#वट_पौर्णिमा
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)
सुनील लहानपणापासून निसर्ग वेडा होता. निसर्गाविषयी त्याला प्रचंड आदर होता. निसर्ग सानिध्याची ओढ त्याच्यात जन्मापासून होती. तो पोटात असतांना आई शेतात राबायची. जरा जीव दमला की ती बांधावरच्या झाडाच्या सावलीत विसावा घ्यायची. परिस्थितीने, कष्टाने दमलेल्या तिला झाडाच्या सावलीत शांत, तृप्त वाटायचे. सुनीलच्या जन्मानंतर त्याच झाडाच्या सावलीत तिने साडीचा झोका बांधला होता. जाग आली की पानांची सळसळ , हळूच पानांमधून डोकावणारे आकाश, तर कधी सूर्याची कोवळी तिरीप बघण्यात सुनीलचा वेळ मस्त जाई. सोबतीला पक्षांची किलबिल कानावर पडत असे. त्याचे पहिले बोबडे बोल , त्याने टाकलेले पाहिले पाऊल,आईच्या दुधाव्यतिरिक्त त्याने अन्नाचा घेतलेला पहिला घास, मातीत पहिल्यांदा गिरवलेली आद्याक्षरे, या सगळ्या क्षणांचे साक्षीदार शेताच्या बांधावरची झाडे होती. शाळेत जायला लागल्यावर शाळेतून घरी न जाता आईला सोबत करण्यासाठी शेतावर जात असे. बांधाच्या झाडांखाली कधी गृहपाठ पूर्ण करत बसे ,कधी वाडाच्या पारंब्याचा झोका खेळत बसे, कधी कधी तर शाळेच्या ग्रंथालयातून आणलेल्या गोष्टीच्या पुस्तकाचा फडशा पाडत बसे. अनेकदा याच झाडांच्या सावलीत तो आईशी मनसोक्त गप्पाही मारत असे. आई देखील तिच्या बालपणीच्या आठवणी पासून ते त्याच्या बाल लीला पर्यंतचे अनेक किस्से अगदी रंगवून रंगवून सांगत असे.
याच गप्पा दरम्यान त्याला आईला बोचणारी गोष्ट तिच्याही नकळत समजली होती. त्याच्या आईचे एक स्वप्न होते की तिच्या लग्नानंतर तीही तिच्या आईसारखी वट पौर्णिमेला नटूनथटून वडाला पुजायला जाईल. परंतु लग्नानंतर जेव्हा ती वट पौर्णिमेच्या दिवशी छान तयार झाली तेव्हा आजी तिच्यावर चिडली होती. आजोबांना नेमकी वट पौर्णिमेच्या दिवशीच मोठा अपघात झाला होता आणि त्यातच ते नंतर वारले होते. आजीचा संसार उघड्यावर पडला. त्यांच्या माघारी चार मुलांची जबाबदारी तिच्या एकटीवर पडली. तिला लिहिता वाचता येत नव्हत. आजोबांची मिळकत फार नव्हती त्यामुळे साठवलेले पैसेही नव्हते. तिला मोलमजुरी करावी लागली. तिच्या मुलांनाही ती चांगले शिक्षण देवू शिकली नाही. तिला तिच्या दोन्ही मुलींची लग्ने तर त्यांच्या लहान वयातच करावी लागली. या सगळ्याचा राग तिने वट पौर्णिमेवर काढला. मोठी सून घरात आली तेव्हा तिने घरात सगळ्यांना खडसावून सांगितले की, " आपल्या घराला वट पौर्णिमा निषिद्ध आहे. इथून पुढच्या पिढीतील सुनांनाही वट पौर्णिमा साजरी करता येणार नाही." आजीला विरोध करण्याची कोणाची हिम्मत नव्हती. कारण मुलांसाठी तीच घरातील कर्ती धरती होती. सगळ्यांनी तिचे म्हणणे निमुटपणे मान्य केले.
मोठ्या जाऊकडून हे सगळे समजल्यावर सुनीलच्या आईचा हिरमोड झाला. माहेरी गरिबी, कष्ट तर पाचवीलाच पुजले होते परंतु सासरीही सौभाग्य लेणं मिरविण्याचा साधा सण आपल्या नशिबात नाही याची रुखरुख तेव्हापासून तिच्या जिवाला लागली होती.
हे समजल्यावर सुनीलनेही आडून आडून आजीशी ,त्याच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता परंतू कोणीही त्याच्या बोलण्याला दाद दिली नाही. शाळेत तर तो अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे घेत होता परंतू त्याच्या घरातील तिढा त्याला सुटत नव्हता.
जेव्हा जे घडायचे असते तेव्हा ते घडतेच असे आजी नेहमीच म्हणायची परंतू वाईट घटनांचा संबंध मात्र दिवस, वार, सण, वेळ या सगळ्यांशी जोडायची याची जाणीव त्याला प्रकर्षाने झाली.
वट पौर्णिमा निमित्त शाळेत पर्यावरण पूरक असे अनेक कार्यक्रम घेतले जात. निसर्ग माणसाला निरंतर देत आलाय. त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून वड पूजन करत वट पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा निर्माण झाली आहे असे सांगण्यात येत असे.
