तळहातावरिल फोड, मी आणि बरेच काही

 *तळहातावरिल फोड, मी  आणि बरेच काही* 

©️Anjali Minanath Dhaske 

मुलीची पाठवणी करते वेळी भाऊक झालेला बाप नवीन जावयला सांगत असतो, "आम्ही आमच्या मुलीला तळहातावरच्या फोडा सारखे जपले आहे"

 हे दृश्य टीव्हीवर बघत असलेली मी मात्र या वाक्याने विचारांच्या गोंधळात पडले. तेथूनच विचार चक्र सुरु झाले..... तेच तुमच्या समोर मांडत आहे. 


"आम्ही आमच्या मुलीला तळहातावरच्या फोडा सारखे जपले आहे " असे मुलीचे पालक कधी अभिमानाने,  कधी भावनिक होवून तर कधी आपल्या मुलीचा सांभाळ तिच्या सासरच्यांनी नीट करावा या अपेक्षेने बोलतात. 

                   वरवर ऐकता आपले पालक आपल्या वर किती प्रेम करतात असे वाटून सगळ्याच मुली या वाक्यावर भावनिक होतात. त्याला कारणही तसेचआहे. ' तळहातावरच्या फोडा सारखे जपणे' या वाक्यात आपण नेहमी जपणे या शब्दाला महत्व देतो.  

याच वाक्यातील 'तळहातावरच्या फोडा' चा विचार केला तर.......

मुळात 'तळहातावर फोड' कुणालाही का हवा आहे किंवा असेल?

फोड यावा आणि आपण त्याला जिवापाड जपावे म्हणुन कोणीही काही विशेष करत नाही.

 तो फोड अपघाताने येतो.  फोड आल्यावर फोडण्याचा प्रयत्न केला तर वेदना देतो म्हणुनच  त्या फोडात लक्ष असे पर्यंत आपण त्याला जपतो. या उलट कामाच्या घाईत किंवा इतर वेळी तो आपोआप फुटतो तेव्हा त्याला जपण्याच्या प्रक्रियेतून आपल्याला मोकळे झाल्यासारखे वाटते. 

पूर्वीच्या काळी देणार्‍याने मुलीसाठी अगदी समर्पक उपमा दिली आहे. त्या काळी बहुदा मुली पालकांना नकोच होत्या. गर्भपात केल्याने मनुष्य हत्येचे पाप लागेल या कल्पनेने मुलींना जन्म दिल्या जात असावा. घरात अपघाताने कितीही मुली जन्मल्या तरी 'वंशाला वारस हवा' हेच अंतिम ध्येय होते. 

मुलींच्या वागण्यावर लावलेल्या अनेक बंधनांना   'जपणे ' असे नाव दिल्या गेले असावे. 

मुळात त्या काळी मुलींना जपण्यापेक्षा सासरी जावून माहेरचा उद्धार होवू नये म्हणून घर कामाला लावत भविष्यातील जबाबदार्‍यासाठी तयार केले जायचे.  तर मुलांना मात्र प्रत्येक वस्तू हातात देण्याची प्रथा होती. मुलांच्या खाण्यापिण्याला ,अभ्यासाला अधिक महत्व दिले जात होते.  मोठा झाल्यावर मुलगा हाताशी येईल असा त्यातही पालकांचा स्वार्थी हेतू होताच.  मुलीला परक्याचे धन  मानून लग्न होईपर्यंत सांभाळायचे हाच मुलींच्या पालकांचा विचार असे. 

मुळात मुलगा असो की मुलगी... पालक म्हणुन आपण त्यांना जपण्यापेक्षा कणखर आणि स्वावलंबी बनवले तर ते त्यांच्या भविष्यासाठी अधिक फायद्याचे आहे. 

जनुकीय बाबतीत विचार केला तर मुलगा असो वा मुलगी.... त्यांच्या कडून पुढच्या पिढीला दिल्या जाणार्‍या गुणधर्मांच्या टक्केवारीची शक्यता सारखी आहे. 

अजून एक विचार असा येतो की आपल्या याच समाजात 'मुलगा मातृमुखी' आणि 'मुलगी पितृमुखी ' असणे चांगले मानले जाते.  याचाच अर्थ  'वंशाचा दिवा' घडविण्यात आईच्या जनुकीय आणि स्वभाव गुणधर्माला महत्व आहे. 

म्हणजेच एक मुलगी लग्न झाल्यावर तिच्या मुलाला जनुकीय आणि स्वभाव गुणधर्म देवू शकते.  ती त्या मुलाला देवू शकत नाही ते म्हणजे तिच्या वडिलांचे  आडनाव आहे. 

या उलट  आईचे गुणधर्म घेवून सुद्धा मुलाला त्याच्या वडिलांचे आडनाव पुढे न्यावे लागते.  

एखादे अडनाव पिढी दर पिढी पुढे जात असले तरी त्याला विशिष्ट अशा जनुकीय गुणधर्माचे बंधन नाही.  

प्रत्यक्षात मनुष्य जीवनात किंवा व्यक्तिमत्त्व घडविण्यात मात्र जनुकीय आणि स्वभाव गुणधर्माचा वाटा फार महत्वाचा आहे.  परंतू आपण आडनाव पुढे नेण्याच्या निरर्थक शर्यतीत डोळे झाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. 

