टेकू

#टेकू 


  श्यामल आणि वीणा या दोघी बाल मैत्रिणी होत्या. श्यामल कायमस्वरूपी गृहिणी पद भूषवत होती तर वीणाने सात वर्षापूर्वीच पोस्टातील कारकून पदावरून सेवानिवृत्त होत गृहिणी पद स्विकारले होते.  


   दोघींनाही नवरा, सुन ,जावई आणि नातवंडे असा मोठा कुटुंब कबीला होता. अनेक वर्षे संसाराचा गाडा ओढल्याने त्यांना आता थोड्या अधिक स्वातंत्र्याची आस लागली होती. 


           दोघी भेटल्या की श्यामल कायम तक्रार करीत असे की," लग्न झाल्यापासून स्वतःच्या मताला मुरड घालत नवर्‍याच्या मताला प्राधान्य दिले. आमच्या दोघांचे फारसे कधी पटले नाही परंतू संसारात जीव गुंतत गेला.  आताही माझा मुलगा असो की मुलगी, मी नेहमीच दोघांच्या संसाराला पुढे नेण्यासाठी मदत करते.  नातवंडांसाठी  तर हाताची झोळी करून त्यांना वाढविले आहे. कसलीच हौस मौज केली नाही. सगळ्यांसाठी येवढे झिजले परंतु घरातल्या कोणत्याच मोठ्या निर्णयात मला सामील करून घेतले जात नाही. सगळ्यांना  गरज असली की माझी आठवण होते. कामात मला गृहीत धरले जाते. माझा मान मात्र मला कधी मिळत नाही.  येवढे कष्ट उपसले संसारासाठी कुठे कमी पडले काही कळत नाही. मुले कधी जवळ येवून प्रेमाने, " जेवलीस का ग? " असा साधा प्रश्न विचारत नाही. यांचे संसार मार्गी लावण्यासाठी मी मन मारून जगते. कधी दोन क्षण आराम मिळत नाही. तरी माझी कोणाला किंमत नाही. फार वाईट वाटते ग याचे. कधी कधी वाटते तुझ्यासारखी नोकरी करून पैसा साठविला असता तर आत्ता तुझ्यासारखीच रूबाबात राहिले असते." 


          खर तर सहा वर्षांपूर्वी वीणाची  परिस्थितीही अशीच होती.  नोकरीमुळे, घरच्या जबाबदाऱ्यांमुळे कधी मनासारखे जगता आले नाही. सेवानिवृत्त झाल्यावर मुलांचा संसार गळ्यात येवून पडला. आता  नोकरीची धावपळ नाही म्हणून सगळ्यांनीच वीणाला गृहीत धरायला सुरवात केली. पेन्शन आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारा पैसा बघून मुलांनी तिच्या गरजा शून्य ठरवत स्वतःच्या गरजा वाढवायला सुरुवात केली.सेवानिवृत्त झाल्याने कंटाळा यायला नको म्हणत वेळ मजेत जावा म्हणून दिवसभर घरातील कामे करायची, नातवंडाना सांभाळायचे आणि संध्याकाळी सगळे थकून येतात म्हणूनही तिनेच स्वयंपाक करायला लागायचे.  अशा सगळ्यांच्या अपेक्षा होत्या.  खरे पाहता स्वतःला थोडा वेळ देता यावा म्हणून तिने सेवानिवृत्ती स्विकारली असली तरी आता घरातल्या जबाबदार्‍यात वाढ होणार हे ही ती जाणून होती. प्रत्यक्षात मात्र 

घरात बारीक बारीक कामे इतकी होती की ती संपता संपत नव्हती आणि या कामांना कोणी कामेही मानत नव्हते. कहर म्हणजे या सगळ्यात स्वतःसाठी वेळही मिळत नव्हता. दुपारी जरा आवडीचे पुस्तक हातात घेतले की नातवंड ' आजी आता गृहपाठ करूया' म्हणत हट्ट करायची. त्यांच्या लाडिक हट्टाला बळी पडत त्यांचा अभ्यास घ्यावा लागायचा. संध्याकाळी सून आणि शेजारीच राहणारी लेक थकून येतात म्हणत तिनेच सगळ्यां कामामधे पुढाकार घ्यायचा.  तिचा दिवसभर मस्त आराम झाला हे गृहीत धरून 'हल्ली तू दिवस भर घरीच असतेस' अशी कारणे देत जबाबदार्‍या लादल्याच जात होत्या. दोन दिवस मोठ्या सूनेकडे तर कधी  लेकीकडे आराम करून यावा म्हंटलं तर तिथेही हीच तर्‍हा असायची. तिथेही सगळीकडे आईच्या,आजीच्या हातचे हवे म्हणत कामातून अंग काढले जात होते. तिलाही लेक, नातवंडांसाठी राबायला आवडत असे परंतू प्रत्येक कामासाठी प्रत्येकाने  तिच्यावर अवलंबून राहणे तिला आवडत नव्हते. 

