ओढ वारीची

#ओढ_वारीची

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

पावसाचे दिवस असूनही पाऊस काही पडत नव्हता.  नेहमीपेक्षा उशीर होतोय म्हणुन सगळ्यां शेतकर्‍यांचे डोळे पावसाकडे लागले होते. गरीब संपतला तीन एकर शेती होती परंतू  खायचे काय आणि पेरायचे काय अशी चिंता लागली होती. पेरणी करायची ठरवली तरी त्याच्याकडे फक्त एकच बैल होता. गावत कोणी त्याला आपला बैल द्यायला तयार नव्हते. पैशा अभावी मोठ्या पोरीचे लग्नही मोडले होते.  डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता. तो चेहर्‍यावर दाखवत नसला तरी मनात मात्र दुःखाचा पाऊस धोधो कोसळत होता. 

             खिशात दाम नाही, करायला काही काम नाही. अशी त्याची अवस्था होती. संसाराच्या कटकटींना तो पुरता वैतागला होता. संसार सोडून जीव देण्याचा त्याचा निर्णय पक्का होवू लागला होता.  असाच शेताच्या बांधावर चिंता करत बसलेला असतांना, त्याच्या कानावर विठ्ठल भजनाचे स्वर पडले.  त्या स्वरांचा पाठ पुरावा करत आपसूक तो वारकरी मंडळींच्या एका छोट्या गटात सामील झाला.  पुढचा मागचा कसलाही विचार न करता तो चालू लागला.  

जिथे ते थांबतील तिथे थांबू लागला. ठिकठिकाणी त्याला खाण्याच्या वस्तू, चालतांना ऊपयोग पडतील अशा अनेक वस्तू मिळू लागल्या. त्याच्या पायात चप्पल नव्हती म्हणुन त्याला एकाने चप्पल दिली. ज्यांच्या घरी मुक्काम केला होता त्यांनी एक जोडी धोतर दिले.  कशानेच त्याचे मन भारावून गेले नव्हते.  मुखाला हरिनामाची आणि पायांना पंढरपूरची ओढ फक्त लागली होती. शेतातल्या त्याच्या घरी त्याची शोधाशोध सुरू झाली.  काही वारकऱ्यांसोबत त्याने पंढरपूरची  वाट धरली आहे असे समजल्यावर त्याच्या पत्नी जनाने वारी संपेपर्यंत वाट बघण्याचा निर्णय घेतला.  खरतर ताबडतोब जावून त्याला घरी परत आणण्याची तिची तीव्र ईच्छा होतो.  परंतू आधीच फाटका असलेला संसार अधिक उघड्यावर टाकून जाण्याची तिची हिंमत झाली नाही. घरात तरुण पोरगी होती. शेतात पेरणी करायची होती. तीही नवर्‍याच्या मागे त्याला शोधायला  निघाली असती तर कर्ज वसुलीला येणार्‍यांनी मुलांचे हाल केले असते. त्याला शोधायला किती दिवस लागतील याचाही काही नेम नव्हता. हातात काहीच पैसे नसतांना व तो वारीला गेलाय की घर सोडून गेलाय हेही नक्की माहीत नसतांना त्याला शोधायला घरा बाहेर पडणे अत्यंत कठीण काम होते. अखेर तिने विठू माऊलीवर सगळ्या चिंता सोपविल्या. विठू माऊलीच त्याला घरी येण्याची बुद्धी देईल या श्रद्धेवर तिने मन खंबीर करत संसार सांभाळण्याचा निर्णय घेतला.

सेंद्रिय पद्धतीने शेती करणार्‍या काही निवडक शेतकर्‍यांना कृषी विद्यापीठ बियाणे वाटप करणार होते. जनाला जेव्हा हे कळाले तेव्हा तिने कृषी अधिकारी यांच्या कडे धाव घेतली. सगळ्यांना बियाणे वाटप करून झाले होते. जनाने बियाण्यांचा आग्रहच धरला. एका प्रयोगा अंतर्गत विशिष्ट पद्धतीने तयार केलेले भुईमुगाचे बियाणे फक्त शिल्लक होते. त्या बियाण्यांच्या चाचण्याचे निष्कर्ष स्थिर नव्हते. त्या बियाण्यांच्या बाबतीत कृषी अधिकार्‍यांना खात्री नव्हती. तशी माहिती त्यांनी जनाला दिली.  

