अलक

 #अलक१

#लाड

" स्वतःचे पोट नीट भरेल निदान इतके तरी स्वयंपाकाचे ज्ञान असावे" असे तक्रारीच्या सुरात विहिण बाईं सांगायच्या तेव्हा "आमच्या मुलीला आम्ही लाडात वाढवले हो.... घरातली कामे काय एखादी बाई कामाला ठेवली की होतील.   त्यात काय एवढं" असं टेचात सांगणाऱ्या राधा ताई आज मात्र विलागिकरणाच्या चौथ्याच दिवशी " रोज रोज बाहेरचे जेवण खावत नाही ग.... आजारी व्यक्तीला घरच्या सात्विक जेवणाचीच गरज असते. YouTube वर बघून साधा  वरण भात बनविता आला तर बघ जरा " असे  मेसचा डबा पाठविणाऱ्या आपल्या त्याच लाडक्या लेकीला काकुळतीला येऊन  फोनवर सांगत होत्या.   

©️अंजली मीनानाथ धस्के( एलगिरे)


#अलक२

#अभिमान

गेले चौदा दिवस राहुल वरण, भात, भाजी, पोळी व कोशिंबीर असे स्वतः प्रेमाने बनविलेले पौष्टिक जेवण ईशाला वाढत होता . तेव्हा तिला जाणवले की," मला तर साधा चहा धड करायला येत नाही" याचा जो कायम अभिमान आपण बाळगत आलो तो किती फसवा होता.

©️अंजली मीनानाथ धस्के( एलगिरे)


#अलक३

#आत्मनिर्भर

 मुलगा मुलगी असा भेद न करता शामलने आपल्या दोन्ही लेकरांना आत्मनिर्भरतेचे धडे दिले होते. जेव्हा चौदा दिवस तिला विलागिकरणात रहावे लागले तेव्हा तिच्या शिकवणीमुळेच लेकरानी घराचा आणि घरकामांचा भार अगदी सहज व आनंदाने पेलला.

©️अंजली मीनानाथ धस्के( एलगिरे)



No comments:

Post a Comment