          या सगळ्याला कंटाळून यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी वीणाने स्वतः मध्ये अनेक बदल करून घेतले. फार भावनिक न राहता कोणीतरी, कधीतरी आपल्याला समजून घेईल याची वाट न बघता स्वतःहून स्वतःची समस्या घरातील सर्व सदस्यांना सांगायला सुरवात केली.  दुपारी थोडी विश्रांती मिळावी म्हणून 'लोक काय म्हणतील' या विचाराला तिलांजली देत नातवंडांना दोन तासासाठी का होईना पाळणा घरात किंवा अभ्यास वर्गात पाठवण्याची सोय केली. संध्याकाळी पोळ्या करायला येणार्‍या मावशींना संपूर्ण स्वयंपाक करायला सांगून टाकले. त्या मावशीला सगळ्या सुचना  देण्याचे काम मुलगा, सून, नवरा,लेक  यापैकी जो कोणी घरात असेल त्याने करावे, असे जाहीर करून टाकले. सायंकाळी पायात चप्पल घालून  राम मंदिरापर्यंत चालून येण्याची सवय लावून घेतली. दिवसभरात घरातली जितकी कामे झेपतील तितकीच करण्याचा नियम घालून घेतला. वीणा घरातल्या प्रत्येक निर्णयात स्वतःहून सहभाग घेत स्वतःचे मत मांडू लागली.  तसेच आपले मत प्रत्येकाने ऐकलेच पाहिजे असा आग्रह सोडून दिला. सगळ्या  बायकांना रोजच्या कामातून थोडी विश्रांती हवी असते परंतु ती त्यांना स्वतःच्या घरी कधीच मिळत नाही अशी त्यांची तक्रार कायम असते. 

"जो स्वतःच्या घरी  हक्काची विश्रांती घेवू शकत नाही त्याला जगाच्या पाठीवर कुठेच विश्रांती मिळू शकत नाही " या विचाराशी प्रामाणिक राहात रविवारचा दिवस वीणाने स्वतःच्या विश्रांतीचा दिवस म्हणून घोषित करून टाकला. सुरुवातीला अगदी नवर्‍यानेही कुरकुर केली पण ती नमली नाही.  हळू हळू सगळ्यांना सवय झाली. पिटुकली नातवंडं ही रविवार आजीचा आरामाचा दिवस म्हणत तिला कमी त्रास देवू लागली. 'अडचण आल्यास हक्काने  सांगा मी मदतीला लगेच तत्पर असेल परंतू तुमचा संसार हा तुमचाच राहील. त्याचे ओझे माझ्या खांद्यावर लादून घेतले जाणार नाही' याची जाणीव आपल्या  लेकरांना करून दिली. तिच्या शरीराला झेपतील इतकी कामे मात्र ती बिनबोभाट करत राहिली. तसेच सगळ्यांनी स्वतःचा आर्थिक व्यवहार चोख सांभाळावा असा आग्रह धरला. ' घरातल्या प्रत्येक कमावत्या सदस्याने घर खर्चात समान सहभाग द्यायचा. तसेच जोपर्यंत अत्यंत महत्त्वाचे काम पडत नाही तोपर्यंत कोणी कोणाला पैसे मागणार नाही', असा ठराव केला. संसारातून पूर्णपणे  विरक्त होता येत नसेल तर सुखी होण्यासाठी किमान स्वतःचा किंवा इतरांचा अहंकार कुरवाळत बसायच नाही असा कडक नियम वीणाने स्वतःला घालून घेतला. अशा छोट्या छोट्या बदलांनी वीणाच्या आयुष्यात शांती, समाधान आणि स्थैर्य आणले होते.  घरातील कुरबुरी, धुसफुस, अशांतता, अवाजवी अपेक्षा सगळ्यांना पूर्णविराम मिळाला. सातत्याने कुढत ,रडत बसुन नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मकतेने सत्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वावलंबनाचा मार्ग स्विकारणे तिच्यासाठी शहाणपणाचे ठरले होते. 

