शीर्षक:फॅशन सोयीसाठीच
( सोनाली बेंद्रे हिची मी काढलेली रांगोळी)
विषय: फॅशन सोयीसाठी की दिखाव्यासाठी
वादविवाद स्पर्धा फेरी लेख क्रमांक ३
©️अंजली मीनानाथ धस्के
पुणे
"एव्हरी लेडी लूक ब्युटीफुल इन सारी" असे आपण आपल्या लेखात सुरुवातीला लिहिले आहे. त्यानंतर संस्कृतीच्या अधःपतनशी वेशभूषेचा संबंध जोडत आगपाखड केली आहे. परंतू आपला मुद्दा पटवून देण्यासाठी आपल्याला प्रादेशिक भाषेपेक्षा परदेशी इंग्रजी भाषा अधिक सोयीची वाटली. म्हणूनच तिचा वापर सहज केल्या गेला. जिथे सोयीसाठी अनेकदा प्रादेशिक पर्याय उपलब्ध असतांना देखील कळत नकळत परदेशी/आधुनिक युगाची भाषा सहज स्विकारली जाते तिथे वेषभूषा सोयीनुसार निवडल्या जात नसेल का?
संस्कृतीचा फॅशनशी जवळचा संबंध आहे हे जरी खरे असले तरी खोलात विचार करता समजून येईल त्या त्या काळाची गरज लक्षात घेता समाजव्यवस्थेचा पाया रचण्यासाठी विविध वेशभूषा, साधन सामग्री जन्माला आली होती.
राज घराणे, मंत्रीमंडळातील प्रत्येक मंत्री आणि नोकरवर्ग यांची वेशभूषा व रहाणीमान नेहमी त्यांच्या पदाला आणि कामाच्या स्वरुपाला साजेसे असे. इतकेच नाही तर समाजातील जातीव्यवस्था अधोरेखित करणारी वेशभूषा आणि रहाणीमान ठरवून दिल्या जात असे. महाराष्ट्रातील महाल,वाडे, माडीची घरे,बैठी घरे झोपड्या असे घरांचे विविध प्रकार आणि नऊवारी नेसण्याचे अनेक प्रकार त्यातूनच जन्माला आले आहेत हे लक्षात येईल. पूर्वी स्त्रियांच्या कामाचे स्वरुप आणि पर्यावरणातील वातावरण बघता वेषभूषा होती. जसे बैठे स्वयंपाक घर होते, धान्य निवडणे, जात्यावर दळण करणे, विहिरीवर पाणी भरणे अशा कामांसाठी लुगडे नेसणे योग्य होते. युद्ध जन्य परिस्थितीसाठी स्त्रियांना लुगडे नेसून सहज सराव करता येत असे. पट्कन घोड्यावर मांड ठोकता येत असे. तेव्हा त्यांच्यासाठी नऊवार बाराही महिने उपयुक्त होती. आता स्वयंपाक घरात ओटा आहे. दळण, कांडप अशी कामे करायला यंत्रे आली आहेत. आजच्या स्त्रीच्या कामाचे स्वरुप बदलले आहे. शिवाय स्त्री नोकरीनिमित्त घराबाहेर पडते आहे. दैनंदिन धावपळ वाढली असून वाहतुकीच्या साधनांचे स्वरुपही आमूलाग्र बदलले आहे. म्हणुनच बदलत्या राहणीमाना सोबत स्त्रियांच्या वेषभूषा ही बदलल्या आहेत. पर्यावरणातील बदलही लक्षात घेता नऊवारी घालायला कितीही आवडत असली तरी ती रोजच्या वापरात आणणे कठीण आहे. जेव्हा घराणेशाही लोप पावली. समाजातील आर्थिक, शैक्षणिक विषमता कमी करण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केले. जातीय भेद नष्ट करून मानावी मूल्यांना जपणारा समाज निर्माण करण्यासाठी समाजव्यवस्थेत अनेक बाबतीत असलेले कडक नियम शिथिल केल्या गेले.
