच मेल आलेली पाहून तिच्या मनातला गोंधळ आणि भीती अजुनच वाढली.  तिने भितभितच मेल वाचायला सुरवात केली.
  " प्रिय गार्गी
      तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. तितकाच तुझ्यावर माझा विश्र्वास ही आहे की तू माझ्यासाठी जिवाचं रान करून चेतापेशिंच्या संशोधनात यश मिळवशील. या संशोधनात तुझं आयुष्य वाया जातं आहे याची तुला कल्पनाही नाही.
मी असा अंथरुणाला खिळून पडलेलो. तुझा शोध यशस्वी झाला तरी तोपर्यंत माझे शरीर तो प्रयोग स्वीकारण्याच्या स्थितीत राहणार नाही. आयुष्याची उमेदीची वर्षे तू फक्त माझ्यासाठी खर्ची घातली आहे. मला कितीही मरावं वाटलं तरी तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू मला सहजा सहजी मरू देणार नाही हे मला पक्क माहीत आहे.  माझ्या संशोधनाचा मला आणि समाजालाही फार फायदा झाला नसला तरी आज त्याच्या साहाय्याने माझे मरण मी सोपे करून घेतले आहे. मला मारण्यासाठीच्या सूचना मीच  टॉमीला दिलेल्या आहेत . त्यामुळे माझ्या मानेवर त्याच्या दातांचे ठसे उमटलेले असले तरी तो फक्त माध्यम आहे हे विसरू नको. त्या मुक्या जीवाचा काहीच दोष नाही. आतापर्यंत त्या मुक्या जीवाला माझ्यामुळे खूप सहन करावं लागलं. निदान   माझ्या मृत्युनंतर तरी त्याला त्रास होऊ नये म्हणून मीच त्याला आपल्यापासून खूप दूर पळून जाण्याची सूचना केली आहे. तेव्हा त्याचा शोध घेवू नकोस.
      तुझं संशोधन यशस्वी व्हावं हीच माझी प्रार्थना आहे पण ते करत असताना जगणं विसरु नकोस. .
         मी माझ्या जबाबदारीतून तुला मुक्त करत आहे. आता तरी तू स्वतः चा विचार करावा . स्वतः साठी जगावं कारण तुला पूर्वीसारखाच हसतांना , नीट नेटकं रहातांना बघायची माझी शेवटची इच्छा आहे
       माझं संशोधन प्रभावी नसले तरी त्या निमित्ताने मला तुझ्या सोबतचे काही क्षण आनंदात घालवता आले. हे समाधान घेवून मी जगाचा निरोप घेतो आहे.
तुझा होतो आणि कायम तुझाच असेल .... रोहन
   
       ही मेल  वाचून तर गार्गीचे सगळे त्राण निघून गेले. तिने रोहनला त्याचे संशोधन वापरण्यासाठी विरोध केला असता तर आज हा अनुभव आलाच नसता या अपराधी भावनेने
ती धायमोकळून रडू लागली.
 
      दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ," घरातील पाळीव कुत्र्यानेच घेतला शरीराने अधू असलेल्या संशोधक  मालकाच्या नरडीचा घोट" अशी बातमी छापून आली.
       खरं तर रोहनच संशोधन यशस्वी ठरल होत पण त्या संशोधनाचं यश तो स्वतः बरोबर कायमचं घेवून  गेला.
खरं काय घडलं हे टॉमीला सांगता येणार नव्हतं आणि गार्गी कधीच सांगणार नव्हती.

  • समाप्त
©️ अंजली मीनानाथ धस्के
सोबतीला कथेला साजेशी रांगोळी ही आहेच
#AnjaliMinanathDhaske
इतर लिखाण anjali-rangoli.blogspot.com उपलब्ध आहे.
टिपः
लिखाण आवडल्यास शेअर करताना नावासहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

भाग १:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_91.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_19.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_48.html?m=1






No comments:

Post a Comment