गुळाचा शिरा, आठवणी आणि बरेच काही

 #गुळाचा_शिरा 

#आठवणी_आणि_बरेच_काही 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

पहाटेच्या घाईत डबा बनविण्यात गुंग असतांना अचानक लक्षात आले आज  नाष्ट्याला काय बनवायचे याचा विचारच आपण करून ठेवलेला नाही.  कमी वेळात तयार होणार्‍या सगळ्या पदार्थांची उजळणी मनातल्या मनात झटपट करून झाली.  गुळाचा शिरा या पदार्थाची निवड झाल्यानंतर एकीकडे चपाती लाटणे व शेकणे, एकीकडे भाजी चिरत असतांना फोडणीचे तयारी करणे यातच साजूक तुपात रवा भाजण्याच्या कसरतीला सुरूवात झाली. रवा खरपूस भाजून झाल्यावर त्यात गरम पाणी घातले तसा रवा मस्त फुलून आला. रव्यातील पाणी आटले तसे त्यात किसलेला गूळ घातला.  गूळ व्यवस्थित मिसळल्यानंतर वेलदोड्याची पूड त्यावर भुरभुरत काजू बदामाच्या छोट्या तुकड्यांची पेरणी केली. तुपाचा वापर सढळ हाताने केल्याने मिश्रणाला तूप सुटायला लागल्यावर चिमूटभर मीठ टाकले. मिश्रण पुन्हा एकदा हळवून घेतले. हळूच गॅस बंद करून पुन्हा चपाती बनविणे आणि भाजी परतण्याच्या कसरतीला लागले.

              तेवढ्यात नवरोबा स्वयंपाक घरात प्रवेश करत म्हणाले, " आज काय खास बनविले आहे, एखाद्या सुगरण आजीने पारंपारिक पदार्थ बनवावा तसा दरवळ घरभर पसरला आहे "

 सकाळच्या घाईत शर्यतीतल्या घोड्याप्रमाणे माझी अवस्था असते. जराही लक्ष भटकू न देता डबा बनविणे, नंतर तो नीट भरून नवरा व मुलाला आनंदाने घराबाहेर पाठविणे या अंतिम रेषेवर वेळे आधी पोहोचण्याचा ध्यास असतो . त्यामुळे नवरोबा जे काही बोलले त्याला उत्तर देतांना ते द्यायचे म्हणून दिल्या गेले ," आज सुगरणी सारखे काही खास केलेले नाही झटपट होतो म्हणुन गुळाचा शिरा केलाय "

             आमचे बाळराजे घरातल्या कोणत्याही कोपर्‍यात कितीही कामात व्यग्र असले तरी कान मात्र आमच्या संवादाकडेच असतात.  बाळराजेंनी क्षणाचाही विलंब न करता आमच्या संवादात उडी घेतली, " आई तु गैरसमज नको करून घेवूस की ते तुला सुगरण म्हणतात आहे, उलट तू आजीबाई सारखी म्हातारी झाली आहेस असे सुचवायचे आहे त्यांना " 

          मीही लगेच बोलले, " त्यांना काय म्हणायचे ते म्हणु दे नंतर बघेन त्यांच्याकडे "

         टाळायचा प्रयत्न केला तरी स्त्री सुलभ मनात शंका आलीच की  नवर्‍याने आपल्याला खरेच आजीबाई म्हंटले असेल का? 

      ईकडे नवर्‍याच्या मनात ही पुढच्या संकटाची चाहूल लागली म्हणुन त्याने बाळराजेंच्या बोलण्याला लगेच स्पष्टीकरण दिले ," अग... तुला आजीबाई म्हंटलेलं नाही .घरभर जो खमंग दरवळ पसरला आहे त्यावरून मला तुझ्या आजीची आठवण झाली. पहाटेची वेळ, तुझी आजी आणि गुळाचा शिरा ..... या तू सांगितलेल्या प्रसंगाची आठवण झाली. "

       माझ्या तोंडूनही निघून गेले," खरच की.... आजीची आठवण येईल असा दरवळ आहे खरा "

        नवर्‍याने सांगितल्यावर प्रकर्षाने  जाणवलं की ,'जबाबदाऱ्यांचे ओझे खांद्यावर असले की असेच अनेक दरवळ अनुभवायचे राहून जातात.' मन क्षणात भूतकाळात गेले. 

