स्पर्श, कन्यादान आणि मातृत्व (100 शब्दांची गोष्ट)

 'हात ' या शब्दावर आधारित लिहिलेल्या या तीन कथा तुम्हाला आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा. 


#स्पर्श

#100शब्दांचीकथा 

मुलांनी हाताला धरून घराबाहेर काढलेल्या बहिणीला शामरावांनी स्वतःच्या घरी आणले.  तारुण्यात सासुरवास सहन करणारी ती वडिलांच्या धाकामूळे कधी हक्काने माहेरी आली नाही. या वयात मुलांचा जाचही मुकाट्याने सहन करत होती. 

आज मात्र  शामरावांनी अंगणातील एक खोली खास तिच्यासाठी तयार करून घेतली. बहिणीच्या थरथरत्या हाताला धरत त्यांनी तिला त्या खोलीत नेले," आज पासून ही खोली फक्त तुझी आहे ताई. कोणीही तुला ईथून बाहेर काढणार नाही अगदी माझ्या माघारी देखील " असे त्यांनी सांगताच बहिणीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हळूच आपला हात आपल्या भावाच्या हातावर ठेवला. आज त्या स्पर्शात अगतिकता नसून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात का होईना हक्काचे माहेर मिळाल्याचे समाधान होते. 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

*********************************************

#कन्यादान

#100शब्दांचीकथा

कन्यादानाच्या वेळी मेहंदीने रंगलेला रियाचा नाजूक हात  राहुलच्या हातात देतांना तिच्या आई बाबांना गहिवरून आले. राहुलने  रियासोबतच तिच्या आई बाबांचा हातही प्रेमाने धरला व बोलला, " या विधीने तुम्हाला तुमची मुलगी परकी होणार नाही,तिला तिचे माहेर दुरावणार नाही तर  मी व माझे कुटुंब तुमच्या परिवाराशी कायमचे जोडले जाणार आहोत. दोन्ही कुटुंबांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन व माझ्या या प्रवासात मला रियाची मोलाची साथ लाभावी म्हणुन आपण हा विधी करतोय " त्याचे असे समजुतदार बोलणे ऐकून रियाच्या आई बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर 

राहुलच्या आईबाबांनीही अलगद त्या चौघांचे हात आपल्या हाताच्या ओंजळीत घेतले.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

**********************************************

#मातृत्व 

#100शब्दांचीकथा

उपेक्षित जिणे जगतांना पूजाच्या सगळ्याच भावना जणू मेल्या होत्या. नेहमी प्रमाणेच ती यांत्रिकपणे टाळ्या वाजवत, पुरुषी हातांचे किळसवाणे स्पर्श टाळत रेल्वे स्टेशनवर फिरत होती. भूक लागली म्हणुन घेतलेल्या ताटलीतील समोसा खाण्यासाठी हात उचलला तसा तिच्या हाताला चिमुकल्या हातांचा स्पर्श जाणवला. "थोड्या वेळात परत येतो" सांगून गेलेल्या बापाची सकाळपासून वाट बघणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातील अगतिक भूकेने पूजाच्या   कठोर काळजालाही मायेचा पाझर फोडला. पोलिसात तक्रार देवूनही चिमुरडीचे आई वडील न मिळाल्याने पूजाने चिमुरडीला दत्तक घेतले. निसर्गाने स्त्रीत्व बहाल केले नसले तरी चिमुरडीचा हात कायद्याने हातात घेवून पूजाने मात्र मातृत्वाला कायमचे कवटाळले. पूजाच्या टाळ्यांनाही आता चिमुरडीच्या उज्ज्वल भविष्याचा ध्यास लागला.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)


कथे सोबत हाताची Rangoli post करते आहे 



No comments:

Post a Comment