ती ,वेळ आणि चहा

 

#जागतिक_चहा_दिवस निमित्त......

*********** ती,वेळ आणि चहा **********
तिची ही धंद्याची वेळ. रोजच्या सारखी मुरडत ती गिर्‍हाईक शोधत होती. तेवढ्यात  पाऊस सुरू झाला अन् ती चिंब भिजली. मोडक्या छताचा आसरा घेत ती थांबली. या संधीचा फायदा घेत काही जण तिला उगाच खेटू लागले  तर काही नजरेनेच तिचे चीर हरण करू लागले. तीही या सगळ्याला निर्ढावलेली होती तरी ओल्या देहाकडे बघणाऱ्या वखवखलेल्या नजरा बघून  फुकट मजा घेवू पाहणाऱ्यांची तिला किळस आली . तेवढ्यात त्याने आपल्या बलदंड  हाताने वाफाळत्या चहाचा कप तिच्या समोर धरला. त्याच्या त्या छोट्याशा कृतीनेच काहींनी आपल्या हातची संधी गेली म्हणत काढता पाय घेतला. तर काहींनी त्याच्या धिप्पाड शरीरयष्टीकडे बघत आपला फालतू मोह आवरता घेतला.
तिची चहाची वेळ नसतांनाही तिच्या वेळेला धावून आलेल्या चहाच्या कपाभोवती तिच्या हातांची पकड घट्ट झाली. तो मात्र पाऊस थांबला तसा आल्या मार्गाने निघूनही गेला.
©️Anjali Minanath Dhaske ( Elgire)



No comments:

Post a Comment