बाल मनाचा प्रश्न

 #बाल_मनाचा_प्रश्न

©अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे )

साहिल हा ७ वर्षांचा अतिशय जिज्ञासू मुलगा. त्याला सतत काहीना काही प्रश्न पडत असतात. त्या सगळया प्रश्नांची उत्तरे देता देता त्याची आई निशा... हिच्या मात्र नाकी नऊ येतात.

       रविवार हा घरात सगळ्यांचा सुटीचा दिवस. साहिलच्या बाबांना फिश , चिकन किंवा मटण खाल्याशिवाय रविवार अपूर्ण वाटे. घरातल्या इतरांनाही मांसाहार म्हंटले की तोंडाला पाणी सुटे.  साहिल मात्र याच्या अगदी उलट होता. त्याला मांसाहार अजिबात आवडत नसे. 

        नेहमीप्रमाणे निशाने साहिलसाठी त्याच्या आवडीचे आलू पराठे आणि घरातील बाकी सगळ्यांसाठी  मस्त फिश करी, फिश फ्राय सोबतीला ज्वारीची भाकरी आणि भात असा  बेत केला होता. सगळ्यांची पाने वाढली . तिलाही कडकडून भूक लागली होती. पहिला घास घेतला तेवढ्यात शाकाहारी  असणाऱ्या सहिलने  इतके दिवस मनात दाबून ठेवलेला प्रश्न  अखेर तिला विचारलाच.

      "आई.... तू नेहमी म्हणतेस मुक्या प्राण्यांवर दया करावी. मात्र रविवार आला की तू  स्वतःच मुक्या प्राण्यांचे जेवण बनवते. असे का?"

       खरं तर निशाला इतकी भूक लागली होती की त्यापुढे साहिलच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यावे असे तिला वाटत नव्हते. 

साहिलने घरातील इतरांप्रमाणे मांसाहार करावा अशी सक्ती तिने कधीच केली नव्हती. साहिलच्या प्रश्नाने मात्र  घरातल्या सगळ्यांचेच मांसाहारावर असलेले प्रेम धोक्यात आले होते.

" अरे तू रस्सा खावून तर बघ ... तूही फिश करीच्या प्रेमात पडशील " असे म्हणत बाबांनी साहीलच्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. तर " मांसाहार करायलाच हवा.... त्यानेच तर शरीर ताकदवर बनते " अशी पुष्टी जोडत आजोबांनी फिश फ्राय वर ताव मारायला सुरुवात केली. 

सहिलच्या नजरेत अजूनही प्रश्न आहे तसाच होता . त्या जाणिवेने निशाला अस्वस्थ केले. काहीही सांगून तिलाही प्रश्नाला बगल देता आली असती परंतू तसे करणे चुकीचे ठरले असते.

"जेवण झाले की तुला नक्की सांगते ह " म्हणत निशाने त्याला पटेल असे उत्तर शोधण्यासाठी वेळ मिळवला.

   सगळ्यांचे निवांत जेवण झाले. राहिलेली कामे उरकून निशा   झोपाळ्यावर आरामात डुलत  बसलेल्या साहिलकडे गेली. 

तीने साहिलला समजवायला सुरूवात केली. " साहिल ... तुला माहीत आहेच की प्रत्येक सजीव प्राणी हा तीन गटापैकी एका गटात नक्की असतो. शाकाहारी, मांसाहारी आणि मिश्र आहारी.... असे तीन गट आहेत.

शाकाहारी म्हणजे ?"त्यावर साहिल ने लगेच उत्तर दिले " जे फक्त भाजीपाला खातात ते " निशा बोलली ," आपण फक्त भाजीपाला खातो . इतर शाकाहारी प्राणी  झाडपाला, गवत  ही खातात. आता मांसाहारी प्राणी म्हणजे काय सांग?"

त्यावर साहिल बोलला," असे प्राणी जे इतर प्राण्यांना खातात"

निशा बोलली," अगदी बरोबर.

