दिवाळी, रांगोळी आणि बरेच काही(२०२१) प्रत्येक दिवसासाठी एक रांगोळी

 हा लेख "ईरा दिवाळी अंक २०२१" या मध्ये प्रकाशित झालेला आहे 

#दिवाळी_रांगोळी_आणि_बरेच_काही
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे)
दिवाळी म्हंटले की फराळ आठवतो तसेच त्या दिवसांमध्ये काढल्या जाणाऱ्या भव्य, आकर्षक रांगोळ्याही आठवतात.
आपल्या संस्कृतीत कोणताही सण हा रांगोळी शिवाय अपूर्ण वाटतो.  पूर्वी दारात रोज रांगोळी काढली जायची. रोज काढणाऱ्या रांगोळीत रंग भरले जात नव्हते. पूर्वी मुख्यत्वे टीपक्यांच्या रांगोळ्या काढल्या जायच्या. घरोघरी रांगोळीची एक वही असायची. ज्यात अनेक रांगोळ्या व त्यांची तपशीलवार माहिती लिहून काढलेली असायची.
माझ्या आईनेही रांगोळीला एक वही केली होती. त्यात अनेक छोट्या मोठ्या रांगोळ्या काढून ठेवलेल्या होत्या. पोपट , हत्ती, मोर , राजहंस असलेल्या टीपक्यांच्या रांगोळ्या होत्या. अकरा ते सात , सात ते एक अशा तोडीच्या रांगोळ्या होत्या. ठराविक वार किंवा सणाला अनुसरून ही अनेक रांगोळ्या होत्या. जून्या वर्तमान पत्रात किंवा मासिकात छापून आलेल्या रांगोळ्यांचे फोटोही त्यात चिटकवलेले होते. मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे गेल्यावर तिथे शेजारी पाजारी कोणाच्याही अंगणात  नविन रांगोळी दिसली की आई थांबून रांगोळीचे निरीक्षण करायची. किती ते किती थेंबाची मांडणी केली आहे हे आधी शोधून काढायची . तिथेच कागद पेन घेवून रांगोळी काढून घ्यायची. अगदीच कठिण रांगोळी असली तर ज्यांनी काढली त्यांची थेट भेट घेवून त्यांच्याकडून शिकून घ्यायची. घरी आल्यावर आमच्या पाटीवर त्या रांगोळीचा सराव करायची . तिला रांगोळी जमली की मगच ती तिच्या वहीत रांगोळी काढून ठेवायची. रांगोळी योग्य येण्यासाठी अगदी बारीक सारीक नोंदीही लिहून ठेवायची.
तिच्या या सवयीने तिला अनेक जणांनी भेटतील तिथून नवीन रांगोळ्या शोधून आणून दिल्या होत्या. रोज सकाळी अंगणात सडा शिंपला की पांढरी रांगोळी काढून त्यावर हळदी कुंकू वाहूनच तिच्या दिवसाची सुरूवात व्हायची. तिला रांगोळी काढतांना बघने माझ्या आवडीचे काम होते. म्हणूनच तिने रांगोळी काढायला सुरुवात केली की सकाळी अंगणातली गार हवा अंगावर घेत पेंगुळलेली मी  तिच्या शेजारीच बसुन असायचे. त्यामुळेच कळत नकळत रांगोळीचे संस्कार माझ्या मनावर झाले .
रंगीत रांगोळी ही शक्यतो दिवाळी आली की बाजारात हातगाडीवर विकायला यायची. त्या काळी रंगीत रांगोळी म्हणजे चैन होती. त्यामुळे दिवाळीला पुरेल इतकीच रांगोळी खरेदी केली जायची. कागदी पुड्यामधे ही रांगोळी बांधून मिळायची. सणाच्या घाईतही कोणता रंग कोणत्या पुडीत आहे हे शोधण्यासाठी सगळया पुड्या उघडून बघाव्या लागायच्या. यावर उपाय खास रंगीत रांगोळ्यांसाठी म्हणून मसाल्याचा डबा असतो तसा प्लॅस्टिकचा डबा आमच्या घरात आला. रांगोळीत ठराविकच रंग मिळत होते तरी रांगोळीचा तो डबा बघून मलाही रांगोळी काढण्याचा मोह व्हायचा. मग आईची मनधरणी करून मला माझ्या छोट्या रांगोलीसाठी रंग मिळवावे लागायचे.