पूर्वी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी \"स्वदेशी\" चळवळ चालविली गेली होती. त्यावेळी सर्व समाजाकडून \"खादी\" स्विकारली गेली होती. देश स्वतंत्र झाला. आपल्या देशाला विकासित करण्यासाठी अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक पातळीवर बदल घडवून आणणे गरजेचे झाले. आज स्वतंत्र्य भारताने संपूर्ण जगात विकसनशील देश म्हणून मानाचे स्थान मिळवले आहे. आजही भारतीय संस्कृतीला असलेले महत्त्व अबाधित आहे. जाती व्यवस्था ,आर्थिक स्तर अधोरेखित करणार्या वेशभूषेच्या बाबतीत असलेली अनेक बंधने बदलत्या सामाजिक भूमिकेत कुचकामी ठरत गेली. त्यातूनच सर्व समावेशक अशा वेशभूषा निर्मितीला चालना मिळाली देश प्रगतीसाठी वस्त्र उद्योगात क्रांती घडविल्या गेली तरीही अंतर राष्ट्रीय बाजारपेठेत आजही आपण आपल्या \"खादी \" चे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. पूर्वीच्या राहणीमानात स्वच्छतागृह घराबाहेरच असे. त्यामुळे डोक्यावरून मैला वाहून नेण्याची घाणेरडी पद्धत अस्तित्वात होती. आता घरा घरात स्वच्छता गृहे आहेत. त्यासाठीची आधुनिक अशी सांडपाण्याची व्यवस्था केलेली असते. त्यामुळेच मानवी समानतेच्या मूलभूत मूल्याचा आदर राखला जातो आहे. पूर्वी पासूनच रहाणीमान, भाषा, वेशभूषा, संस्कृती सगळेच आपण आपल्या सोयीसाठी निर्माण केले आहे. मग आताच त्याबाबतची फॅशन गैरसोयीची कशी झाली?
हल्ली नवरी मुली रिसेप्शनला गाऊन घालण्यास पसंती देतात. हे खरे आहे. यातच फॅशन ही सोयीचे आहे हे ही सिद्ध होते. लग्नाचे सगळे विधी पारंपरिक वेषभूषेत पार पडल्यावर त्या विधी आणि वेषभूषा यांचा थकवा सगळ्यांनाच येतो. हल्ली समारंभासाठी कपड्यांचे अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. पूर्वी सोय नव्हती आता ती असल्याने रिसेप्शनला गाऊन परिधान करण्याला पसंती असते. आपण आपल्या लेखात फक्त नवरीच्या वेषभूषेबद्दल उल्लेख केला. परंतू फार पूर्वी पासून नवरदेव लग्नात सफारी किंवा सुट अशाच वेशभूषेत होते. खरे तर आपल्या पारंपरिक विधिंना पार पाडण्यासाठी सुट, बूट हा पोषाख गैरसोयीचा होता. पुरुषांनी धोतर, सदरा असा पोषाख सोडून आधुनिक पोशाख स्विकारला तेव्हा संस्कृतीचा र्हास होत नव्हता?
