पोपट

#पोपट


      सात आठ वर्षांपूर्वीची घटना . बाळ राजे नर्सरी मधे असतील.
आमच्या बाळराजेंची पहिली तोंडी परीक्षा होती. तेव्हा नवीनच पद्धत आली होती. मुलांच्या आवडी निवडी, राग रंग बघून त्यांना प्रश्न विचारला जात होते. एकदा उत्तर बरोबर नाही आलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचा कल बघत प्रश्न विचारला जात होता.
उद्देश हाच की , मुलांना सगळं येत असतं पण त्या वेळी जर त्यांची इच्छा नसेल किंवा त्यांना आठवत नसेल तर  त्याचा ताण त्यांच्या मनावर येवू नये. अगदी हसत खेळत प्रश्न उत्तर विचारली जावी.
असो...
         विचारून विचारून असं काय विचारणार लहान मुलांना? जे त्यांना शाळेत दहादा शिकवतात तेच पुन्हा लाडीगोडी लावून विचारणार होते. म्हणजेच पालक यानात्याने आम्हाला मुलांकडून काहीच करून घ्यायचं नव्हतं.
       मी बाळराजेंना शाळेतून आणायला गेले तेव्हा त्याच्या शिक्षिकेने मला बोलावून घेतलं.
     तिने मला सांगितलं की ," आपका बेटा बहोत अच्छा है पढायी मे, बस एकही सवाल का जवाब बार बार पूछने पर भी वो गलत ही दे रहा है "
मी काळजीने लगेच विचारलं ," सवाल क्या है?"
त्यांनी  तत्परतेने सांगितलं ," who eats row chilly?"
मी विचारलं ," तो उत्तर काय देतो आहे ?"
त्यांनी सांगितलं ," पहिली बार जवाब दिया .... मेरे पापा ( my father) दुसरी बार जवाब दिया तोता और मेरे पापा ( parrot and my father)"
माझं तोंड बघण्यासारखं झालं होतं.
त्यावर त्याच बोलल्या ," उसे सही जवाब पता है पर कितनी बार भी पूछा तो ' मेरे पापा ' ये जवाब मे रहताही हैं"
मी सारवासारव करत स्पष्टीकरण दिले की ,"  .... आम्ही महाराष्ट्रीयन असल्याने आमच्या बऱ्याच पदर्थासोबत त्याचे पप्पा ताजी मिरची  खातात ".
त्यावर त्या दिखुलास हसल्या आणि आमच्या बालराजेंना जवळ बोलावलं , " देखो बेटा तुम्हारा जवाब सही हैं पर तुम्हारे पापा को हमने तो देखा नही हैं ना रॉ चीली खाते हुवे ... तो जवाब मे सिर्फ parrot (पोपट) ही बोलना हैं । आया ध्यान में "
आमच्या बालराजेंनी लगेच बोबड्या शब्दात उत्तर दिलं ," मैने भी तो  parrot (पोपट) को रॉ चिली खाते हूवे नही देखा हैं फिर जवाब मे parrot(पोपट) क्यो बोलू "
आता मात्र शिक्षिकेच तोंड बघण्यासारखं झालं होतं. कुठून बुध्दी झाली आणि याच्या पप्पा ने याच्यासमोर मिरची खाल्ली असा विचार मनात येवुन   मला तर मेल्याहून मेल्यासारख झालं होतं .
आमचा संवाद दुरून ऐकणाऱ्या मुख्याध्यापिका आमच्याजवळ आल्या आणि आमच्या बाळराजेंना उचलून घेत म्हणाल्या , "  मीही मिरची खाणारा पोपट फक्त आपल्या पुस्तकातच  बघितला आहे. प्रत्यक्षात पोपटाला इतक्या जवळून बघण्याचा योग  अजून तरी  आला नाही. तुला हवं ते उत्तर दे बाळा. दोन्ही उत्तर बरोबर आहेत." त्याचा पापा घेत त्यांनी मला सांगितले , " हमारे बचपन मे किताबो की बाते  हम कितने आसानीसे मान लेते थे। आज कल के बच्चे होशियार हैं। घरपर जाके उसे बिलकुल दाटना नही । बहुत समझदार बच्चा है।"
          खरं तर  प्रकरण फार वाढलं नाही  म्हणून इकडे माझा  जीव भांड्यात पडला होता.
          घरी आल्यावर जेव्हा घरच्यांना आमच्या बाळराजेंचा हा पराक्रम कळला तेव्हा मात्र सगळ्याची हसून हसून पुरेवाट लागली.
या प्रसंगानंतर बाळराजेंची निरीक्षण क्षमता बघता सगळेच त्याच्यासमोर अदबीने वागू लागले.  पहिल्याच परीक्षेत  बाळराजेंनी पोपटावरच्या प्रश्नाने अनेकांचा पोपट केला होता त्यामुळे बाळराजे काय बघतील आणि शाळेत जावून सांगतील याची अप्रत्यक्ष धास्तीच सगळ्यांनी घेतली होती.
©️ अंजली मीनानाथ धस्के
लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे


No comments:

Post a Comment