सगळ्यात जास्त प्राणवायू देणार्या झाडांमध्ये वडाच्या झाडाचा समावेश होत असून सुद्धा या दिवशी शहरी भागात वडाच्या झाडाची फांदी तोडून घरच्या घरी वड पूजा करण्याची नवी पद्धत रुजू पाहते आहे. निसर्गाचे संवर्धन, संरक्षण व्हावे म्हणून साजरा केला जाणारा हा सण असून देखील त्याच दिवशी घाईच्या दिनक्रमाची सबब सांगत वेळ नसल्याचे कारण देत अत्यंत पूजनीय व उपयुक्त झाडाची फांदी तोडून आणतो. ही चुकीची प्रथा मोडून काढण्यासाठी शाळेतील शिक्षक या दिवशी "आईला झाडाची फांदी तोडून आणू देवू नका" असे मुलांना आवाहन करत. तसेच वट पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी गावातील वडाच्या झाडांखाली जमलेले निर्माल्य साफ करण्याची आणि झाडांना गुंडाळलेला दोर काढून टाकण्याची मोहीमही राबवत असत.
सुनील या सगळ्यात हिरीरीने भाग तर घेत होता परंतु आईला वट पौर्णिमा साजरी करता येत नाही याचे त्याला वाईटही वाटत असे.
जस जसा तो मोठा होवू लागला तस तसा आजूबाजूला सतत होणारी निसर्गाची हानी तो उघड्या डोळ्यांनी बघू लागला. गावातील विहिरी आटू लागल्या. पाणी टंचाई तर रोजची बाब झाली. पावसाचे प्रमाण कमी झाले .उन्हाळा मात्र चांगलाच कडक जाऊ लागला. शहरातील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. यंदा तर महाविद्यालयाने दर वर्षीच्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईला लक्षात घेता वार्षिक परीक्षा लवकर उरकून घेतल्या. जेणे करून वसतिगृहातील मुलां मुलींच्या रोजच्या पाणी वापरात कपात होवून पाणी टँकर वर होणारा खर्च ही टाळता येईल. सुनील सुट्टीला गावात आला तेव्हा ज्याच्या त्याच्या तोंडी 'उन्हाळा यंदा फारच कडक आहे ' हेच ऐकु लागला. मान्सूनचा महिना सुरू होवून आठवडा झाला तरी गरमी कमी होण्याचे नाव घेईना. वट पौर्णिमा आठवड्यावर आली तसे त्याचे विचार चक्र जोरात फिरू लागले.
अखेर वट पौर्णिमेचा दिवस उगवला. तो घरातील सगळ्यांना गावच्या माळ रानावर घेवून गेला. त्याचे सगळे मित्रही आपल्या आई , बहीण व आजीला घेवून आले होते.
तिथे त्याने व त्याच्या मित्रांनी झाडाची पन्नास रोपे आणि खड्डे तयार ठेवले होते. त्यातील वडाच्या झाडाचे एक रोप जमिनीत लावण्यासाठी त्याने आईच्या हाती दिले आणि म्हणाला, " आजीचा वडाची पूजा करायला विरोध आहे. लागवड करायला नाही. तसही सध्या फक्त वडाचे पूजन न करता वड लावण्याची गरज जास्त आहे. आई ग.... स्वतः नटूनथटून सण साजरे करणे ही आपली प्रथा असली तरी सध्या आपल्या या धरती मातेला हिरवा कंच शालू नेसविण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या दिवशी सौभाग्य लेणे मिरवण्यासोबतच आपल्या काळ्या आईला हरित लेणे बहाल करायला हवे. झाडाला झोके बांधुन खेळण्यासोबतच पुढच्या पिढीलाही हे सगळे खेळ खेळता यावे म्हणून झाडाची लागवड व त्यांचे संवर्धन करणे फार महत्त्वाचे आहे. " आईला हे बोलत असतांना त्याने हळूच आजीकडे इशारा केला.
आजी वडाचे रोप एका खड्यात व्यवस्थित लावत होती.
रोप लावून झाल्यावर आजी आपल्या दोन्ही सुनांना म्हणाली, " पोरानं माझे डोळे उघडले , इथून पुढे आपल्या घराण्यात आजच्या दिवशी सुनांच्या, लेकिंच्या हस्ते वृक्षारोपणाची प्रथा सुरू करुया "
आज सुनीलच्या घरच्यांना एक व्यापक दृष्टिकोन मिळाला तर माळ रानावर गावकर्यांनीही खऱ्या अर्थाने वट पौर्णिमा साजरी केली . मुलांच्या या कृतीने शिक्षकांचे मन ही अभिमानाने भरून गेले होते.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)
टिप: या लेखाचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नसून " झाडे लावा झाडे जगवा " हा संदेश देण्याचा आहे. तेव्हा चूक भूल माफ असावी. लिखाण आवडल्या नावानिशी शेयर करायला काहीच हरकत नाही.
अशाच सुंदर रांगोळ्यां शिकण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel सबस्क्राइब करा.
खालील रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇👇
No comments:
Post a Comment