मनी वसे ते स्वप्नी दिसे

मनी वसे ते स्वप्नी दिसे


सावीला  एक फोन आला.
 त्यात काय एवढं विशेष . आम्हाला हजारो येतात . आम्ही नाही बाई त्याचा गाजावाजा करत . असे विचार वाचकाच्या मनात येणं साहजिक आहे . खरी गोष्ट तर पुढे आहे . त्यासाठी सावीची ही गोष्ट वाचावी लागेल. त्याआधी या फोनची थोडी पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे.

सावीला फेस बुकवर सतत कार्यरत रहायला आवडायचं. अनेक ऑनलाईन ग्रुपची ती सदस्य होती . त्यातील ," सखी मंच" हा ग्रूप तिचा सर्वाधिक प्रिय होता . यावर येणारी प्रत्येक पोस्ट आणि प्रतिक्रिया यांनी ती भारावून जायची .  इथे जाहिरात करणाऱ्या महिला उद्योजिका आपल्या जाहिरातीसाठी याचं ग्रुपच्या काही  महिलांची निवड करायच्या. जाहिरातीसाठी निवडल्या गेलेली महिला आपले सुंदर सुंदर फोटो टाकून आपला अनुभव सगळ्यांना सांगायच्या . त्या फोटोवर , अनुभवावर खूपच छान प्रतिक्रिया यायच्या. ते वाचून  गृहिणी असणाऱ्या सावीला नेहमीच वाटे , की,
 आपलीही कधी तरी अशी निवड व्हावी . आपणही आपला अनुभव सगळ्यांना सांगावा . सुंदर सुंदर प्रतिक्रिया वाचून येणारा भारी  अनुभव घ्यावा .


तर झालं असं की ,
 सखी मंच या ग्रुपच्या  अधिकृत विक्रेता असलेल्या  एका नामांकित  ज्वेलरी कंपनीकडून हा फोन आला होता . त्यांना त्यांच्या मराठमोळ्या  दागिन्यांच्या जाहिरातीसाठी सामान्य स्त्रीचाच चेहरा हवा होता आणि त्यासाठी सावीहून चपखल व्यक्ती कोणी असूच शकत नाही अशी त्यांची बहुदा खात्री पटली होती. म्हणून त्यांनी तिला फोन केला होता. तीने जरा आढेवेढे घेतले पण तिच्या वेशभूषे पासून ते रंगभूषे पर्यंत सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. तिच्या जाण्या- येण्याची सोय ही केली. तेव्हा तिचा नाइलाज झाला. ती दिलेल्या वेळी दिलेल्या  ठिकाणी पोहचली. थोडी भीती मनात होती  पण तिथे गेल्यावर कंपनीची मालकीण ... वेशभूषा करणारी .... चेहऱ्याची रंग रंगोटी करणारी ...आणि छायाचित्रकार ... सगळ्या बायकाच .... अवतीभवती बघून तिने निर्धास्त होवून  शरीर त्यांच्या स्वाधिन केले .
 त्यांनी बघता बघता तिचा कायापालट केला . आरश्यात जेव्हा तिने स्वत:ला बघितले तेव्हा , " ही😱 मी नव्हेच ... ही तर अप्सरा😜 नभीची" असेच तिला वाटले  . त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तिने त्यांना जाहिरातीसाठी हव्या तशा  पोझ दिल्या .... कधी डोळ्यांना केलेला मेकअप दिसावा अशा बेताने पापण्या खाली ठेवून लाजण्याचा अभिनय करत फोटो काढले , कधी केलेली सुंदर केशरचना  दिसावी या बेताने  रूपगर्वितेचा अभिनय करत मागे वळून बघतांनाचे फोटो काढले, कधी केलेला मराठमोळा साज संपूर्ण दिसावा या बेताने दूरवर बघत असल्याचा ..... एखाद्या सुंदर आठवणींचा विचार करण्यात गुंग असल्याचा अभिनय करून , गळ्यातले मंगळसूत्र  हलकेच पकडून फोटो काढला , कधी अंगणात रांगोळी रेखाटण्यात मग्न असण्याचा अभिनय करून पदरावरचे मोर , पाय दुमडून बसल्यावरही ठसठशीत दिसणारे पायातील पैंजण , उठून दिसणारी नाकातील नथ, हातातल्या बांगड्या, दंडाचे सौंदर्य खुलवणारा बाजू बंद  .... या सगळ्याचे अनेक फोटो काढले . तर कधी सात्विकतेचा अभिनय करत तुळशीला पाणी देतांना, आरतीचे तबक हातात घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात उभे असलेला , हात जोडून नमस्कार करतांना ...असे ही खूप फोटो काढले . तर कधी पुजेसाठी फुल तोडण्याचा अभिनय करत बागेतल्या प्रत्येक फूलं झाडापाशी फोटो काढले.
  इतके फोटो काढले की तिथल्या आवरातली एकही  जागा छायाचित्रणासाठी  शिल्लक राहिली नाही आणि तिचे मनही कसे तृप्त.... समाधानी झाले .
छायाचित्रांची शेवटची प्रत  दोन दिवसात  पाठवायच त्यांनी कबुल केलं. तेव्हा तर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.
 तिने त्यांचे आभार मानले आणि पुन्हा भेटण्याचं आश्वासन देवुन  प्रेमाने त्यांचा  निरोप घेतला.  घरी आल्यावर दोन दिवसात फोटो मिळणार या विचारातच ती शेखचिल्लीसारखी स्वप्न रंगवू लागली. तिचे कशातच लक्ष लागेना . छायाचित्र कसे  आले असतील ? मी चांगली दिसत असेल का? छायाचित्र चांगले आले तर सखी मंच वर लगेच आपण आपला अनुभव सांगून  टाकूया का? . छायाचित्र बघून सगळ्यांना काय वाटेल?? त्या  भरभरून कौतुक करतील का ? कौतुक केले तर आपण काय प्रतिक्रिया द्यायची ?. सगळ्यात छान फोटो निवडून तो मोठा करून  एखाद्या राज घराण्यात असतो तसा आपल्या दिवाणखाण्यात लावूया का??? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात येवू लागले.