त्या उलट आता लग्नात नववधू नऊवारी नेसते. जोडीदारालाही तिला साजेसा असा पारंपारिक पोषाख करण्यास प्रेरित करते. पारंपारिक विधी पारंपारिक वेशभूषेत पार पडतात. त्या निमित्ताने दागिने, कपडे, विधी अशी सालंकृत संस्कृती पुढची पिढीही आनंदाने स्विकारतांना दिसते आहे. परंतू या सगळ्याकडे आपल्या लेखात सोयीने दुर्लक्ष केल्या गेले आहे रिसेप्शन देणे हेच मुळी आपल्या संस्कृतीतील कोणताही पारंपारीक विधी नाही. निव्वळ आपल्या सोयीसाठी अनेक कारणांमुळे \"रिसेप्शन\" ही संकल्पना अस्तित्वात आली आहे. त्यामुळे त्यासाठी करावी लागणारी वेशभूषा ही आपल्या सोयीची असण्यात गैर काहीच नाही. " जसा देश तसा वेश" अशी म्हण आपल्या भारतात प्रचलित आहे. आपल्या भारतीय महिलांनी परदेशात गेल्यावर तिथल्या समाजव्यवस्थेत मिसळण्यासाठी तिथल्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून असलेली तिथली वेशभूषा केली तर \"ती तिथे जावून \" बिघडली \",असे आपण सहज म्हणतो आणि दुसरीकडे "मुंबईच्या जुहू स्थित इस्कॉन मंदिरातील परदेशी तरुणी साडी नेसतात" हे आपण अभिमानाने सांगतो. परंतू लक्षात घ्यायला हवे की त्या त्यांच्या देशात असतांना किंवा परत गेल्यावर साडी परिधान करणार नाहीत किंबहुना करत नाही. \"संस्कृतीचा र्हास \" होतोय अशी ओरड करणारा समाजच \"संस्कृती म्हणजे नेमके काय ?\" हे समजून घेण्यात कमी पडतो आहे. मनुष्यजातीला कपड्यांचा शोध लागला नव्हता तेव्हाही \"संस्कृती\" अस्तित्वात होतीच. परंपरेचा वारसा देणार्या \"प्रगल्भ विचारांचा पाया\" म्हणजे \"संस्कृती\". व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर म्हणजे संस्कृती. मूलभूत मानवी मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन म्हणजे संस्कृती. अंधश्रध्देतून जन्मलेल्या रुढी म्हणजे संस्कृती नव्हे. आपण छोटे कपडे घालून मंदिरात जाणाऱ्यांना नावे ठेवतो. परंतू आधुनिक वेशभूषा असली तरी देवा पुढे नतमस्तक होण्याचे संस्कार अंगी रुजले आहेत याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो. शिवलिलामृत या पौराणिक कथेत महानंदा नावाच्या \"गणिकेचा\" शिवभक्त यादीत अग्रक्रम आहे. तुम्ही करत असलेले कार्य, वेशभूषा कधी कधी तुमच्या मनात जतन केलेल्या सांस्कृतिक मूल्यांशी विसंगत असू शकते. म्हणूनच संस्कृतीत पेहरावा पेक्षा श्रद्धेला अधिक महत्त्व आहे. सिनेसृष्टीतील काही लोक जी वेशभूषा करतात ती म्हणजेच संपूर्ण फॅशन नव्हे. फॅशन जगताने आपल्याला अनेक सोयीचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील प्रसिद्धीसाठी उपयुक्त असलेल्या पर्यायांची निवड सिनेसृष्टीतील मंडळी करत असतात. हल्ली अनेकांना प्रसिद्धी हवी असते. सरासार विवेक बुद्धीचा वापर न करता निव्वळ अंधानुकरण केले जाते. यात फॅशन निर्मितीला दोष देणे चुकीचे आहे. एकीकडे हल्लीच्या मुली अंगप्रदर्शन करणारे कपडे घालतात म्हणून त्यांच्या भोवती वावरणारी पुरुष मंडळीची नियत विचलित होते. मुलींना अतिप्रसंगाला सामोरे जावे लागते. तिच्या घरच्यांची नामुष्की होते. असे म्हणत आपण अंगभर कपड्यांच्या संस्कृतीचे महत्व आपल्या लेखात अधोरेखित करू पाहता. दुसरीकडे द्रौपदीने आपल्या भरजरी साडीचा