        आजही मंदिरातल्या भजनानंतर  श्यामल रोजचेच रडगाणे गात होती. इतर मैत्रिणींनी या आधीही अनेकदा तिला सहानुभूती दिली होती. आज तर त्यांनी समस्त ज्येष्ठ स्त्रिया कशा कायमच उपेक्षित असतात याचा पाढाही गिरवायला सुरुवात केली. 

वीणाने मात्र आज श्यामलच्या निमित्ताने सगळ्यांनाच नीट समजावून सांगण्याचा निश्चय केला. 


       "खरं तर स्त्री नोकरी करणारी असो वा नसो, प्रत्येकीने संसाराच्या सुरवातीपासून स्वतःसाठी काही रक्कम साठवायला हवी. साठवलेल्या रकमेतून काही रक्कम योग्य परतावा देणार्‍या प्रकल्पात गुंतवायला हवी. तशी रक्कम साठवलेली नसेल तर लक्षात घ्यायला हवे की, संसार हा दोघांचा असतो. नवर्‍याला दरमहा ठराविक रक्कम मागायला हवी.

काही वेळा घरातील आर्थिक व्यवहार स्त्रीच्या हातात नसतात म्हणून घरातील स्त्रीने मनात उपरेपणाची भावना बाळगणे योग्य नाही. हक्काने आपल्या योग्य आर्थिक गरजा मांडायला हव्यात. यामुळे तुम्हा सगळ्यांची रोज रोजची आर्थिक घुसमट थांबून आत्मविश्वासाचा अनुभव घेता येईल. अपेक्षांचे ओझे लादू नये आणि लादूनही घेवू नये. कायम स्वावलंबी रहावे आणि घरातील इतर सदस्यांनाही स्वावलंबनाची शिकवण द्यावी. किमान   उतार वयात तरी आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य क्रम द्यायला हवा. घरातील तरुण पिढी आपल्यापेक्षा शरीराने बळकट असते. काही कामे त्यांनाच सांगावी. आपल्या वयाचा मान ठेवत अति श्रम करण्याच्या भानगडीत पडू नये. स्वतःला कामे होत नसतील तर नामस्मरण करत बसावे परंतु आदळ आपट करत ती कामे करण्याचा आग्रह करू नये.  सुनेने किंवा लेकीने कौतुक करावे म्हणुन काहीही करू नये.  दुखत खुपत असतांनाही आपणच कसे रोजचे सगळे व्यवहार नीट पार पाडतो हे दाखवत बसू नये. इतर सदस्य थकून घरी आल्यावर त्यांच्या हातात चहाचा कप देवून दिवसभराच्या कामांनी आपण किती थकलेले आहोत हे शब्दातून किंवा  आपल्या कृतीतून दाखवू नये. उलट पाण्याचा पेला हाती देत, " आज उशीर का झाला? दमलास/दमलीस का? " अशी चौकशी स्वतःहून करावी. अशा प्रेमळ शब्दांमुळे  सून, लेक स्वतःचा चहा करून घेतांना तुम्हालाही अर्धा कप चहा हातात आणून देतील याची खात्री बाळगा. तसेच उगाच  कामांचा सगळा भार सुनांवरही टाकू नये. ' एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ' ही ओळ कायम लक्षात ठेवावी. आपल्याच लेकरांची उणी दूणी काढण्याऐवजी त्यांच्यातील चांगल्याचा शोध घ्यावा व मन कायम प्रसन्न ठेवावे. मुख्य म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने सगळेच प्रभावित होतात मग घरातील सदस्य आनंदी का होणार नाहीत? पुढची पिढीही  सक्षम आहे परंतु तुम्ही 'टेकू' देवून तिला अधू करू नये. ज्याच्या सोबत संसार करतोय तो आपल्याला अनेकदा नीट समजून घेवू शकत नाही.  म्हणून इतर नात्यांकडून अशा अपेक्षा ठेवण्यापेक्षा सगळ्यांशी स्वतःहून संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा.  तरुण पिढीशी असलेले मतभेद खुल्या मनाने स्विकार करायला शिकावे. त्यांना विचारांचे स्वातंत्र्य देत स्वतःच्या स्वातंत्र्याचीही जाणीव ठेवावी. भरल्या घरात आपण दुःखी, कष्टी का आहोत याची कारणे शोधतांना आत्मपरीक्षण  जरूर करत रहावे. यामुळे आपले नेमकी कुठे चुकते आहे याचा शोध लागतो. आपण स्वाभिमान जपतांना अहंकाराला तर कुरवाळत नाही ना हे वेळोवेळी तपासून बघावे. घरातली चार कामे कमी केलीत तर फार काही बिघडणार नाही. ती सगळी कामे कामाला ठेवलेल्या मावशीकडून करून घेतली जातील परंतू ती सगळी कामे करत असतांना तुम्ही नकारात्मक वातावरण निर्माण करत असाल तर तुमच्यात असलेल्या  चांगुलपणाला बगल देत एकांतवास तुमच्यावर लादला जाईल.  कोणत्याही नात्यात फार गुंतून पडू नये म्हणजे त्या नात्याकडून असलेल्या  अपेक्षाही कमी होत जातात. त्याचबरोबर आपल्या जबाबदार्‍याही कमी होत जातात.  आयुष्यात भावनिक गुंता न वाढविता प्रत्येक क्षण आनंदाने, निर्लेप भावनेने जगायला हवे.  समस्या असेल तर ती उगाळत बसू नये त्यावर लगेच उपाय शोधायला हवा. गावगप्पा करून सहानुभूती मिळविता येईल परंतू त्याने सुखी, समाधानी होता येत नाही. ", असे वीणा सगळ्यांना समजावत असतांनाच मंदिराच्या नवीन स्लॅबचे टेकू काढून टाकण्याचे काम सुरू झाले. त्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधल्या गेले. 