   घरात खायला पुरेसे अन्न नसताना पेरायला बियाणे कुठून आणायचे? नवरा घर सोडून गेलाय तो परत येईल याची खात्री देता येईल ? एकच म्हातारा बैल घेवून पेरणी तरी किती आणि कशी करायची ? असे अनेक प्रश्न सतावत असताना शेत रिकामे राहण्यापेक्षा विशिष्ट पद्धतीचे बियाणे जमेल तसे पेरले तर उत्पन्न निघाले नाहीच तर निदान गुरांना चारा होईल असे मत जनाचे होते. तीने फारच हट्ट धरला तेव्हा अधिकार्‍यांनी तिला तिच्या जबाबदारीवर बियाणे नेण्यास परवानगी दिली.  

           बियाणे घेवून घरी आली तर तिच्या पडक्या गोठ्यात म्हातार्‍या बैलाजवळ जखमी वळू बसलेला होता. मुख्य रस्त्यावर गाडीच्या धडकेने वळूला जखमा झाल्या होत्या.  तो खूप घाबरलेला देखील होता. जनाच्या दोन्ही मुलांनी त्याला प्रेमाने चुचकारून घरी घेवून आले होते. 

 आहे त्या बैलाचा सांभाळ करणे कठीण असतांना या नवीन पाहुण्याला ठेवून घेणे शक्य नव्हते. तिच्या पोरांनी जखमांवर हळद लावली होती. त्याला प्यायला बादलीभर पाणी आणि थोडा चारा खायला दिला होता.

 त्यातच बाहेर पावसाची पीरपीर सुरु झाली म्हंटल्यावर तर त्याला बाहेर हाकलून तरी कसे द्यावे म्हणुन जना गप्प बसली.  पावसाची चांगलीच झड लागली होती. सलग दोन दिवस झाले तरी पाऊस थांबला नाही. पावसाने जरा उघडीप दिली की लगोलग पेरणी उरकायची असे जनाच्या मनाने घेतले.  या सगळ्या सोबतच नवर्‍याच्या परतीसाठी अखंड हरी नामाचा जप ही सुरूच होता. 

लग्न दोघांचे होते परंतू संसार हा फक्त बाईचा असतो. पुरुष कोलमडून पडला तर बाई संसार सांभाळून घेते. जर बाई कोलमडून पडली तर संसार होत्याचा  नव्हता होतो. याची जाणीव जनाला होती 

 बापाच्या जाण्याने उदास झालेली लेकरं तिच्या रडण्याने अधिक खचली असती म्हणुन तिने स्वतःला सावरले होते.  

तीन दिवसांनी पाऊस थांबला तसा तिने पदर खोचला. म्हातार्‍या बैलाच्या सोबतीला स्वतःच्या खांद्यावर जोखड घेतला आणि पोरांच्या मदतीने पेरणीला लागली.  पोटात पुरेसे अन्न नाही तरी केवळ ईच्छा शक्तीच्या जोरावर ती जोखड ओढत होती.  हरिनामाचा जप सुरु होताच.  गंमत म्हणजे पेरणीसाठी म्हातारा बैल जेव्हा गोठ्या बाहेर काढला तेव्हा वळूही त्याच्या मागोमाग आला.  पेरणी करतांना वळू जनाच्या सोबत सोबत चालू लागला.  आधीच जोखड खांद्यावर असलेली जना वळूच्या सोबत सोबत चालण्याने अडखळू लागली. तिने व पोरांनी त्याला हाकलण्याचा खूप प्रयत्न केला परंतू वळू काही गेल्या सोबत येण्याचे सोडत नव्हता.  त्याला जास्तच हाकलून लावले तर तो पोरांच्या अंगावर धावून जाईल या भीतीने जनाने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले.  आता तर वळू जनाला अधिक खेटून चालू लागला. तिची चिडचिड होवू लागली होती. पेरणीच्या कामाला वेग येतं नव्हता. अखेर जना थकली तशी झाडाखाली जावून बसली. विठू माउलीच्या मनात जे असेल ते होवू दे म्हणत तिने सोबत आणलेली भाकर खायला घेतली.  पोरांनी बैलाला चारा दिला आणि तीही जना सोबत जेवू लागली. जनाला वाटल होतं की वळू कंटाळून निघून जाईल किंवा चारा खायला झाडाखाली येईल तेव्हा त्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याला झाडालाच बांधुन ठेवता येईल. 