मानवी व्यक्तिमत्त्व हे संपूर्णपणे त्याच्या गुणधर्मावर आधारित आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव आपण विसरण्याची शक्यता असतांना त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची चांगली वाईट छाप दीर्घकाळ आपल्या लक्षात राहते . तरीही आडनावाला महत्व देत ते पुढे नेण्याचा आग्रह धरणारा समाज  किंवा तसे विचार करणारी व्यक्ति खऱ्या अर्थाने समाज कंटक आहे.  तेव्हा ' मुलींना परक्याचे धन' मानून त्यांच्या कडे दुर्लक्ष करू नका कारण दुसर्‍याचे (दुर्लक्षित)धन तुमच्या वंशाला पुढे नेण्यासाठी आपले जनुकीय आणि स्वभाव गुणधर्म देणार आहे. तेव्हा प्रत्येकाने स्वतःचे 'धन' नुसते जपून ऊपयोग नाही तर उत्तम जनुकीय आणि स्वभाव गुणधर्म देवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वागीण विकास करायला हवा. 

अगदी हाच नियम मुलांच्या पालकांना देखील लागू होतो.  नुसते आडनाव पुढे नेण्याचा अट्टहास करण्यापेक्षा  मुलांवर दर्जेदार संस्कार करत चांगला माणुस घडविण्यावर भर दिल्यास भावी आयुष्यातील पन्नास टक्यांची जनुकीय आणि स्वभाव गुणधर्माची  भागीदारी सफल होईल. 

सर्वोत्कृष्ट मानव समाज निर्मितीसाठी मुलगा, मुलगी असे भेद न बाळगता दोघांच्या उत्तम जडणघडणीत समान प्रयत्न अपेक्षित आहेत. तिला /त्याला सर्वार्थाने स्वावलंबी बनविण्यावर भर दिला जावा. 

मुलींना तळहातावर असलेल्या 'फोडा' प्रमाणे जपण्यापेक्षा किंवा सासरच्यांनी तिचा 'सांभाळ ' नीट करावा या अपेक्षा ठेवण्यापेक्षा मुलींना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याकरिता योग्य प्रयत्न करायला हवेत. स्त्री संपूर्ण कुटुंबाचा आधार असते. ती स्वतः सोबत अनेकांचा  सांभाळ नीट करू शकते तेव्हा 'तिचा सांभाळ कोणी करावा'  असे कमकुवत विचार तिच्या मनात चुकूनही बिंबविल्या जाणार नाही याची काळजी घ्या. 

"आम्ही आमच्या मुलींना मुलाप्रमाणे वाढविले आहे " 

"आम्हाला दुसरी 'ही'  मुलगीच हवी होती आणि देवाने आमचे ऐकले"

" हल्लीचे मुलगे ही आईवडिलांना कुठे सांभाळतात त्यापेक्षा मुलीच बर्‍या "

" आमचे नाव आमच्या मुलीनी इतके  मोठे केले की मुलगा नसण्याची उणीवही भासत नाही "

" आम्ही आमच्या मुलींमधे मुलगा पाहतो आणि आनंदी राहतो "

 स्वतः स्वतःच्या मुलींना दुय्यम ठरविणारी ही आणि अशीच अनेक निरर्थक वाक्ये समजता मिसळताना स्पष्टीकरणासाठी बोलण्याआधी त्यांचा नक्की काय अर्थ निघतो आहे.  त्याचा आपल्याच मुलींवर  काय दूरगामी परिणाम होणार आहे. याचा सखोल विचार करायला हवा. 

 पालक म्हणुन आपण आपल्या लेकींचा मनापासून स्विकार आणि आदर करायला हवा. तेव्हाच सासरची मंडळीही तिचा स्विकार करत तिला योग्य तो आदर देतील. 

मुलीच्या बाबतीत शहरातील चित्र बदलत असले तरी सामाजिक विचारांचा पाया अजूनही म्हणावा तसा भक्कम झालेला नाही. याची जाणीव वेळोवेळी मनाला टोचणी देणारी ठरते. 

मुलगा, मुलगी यांचे ' पालक' या विषयाला अनेक कंगोरे आहेत.  तरीही पालक म्हणुन जबाबदारी समान आहे.  तेव्हा आपल्या पोटी जन्म घेणाऱ्या जिवाच्या लिंगाला महत्व न देता आपण आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडायला हवी . 

असे माझे प्रामाणिक मत आहे. 

©️Anjali Minanath Dhaske 

टिप: "तळहातावरिल फोड........" या एका वाक्याने डोक्यात अनेक विचार सुरू झाले. त्यात तिसर्‍यांदा मुलगीच झाली म्हणुन दुःख करणार्‍या आईचे मनोगत वाचण्यात आले आणि मग न रहावून हा शब्द प्रपंच मांडल्या गेलाय.

*विचार आवडल्या नावासहित शेअर करावे*. न आवडल्यास तुमच्या विचारांचा ही आदर आहे.



No comments:

Post a Comment