नदी आणि स्त्री (निसर्ग चित्र)

#नदीआणिस्त्री
©️ सौ. अंजली मीनानाथ धस्के
            नदीला जेव्हाही मी बघते मला वाटतं की ती एका उत्तम गृहिणीचं  प्रतिबिंब आहे. किती शांत आणि संथपणे वहात असते. तिच्या उदरात होणाऱ्या हालचाली वरवर पाहता आपल्याला कळत देखील नाही. कधी मंजुळ  खळखळते, तर  कधी संघर्ष टाळायचा म्हणून  वळण घेते, कधी पात्र रूंदावते आणि ऐटीत पूढे जाते, अशक्य वाटत असतांना अरूंद होते तरी जाते मात्र पुढे पुढेच. इतकं होवुनही तिची नाळ मात्र तिच्या उगमस्थानाशी  घट्ट बांधलेली असते. रागावते.......तेव्हा पूर येतो  सगळं संपलं असं  वाटत पण तस नसतं....... पुरात ती सुपीक गाळ घेवुन येते कारण तिला माहिती असतं की आपली लेकरं पुन्हा जिद्दीने उभी रहातील. तेव्हा तीही शांत.....तृप्त होवून अखंड वहातच रहाते. एका गृहिणीच ही असंच असत, ती घरासाठी राबते.... हे  बघणाऱ्यांना दिसत नसलं तरी घरातल्यांना  जाणवत, तिच्या मंजुळ हसण्याने घर भरून जातं, नको ती माणसं टाळत आणि आपली ती सगळी माणसं जोडत मित्र परिवार वाढवते , ती ही तिचा संसार फुलवते. वेळ प्रसंगी तडजोड करते पण नाती तुटू मात्र   देत नाही. मुलांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून रागवते, तर  कुटुंब कोलमडून पडू नये म्हणून खंबीरपणे पाठीशी उभीही राहते. संसाराचा गाडा पुढेपुढे नेतांना माहेरची ओढ मनात कायम जपलेली असते. माझ्या नदी विषयी असलेल्या याच भावना मी ह्या  रांगोळीत रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

©️ सौ. अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३


No comments:

Post a Comment