  जेवण झाल तरी वळू काही जोखडापासून हालला नाही. चारा खायलाही आला नाही.  कंटाळून जनाने पुन्हा पेरणी सुरू करण्यासाठी जोखड खांद्यावर घेण्याचे ठरविले तसे वळूने तिला ढुशी दिली.  हे काय नवीन विघ्नं आलय म्हणत ती घाबरली.  पोरांना घेवून झाडाखाली बसुन राहिली.  तिचा धीर सुटला तसा तिने आकाशाकडे पाहिले व म्हणाली, " विठोबा तुलाच रं माझी काळजी , साहेबाच्या हातापाया पडून बियाणे आणले आहेत. आता हा वळू येवून उभा राहिला आहे तर पेरणी कशी करू रे? तूच काही मार्ग दाखव बाबा "

तिचे बोलणे ऐकून तिचा लहान मुलगा श्याम म्हणाला, " आई ग.... आपण या वळूच्या खांद्यावरच जोखड दिले तर? म्हणजे मग हा  पळून जाईल आणि आपल्याला पेरणी  करता येईल " 

त्याची ही कल्पना ऐकुन जनाला आश्चर्य वाटले.  

खर तर मुका जीव त्यातही आताच कुठे त्याच्या जखमा बर्‍या झाल्या होत्या. त्यात तो पाळीव नव्हता त्याच्या खांद्यावर जोखड ठेवायचे म्हणजे जिकिरीचे काम होते. अगदीच नाईलाज झाला म्हणुन जना त्या जवळ गेली आणि त्यालाच विनवू लागली, " बाबा र ...पेरणी खोळंबली हाय, एकतर ईथून बाजूला हो नाहीतर जोखड घेवून तूच पेरणी करायला मदत कर "

     ती बोलू लागली तसे वळूने जोखड चाटायला सुरवात केली.  

विठू माउलींच्या मनात असेल ते होईल म्हणत एका बाजूने बैलाला जुंपले तर  दुसर्‍या बाजूचा जोखड वळूच्या खांद्यावर दिला.  वळूने जराही तक्रार केली नाही उलट शांतपणे बैला सोबत चालू लागला.  दोन दिवसात पेरणी पूर्ण झाली. रात्रीच्या अंधारात वळू जिथून आला होता तिकडे निघून गेला  

 विठू माऊलींनीच आपल्या मदतीसाठी या वळूला पाठविले की काय? असा विचार जनाच्या मनात येवून तिने विठ्ठलाचे आभार मानले.  पावसाने यायला उशीर केला होता परंतु आता संतत धार पावसाने हजेरी लावली होती.  ईतर शेतकऱ्यांना वर असलेले दुबार पेरणीचे संकट टळले होते.  जनाची शेत पेरणी ही अगदी योग्य वेळेत झाल्याने तिलाही समाधान मिळाले होते.  

            ईकडे संपत विठ्ठलाचे अखंड नाम घेत पंढरपुरात पोहोचला होता. तिथे त्याला रोज त्याच्या गावचा माणूस भेटत होता आणि जना त्याची घरी वाट बघते आहे असा निरोप द्यायचा.  

        सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले परंतू एकादशीच्या दिवशी असंख्य भक्तांच्या गर्दीत जेव्हा विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी त्याने डोळे मिटून हात जोडले तेव्हा ही त्याच्या कानात, " संपत .... संकटाचा सामना कर. आल्या परिस्थितीचा स्विकार कर. पळून जावून संसार उघड्यावर टाकण्यात कसला पुरुषार्थ? हेही दिवस जातील. मी कायम तुझ्या सोबत आहे. घरी जना वाट बघते आहे . तुला माघारी फिरायला हव " ,असे बोलणे ऐकू आले आणि त्याने पटकन डोळे उघडले.  गाभाऱ्यात विठ्ठल कमरेवर हात ठेवून प्रसन्न चित्ताने विटेवर उभा होता.  ते सावळे सुंदर रूप बघून संपतचे डोळे भरून आले. संपतने विठ्ठलाच्या चरणी समाधानाने मस्तक टेकवले आणि घरी परत जाण्याचा निर्णय घेतला .