पदर फाडून कृष्णाच्या करंगळीला बांधला होता. त्याची परतफेड त्याने चीरहरणावेळी तिला वस्त्र पुरवून केली असेही आपण म्हणता. जेव्हा \"भरजरी वस्त्रे\" नेसणार्या राज घराण्यातील स्त्रीला चीरहरणा सारख्या घृणास्पद प्रसंगाला सामोरे जावे लागले. तेव्हा या प्रसंगाचा तिच्या वेशभूषेशी कितपत संबंध होता? असा साधा प्रश्न आपल्या मनाला भेडसावत नाही का? म्हणजेच ज्या पौराणिक संस्कृतीचा नारा आपण देत आहात त्या संस्कृतीतही \"माणसांची नियत\" खराब होत होतीच. निव्वळ स्त्रीची वेशभूषा \"माणसांची नियत\" खराब करते आहे असे म्हणणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा वैचारिक पाया किती कमजोर आहे हे आपणच मान्य करण्यासारखे आहे. आपली संस्कृती इतकी कमकुवत नव्हती, नाही आणि नसणार आहे. मुळात \"वेशभूषा\" म्हणजे \"संस्कृती\" नव्हे. ती फक्त संस्कृतीचा एक छोटा भाग आहे. हे आधी लक्षात घ्यायला हवे. राहिला प्रश्न \"स्त्री सुरक्षिततेचा\" तर त्याचे उत्तर \" संस्कृतीचा मुख्य भाग असलेल्या संस्कारात \" दडलेले आहे. सर्वेक्षण करता असे लक्षात येते की, बलात्काराच्या अनेक घटनांमधील पिडितेने अंगभर कपडे घातलेले होते. तरीही तिला अति प्रसंगाला सामोरे जावे लागले. ज्या समाजात पिडितेच्या वेशभूषाला दोष देवून गुन्हेगारी \"वृत्तीला\" पाठीशी घातले जाते. \"संस्कार\" \"मूल्य शिक्षण\" यांचा अभाव या महत्त्वाच्या विषयाला बगल देत फॅशन सारख्या छोट्या मुद्यांचा उहापोह केला जातो तिथे स्त्री सुरक्षित कशी राहील? आपण आपल्या लेखात संस्कृतीला सागर म्हणता. इतर संस्कृतीला नद्या मानता. अनेक नद्या एकत्रित येवून सागर बनतो हे लक्षात घ्यायला हवे. इतिहास बघता अनेक समृद्ध संस्कृतींचा उगम नद्यांकाठी झालेला आढळून येतो. सगळ्यां विचारधारा सहज सामावून घेणारी आपली आजची संस्कृती ख-या अर्थाने सागरासारखी होवू पाहते आहे. प्रत्येक नदीला/संस्कृतीला सागराची ओढ असते. सागराला मिळाल्यावर नदीला तिचे असे वेगळे पण रहात नाही. परंतू सागर त्याचे अस्तित्व कायम टिकवून असतो. आपल्या संस्कृतीनेही सागरा सारखे इतर देशाच्या अनेक चांगल्या बाबी स्विकारत स्वतःला अधिकाधिक प्रगल्भ केले आहे. आपण शेवटच्या परिच्छेदात तंत्रज्ञानाने मानावी मूल्ये आणि श्रद्धा यांची हानी केली आहे. फॅशन हीच सगळ्याचे मुख्य कारण आहे असे काहीसे मत मांडले आहे. \"परमाणू ऊर्जेचा \" शोध लागला तेव्हा तिचा वापर दोन प्रकारे करण्याचे पर्याय उपलब्ध होते. देशाला विकसित करण्यासाठी \"परमाणू ऊर्जेचा \" वापर करायचा किंवा इतरांचे अस्तित्व हिरोशिमा नागासाकी सारखे नष्ट करायचे. निवड माणसाच्या हातात होती आणि आहे. फॅशन अस्तित्वात आली तेव्हाच सोयीसाठी किंवा दिखाव्यासाठी असे दोन पर्याय उपलब्ध झाले. कोण कुठल्या पर्यायाची निवड कधी करते यावर बंधने लादता येत नाहीत. मात्र योग्य पर्यायाची निवडण्यासाठीची शिकवण जरूर देता येते. आपण चुकीचा पर्याय निवडला तर त्यात पर्याय उपलब्ध करून देणारे तंत्रज्ञान आणि त्या अनुषंगाने येणारी फॅशन यांना दोषी ठरविणे हे कोत्या मानसिकतेचे लक्षण आहे. प्रसंगानुरूप योग्य पर्याय निवडता न येणे हे मानसिक जडणघडणीत असणारी कमी दर्शविते. "आदमी