दिवाळीत वीस ते वीस, चाळीस ते चाळीस .... किंवा या पेक्षाही मोठया रांगोळ्या काढल्या जायच्या. रांगोळीत रंग भरण्यासाठी जितके हात मिळतील तितके ते हवे असायचे. म्हणूनच एरवी घरातही रंगीत रांगोळीला हात लावण्याची परवानगी नसलेल्या माझ्या सारख्या मुलींनाही शेजारीही रंग भरण्यासाठी बोलावणे यायचे. रांगोळीत रंग कमी पडला की लगेच शेजारच्या घरी तो रंग मागितला जायचा. दुसऱ्या दिवशी जितकी रंगीत रांगोळी घेतली तितकी साभार परत देखील केली जायची. रंगीत रांगोळी जपून वापरली जायची. दिवाळी संपली तसे अनेक रांगोळीचे रंग ही संपून जायचे. संपलेले रंग पुन्हा  पुढच्या दिवाळीतच घेतले जायचे. अनेकदा वर्षभर रंगीत रांगोळी सांभाळावी लागू नये म्हणूनही मोठ्या मोठ्या रांगोळी काढून त्यात ती सढळ हाताने वापरली जायची. दिवाळीच्या दिवशी क्वचित रांगोळीवर पसरवण्यासाठी चमचम ही विकत घेतली जायची. ही चमचम दिव्याच्या प्रकाशात  रांगोळीची शोभा वाढवत असे 
दिवाळीत कोणाच्या अंगणातली रांगोळी भव्य आणि सुबक आहे यावर चर्चा ही व्हायची.
दिवाळीच्या दिवशी तर कामाची एवढी घाई असायची की अनेकदा वाड्यातल्या सगळया मिळून एकच मोठी रांगोळी काढत असू. रंग भरताना गप्पा गोष्टीही रंगायच्या. जाणकार मुलींच्या हाताखाली रंग भरताना नकळत आम्ही कच्चे लिंबू रांगोळीत  तयार व्हायचो. त्याचा आत्मविश्वास घेवून मग वर्षभर छोटया छोटया रांगोळ्या अंगणात काढून बघायचो.
हल्ली रांगोळीत अनेक प्रकार आहेत. एका पेक्षा एक सुंदर कलाकृती रांगोळीत काढल्या जातात. परंतू आजही दिवाळी आली की मला टीपक्यांच्या रांगोळीची ओढ लागते. या रांगोळ्या शिस्तबध्द असतात. आकाराचा, रंगांचा समतोल राखला तर या रांगोळीच्या सोंदर्याची कशाशीच तुलना होवू शकत नाही.  मुख्य म्हणजे टीपक्यातील अंतर कमी जास्त करून तुम्ही या रांगोळीला मोठी किंवा छोटी भासवू शकता. आजी आणि आईने रांगोळीची आवड माझ्यात निर्माण केली . चार ते चार थेंबी  चॉकलेट रांगोळी पासून सुरू झालेला प्रवास अनेक नव नवीन प्रकार आत्मसाद करत पुढे जातोय. पण आजही रांगोळी म्हटलं की मन बालपणीच्या सुखद आठवणीत रमत.
दिवाळी अंकानिमित्त वसूबारस ते भाऊबीज पर्यंत काढता येतील अशा काही रांगोळ्या इथे देत आहे.
वसू बारस म्हणजेच गाय गोऱ्याची बारस. या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लागतो.
बालपणी घरात चकली चिवडा या पदार्थांचा खमंग  दरवळ पसरलेला असायचा.
  "दिन दिन दिवाळी .... गायी म्हशी ओवाळी" .... असे म्हणत आम्ही फुळझडी गोल गोल फिरवत उत्साहात नाचायचो.  त्याचीच आठवण म्हणून गाय वासरू अशी रांगोळी रेखाटली आहे.
दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी . या दिवशी आरोग्य उत्तम रहावे म्हणून धन्वंतरीची पूजा करतात. तसेच घरात असलेल्या धनाची ही पूजा करतात. आमच्या घरी या दिवशी फराळाचे पदार्थ बनविण्याची लगबग राहायची. बेसनाच्या लाडूचा दरवळ दिवाळीची ओढ तीव्र करायचा. त्या दिवसाची आठवण म्हणून मांगल्याचे प्रतीक कलश आणि लक्ष्मीचे प्रतिक कमळ रांगोळीत रेखाटले आहे.
