निसर्ग चित्र



                 नदी...... माझ्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. मी ज्या ज्या वयात नदीला पाहीलं, मला तीही त्याच वयाची वाटली. अल्लड बालिकेच्या पायातील पैंजणाचा आवाज अधिक सुरेल आहे? की नदीच्या खळखळण्याचा? हे ठरवण फार कठीण आहे. दोघींचाही बालिशपणा मात्र निरागस आहे.                बालिकेची कुमारिका झाली. सौंदर्य बहरायला लागलं. आरस्यात स्वत:ला  निरखून मुरडनं वाढलं . तसे  नदीतही बदल झाले. तिचा किनारा हिरवाईने बहरला. अल्लड खळखळनं जावुन नखरेल वहानं सुरू झालं. वयाच्या याच टप्प्यात नकळत होणारे बदल सहज स्वीकारल्या गेले. मनाला प्रेमाची चाहूल लागली. प्रियकराच्या भेटीसाठी मन आतुर होवू लागलं. मग नदीचंही पात्र रूंदावू लागलं. तीही एक प्रेयसीच भासू लागली. तिला सागर भेटीची ओढ जरी लागली तरी ती उतावीळपणे वहात नव्हती. 
                  लग्न झाल्यावर जेव्हा कोयने किनारी बसले तेव्हा नदीही नववधू सारखी प्रसन्न वाटली. माहेरच्या पंखांची ऊब मागे राहिली याचं दुख: जरी असलं तरी सागर भेटीचा निखळ आनंदही होताच. तिच्याही डोहात अनेक तरंग उठले...... लाजणं , स्पर्शाने शहारणं, पूर्णतेच्या भावनेनं भारून जाणं......या सगळ्या भावनिक  तरंगांनी माझं मनही व्यापुन गेलं.
 काही वर्षांनी जेव्हा मुलाला घेवुन पवनेच्या घाटावर गेले तेव्हा " ती "ही लेकुरवाळीच वाटली. तीही तिच्या डोहात शिरणाऱ्या प्रत्येकाला प्रेमानं न्हावूमाखू घालत आहे असं वाटलं. तिच्याही कुशीत एक गाव विसावलं होतं. तिच्यात आता  अल्लड खळखळन नव्हतं, होता तो शांत प्रवाह. जगाला वाटवं की थांबली आहे, इतका संथ प्रवाह. कुशीत घेतलेल्या लेकराच्या  गरजा पूर्ण करण्यासाठी तिचा वेग कमी झाला पण ती थांबली मात्र नक्कीच नव्हती.
 आता  पस्तीशी ओलांडल्यावर  वाटतंय की तीही संयमी झाली आहे. जबाबदाऱ्या पेलतांना स्वतःसाठीही वेळ काढायला शिकली आहे. पाणी जरी स्वच्छ होतं तरी तिच्या खोलीचा आत्ताही अंदाज घेणं कठीण..... अगदी आपल्या मना सारखं . एवढ्या दूर असलेल्या आकाशाचं प्रतिबिंब तिच्या पाण्यात दिसलं आणि वाटलं तिलाही दुसऱ्यांना  समजून घेणं जमतंय आता. 
 स्वतःच्या भविष्याचा विचार करतांना वाटलं, पन्नाशी ओलांडल्यावर तीही थकलेली वाटेल का? तिच्यातही  पोक्तपणाच्या खुणा दिसतील का? संसारात राहूनही अध्यात्माकडे तिचं मन धाव घेईल का? काळाप्रमाणे स्वतः ला ही थोडं बदलेल का? एवढं मात्र नक्की त्याही वयात तिच्या सौंदर्याचा.... अस्तित्वाचा..... आब ती अगदी उत्तम राखेल. मागे वळून  बघतांना नात्याच्यां चांदण्यात अगदी तृप्त होवून वहात राहिल. 
पुन्हा नव्याने पहाट होईल, नदी किनारी खेळणाऱ्या एखाद्या बालिकेलाही   "ही" नदी पुन्हा  तिच्यासारखीच अवखळ .... अल्लड .... खोडकर वाटेल.............. हा प्रवास असाच सुरू राहील........
©️ अंजली मीनानाथ धस्के
     



No comments:

Post a Comment