बदलाची सुरुवात स्वतःपासूनच : शिव जयंती (२०२०)

#बदलाची_सुरुवात_स्वतःपासूनच

               शिवाजी महाराजांचा जन्म १९/२/१६३० ला झाला असला तरी त्यांच्या विचारांची गरज आजही आहेच. ते जीजाऊंसाठी शिवबा, बाळ संभाजींसाठी आबा साहेब, प्रजेसाठी जाणता राजा, मोघलांसाठी शिवा तर इतिहास कारांसाठी युग पुरुष आहेत.

              अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहीजे. पण एव्हढ्यावरच थांबुन उपयोग नाही.फक्त भावना..... फक्त जयजयकार.....,  फक्त मिरवणुका..... पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज्, आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहीजे. त्यांच्या  ठायी असलेली चिकाटी जर आपण आपापल्या क्षेत्रात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल.

      पण दुर्दैव *' शिवाजी जन्मावा ते शेजारच्या घरी '* असं आपण म्हणतो. शिव राज्यातले फायदे हवेत पण त्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या यातना नकोत.  समाजात चांगले बदल व्हायला हवेत अशी आपण चर्चा करतो पण त्या बदलांची सुरवात आपल्या पासूनच करावी असा निश्चय करण्यात कमी पडतो.
आजची स्त्री सुशिक्षित झाली आहे पण सुरक्षित नाही . कारण  पर स्त्रीमधे माता, भगिनी बघणारे शिव संस्कार हरवले आहेत. आई, बहिणीवरच्या शिव्या देण्यात आपण धन्यता मानतो.
          आजही वंशाला दिवा हवाच असा आग्रह अनेक घरी असतो पण त्याच क्षणी त्या वंशाच्या दिव्याला वाढवतांना घरातील आईने जिजामाता सारखे संस्कार त्यावर करण्याचा आग्रह मात्र कोणीच धरत नाही.
       
 "भगवा " आपला तर मानतो पण महाराजांना अपेक्षित असलेले राज्य निर्माण करता येत नाही. सगळ्या जाती धर्मांना एकत्र आणून शांतता प्रस्थापित करण्यापेक्षा आपण जातीच, रंगाचं ही राजकारण करतो.
     आज गल्ली बोळात शिव जयंती निमित्त कार्यक्रम होतात. पण शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर पोवाडे सादर करण्याऐवेजी फावल्या वेळेत फिल्मी गाणी वाजवली जातात तेव्हा काळीज तुटतं.
बाईकवर.... कारवर शिवाजी महाराजांचे चित्र असलेले झेंडे घेवून ... कपाळावर चंद्र कोर काढून .... नवीन कोरे भगवे कपडे घालून फिरतांना काही तरुण विसाव्यासाठी म्हणून  पान पट्टीवर थांबून घुटका खातात .... तोंडातला घुटका रस्त्यावर इथे तिथे थुंकतात तेव्हा काळीज तुटतं.
त्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या काही मुली केवळ जिजामाता सारखी वेशभूषा करण्यात समाधान मानतात तेव्हा काळीज तुटतं.


  मी इतिहासाची अभ्यासक नाही.....तरी मला वाटतं भगवा म्हणजे एकी....... भगवा म्हणजे सुखी प्रजा.... भगवा म्हणजे स्त्रियांचा आदर..... भगवा म्हणजे सगळे समान......भगवा म्हणजे विरक्ती...... भगवा म्हणजे रयतेचे हित आधी मग राजाचे...... भगवा म्हणजे राज्य विकासाचा ध्यास..... भगवा म्हणजे अन्यायाची चीड.....

            आज आपण फक्त रंगात गुरफटलो आहे. महाराजांचे विचार मात्र विसरत चाललो आहे.
 शिव मूर्ती पूजेचं स्तोम करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याची ..... भावी पिढीवर तसे संस्कार करण्याची नितांत गरज आहे. 
जिजामाता होत्या म्हणून शिवाजी महाराज घडले. आपण त्यांच्या सारखी फक्त वेशभूषा करू शकतो. विचारांनी त्यांची बरोबरी करणे केवळ अशक्य .....
मात्र महाराजांचे विचार आत्मसाद केले तर त्यांना अपेक्षित असलेले निष्ठावान मावळे आपण नक्कीच बनू शकतो.

आज शिव जयंती निमित्त महाराजांच्या विचारांची आठवण ठेवून....... त्यांच्या विचारांना अंगिकारून वर्तन करत खऱ्या अर्थाने  मना मनात शिव ज्योत लावू या.......
 ही रांगोळी शिव चरणी अर्पण.......
जय भवानी... जय शिवाजी....

 ©️ अंजली मीनानाथ धस्के
(लिखाण आवडल्यास नावा सहितच शेयर करावे)

No comments:

Post a Comment