तिसरा दिवस लक्ष्मी कुबेर पूजन म्हणजेच दीपावलीचा. या दिवशी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घर , आंगण, घरातली लहान थोर मंडळी सगळेच नटून थटून तयार असतात. आमच्या घरी ही सगळ्यांचीच धामधूम असायची. खास दिवाळीसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत सगळेच उत्साहात असायचे. आई नैवेद्यासाठी म्हणून गरमा गरम  अनारसे आणि बासुंदी करायची. बासुंदी लवकरच खायला मिळणार या उत्साहातच आम्ही बच्चे कंपनी आमच्या किल्याची सजावट पार पाडत असू. आज जणू अंगणातल्या पणत्या आणि आकाश कंदील मांगल्याच्या तेजाची उधळण करत असतात असाच भास मला  होत असे. त्याचीच आठवण म्हणून टीपक्यांच्या रांगोळीत आकाश कंदील, पणत्या आणि स्वस्तिक रेखाटले आहे.
चौथा दिवस बलिप्रतिपदा /दीपावली पाडवा. बळीच्या राज्यात जसे सगळे सुखी समाधानी होते तसेच सुख कायम राहावे म्हणून अंगणात वेगवेगळ्या धान्याचा वापर करून रांगोळी काढली जायची. दिवाळी नंतर पाहुणे आपआपल्या घरी परततील तेव्हा त्याच्या सोबत दिवाळीचा सगळा फराळ  देता यावा म्हणून आई  शंकरपाळी आणि शेव असे काही राहिलेले पदार्थ करण्याचा घाट घालायची. म्हणूनच बळी राजाची आठवण करून देणारा आणि शेतात राबणारा  बैल रांगोळीत रेखाटून त्यावर समाधानाची झुल चढवलेली आहे.
" इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो" असा संदेश वेगवेगळी धान्ये वापरून लिहिला आहे. 
पाचवा दिवस भाऊबीज . आज घरी परतणाऱ्या पाहुण्यांची सामान भरण्याची लगबग सुरू असायची. त्याच्यासोबत देता याव्यात म्हणून सगळयात शेवटी ओल्या नारळाच्या करंज्या बनवल्या जायच्या.  ओल्या नारळाच्या करंजीचा खुसखुशीत गोडवा घेवूनच भावला ओवाळले जायचे. त्याचीच आठवण म्हणून बहिण भावला ओवाळते आहे अशी रांगोळी रेखाटली आहे.  प्रत्येक रांगोळी ही अनेक  आठवणींना उजाळा देणारी आहे. घरी आलेले पाहुणे दिवाळीचा फराळ शिदोरी म्हणून नेताना अनेक नविन रांगोळ्या शिकून आणि शिकवून ही जायचे. पुढच्या दिवाळीत पुन्हा भेटू असे आश्वासन देवून निरोप घेतले जायचे.
मागे राहायच्या फक्त काही  खुणा.  ओल्या अंगणातल्या रंगीत रांगोळीचा रंग अनेक दिवस दिवाळीची आठवण मानत रेंगाळत ठेवायचा. आजही दिवाळीतल्या आठवणींचा तो रंग ओल्या मनात त्याच्या खुणा जपून आहे.
तुमच्याही दिवाळी बद्दल अशाच अनेक गोड आठवणी असतील. याची मला खात्री आहे.

या रांगोळ्या कशा काढल्या याचे व्हिडियो
*Rang Majha Vegala by Anjali M* या यु ट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.
Rang Majha Vegala by Anjali M चॅनेल लिंक 👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

*रंग माझा वेगळा* फेसबुक पेज लिंक 👇👇
https://www.facebook.com/AnjaliMinanathDhaske/

तसेच *आशयघन रांगोळी* या ब्लॉग वरही अनेक रांगोळ्या उपलब्ध आहेत.
*आशय घन रांगोळी* ब्लॉग लिंक 👇👇👇👇
http://anjali-rangoli.blogspot.com

©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे)




वसू  बारस  रांगोळी: link 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/IpGoTT_uZt8



धनत्रयोदशी रांगोळी: link 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/BmXAmjHdZ0s



लक्ष्मी पूजन रांगोळी :link 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/EtxQo5vgMiY




बलिप्रतिपदा रांगोळी :link 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/ien1_oIdrPg



भाऊबीज रांगोळी :link 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/qC6DZWaIbX0







No comments:

Post a Comment