           माझ्या लहानपणी आमचे आजी आजोबा (वडिलांचे आई वडील)वर्षात बरेचदा आमच्याकडे  दहा पंधरा दिवसांसाठी रहायला येत. 

 मी साधारण दुसरी किंवा तिसरीत असेल. तेव्हाची ही गोष्ट.

हिवाळ्याचे दिवस सुरू झाले होते. पहाटेची चार, साडेचारची वेळ होती. हवेतला गारवा आणि सोबतीला दुलईची ऊब अत्यंत सुखदायक होती.  गावी असले की आजोबांना पहाटेच्या वेळी ब्रम्ह मुहूर्तावर मंदिरात जावून काकड आरती म्हणण्याची सवय होती.  आमच्या घराजवळ मंदिर नसल्याने ते अंगणात तुळशी वृंदावनाजवळ बसुन काकड आरती म्हणत. साधारण तासभर तरी त्याचा हा कार्यक्रम चाले.  दिवसभर आई काम करून थकलेली असे.  तिला पहाटेच्या कामात अधिक त्रास नको म्हणून फक्त याच वेळी आजी स्वयंपाक घरात काहीतरी बनवायला म्हणुन येत असे. आजोबांची आरती झाल्यावर नैवेद्य म्हणून  कधी गोड कधी तिखट पदार्थ बनवले जात . 

            मी साखर झोपेचा आनंद घेत असतांना रोजच्या सारखे काकड आरतीचे मंद स्वर कानावर पडत होते. आई बहुदा खराट्याने घराचे मागील अंगण झाडत असावी कारण त्या झाडण्याच्या आवाजातील  लयही कानांना जाणवत होती. पक्ष्यांचा किलबिलाट नुकताच सुरु झाला होता. स्वयंपाक खोलीतील भांड्यांची कीणकीण त्यात मिसळली होती. 

 सवयीने  थोडी चुळबुळ करत पुन्हा झोपेच्या आधीन होण्याचे कसब येव्हाना घरातील ईतर सदस्यांना चांगले जमू लागले होते.  पहाटेला स्वतःचा असा एक सुखद गंध असतो. आपल्या आधी उठणाऱ्या व्यक्तीने दारे,  खिडक्या उघडल्यावर तो गंध श्वासात साठवून थोडा वेळ लोळायला मला आजही फार आवडते.  

 तेव्हाही या सगळ्या आवाजाचा  गुंगीतच कानोसा घेत पुन्हा झोपेच्या आधीन होत असतांनाच  एक दीर्घ श्वास घेतला .  नेहमी या दीर्घ श्वासानंतर निद्रा  देवी पुन्हा पापण्यांवर विराजमान होत असे. तेव्हा मात्र त्या श्वासा बरोबर जो  खमंग दरवळ आला होता त्याने पोटातील भूक चाळवली.  त्या जाणिवेने निद्रा देवीने तिचे काम करण्यास नकार दिला. तोपर्यंत या खमंग दरवळाचे उगम स्थान शोधण्याचा आदेश मेंदूने सुस्तावलेल्या शरीराला दिलाही होता. अंगावर पांघरलेली दुलई अंगाभोवती गुंडाळून घेत मी डुलत डुलत शोध सुरू केला आणि स्वयंपाक घरात जावून पोहोचले. आजीला ओट्यावर असलेल्या शेगडीचा वापर जमत नसे म्हणुन तिने गॅसची शेगडी खाली फाशीवर ठेवली होती.  पाटावर बसुन ती कढईत एक एक जिन्नस टाकत होती.  मला आलेलं बघून तिला थोडे आश्चर्य वाटले . ती हसून म्हणाली, " काय झालं ग, ईतक्या लवकर उठलीस आज." मीही तिच्या जवळ फतकल मारून घेत लाडात येवून बोलले, " उठली बिठली काही नाही, तूम्ही रोज मस्त मस्त पदार्थ बनवून खाता. आज मीही तुमच्या बरोबर खाणार आहे आणि मग पुन्हा जावून झोपणार आहे ". त्यावर आजीने हसत लाडाने माझ्या तोंडावरून हात फिरवून माझा मुका घेतला.

