हनीमून.... म्हणजे काय ग आई?

 #हनीमून_म्हणजे_काय_ग_आई?

                  निशा स्वयंपाक खोलीतली कामे उरकत होती तेवढ्यात साहील तिच्या जवळ आला आणि विचारले, "आई हनिमून म्हणजे काय... ग? "

 या प्रश्नाने ती पुरती हादरली. टाळायचे म्हणून लगेच बोलून गेली ," जा बाबांना जावून विचार " .

त्यावर त्याने लगेच उत्तर दिले ," बाबांना नाही माहिती म्हणून तुला विचारायला सांगितले आहे".

मनातल्या मनात ती नवऱ्यावर चिडली . पण आता इच्छा नसतानाही साहिलशी' हनिमून' या गंभीर विषयावर चर्चा  करावी लागणार होती.

साहिल जेम तेम अकरा वर्षांचा. त्याच्या बुध्दीला पटेल असे सांगणे गरजेचे होते. त्याची उत्सुकताही क्षमली पाहिजे आणि उत्तर ऐकून समाधान ही व्हायला हवे होते.

शब्दांची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ मिळवा म्हणून तिने साहिलला प्रश्न विचारला," साहिल .... तुला हा शब्द कुठून माहिती झाला ?" 

त्यावर साहिलने सविस्तर सांगितले ....

" अग आता बाबांनी टेलिव्हिजनवर कॉमेडी शो लावला आहे ना त्यातून माहिती झाला . त्यात तो विनोद करणारा म्हणाला की," संता इतना कंजूस हैं की वो अपने हनिमून पे भी अकेला गया था" त्यावर सगळे हसले ... बाबाही हसले आणि हनिमून म्हणजे काय विचारला तर आईला जावून विचार म्हणाले "

         साहिलच्या उत्सुकतेचे कारण निशाच्या लक्षात आले. 

 साहीलला ' हनीमून' या शब्दाने होणारा विनोद जाणून घेण्यात रस होता.   सहिलच्या तोंडून हनीमून हा शब्द एकाएकी अंगावर आल्याने ती गोंधळली होती. आता मात्र त्याला सांगणे जरा सोपे जाणार होते.

   तीने त्याला समजावून सांगायला सुरुवात केली. 

"  आपल्या संस्कृतीत हनीमून हा एक सुंदर  विधी आहे. जो लग्नानंतर करण्याची पद्धत आहे. या विधीला नवरा बायको दोघे असणे गरजेचे असते. हा विधी एकट्याने करायचा नसतोच मुळी . 

विनोदातला संता हनीमून साठी एकटाच गेला ना ... म्हणून सगळे हसले". 

साहिलने लगेच पुढचा प्रश्न विचारला," अग पण काल आजी तिची सिरीयल बघत होती त्यात ' हनीमून ' दाखवत होते . एका खोलीत नवरी नवरदेवाची वाट बघत बसली आहे . त्यात कुठे ही भटजी पुजा करत नव्हते की नवरीला कुठलाही विधी सांगत नव्हते.   हिरो खोलीत आला आणि  आजीने चॅनल बदलले मग पुढे काय झाले काही कळले नाही." 

त्याच्या या प्रश्नाने तिला कळून चुकले की आज जरी प्रश्न विचारला गेलेला आहे तरी ' हनीमून ' या शब्दाविषयीची उत्सुकता अनेक दिवसांच्या निरिक्षणातून जन्मला आलेली आहे. लॉकडाऊनमुळे सगळेच सतत घरात असतात. टेलिव्हिजनवर लागणारे मोठ्यांचे कार्यक्रम ही घरातले लहानगे नाईलाजाने का होईना बघतात. त्यातूनच बाल मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आपली पिढी सगळे समजून वमजून वागत होती. असे प्रश्न पडले तरी विचारण्याची हिंमत आपल्यात नव्हती . आताच्या पिढीला प्रश्न पडतात , त्यांची उत्तरे ही लगेच हवी असतात . पालकांनी उत्तर दिले नाही तर गूगल सर्च करायचा असतो हेही त्यांना चांगलेच माहीत असते. तेव्हा पालक म्हणून आपली जबाबदारी वाढते.  याची निशाला जाणीव होती.

