एक पिंजरा स्वतःसाठी


#एक_पिंजरा_स्वतःसाठी    
                    गेले पंधरा दिवस माझा छळ सुरू आहे. तसा तो रोजचाच आहे म्हणा ... पण आता उन्हाळ्याची चाहूल लागली म्हणून की काय जरा जास्तच वाढलाय. मोकळ्या  हवेत जरा बसावं म्हटलं तर ते भसकन अंगावर येतात अगदी जादुगराच्या टोपीतून निघावे तसे. दिवसभर मेले  धुडगूस घालतात . ज्या ताटात खातात ( पाणी पितात)त्यातच विष्टा करतात. यांना स्वच्छता नावाला आवडत नाही. चिवुसाठी म्हणून काही ठेवावं तर हेच फडशा पाडतात.   यांना काडी काडी गोळा करून घरटे बांधायला नको . कुंडीतली हिरवळ नष्ट करून तिथेच अंडी द्यायची .  बरं अंडी दिलीत तर ती उबवायला नको? जातात निघून .... म्हणजे झाडं जातं ते जातं पिल्ल ही तयार होत नाही . " तेल गेले ...तूपही गेले हाती राहिले .... धुपाटणे (अंडे) " अशी गत होते.  मेहनतीने वाढवलेली नाजूक रोपं जणू नष्ट करण्याचा  त्यांनी विडाच उचलला आहे. काल तर झेनियाची ५० नाजूक रोपं त्यांनी अशी काही तुडवली... तोडली की जीव चिडला😠 ... रडकुंडीला 😭आला. खुडून टाकलेली रोपं.... त्यात सगळीकडे चिखल माती पसरवलेली बघून मनात सगळे दुष्ट विचार फेर धरुन नाचू लागले.🤔 बंदूक असती ना हाती तर एकेकाला नेम धरून मारलं असतं. 🙄इथं फटाक्याची बंदूक सपडत नाही घरात  लवकर तिथे खरी बंदूक कधी यावी आपल्या हाती.  आता तर चिडचिड 😤 झाली नुसती . वाटलं हाती लागले ना तर मुंडीच पीरगाळून टाकावी एकेकाची .
कल्पनेनंच असुरी आनंद झाला.
बागकाम आवडणारी पण कबुतरांच्या त्रासाला कंटाळून गेलेली मी आणि माझं पापभिरू मन ते ... बिचारं ..  कृती काय करणार ... लागलं  लगेच दुसरे साधे उपाय शोधायला. इतके दिवस आपण पक्ष्यांसाठी पिंजरे तयार केले आता आपण स्वतःच्या घराला जाळ्या लावून  घ्यायच्या ..... पिंजरा तयार  करायचा स्वतः साठीच 😓😓.. हे मात्र मुक्त संचार करणार .... सगळीकडे.
©️ अंजली मीनानाथ धस्के


No comments:

Post a Comment