पराभव


   #पराभव
  ©️ अंजली मीनानाथ धस्के

              ती या रेड लाइट एरियात गेली अनेक वर्ष रहात होती. रिटा हे नाव तिला कोणी दिलं हेही तिला नक्की आठवत नाही. तिचं कोणी जगाच्या पाठीवर कुठे असेल याबद्दलही तिला खात्री नाही. तिला समजायला लागायच्या आधीच ती इथे आली होती. बाहेरचं जग कसं आहे याची तिला काहीच कल्पना नव्हती. तिच्या लक्ष्मी अक्काला ती कचऱ्याच्या टोपलीत सापडली होती. लक्ष्मी अक्का स्वतः देह विक्री करून गुजरान करत होती. कितीही धंदा करा तिच्या हातावर गरजेपुरते पैसे ठेवले जायचे. तरी तिच्यातल्या ममतेला पाझर फुटला होता. तिने आपल्या घासातला घास देवून रिटाला वाढवल होतं.  
लक्ष्मी अक्का जिथे रहात होती तिथे रिटा  सुरक्षित नव्हतीच पण बाहेरच्या जगात ही ती सुरक्षित राहील याची काहीच खात्री लक्ष्मी अक्काला नव्हती.
    खरं तर रिटाला चांगल आयुष्य जगता यावं यासाठी तिने सुरवातीला खूप प्रयत्न केले.
रिटानेही सुरवातीला यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता पण बाहेरचे लांडगे तिचे लचके तोडायला तयारच होते.
          लहानपणापासूनच रिटा नको ते सगळं बघत आली होती म्हणूनच की काय तिलाही या सगळ्याच काहीच वाटतं नव्हतं.
बाहेरच्या जगापेक्षा  रेड लाइट भागातल जग तिला जास्त सुरक्षित वाटू लागलं होत. बाहेरच्या जगाने तिला नाकारलं होत म्हणूनच तर ती इथे होती.
लक्ष्मी अक्काने तिला स्वीकारलं तस इथल्या लोकांनीही तिला आपलं मानलं होत. तिच्यासाठी जीव तोडणारी चार आपली म्हणावी अशी माणसं इथे होती . म्हणूनच तिनेही हळू हळू बाहेर पडण्याचा विचार सोडून दिला.
तसही सगळं सहन करता येत पण पोटातली आग सहन करणं कठीण या पोटाच्या आगीपुढे दोघींचही काहीच चाललं नाही.
       सुरवातीला हे अंगवळणी पडायला जड गेलं पण हळूहळू ती या धंद्यातल कसब शिकू लागली.
      काही गोष्टी तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की गिऱ्हाईक खुश झाला की हवा तो दाम द्यायला तयार असतो.
दुसरं म्हणजे एकदा का वय निघून गेलं तर इथे कुत्र तुमचं हाल खात नाही. कधीही आणि
कसेही गिऱ्हाईक आले तरी तयारच रहावं लागतं.
ती लक्ष्मी अक्कासारखी  मिळतील ते पैसे घेवून गप्प बसणारी नव्हती. तिच्या मर्जीने आणि हवा तेवढा दाम मिळाल्यावरच ती तयार व्हायची.
     स्वत:च्या दिसण्यावर, टापटीप रहाण्यावर ती विशेष लक्ष द्यायची . इथला सगळा खेळ दिसण्यावर आहे हे ही ती जाणून होती.
  एकीकडे   तिच्यामुळेच लक्ष्मी अक्कालाही आता चार सुखाचे घास मिळत होते. पैसा मिळत होता तरी येणारा प्रत्येकच जण फक्त तिच्या शरीराचे लचकेच तोडत होता. म्हणून  दुसरीकडे लक्ष्मी आक्काला  आपल्याच मुळे पोरीचे असे हाल होतात अशी  बोचनीही सतावायची.
        कितीही त्रास झाला तरी रिटा सगळ्या वेदना लपवत गिऱ्हाईक आलं की हसत तयार व्हायची. तीला असं बघून लक्ष्मी अक्काच काळीज तीळ तीळ तुटायच पण रिटा मोठी धीराची . ती अक्काला समजवायची,
"अग इथे दोन घास तरी मिळतात , आपल्या म्हणाव्या अशा जीवा भावाच्या मैत्रिणी आहेत. जोपर्यंत जवानी आहे तोपर्यंत कमावून घेते . एकदाका गिऱ्हाईक कमी झालं की मग जमवलेले पैसे घेवून बाहेर पडू" .