आता सविस्तर सांगणे क्रमप्राप्त होते. उत्तर देतांना अती दक्ष राहणे आवश्यक होते.  साहिलच्या वयाला झेपेल तितकीच तरी त्याची जिज्ञासू वृत्तीला पटेल अशी  माहिती द्यावी लागणार होती.

इतक्यात त्याला असे काही सांगावे लागेल यासाठी तिची स्वतः ची मानसिक तयारी नव्हती परंतु अशा  विषयावरील कोणतीही माहिती इतर कोणत्याही चुकीच्या मार्गाने त्याने मिळवू नये या साठीही ती कायम जागरूक होती.

     साहिलने विश्वासाने विचारलेल्या प्रश्नावर पालक म्हणून उत्तर देताना त्याची निकोप विचारसरणी घडविण्याचे शिव धनुष्य तिला पेलायचे होते.

तीने तीला ऐन वेळी सुचले त्या शब्दात सांगायला सुरुवात केली.

"अरे साहिल हा विधी लग्नानंतर करतात म्हणून यात भटजी , पुजा असे काही नसते. लग्नात नवरा नवरी सप्तपदी चा विधी करतात . तेव्हा एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात . या विधीमूळे  दोघांनाही एकमेकांसोबत सगळे आयुष्य शेयर करायचे असते.  या विधीमुळे दोघे एकमेकांचे  लाईफ पार्टनर तर बनतातच पण कायमचे रूम पार्टनर ही बनतात.

खोलीतल्या सगळ्या वस्तू, कपाट , टेबल , बेड सगळे शेयर करावे. इतकेच नाही तर या नंतर आयुष्यातील प्रत्येक निर्णय एकमेकांना विचारून घ्यायचे असतात. चोवीस तास एकमेकांच्या संगतीत राहिले की एकमेकांना टच होतोच. लग्नाआधी फक्त आई वडिलांच्या स्पर्शाची सवय असते मग  छोटया छोटया स्पर्शाने दोघेही एकमेकांच्या संगतीत अस्वस्थ होतील . तसे  होवू नये म्हणून हा विधी असतो.

लहान पणी तू गुड टच , बॅड टच शिकला ना ... आई वडिलांचा स्पर्श जसा गुड टच असतो तसेच  लग्नानंतर करण्यात येणाऱ्या या विधीमूळे नवऱ्याला बायकोचा आणि बायकोला नवऱ्याचा टच हा गुड टच असतो.  लग्नात नवऱ्याने तिला आनंदी ठेवण्याचे , तीच्या समस्या सोडविण्याचे , जे त्याचे आहे ते सर्व तिला देण्याचे वचन दिलेले असते म्हणून मग  पहिल्यांदा  नवरी खोलीत रहायला आल्यावर  हा विधी करतात.  नवरीच्या स्वागतासाठी संपुर्ण घर, त्यातील खोल्या सजवल्या जातात. या विधीला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण लग्नानंतर हा पहिलाच असा विधी असतो जो फक्त आणि फक्त नवरा आणि नवरी दोघेच करतात. आज पर्यंत आई वडीलांनाही जे कधी शेयर करू शकले नाही ते आता  इथून पुढे एकमेकांना शेयर करायचे असते. जबाबदारीने वागायचे असते . एकमेकांची काळजी घ्यायची असते . एकमेकांना सूख दुःखात साथ द्यायची असते. या सगळ्यासाठी नवरा आणि नवरी दोघेही असणे गरजेचे असते... कोणी एक हा विधी करूच शकत नाही.... समजलं" 

         साहिलनेही सगळे समजले या आविर्भावात मान हलवली तरी विचारलेच ," तू सांगितलेले समजले ग पण  बाबांना विचारल्यावर ... आईला जावून विचार असे का म्हणाले ते, .... आजीला विचारले तर तीनही सांगितले नाही ." 

