आड वाटेने जातांना.... (निसर्ग चित्र)

#आड_वाटेने_जातांना
              सहज कधीतरी आड वाटेने जाताना रानात असंच एखादं  मंदिर दिसत  आणि आपली पाऊले आपसूक तिकडे वळतात. त्यात कोणत्या  देवाची  स्थापना केली आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तर असतेच पण अशा निर्जन ठिकाणी  आपल्या जीवाभावच कोणितरी भेटणार आहे याची ओढ ही मनाला लागते. भक्त, भाविकांनी  गजबजलेल्या मंदिरापेक्षा.... या आणि अशा मंदिरात लाभणारी निरव शांतता थेट देवाशी संवाद साधणारी असते. खरंतर आपल्या मनाचा मनाशी होणारा संवाद इतका सुरेख असतो की,त्यातूनच देवाशी संवाद साधला असे वाटते.   कधी या मंदिराकडे बरेच कोणीच फिरकलेल नसतं  म्हणून दुख: होत. तर कधी देवाला वाहीलेली ताजी फुलं बघून कौतुक वाटतं..... "कोण आलं असेल बरं  ही फुल घेवुन!". माळरानावर   शोधक नजर सगळीकडे फिरते......
  उगाच जोरात घंटा वाजवून आपणही फार मोठे भक्त आहोत अस समाधान ही मिळवलं जात. "मंदिरात घटकाभर तरी बसाव "अस म्हणतात. एरवी त्याची फिकीर नसते. संसाराची घाईच असते न कायम. पण या मंदिरातून पाऊल निघत नाही. इथला वारा शरीरालाच नाही तर मनालाही  गारव्याने तृप्त करतो. मनाला लाभलेली प्रसन्नता तर अवर्णनीय असते. निघालेच निग्रहाने तरी  प्रश्न मनात येतोच ...."परत कधी येणे होईल या बाजूला?". परतीच्या प्रवासात सतत वाटतं की मागे काहीतरी राहिलय. मन मंदिराभोवतीच रूंजी घालत रहात. ही रांगोळी काढतांना अशा मंदिरात केलेला पवित्र आणि सुरेल  घंटा नाद च कानात घुमत  आहे असा भास मला झाला. तुम्हालाही असाच एखादा राऊळी घुमणारा  घंटा नाद ऐकू येतोय?
 ©️अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३




No comments:

Post a Comment