नैवेद्य दाखवून झाल्यावर तिने मला बशीमधे गरमागरम साजूक तुपातील शिरा खायला दिला.

मी विचारले, " आजी... आज हे काय बनवले आहे?". आजी म्हणाली, " शिरा आहे.  कसा  बनला आहे?" 

मी ही बोलले, " मस्त लागतोय पण हा आज असा काळा कसा झाला " त्यावर आजीला हसू आले ," अग हा गुळाचा शिरा आहे, नेहमीसारखा दुधातलं नाही.  "

तितक्यात आई ही तिथे पोहोचली.  मला ईतक्या पहाटे उठलेले बघून तिलाही आश्चर्य वाटले. आजीच्या शिर्‍याचा खमंग दरवळ मला झोपेतून खेचून घेवून आलाय हे समजल्यावर माझ्या हावरट पणाचे तिलाही हसू आले. 

       शिरा खावून झाल्यावरच मी तिथेच आजीच्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेले.  पहाटेचा अंगणातील उजेडाचे स्वागत करायला उत्सुक असलेला अंधार, अंगणात सडा शिंपण्याचा येणारा आवाज ,पक्ष्यांचा किलबिलाट, स्वयंपाक खोलीच्या मागच्या दारातून येणारी गार हवा , सबंध वातावरणात पसरलेला गुळाच्या शिर्‍याचा खमंग दरवळ, मला थोपटतांना आजीच्या बांगड्यांची होणारी कीणकीण आणि गुळाचा शिरा खावून सुखावलेला माझा आत्मा  या सगळ्यांनी मिळून ती पहाट माझ्यासाठी अविस्मरणीय झाली होती.  

       त्यानंतर मात्र रोज रात्री मी आजीला "उद्या काय बनविणार आहेस" हे विचारूनच झोपी जात होते.  मी पहाटे कधी उठले नाही तरी आजी माझ्यासाठी वाटीभर खाऊ बाजूला काढून ठेऊ लागली होती. 

मी आठवणीत रमले होते  तेवढ्यात गुळाचा शिरा खाणार्‍या नवरोबाचे शब्द कानी पडले, " एक नंबर..... काय अप्रतिम चव आहे. एकदम मेंदू पर्यंत जाते. तू आजीची आठवण सांगितली तेव्हा असाच खमंग दरवळ माझ्या कल्पनेत व्यापून राहिला होता .आज ईतक्या दिवसांनी तू वर्णन केलेल्या  सुगंधाला, चवीला आणि पहाटेला मी प्रत्यक्ष अनुभवतो आहे. वाह वाह आज मजा आली...." 

       रोज भल्या पहाटे सोसायटी स्वच्छ करायला येणार्‍या दादांनी खराट्याने झाडतांना मस्त लय पकडली होती. सोबतीला पक्षांचा किलबिलाटही होताच. शरीराला हवेतील गारवा सुखावत होता. सोबतच साजूक तुपातील गुळाच्या शिर्‍याचा खमंग दरवळ आणि जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव या सगळ्यांच्या एकत्र येण्याने नवरोबाला कधीही न बघितलेल्या माझ्या आजीची आठवण झाली होती याचे मला फार नवल वाटले. 

त्याच्या या कृतीने मी सुखावले आणि आजीच्या गोड आठवणीने आजची सकाळही प्रसन्न झाली. 

      तुम्हालाही असा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी भल्या पहाटे उठावे लागेल.  साजूक तुपातला गुळाचा शिरा करावा लागेल. अंगणात, खिडकीत किंवा गॅलरीत बसुन पक्षांचा किलबिलाट ऐकत गरमागरम गुळाचा शिरा खातांना ज्या स्वर्ग सुखाची अनुभुती येईल त्याने तुमची ही एक पहाट नक्की अविस्मरणीय बनेल याची मला खात्री आहे.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

टिप: लिखाण आवडल्यास नावासहित शेयर करण्यास हरकत नाही. ईतर लिखाण 'आशयघन ' रांगोळी या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे . लिंक खाली देत आहे. 

anjali-rangoli.blogspot.com 

अनेक सुंदर व सोपे कलाविष्कार पाहण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. Link 👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg








No comments:

Post a Comment