त्यावर निशा म्हणाली ," अरे तुला स्वतःला मोठे झाल्यावर हे सगळं अधिक चांगल्या प्रकारे कळणारच आहे. सध्या तुझे ते जाणून घेण्याचे वय नाही. आताच जर तुला मोठे पणी अंगावर पडणाऱ्या संसाराच्या जबाबदाऱ्या समजल्यातर कदाचित तू गांगरशील... तुझ्या मनात त्या जबाबदाऱ्या प्रती भीती, घृणा , चीड काहीही निर्माण होवू शकत.... उगाच या वयातच तुझ्या मनात भविष्याची चिंता कशाला पेरायची म्हणून तुझ्या काळजी पोटीच  बाबा आणि आजी तुला सांगायचे टाळतात". 

दोघा माय लेकराचा संवाद बाबाही ऐकत होतेच. 

 या वेळी  बाबांनीच संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला. बाबा म्हणाले," मी आईला जावून विचार म्हणालो कारण ... मला तुझ्या आई सारखे नीट समजावून सांगता येत नाही. " 

साहिलला बाबांचे हे म्हणणे एकदम पटले. खोली बाहेर जाता जाता त्याने बाबांना विचारलेच ," तूम्ही ही लग्नानंतर हनीमूनचा विधी केला आहे?" 

यावेळी बाबा असल्या प्रश्नासाठी तयार होते .

बाबांनी उत्तर दिले ... "लग्न झालेल्या प्रत्येकाला हा विधी करावाच लागतो. आम्ही ही केला.  आज पर्यंत कधी बोललो नाही पण  एक सांगतो तुला...   तुझी आई खूप खडूस आहे..... ती माझी नुसती रुम पार्टनर राहिली नाही तर तिने अख्खे घर ताब्यात घेतले आहे.  खोलीतच काय ... घरात मी कुठेही पसारा केला तरी मला   ओरडायला कमी करत नाही. "

त्यावर साहिलने लगेच आईची बाजू घेतली ," अहो तिला आवडत नाही तरी तूम्ही रोज ओला टॉवेल बेड वर ठेवता मग ती चिडणारच"

बाबाही म्हणाले," अरे मला ओरडते ते ठीक आहे पण ती तुलाही रागवत असते ..... त्याच काय ... बघ तुझी इच्छा असेल तर नवीन रुम पार्टनर शोधतो" 

त्यावर निशाने उगाच फुरगटून बसण्याचा अभिनय केला.

त्यावर साहिलनेही लगेच तिच्या गळ्यात दोन्ही हात टाकले आणि म्हणाला ," ओरडू द्या .... तरी मला तीच आवडते.... तुम्हीही हिच पार्टनर ठेवायची आयुष्यभर... एकमेकांना  आनंदी ठेवण्याचे वचन दिले आहे ना मग ... दोघेही भांडू नका." असे म्हणत त्याने बाबांनाही प्रेमाने जवळ ओढले. बाबांनी दोघांना मिठीत घेतले.

एक संवेदनशील विषय खेळी मेळीच्या वातावरणात हाताळल्या गेला होता.  निशाचा आणि सहीलच्या बाबांचा जीवही भांड्यात पडला होता.

 ©️ अंजली मीनानाथ धस्के 

टिपः लिखाण आवडल्यास नावा सहित शेयर करायला हरकत नाही.

अशाच इतर विषयांवरील लिखाण दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
 १) पिरियड्स : link

२) मुलांची उत्सुकता आणि गूगल: link


आकर्षक आणि सोप्या रांगोळ्या पाहण्यासाठी 
हे YouTube Channel  ला एकदा जरुर भेट द्या 







 

15 comments:

  1. खूप छान रीतीने समजावले आईने. खूप आवडले मला.छान लिहिले आहे तुम्ही. अशा समजण्याची गरज आहे आजच्या पिढीला.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद

      Delete
  2. Khupach chan shabdat samjaun sangitale ahe. Khare ahe ki prashn anuttarit rahilas ki uttarachi oodh lagate.

    ReplyDelete