            स्लॅब आता मजबूत झाला होता. त्याला टेकूची काहीच गरज राहिली नव्हती म्हणून सगळे टेकू काढून नवीन सभामंडप मोकळा करण्याचे काम जोरात सुरू होते . तेव्हा वीणा सगळ्यांना उद्देशून म्हणाली, " बघा गरजेला टेकू महत्त्वाचा असतो परंतू त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची दखलही तात्पुरती घेतली जाते. आज इथे तर उद्या तिथे अशी त्यांची रवानगी केली जाते. यांची गरज नसते तेव्हा खुशाल अडगळीत ठेवले जातात. या उलट खांबाकडे बघा ते कायम एकाच जागी स्थिर असतात.  तेही स्लॅबचा भार कायम पेलत असतात परंतू आपली जागा कधी सोडत नाही. खांब हा एखाद्या कोपर्‍यातला जरी असला तरी तेवढाच महत्त्वाचा असतो. मुलांच्या संसाराला टेकू देत बसण्यापेक्षा स्वतःच्या संसाराचे खांब होवून रहायला हवे. आपली जागा सोडायची नाही परंतू नात्यांची गुंफण अशी काही मजबूत करायची की, त्याच्या जोरावर मुलांच्या संसाराचा स्लॅबही ढळणार नाही."

            खरंतर 'टेकू ते खांब' हा प्रवास वीणासाठीही सोपा नव्हता.  संयम, विरक्ती, आत्मविश्वास ,संवाद कौशल्य आणि स्पष्टवक्तेपणा या गुणांमुळे तिला संसारातील 'खांब' होणे शक्य झाले होते. वीणाने प्रामाणिकपणे मांडलेले विचार सगळ्यांनाच पटले. वीणाने सूचविलेले काही छोटे छोटे उपाय जरी आपण अंमलात आणले तर आपल्या अनेक तक्रारी कमी होवून समाधान मिळेल अशी आशा सगळ्यांच्या मनात जागृत झाली. श्यामललाही तिच्या वागण्यातल्या त्रुटी उमगल्या. वीणासारखे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर चांगले बदल अंगीकारता यायला हवे, या जाणिवेने सगळ्यांना प्रेरित केले.

 श्यामलसोबत सगळ्यांनी आजपासूनच रडगाणे बंद करून विचारांना सकारात्मक ठेवत आनंदी राहण्याचे वचन वीणाला दिले.


©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

टिप: लिखाण आवडल्यास नावासहित शेयर करण्यास हरकत नाही. ईतर लिखाण 'आशयघन  रांगोळी 'या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे . लिंक खाली देत आहे. anjali-rangoli.blogspot.com 

अनेक सुंदर व सोपे कलाविष्कार पाहण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. Link 👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg











.

No comments:

Post a Comment