गाणे, मी आणि बाळराजे

#गाणे_मी_आणि_बाळराजे  

©️ Anjali Minanath Dhaske (Elgire)

हंसराज रघुवंशी यांनी गायलेले "शिव समा रहे मुझ मे और मै शून्य हो रहा हूँ " हे गाणे माझे फार आवडीचे आहे.  गाण्यातील शब्दांचा अर्थ मनाला जितका भावतो तितकेच गाण्याचे सूर मनाला सुखावून जातात.

     हे गाणे अनेक वेळा कानावर पडल्याने बाळराजेंनी आपसूकच त्यावर विचार करायला सुरवात केली असणार....

" आई तुला हे गाण ईतक का आवडत ग?" इती  बाळराजे

" गाण्यातले शब्द, सूर आणि मुख्य म्हणजे गाण्याचा भाव मनाला शांत, तृप्त करतो म्हणुन मला हे गाण ऐकायला आवडत " इती मी 

" तुला नाही वाटत कधी की गाण्याचे शब्द थोडे वेगळे हवे होते " इती  बाळराजे

" नाही बा .... पण तुला का असे वाटले " इती मी 

" तू म्हणतेस ना नेहमी की, माणसाने प्रतिकूल परिस्थितीत ही सकारात्मकच विचार करायला हवा " इती  बाळराजे

" हो... त्याचा ईथे काय संबंध?" इती मी 

" अरे  .... गायक म्हणतो की ,"शिव समा रहे मुझ मे और मै शून्य हो रहा हूँ " परंतू  जर त्याच्या मधे शिव वास करणार आहेत तर मग तो शून्य कस काय होवू शकतो..... त्यानी स्वतःच्या बाबतीत सकारात्मक विचार करून ,"शिव समा रहे मुझ मे और मै शिव हो रहा हूँ " असे गायला हवे" इती  बाळराजे


" अरे.... या गाण्यात भगवान शिव प्रती समर्पण भाव व्यक्त केला आहे.  शिव माझ्यात अशा काही प्रकारे संचार करतो आहे की मी माझे अस्तित्व विसरून त्याच्या चरणी लीन होत आहे.  असे म्हणायचे आहे गायकाला " इती मी 

" अग .. शिव त्याच्यात संचार करतोय तेव्हा गायक शून्य होतो.... हे जरी खरं असलं तरी तो शून्य होतोय म्हणजेच तो शिव होतोय ना.... तूच सांग शिव जर तुझ्यात आहे तर तू शून्य कशी होवू शकते?.... " इती  बाळराजे


आजची पिढी कुठे कसे डोके लावेल याचा काही नेम नाही. आपण घेत असलेल्या पारंपारिक अर्थाचा क्षणात नवीनच दृष्टीने विचार करणे भाग पडते. 

त्याच्या या प्रश्नाने जणू माझे पालकत्व पणाला लावल्या गेले असे मला वाटू लागले. 

"हो ... बरोबर आहे तुझे . परंतु या गाण्यात एका भक्ताची भक्ती दर्शविली आहे.  " मै शिव हो रहा हूँ " असे म्हणण्यात अहंकार दिसतो. या उलट ,'मै शून्य हो रहा हूँ " म्हणण्यात समर्पण भाव, विनयशीलता प्रकट होते. शिव चरणी लीन होताना आपण आपले उग्र विचार, अहंकार, द्वेष, मत्सर, क्रोध अशा सगळ्या वाईट गुणांचा त्याग करायचा.  अगदी स्वतःची स्वतःशी देखील स्पर्धा/तुलना करायची नाही.  

 शिव बनणे ईतके सोपे नाही. शिवा पुढे आपण म्हणजे समुद्रातील एक थेंब आहोत. थेंब समुद्राचा अंश असतो म्हणुन आपण थेंबाला समुद्र म्हणत नाही ना. तसेच 

 आपल्या मधे जो शिव अंश आहे त्याला  शिव म्हणणे योग्य होत नाही.  आपण जेव्हा आपल्या 'मी ' पणाचा त्याग करू तेव्हाच तर शिव आणि आपण यातले अंतर नष्ट होईल.  म्हणुन या गाण्यात ,'मै शून्य हो रहा हूँ ' हेच योग्य आहे " इती मी 

" तू सांगितल ते पटले आहे पण तूच म्हणतेस ना, शब्दा पेक्षा भाव महत्त्वाचा मग..... गाणं म्हणणारा समर्पण भावनेनेच " मै शिव हो रहा हूँ " असे म्हणत असेल तर काय हरकत आहे. म्हणजे आपण ' शिव' होवून आपल प्रमोशन पण करायच आणि विनय शीलता पण अंगी बाळगायची."

इती  बाळराजे

" काही हरकत नाही..... गाणे तुला जसे म्हणायचे तसे म्हण.

गायकाला जो भाव आणि अर्थ अपेक्षित आहे तो समजण्यासाठी तुझे वय अजून लहान आहे.  एक दिवस तुझे तुलाच जाणवेल की गाण्यातल्या ओळी किती समर्पक आहेत आणि तेव्हा तू स्वतःहून "शिव समा रहे मुझ मे और मै शून्य हो रहा हूँ " असेच म्हणणे पसंत करशील " इती मी 

 अनेकदा आपल मत मुलाला पटवून देता येईलच किंवा आपण सांगितल्यावर त्याला ते पटेलच याची खात्री नसते परंतू त्यानिमित्ताने होणारे विचारमंथन फार महत्त्वाचे आहे.  " आध्यात्मिक आनंद व त्या अनुषंगाने येणारा समर्पण भाव " समजण्यासाठी   त्याचे वय अजून कच्चेच आहे. 

मी काही आदर्श पालक नाही.  मुलांना त्यांची स्वतंत्र मते असतात आणि त्याला नाकारून चालत नाही याची जाणीव मात्र आहे.  आज जी गोष्ट त्याला समजावून सांगायला कठीण वाटते तीच गोष्ट त्याच्या योग्य वयात त्याला आपसूकच समजेल अशी खात्री बाळगून मी संवाद आटोपता घेतला.  काही गोष्टी काळावर सोडून दिलेल्या चांगल्या असतात. 

आपल्या मुलांना त्यांची स्वतंत्र आणि आपल्या मतांशी प्रतिकूल मते असू शकतात. आपण त्या मतांचा  स्विकार करू शकत नसलो तरी त्यांची मते ऐकून घ्यायला काहीच हरकत नसावी. त्या अनुषंगाने होणारा संवाद मुलांना त्यांचे विचार मांडण्याचा आत्मविश्वास देवून जातो तसेच आपल्याला विचार करण्यासाठी नविन दृष्टिकोन मिळतो. 

©️ Anjali Minanath Dhaske (Elgire)

टिप: लिखाण आवडल्यास नावासहित शेयर करण्यास हरकत नाही. ईतर लिखाण 'आशयघन ' रांगोळी या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे . लिंक खाली देत आहे. 

anjali-rangoli.blogspot.com 

अनेक सुंदर व सोपे कलाविष्कार पाहण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. Link 👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg




No comments:

Post a Comment