       धंद्यात जम बसवून दोन वर्ष लोटली नव्हती तर कोरोना नावाच्या विषाणूचे जगात आगमन झाले. बघता बघता या विषाणूचा प्रवेश रिटा रहात होती त्या रेड लाइट एरियात ही झाला.
गिऱ्हाईक कमी होता होता बंदच झालं. आहे त्या पैशावर तग धरून दिवस काढावे तर तिच्या मैत्रिणींची होणारी उपासमार तिला सहन होईना. सगळ्यांसाठी पुढचे अनेक महिने पुरेल इतका पैसाही तिच्याजवळ नव्हता. तरी ती जमेल ती मदत करत होती.
त्यातच लक्ष्मी अक्काला कोरोनाची लागण झाली. दोघींची ताटातूट झाली. रिटाची चाचणीही    पोझीटीव्ह आली.  रिटाने  कोरोनाला हरवत एक लढाई जिंकली .
तिला तिच्या घरी सोडण्यात आले. घरी येवुन बघते तर सगळाच संसार चोरीला गेलेला. चोरट्यांनी सगळी जमापुंजीही चोरून नेली होती.
         सगळ्यांनी दुरून धीर दिला . जीव महत्वाचा सांगत आठ दिवस एकवेळच जेवणही दिलं. शून्यातून पुन्हा सुरवात करावी तर लॉकडाऊन वाढवल्याची बातमी आली. कोरोनाची दहशत वाढली . मदत करणारेही तिच्या जवळ जायला तयार नव्हते.
गिऱ्हाईक नाही तर पैसे नाही आणि पैसे नाही तर अन्न नाही अशी सगळ्यांचीच अवस्था झाली होती. त्यात तिला मिळणाऱ्या एक वेळच्या जेवणाची ही मारामार झाली . त्यातच लक्ष्मी अक्का या आजारातच देवाघरी गेल्याची बातमी आली. दुरून का होईना तीच अंतिम दर्शन घेता यावे असा रिटाने हट्ट धरला . तिच्या सोबतीला कोणीच यायला तयार झालं नाही. आक्काला शेवटचा निरोप देवून आल्यावर तर
  ज्यांना आपलं म्हणून तिने मदत केली त्यांनीही पाठ फिरवली. अक्का गेल्याच दुःख करायलाही तिला निवांत वेळ मिळाला नाही.
सरकारी मदत मिळत होती पण हिला घराबाहेर पडता येत नव्हतं आणि तिला कोणी घरी काही आणून द्यायला धाजावत नव्हतं.
           एरवी तर  कोणीही सहज तिच्या शरीराशी खेळ खेळला असता. स्वत:ची शारीरिक भूक भागवली असती . त्या निमित्ताने रीटाचीही पोटाची खळगी भरली असती पण आता फुकटात ही कोणी तिला हात लावायला तयार नव्हतं .
बाहेरच्या जगाने तिला नाकारलं तेव्हा रेड लाइट जगातल्या आक्काने तिला स्वीकारलं होतं पण आता तर या रेड लाइटच्या जगानेही तिला नाकारलं होत. ती पुरती खचली. आक्काच्या कुशीत शिरून रडावं तर तीही सोडून गेली. हे दुःख तिला सहन होईना तिची जगण्याची इच्छाच संपली.
     इतरांची शारीरिक भूक भागवणाऱ्या तिचे प्राण तिचीच पोटातली भुक घेवू पहात होती. एक विषाणू काय आला सगळ्यांनी तिची  साथ सोडली .
कोणी साथ दिली नाही तरी
तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या पोटातली भुकच तिची साथ देणार होती. ही आयुष्याची  शेवटची आणि महत्त्वाची शिकवण कोरोना नावाचा विषाणू तिला  देत होता.
कोरोना विरूद्धची लढाई तर ती जिंकली होती पण आज पराभूत झालेला तोच विषाणू तिच्यावर हसत होता कारण *भुके विरुद्धच्या लढाईत तिचा पराभव होत होता.*
  ©️ अंजली मीनानाथ धस्के
या
(टिपः लिखाण आवडल्यास नावासहिताच शेयर करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.)

No comments:

Post a Comment