अमावस्या आणि दीप ... तीन १०० शब्दांच्या गोष्टी

"अमावस्या आणि दीप " या विषयावर लिहिलेल्या १०० शब्दांच्या काही गोष्टी

#गोष्ट१
 #आई_आणि_'नेत्र'_दीप
एका लहान मुलाला आगीतून बाहेर काढतांना दोन्ही डोळे गमावलेल्या सुमितच्या आयुष्यात अमावास्येचा अंधार पसरला . सतत दुसऱ्यांच्या मदतीला धावणारा .... असं परावलंबी जीवन त्याला नकोसे झाले. आपण दुसऱ्यावर ओझे झालो या भावनेने खचला  .
त्यातच  त्याला एक क्षणही नजरे आड  न करणाऱ्या ....   माणूस म्हणून वागतांना आपण स्वतःच्या नजरेत कधीच पडता कामा नये. नेहमी संकटांना सामोरे जावे. ही शिकवण देणाऱ्या ....  त्याच्या आईने  जगाचा निरोप घेतला. जाताजाता त्याच्या आयुष्यातील अमावस्येला तिच्या ' नेत्र'दीपानेच नष्ट केले.
त्यानेही 'नेत्रदीप'  नावानेच गरजू लोकांना मदत करणारी नेत्रदानाचे महत्त्व सांगणारी संस्थेची स्थापली. "जिथे दुःखाची अमावस्या  तिथे 'मदतीचा' दीप " ही आईची शिकवण तो विसरला  नाही
©️ अंजली मीनानाथ धस्के


#गोष्ट२

#कर्मकाडांची_अमावस्या_आणि_सत्कर्याचा_दीप

श्रावी ' गुरुकुल' या मूकबधिरांच्या अनाथ आश्रमात आली . श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी, पुलाव असं जेवण बघून पोरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला .
तेवढ्यात सासूबाईंचा फोन आला : कुठे आहेस?
ती: बाहेर
त्या: वाटलच, देवा धर्माचं काही करायला नको ...
  आज दीप अमावस्या ... आधी घरातले सगळे दिवे स्वच्छ करून सायंकाळी  त्यांची पूजा कर .... नाहीतर विसरशील" .
मुलं... "ताई जेवण मस्त झालं" असं  खूणेनीच सांगत होती . त्यांच्या डोळ्यातली चमक ... दिव्यज्योत भासली. ती  सुखावली... सासूच्या  बोलण्याचं वाईट वाटून न घेता खंबीरपणे
म्हणाली ," निश्चिंत रहा. मी सगळं करेन. मात्र  यावेळी दिव्यांचा प्रकाश ... कर्मकांडाची अमावस्या दूर करणारा असेल ".
©️ अंजली मीनानाथ धस्के





#गोष्ट३
#संगीचं_भूत

शास्त्रीबुवांनी सांगितल्याप्रमाणे संगी...  लग्न व्हावं   म्हणून   दीपअमावस्येपर्यंत पारावरच्या पिंपळाखाली वाढत्या क्रमाने दिवे लावायची. आजही ती  एक एक दिवा लावत पिंपळाभोवती फेरी मारत होती.
बस गावात पोहचायला उशीर झाला होता. सगळे गप्पा मारत  पायीच घरी निघाले . गप्पांच्या ओघात "अमावस्येच्या रात्री भूतं दिवट्या घेवून वेताळाकडे हजेरी द्यायला निघतात . अडवणाऱ्यालाच झपाटतात"अशी  माहिती एकाने दिली.

दुरून एक दिवा दिसला तेव्हा भित्र्या गणामास्तरांना  आधार वाटला पण दिव्यांची संख्या वाढत जावू लागली तशी त्यांची बोबडीच वळली. "अमावस्या .. दीप... भूतं... वेताळ " म्हणत  रस्त्यातच  बसले.  मास्तरांची समजूत काढत सत्य जाणून घेण्यासाठी  सगळे पाराकडे गेले. तिथे संगीला दीप प्रज्वलीत करतांना बघून सगळ्यांची हसून पुरेवाट लागली.
©️ अंजली मीनानाथ धस्के



No comments:

Post a Comment