 मिश्र आहारी म्हणजे असे प्राणी जे शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करू शकतात. हे प्राणी आपल्या गरजेनुसार किंवा उपलब्धतेनुसार आपला आहार बदलू शकतात. मनुष्य प्राणी हा मिश्र आहारी प्राणी आहे. फार पूर्वी आपण फक्त शिकार करून खात होतो. शिकारीसाठी एकाठीकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत होतो. जंगलात भटकतानाशिकार नाहीच मिळाली तर फळे खाण्याचा पर्यायही ही आपल्याला गवसला. 

 कालांतराने आपल्याला शेतीचे ज्ञान प्राप्त झाले. शेतीमूळे आपल्याला एकाच ठिकाणी थांबण्याची गरज निर्माण झाली. याच दरम्यान अन्न शिजवून खाल्ले तर ते लवकर पचते या शोधातून पाककला जन्माला आली. या काळात आपण शाकाहारी आणि मांसाहारी असे अनेक पदार्थ बनवायला शिकलो. ऋतूनुसार जे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असे शाकाहारी पदार्थ आणि मांसाहारी पदार्थ यांची साठवणूक करायला शिकलो. पूर्वी शेती फक्त पावसाच्या पाण्यावरच केली जायची. पाऊस नसेल तेव्हा शिकार करून खाणे हाच पर्याय होता.  या समस्येवर उपाय म्हणून मग आपण प्राणीही पाळायला लागलो. गाय शाकाहारी असते तिला चारा देवून त्या बदल्यात आपण तिचे दूध मिळवू लागलो. बकऱ्यानपासून मास आणि दूध  तर कोंबड्यापासून मास आणि अंडी मिळवली जावू लागली. नदीत किंवा समुद्रात  मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारे मासे ही पकडून खावू लागलो.

शेतीसोबताच ज्या प्राण्यांचा आहारात समावेश करु शकतो अशा प्राण्यांची संख्या आपण कृत्रिम रित्या वाढवतो . जेणेकरून त्या प्राण्यांची संख्या कमी होता कामा नये, निसर्गाचा समतोल राखला जावा. तसेच प्रतिकूल परिस्थितीत हे प्राणीच आपला आहार बनतील. 

 जगातल्या प्रत्येकाने शाकाहारी बनण्याचे ठरविले तर सध्या आपल्याकडे सगळ्यांना पुरेल एवढे धान्य, भाजीपाला उगविण्यासाठीची जागा उपलब्ध नाही . तसेच  उपलब्ध जागेत आपण पूर्णपणे शाकाहार स्वीकारला तर इतर शाकाहारी प्राण्यांना खाण्यासाठी काहीच मिळणार नाही. कारण मांसाहारी प्राण्यांच्या तुलनेत शाकाहारी प्राण्यांची संख्या ही भरपुर आहे.

आपण पूर्णपणे मांसाहार स्वीकारला तरी प्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी आपल्याला जागा कमीच पडणार आहे. तसेच आपण मांसाहारी प्राण्यांची शिकार केली तर निसर्गाचा समतोल ही राखला जाणार नाही.

 जगण्यासाठी आपल्याला प्राणवायू देणारी झाडेही हवीच आहेत. 

आपली एक अन्नसाखळी आहे.... गवत, झाडपाला भाजीपाला उगवतो ... तो शाकाहारी प्राणी खातात... शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात.

मिश्र आहारी प्राणी काही गोष्टी झाडांपासून मिळवतो, काही शाकाहारी प्राण्यांपासून मिळवतो ... यामुळे पूर्णपणे मांसाहार करणाऱ्या प्राण्यांचेही रक्षण होते. ही झाली मानवाच्या आहारात मांसाहार समाविष्ट असण्याची छोटी पार्श्वभूमी.

आता तुझ्या मूळ प्रश्नाकडे जावू ....

मी मांसाहार करते तेव्हा फक्त मानवाने खास खाण्यासाठी वाढविलेले प्राणीच वापरते. डोळ्यांना दिसतील ते  सगळे प्राणी आपण आहारात वापरावे ... किंवा निव्वळ चव अप्रतिम लागते म्हणून निसर्गाचा समतोल न राखता कोणत्याही प्राण्याचे मांस मिळविण्यासाठी शिकार करावी या मताची मी मुळीच नाही. कृत्रिम रित्या संख्या वाढविलेल्या प्राण्यांची आयुष्य मर्यादा कमी असते. त्यांचा उद्देशच मुळी आपल्याला मांस पुरविणे हा असतो.