         जना एकादशीच्या दिवशी विठ्ठल दर्शनासाठी गावच्या मंदिराला निघाली तेव्हा रस्त्यात तिला भुकेने व्याकूळ एक भिकारी दिसला तसं तिने त्याला स्वतः जवळ असलेला ओल्या नारळाचा तुकडा आणि गूळ खायला दिला.  ती पुढे जावू लागली तसे,' तुझा नवरा परत येईल' असे शब्द कानी पडले. तिने वळून बघितले तर भिकारी गूळ खोबरे खाण्यात मग्न होता.  आपल्याला भास झाला असे वाटून तिने मंदिराचा रस्ता धरला.

शेतातल्या बियाण्यांची रोप तयार झाली. संपत घरी परत आला. जनाने विठू माऊलीचे आभार मानले. जनाला बियाणे कसे मिळाले,तीने पेरणी कशी केली हे त्याला समजल्यावर त्यानेही विठ्ठलाचे आभार मानले. 

आता कितीही कठीण परिस्थितीत हरायचे नाही हे त्याने मनाशी पक्के केले. 

 परतीच्या वाटेवर त्याला काही धनिकांनी तिकिटासाठी व वाटेत खर्चा साठी थोडे पैसे दिले होते ते त्याने खर्च केले नाहीत. तो गेला होता तसा पायीच परत आला होता. त्या पैशातून त्याने एक कोंबडा व तीन कोंबड्या विकत घेतल्या. अंड्यातून पीले तयार झाली. हळू हळू कोंबड्यांची संख्या वाढायला लागली. अंड्यांची विक्री करून थोडे पैसे घर खर्चाला मिळू लागले. मोठ्या मुलीला अंगणवाडी सेविका म्हणुन काम मिळाले. दोन्ही लहान मुले शाळेत जावू लागली. संसाराची गाडी पुन्हा रूळावर येवू लागली.  

         शेतात पेरलेल्या अस्थिर बियाण्यातून चांगले पीक आले तेव्हा कृषी विद्यापीठाने त्यांच्या जमिनीच्या कसून चाचण्या घेतल्या.  भुईमुगाच्या पिकासाठी त्यांची जमीन अत्यंत उपयुक्त होती व अस्थिर बियाण्यां स्थिर करणारे अनेक नैसर्गिक घटक त्यांच्या जमिनीत आधीच उपलब्ध असल्याने बियाण्यांनी चांगले पीक दिले होते.  

            अनेक वर्षे केवळ सेंद्रिय शेती केल्यानेच त्यांच्या जमिनीचा नैसर्गिक पोत टिकून होता.  सेंद्रिय शेती करण्याच्या अनेक सोप्या पद्धती त्यांच्या कडून जाणून घेण्यासाठी कृषी विद्यापीठाने त्यांना मानधन दिले. 

     संपत आणि कुटुंबाने काटकसरीने बचत करत हळू हळू कर्जाचे ओझे ही कमी केले.  बघता बघता वर्ष संपले. पुन्हा सगळ्यांना वारीचे वेध लागले. माळकरी सदा भाऊच्या मुलाचे स्थळ मुलीला सांगून आले.  याही वर्षी संपतने वारीला पायी जाण्याचा निर्णय घेतला. 

यावर्षी मात्र जनाने त्याला प्रसन्न चित्ताने निरोप दिला. पहिल्यांदा वारीला संपत चालत गेला होता. खरे तर त्याच्यामागे जनाचे मन ही गेले होते. शरीराने मात्र तिने संसाराचा गाडा हाकला होता. 

मुलीचे लग्न झाले. मूलही शिकून मोठी झाली. मुलांनी संसाराचा भार उचलला तेव्हा दोघेही जोडीने वारीला जाऊ लागली.

वाईट काळही थांबणार नसतो फक्त तोपर्यंत आपल्याला संयम ठेवता यायला हवा. ह्याच संयमाचे महत्व दोघांनाही संपतच्या पाहिल्या वारीच्या निमित्ताने समजले होते. 

संसाराला कंटाळून संपतने सुरू केलेली पंढरपूरची वारी दोघांनाही आयुष्यभरासाठी विठू माऊलीची ओढ लावणारी ठरली.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

टिप: लिखाण आवडल्यास नावासहित शेयर करण्यास हरकत नाही. ईतर लिखाण 'आशयघन  रांगोळी 'या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे . लिंक खाली देत आहे. anjali-rangoli.blogspot.com 

अनेक सुंदर व सोपे कलाविष्कार पाहण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. Link 👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg



No comments:

Post a Comment