गावाकडच घर


            आज हातगाडी वर विकायला आलेले पेरू  आणि बोर... जांभळं ... बघून... मला माझं गावा कडे असलेलं  घर आठवलं .... बालपणी सुट्टीत गावी गेलो की, सहज घरा बाहेर पडून रान मेवा खात खात डोंगर फिरून यायचो.. आत्ता मात्र खास  ट्रेकिंग करण्यासाठी गावा बाहेर पडावं लागत. सोबत नेलेल बाटलीतल पाणी संपल की वाटतं " कोणे एके काळी वाहत्या पाण्यात ओंजळ भरून यथेच्छ पाणी पिणारी माझ्यातली अल्लड मुलगी कुठे हरवली आहे?".बालपणी शेणाने सारवलेल्या ओट्यावर  बसून बिनधास्त भूईमुगाच्या शेंगा खाणारी मी..... आत्ता मात्र मुलाला सँनीटायझर ने हात धुवायला सांगते. लपंडावाचा खेळ खेळताना .... झाडामागे लपण्यात जी मजा यायची ती झाडंच हरवली आहेत.... आता मुल लपंडाव खेळत नाहीत आणि खेळली तरी पार्किंग मधे पार्क केलेल्या मोठ्या  गाड्यांमागे त्यांना लपाव लागत. त्यामुळे मातीशी त्यांचं नातं जोडल्या जात नाही.  गावाकडंच्या मातीचा सुगंध शहरातल्या परफ्यूमला येत नाही. कुंडीत लावलेल्या झाडाची फुलं तोडतांना अंगणात पडलेला पारीजातकाच्या  फुलांचा सडा  आठवतो. हातगाडी वर मिळणाऱ्या फळांना खावुनही....स्वतःच्या हाताने तोडून खाल्लेल्या रानमेव्याची चव विसरता येत नाही .
आताची बंद दारे बघून  बालपणी शेजाऱ्यांच्या घरात हक्काने केलेला वावर आठवतो.
उंचावरच्या फ्लॅट मधे राहूनही वाऱ्याचा मुक्त वावर मनाला  सुखावत नाही.  पी.ओ.पी. केलेलं  घराचं छत बघून डोळ्यांना बरं वाटतं पण कौलारू घरातलं माझं सुखी,समाधानी मन शोधून सापडत नाही. आत्ता माझ गाव ही बदललं  आणि गावा कडंच घर ही बदललं ... गावाकडची लोकही बदलत चालली आहेत..... माझ्या आठवणीच्या ऍल्बम मधे मात्र माझं गावाकडंच घर अजूनही ज़सच्या तसं आहे.
पुन्हा ते दिवस यावेत.... पुन्हा भरभरून जगता यावं .... या धकाधकीपासून दूर .... जीवनाचा निखळ आनंद घेता यावा असच वाटत राहत....
तसच गावाकडंच एक घर रेखाटण्याचा माझा प्रयत्न तुम्हालाही नक्की आवडेल.
©️ अंजली मीनानाथ धस्के



No comments:

Post a Comment