एक नूर तो कपडा दस नूर\" अशी म्हण आहे. माणसाचे व्यक्तिमत्त्व हे कपड्यांनी दहा पट अधिक खुलून येते असा याचा अर्थ आहे. योग्य वेशभूषा परिधान केल्यास तुमच्या निव्वळ उपस्थितीने अनेक लोक प्रभावित होऊ शकतात. फार पूर्वी पासून वेशभूषा / फॅशन ही मानवजातीच्या सोयीसाठीच अस्तित्वात आली आहे. मुख्यत्वे वेषभूषा ही भौगोलिक परिस्थिती आणि कराव्या लागणार्या कामाच्या स्वरुपावर अवलंबून असते. वेशभूषा ही प्रसंगानुरूप बदलली जाते. आज जुन्या राहणीमानाचा आग्रह धरला तर देश प्रगती करण्याऐवजी तंत्रज्ञानाला नाकारून अश्म युगाकडे वाटचाल करायला लागेल. \" बदल ही काळाची गरज आहे \" म्हणूनच जुन्या मधले चांगले ते घेवून समस्त मानव जातीने आजचे रहाणीमान स्विकारलेले आहे. यांत्रिक साधनसामग्री व वस्त्र उद्योगातील क्रांती घडून येण्यामागे मानवाच्या बदलत्या गरजा आहेत. फॅशन आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध करून देते. प्रसंगानुरूप आपल्या शरीराला शोभून दिसेल अशी फॅशन निवडणे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. एखाद्या प्रदेशातील लोक विशिष्ट शैलीचे कपडे तसेच दागिने अंगीकारतात जे पिढ्यानपिढ्या प्रसारित केले जातात. पारंपारिक कपड्यांमध्ये असे बदल आणि विकास भौगोलिक, सामाजिक, राजकीय तसेच परकीय प्रभावामुळे घडतात. जरी पारंपारिक पोशाख एका वांशिकतेला दुसर्या जातीपासून वेगळे करतात, तरीही ते विशिष्ट संस्कृतीच्या लोकांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या एकात्मतेवर भर देतात. म्हणूनच आजही लोक विशिष्ट दिवशी त्यांच्या पारंपारिक वेशभूषेला प्राधान्य देतात.
आधुनिक काळात जातीभेद नष्ट करून \"माणुसकी\" या एकाच जातीची जपणूक व्हावी म्हणून आजच्या वेशभूषा या अधिक सर्व समावेशक आहेत. आजचे फॅशन पर्याय हे पिढी दर पिढी लादले जाणारे नसून व्यक्तिस्वातंत्र्याचा मान राखणारे आहेत. पूर्वी आर्थिक आणि सामाजिक दर्जाला महत्व देत फॅशन केली जात होती. आज व्यक्तिमत्त्वाला उठाव देणारी फॅशन निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्या समाजात रणवीर सिंग, ऊर्फी जावेद अशी दिखावा करणारी मंडळी आहेत तसेच सुधा मूर्ती, नंदिनी हरीनाथ, रितू करीधाल अनुराधा टिके, रतन टाटा अशी मानवी मूल्ये जपणारी अनेक नामवंत व्यक्ति आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की यातील प्रत्येकाने त्यांच्या सोयीचा राहणीमानातील फॅशन पर्याय निवडला आहे. निव्वळ पैसे असून देखील छोट्या घरात राहिल्याने किंवा साडी परिधान केल्याने कोणी सुधा मूर्ती होवू शकत नाही. त्यासाठी त्यांच्या अंगी असणार्या अनेक चांगल्या गुणांना आत्मसात करणे आवश्यक आहे. या उलट मात्र रहाणीमान,विचार कसेही असले तरी अंगप्रदर्शन करणारे अंतरंगी कपडे घालून कोणीही सहज \"ऊर्फी जावेद\" सारखी प्रसिद्धी मिळवू शकते. म्हणूनच आपण कोणाचा आदर्श घेतो यावरच सगळे अवलंबून असते. आपली निवड ही...आपले संस्कार दर्शविते..... संस्कृती नाही. मुळात मोबाईल,कार, घर ही फॅशन नसून गरजेतून निर्माण झालेली जीवनपद्धती आहे. त्याबाबतीत होणारे सगळे चांगले वाईट बदल हे सध्या आलेले \" फॅड \" आहे. गतीमान जीवनशैलीमुळे आपल्या राहणीमानात आमूलाग्र बदल झाला आहे. अनेक कष्टाची कामे यंत्राच्या साहाय्याने चुटकीसरशी पूर्ण होतात. