हळदीकुंकू समारंभ (२०१९)

#हळदीकुंकूसमारंभ
#एक_वेगळा_प्रयत्न
             गेली सहा वर्षे मी घरी हळदीकुंकू कार्यक्रम करत नाही . त्या ऐवजी गरजूंना काही देता आलं तर ते देण्याचा प्रयत्न करते. या वेळेस माझी मैत्रीण अंजली मुंगडे माझ्या या उपक्रमात सहभागी झाली .
यावेळ विद्यार्थ्यांसाठी काही मदत करावी या हेतूने मी शाळेत गेले . तिकोने मॅडम यांना मी आमचे बजेट सांगितले आणि त्यात काय देता येईल ते  त्यांनी आम्हाला सुचवावे हा विचार मांडला. त्यावर त्यांनी निवडक विद्यार्थ्यांना देण्यापेक्षा सगळ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची बाटली द्यावी असं सांगितलं. मुलं डब्बा तर घेवून येतात पण पाणी आणत नाही. तुम्ही बाटली दिली तर आमचा प्रश्न सुटेल . मुल रोज पाणी देखील आणतील. असं त्यांनी सांगितलं.
     आम्ही दोघी  शॉपमधे गेलो . सगळ ठरवून ... शाळेचा पत्ता देवुन आम्ही परतलो. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या दिवशी  आमचे समान शाळेत पोहचले.
       शाळेने पालकांसाठी हळदीकुंकूचा कार्यक्रम ठेवला होता . त्यात ते बालवाडीच्या मुलांचे बोरन्हाण ही करणार होते.  पुढच्या पिढीला आपल्या सणांचे महत्व कळावे यासाठी त्यांनी छोटा मनोरंजनात्मक कार्यक्रम ही ठेवला होता. आमच्याही नकळत गणेश जयंतीच्या मुहूर्तावर क्रांतिवीर चाफेकर प्राथमिक शाळेत जाण्याचा योग आला.
          आम्ही नको नको म्हणत असतांनाही तिथे गेल्यावर त्यांनी आम्हा दोघींना " प्रमुख पाहुणे" घोषित केले. खरं तर कुठल्याही प्रकारचा बडेजाव आम्हाला नको होता. पण आमच्या या कृतीतून पालकांना व विद्यार्थ्यांना ही " देण्याचं  " महत्त्व कळेल. आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना त्यांच्यात निर्माण होईल असं तिकोने मॅडमच मत होतं. त्यांच्या मताचा आदर करून आम्ही प्रमुख पाहुणे पद स्विकारले  .  आमचं स्वागत श्रीफळ देऊन केले. गणेश पूजन व सरस्वती पूजन  आमच्या हस्ते केल्या गेले . आमचा परिचय विद्यार्थी व पालकांना करून दिला.  पाटील मॅडम नी हळदीकुंकूसमारंभाचे महत्त्व तर सांगितलेच पण सुंदर गीत ही सादर केले. बालवाडीच्या मॅडम नी खूप सुंदर अभिनय करून विनोदी गीत सादर केले. मलाही दोन शब्द बोलण्याची संधी दिली. आमच्या हस्ते लहान मुलांचे बोरन्हाण ही केले.
         या निमित्ताने पुन्हा माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. थोडेच वर्ष मी शिक्षिका म्हणू काम केले पण शाळेशी असलेलं नातं कधीच संपुष्टात येवू नये असंच मला वाटतं.
        खरं तर मुलांना आनंद देता यावा म्हणून आम्ही गेलो होतो पण तिथून परत येताना  मी व माझी मैत्रीण दोघीही लाख मोलाचा आनंद, समाधान व सकारात्मक उर्जा सोबत घेवून परतलो .
आमची ही छोटीशी सेवा गणेश चरणी अर्पण.......
©️ अंजली मीनानाथ धस्के



No comments:

Post a Comment