आनंदाच्या  नुसत्या उकळ्या फुटू लागल्या. इतका आनंद झाला की...  आनंदाने उड्या मारत " किती सांगू मी सांगू कुणाला , आज आनंदी आनंद झाला " हे गाणं ती मोठ्याने गुणगुणायला लागली .

तेवढ्यात ......

 नवरोबाने गदा गदा हलवून तिला झोपेतून जागे केले. तिला फिट आली आहे  असं समजून तो पुरता घाबरून गेला होता. हात पाय वाकडे करून ... ती काय पुटपुटत होती त्याला काही कळत नव्हतं.  तिला उठवत असतांनाच त्याने गोंधळून विचारलं  , " काय हे? काय  होतय ? हात पाय वाकडे का करतेय? काय त्रास होतोय? स्पष्ट सांग. तुझी ही  झोपेतली बडबड   काहीच कळत नाही   ".

त्यावर अजून झोपेतच असलेल्या सावीने चिडून उत्तर दिले , " पाच मिनिट अजून थांबला असतात तर काय बिघडल असतं . आता फोटोचा अल्बम मिळणारच होता .  "

त्याला काहीच कळले नाही . तो तिच्याकडे  भूत बघितल्या सारखा बघत होता.

त्याचा पांढरा पडलेला चेहरा बघून सावी भानावर आली. इतकी मेहनत करून काढलेल्या फोटोचा अल्बम प्रत्यक्षात कधीच मिळणार नाही हे दुःख पचवत तिने झालेला सगळा प्रकार त्याला नीट समजावून सांगितला तेव्हा मात्र तो ," मनी वसे ते स्वप्नी दिसे" म्हणत पोट धरून हसत सुटला.

©️ अंजली मीनानाथ धस्के








No comments:

Post a Comment