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता बैठी घरे जावून अपार्टमेंट तयार झालीत. वाहतूक साधने बदलली आहे. सद्य परिस्थितीत आधुनिक राहणीमान स्विकारणे हे गरजेचे झाले आहे. पूर्वीच्या राहणीमानाचे कितीही फायदे सांगितले तरी आता ती जीवनशैली कालबाह्य झाली आहे. आधुनिक जीवनशैलीचे, मोबाईलचे ,फॅशनचे वाईट परिणाम सांगितले तरी त्याचे अस्तित्व नाकारून चालणार नाही. प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात. वाईट गोष्टींचा पाढा वाचण्यापेक्षा त्यातील चांगले ते हेरता आले पाहिजे. आपल्या सामाजिक,वैचारिक उत्कर्षासाठी त्याचा योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर करता यायला हवा. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक लक्षात घेता आला तर पुढच्या पिढीलाही उत्तम संस्कार देता येतील. महागडा फोन घेण्यासाठी कोणत्याही थराला तरुण पिढी जाते. हल्लीची तरुण पिढी मोबाईलच्या/फॅशन च्या आहारी गेली आहे असे आपण म्हणतो तेव्हा लक्षात घ्यायला हवे की, आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती तसेच आपल्या गरजा ओळखून उपलब्ध पर्यायामधून आपल्यासाठी योग्य पर्याय निवडण्याची शिकवण,संस्कार पुढच्या पिढीला देण्यात आपणच कमी पडतो आहे. ज्या संस्कृतीला जपण्यासाठी आपण फॅशनने उपलब्ध करून दिलेल्या काही पर्यायांना नावे ठेवतो. त्या संस्कृतीचे जतन योग्य रित्या व्हावे यासाठीचे संस्कार पुढच्या पिढीवर मात्र करत नाही. \"संस्कृती \" हा विषय निव्वळ चर्चा करण्याचा नसून प्रत्येक समाजमनात रूजविण्याचा आहे. मूलभूत मानवी मूल्यांची पायमल्ली करून दिखाऊ संस्कृती जपण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा \"संस्कृतीचा \" सखोल अभ्यास करायला हवा. कोणतीही संस्कृती ही पर्याय उपलब्धतेवर बंधने लादू शकत नाही. या उलट प्रत्येक संस्कृतीने फॅशन क्षेत्राने उपलब्ध करून दिलेल्या पर्यायांचा सन्मानपूर्वक स्विकार करून \"योग्य वेळी योग्य पर्याय निवड\" या प्रगल्भ विचारांची शिकवण दिल्यास तिचे अस्तित्व निव्वळ टिकणार नाही तर आपली संस्कृती अधिक समृद्ध देखील होईल.फॅशन या शब्दाची मूळ व्याख्या म्हणजेच विशिष्ट ठिकाणी आणि कालावधीत रहाणीमान, कपडे, पादत्राणे, आभूषणे, शृंगार, केशभूषा आणि शरीर मुद्रा या संबंधी स्वतःची अभिव्यक्ती तसेच स्वनिर्णयाचा हक्क असलेला एक प्रकार होय. फॅशन गोष्टच मुळी व्यक्तिस्वातंत्र्याशी निगडित आहे.तेव्हा फॅशनच्या बाबतीत आपल्या नजरेतून किंवा निकषांवर इतरांना पडताळून पाहणे कितपत योग्य आहे. फॅशन या शब्दाचा सर्व सामान्य वापर बघता त्या शब्दाचा सखोल अर्थ समजून घेण्याची आणि त्याला अंगीकारला जाण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीत फॅशन ही सोयीसाठीच होती, आहे आणि कायम राहील सुद्धा.
©️अंजली मीनानाथ धस्के
पुणे
टिप: सादर लेखन वादविवाद स्पर्धेबाबत केले आहे. आपले विचार या लेखाशी सहमत नसल्यास तुमच्याही विचारांचा आदर आहे.
लिखाण प्रकाशित करतांना ते नावासहितच असावे .
धन्यवाद
No comments:
Post a Comment