 पालेभाज्यातून शरीराला जीवन सत्वे मिळविण्यासाठी भरपुर प्रमाणात पालेभाज्या खाव्या लागतात.  पालेभाज्या शिजविल्या तर त्यातील जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी होते. कच्या पालेभाज्या आपल्या आहारात फारशा नसतात . अशा वेळी आठवड्यातून एकदा दोनदा  मांसाहार करून आपल्या शरीराला आवश्यक असे जीवन सत्व मिळवण्याचा प्रयत्न करते. घरातली जाणती मंडळी नेहमी सांगायची  मांसाहाराने शरीराची झीज लवकर भरून येते. झाडे काय किंवा प्राणी काय दोन्ही सजीव असतात हे शाळेतल्या विज्ञानात शिकले . लहानपणापासून आम्ही मांसाहार करत आलो म्हणूनही ते करतांना तुझ्या सारखे प्रश्न कधी पडले नाही. 

मला भाजीपाला , फळे ही आवडतात आणि फिश फ्राय, चिकन बिर्याणी ही तेवढीच आवडते.

 परंतू तुझ्या प्रश्नावर एवढच सांगेन....

आपल्या शरीराला आवश्यक अशी जीवनसत्वे आपण शाकाहार किंवा मांसाहार या दोन्हीतून मिळवू शकतो. ज्याला जे आवडते ते खाण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. तुला काय आवडते ते तू खावू शकतोस. तुला आवडत नसेल तर मांसाहार केलाच पाहिजे असा आग्रह तुला कधीही कोणी करणार नाही. मांसाहार करणे चांगले असेही तुला सांगणार नाही. स्वतः साठी तू जे निवडशील त्यात मी तुझी साथ देईल हे मात्र नक्की.

 इतरांनी मांसाहार करावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. तुला आवडत नाही म्हणून त्यांना कधी  नावे ठेवू नकोस. आहार कोणताही आसो...अन्न हे पूर्णब्रह्म असते त्याचा आदर करावा. 

आहार कोणताही असू दे... त्यातून आपल्याला आवश्यक ती सगळी जीवनसत्वे मिळावी आणि खाताना जिभेला त्याची चव जाणवावी येवढाच उद्देश असावा. "

निशाने साहिलला तिच्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. काही अंशी त्याला पटलेही. मोठं झाल्यावर त्याचे त्यालाच चांगल्या प्रकारे कळेल. 

आहार पद्धती कोणती असावी हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे . एकाच घरात जेव्हा भिन्न पद्धतीचा आहार घेणारे व्यक्ती असतात तेव्हा असे मतभेद किंवा प्रश्न उपस्थित होणारच. कोणत्याही एकाने दुसऱ्यावर आहाराबाबत  सक्ती करु नये. उलट एकमेकांच्या मतांचा, आवडीनिवडीचा कायम आदर करावा.  आहार घेतांना शरीराला पोषण मिळणे आणि घरातील प्रत्येक सदस्य आनंदी असणे  महत्त्वाचे.... बाकी सगळे गौण आहे. 

©️अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे )

टिपः लिखाण आवडल्यास नावा सहित शेयर करावे. मुले अनपेक्षित असलेले प्रश्न विचारतात आणि पालक म्हणून उत्तर देताना आपल्या बुध्दीचा कस लागतो. आपल्या साठी शुल्लक असलेल्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. तेव्हा आपली मते त्यांच्यावर न लादता त्यांच्या शंकेचे निरसन करणे आवश्यक असते.  पिरियडस् , मुलांची उत्सुकता आणि गूगल , हनिमून म्हणजे काय ग आई? अशा संवेदशील विषयावर ही पालक या भूमिकेतून मी लिखाण केलेले आहे. असे आणि इतर लेख हे आशयघन रांगोळी (anjali_rangoli.blogspot.com) , रंग माझा वेगळा या fb पेज वर उपलब्ध आहे. नक्की भेट द्या. लेख लिहितांना  चूक भूल माफ असावी.


सोप्या सुंदर रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. 

तसेच रंग माझा वेगळा या face book  पेज लाही follow करा 
ईतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे 



No comments:

Post a Comment