नवरात्री सिरीज आणि बरेच काही

 #नवरात्री_सिरीज_आणि_बरेच_काही

#रांगोळीचा _बाल_चाहता

#रांगोळीची_ज्येष्ठ_चाहती

 नवरात्र निमीत्त अगदी सोप्या रांगोळ्या आणि देवीच्या प्रत्येक रुपाबद्दल थोडक्यात महिती अशा स्वरूपाची व्हिडियो मालिका मी तयार केली . या मागचा उद्देश नवरात्रीचे यावर्षीचे नऊ रंग याची माहिती देता यावी तसेच अशा सोप्या रांगोळ्या असाव्यात की ज्या पाहून त्या काढून बघण्याचा मोह अनावर व्हावा. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे देवीच्या नऊ रूपाची नावे आणि त्या संबंधीच्या आख्यायिका ज्यांना माहित नाही त्यांनाही सहज माहिती व्हाव्या. 

             जेव्हा आपण प्रचंड मेहनत घेवून काही तरी सादर करतो तेव्हा त्याचे चीज व्हावे हेच ध्येय असते. नवरात्र सिरीज बनविण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अनेक टेक्निकल आणि वैयक्तिक अडचणी आल्या. टेक्निकल बाजू कमजोर असल्याने चुकांमधून मी शिकते आहे.  परंतू हे करत असताना वेळ आणि मेहनत खर्ची पडते. ...

         या खडतर प्रवासात दिलासा देणारी बाब घडली. माझ्या व्हिडियोचा  पहिला वहिला बाल चाहता मला गवसला. रांगोळी सोबत कथा असल्याने  त्याला रांगोळी मालिका बद्दल आवड निर्माण झाली. ही आवड इतक्या प्रमाणात होती की आवडलेली रांगोळी जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत हा चाहता गप्प बसला नाही . इतकेच नाही तर ," मी तुझ्या व्हिडियो ला लाईक, कमेंट subscribe करून बेल आयकॉन चे बटन दाबले . तू माझ्यावर खुश आहेस का? अरे

पण मोबाईल आईचा आहे  म्हणून 

मी तुझीलिंक शेअर करू शकलो नाही. तू खूश आहे ना ?"

असे फोनवर बोलून मला पुरते खूश नाही तर घायाळ केले.

आता या बाल चाहत्याला रांगोळी काढून बघण्याचे वेध लागले.

"आता नको नवरात्र सुरू झाले की काढ रांगोळी" असे सांगून त्याचा उत्साह थोपवण्यात आला . हार मानेल तो बाल चाहता कसला..... त्याने नवरात्र सुरू होण्याची वाट बघितली आणि अखेर रांगोळी मिळवून त्याने त्याला आवडलेली रांगोळी रेखाटलीच.

हा जिद्दी बाल चाहता म्हणजे माझा सहा वर्षाचा भाचा अंशुल असून त्याची रांगोळी मी इथे देत आहे. कारण जेव्हा त्याने मला माझी रांगोळी खूप आवडली , कथा आवडली असे सांगितले तेव्हा 

मला वाटलं रांगोळी, कथा आवडली इथपर्यंत ठीक आहे नंतर हा रांगोळी काढण्याची त्याची इच्छा विसरून जाईल. 

 परंतु आठवणीने त्याने मला ही रांगोळी पाठवली आणि सोबतीला गोड गोड आवाजात व्हॉईस मेसेज पाठवला तेव्हा ती रांगोळी बघून आणि त्याचा मेसेज ऐकून मला आकाश ठेंगणे झाले.

रांगोळी बघून अंदाज येईल की या वयात अशी रांगोळी काढली म्हणजे येत्या काही वर्षांत त्याने अशीच आवड टिकवली तर त्याच्या रांगोळीचा मोठा चाहता वर्ग नक्कीच निर्माण होईल. रांगोळीची परंपरा फक्त जोपासली जाणार नाही तर ती वृद्धिंगत होईल...

त्याने त्याची आवड जपावी आणि त्यात अधिकाधीक प्रावीण्य मिळवावे हिच सदिच्छा.

नवरात्री सिरीज बघून माझ्या आईलाही तिचे जूने दिवस आठवले. परंतू गेली अनेक वर्षे खाली बसून रांगोळी काढणे जमत नसल्याने तीची रांगोळीची आवड मागे पडली. परंतू नवरात्री येणार आहे निमित्ताने तीही रोज छोटया छोटया रांगोळ्या काढून बघू लागली. तिला ठिपक्यांच्या आणि फक्त पांढरी रांगोळी वापरून काढलेल्या रांगोळ्या अधिक आवडतात  परंतू आज तिने प्रथमच डिझाईन आणि रंगीत रांगोळी वापरून बघितली. तिने  ब्रह्मचारिणी ही रांगोळी काढली आणि मला फोटो पाठवला . " हल्ली बारीक सरळ रेष येत नाही... जपमाळसाठी ठिपके नीट पडले नाही....  डिझाईन नाहीच जमत ग मला तरी आज प्रयत्न केलाच बघ... हवी तशी जमली नाही पण काढून बघितली आणि स्टेटसला ठेवली आहे बघ तुला आवडली तर... " असे सांगितले. 

रांगोळी कशी आली यापेक्षा अनेक वर्षांनी तिने रांगोळी पुन्हा हातात घेतली याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही.

आज एका ज्येष्ठ तर एका बाल चाहत्याने माझ्या नवरात्री सिरीजला अतिशय भावनिक करणारा प्रतिसाद दिला आहे. 

आज हे चाहते माझ्या घरातले आहेत म्हणून मला त्यांची प्रतिक्रिया कळली परंतू माझ्या मैत्रिणी सांगतात की त्यांची आजी, मावशी , काकू माझे व्हिडियो लिंक पाठवल्यास त्यावर क्लीक करून आवर्जून सगळे व्हिडियो बघतात परंतू टेक्निकल अडचणी असल्याने त्यांना लाईक कमेंट करणे सूचत नाही/ जमत नाही.

 त्यामूळेच मला खात्री आहे की असे अनेक चाहते आहेत की ज्यांना टेक्निकल अडचणी असल्याने ते प्रतिसाद नोंदवू शकत नाहीत परंतू ते प्रेरित मात्र नक्कीच होतात. त्यांनी प्रेरित होणे हाच मुख्य हेतू असल्याने तो सार्थकी लागतोय याचा आनंद मोठा आहे.

" किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला "

टिपः माझा व्हिडियो बघण्याची इच्छा झाली तर आधीच्या अनेक पोस्ट मधे लिंक दिलेली आहे. ही जाहिरातीची पोस्ट नसल्याने इथे लिंक देणे संयुक्तिक वाटतं नाही. आजचा लेखा ज्या बाल आणि ज्येष्ठ चाहत्यासाठी आहे त्यांचीच रांगोळी इथे देत आहे.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire )








No comments:

Post a Comment